Saturday, January 30, 2010

सुरंगीची वेणी, ज्यूटची पिशवी आणि गोल्डफिशचा साबण

"गोव्याहून तुझ्यासाठी काय आणू? " माझा हा प्रश्न आमच्या नातेवाईकांना, परिचितांना एव्हाना तोंडपाठ झाला होता.
आयुष्यातील पहिलीवहिली शाळेची लांब पल्ल्याची सहल. माझा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. जो भेटेल त्याला ह्या आगामी गोवा सहलीचे इत्यंभूत वार्ताकथन होत होते. आम्ही काय काय स्थळे पाहणार, कोणकोणत्या बीचवर जाणार, कसा प्रवास करणार.... एक ना दोन! आणि सर्व स्वयंस्फूर्त माहितीची गाडी "तुझ्यासाठी काय आणू? " ह्या प्रश्नावर येऊन थांबायची.
अर्थात मला नाही तरी इतरांना माझ्या आईवडीलांच्या खिशाची काळजी होती म्हणा! त्यामुळे बहुतेक सगळेजण "तुला आवडेल ते आण," अशा जुजबी बोलण्यावर माझी बोळवण करत होते. तरीही माझ्या एका बहिणीचा व एका मास्तरीणबाईंचा मी पिच्छाच पुरविला होता जणू! जेव्हा भेटतील तेव्हा विचार असे करून त्यांना भंडावून सोडले होते. बहिणीने बराच विचार केला आणि म्हणाली, "तुला तिथे सुरंगीच्या फुलांची वेणी मिळाली तर आण नक्की! " मास्तरीण बाईंनी ज्यूटची पिशवी आणायला सांगितली. "फार महाग नक्को हं! खूप बोजड पण नको. आणि पिशवीचे बंद नीट तपासून आण गं बाई!! नाहीतर तुटायचे लगेच! " इति मास्तरीण बाई. आणि आमच्या एका परिचितांनी "तो बेसिनवर टांगायचा साबण मिळतो ना, नाही का नाडी असते त्याला.... तो गोल्डफिशचा साबण मिळाला तर घेऊन ये दोन-तीन! बरेच दिवस टिकतो म्हणे! " अशी खास फर्माईश केली मी गोव्याला जाणार हे कळल्याबरोबर!
आता सुरंगीच्या फुलांबद्दल मी पहिल्यांदाच ऐकत होते. ती कशी दिसतात, त्यांचा सुवास कसा असतो, कोठे मिळतात ह्याबद्दल ठार माहिती नव्हती. ह्या अगोदर ज्यूटचीच काय, साधी गोणपाटाची पिशवी घ्यायला पण मी बाजारात गेले नव्हते. आणि त्या अद्भुत गोल्डफिश साबणाचे नावही मी उभ्या जन्मात (उण्यापुऱ्या पंधरा वर्षांच्या आयुष्यात) ऐकले नव्हते! पण प्रथमच परगावी, आईवडीलांच्या देखरेखीविना शॉपिंग करायची संधी मिळत होती, ती कोण सोडणार! मागे शाळेची ट्रीप मुंबईला गेल्यावर मी एलिफंटा गुंफांजवळच्या बाजारातून पिसापिसाची टोपी घेऊन आले होते. नंतर ती टोपी कपाटाची शोभा वाढवित अनेक वर्षे तशीच पडून होती. तिच्यावरची पिसेसुद्धा मी इतर कोणाला काढू दिली नव्हती. शेवटी घर बदलताना हरवली (की तिचे अजून काही झाले?). पण ह्या खेपेस असली काही वायफळ खरेदी करायची नाही अशी मातृदैवताची सक्त ताकीद होती.
गणपतीपुळ्याला थोडा वेळ थांबून आमची इयत्ता नववीची सहल गोव्याला मार्गस्थ झाली खरी, पण गोव्यात वेगळेच भयनाट्य घडत होते. आम्ही रात्रीच्या अंधारात, उशीरा गोव्यात पोहोचलो. मुक्कामी रात्रभर विश्रांती घेतली व दुसरे दिवशी सकाळी स्थलदर्शनासाठी तय्यार होऊन बसलो. परंतु आमचे सहल संयोजक, बरोबर आलेले शिक्षक व मुख्याध्यापिका तणावात होते. रात्रीतून गोव्यात दंगल उसळली होती. लोक रस्त्यांवर चॉपर, लाठ्याकाठ्या, रॉकेल -पेट्रोलचे डबे घेऊन उतरले होते. काही ठिकाणी दगडफेक झाली होती. काही रस्ते बंद झाले होते, काही बंद केले होते. गोव्यात काही ठिकाणी कर्फ्यू लागला होता. आणि आंदोलकांनी गोव्याच्या सीमा रस्ते अडवून बंद केल्या होत्या.
पण आम्हा मुलींना यातील काहीच माहिती नव्हती. मोबाईलचा जमाना नसल्यामुळे व तेथील स्थानिक वृत्तपत्रांची दखल न घेतल्यामुळे आम्हाला या सर्व घटनांची सुतराम कल्पना नव्हती. आपण आज गोवा फिरणार, मजा करणार अशा सुंदर दिवास्वप्नांत आम्ही मुली गुंगलो होतो. सर्व मुली आपापल्या बसेस मध्ये जाऊन बसल्या. थोड्या वेळाने मुख्याध्यापिका बसमध्ये चढल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी व ताण स्पष्ट दिसत होता. पण तरीही कमालीच्या शांततेने त्यांनी आम्हाला परिस्थितीची कल्पना दिली. गोव्याच्या सीमांवरही हिंसाचार चालू असल्याने आम्ही परत पुण्याकडे फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्याऐवजी त्यातल्या त्यात शांत भागांत जाऊन स्थलदर्शन करण्याची कल्पना सर्वांनाच पसंत पडली.

जसजसे रस्ते मागे पडत होते तसतशी आम्हाला हळूहळू परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव होऊ लागली होती. कोठे रस्त्यावर अर्धवट जळलेल्या, धुमसत असलेल्या टॅक्सीज, रिक्शा.... रस्त्यावर मधोमध पडलेल्या कोणाच्या तरी तुटक्या वहाणा, सुनसान ओस पडलेले रस्ते..... आमच्या मनातील गोवा शहर आणि प्रत्यक्षात दिसलेले गोवा शहर यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता. काही ठिकाणी आम्हाला आपापल्या सीटवर डोके गुडघ्यांत घालून वाकून बसण्याची सूचना यायची. सगळ्या मुली एकजात चुपचाप डोकी खाली घालून ओणव्या झालेल्या. त्या त्या रस्त्यांपुरती गाणी नाहीत, भेंड्या नाहीत की गप्पा नाहीत. सर्व कसं शांत. तरीही एखादा दगड भिरभिरत यायचाच बसच्या रोखाने! एकदा पुढच्या एका खिडकीच्या काचेला तडा गेला, पण कोणाला इजा झाली नाही. एकदा एक जमाव मागे लागला, पण बसचालकाच्या कौशल्यामुळे वाचलो.
शांतादुर्गेच्या देवळाबाहेर सुरंगीची वेणी दिसली. कमळाचे हारही दिसले. पण माझ्या मनातला त्यांचा सुगंध हरपला होता. त्या सुरंगीला मात्र मी डोळे भरून न्याहाळून घेतले. पुन्हा कोठे दिसली तर ओळखता यावी म्हणून. तिचा मंद मधुर सुगंध फक्त सायंकाळी जाणवतो असे मला कोणीतरी सांगितले. मडगावच्या बाजारात मला ज्यूटच्या पिशव्याही दिसल्या व गोल्डफिशचा साबणसुद्धा! भराभर, सावध चित्ताने, कसलीही घासाघीस करण्याच्या भानगडीत न पडता त्यांची खरेदी केली. त्या खरेदीतील मजा आता गेली होती. भीतीची चव अजूनही तोंडात रेंगाळत होती. चर्चेस पाहून झाली. मंगेशीचे दर्शन झाले. ज्या बीचवर जाण्याची आम्ही उत्कंठेने वाट पाहत होतो ते बीच दंगलीमुळे लोकांना बंद होते. तरीही एका भल्या सकाळी सहल संयोजकांनी आम्हाला मोठे धार्ष्ट्य करून तिथे नेलेच! बीचच्या जवळ पोहोचायचा रस्ता काही आंदोलकांनी झाडांचे ओंडके आडवे घालून अडविला होता. आमची बस तिथे अडल्यावर मागून एक मोठा जथा आला....त्यांच्या हातात दगडधोंडे तयारच होते. आम्ही मुली व शिक्षिका बसमध्ये डोकी खाली घालून श्वास रोधून आता पुढे काय होते ह्याची वाट पाहत होतो. सहल संयोजक खाली उतरले. मोठ्या धैर्याने व कौशल्याने त्यांनी त्या जमावाच्या म्होरक्याला ही बस पुण्याहून आली आहे; बसमध्ये निरागस, कोवळ्या वयाच्या पुण्याच्या नामवंत शाळेतील विद्यार्थिनी आहेत, गोव्याला पहिल्यांदाच आलेल्या आहेत वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या. थोड्या वेळाने जमावाने मागचा परतीचा अडवलेला रस्ता सोडला. आम्ही बीचवर न जाताच परत फिरलो.

