Sunday, February 21, 2010

वारुडी


वारुडी गाव म्हणजे पुण्यापासून अक्षरशः काही किलोमीटर्सच्या अंतरावर! पण एकदा कात्रज मागे टाकले आणि गावाकडे जाणारा डोंगरातील वळणावळणाचा, गर्द हिरवाईचा, तीव्र चढाचा रस्ता लागला की वाटू लागते, आपण पुणे शहराच्या खरोखरीच इतक्या जवळ आहोत? ह्या गावी जायला एक परिवहन मंडळाची बस आहे, जी दिवसाकाठी (मी त्या गावी गेले तेव्हा) दोन वाऱ्या करायची व रात्री मुक्कामाला गावातच असायची. बाकी तिथे पोचायचे म्हणजे मोटरसायकल किंवा चारचाकीला पर्याय नाही. चार-पाच वर्षे झाली असतील मी त्या गावाला भेट देऊन. अजूनही ती भेट जशीच्या तशी डोळ्यांसमोर येते.
त्या दिवशी आमच्या एका स्नेह्यांनी वारुडी गावात गावकऱ्यांसाठी एका खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्या स्नेह्यांचा वारुडीजवळच स्वतःचा मळा आहे. साहजिकच त्यांना गावातील लोकांविषयी विशेष आत्मीयता आहे. कार्यक्रमासाठी आम्ही एक जीप व दोन मोटारगाड्यांमधून निघालो. जीप व दोन्ही गाड्यांच्या डिक्क्या व यच्चयावत रिकामी जागा सामानाने ठासून भरलेली. काय होते हे सामान? तर सतरंज्या, ऍंम्प्लीफायर्स, इन्व्हरटर, पाण्याच्या बाटल्या, मायक्रोफोन्स, वायरींची भेंडोळी, इमर्जन्सी लॅंप्स आणि संगीत-वादनाचे साहित्य! बरोबर! आम्ही ज्या कार्यक्रमासाठी चाललो होतो त्यात संगीत तर होतेच, शिवाय गावकऱ्यांना स्वदेशीचे, व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगणारे एक कार्यकर्ते व फर्डे वक्ते आमच्याबरोबर होते. गायक - वादक चमूत आम्ही चारजण होतो व बाकी सर्वजण ह्या गावात जाऊन लोकांच्या उपयोगी पडण्यास उत्सुक असे आय. टी. व तत्सम नामवंत क्षेत्रात काम करणारे तरुण, तरुणी.
चारशे - पाचशे उंबऱ्याच्या त्या गावात आम्ही पोचलो तेव्हा सूर्य पश्चिमेकडे कलला होता. गावात सर्वांना जमा करायची एकमेव जागा म्हणजे गावातील देऊळ. त्या देवळातच आम्ही बरोबर आणलेले सर्व सामान ठेवले. आमच्यासमोरच देवळाच्या समोरच्या मोकळ्या जागेत केरसुणी फिरवून थोडा सडा घालण्यात आला. तोवर आम्ही वीजेच्या अपेक्षित गायब असण्यामुळे इन्व्हर्टर, ऍंम्प्स, मायक्रोफोन्स, वायरी यांची जुळवाजुळव करण्याच्या धडपडीत होतो.
अंधार पडला तसा एक कळकटलेल्या वेषातील पुजारी आला व त्याने देवळात दिवाबत्ती केली, घंटानाद केला. जणू सिग्नल मिळाल्याप्रमाणे गावातील लोक देवळासमोरच्या मोकळ्या पटांगणात जमा होऊ लागले. येताना बहुतेकांनी आपापल्या धाबळ्या, सतरंज्या, तरटे आणलेली, तीच अंथरून इतरांनाही बसायला जागा करून देत होती ही मंडळी. आम्हाला बसायला अशी वेगळी जागा नव्हतीच! पण लोकांना कोण बोलत आहे, कोण गात आहे हे तर दिसायला हवे! मग देवळाच्या चिंचोळ्या पायऱ्यांवरच सतरंज्या अंथरल्या. त्यावर गायक, वादक व त्यांची वाद्ये विराजमान झाले. 'साऊंड चेक' झाला. एरवी भोपूसारख्या कर्ण्याची सवय असलेले गावकरी आमच्या आजूबाजूचे ऍंम्प्लीफायर्स कौतुकाने न्याहाळत होते.
