Saturday, July 31, 2010

रत्ना

परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! ''
''नको नको, ताई! '' तिच्या स्वरात अजिजी होती, '' पुन्हा कधीतरी येईन ना मी! आज इथंच बोलू की! '
'

रत्ना. आमच्याकडे ती पहिल्यांदा कामावर रुजू झाली तेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन आणि ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला! किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, लांबसडक केस आणि चेहर्‍यावर हसू असलेली तिची ती ठेंगणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी येते. कॉलेजची फी भरायला तिच्या आई आणि भावाने नकार दिला म्हणून ताठ मानेने, मिळालेल्या पगारातून पुढे शिकायचे ह्या जिद्दीने ती आमच्या घरी माझ्या नोकरी करणार्‍या आईला वरकामात मदत करायला आली आणि जणू आमच्या घरचीच होऊन गेली. भल्या पहाटे उठून घरात पडेल ते काम करायचे, भावाला व आईला व्यवसायात मदत करायची, कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, आमच्या घरचे काम आणि इतर दोन घरची कामे असे सर्व उरकून उरलेल्या वेळेत अभ्यास करणारी रत्ना. मला शाळेत सोडायला - आणायला येणारी, मी तिच्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त केल्यावरही राग न मानणारी हसतमुख रत्ना. कामाला वाघ असणारी, शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने उरी बाळगणारी अल्लड रत्ना. दिसायला काळीसावळी आणि तिच्या पायात जन्मजात व्यंग होते म्हणून तिच्या घरचे सुरुवातीपासून तिचा राग राग करायचे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या आणि व्यंगामुळे रत्नाला नीट स्थळेही चालून येईनात. रत्नाची त्यांच्या जातीबाहेर लग्न करायची तयारी होती, पण तिच्या भावाला व आईला ते मान्य नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे तिचे वडील अकाली निवर्तल्यानंतर ती घरात एकटीच पडत गेली. तरीही तिने घरच्यांच्या लग्न करण्याच्या आग्रहाला बळी न पडता नेटाने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आमच्या घरी सर्वांना तिच्या ह्या जिद्दीचे खूप कौतुक वाटे. त्यामुळे तिला अभ्यासात, पुस्तके मिळवण्यात किंवा फी भरायला काही अडचण आली तर ती हक्काने आमच्याकडे मदत मागायला येत असे.

कालांतराने, मजल दरमजल करीत रत्ना एकदाची बी. ए. झाली. तिच्या घरी कोणालाच त्याचे फारसे कौतुक नव्हते. ना त्यामुळे भावाला कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या त्याच्या व्यवसायात मदत होणार होती, ना आईच्या फुलांच्या व्यवसायात बरकत येणार होती! पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घरी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली! गेली अनेक वर्षे तिने एकच स्वप्न उराशी बाळगले होते. तिला शिक्षिका होऊन शाळेत नोकरी करायची होती. आणि त्यासाठी तिचे पुढचे ध्येय होते बी. एड. पूर्ण करणे!

पण पुन्हा समोर दोन समस्या उभ्या ठाकल्या. पहिली समस्या म्हणजे बी. एड. प्रवेशाच्या फीसाठी लागणारा पैसा आणि दुसरी म्हणजे फायनलला तिला मिळालेला काठावरचा सेकंड क्लास. शेवटी तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायचे ठरवले. मुलांमध्ये काम करायची तिला जबरदस्त हौस होती. त्यांना शिकवावे, घडवावे, त्यांच्यात रमून जावे असे तिला मनापासून वाटायचे. मग काय! बालवाडी प्रशिक्षणासाठी तिने तिचे सोन्याचे कानातले विकून पैसे उभे केले. पुढचे शिक्षण चालू ठेवायचे तर तिला अर्थार्जन करणे भागच होते. शहरातील सुप्रतिष्ठित समाजकारणी व राजकारणी अप्पाजी आमच्या परिचयातील होते. त्यांच्यापाशी रत्नाला चांगली नोकरी लावून देण्याविषयी शब्द टाकल्यावर त्यांनी तिला चिठ्ठी व तिची प्रमाणपत्रे घेऊन एक दिवस भेटायला बोलावले. तिथेच तिची ओळख सुभानरावाशी, अप्पाजींच्या धाकट्या लेकाशी झाली.

अप्पाजींच्या ओळखीने रत्नाला बर्‍यापैकी नोकरी तर मिळाली, पण सुभानरावाच्या आणि तिच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. एक दिवस अप्पाजी आमच्याकडे 'सहज'च भेटायला म्हणून आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्यांनी थेट रत्नाची चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी नापसंतीने सांगितले की सध्या रत्ना आणि सुभान्या एकत्र भटकत असतात म्हणून! अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच! रागावलेल्या अप्पाजींची कशीबशी समजूत घातल्यावर ते एकदाचे घरी गेले, पण ''त्या रत्नाला समजावा, ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, '' अशी धमकी देऊनच!

दोनच दिवसांनी रत्नाला सांगावा देऊन आमच्या घरी सुभानरावाविषयी विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले गेले. रत्ना आपल्या निवडीवर व निर्णयावर ठाम होती. ''सुभानराव आणि मी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनी तसं वचन दिलंय मला. मी अप्पाजींच्या धमक्यांना घाबरणार नाही! सांगा त्यांना तसं! '' खरं तर सुभानरावाची कथा वेगळीच होती. सुप्रतिष्ठित, सधन घरातील वाया जाऊ पाहत असलेला तो लाडावलेला मुलगा होता. घरच्या दुधाच्या धंद्याकडे, शेतीकडे बघायचा तसा थोडाफार! पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती! तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने! अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची! तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले! रस्त्यात दिसली तरी ओळख देईनाशी झाली.