गोव्याहून परत पुण्याला येणे हेही वाटेतल्या आंदोलनामुळे अग्निदिव्यच झाले होते. वाटेतील गावे आपला आतिथ्यशील स्वभाव सोडून उग्र, हिंसक झाली होती. वाटसरूंची लुबाडणूक, त्यांना अडविणे, वाहनांवर दगडफेक ह्या गोष्टी सर्रास चालू होत्या. पण अशा परिस्थितीतही आम्हाला परत फिरणे भागच होते. सहल संयोजकांनी बरोबर घेतलेला शिधा संपत आला होता. जास्त दिवस गोव्यात राहणे परवडणारे नव्हते. पुण्यातही सर्व मुलींचे पालक गोव्याच्या बातम्या वाचून चिंतेत होते. येताना आम्हाला परतीच्या मार्गावरील एका बीचचा आनंद काही काळ लुटता आला. मग सुरू झाला एक लांबच लांब प्रवास! अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी रस्ते बंद केल्यामुळे बसचालक दुसऱ्या, नेहमी वापरात नसलेल्या आडरस्त्यांनी बस नेत होता. गावांच्या सीमेवर आलो की आम्ही बसमधील सर्वजण गुडघ्यांत डोकी खुपसून संतापलेल्या, आक्रमक जमावांपासून आपापले रक्षण करीत होतो. नेहमीचा रस्ता न घेतल्यामुळे तेवढाच पल्ला गाठायला आम्हाला दुप्पट वेळ लागत होता. सुरुवातीला अन्न-पाण्याचा पुरवठा सहल संयोजक नियमितपणे करत होते, पण प्रवासाचा काळ जसा वाढला तसतसे खाद्यपदार्थही थोडेथोडे, बऱ्याच अंतराने येऊ लागले. कधी गावठी शेवबुंदी, कधी फ्रायम्स, कधी कोरडी साटोरी.... मुलींनीही त्यांच्याकडचा सगळा खाऊ वाटून संपविला. पाणी तर जपूनच पीत होतो. कारण मधल्या वाटेत कोठे 'थांबण्याची'पण सोय नव्हती. नाहीतर मग निसर्गाच्या कुशीत, झाडांच्या आडोशाला..... आम्हाला आमच्या बसचालकाचे कौतुक वाटत होते. कारण एवढे मोठे अंतर कोठेही फारसे न थांबता, विश्रांती न घेता गाडी हाकणे, आडवाटा धुंडाळणे, जमावापासून बसचे शिताफीने रक्षण करणे ह्या सोप्या गोष्टी नव्हत्या.
पुण्यात पोहोचलो तेव्हा आम्ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल अठरा तास 'लेट' होतो. वाटेतून पुण्याला कोणालाही संपर्क साधता न आल्याने सर्व मुलींचे पालक शाळेवर व शिक्षिकांवर जाम उखडलेले होते. पण त्या तरी काय करणार होत्या बिचाऱ्या! वाटेत कोठे धड टेलिफोन बूथही दिसला नव्हता. आणि महाराष्ट्रात आल्यावर कधी एकदा पुण्याला पोहोचतो म्हणून बसचालकाने बस कोठेही न थांबविता थेट पुण्याला आणली होती. आम्ही पोचलो तेव्हा रात्रीचा बराच उशीर झाला होता. गेले दोन-तीन दिवस ना धड झोप, ना अन्न, सततचा प्रवास आणि ताण यांमुळे सर्व मुलीही गप्प गप्प होत्या. घरी गेल्यावर आवरून मी अंथरुणावर अंग लोटून दिले. पण अजूनही आपण बसमध्येच आहोत, प्रवास करत आहोत असा भास होत होता. रात्रीतून मी एक-दोनदा दचकून उठलेदेखील... पण आजूबाजूला पाहिले तेव्हा चिरपरिचित सामान, फर्निचर दिसले. आपलेच घर आहे ह्याची खात्री पटली. पुन्हा झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी घरातल्यांनी, भेटणाऱ्यांनी "काय काय खरेदी केली? " असे मोठ्या थट्टेने मला विचारले खरे, पण त्यांना काय सांगावे, काय दाखवावे असा प्रश्न मला पडत होता. न राहवून विकत घेतलेली सुरंगीची वेणी तिच्या वाळक्या द्रोणाच्या आवरणात न उमलता तशीच सुकून गेली होती. ज्यूटची पिशवी एका बाजूने चेपली गेली होती. गोल्डफिश साबणातील नावीन्य आता उरले नव्हते. पण रस्त्यावरून जाता जाता माझ्या नजरेत भरलेले आणि मी विकत घेतलेले गोव्याचे देखणे, गडद चित्र त्याच्या फ्रेममधून "आय लव्ह यू गोवा! " सांगत मला जणू हा अनुभव मागे टाकून नव्या उमेदीने जगायला सांगत होते!
-- अरुंधती

Thursday, January 28, 2010

दंतविहीनांचे दाताळ अनुभव


आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे? आता एखाद्या छोट्या बाळाचे बोळके निरागस हसू पाहून आपल्याही चेहऱ्यावर जसे नकळत स्मित उमटते त्याच सहजतेने कोणा म्हातारबाबांचे किंवा म्हातारबाईंचे बोळके हसू पाहिले की मलाही हसू फुटल्याशिवाय राहत नाही. कदाचित या हास्याचा संबंध बालस्मृतींशीही असण्याची दाट शक्यता आहे! आमच्या भाड्याच्या जागेच्या मालकीणबाई आमच्याच खालच्या जागेत राहायच्या. त्या व्यवसायाने डेंटिस्ट (दंतशल्यविशारद) होत्या. घरातच त्यांचा ऐसपैस दवाखाना होता. त्यांच्याकडे अनेक लोक कवळ्या बनवून व बसवून घ्यायला येत असत. त्यांच्याकडील पेशंट्स चेहऱ्यावरील करुण भावावरून सहज ओळखता येत असत. येताना व जातानाच्या त्यांच्या चेहऱ्यांत जमीन-अस्मानाचा फरक पडलेला असे. कदाचित म्हणूनच मी व आमच्या कुटुंबीयापैकी कोणीही त्यांच्याकडून आमचे दंतकाम करून घेण्यास कधीच धजावलो नाही. कवळ्या सोडल्या तर त्यांच्याकडे इतर पेशंट्सची फारशी गर्दी नसे. दवाखान्याच्या आतील बाजूस असलेल्या छोटेखानी जागेत त्यांचे हे कवळ्यांचे कारा(गीर)गृह थाटलेले होते. अतिशय जुनाट हत्यारांनी त्यांचे हे कवळीकाम चालत असे. अनेकदा मी व मालकीणबाईंचा माझ्याच वयाचा नातू दवाखान्यावरील पोटमाळ्यात लपून भयचकित व उत्कंठित नजरांनी ह्या कवळ्या आकाराला येताना पाहत असू. नंतर मोठ्यांची नजर चुकवून त्या कवळ्या व त्यांचे साचे हळूच हाताळत असू. वरच्या व खालच्या जबड्याच्या कवळ्या एकमेकांवर आपटण्याचा आविर्भाव करत त्या कवळ्याच जणू बोलत आहेत अशा थाटात घशातून वेगवेगळे आवाज काढण्यात आम्हाला फार मजा वाटे. मालकीणबाईंच्या यजमानांनाही वयोपरत्वे कवळी बसवली होती. तोंड धुताना त्यांनी कवळी काढून बाजूला ठेवली की ती कवळी लंपास करून धावत सुटायचे हा आमचा लाडका उद्योग होता. मग नंतर दोन-चार धपाटे खाल्ले की ती कवळी परत केली जायची. मालकीणबाईंचे यजमान आपली कवळी काचेच्या पेल्यात घालून विसळायचे. प्रत्येक खाण्याजेवणानंतर त्यांना बेसिनवर उभे राहून भांडी घासल्यासारखी त्यांची कवळी घासताना पाहून आमच्या बालमनांमध्ये उगाचच करुणा दाटून यायची.

दर रविवारी त्यांच्याकडे त्यांचा समवयस्क मित्रमैत्रिणींचा रमीचा नाहीतर ब्रिजचा अड्डा जमायचा. करड्या-पांढऱ्या केसांचे बॉब्ज केलेल्या, स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेल्या, ओठांना लिपस्टिक फासलेल्या मालकीणबाईंच्या मैत्रिणींना खाण्या-पिण्याची राउंड झाल्यावर हळूच बेसिनवर आपली कवळी काढून साफ करताना पाहून आम्हा बालकांना हसू न आले तरच नवल! त्यामुळे कवळी व बोळके यांचे दर्शन झाले की आजही माझ्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते. मध्यंतरी माझे वडील व दोन्ही काका एका कार्याच्या निमित्ताने एके गावी गेले होते. तेथील लोकांनी त्यांना हौसेने खाऊ म्हणून बॉम्बे हलवा दिला. आता ज्यांनी हा हलवा खाल्ला किंवा पाहिला आहे त्यांना कल्पना असेल की तो किती चिकट व चिवट असतो ते! परतीच्या प्रवासात अपरात्री भूक लागली म्हणून त्यांनी हा हलवा खायला घेतला अन... काकांची कवळीच हलव्यात रुतून बसली व ती निघता निघेना! इतर दोन्ही बंधू भावाला साहाय्य करण्याचे सोडून खदखदा हसत भावाची फजिती पाहत बसले. मग वडिलांनी हलवा खायला घेतला. त्यांची अपेक्षा की आपल्या तोंडात एकच दात शिल्लक असल्यामुळे हा हलवा आपल्याला त्रास देणार नाही. परंतु त्यांची ही आशा अतिशय फोल ठरली. त्या हलव्याने त्यांच्या एकुलत्या एक दाताला व हिरड्यांना असे काही घोर आलिंगन दिले की ते रात्रभर कळवळत होते. दुसऱ्या काकांनी सुज्ञतेने हलवा न खाता भुकेले राहणे पसंत केले. हा किस्सा मी मोठ्या चवीने हसत हसत चुलतभावाला ऐकवत होते तर तो म्हणाला, काळजी करू नकोस! त्याचे बाबा (माझे काका) काशी-प्रयागाला गेले होते तेव्हा त्यांनी गंगेत डुबकी लगावली आणि त्यांची कवळीच गंगेच्या प्रवाहात वाहून जायला लागली!! ('हर हर गंगे' म्हणताना त्यांचे तोंड त्यांनी जरा जास्तच उघडले असावे! ) आणि कवळीच्या मागे ते 'माझी कवळी, माझी कवळी' करत जाऊ लागले, आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे दोस्त आपला मित्र असा कोठे चालला म्हणून त्यांना सावरायला त्यांच्या मागे मागे!!! कोणालाच नक्की काय गोंधळ चाललाय ते लक्षात येईना! शेवटी कसेबसे गंगेच्या वेगवान प्रवाहाच्या दिशेने कवळीच्या मागे जाणाऱ्या माझ्या काकांना लोकांनी आवरले व त्यांना त्यांच्या कवळीसकट काठावर आणून सोडले. एक दिवस माझी थोरली मावशी आमच्याकडे आली. आईने तिला काहीतरी खाण्याचा खूप आग्रह केला. पण ही आपली काहीच खायला तयार होईना. फार बोलत पण नव्हती. खूप खोदून विचारल्यावर तिने हळूच सांगितले, अगं, आज कवळी घरीच विसरले! ती घाईघाईत कवळी घालायचे विसरून आली होती. अशीच एकदा प्रवासाला गेले असताना सोबत एक वृद्ध बाई होत्या. सकाळी त्या तोंड वगैरे धुवून आल्या व त्यांच्या हँडबॅगेत काहीतरी धुंडाळू लागल्या. त्या शोधत असलेली वस्तू त्यांना काही केल्या सापडेना. अगदी हैराण झाल्या होत्या. न राहवून मी त्यांना मदत करू का, म्हणून विचारले. तशी त्यांनी त्यांची हॅंडबॅगच माझ्या पुढ्यात ठेवली व लाल रंगाची नक्षीकामाची डबी त्यातून धुंडाळायला सांगितले. आतील सामानाची बरीच उलथापालथ केल्यावर मला एकदा का ती डबी सापडली. वाटले, काहीतरी दागिना असेल म्हणून त्या एवढ्या कासावीसपणे शोधत असतील. पण छे! आत त्यांची आदल्या रात्री काढून ठेवलेली कवळी होती!! परवा सकाळी न्याहारी करताना अचानक आईचा समोरचा दात तिच्या हातात आला. गेल्या वर्षभरात अनेक दातांनी तिचा निरोप घेतला आहे. आता समोरचा, दर्शनी भागातील दात असा दगाबाजाप्रमाणे कोणतीही पूर्वकल्पना न देता गारद व्हावा म्हटल्यावर ती दुःखी झाली. तिच्या गेलेल्या दाताचा ती असा शोक करीत असताना मला मात्र तिच्या मुखातील दर्शनी भागातील खिंडार पाहून कमालीचे हसू येत होते. शेवटी ते दाबलेले हसू बाहेर पडलेच! एकदा का मी हसू लागले आणि ते आवरताच येईना! त्याच दिवशी दुपारी माझ्या दाढेचा एक तुकडा अलगद हातात आला. आईने माझ्याकडे फक्त विजयी मुद्रेने पाहिले. मलाही आता कल्पनेत माझी बोळकी मूर्ती दिसू लागली होती!!
-- अरुंधती