बघता बघता पटांगण भरले. आता इमर्जन्सी लॅंप्स व गावकऱ्यांनी पेटवलेल्या मशालींनी सारा परिसर उजळला होता. फारसा विलंब न करता आम्ही गणेशवंदनेने सुरुवात केली. थोड्याच वेळात गावकऱ्यांच्या लक्षात आले की हा आपला नेहमीसारखा भजनाचा कार्यक्रम नाही. कारण ह्यात सर्व धर्मांना अभिवादन होते, ईश्वराला नमन होते आणि सोपे शब्द, सोप्या ठेकेबद्ध चाली यांबरोबरच सर्व गावकऱ्यांना सामील होण्याचे आवाहन होते. हळूहळू मुंड्या डोलू लागल्या, हात टाळ्या वाजवून ठेका धरू लागले, शब्द येवोत वा ना येवोत - कंठ गाऊ लागले.... छोटी मुले लगेच उठून तालावर नाचू लागली. त्यांना पाहून लाजऱ्या बुजऱ्या बाया पदरात तोंड लपवून फिदीफिदी हसू लागल्या. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात स्वरांच्या व भक्तीच्या लडी उलगडू लागल्या. भक्तीमय अशा त्या वातावरणात आलेल्या एका प्रशिक्षकांनी लोकांचे छोटेसे ध्यान घेतले.
ध्यानातून सगळे बाहेर आले तेव्हा रातकिड्यांचा आवाजही खूप मोठा, कर्कश्श वाटत होता. वातावरणात एक अनामिक गंध भरून राहिलेला. मोकळ्या हवेबरोबर येणारा, चुलीचे, गोवऱ्यांचे, शेणाचे, धुळीचे वास गुंफले गेलेला.... देवळात जाळलेल्या कापूर-उदबत्तीच्या वासात मिसळून पल्याडच्या हिरव्या शेतांमध्ये, सळसळणाऱ्या झाडांमध्ये नाहीसा होणारा....
आमच्याबरोबर आलेल्या मान्यवर वक्त्यांनी लोकांशी मोठ्या खुबीने संवाद साधायला सुरुवात केली. पहिल्यांदा कोणी फारसे बोलत नव्हते. पण हळूहळू भीड चेपली जात होती. अनेकांनी मान्य केले की त्यांना गुटखा, तंबाखू, दारूचे व्यसन आहे. त्यात बराच पैका जातो. कर्जपाणी होते. घरी पैका पुरत नाही. तब्येत खराब होते. दवाखान्यात जायचे तरी डोंगर उतरून बरेच अंतरावर जायला लागते. एकेक करत लोक आपल्या समस्या सांगत होते. काहीजण ह्यातून बाहेर यायचंय का विचारल्यावर माना डोलवत होते. काही वेळा त्यांच्या बायका हलकेच फुसफुसत होत्या. एकमेकींना 'तू बोल, तू बोल' करत होत्या. दोन-चार म्हाताऱ्या आजीबाईंनी तर स्पष्ट शब्दांत सांगितले, तुम्ही लोक आमच्या गावात या, आमच्या पोरांना व्यसनातून बाहेर काढा, त्यांना चार चांगल्या गोष्टी शिकवा.... आम्ही तुमच्याबरोबर आहोत!!!
दुसऱ्या दिवशीपासून गावकऱ्यांसाठी विनामूल्य शिबिर घ्यायचे ठरले. त्यात त्यांना आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती, ध्यान, प्राणायाम व एकमेकांशी सुसंवाद कसा साधता येईल यांचे प्रशिक्षण मिळणार होते.
पुरुषांचा उत्साह तसा यथातथाच होता. पण बायकांच्या गटात बरीच उत्सुकता दिसून येत होती. शिबिराची वेळ संध्याकाळची म्हटल्यावर एकीने धीटपणे पुढे होऊन चुलीसमोरून संध्याकाळी उसंत मिळत नाही, घरातल्यांची
जेवणे झाल्याबिगर बाहेर पडता येत नाही असे सांगितले. मग चार-पाच बायकांमध्ये आपापसांत चर्चा झाली व पुढचे पाच दिवस संध्याकाळचा स्वैपाक आधीच करून ठेवायचे एकमते ठरले. सर्व काही 'फिक्स' झाल्यावर आम्ही दोन- तीन वेगवान चालींची, ठेका धरायला लावणारी भजने गायली व कार्यक्रमाचा समारोप केला. आमच्या ज्या स्नेह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांनी गावकऱ्यांना प्रसादवाटप केले.