आणि एक दिवस अचानक रत्ना अस्ताव्यस्त, विस्कटलेल्या अवतारात आमच्या दारात येऊन उभी राहिली. डोळे रडून रडून सुजलेले, चेहर्‍यावर वेडसरपणाची झाक.... तिची अशी अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला! सुभानरावाने तिला फसवून त्याच्या जातीतल्या, श्रीमंत घरातल्या दुसर्‍याच पोरीशी लग्न केले होते.
''मला पार लुटलं हो त्यानं! पार फशिवलंन! माझी इज्जत गेली, आब्रू गेली.... आता मी काय तोंड दाखवू? कशी घरी जाऊ? '' तिचा तो घायाळ टाहो काळीज चिरून जात होता. आईने तिला कसंबसं सावरलं. ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यावर मग ती जरा शांत झाली. उध्वस्त अवस्थेतच तिच्या घरी परतली. एकदा रॉकेल अंगावर ओतून घेतले असेच निराशेच्या भरात! पण तिची भाचरे येऊन बिलगली तिला तसा तिचा बांध फुटला. काही महिन्यांनी परिस्थितीतून जरा सावरल्यानंतर सुभानरावावर फसवणुकीचा दावा ठोकता येईल का, ह्यासाठी ती आमच्या ओळखीच्या एका वकिलांना भेटून आली. पण त्यांनी तिला स्पष्ट शब्दात अशा दाव्यांमध्ये खर्च होणारा पैसा, वेळ व मनस्ताप -बदनामीची कल्पना दिल्यावर तिने सुभानरावावर दावा करण्याचा विचार रहित केला. शिवाय अप्पाजींचा राजकीय प्रभाव बघता अशी केस कोर्टात उभी राहील की नाही ह्याबद्दलही शंका होती.

''आता काय करणार आहेस? '' माझ्या आईने तिला विचारले.
''काय करणार वैनी! अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करीन म्हणते. बघूयात देवाच्या मनात तरी माझ्यासाठी काय आहे ते! '' रत्नाच्या स्वरात कडवटपणा ठासून भरला होता.
एका अनामिक जिद्दीने भारलेल्या कडवटपणाने रत्नाने तो कोर्स पूर्ण केला खरा, पण मधल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःची पार वाताहत करून घेतली. रोज कसलेतरी उपास करायची. खाण्यापिण्याकडे लक्षच द्यायची नाही. आधीच तिची किरकोळ शरीरयष्टी! आता तर ती अजूनच कृश दिसू लागली. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. माझ्या आईला तिची जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांकडे जबरदस्तीने घेऊन गेल्यावर आणि त्यांनी तिला भले मोठे लेक्चर दिल्यावर मग कोठे ती जरा ताळ्यावर येऊन वागू लागली.

आताशा तिची आमच्याकडे पूर्वीसारखी ये-जा राहिली नव्हती. बघता बघता तिचा अल्लडपणा ओसरून चेहर्‍यावर, वागण्यात एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. जणू मोकळेपणाने हसायचे ती विसरूनच गेली होती. अशीच एके दिवशी ती अवचित संध्याकाळी भेटायला म्हणून घरी आली. बोलता बोलता दोन गोष्टी अगदी सहज बोलल्यासारख्या सांगितल्या तिने. पहिली गोष्ट म्हणजे सुभानराव तिला भेटायला आला होता. खास तिची माफी मागायला. त्याच्या लहान बाळाला कसलासा असाध्य आजार झाला होता म्हणे! आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे! त्यामुळे तो तिची माफी मागायला आला होता.
''मग? तू काय म्हणालीस? '' आईने तिला विचारले.
तशी खांदे उडवीत रत्ना उद्गारली, ''मी काय म्हणणार वैनी!! मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन! '' तिचे ते बोल ऐकल्यावर माझ्या आईच्या तोंडावर हसू फुटल्याविना राहवले नाही.
त्या दिवशी अगदी निघायची वेळ आली तशी रत्ना हळूच म्हणाली, '' मी माझं लगीन ठरीवलंय. ''

त्या खुळ्या पोरीने सुभानराव भेटून माफी मागून गेल्यावर तिरिमिरीत एका बिजवराशी लग्न करायचे ठरविले होते. एके काळी तिचे कोणाशीही लग्न लावायला तयार असणारे तिचे आई-भाऊ ह्या लग्नाविषयी जरा साशंक होते. पण रत्नाचा निर्णय एकदा झाला की तो झालाच! त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्‍यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची! '' असा सुटकेचा नि:श्वासही टाकला.

पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. लग्नानंतर आठ-दहा महिन्यांतच रत्ना नवर्‍याच्या जाचाला, मारहाणीला आणि व्यसनाला कंटाळून पुन्हा माघारी आली. घरी समजूत काढायला ह्या खेपेला तिची आईही नव्हती. लेकीच्या लग्नानंतर दोनच महिन्यात ती परलोकवासी झालेली. भावाच्या घरात, त्याच्या संसारात आपला अडथळा होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करत, स्वतःला आक्रसून घेत पुन्हा एकदा रत्ना एका बालवाडीत ''ताई'' म्हणून रुजू झाली.