मदतीचा हात


आज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला नव्हता. लक्ष्मी म्हणजे माझी वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी असणारी, पण अतिशय बोलघेवडी, माणूसवेडी, अगत्यशील दाक्षिणात्य मैत्रीण! आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे तेवढीच अनौपचारिक! तिच्या घरच्या समस्या ती मोकळेपणाने सांगणार, माझ्या टिपिकल मराठी वागण्यावर खळखळून हसणार, कामात असली तर मला तिच्या नऊ वर्षांच्या चिमुरडीच्या - मीनूच्या तावडीत सोडून एकाच वेळी स्वैपाक, फोन, दरवाज्याची बेल, कामाच्या बाईवर देखरेख, वृद्ध सासऱ्यांना काय हवे-नको ते बघणे अशा अनेक जबाबदाऱ्या दशभुजेच्या आवेशात लीलया पेलून चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम राखणार....


दरवाज्याबाहेर घातलेली सुबक रांगोळी मी कौतुकाने न्याहाळत असतानाच लक्ष्मीने दार उघडले. नेहमी टवटवीत असणारा तिचा चेहरा थोडा काळजीत दिसत होता. मला पाहून तिच्या चर्येवर आनंदमिश्रित आश्चर्य उमटले खरे, पण त्यात एरवीची चमक नव्हती. काहीतरी नक्की बिनसले होते! ती एकीकडे माझ्याशी बोलत होती पण वारंवार तिची अस्वस्थ नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे व दरवाज्याकडे जात होती. तिची चलबिचल मला पाहवेना. "काय झाले गं? " माझ्या प्रश्नासरशी ती ताडकन उठली व बाल्कनीत जाऊन खालच्या रस्त्यावर एक नजर घालून आली.

"अगं, सांगशील का काय झालं ते? " मी पुन्हा विचारले.

एवढा वेळ आणलेले अवसान गळल्यासारखे ती धपदिशी सोफ्यावर बसली. "मीनू अजून आली नाही परत तिच्या मैत्रिणीकडून! अर्ध्या तासापूर्वीच घरी पोचायला हवी होती. मी फोन केला तिच्या मैत्रिणीला. इथे पलीकडच्या रस्त्यावर राहते ती. चालत घरी यायला जेमतेम दहा मिनिटे लागतात. रस्त्यात कोणी भेटले तरी एव्हाना घरी यायला हवी होती गं ती.... छे! मी तिला एकटं घरी परत यायची परवानगीच द्यायला नको होती!! " लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचे कावरेबावरे भाव मला अनोखे होते. कायम जिला उत्साहाने खळाळताना पाहिले आहे तिला असे पाहायची सवय नव्हती ना! मी तिचे गार पडलेले हात हातात घेऊन म्हटले, "आपण जायचं का तिला रस्त्यावर शोधायला? कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय तिनं? चल, एकीला दोघी असलो की पटापट शोधता येईल... "

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच घरातला फोन वाजला. लक्ष्मीने अक्षरशः फोनवर झडप घातली. पलीकडे मीनूच्या मैत्रिणीची आई होती. थोडा वेळ मला अगम्य भाषेत तिच्याशी बोलल्यावर लक्ष्मीने फोनचा रिसीव्हर जाग्यावर ठेवून दिला.

"ती म्हणते आहे की त्यांच्या सोसायटीच्या चौकीदाराने तिला साधारण पाऊण तासापूर्वी सोसायटीतून बाहेर पडताना पाहिलंय, " लक्ष्मीच्या आवाजात चिंता दाटून आली होती. "कुठे, गेली कुठे ही मुलगी अशी अचानक?"

"अगं, तिची कोणी मैत्रीण-मित्र भेटले असतील रस्त्यात तिला.... त्यांच्याशी गप्पा मारत बसली असेल.... " माझा तिची समजूत काढायचा प्रयत्न. त्यावर मान नकारार्थी हालवीत लक्ष्मीने ती शक्यता फेटाळून लावली.

थोडा वेळ आम्ही दोघी शांत बसलो, आपापल्या विचारात हरवून.

माझ्या नजरेसमोर मीनूचा तरतरीत, गोड चेहरा येत होता. आपल्या आईसारखीच सतत उत्साहाने लवलवणारी, लाघवी, खट्याळ मीनू. आपल्या आजोबांना नीट दिसत नाही म्हणून त्यांना जमेल तसा पेपर वाचून दाखविणारी, घरात आलेल्या पाहुण्यांकडे एखाद्या मोठ्या बाईच्या थाटात लक्ष देणारी, अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून कुरकूर करणारी, आइसक्रीमचे नाव काढले की गळ्यात पडणारी....

अचानक लक्ष्मी उठली, आतल्या खोलीतून तिची पर्स व मोबाईल घेऊन आली. मी पण उठले, पर्स काखोटीला मारली. पायात चपला सरकवणार तेवढ्यात आठवण झाली, "अगं, मीनूचे आजोबा कुठं आहेत? " लक्ष्मीने पर्समधून घराच्या चाव्या बाहेर काढल्या होत्या.

"ते माझ्या धाकट्या दिरांकडे गेलेत आठवडाभरासाठी. चल, तू लिफ्ट बोलाव तोवर मी घर लॉक करते, " इति लक्ष्मी.

मी दारातून बाहेर पडून लिफ्टकडे वळणार तोच लिफ्टचा आवाज आला, दारातून बाहेर येणारी मीनूची छोटीशी मूर्ती पाहून किती हायसे वाटले ते आता शब्दांत सांगू शकणार नाही. मीनू बाहेर आली आणि तीरासारखी धावत दार लॉक करत असलेल्या लक्ष्मीच्या गळ्यातच पडली. 'अगं, अगं, अगं... " करत लक्ष्मीने कसाबसा आपला तोल सांभाळला, हातातून पडत असलेली पर्स टाकून लेकीचा छोटासा देह पोटाशी धरला. काही सेकंद मायलेकी काहीच बोलल्या नाहीत. एकमेकींना घट्ट धरून होत्या. शेवटी मीनूची आईच्या मिठीतून सुटण्यासाठी चुळबूळ सुरू झाली. "अम्मा, आता बस्स ना... " लक्ष्मीने काही न बोलता दार पुन्हा उघडले, लेकीला आत घेतले. त्यांच्या मागून मीही लक्ष्मीची विसरलेली पर्स उचलून आत शिरले.

आत गेल्यावर मात्र लक्ष्मीचा एवढा वेळ मनावर ठेवलेला संयम सुटला. तिने मीनूच्या समोरच बसकण ठोकली, लेकीला तिच्या दोन्ही दंडांना धरून स्वतःसमोर उभे केले. दोघींमध्ये पुन्हा मला न कळणाऱ्या खडडम खडडम भाषेत बरेच संभाषण झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून मी त्या काय म्हणत असतील ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. मीनू बराच वेळ श्वासाचीही उसंत न घेता जोरजोरात हातवारे करून तिच्या आईला घडलेले सांगत होती. सुरुवातीला काहीसा घुश्शात असलेला लक्ष्मीचा चेहरा लेकीच्या स्पष्टीकरणाबरोबर हळूहळू निवळत गेला. पण तरीही तिने मीनूचे बोलणे संपत आले तशी इंग्रजीमिश्रित खडडम भाषेत तिला ताकीद दिली. लेकीने समजल्यागत मुंडी हालविली व आतल्या खोलीत खेळायला निघून गेली.

"काय म्हणत होती मीनू? " मी उत्सुकतेने विचारले.

" आज माझ्या लेकीने खूप चांगले काम केले आहे गं.... " लक्ष्मीचे गोल टपोरे डोळे पाण्याने भरून आले होते. घशाशी आलेला आवंढा गिळून ती म्हणाली, " आज परत येताना रस्त्याच्या बाजूला तिला आमच्या घराच्या कोपऱ्यावर भाजी विकायला येणारी भाजीवाली बेशुद्ध पडलेली दिसली. मीनूने लगेच शेजारच्या एका दुकानात जाऊन त्या दुकानदाराकडे मदत मागितली.




आजूबाजूचे इतर काही विक्रेतेही तोवर जमा झाले. मग त्यातल्याच एका बाईने त्या भाजीवालीला पाणी पाजून शुद्धीवर आणले आणि तिला रिक्शात घालून दवाखान्यात घेऊन गेली. तोवर कोणीतरी त्या भाजीवाल्या बाईच्या मुलाला निरोप धाडला होता. तो मुलगा येईपर्यंत मीनू त्या भाजीवालीची हातगाडी सांभाळत रस्त्यातच उभी होती. मगाशी तो आला म्हटल्यावर ही तिथून निघाली व तडक घरी आली! म्हणून उशीर!!" लक्ष्मीच्या आवाजात लेकीविषयी कौतुक होते, पण काळजीचा स्वर पुरता मिटला नव्हता.

मी तिला म्हटलेही, "अगं, आता आली ना ती परत? मग पुन्हा कसली काळजी करतेस? "

त्यावर लक्ष्मीचे ट्रेडमार्क हसू पुन्हा तिच्या ओठांवर उमटले आणि जणू डोक्यातले विचार झटकत ती पुटपुटली, "कायम मीच तिला सांगत आले आहे की दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, अडल्यानडल्याला मदत करावी.... आता या बाईसाहेब कोणाकोणाच्या मदतीला अशा धावून जातात ते पाहायचं.... हां! मात्र आता तिला वॉर्निंग मिळाली आहे की असं काही झालं की आधी फोन करून आईला कळवायचं... "

लक्ष्मीच्या उद्गारांवर मी कुतूहलाने विचारले, "म्हणजे त्याने काय साध्य होईल?"

