Wednesday, February 24, 2010

कथेकरी, टाळकरी व मृदंगकरी

ही कथा आम्हाला बालपणी आमची आजी सांगायची.
आजीचा जन्म, संगोपन कोंकणात झाले. त्यामुळे तिला त्या भागात प्रसिद्ध असलेल्या बऱ्याच कथा, कहाण्या तोंडपाठ असायच्या. ती होतीही गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे सर्व कहाण्या चटकदार करून, रंगवून रंगवून सांगायची. रात्रीची जेवणे आटोपली की आम्ही मुले आजीभोवती 'गोष्ट सांग, गोष्ट सांग' करत पिंगा घालायचो. मग तिच्या गोधडीत शिरून, मांडीवर डोके ठेवून तिने सांगितलेल्या साभिनय गोष्टींची सर लिखित गोष्टीला येणार तरी कशी? पण तरीही ही मजेशीर गोष्ट बालगोपाळांना व मोठ्यांनाही नक्कीच आवडेल! कोकणी कथा असल्याने अर्थात तिची खरी खुमारी रात्रीच्या गुडुप्प अंधारात ऐकताना येते.

*****************************************************************************
कथेकरी, टाळकरी व मृदंगकारी

फार पूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब रहायचं. घरात जेमतेम दोन वेळा कसंबसं पोटात पडेल इतपत उत्पन्न यायचं. कुटुंबात तीन लहान लहान मुलं व त्यांची आई राहायचे. मुलांची आई अतिशय कष्टाळू, पण चतुर होती. सारे गाव त्यांना सुभद्राकाकू नावाने हाक मारायचे. मुलांचे वडील बराच काळ यात्रेसाठी घराबाहेर गेले असल्याने मुलांचे संगोपन त्यांची आईच करत होती. परसातला भाजीपाला, साठवणीतली तांदूळ आणि थोडे धान्यधुन्य यांवर त्यांची गुजराण चालत असे. कधी कोणाची जास्तीची कामे करून ती माऊली संसाराचा गाडा ओढत होती.
एक दिवस त्या गावात तीन वस्ताद, ठक लोकांनी प्रवेश केला. नव्या नव्या गावांना जायचं, तेथील कोठल्यातरी घरात मुक्काम ठोकून पाहुणचार झोडायचा गावातील सर्व माहिती काढून, ठरवून एका रात्री तिथे दरोडा टाकायचा आणि लूट घेऊन पोबारा करायचा ही त्यांच्या कामाची पद्धत होती.
गावात शिरल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे माहिती काढायला सुरुवात केली. माहितीमध्ये त्यांना सुभद्राकाकूचे पती यात्रेला गेल्याचे कळले. मग काय! त्यांचे निम्मे कामच झाले! थोड्या वेळातच ठक मंडळी सुभद्राकाकूच्या दारात हजर झाली.
आल्यासरशी त्यांनी सुभद्राकाकूच्या यजमानांना यात्रेच्या वाटेत भेटल्याची बतावणी केली व यजमानांच्या आग्रहाखातर आपण सुभद्राकाकूंच्या घरी पाहुणचार घ्यायला आल्याचे सांगितले.
आता सुभद्राकाकूला चांगले माहीत होते की आपली एवढी गरीबीची परिस्थिती असताना आपला नवरा कोणाला असा आग्रह करणार नाही. पण दारी आलेल्या पाहुण्यांना नाही तरी कसे म्हणणार? तिने मुकाट्याने त्यांना घरात घेतले. ओसरीवर त्यांच्या मुक्कामाची सोय केली.
ह्या खेपेला ठक मंडळींनी कथेकरी, टाळकरी व मृदंगकऱ्याची सोंगे घेतली होती. कथेकरी बुवा एकतारीच्या सुरावर भजने गाऊन लोकांना पुराणातील कथा ऐकवी आणि टाळकरी त्याला टाळ वाजवून तर मृदंगकारी मृदंग वाजवून साथ करत असे. रोज संध्याकाळी गावाबाहेरच्या देवळात सर्व गावकऱ्यांना जमवून ते नवनव्या कथा ऐकवत आणि त्या मिषाने गावकऱ्यांच्या हालचालींची, पैशाअडक्याची माहिती काढत.
एक-दोन करत चांगले सात-आठ दिवस गेले तरी पाहुणे मंडळी मुक्काम हालवायचं चिन्ह दिसेना. घरातील साठवणुकीचं धान्यपण संपत चाललं. शिवाय त्या पाहुण्यांचं वागणं, आपापसातलं कुजबुजणं, रात्री-बेरात्री गावात चक्कर मारणं सुभद्राकाकूला काही ठीक वाटेना. त्यांना खायला घालून घालून घरात मुलांनादेखील अन्न उरत नसे. पण ह्या नको असलेल्या पाहुण्यांना घालवायचं कसं?
विचार करता करता तिला एक युक्ती सुचली. तिनं आपल्या मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना ही युक्ती सांगितली. मुलं सुद्धा रोजरोजच्या पाहुण्यांच्या मागण्यांना, त्यांची कामे करण्याला कंटाळली होती. आईची युक्ती ऐकताच त्यांचे चेहरे उजळले आणि मुलं त्या आगंतुक पाहुण्यांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहू लागली.
इकडे ठक मंडळींनी त्या रात्री अमावास्या आहे हे हेरून गावात दरोडा टाकायचा बेत केला होता. त्यासाठी साहित्याची जमवाजमव करायला ते सकाळपासून बाहेर गायब झाले होते. त्यांचा रात्रीच्या अंधारात गावातील सोनंनाणं लुटून पळ काढायचा मनसुबा होता.