अवचितपणे तिला रस्त्यात भेटल्यावर ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मधल्या वर्षांमध्ये बरेच काही घडून गेले होते. त्या घटनांच्या अंगखुणा वागवत रत्ना माझ्यासमोर आज उभी होती.
''काय करतेस सध्या तू? '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई! तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे! ''
''आँ?!!! '' आता आश्चर्यचकित होण्याची माझी खेप होती.
'' तुम्हाला नवल वाटलं असेल ना ताई? आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून! पण मला सारखं वाटायचं, आपण बी. एड. करायचं स्वप्न अर्धवट सोडलं ते चांगलं नाही केलं. आता मी ते स्वप्न पूर्ण करत आहे. ''
''आणि घरी? भाऊ काय म्हणतो? '' मी हलकेच विचारले.
''भाऊ? तो काय म्हणणार? त्याची पोरं मोठी झाली आता. ती आपल्या आत्याची बाजू घेतात. त्याला म्हणतात, बाबा, तुम्ही न्हाई शिकलात तर न्हाय, पण आत्याला तर शिकू देत! ''
''वा! गुणी आहेत गं तुझी भाचरं! '' माझ्या तोंडून नकळत कौतुकाची दाद दिली गेली.
''ताई, आईगत माया केली आहे मी त्यांच्यावर! आता तीच माझी लेकरं! '' रत्नाचा स्वर पुरता कौतुकात भिजला होता.
''खरंच, चलतेस का गं घरी? '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून! ''
रत्नाचे डोळे क्षणभर पाणावले. पण मग लगेच तिने स्वतःला सावरले आणि उद्गारली, ''वैनींना माझे नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं आता ही रत्ना बी. एड. झाल्याचे पेढे घेऊनच तुम्हाला भेटायला येईल! ''

तिला आमचा नवा पत्ता, फोन नंबर देऊन झाल्यावर काही क्षण दोघी तशाच उभ्या होतो. शांत, निःशब्द! मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई! घरी उशीर होईल. '' त्या हास्यात मी उगाचच काहीतरी शोधत राहिले. माझा निरोप घेऊन ती पुन्हा पाय ओढत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे मी कितीतरी क्षण तशीच बघत उभी होते. मनात कोठेतरी तिच्यावरच्या अन्यायाविषयीची खंतही होती आणि त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत, सन्मानाने जगू पहाणार्‍या तिच्या संघर्षाविषयी, तिच्या जिद्दीविषयी कौतुकाची सायही होती. प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा चंद्रकिरण शोधणार्‍या, हार न मानणार्‍या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला आणि मार्गस्थ झाले.

-- अरुंधती

(सत्यकथेवर आधारित)

Sunday, July 18, 2010

एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे.

कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी. तेव्हा चुभूदेघे )
तर ही एस्पेरांतो भाषा नक्की आहे तरी काय?
बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्यांना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत. थोडक्यात, युरोपियन व आशियाई भाषांच्या अभ्यासकांना ही भाषा अवगत करणे अजिबात कठीण नाही. मात्र ह्या भाषेचा उद्देश जगातील सर्व समूहाला एका सामायिक पर्यायी भाषेत एकमेकांशी संवाद साधता यावा हा आणि हाच आहे. आज जगातील लाखो लोक तरी ही भाषा आपल्या स्थानिक भाषेगत सफाईने बोलतात. पुण्यातील ह्या भाषेचे अभ्यासक व एस्पेरांतोच्या भारतातील संघाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम म्हणतात त्याप्रमाणे ही काही परिषदांमध्ये, अभ्यासकांच्या मेळाव्यात काथ्याकूट करायची भाषा नव्हे; तर ही जनसमूहाची - सामान्य माणसाची भाषा आहे.
भाषेचे जनक
एल. एल. जामेनहोफ 
(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)
पोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) जामेनहोफ या सद्गृहस्थांनी इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व प्रांतिक भेदांचे मूळ लोकांचा आपापसात परस्पर संवाद नसण्यात आणि तो संवाद करण्यासाठी एखादी सामायिक भाषा नसण्यात आहे याबाबतीत त्यांचे ठाम मत होते. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे. दुर्दैवाने जामेनहोफ यांच्या तिन्ही मुलांची होलोकास्टमध्ये हत्या झाली.

भाषेच्या नावामागील इतिहास
जामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ. स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ ''आशा बाळगणारा'' असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ''ल इंतरनॅशिया लिंग्वो'' (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.
एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये
१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे. 