त्यावर खळखळून हसत लक्ष्मीने माझे हात हातात घेतले व आपल्या हसण्याचे चांदणे डोळ्यांतून उधळत उद्गारली, "म्हणजे मग मीपण तिच्या मदतीला जाईन!! "

-- अरुंधती

Tuesday, January 19, 2010

नैनितालच्या आठवणी



नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर.....

माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता.

महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो. अभ्यासाच्या सर्व स्थळांची सहल करून झाल्यावर आमच्या सहलीचा मोर्चा नैनितालकडे वळला. प्रवासात अखंड टिवल्याबावल्या करणे, चिडवाचिडवी, भेंड्या, उखाळ्यापाखाळ्या, खोड्या असे उद्योग चालू होते.

दिल्लीहून एक संपूर्ण रात्र नागमोडी, वळणावळणाच्या रस्त्यांनी बसचा प्रवास केल्यावर पहाटे आलेल्या नैनितालमधील ऐन नोव्हेंबर महिन्यातील हाडे गोठवून टाकणारी थंडी आम्हाला जरा अनपेक्षितच होती.

तशी आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी पूर्वसूचना दिली होती. परंतु तरुणाईच्या जोषात आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

परिणामी, चाळीस जणांचा आमचा जथा कुडकुडत, थरथरत, सुन्न होऊन नैनितालच्या नैनी सरोवराच्या काठालाच लागून असलेल्या पर्यटक निवासात दाखल झाला. दिवसा साधारण तीन ते चार डिग्रीज सेल्सियस तापमान असायचे. रात्री ते किती घसरायचे ह्याची कल्पनाच न केलेली बरी! त्यात आम्ही सरोवराच्या काठालाच असल्याने तो गारठा अजूनच वेगळा! सकाळी दहा वाजता सूर्य उगवायचा (म्हणजे आभाळात धुगधुगी आल्यासारखा दिसायचा! ) बाकी वेळी धुकाळ वातावरण, बोचरी थंडी, रक्त गोठविणारे वारे आणि मधूनच दाटून येणारा अंधार! अहाहा!!


आमची स्थिती तर काय वर्णावी!! नाक, कान, चेहरे थंडीने कोरडे, लाल पडलेले... हात-पाय कधीही दगा देतील अशा स्थितीत! स्थानिक बाजारातील दुकाने उघडल्यासरशी आमची टोळी तेथील दुकानांमधून ढीगभर स्वेटर्स, शाली, कानटोप्या इत्यादी खरेदी करून आली. इतकेच नव्हे तर पुण्यातील आपल्या कुटुंबियांसाठीही प्रत्येकाने पुण्यात तीन - चार डिग्रीज सेल्सियस तापमान असल्याच्या थाटात वारेमाप गरम कपडे घेतले! (अजूनही १२ - १३ वर्षांनंतर आमच्या घरी नैनितालच्या लोकरी स्वेटर - शालींची पुण्याई पुरी पडत आहे, म्हणजे बोला! ) एवढ्या थंडीत प्रवासाने आखडलेले आमचे हात-पायही चटचट हालत नव्हते. अंघोळीच्या नुसत्या कल्पनेनेही जीव नकोसा होत होता. स्नानगृहात एरवी तासंतास रेंगाळणाऱ्या भद्रकन्या विजेच्या चपळाईने स्नानादिकर्म आटोपून बाहेर येत होत्या.

थंडीच्या मोसमामुळे नैनितालमध्ये प्रवाशांची फारशी गर्दी दिसत नव्हती. दुकाने, हॉटेल्सही पटापट बंद होत असत. आम्ही त्यातल्या त्यात स्वस्त व मस्त अशा ढाबावजा टपरीत बसून गरम चहा आणि विस्तवाच्या उबेचा आनंद घेत असू.

आमच्या रूममध्ये तसा पाचजणींमध्ये मिळून एक हीटर होता, पण ऐन रात्री तो बंद पडत असे. रूमची एक बाजू सरोवराच्या दिशेने उघडत होती. त्या बाजूला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या, जेणेकरून सरोवर व पलीकडील पर्वतराजींचा नयनरम्य देखावा सतत समोर असावा. पण आमच्या लेखी ह्या खिडक्या म्हणजे अधिक गारठण्याची क्रूर हमी होत्या! माझ्या मैत्रिणी थंडगार पडलेल्या गादीवर कूस जरी बदलावी लागली तरी अक्षरशः किंचाळत उठत असत, इतकी ती गादी बर्फासमान गार पडलेली असे. मला तर थंडीने झोपच नव्हती.

पहिल्याच रात्री माझ्या एका मैत्रिणीच्या पायात थंडीमुळे प्रचंड गोळे व मुंग्या आल्या.

आमच्या वर्गमित्रांना हे कळल्यावर त्यातील एकाने गुपचूप तिला थोडी ब्रँडी आणून दिली व रात्री ती पायाला चोळायला सांगितले.

पण ही मुलगी तर फार महान निघाली.... तिला औषधासाठी चमचाभर ब्रँडी पोटात तर घेणे सोडाच, पण ती पायाला चोळायलाही महासंकोच वाटत होता. शेवटी रात्री पुन्हा एकदा थंडीने किंचाळून झाल्यावर तिने पायाला कण्हत कुथत ब्रँडी चोळली व खोलीतील इतर सर्व जाग्या मुलींकडून बाकी कोणालाही न सांगण्याचे वचन घेतले! (जसे काही आम्ही हिची बदनामीच करणार होतो, कप्पाळ! )

थंडीमुळे आमचे सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे बेत बारगळले. एक तर धुक्यामुळे व कधीही पडणाऱ्या अंधारामुळे मुख्य शहरापासून फार लांब जाणे, डोंगर तुडविणे जरा आमच्यासारख्या नवख्यांना धोक्याचेच वाटत होते. शिवाय थंडीपायी सगळेजण एवढे गळाठले होते की दिवसभर बाजारात हिंडणे, रोप-वे वरून राईड घेणे, घुडसवारी करणे व नौकानयन याखेरीज खाणे-पिणे व झोपा काढणे (जमल्या तर, कारण थंडीमुळे झोपही यायची नाही! ) हाच उद्योग! त्यामुळे अनेकदा आम्ही क्वचितच उघड्या असणाऱ्या पर्यटन ऑफिसमध्ये घुसत असू व त्यांच्याकडील नैनिताल परिसराचे विविध रंगीत नकाशे, पुस्तिका यांच्यावर ताव मारून जणू आपण ती ती स्थळे प्रत्यक्ष बघत आहोत अशा तऱ्हेचे सोंग आणून मुक्त बडबड करीत असू.


एके दुपारी, मनाचा हिय्या करून मी व माझ्या दोन मैत्रिणींनी आतापर्यंत टाळत आलेल्या नौकानयनाचा लाभ घेण्याचे ठरविले. एक नावाडी ठरविला. दुपारची वेळ असल्याने सूर्य नावाला का होईना, आकाशात दिसत होता. अर्थात त्या उन्हात काही दम नव्हता. गार वारे वाहत होते. सरोवरात बोटींची जास्त वर्दळ नसली तरी अनेक लोक आमच्यासारखाच नौकानयनाचा आनंद लुटायला आल्याचे दिसत होते. हवेतला बोचरा गारठा कमी होण्याची कसलीच लक्षणे नसल्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजवयातील फॅशन सेन्स ला शोभणारे गरम कपडे घालून आलो होतो. (म्हणजेच, कपड्याच्या उबदारपणापेक्षा 'दिखावा' जास्त, हे सुज्ञांनी समजून घ्यावे! ) नावाड्याने नाव वल्हवायला सुरुवात केल्याबरोबर थोड्याच अंतरावर अचानक आभाळ दाटून आले. जोरात वारे वाहू लागले. आमची नाव गदगदा हालू लागली. सरोवरात इतरही बोटी होत्या. अंधारात नाव तशीच वल्हवली असती तर त्यांच्याशी टक्कर होण्याचा धोका असतो असे मौलिक ज्ञान आम्हाला नावाड्याकरवी मिळाले. कोंदलेला अंधार आकस्मिक होता. पण नावाड्याला ह्याची सवय असल्यामुळे त्याने सराईतपणे नाव थांबविली, स्थिर केली व अचानक दाटून आलेला अंधार सरायची वाट पाहत विडी शिलगावून बर्फाळ हवेत धुराची वलये सोडू लागला. इथे आमचे प्राण मात्र कंठाशी आले होते! आमच्यापैकी एकीलाच पोहोता येत होते. आजूबाजूला डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, एवढा गुडुप्प अंधार होता. नाव वाऱ्याच्या वेगासरशी डुगडुगत, डळमळत होती. नावाडी जगाची पर्वा नसल्यासारखा आपल्याच नादात होता. डोंगरातील एका देवळातून ऐकू येणारा अखंड घंटा गजर मात्र त्या अंधारातही आश्वासन देत होता. माझे सारे लक्ष त्या घंटानादाकडे एकवटले होते. मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना चालली होती. इतके दिवस आमची सर्वांची जी मौजमजा चालली होती, तिची चमक आता फिकी पडू लागली होती. अजून किती बघणार, किती पाहणार? किती प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर हे डोळे निवणार? किती वेगळे वेगळे पदार्थ चाखणार? असे किती पदार्थ चाखले म्हणजे समाधान होणार? अजून किती मौजमजा करणार? याला काही अंत आहे का? मनात असे आणि अजून बरेच विचार उमटत होते.


सरोवरावर निःस्तब्ध शांतता पसरली होती. पक्षीही अंधारात चिडीचूप झाले होते. वातावरणात भरून राहिला होता तो फक्त घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज व अविरत चाललेला घंटानाद! त्याक्षणी मनात काहीतरी हालले. एक पडदा गळून पडला. आपण जे काही करतोय त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या कार्याच्या दिशेने जाण्याची अंतर्सूचना मिळाली. गोंधळलेले मन जसे सावरत होते तोच सूर्यानेही अचानक काळ्यासावळ्या ढगांच्या व धुक्याच्या आडून एकदम बहारदार दर्शन दिले! सरोवरातील नौकाप्रवाशांमधून आनंदाचे एकच चीत्कार उमटले. आमच्या नावाड्याने नाव वळवून पुन्हा काठाला आणली. एवढा वेळ निसर्गाच्या ह्या आकस्मिक रूपाने अवाक झालेल्या माझ्या मैत्रिणींनाही कंठ फुटले. माझ्या डोळ्यांत आलेले कृतार्थतेचे अश्रू लपवितच मीही त्यांच्या चटपटीत गप्पांमध्ये सामील झाले.