दुपारच्या जेवणाची वेळ झाली तसे तिन्ही पाहुणे त्यांचा फेरफटका, गुप्त तयारी आटोपून सुभद्राकाकूच्या ओसरीवर परत आले. बाहेरूनच त्यांनी आत चाललेले संभाषण ऐकले.
मोठा लेक सुभद्राकाकूला विचारत होता, "आई, आज अमुशा (अमावास्या) आहे ना? तू आमच्यासाठी आज काय खास जेवण बनवणार?"
त्यावर सुभद्राकाकू उत्तरली, "अरे लब्बाडा, तुला एवढी कसली रे घाई? आज मी तुमच्यासाठी किनई खास खास बेत केलाय जेवणाचा.... पण तुम्हाला सांजच्यापर्यंत वाट पाहायला लागेल!! "
ठकमंडळी जेवायला बसली तशी सुभद्राकाकू त्यांना वाढता वाढता म्हणाली, " आज अमुशेला आमच्या गावात बळी देतात, त्याचं वेगळं मसाल्याचं, वाटणाचं जेवण असतं.... " पाहुण्यांच्या तोंडाला तर एकदम पाणीच सुटलं. त्यांना रात्र कधी एकदा येते असं झालं....
जसजसा दिवस कलू लागला तसतशी सुभद्राकाकूच्या घरात लगबग सुरू झाली. "अरे परशा, त्या विळ्याला आणि चाकूला धार आहे का बघ रे नीट!" "अगं गोदे, ते वाटण नीट वाट बरं....त्यात पाणी नको घालूस फार! आज सांजच्याला खासा बेत आहे ना! " घरात मसाल्याचे खमंग वास सुटले होते. पाहुण्यांच्या पोटात त्या वासानेच कावळे कोकलू लागले होते.
संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, अंधार पडला. रातकिडे किर्र किर्र आवाज करू लागले. अमावास्येमुळे आकाशात चंद्र नव्हता. सगळीकडे काळोख. सुभद्राकाकूचे घर गावात जरा एका बाजूला होते. ताडामाडांच्या गर्द सावल्यांनी पार झाकलेले. तिथे तर चिडीचूप अंधार पसरलेला. घरात चुलीचा काय तो जाळ आणि एक मिणमिणती चिमणी. सुभद्राकाकूच्या भोवती तिची तिन्ही मुले कोंडाळं करून बसलेली. त्यांच्या सावल्या भेसूरपणे समोरच्या भिंतीवर उमटलेल्या. चार गावचं पाणी प्यायलेल्या ठक मंडळींच्या मनातही त्या सावल्या पाहून अस्वस्थ चलबिचल सुरू झाली.
तेवढ्यात बाहेर कोठेतरी एक कुत्रे केकाटले. इतर कुत्री पण ओरडू लागली. वटवाघूळ चिरकले. ठकांच्या छातीत उगीचच धडधड सुरू झाली. इतक्यात त्यांना पुन्हा एकदा सुभद्राकाकू आणि तिच्या तिन्ही पोरांचे संभाषण कानावर पडले.
"आई, मी तर कथेकऱ्याला खाणार... तू त्याला भाजणार की तळणार? "
"आई, मला टाळकरी बुवा खायला फार मजा येईल. त्याला तू केलेला मसाला लावला की काय मस्त चव लागेल! "
"ए आई, मलाच का तो मृदंगकारी बुवा? कसला लुकडा आहे तो! माझं कसं भागणार त्यानं? मला टाळकरी बुवाच हवा! चांगला खमंग भाज त्याला!! "
ह्यावर सुभद्राकाकूचं उत्तर, "बाळांनो, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला आज मी जस्सं हवं तस्सं, हवं ते बनवून देते, मग तर झालं? आज अमुशेचा बळी आपल्या घरातून आहे हे पाहुण्यांना माहीत नाही बहुतेक! ते आले की मी लागतेच पुढच्या कामाला..... परशा, तो चाकू आणि मोठा सुरा काढून ठेवलाय, तो आणून दे रे मला! "
मायलेकरांचा हा संवाद ऐकून कथेकरी, टाळकरी व मृदंगकारी बुवांची मात्र पाचावर धारण बसली. टपाटपा घाम गळू लागला, भीतीनं श्वास घेता येईना, डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्यांच्या डोळ्यांसमोर सुभद्राकाकू हातात धारदार चाकू घेऊन आपल्याला भाजताना, तळताना आणि वाटण लावतानाचे दृश्य दिसू लागले. आता फार काळ इथे थांबलो तर आपली धडगत नाही हे त्यांनी ओळखलं आणि रात्रीच्या अंधारात बाहेरच्या बाहेर पोबारा केला.
आपले पाहुणे पळून गेल्याची खात्री केल्यावर सुभद्राकाकूने मुलांची पाने घेतली. तिच्यासमोर परातीत कणकेचे तीन उंडे होते. त्यातल्या 'कथेकरी बुवा' नाव दिलेल्या उंड्याला तिने भाजायला घेतले आणि विचारले, "कथेकऱ्याला कोण खाणार होतं? " उत्तरादाखल मुलं फक्त खुसुखुसू हसली.
त्या रात्री गावातील लोकांना ठक मंडळींनी दरोड्यासाठी जमा केलेलं सामान, शस्त्रे सापडली आणि ते त्या तिघांना पकडायला सुभद्राकाकूच्या दारात आले. पण तिच्याकडे आल्यावर तिने आणि तिच्या मुलांनी ठक मंडळींना गावातून कसे अक्कलहुशारीने घालवून दिले ह्याची हकिकत त्यांना समजली. केवळ त्यांच्यामुळे गावावरचा दरोडा टळला होता.
गावच्या खोताने त्यांना तांदळाची दोन पोती बक्षिसाखातर देऊ केली, सुभद्राकाकूला लुगडंचोळी आणि तिच्या मुलांना बक्षीस देऊन सर्व गावकऱ्यांसमोर त्यांच्या अक्कलहुशारीचे व प्रसंगावधानाचे कौतुक केले. अशा तऱ्हेने सुभद्राकाकूच्या व तिच्या मुलांच्या हुशारीमुळे साऱ्या गावावरचे संकट टळले.
-- अरुंधती