२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.
३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते.
४. सोपेपणा : ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.
५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य.
आज ह्या भाषेत कित्येक हजार पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संगीत व काही प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच जगभरातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य ह्या भाषेत रुपांतरित झाले आहे. संपूर्ण दुनियेत ह्या भाषेला आत्मसात केलेली मंडळी तिचा उपयोग जगभरात प्रवास करताना, पत्रमैत्रीसाठी तर करतातच! जगातील एस्पेरांतो बोलणारे लोक एकमेकांच्या घरी आतिथ्याचा विनामूल्य लाभ घेतात. शिवाय एकमेकांच्या भेटीगाठीत फक्त एस्पेरांतो बोलण्यावर भर, परस्पर संस्कृती-पाककला-परंपरा-विचार इत्यादींची एस्पेरांतोच्या माध्यमातून देवाणघेवाण ह्याही गोष्टी आठवणीने पाळल्या जातात. ह्या भाषेसंदर्भातील वेगवेगळ्या परिषदा, संवाद, स्नेहसंमेलनांतून निरनिराळ्या ठिकाणी एस्पेरांतो बोलणारे लोक एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करतानाच ह्या भाषेचा मूळ उद्देश जपण्याचे काम करतात.
भाषेचा उद्देश
ह्या भाषेला निर्माण करण्यामागे जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी... ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. त्यात स्थानिक भाषेला ही भाषा पर्याय म्हणून गणणे, भाषावैविध्यात खंड पाडणे हे उद्देश अजिबातच दिसत नाहीत. एक तटस्थ, कोणतीही विशिष्ट संस्कृती नसलेली व स्वतःची वेगळी ''वैश्विक'' संस्कृती असलेली ही भाषा तिच्या ह्या वैशिष्ट्यांमुळेच अनेक टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे. तसेच ह्या भाषेतील शब्द प्रामुख्याने युरोपियन धाटणीचे असल्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. मानवी इतिहासातील एक समृद्ध, विचारपूर्वक आणि ऐतिहासिक - क्रांतिकारक पाऊल म्हणून ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.
ह्या भाषेतील काही शब्द उदाहरणादाखल :
हॅलो : सालूतोन : Saluton
येस : जेस : Jes
नो : ने : Ne
गुड मॉर्निंग : बोनान मातेनोन : Bonan matenon
गुड आफ्टरनून : बोनान वेस्पेरोन : Bonan vesperon
गुड नाईट : बोनान नोक्तोन : Bonan nokton
ऑल राईट : बोने : Bone
थॅंक यू : दांखोन : Dankon
प्लीज : बोन्वोलू : Bonvolu
भाषा कशी शिकायची?
इंटरनेटच्या जमान्यात काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ही भाषा शिकू शकता.
त्यासाठी http://www.lernu.net व http://www.ikurso.net या संकेतस्थळांवर नजर टाका.
मराठीत ह्या भाषेवरील पुस्तकाची निर्मिती डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी केली आहे.
मला इंटरनेटवर पुस्तक मागवण्यासाठीचा त्यांचा मिळालेला पत्ता हा असा : बी ३, कांचन नगरी, कात्रज, पुणे - ४६.
ईमेलः anibani@rediffmail.com

तसेच ह्या विषयावर तेलुगू व इंग्रजी भाषेत डॉ. रंगनायकुलू यांनी पाठ्यपुस्तकनिर्मिती केली आहे.
त्यांचा मिळालेला पत्ता असा :
P V RANGANAYAKULU
(ranganayakulu@hotmail.com , pvranga@rediffmail.com)
asista profesoro, 46 Junior Officers' Quarters, Behind TTD Admn Bldgs, KT Road, Tirupati 517 501, Andhra Pradesh.
(वरील पत्ते हे इंटरनेटवर मिळालेले असून त्यांची लेखिकेने खात्री करून घेतलेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी! )

चित्रफितींच्या लिंक्स







तसेच ह्या विषयावर यूट्यूबवरही काही चित्रफिती उपलब्ध आहेत. त्याही जरूर पाहाव्यात!

या भाषेविषयी काही बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आल्या आहेत. त्यातीलच ही एक बातमी :
http://www.thehindu.com/2008/02/13/stories/2008021359100400.हतं

माझे शिक्षक
माझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांच्याविषयी दोन शब्द लिहिल्याखेरीज हा लेख संपवता येणार नाही. त्यांच्या माध्यमातूनच मला या भाषेची सुरेख ओळख झाली. अनेक विद्यार्थ्यांशी, समाजातील विविध स्तरांतील लोकांशी सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. उत्साह, नैपुण्य, विनम्रता, सौहार्द आणि कार्यनिष्ठा यांचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. अनेक वर्षे समाजकल्याण खात्यातील महत्त्वपूर्ण अधिकारपद निभावल्यावर निवृत्तीनंतरही समाजहितासाठी झटणारे डॉ. अब्दुल सलाम ज्या सफाईने, सहजतेने वावरतात, बोलतात त्यावरून त्यांना दृष्टीचे सुख नाही हे कोणाला कळणारही नाही! पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कार्यातले झपाटलेपण, त्यांची तळमळ समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. त्यांचे मोकळे हास्य, वागण्यातील सुसंस्कृतता त्यांच्या विश्वनागरिकत्वाचीच प्रचीती देते. डॉ. सलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन!
(लेखातील बरीचशी माहिती विकिपीडियामधून साभार!
विकीपीडियाची लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Esperanto)

डॉ. अब्दुल सलाम यांना आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता :
HELPO FOUNDATION
India Office:
5, Archana Corner, Saluke Vihar Road, Pune - 411 048, India.
Tel.: +91-20-26855632, 26855644. Fax: +91-20-26855644.
Email: helpo@vsnl.com
http://www.helpo.in/index.htm
-- अरुंधती