काठावर आमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणी आमची वाटच पाहत होते. आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला तासाभरात मुक्काम हालविण्यासाठी तयार होण्याचा निरोप दिला होता.

कॉलेजवयीन नियमाला अनुसरून मी मनोमनच त्या सूर्यदेवतेला नमस्कार केला व एका अनामिक उत्साहाने पुढील प्रवासासाठी सज्ज झाले!

--- अरुंधती

Tuesday, January 05, 2010

भागवतकथेने घडविले व्रत!

आयुष्यात एकदा तरी भागवतकथा ऐकावी असे म्हणतात. मला आपल्या आयुष्यात हा योग किमान साठी-सत्तरी उलटल्याशिवाय येणार नाही ह्याची खात्री होती. परंतु बहुधा परमेश्वराला मला त्या भक्तिसागरात लवकरात लवकर बुचकळून काढायचे असावे. परिणामी माझ्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर, म्हणजे वयाच्या तिशीच्या आतच तो सुवर्णयोग जुळून आला.

माझ्या मैत्रिणीच्या आईने तिच्या कालवश झालेल्या सासूसासऱ्यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिद्वार येथे ऐन मे महिन्यात आयोजित केलेल्या भागवत सप्ताहाचे मला व माझ्या आईला साग्रसंगीत आग्रहाचे निमंत्रण दिले. मी उन्हाळ्याचे कारण पुढे करणार, तोच तिने माझ्यासाठी खास ए‌. सी. प्रवास व ए‌. सी. खोलीची व्यवस्था करू असे भरघोस आश्वासन दिले. आधीच मला भागवतकथासप्ताहा विषयी अपार उत्कंठा होती, त्यात महाराष्ट्रातील अतिशय नामवंत भागवत कथाकारांना मैत्रिणीच्या आईने कथेसाठी आमंत्रित केले होते. चोख बडदास्त ठेवली जाण्याची खात्री होती आणि सर्वात कळस म्हणजे हरिद्वारला गंगेच्या काठापासून थोड्या अंतरावरच कथासप्ताहाचे स्थळ होते! सर्वच गोष्टी एवढ्या सुंदर जुळून आल्यावर पुढचे दहा दिवस अविस्मरणीय रीतीने पार पडणार याची मला पक्की खात्री होती आणि झालेही तसेच! १४ मे ला पहाटे चार वाजता पुण्याहून गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस ने आमचा जवळपास शंभर - दीडशे लोकांचा जथा निघणार होता. आमच्यापैकी चार-पाच लोक सोडले तर बाकी सर्व मैत्रिणीचे नातेवाईक होते. १३ मे ला सायंकाळी माझा नाशिक येथे कार्यक्रम होता. कार्यक्रम रात्री उशीरा संपणार व मला तर लगेच पहाटेपर्यंत पुणे स्टेशन गाठायचे होते. कार्यक्रमाच्या आयोजकांना मी माझी अडचण सांगितली. त्यांनीही तत्परतेने माझ्या दिमतीला त्यांची गाडी व विश्वासू ड्रायव्हर दिला व सांगितले की माझा ड्रायव्हर तुम्हाला पहाटेपर्यंत वेळेत ट्रेनमध्ये बसवून देईल. आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. रात्री उशीरा ११ वाजता कार्यक्रम संपल्यावर मी गाडीत बसले आणि आयोजकांच्या ड्रायव्हरने कोठेही गाडी न थांबविता मला ठीक पहाटे पावणेचार पर्यंत पुणे रेल्वे स्टेशन वर आणून देखील सोडले होते! आमची ट्रेन आल्यावर सगळेजण भराभर गाडीत चढलो. माझा व आईचा ए‌. सी. डबा असल्याने तिथे फारशी गर्दी नव्हती. रात्रभर जागून काढल्याने मला कधी एकदा बर्थ वर देह लोटून देतो व सुखनिद्रेचा अनुभव घेतो ह्याची घाई झाली होती. पण जेमतेम तास-दोन तास डोळा लागला असेल तोवर आमच्या यजमान परिवाराने त्यांच्या आदरातिथ्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली. प्रथम गरमागरम वाफाळता चहा आला, त्या नंतर नाश्त्याची पाकिटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्या घेऊन चक्क यजमान स्वतः हजर झाले. गाडीतील त्यांच्या सर्व नातेवाईकांना ते जातीने नाश्त्याची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या पुरवित होते. मग दर अर्ध्या तासाने खाण्याच्या विविध पदार्थांची सरबत्तीच सुरू झाली. पोहे, कचोरी, समोसे, मिठाया, ज्यूस, चहा, पाणी, ढोकळा..... माणसाने खायचे खायचे म्हणून किती खावे? एक तर उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून हा आदरातिथ्याचा महापूर....!!!! थोड्याच वेळात मला ट्रिक लक्षात आली. आपण एखाद्या पदार्थाला नाही म्हटले तर तो पदार्थ घेऊन येणारे इतका आग्रह करीत की आपल्यालाच लाजायला होत असे. मग त्यांचा असा आग्रह 'सहन' करण्यापेक्षा तो पदार्थ मुकाट्याने ठेवून घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या स्टेशनला आमच्या यजमानांचे अजून नातेवाईक ह्या यात्रेत सामील होत होते व येताना त्यांच्याबरोबर खाद्यपदार्थांचे मोठमोठे बॉक्सेस घेऊन येत होते!! एका प्रकारे अतिशय सुरेख नियोजन केले होते ह्या सफरीचे! कोणालाही कसलीही उणीव भासू नये, त्रास होऊ नये ह्यासाठी यजमान परिवार व त्यांचे नातेवाईक खरोखरीच मनापासून झटत होते. त्यांच्या दिवसभरात ट्रेनमधून असंख्य चकरा झाल्या असतील व रात्रीही त्यांच्यातील पुरुषमंडळी जागरूकतेने डब्यांमधून गस्त घालत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली आले आणि एवढा वेळ ए. सी. चे सुख घेतलेल्या मला दिल्लीच्या उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली. सर्वांनी स्टेशनवरील क्लोकरूममध्येच अंघोळी-पांघोळी उरकून घेतल्या. भुकेचा तर प्रश्नच नव्हता एवढी आमची पोटे आदल्या दिवशीच्या अखंड खाद्य माऱ्याने तुडुंब भरली होती. तरीही ठराविक अंतराने खाद्यपदार्थ आमच्या दिशेने येतच होते! अखेर हरिद्वारला जायच्या गाडीत बसलो. एव्हाना तीन बसेस भरतील एवढी आमची जनसंख्या होती. माहोल पूर्ण पिकनिकचा, धमालीचा होता. गाणी, गप्पा, अंताक्षरी....प्रवासाचा पहिला टप्पा सुरळीत पार पडल्याने सगळेच जरा निवांत झाले होते. कडकडीत उन्हात प्रवास केल्यावर पुन्हा आमच्या बसेस मुख्य रस्त्यापासून जवळच एका निसर्गरम्य स्थळी दुपारच्या भोजनासाठी थांबल्या. येथे मात्र यजमान परिवाराने आतिथ्याची शर्थच केली होती. आमच्या जवळपास दोनशे लोकांच्या तांड्यासाठी त्यांनी दिल्लीहून एका आचाऱ्यालाच पाचारण केले होते, आणि आम्ही जेव्हा भोजनस्थळी पोचलो तेव्हा आचाऱ्याच्या मदतनीसांनी व यजमानांच्या अजून काही नातेवाईकांनी पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. झाडांच्या सावल्यांत, प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसून आम्ही तळपत्या सूर्याच्या साक्षीने पुरी, भाजी, हलवा, पुलाव, मठ्ठा, लोणचे अशा शाही भोजनाचा आस्वाद घेतला व पुढे निघालो. आतापर्यंत माझ्या मनात आपण भागवतकथेला चाललोय की खाद्ययात्रेला, असे सवाल येऊ लागले होते. परंतु 'आलीया भोगासी असावे सादर' अशा अर्थाचे थोर विचार करत आला क्षण सुखाचा मानण्यात मला धन्यता वाटू लागली होती. मजल-दरमजल करीत एकदाचे आम्ही हरिद्वारला पोहोचलो. सायंकाळची वेळ होती. गंगेच्या दर्शनाची घाई झाली होती. यजमान परिवाराने त्यांच्या समाजाच्या अद्ययावत धर्मशाळेत आम्हा सर्वांसाठी खोल्या आरक्षित केल्या होत्या. पण त्या खोल्या ताब्यात घेईपर्यंत धीर कोणाला होता! सर्वांनी बॅगा लॉबीतच सोडल्या व मिळेल त्या वाहनाने गंगातीरी पोहोचलो. "मातस्त्वं परमासि शक्तिरतुला सर्वाश्रया पावनी । लोकानां सुखमोक्षदाखिलजगत्संवंद्यपादांबुजा ॥ " हे गंगे, हे माते, हे जगत जननी, तुझ्या चरणकमलांचे दर्शन घेण्यास सारे विश्व व्याकुळले असते... त्या तुझ्या चरणांशी मी नतमस्तक आहे! सायंकाळचे ते गंगेचे मनोहर रुप डोळ्यांत साठवित हुरहुरत्या मनांनी आम्ही पुनश्च मुक्कामी पोहोचलो. वचन दिल्याप्रमाणे खरोखरीच यजमानांनी माझ्या खोलीत विशेष ए‌. सी. ची सोय केली होती! स्वर्गसुख ह्यापेक्षा वेगळं काय असतं? खोलीत जाऊन जरा फ्रेश होत होतो तोवर रात्रीच्या जेवणाची वर्दी आली. खरे तर आता प्रवासाचा शीण जाणवत होता. फारसे खायची पण इच्छा नव्हती. मात्र गेलो नसतो तर यजमानांना वाईट वाटले असते. एवं च काय, मी व आई खाली आवारात उभारलेल्या खास भोजनशाळेकडे निघालो. सर्व पाहुण्यांच्या स्वागताची चोख तयारी केलेली दिसत होती. मांडवाबाहेरही लोकांना बसायला खुर्च्या टेबले मांडली होती. मांडवात तर सर्वत्र चकचकाटच होता. यजमानांच्या जवळच्या परिवारातील सर्व पुरुष जातीने पगडी, फेटे घालून स्वागताला उभे होते. वयस्कर लोकांचे पायी पडून आशीर्वाद घेण्यात येत होते. प्रत्येक माणूस व्यवस्थित जेवतोय ना ह्याकडे घरातील स्त्रियांचे बारीक लक्ष होते. आम्हाला बरेचसे लोक अनोळखी होते. मग त्यांच्या परिवारातील विविध लोक आमची ओळख स्वतःहून करून घेत होते. आमचा अंदाज होता, रात्री प्रवास करून आल्यावर साधे कढीभाताचे जेवण असेल. पण येथेही त्यांनी साग्रसंगीत जेवणाचे आयोजन केले होते. मी कसेबसे दोन घास खाल्ले. सर्व स्वयंपाक साजूक तुपातील.... जेवणात भरपूर तळलेल्या, तुपातील पदार्थांची रेलचेल... असले जेवण मला नक्कीच मानवणारे नव्हते. खोलीवर परत आले पण अस्वस्थ वाटू लागले. जरा शतपावली करावी म्हणून बाहेर आले तोच माझ्यासाठी खास निरोप आला की तुम्हाला यजमानीण बाई शोधत आहेत. आता नवे काय? असे वाटून काहीशा बुचकळ्यानेच मी यजमानीण बाईंना गाठले. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शनचे ढग जरा मावळलेले दिसले. "बरं झालं बाई तू भेटलीस ते! एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय... बघ ना तुला काही करता आलं तर.... " मला काहीच उलगडा होईना.... आता कसला प्रॉब्लेम? आणि मी काय मदत करणार? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्या उत्तरल्या, " अगं, आमच्या भागवत कथा सांगणाऱ्या महाराजांबरोबर त्यांना साथ करणारी गायक, वादक मंडळी असतात. आमचे महाराज वेगळ्या ट्रेनने आले आणि त्या गायक-वादक मंडळींपैकी मुख्य गायकांची ट्रेन चुकली. गाड्यांना गर्दी एवढी आहे की ते लगेच येऊ शकतील असे वाटत नाही. तर तू गाशील का त्यांच्या ऐवजी? " आता थक्क होण्याची माझी खेप होती. मी जरा चाचरतच उद्गारले, "पण मला तुमची ती भजने, गाणी कशी येणार? मला तर काही माहीत नाही.... " ताबडतोब त्यांनी माझा हात धरला व मला लगोलग त्यांच्या महाराजांच्या कक्षात घेऊन गेल्या. महाराजांना त्यांनी अगोदर सांगून ठेवले असावे, कारण त्यांनीही माझे खुल्या हास्याने स्वागत केले. मी माझी अडचण सांगितल्यावर त्यांनी, ''तुम कुछ चिंता मत करो, यह किताब रख लो । बहुत ही सरल, सीधे भजन है । गानेमें कोई दिक्कत नही होगी तुम्हे । बस, मैं जैसा गाता हूं उसे ठीक ठीक वैसेही फॉलो करना... यदी कुछ यहां वहां हो गया तो हमारे और बाकी साथी सम्हाल लेंगे.... तुम बस मन लगा के गाना । राधेश्यामके चरणोंमें तुम्हारी सेवा अर्पन करना ।" इत्यादी इत्यादी बोलून मला अगदी निरुत्तर करून सोडले. झाले! एका अपरिचित ठिकाणी, अपरिचित समूहाबरोबर, अपरिचित गाण्यांना गायचे मी कबूल करून बसले..... दुसऱ्या दिवशीपासून माझ्या एका अनोख्या व्रताचा आरंभ झाला.... येथील जेवण, खाणे अतिशय रुचकर होते, परंतु जड होते. तुपातील पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ खाण्याची सवय नसल्याने असे खाणे घशाशी येत असे. त्यात मी गायचे कबूल केल्यामुळे सगळीच पंचाईत! मग सकाळी माफक फलाहार करायचा, गंगेत डुबकी घ्यायची, खोलीवर येऊन आवरायचे व त्यानंतर भागवत कथा सप्ताह स्थळी जाऊन इतर वादकांबरोबर त्या त्या सत्रात म्हणावयाच्या भजनांची व आरत्यांची तालीम करायची.. अल्प वेळातच सत्र सुरू झाले की जागरूकतेने कथेचा आनंद लुटतानाच महाराजांच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवायचे, योग्य ठिकाणी गायचे, आरत्या म्हणायच्या असा कार्यक्रम सुरू झाला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात लोक हमखास डुलक्या काढायचे. पण मी भागवत कथा पहिल्यांदाच ऐकत होते. महाराजांची ओघवती, रसाळ वाणी, मनोरम हृदयस्पर्शी कथापट, कसलेल्या वादकांची प्रोत्साहक साथ आणि शेवटच्या कर्पूरारतीत रोमांरोमांत जाणवणारे चैतन्य..... भक्ती, भक्ती म्हणतात ती हीच काय? तासनतास एकाच ठिकाणी बसल्यावरही पाठीला रग न लागणे, थकावट न जाणवणे, चित्तवृत्ती आल्हादित राहणे, कथेत इतके गुंगून जाणे की वेळेचेही भान न उरणे.... मला खूप मजा येत होती. सकाळ सायंकाळ गंगेचे दर्शन, गंगास्नान, गंगारतीचा सोहोळा अशी पर्वणी मिळत होती. जवळपास खूप सुंदर देवळे होती, तिथेही गेल्यावर उल्हसित वाटत असे. आणि गाण्याच्या ह्या अनपेक्षित संधीमुळे माझा रोजचा आहार अगदीच मित झाला होता. दुपारी व सायंकाळी घासभर ताकभात खायचा (फक्त त्याच एका पदार्थात साजूक तूप नसायचे! ) आणि इतर लोकांना अक्षरशः छप्पनभोगांवर ताव मारताना निरिच्छ वृत्तीने पाहायचे हाच माझा खाण्यापिण्याशी त्या दहा दिवसांत आलेला संबंध! नाही म्हणायला एके सायंकाळी आम्ही समोरच्या विशाल निसर्गरम्य क्षेत्र व्यापलेल्या हनुमानाच्या सुंदर मंदिरात गेल्यावर तेथील मुख्य पुजाऱ्यांनी प्रसादाचा खिचडी व शिऱ्याचा द्रोण हातात ठेवला.... प्रसादच तो! त्यामुळे तो खाल्ल्यावर घसा व पोट दोन्ही शांत राहिले. एक दिवस आमच्याबरोबर पुण्याहून आलेल्यांपैकी एकाने हार की पोडीवरील विशिष्ट ठिकाणी मिळणाऱ्या चाट-कचोरी-पकोड्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. (म्हणजे हे महाशय रोज आमच्याबरोबर सकाळ-सायंकाळ भोजनशाळेत जेवून पुन्हा खवय्येगिरी करायला भ्रमंती करत होते तर! ) साहजिकच मनात ते ते पदार्थ चाखण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या ठिकाणी जाऊन एका पदार्थाची ऑर्डर दिली... म्हटले बघू या, जर चव आवडली तर पुढची ऑर्डर देऊ. पण हाय! येथेही मला आडवे आले 'सरसोंचे तेल'! तेथील सर्व व्यंजने एकतर सरसोंच्या तेलात किंवा साजूक तुपात तळली जात होती. पहिल्या घासालाच माझा चेहरा बघण्यासारखा झाला आणि बहुधा हा सप्ताह पूर्ण होईपर्यंत आपली 'ताकभात व्रता'तून सुटका नाही ह्याची खात्री पटली. आहाराची किरकोळ बाब सोडली तर मला खूप मजा येत होती. रोजची कथा संपल्यावर पुढच्या कथेची उत्सुकता लागत असे. नव्या नव्या चालींची, ब्रज शैलीची, त्या त्या उच्चारांसहित भजने गाताना ही मजा येत असे. कधी मी थोडी चुकले तरी महाराज व श्रोते सावरून घेत असत. नंतर दोन दिवस अचानक महाराजांचा आवाज बसला. त्याही परिस्थितीत ते मोठ्या कष्टाने, संयमाने व धीराने कथा सांगत होते. माझ्यावरची गाण्याची जबाबदारी अजूनच वाढली होती. दुसरीकडे त्यांच्या मुख्य गायकाचा गावाहून निरोप आला होता की तो काही गाड्यांच्या गर्दीमुळे येऊ शकत नाही. आमच्या यजमानीण बाई माझ्यावर विलक्षण खूश होत्या. त्या व त्यांच्या परिवारातील इतर लोक येऊन माझ्या गाण्याची, अडचणीच्या वेळी मदत करण्याची स्तुती करून मला संकोचून टाकत असत. खरे तर मी वेगळे काहीच करत नव्हते! पण त्या लोकांना त्याचे अतिशय अप्रूप वाटत होते हेच खरे! बघता बघता दहा दिवस भुर्रकन उडून गेले. कथा मोठ्या जल्लोषात, उत्सवात समाप्त झाली. त्या रात्री आयोजित केलेला भोजन समारंभ आतापर्यंतच्या भोजनांना लाजवेल एवढा जंगी, शाही होता. मी अर्थातच ताकभाताच्या डायटवर होते! दुसऱ्या दिवशी सर्व लोकांनी आपला मुक्काम हालविला. आम्हीही साश्रू नयनांनी गंगामाईचा निरोप घेतला. तिच्याकडे पुन्हा लवकर बोलाव म्हणून प्रार्थना केली आणि निघालो. येताना आम्ही वेगवेगळे झालो होतो, कारण अनेकांचे पुढे इतर प्रवासाचे बेत होते. यजमान परिवार मागील सर्व आवरासवर करायला हरिद्वारलाच थांबले होते. ह्या खेपेस आमचा परतीचा प्रवास अतिशय शांत पार पडला. घरी पोचलो, अंघोळी उरकल्या, आवरले. बहिणीने जेवणाची ताटे घेतली होती. पानात वरणभात पाहून मला काय आनंद झाला ते वर्णन करणे कठीण आहे! गेले दहा दिवस सकाळ सायंकाळ दालबाटी, मालपुवा, छोले, कचोरी, समोसे, ढोकळे, गट्ट्याची भाजी, फाफडा, खाकरा, पकौडी वगैरे पदार्थ आणि मिष्टान्नांचे हारेच्या हारे पाहून थकलेल्या माझ्या मनाला व जिभेला घरच्या वरणभाताने जणू नवसंजीवनी मिळाली! ती सहल कायम स्मरणात राहील ती अविस्मरणीय अशा भागवत कथेच्या अनुभवाने, गंगेच्या मनोहारी सहवासाने आणि न भूतो न भविष्यति अशा अन्नवर्षावामुळे! आज ह्या घटनेला अनेक वर्षे लोटली. आमच्या यजमानांनी उदार पाहुणचार हा काय असतो हे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आणि परमेश्वराने गंगेच्या तीरी भागवत कथेचे अविस्मरणीय श्रवण करताना मला अनोख्या अशा कृष्णप्रिय 'ताकभात' व्रताची ओळख करून दिली!!
--- अरुंधती

Monday, January 04, 2010

नक्को नक्को रे!