6 comments:

  1. मला लहानमुलांना सांगता येण्यासारख्या गोष्टी अजुनही तितक्याच आवडतात हे पुन्हा एकदा कळलं..तसंही मी अद्याप अकबर-बिरबल आणि असंच काही वाचत असते म्हणा...पण ही गोष्ट खूपच आवडली अगदी एका घासात संपवली....धन्यवाद..

    ReplyDelete
  2. माझ्या लहानपणी म्हणजे ३०-३५ वर्षापुर्वी ऐकली आहे ही गोष्ट आजी कडुन.. बालपण आठवण करुन दिलं.. :)

    ReplyDelete
  3. अपर्णा, आपण वयाने कितीही मोठे झालो तरी मनाने बहुधा लहानपण मागे टाकतच नाही! मलाही म्हणूनच आजही चांदोबा, चंपक, टिन टिन वाचायला आवडतात आणि बालपणात घेऊन जातात.
    आणि सर्वात जास्त धमाल गोष्ट ऐकताना येते, नाही? तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

    ReplyDelete
  4. महेंद्र, ब्लॉग वर आपलं स्वागत! व्वा! तुम्हीपण ही गोष्ट ऐकली होती? छान आहे ना? मलापण ती लिहिता लिहिता पुन्हा बालपणात घेऊन गेली. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

    ReplyDelete
  5. Me lahaanpani goshtinchi khup pustaka vachayacho...tya divasanchi athavan karun dilyabaddal dhanyawaad! Goshta khupach avadali!

    ReplyDelete
  6. धन्यवाद! :-) अशा अनेक गोष्टी पोतडीत आहेत! करेन पोस्ट एकेक.

    ReplyDelete