Saturday, July 10, 2010

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला.
सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो. प्रस्तुत लेखात त्या अनुभवांच्या शिदोरीतील मोजके, रंजक अनुभव मांडत आहे. कोठे तांत्रिक चुका राहिल्यास ती माझ्या विस्मरणाची खूण समजावी!!
तर चार झाशीच्या राण्या (उर्फ अस्मादिक व तीन सख्या) प्रथमच अशा प्रकारच्या उत्खननाला तब्बल आठवडाभरासाठी जाणार म्हटल्यावर घरच्यांना थोडी काळजी होतीच. आम्हाला आधीपासून आमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी बरोबर काय काय न्यावे लागेल ह्याची एक मोठी यादीच दिली होती. त्याप्रमाणे जमवाजमव, खरेदी, त्या दरम्यान एकमेकींना असंख्य फोन कॉल्स, सूचना वगैरे पार पडल्यावर जानेवारीच्या एका रात्री आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुराकडे रवाना झालो. आम्हा नवशिक्यांसोबत एक पी. एच. डी. चे विद्यार्थीही होते. चौघीही अखंड टकळीबाज असल्यामुळे गप्पाटप्पा आणि खादाडीच्या ओघात प्रवास कधी संपला तेच कळले नाही. नागपुराहून भागीमारीला जाताना आधीपासून आमच्या प्राध्यापकांनी आमच्यासाठी खाजगी जीपची व्यवस्था करून ठेवल्याचा खूपच फायदा झाला. आदल्या रात्री अकरा वाजता निघालेलो आम्ही दुसऱ्या रात्री एकदाचे भागीमारीत थडकलो.
आमची नागपुराहून निघालेली जीप धूळ उडवत थेट आमच्या राहुट्यांच्या कँपवरच पोचली. एका बाजूला हाय-वे, दुसऱ्या बाजूला कापणी झालेली शेतं आणि हाय-वे लगतच्या त्या मोकळ्या शेतजमीनीवर उभारलेल्या राहुट्यांमध्ये आमचा मुक्काम! आयुष्यात प्रथमच मी अशा प्रकारे मोकळ्या माळरानावर राहण्याचा अनुभव घेत होते. माझ्यासाठी ते सर्व अनोखे होते. माझ्या बाकीच्या सख्याही पक्क्या शहराळलेल्या. त्यामुळे ह्या नव्या वातावरणात आपण कितपत तग धरू शकू अशी धाकधूक प्रत्येकीच्याच मनात थोड्याफार फरकाने होती. पण त्याहीपेक्षा काही नवे शिकायला मिळणार, आजपर्यंत जे फक्त थियरीत शिकलो ते प्रत्यक्ष करायला मिळणार, अतिशय अनुभवसंपन्न व जाणकार प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार ह्या सर्वाचे औत्सुक्य जबरदस्त होते. त्यामुळे जे काही समोर येईल ते स्वीकारायचे, आत्मसात करायचे असाच चंग बांधलेला होता आम्ही!
त्या रात्री आम्ही जरा लवकरच झोपी गेलो. एकतर प्रवासाचा शीण होता आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून उत्खननाच्या साईटवर निघायचे होते. माझ्या तंबूत मी आणि एक मैत्रीण अशा दोघींची व्यवस्था होती. बाकी दोघी दुसऱ्या तंबूत. इतर पी. एच. डी. चे विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टाफ यांसाठीही वेगवेगळ्या राहुट्या होत्या. स्वयंपाक व भोजनासाठी वेगळी राहुटी होती. सर्व राहुट्या अर्धवर्तुळात रस्त्याच्या विरुद्ध, आतल्या बाजूला तोंड करून होत्या. जरा पलीकडे आमच्या मेक-शिफ्ट बाथरूम्स होत्या. म्हणजे चारी बाजूंनी तरटे लावलेली, पाणी वाहून जायची व्यवस्था केलेली शेतजमीनीतील जागा. त्याही पलीकडे असेच प्रातर्विधींसाठीचे तरटांनी चारही बाजू झाकलेले मातीचे चर. एका मोठ्या चुलाण्यावर सकाळ, संध्याकाळ मोठ्या हंड्या-पातेल्यांतून पाणी उकळत असे. तेच पाणी बादलीतून आम्हाला अंघोळीसाठी मिळे. थेट आकाशाच्या खाली, अंगाला वारा झोंबत, रात्री व पहाटे टॉर्चच्या उजेडात सर्व आन्हिके आटोपताना फारच मजा येत असे! त्यात एक मैत्रीण व मी स्नानाचे वेळी आमच्या नैसर्गिक स्पा उर्फ वेगवेगळ्या तरट-स्नानगृहांमधून एकमेकींशी गप्पा मारत असू. आम्हाला वाटायचे की आम्ही जे काही बोलतोय ते फक्त आमच्यापुरतेच आहे.... पण ते साऱ्या राहुटीवासियांना ऐकू जात असे हे बऱ्याच उशीराने समजले. नशीब, आम्ही वाचलेली पुस्तके, कथा, कादंबऱ्या, पाहिलेले चित्रपट - गाणी वगैरेचीच चर्चा ( वैयक्तिक टिकाटिप्पणीसह) करायचो!!!!
पहिल्या रात्री त्या अनोळखी माळावर, हाय-वे वरच्या ट्रक्सचे आवाज व दिव्यांचे प्रखर झोत तंबूच्या कपड्यातून अंगावर घेत, सतरंजीमधून टोचणाऱ्या नवार खाटेवर कूस बदलत, अंगाला यथेच्छ ओडोमॉस चोपडूनही हल्ल्यास उत्सुक डासोपंतांना हूल देत, बंद तंबूच्या फटीमधून येणारे गार गार वारे अनुभवत आणि दुसऱ्या दिवशीची स्वप्ने पाहत कधी झोप लागली तेच कळले नाही.