"केतन, नाकात बोटं नको घालू.... "

"केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का? थोडा वेळ ऐकल्याचे दाखवतील कदाचित! पण जरा तुमचे लक्ष दुसरीकडे वळले की पुन्हा आपले ह्यांचे उद्योग सुरुच! मग तरीही आपण त्यांना सारखे सारखे का हटकत राहतो? त्या ऐवजी त्याला एखाद्या खेळात, गाण्यात गुंतवता आले तर? उदाहरणार्थ, तिथे ती माता तिच्या मुलाचे लक्ष रस्त्यावरच्या विविध गोष्टींकडे वेधू शकली असती.... जसे, तुला रस्त्यात किती दिव्याचे खांब दिसतात? आपण रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा मोजूयात. किंवा समोरच्या फळवाल्याकडे कोणती फळे दिसत आहेत रे? इत्यादी इत्यादी. आपण मुलांशी अनेकदा संवाद साधायचे विसरून जातो. आणि ती बोअर झाल्यावर जे काही करतात त्यावर नकारात्मक शेरे ओढत राहातो. माझ्या मैत्रिणींच्या, परिचितांच्या अनेक मुलांमध्ये मी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली आहे. मोठ्यांना जेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते, ते आपल्या गप्पा-कार्यक्रमांत मश्गुल असतात तेव्हा ही मुले आपल्या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायला असेच काहीबाही उद्योग करत असतात. कधी पाणीच सांडून ठेव, कधी पसारा कर, कधी कोणा दुसऱ्या पोराला त्रास दे, कधी मांजरीची शेपटीच ओढ.... त्यात त्या मुलांचा तरी काय दोष असतो म्हणा! त्यांना तुम्हाला काही तरी इंटरेस्टिंग दाखवायचे असते.... अगदी रस्त्यात पडलेल्या चॉकलेटच्या चांदीपासून ते त्यांच्या मोज्याला पडलेल्या भोकापर्यंत! पण आपल्यालाच त्यांच्याकडे पहायला वेळ नसतो. रोजच्या रामरगाड्यात दमछाक होईपर्यंत धावताना त्यांच्या चिमुकल्या विश्वाचा आपल्यालाच अनेकदा विसर पडतो. ती मात्र सदैव आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जायला उत्सुक असतात. आपल्यालाच त्यांच्या विश्वात डोकावायची सवड नसते. आणि त्यातून कित्येक वेळा आपला धीर संपुष्टात येतो.... एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची बस आली. केतनचे बखोट पकडून केतनची आई बसमध्ये चढली. चढतानाही सूचनांचा सपाटा आणि तोंडाचा पट्टा चालूच होता. "नीट चढ. तिथे हात लावू नकोस - हात खराब होतील. पुढे धावू नकोस. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. तोंडात बोटं घालू नकोस.... " नकोस, नकोस, नकोस आणि पुन्हा नकोस! मान्य आहे, सर्व काही त्याच्याच भल्यासाठी आहे. पण सारखा 'नको' चा पाढा लावणे टाळून हेच वेगळ्या पद्धतीने समजावता आले असते. आजकालच्या पद्धतीप्रमाणे पालक हल्ली एकाच मुलाला जन्म देणे पसंत करतात....त्याच्यावर सर्व वस्तूंचा वर्षाव करतात, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवितात आणि मग त्याचबरोबर त्या मुलाची प्रत्येक कृती स्कॅनरखाली येते. त्यातून असा 'ना' चा पाढा असेल तर अजूनच आनंद! चिमुकला केतन थोड्याच वेळात बसच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहत रमून गेला व त्याच्या आईने हुश्श करीत आपले लक्ष इतरत्र वळवले. आता पुरता तरी तो स्थिरावला होता. सगळीकडे टकामका डोळ्यांनी पाहत होता. पण त्याची ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. हे बहुधा त्याच्या आईला देखील माहित असावे. म्हणूनच ती डोके मागे टेकवून, डोळे मिटून थकलेल्या बॅटरीज रीचार्ज करत असावी. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक उंट जाताना केतनला दिसला. तो लगेच, "मम्मा, उंट बघ" म्हणून किंचाळत खिडकीतून हात बाहेर काढू लागला. "केतन, किती वेळा सांगितलंय असला वेडेपणा करायचा नाही म्हणून! आधी हात आत घे.... पुन्हा हात बाहेर काढायचा नाही.... आणि असा उसळ्या मारू नकोस रे, माझा ड्रेस खराब होतोय.... " तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला. मायलेक दोघेही खाली उतरले.... लेक आईच्या हाताला लोंबकळत होता. "अरे, असा लोंबकळू नको रे.... " बसचा थांबा आला, प्रवास संपला पण केतनच्या आईचा 'नको' प्रवास अद्याप जारीच होता.....
--- अरुंधती.

Friday, January 01, 2010

चुटपुटसुंदरी


आमच्या त्या मैत्रिणीला सर्व ग्रुपने ते एक सांकेतिक नावच पाडलंय..... "चुटपुटसुंदरी". आता तुम्ही म्हणाल, हा काय सौंदर्याचा निकष झाला का? पण आमची ही मैत्रीण तिच्या चुटपुटण्याच्या ह्या अनोख्या गुणामुळेच आमच्या ग्रुपमध्ये स्वतःची अशी खास ओळख बाळगून आहे. कोठेही जा, कधीही बघा, ही आपली कसल्या ना कसल्या गोष्टीबद्दल चुटपुटत असते. कधी ती सीरियल मधील रमाच्या पात्राबद्दल चुटपुटते तर कधी कोथिंबीर स्वस्त असतानाच का नाही भरपूर खरेदी केली - जेणेकरून सर्वांना कोथिंबीरवड्या बनवून खिलवता आल्या असत्या ह्याबद्दल चुटपुटलेली असते. कधी त्या सान्यांच्या वैशालीला तिथल्या तिथे खरमरीत उत्तर का नाही दिले म्हणून आमची मैत्रीण अस्वस्थ असते तर कधी सेलमधून आणलेली साडी चांगली नाही लागली म्हणून तिचे मन खंतावलेले असते. तिच्या ह्या चुटपुटीला कंटाळून घरच्यांनी तिचा नादच सोडलाय.... पण आम्ही पडलो मैत्रिणी... त्या ही हक्काच्या! त्यामुळे वेळोवेळी तिला दोन बोल सुनावून तिच्या चुटपुटीतून तिला बाहेर आणण्या पलीकडे काहीच करू शकत नाही. आता परवाचीच गोष्ट घ्या ना! तिच्या सासूबाईंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम होता. आमच्या मैत्रिणीने कसून मोठ्या कौतुकाने सर्व सोहोळ्याची तयारी केली होती. तिच्या काटेकोर नियोजनाप्रमाणे सोहोळा उत्तम पार पडला. निमंत्रितांची जेवणे आटोपली. पण ठरविल्याप्रमाणे त्यांना घरी विडा बनवून देण्या ऐवजी बाहेरून विडे मागवावे लागले ह्याचे आमच्या बाईसाहेबांना काय ते शल्य लागून राहिले! खरे तर कोणालाच एवढ्या छोट्याशा गोष्टीचे तितकेसे महत्त्व वाटले नाही. कारण सर्व समारंभ उत्कृष्ट झाला होता, जे जे ठरविले होते ते ते सर्व पार पडले होते. अशा वेळी आपला आनंद इतक्या लहानशा गोष्टीने का कमी करायचा? पण आमची चुटपुटसुंदरी हा sss चेहरा लांब करून बसली. शेवटी नवऱ्याला राहवले नाही. तो एकदाचा खेकसला! मग झाssले! अश्रूंचा महापूर लोटला. दुसऱ्या दिवशी मैत्रिणींना फोन करून सर्व दुःखी गाथा ऐकवून झाली. अर्थात प्रत्येकीला व्यवस्थित कल्पना असल्याने माहीत होते की आपल्या कितीही समजविण्याने हिच्यावर परिणाम होणार नाही! ह्यावर आम्हाला माहीत असलेला एकच जालीम उपाय! तिचे लक्ष दुसरीकडे वळविणे!! बऱ्याच दिवसांत एकत्र भेटलो नव्हतो, म्हटलं प्रोग्रॅम बनवूयात. आमची सुंदरी लगेच टवटवली. तिचे जोरदार प्लॅनिंग सुरू झाले. बघता बघता बाईसाहेबांचा मूड ठीक झाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.
खरेच, काही काही लोक त्यांनी योजल्याप्रमाणे एखादी गोष्ट तंतोतंत नाही झाली तर एवढे का दुःखी होतात? त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे इतके मोठे शल्य का लागून राहते? परिस्थिती, मानवी हस्तक्षेप, इतर घटकांनी कधीही, कोणतीही गोष्ट आपल्या यशापयशाचे समीकरण बदलू शकते. आपल्याला जसे हवे तसे घडले नाही म्हणून निराश होणे, खंत करीत राहणे हे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायी ठरू शकते! ठीक आहे! नाही घडलं तुमच्या मनासारखं! पण म्हणून किती काळ तेच ते उगाळत राहणार? किती वेळ त्यात दवडणार? त्यातून बाहेर येण्यात एवढे कष्ट का पडतात? आणि ज्यांना अशा प्रकारे सारखे सारखे चुटपुटण्याची सवय असते त्यांना पुढे पुढे इतरांची सहानुभूती मिळणे देखील बंद होते. कारण काळ हा पुढे धावत असतो. तुम्ही जर वारंवार झालेल्या घटनेलाच चिकटून बसू राहू लागलात तर काळ व लोक तुम्हाला मागे टाकून पुढे जातात. आणि मग भविष्यात कधीतरी तुम्हाला 'एवढा वेळ चुटपुटण्यात घालविला त्या ऐवजी वेगळ्या गोष्टीत घालविला असता तर बरे झाले असते' असे चुटपुटण्याची वेळ येते! आमच्या चुटपुटसुंदरीसारखे अनेक लोक भवताली दिसतात. सारे काही चांगले, सुरळीत घडत असताना देखील त्यांना एखाद्या होऊ न शकलेल्या गोष्टीची रुखरुख लागलेली असते. त्या सर्वांना आणि आमच्या चुटपुटसुंदरीला सांगावेसे वाटते, "जरा जागे होऊन आजूबाजूला बघा तरी! सगळे किती आनंदात आहेत. तुम्ही पण आनंदी व्हा. इतरांना आनंद द्या! जे नाही झाले, ते नाही झाले... त्याने खंतावून जाण्यापेक्षा जे होत आहे, घडत आहे, त्याचा आनंद घ्या.' असे एक जरी चुटपुटकुमार वा चुटपुटसुंदरी ह्या लेखाने वेगळा विचार करू लागले तरी ह्या लेखाचे सार्थक झाले!
--- अरुंधती.