कार्यक्रम संपल्यावर आम्ही पुन्हा आपापल्या सतरंज्या गुंडाळल्या, वाद्यांना आवरणे घातली. मायक्रोफोन्स, वायरी, ऍंम्प्लीफायर्स पॅक केले. देऊळ व त्याच्या आजूबाजूची आमच्या सामानाने व्यापलेली जागा रिकामी केली.
सर्व कार्यक्रम संपल्यावर काही बाया येऊन आमची मोठ्या कुतुहलाने चौकशी करत होत्या, काहीजणी कार्यक्रम आवडला म्हणून लाजत सांगत होत्या. गावातली पुरुष मंडळी आमच्याबरोबर असलेल्या आमच्या पुरुष सहकाऱ्यांशी बोलत होती, शंकांचे निरसन करून घेत होती. गावातून सर्वांचा व रस्त्याच्या एका बाजूला उभ्या रिकाम्या, वस्तीला आलेल्या बसचा निरोप घेऊन आम्ही स्नेह्यांच्या मळ्याकडे कूच केले. तिथे त्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये आमच्यासाठी गरमागरम पोहे व मसाला दूध अशी व्यवस्था केली होती. रात्रीचे साडेनऊ कधीच वाजून गेलेले... सगळ्यांना आता घरी परतायचे वेध लागले होते. दुसऱ्या दिवशी बहुतेकांच्या नोकऱ्या होत्या. भरभर खाणे आटोपून आम्ही त्यांच्या गोशाळेतून एक चक्कर टाकली. जेमतेम एक महिना वयाची दोन वासरे दंगा करत होती. सर्व देशी गायींना स्पीकर्सद्वारा हळुवार आवाजात 'ओम नमः शिवाय' चा जप चोवीस तास ऐकवायची त्यांची कल्पना पाहून मजा वाटली. बाहेर टिपूर चांदणे पडलेले! त्या चांदण्यात ती गोशाळा, हिरवागार मळा, पत्र्याची शेड आणि बाजूचा डोंगर न्हाऊन निघालेले..... मन तिथून हालायला तयार नव्हते. शहराच्या दगदगीतून एका बाजूला, आपल्याच नादात मस्त असलेल्या ह्या निवांत गावातून पावले चटचट हालत नव्हती. त्यात चांदण्या रात्री मने उजळवून टाकणारा भवतालचा मोहक नजारा....
परत येताना वाटेत ड्रायव्हरने माहिती पुरविली की ह्या डोंगरात बरेच जंगली ससे आढळतात.
डोंगर उतरल्यावर काही अंतर गेल्यावर मग पुन्हा शहराच्या खुणा जाणवू लागल्या...
रस्त्यांवरचे सोडियम व्हेपरचे दिवे, निऑन चिन्हे - फलक उगाचच डोळे जास्त दिपवत आहेत, वाहनांचे हॉर्न्स फार कर्कश्श वाजत आहेत असे वाटू लागले.
त्यांना वारुडीच्या निसर्गरम्य वातावरणातील लयबद्ध संगीताची, चौफेर चांदण्याची व लुकलुकत्या मशालींची सर नव्हती ना!
-- अरुंधती

6 comments:

  1. Anonymous7:27 PM

    WOW!!!

    ReplyDelete
  2. Khup Chaan watla vachun.
    Asa watla ki atta javaa tikde!

    :)

    thanks for sharing your wonderful gift of writing with all of us re !

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. ओमी, तुला वारुडीला लगेच जावंसं वाटलं ह्यातच सर्वकाही आलं! :-)

    ReplyDelete
  5. Atishay Sundar varnan aahe. Agadi attach Varudi la jaun aalyasaarakha vaatala.
    Aani ek Prashna, tumchya Posts cha Title tumhi swatah band kelay ki te aapoaap jhala aahe. Karan, Tumchya posts cha sheershak vegala disat naahi. fakt utsukatepoti vichartoy.

    ReplyDelete
  6. नवनवीन प्रयोग करून पाहत आहे. ब्लॉगिंग अजून शिकत आहे, त्यामुळे काय चांगलं दिसतंय वगैरेचे नित्य प्रयोग चालू असतात. तुमच्या प्रतिक्रिया निश्चित स्वागतार्ह! :-)

    ReplyDelete