दुसऱ्या दिवशी गजर लावला होता तरी कुडकुडत्या थंडीत उठायची इच्छा होत नव्हती. पण तंबूच्या दाराशी आलेल्या बेड-टीने आम्हाला उठवल्यावर मग बाकीचे आवरणे भागच होते. पहाटेच्या अंधारातच पटापट आवरले. येथे खाटेवरून पाऊल खाली टाकल्या टाकल्या बूट-मोजे घालावे लागत. कारण राहुटीचा भाग शेतजमीनीचाच असल्यामुळे रात्रीतून कोण कोण पाहुणे तिथे आश्रयाला आलेले असत. रात्री कंदिलाच्या उजेडात उशाशी काढून ठेवलेला कपड्यांचा ताजा जोड अंगात चढवायचा, सर्व जामानिमा करून दिवसभरासाठी लागणारे सामान सॅकमध्ये कोंबून बाहेरच्या खुल्या आवारात, हातांचे तळवे एकमेकांवर चोळत, थंडीत अंगात ऊब आणायचा प्रयत्न करत प्राध्यापकांची वाट बघत थांबायचे. त्यादिवशीही तसेच झाले. पलीकडे आकाशात विविध रंगछटांची नुसती बरसात झाली होती. सकाळच्या प्रहराला शांत प्रहर का म्हणतात ते तेव्हा नव्याने कळले. जानेवारीतल्या धुक्याच्या दुलईला बाजूला सारत जेव्हा सूर्याची किरणे आसमंत उजळवू लागली होती तेव्हा आमच्या चमूने उत्खननाच्या साईटच्या दिशेने कूचही केले होते. सोबत किलबिलणाऱ्या पक्ष्यांची साथ. नागपुरी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्याला हॅट, गळ्यात स्कार्फ, टी-शर्टवर पूर्ण बाह्यांचा शर्ट, पॅंट आणि पायात शूज अशा एरवी मला अजिबात सवय नसलेल्या अवतारात सुरुवातीला वावरताना थोडे अवघडायला झाले होते. पण हळूहळू त्याची सवय झाली. हाय-वे वरून पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर थोडे आत वळून एका ओढ्याच्या बाजूला असलेल्या एका पांढरयुक्त डोंगरावर आमची उत्खननाची साईट होती. महापाषाणयुगीन संस्कृतीतील वस्तीचे अवशेष येथील उत्खननात गवसत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. अगोदरच्या वर्षी जवळच त्या काळातील दफनभूमीचे उत्खनन झाले होते. मला ह्यावर्षीच्या त्या पुरातन वस्तीवरील उत्खननात हाडे, सांगाडे वगैरे सापडणार नाहीत म्हणून थोडेसे दुः ख झाले खरे, पण त्या वस्तीच्या खुणांमध्येही काही महत्त्वपूर्ण अवशेष, पुरावे हाती लागायची शक्यता होती.
आल्यासरशी आमच्या एका प्राध्यापकांनी आम्हाला ओढ्याच्या दिशेने पिटाळले. मग त्यांनी स्वतः येऊन ओढ्याच्या पाण्यातून, परिसरातून जीवाश्म कसे हुडकायचे ते सप्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर जवळपास अर्धा-पाऊण दिवस आम्ही घोटाभर पाण्यात उभे राहून, पाठी वाकवून, माना मोडेस्तोवर ताणून जीवाश्म हुडकत होतो. उत्खनन हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे हा शोध मला त्याच बकचिंतनात लागला. पुस्तकात वाचलेली सोपी पद्धत प्रत्यक्षात आणताना किती कष्टाची असते ते पहिल्यांदाच जाणवले. लगोलग सर्व पुरातत्वज्ञांविषयीचा माझा आदर जाम दुणावला.
दुपारच्या जेवणापश्चात (नशीब, त्यासाठी वेगळी तंगडतोड नव्हती! ते जाग्यावरच यायचे! ) मोडलेल्या माना, पाठी सावरत आम्ही उत्खननाच्या चरापाशी येऊन थडकलो. चराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वेगवेगळ्या चौरसांमध्ये दोरीच्या साहाय्याने विभाजन करण्यात आले होते. आमच्या हातात छोटी छोटी हत्यारे देऊन प्रत्येकीची रवानगी एकेका कोपऱ्यात करण्यात आली. जमीन कशी हलक्या हाताने उकरायची, ब्रशने साफ करायची वगैरेंचे प्रात्यक्षिक झाल्यावर आम्ही मन लावून आपापल्या चौकोनात कामाला लागलो. खूपच वेळखाऊ, कष्टाचे, धीराचे आणि कौशल्याचे काम. कोणतीही घाई करायची नाही. काही महत्त्वाचे सापडत आहे असे वाटले तर लगेच सरांना बोलावायचे. मध्ये मध्ये आमचे सर येऊन शंकांचे निरसन करीत, प्रश्नांना उत्तरे देत आणि आमच्या आकलनाचीही चाचपणी करत. तशी मजा येत होती. पण एवढा वेळ दोन पायांवर उकिडवे बसण्याची सवय नसल्यामुळे दर पंधरा-वीस मिनिटांनी हात-पाय झाडायचा, झटकायचा कार्यक्रमही चालू असे. पाठ धरली की जरा हात-पाय मोकळे करण्यासाठी इतर लोकांची खोदाखोदी कोठवर आली हे बघण्यासाठी जरा फिरून यायचे.... अर्थातच आपल्या चौकोनापेक्षा इतरांचे चौकोन जास्त आव्हानात्मक व आकर्षक वाटत असत!
मला नेमून देण्यात आलेल्या चौकोनात मला तुटकी-फुटकी मातीची खापरे, शंख, हस्तीदंती बांगड्यांचे काही तुकडे मिळत होते. प्रत्येक अवशेष जीवापाड जपून हलकेच साफ करताना नकळत मनात तो अवशेष तिथे कसा, कोठून आला असेल वगैरेची कल्पनाचित्रे रंगत असत.
