
आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे? आता एखाद्या छोट्या बाळाचे बोळके निरागस हसू पाहून आपल्याही चेहऱ्यावर जसे नकळत स्मित उमटते त्याच सहजतेने कोणा म्हातारबाबांचे किंवा म्हातारबाईंचे बोळके हसू पाहिले की मलाही हसू फुटल्याशिवाय राहत नाही. कदाचित या हास्याचा संबंध बालस्मृतींशीही असण्याची दाट शक्यता आहे! आमच्या भाड्याच्या जागेच्या मालकीणबाई आमच्याच खालच्या जागेत राहायच्या. त्या व्यवसायाने डेंटिस्ट (दंतशल्यविशारद) होत्या. घरातच त्यांचा ऐसपैस दवाखाना होता. त्यांच्याकडे अनेक लोक कवळ्या बनवून व बसवून घ्यायला येत असत. त्यांच्याकडील पेशंट्स चेहऱ्यावरील करुण भावावरून सहज ओळखता येत असत. येताना व जातानाच्या त्यांच्या चेहऱ्यांत जमीन-अस्मानाचा फरक पडलेला असे. कदाचित म्हणूनच मी व आमच्या कुटुंबीयापैकी कोणीही त्यांच्याकडून आमचे दंतकाम करून घेण्यास कधीच धजावलो नाही. कवळ्या सोडल्या तर त्यांच्याकडे इतर पेशंट्सची फारशी गर्दी नसे. दवाखान्याच्या आतील बाजूस असलेल्या छोटेखानी जागेत त्यांचे हे कवळ्यांचे कारा(गीर)गृह थाटलेले होते. अतिशय जुनाट हत्यारांनी त्यांचे हे कवळीकाम चालत असे. अनेकदा मी व मालकीणबाईंचा माझ्याच वयाचा नातू दवाखान्यावरील पोटमाळ्यात लपून भयचकित व उत्कंठित नजरांनी ह्या कवळ्या आकाराला येताना पाहत असू. नंतर मोठ्यांची नजर चुकवून त्या कवळ्या व त्यांचे साचे हळूच हाताळत असू. वरच्या व खालच्या जबड्याच्या कवळ्या एकमेकांवर आपटण्याचा आविर्भाव करत त्या कवळ्याच जणू बोलत आहेत अशा थाटात घशातून वेगवेगळे आवाज काढण्यात आम्हाला फार मजा वाटे. मालकीणबाईंच्या यजमानांनाही वयोपरत्वे कवळी बसवली होती. तोंड धुताना त्यांनी कवळी काढून बाजूला ठेवली की ती कवळी लंपास करून धावत सुटायचे हा आमचा लाडका उद्योग होता. मग नंतर दोन-चार धपाटे खाल्ले की ती कवळी परत केली जायची. मालकीणबाईंचे यजमान आपली कवळी काचेच्या पेल्यात घालून विसळायचे. प्रत्येक खाण्याजेवणानंतर त्यांना बेसिनवर उभे राहून भांडी घासल्यासारखी त्यांची कवळी घासताना पाहून आमच्या बालमनांमध्ये उगाचच करुणा दाटून यायची.

-- अरुंधती
No comments:
Post a Comment