असा कसा हा पेपरवाला!

आम्ही या नव्या भागात राहायला आलो त्यासरशी आमच्या शेजारच्या आजीबाईंनी दुसऱ्याच दिवशी दार ठोठावले. पाठीची पार धनुकली झालेली, अंगावर सुरकुत्यांचे जाळे, डोईवर पदर अशा त्या नऊवारी नेसलेल्या आजीबाई दारातूनच म्हणाल्या, "तुमाला पेपर लावायचा आसंल तर माज्याकडनं घ्यावा. माझी एजन्सी हाय. " त्यांच्याकडे काही क्षण थक्क होऊन पाहिल्यावर आमच्या मातुःश्रींनी भारल्यागत होकारार्थी मुंडी हलविली आणि म्हातारबाईंच्या पेपर एजन्सीचा माणूस रोज दारात पेपर टाकू लागला. बघता बघता वर्ष लोटले. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की ह्या भागात, खास करून आम्ही जिथे राहतो त्या गल्लीत असे अनेकजण पेपर एजन्सी चालवितात. आमच्या इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत भल्या पहाटे वर्तमानपत्रांचा टेम्पो दे दणाद्दण वर्तमानपत्रांचे गठ्ठे टाकून जातो. मग पहाटे चार वाजल्यापासून सॉर्टर्स येऊन त्यांचे वर्गीकरण करतात. साडेपाच-सहा च्या दरम्यान पेपर टाकणारी मुले आपापल्या सायकल्स, बाईक वरून ही वर्तमानपत्रे घरोघरी टाकायला घेऊन जातात. हे काम एवढे शिस्तीत चालते की गल्लीच्या कुत्र्यांना पण ह्या लोकांची सवय झाली आहे. तर अशा परिस्थितीत आम्हाला अगदी घरबसल्या विविध पेपरवाल्यांचा सहवास मिळत होता. दररोज पहाटे साखरझोपेची दुलई बाजूला सारून नित्यकर्माला लागण्यासाठी ह्या पेपरवाल्यांच्या आवाजाचा, त्यांच्या गप्पांचा , त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचा फार फायदा होई. आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात त्यांच्यापैकी कोणी शिंकले तरी खणखणीतपणे ऐकू येई. आजीबाई सर्व पेपरवाल्यांची वर्दळ संपली की इमारतीच्या दारातच सकाळची कोवळी उन्हे खात एका तरटावर बसून पेपर विकायला सज्ज होत असत. शिवाय त्यांची नजर चौफेर असे.... त्यामुळे कोठे काय चालले आहे ह्याची बऱ्यापैकी खबर त्यांना लागलेली असे. एक दिवस आजीबाई अचानक आजारी पडल्या. एक-दोन महिन्याचे हॉस्पिटलाचे दुखणे झाले आणि आजीबाईंची प्राणज्योत मावळली. त्यांच्या घरच्यांनी पेपर एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरेच दिवशी आमच्याकडे अजून एक पेपर एजंट आला. (ह्या एजंटांना कसा सगळा पत्ता लागायचा कोणास ठाऊक! ) चांगल्या झुबकेदार मिशा, कपाळाला टिळा, अंगात शर्ट -पँट, काखोटीला चामड्याची बॅग, पायात वहाणा अशा वेषातला हा एजंट बोलण्यावरून शिकलेला वाटला. झाले! त्याने दुसऱ्या दिवशीपासून पेपर टाकायचे ठरले. त्याच्या भेटीत त्याने सांगितले होते की तो रीयल इस्टेट एजंटपण आहे, दुधाचा ही धंदा आहे इत्यादी इत्यादी. खरे तर आपल्या पेपरवाल्याची कोण एवढी चौकशी करतो! पण त्याने आपण होऊनच ही माहिती दिली. त्या नंतर सुरू झाला एक मजेदार अनुभव! आमच्या मातुःश्रींचे व पेपर टाकायला येणाऱ्या मुलाचे वारंवार खटके उडू लागले. कधी तो दाराच्या बाहेर कोणीही उचलून न्यावा अशा पद्धतीने पेपर टाकत असे तर कधी त्याला उशीर होत असे. मातृदैवताला सकाळी साडेसातच्या आत वर्तमानपत्र वाचण्याची सवय असल्याने तिला हा उशीर जराही खपत नसे. मग काय! आई तो यायच्या वेळेला दबा धरूनच बसत असे आणि तो अवतरला की त्यांची किरकोळ हुज्जत रंगत असे. मग एक दिवस कंटाळून आईने त्या पेपर एजंटचा फोन नंबर धुंडाळून थेट त्याच्याकडेच तक्रार केली. दुसऱ्या दिवसापासून आमचा पेपर वेळेत येऊ लागला, दारात लोळत पडण्या ऐवजी कडी-कोयंड्यात खोचला जाऊ लागला. पण मग त्या महिन्यापासून पेपरचे बिल येणेच बंद झाले. आमच्या पांढरपेशा मनांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती. अशी उधारी ठेवायची म्हणजे काय! आपल्याला अशा गोष्टी जमत नाहीत आणि ती वस्तुस्थिती आहे! अखेर रात्रीच्या निवांत झोपेचा प्रश्न आहे, राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते. तर अशा आमच्या ह्या वर्तमानपत्राचे बिल घेण्यास उदासीन पेपर-एजंटला आईने अनेक निरोप धाडले, फोन केले. त्याचे उत्तर ठरलेले, "ताई, काय घाई आहे! घेऊ की निवांत बिल, कुठं पळून का जातंय... " त्याच्या अशा उत्तरांनी आम्ही अजूनच अस्वस्थ होऊ लागलो. दरम्यान येथील रीयल इस्टेट वाल्यांचे राजकारणी व गुंडांशी असलेले संबंध कोणीतरी मोठ्या अक्कलहुशारीने आमच्या कानी घातले होते. मग तर काय! आम्हाला दरदरून घाम फुटायचाच काय तो शिल्लक राहिला. न जाणो हा पेपर एजंट कोणत्या गँगचा माणूस असला तर? तो उद्या-परवा कर्जवसुलीसारखी दारात माणसे घेऊन उभा ठाकला तर? निरनिराळ्या हिंदी पिक्चर्समधील असे गावठी गुंड, त्यांची दहशत वगैरे सीन्स आमच्या चक्षूंसमोर तरळू लागले. घरापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर एक खाटिकखाना आहे. तिथे घेऊन जाणाऱ्या बकऱ्या, बोकडांमध्ये आम्हाला आमचे चेहरे दिसू लागले. शेवटी आम्ही गृह-सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.... पेपरवाला बदलायचा.... आमच्याकडे पेपर टाकणाऱ्या पोराकडे निरोप दिला. तो तर हसायलाच लागला. झाले! आमच्या छातीचे ठोके चुकले. दुसऱ्याच दिवशी त्या पेपर एजंटचा फोन आला.... "ताई, काय नाराज आहात का आमच्यावर? जाऊ की घेऊन बिलाचे पैसे निवांत! तुम्ही नका काळजी करू!" (त्याने सबंध वर्ष बिलाचे पैसे घेतले नव्हते!)

पण आमचा निर्णय ठाम होता. एकतर बिलाचे पैसे घे, नाहीतर पेपर टाकणे बंद कर. आम्ही दुसरा पेपरवाला शोधतो. काहीसे कुरकुरतच त्याने फोन ठेवून दिला. पुढचे दोन दिवस पेपर आला नाही. एरवी सकाळी सकाळी पेपर दृष्टीस पडला नाही की अस्वस्थ होणारी आमची आई कधी नव्हे ते पेपर आला नाही म्हणून आनंदात होती! दोन दिवसांनी शेजारील फ्लॅटमध्ये पेपर टाकणाऱ्या नव्या पेपर-एजंटला सांगून पुन्हा आमच्याकडे पेपर सुरू झाला. त्या आधीच्या पेपरवाल्याने अजूनही बिल दिले नव्हते व बिलाचे पैसेही नेले नव्हते. वाटले, लवकरच तो बिलासकट हजर होईल. पण छे! तिसऱ्या दिवशी त्याच्या पेपर टाकणाऱ्या मुलाने आधीप्रमाणे पुन्हा आमच्याकडे पेपर टाकायला सुरुवात केली. जणू काही मधल्या काळात काहीच घडले नव्हते! आता मात्र अती झाले होते. एकाच वेळी घरात दोन-दोन पेपर एजंट कडून पेपर येत होते! पुन्हा एकदा आमची गोलमेज बैठक झाली. दुसऱ्या दिवशी आई पेपरवाल्याच्या प्रतीक्षेत दबाच धरून बसली. तो आल्यासरशी त्याला 'का टाकतोस आता पेपर? ' म्हणून फैलावर घेण्यात आले. त्यावर तो मुंडी हालवत, हसत 'तुम्ही आमच्या मालकांनाच विचारा' असे म्हणून खांदे उडवित निघून गेला....!!!!! मालक अर्थातच फोनवर उपलब्ध झाले नाहीत! आता रोज आम्ही दोन-दोन पेपर्स चा संशयी मनाने आनंद लुटतो. कदाचित आमचा आधीचा पेपर एजंट येईल, बिलाचे पैसे घेईल, कदाचित घेणारही नाही. आमच्या दमल्या थकल्या मनांनी त्याच्या वागण्याचे कोडे उलगडविण्याचे तूर्तास रहित केले आहे. रात्री झोपेत पेपरच्या गठ्ठ्यांखाली आपण गुदमरत आहोत असले काही स्वप्न पडल्यास आम्ही त्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करतो. कसली वर्गणी मागायला कोणती तरुण मंडळे आली की 'आली आपल्या पेपर एजंटची माणसं! ' असा डरपोक विचार आम्ही अजिब्बात म्हणजे अजिब्बात करत नाही. त्यांना जुजबी पैसे देऊन वाटेला लावतो. वेळप्रसंगी घरात कोणीच नसल्याचा बहाणा करतो. आणि रोज देवाकडे आमच्यासारखा उदार, कनवाळू पेपर एजंट इतर कोणालाही न मिळो म्हणून कळकळीने प्रार्थना करतो. न जाणो देव ऐकेल आणि पुन्हा एकदा आमच्या राज्यात सर्व काही आलबेल होऊन आम्ही सुखाने झोपू लागू!
--- अरुंधती.