मी काम करत असलेल्या चौकोनाच्या जवळच मातीत पुरलेल्या रांजणाच्या खुणा सापडल्या होत्या. त्यामुळे आम्ही काम करत असलेला भाग एखाद्या घराच्या स्वयंपाकाच्या जागेतील असावा असे वाटत होते. आमचे प्राध्यापक आम्हाला खापरांचे वर्गीकरण कसे करायचे, त्यांच्यावर दृश्य खुणा कशा शोधायच्या, त्यांची साफसफाई इत्यादीविषयी अथक मार्गदर्शन करत असत. काम कितीही पुढे न्यावे असे वाटले तरी सूर्याचे मावळतीचे किरण आम्हाला जबरदस्तीने परतीचा कँप साईटचा रस्ता धरायला लावत असत. शिवाय दिवसभर उन्हात करपल्यावर दमलेल्या थकलेल्या शरीराने जास्त काही होणे शक्यही नसे.
कँपवर परतल्यावर हात-पाय धुऊन सगळेजण मधल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या प्लॅस्टिक टेबल-खुर्च्यांचा ताबा घेत असत. मग चहा-बिस्किटांचा राऊंड होई. जरा तरतरी आली की आळीपाळीने स्नानासाठी क्रमांक लावले जात. दिवसभराची धूळ, माती, घाम, आदल्या रात्रीचा ओडोमॉसचा थर वगैरे चांदण्यांच्या आणि टॉर्चच्या प्रकाशात, किरकिरणाऱ्या रातकिड्यांच्या आणि गार वाऱ्याच्या साथीने, गरम गरम पाण्याने धुतला जाताना काय स्वर्गसुख लाभे हे शब्दांमध्ये सांगणे शक्य नाही. मग जरा किर्र अंधाराची भीती घालवण्यासाठी आपसूकच तोंडातून गाण्याच्या लकेरी बाहेर पडत आणि टेबलाभोवती गप्पा मारत बसलेल्या आमच्या 'सक्तीच्या' श्रोत्यांची बसल्या जागी करमणूक होई!
स्नानादीकर्मे झाल्यावर खरे तर माझे डोळे दिवसाच्या श्रमांनी आपोआपच मिटायला लागलेले असत. पण कंदिलाच्या प्रकाशातील राहुटीतल्या भोजनाचा दरवळ त्या झोपेला परतवून लावत मला जागे राहण्यास भाग पाडत असे. जेवणात आम्हा विद्यार्थी व प्राध्यापकांची अंगतपंगत बसे. आमचा शिपाई/ आचारी/ वाढपी आम्हाला मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालत असे. त्या पंगतीत दिवसभरातल्या उत्खननाच्या प्रगतीवर चर्चा होत. कधी कधी उष्टे हात कोरडे होईस्तोवर ह्या चर्चा रंगत. त्यातील सर्व तांत्रिक मुद्दे कधी कळत तर कधी बंपर जात. पण तरीही तारवटल्या डोळ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मुखातून मिळणारी माहिती शिणलेल्या मेंदूत साठवताना काय तो आनंद मिळे!
जेवणापश्चात पुन्हा जरा वेळ बाहेरच्या टेबलाभोवती गप्पा रंगत. कधी आम्ही पाय मोकळे करण्यासाठी हाय-वे च्या कडेकडेने जरा फेरफटका मारून येत असू. पण दिवसभरच्या सवय नसलेल्या परिश्रमांनंतर माझे पाय अशा सफरीसाठी जाम कुरकुरत. तरीही माघार घ्यायची नाही ह्या तत्त्वानुसार मी स्वतः ला रेटत असे. नऊ-साडेनवाला सगळेजण आपापल्या राहुट्यांमध्ये परतलेले असत. मग रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात हलक्या आवाजात गप्पा (हो! गप्पांचे आवाजही मोकळ्या माळरानामुळे इतरांना ऐकू जायचे! ), दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स आणि मग कधीतरी कंदिलाची ज्योत बारीक करून निजानीज!
दुसरे दिवशी पुन्हा आदल्याच दिवसाचे रूटीन! रोज साईटवर जाता - येता रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये चमचमणारे दगड मिळायचे. अमेथिस्ट, टोपाझच्या रंगछटांचे ते जाडजूड चमचमणारे दगड गोळा करताना खूप मजा यायची. दुपारच्या जेवणानंतर जिथे कोठे, ज्या झाडाखाली सावली मिळेल तिथे अर्धा तास विश्रांती घेऊन मगच पुढच्या कामाला सुरुवात व्हायची. मग आमच्यातील काही उत्साही जन आजूबाजूच्या संत्रा-पेरुंच्या बागांमध्ये रानमेवा शोधत हिंडायचे. गावातील शेतकरी कधी कधी आम्ही काय करतोय हे पाहायला यायचे. आम्हाला आधीपासूनच गावकऱ्यांशी कसे वागायचे वगैरेच्या अनौपचारिक सूचना देण्यात आल्या असल्यामुळे आम्ही आपले हातातले काम चालू ठेवायचो.
आमचे एक प्राध्यापक आम्हाला अनेकदा काही सोन्याचांदीचे दागिने अंगावर असल्यास ते उत्खननाचे वेळी काढून ठेवायला सांगायचे. ते असे का सांगतात ते मात्र कळत नव्हते. शेवटी त्याचा उलगडा एका मजेदार किश्शाच्या कथनाने झाला. अशाच एका उत्खननाचे वेळी तेथील एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन उत्खनन करत असलेल्या खड्ड्यात पडली. नंतर लक्षात आल्यावर शोधाशोध झाली व अखेर ती चेन खड्ड्यातून मिळाली. एव्हाना गाववाल्यांपर्यंत ही बातमी कशीतरी पोचलीच होती. मग काय! थोड्याच वेळात त्या जमीनीचा मालक व त्याचे इतर गाववाले साथीदार उत्खननाच्या साईटवर हजर झाले! त्यांच्या मते उत्खननात बरेच गुप्तधन सापडले आणि त्या गुप्तधनात सोन्याची चेनही मिळाली! वातावरण बघता बघता गंभीर झाले. गाववाले गुप्तधन ताब्यात द्या ह्या आपल्या आग्रहापासून मागे हटायचे नाव घेईनात आणि त्यांची कशामुळे खात्री पटेल ह्यावर साईटवरील लोकांमध्ये खल-विचार. शेवटी त्या गाववाल्यांची कशीबशी समजूत काढता काढता तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व मदतनीसांच्या नाकी नऊ आले! तेव्हापासून जरा जास्तच सावधानता!
एव्हाना मी काम करत असलेल्या चौकोनात फार काही निष्पन्न होत नव्हते. परंतु माझ्या दोन सख्या ज्या चौकोनात काम करत होत्या तिथे फक्त चूलच नव्हे तर वैलीच्या अस्तित्वाच्या खुणाही दिसू लागल्या होत्या!! महापाषाणयुगीन संस्कृतीतील मानवालाही चूल-वैलीचे तंत्रज्ञान अवगत असण्याविषयीचा हा फार फार महत्त्वाचा पुरावा होता. मग त्याविषयी अगणित चर्चा, तर्क, अंदाज चांगलेच रंगत असत. दरम्यान आम्ही उत्खननाच्या व आमच्या राहुट्यांच्या साईटपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर असलेल्या प्रत्यक्ष भागीमारी गावाचा फेरफटका करून आलो होतो. मुख्य वस्तीतील बऱ्याच घरांचा पाया पांढर असलेल्या भागातच होता. मूळ जोत्यावरच पुढच्या अनेक पिढ्या आपली घरे बांधत होत्या. म्हणजे कितीतरी शे - हजार वर्षे त्याच भागात लोक वस्ती करून राहत होते. अर्थात तिथे लोकांची रहिवासी वस्ती असल्यामुळे तसे तिथे उत्खनन करणे अवघड होते. पण निरीक्षणातून अंदाज तर नक्कीच बांधता येत होता.
आतापर्यंत आमच्या खरडवह्यांमध्ये आम्ही उत्खननाच्या चराच्या आकृत्या, कोणत्या चौकोनात काय काय सापडले त्याच्या नोंदी, खुणा, तपशील व जमतील तशा आकृत्या वगैरे नोंदी ठेवतच होतो. त्या चोपड्यांना तेव्हा जणू गीतेचे महत्त्व आले होते. एकेकीच्या वहीत डोके खुपसून केलेल्या नोंदी न्याहाळताना ''ह्या सर्व घडामोडींचे आपण साक्षीदार आहोत'' या कल्पनेनेच मनात असंख्य गुदगुल्या होत असत. काळाच्या पोतडीतून अजून काय काय बाहेर पडेल ह्याचीही एक अनामिक उत्सुकता मनी दाटलेली असे.
बघता बघता आमचा उत्खननाच्या साईटवरचा वास्तव्याचा काळ संपुष्टात आला. आमची बॅच गेल्यावर दुसरी विद्यार्थ्यांची बॅच उत्खननात सहभागी होण्यासाठी येणार होती. मधल्या काळात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी गावातील प्रभात फेरीत उत्स्फूर्त भाग घेऊन त्यानंतर आमच्या तज्ञ प्राध्यापकांनी अतिथीपद भूषविलेल्या गावातील पंचायत व शाळेच्या समारंभात उपस्थिती लावतानाही आगळीच मजा आली. दुपारी असेच फिरायला गेलो असता माझ्या लाल रंगाच्या टीशर्टला पाहून जरा हुच्चपणा दाखवणाऱ्या रस्त्यातील म्हशीमुळे माझी भंबेरी उडाली व इतरांची करमणूक झाली!
निघताना आम्ही मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे सावनेरला रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठून नागपूर स्टेशन गाठले. तिथून पुढे पुण्यापर्यंतचा सोळा-सतरा तासांचा प्रवास. अंगाला अजूनही भागीमारीच्या मातीचा वास येत होता. नाकातोंडात-केसांत तिथलीच धूळ होती. हातांना कधी नव्हे तो श्रमाचे काम केल्यामुळे नव्यानेच घट्टे पडले होते. पायांचे स्नायू दुखायचे बंद झाले नसले तरी दिवसभराच्या उठाबशांना सरावू लागले होते. आणि डोळ्यांसमोर सतत उत्खननाच्या साईटची दृश्ये तरळत असायची. तो अख्खा प्रवास आम्ही सहभागी झालेल्या उत्खननाच्या आकृत्या पडताळण्यात, त्यावर चर्चा करण्यात आणि दमून भागून झोपा काढण्यात घालवला.
घरी आल्यावर आप्त-सुहृदांनी मोठ्या उत्सुकतेने प्रवासाविषयी, उत्खननाविषयी विचारले. तेव्हा त्यांना काय काय सांगितले, त्यातील कोणाला मी सांगितलेल्यातील काय काय उमजले हे आता लक्षात नाही. एका अनामिक धुंदीत होते मी तेव्हा! पण आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय असा अनुभव देणारे ते सात दिवस, ते अनमोल उत्खनन आणि वेगळ्या वातावरणात मिळालेली निखळ मैत्रीची साथ यांमुळे भागीमारी कायम लक्षात राहील!
-- अरुंधती
(छायाचित्र स्रोत : विकिमीडिया)