Wednesday, March 10, 2010

वीजेची जादू!

लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी....
त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे.


आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फक्त लहानपणीच्या कथांमधील जादूने गोष्टी गायब करणार्‍या जादूगाराची जागा आश्वासनं देणारे मंत्री, सरकार, प्रशासन यांनी घेतली आहे. लोक काहीही म्हणोत! मात्र मी त्यांच्यावर आणि त्यांनी गायब केलेल्या वस्तूंवर विश्वास ठेवायचं सोडलं नाही हां!
आमच्याकडे बाजारात बर्‍याच गोष्टी गायब होत असतात. पण आम्ही स्वतःला सवय लावली आहे. एखादी गोष्ट गायब झाली म्हणून स्वतःचे फारसे अडू द्यायचे नाही. त्या वस्तूशिवाय जगायला शिकायचे. मग पुन्हा ती वस्तू बाजारात नव्या किमतीने अवतीर्ण होते तेव्हा ठरवायचे की त्या वस्तूला पुन्हा घ्यावे की नाही? न जाणो, उद्या पुन्हा गायब झाली तर अडायला नको हो! असं आपलं आमचं साधं सोपं मानसशास्त्र!
गेली दोन-तीन वर्षे आमच्याकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की वीज आणि पाणी हुतुतू, खो खो, लपंडाव सुरू करतात. आधी वीज गायब, मग पाणी गायब!! आह्हे ना ज्जादू?!! पाऊस पडो अगर न पडो, जलाशय - धरणे भरोत अगर न भरोत... गरजेपेक्षा पाण्याचा साठा कायम कमीच भरतो. पण तरीही आमचे सर्व मंत्री आश्वासने द्यायचं सोडत नाहीत बरं का!! कसले खेळकर आहेत ना आपले सर्व मंत्री?!! Tongue
वर्षभर भारनियमनमुक्तीच्या चर्चा, आश्वासने आम्ही श्रद्धेने ऐकतो. ह्याही वर्षी ऐकली. भक्तिभावाने इतरांनाही ऐकवली. पण सगळे थोडेच आमच्यासारखे सश्रद्ध! आमच्या भोळ्या भाबड्या चर्येकडे तुच्छ कटाक्ष टाकून, नाकपुड्या फेंदारून ते आमच्या भारनियमनमुक्तीच्या भावस्वप्नांना वास्तववादाची डूब देऊन भंग करण्यास आसुसलेले असतात. आमचे दादा, ताई निवडणुकांपूर्वी आणि नंतरही, आम्हाला ठासून सांगतात की ह्या वर्षापासून ते आमच्या भागाला भारनियमनमुक्त करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच!!! आम्हीपण लग्गेच वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणून कौतुकाचे पेढे सर्वांना भरवतो. हो, उगाच कुणाचं तोंड गोड करायचं राहिलं म्हणून त्यांनी नंतर कडूजहर मनाने आमच्या तोंडाचे पाणी (शब्दशः) पळवलं असं नको व्हायला! ह्या वर्षीचा उन्हाळा गारगार बरं का.... डोक्यावर फॅन गरगरणार, नळाला पाणी येणार, फ्रीज चालू राहणार, ए. सी. ची हवा झुळूझुळू वाहणार.... अहो, कसलं ते थंड हवेच्या ठिकाणांचं कौतुक करून राहिलात!! आमचं घर हेच आमचं थंड हवेचं ठिकाण होणार, बरं का!
उन्हाळ्याची सुरुवात तर चांगली होते. आश्वासनांच्या सुखस्वप्नांत आम्ही नेहमीप्रमाणेच गाफील असतो. वर्तमानपत्रांत कलिंगड, काकड्या, लिंबू सरबत, ऊसाच्या रसाची विक्री करणार्‍यांचे फोटो 'उन्हाळ्याची चाहूल' देत छापून यायला लागले की आम्हालाही उन्हाळ्याची चाहूल लागते. सालाबादप्रमाणे घरात ए. सी. घ्यावा की नाही ह्यावर चर्चा झडते. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे सर्व ए. सी. कांक्षी गृहसदस्यांच्या योजनांना अडसर बनण्याचे सोडून आम्हीही उत्साहाने ए. सी. घ्यायलाच पाहिजे इत्यादी इत्यादी चर्चेत समरसून भाग घेतो.
दुसर्‍याच दिवशी घरात सकाळपासूनच विजेने पोबारा केलेला असतो. पण आम्ही मनाची समजूत घालतो.... केबलमध्ये बिघाड असेल.... ट्रान्स्फॉर्मर उडाला असेल..... दुरुस्ती चालली असेल.... नाहीतर अशी पूर्वसूचना न देता ऐन परीक्षेच्या मोसमात वीजकपात मायबाप सरकार नक्कीच करणार नाही!
दुपारी घराजवळच्या भव्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनाकडे आमची पदकमले वळतात. बघतो तो काय, सारे दुकान अंधारात, दुकानातले नोकर हवा खात दुकानाच्या पायर्‍यांवर चकाट्या पिटत बसलेले आणि दुकानात मालक इमर्जन्सी दिव्याच्या प्रकाशात लुकलुकताना दिसतात.
"अहो, काय हो हे? " अस्मादिकांचा मूर्ख प्रश्न!
दुकानाचा एक आगाऊ नोकर दात विचकतो, "ह्यँ ह्यँ ह्यँ.... तुम्हाला माहीत न्हाय का ताई..... पावरकट हाय आजपासून.... आता रोज दुप्पारच्याला आसंच बसायचं.... " अमादिकांच्या फुग्यातली हवाच फुस्स गुल होते! अस्मादिक दाणकन भूतलावर आपटतात!
हाय रे माझ्या ए. सी. विरोधी दैवा! असा कसा तू अवसानघात केलास!! आता मी गारव्याच्या आशेने कोणाकडे पाहू? भर दुपारच्या उकाड्यात जर ए. सी. नाही चालला तर मग त्याला विकत घेऊन काय करणार कप्पाळ??!!
निराशेने घेरलेल्या मनाने मी दुसर्‍या दुकानी जाते. तिथेही तीच तर्‍हा!!! एवढ्या सुंदर, भव्य दालनात कितीतरी कंपन्यांचे ए. सी. मांडलेले असताना सर्व दुकान व दुकानमालक मात्र उकाडा व अंधाराच्या खाईत! काय हा विरोधाभास!! हा हन्त.... हा हन्त.... तेथून वीजमंडळाच्या कार्यालयात धडक मोर्चा..... तिथे तर कर्मचारी जांभया देत, हातातल्या वर्तमानपत्राने स्वतःला वारा घालत आणि आजूबाजूच्या माशा उडवत समस्त जगताकडे तुच्छ कटाक्ष टाकत बसून असतात. "वीज कधी येणार? भारनियमनाचे टाईमटेबल तरी द्या... " अशा सवालांना टेबलवर बसलेल्या माशीच्या सहजतेने उडविले जाते. मम पदरी/ ओढणीत घोर निराशा.....
वृत्तपत्राच्या कार्यालयात तरी आपल्या दु:खाला कोणीतरी वाचा फोडेल ह्या अंधुक आशेने आम्ही एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये डोकावतो. संपादकांसकट सर्व वार्ताहर, कर्मचारी...कोणालाच आमच्या दु:खाची कदर वाटत नाही.
"अहो ताई, तुमच्याकडे दुपारचे चार-पाच तास वीज जाते म्हणून तुम्ही डोकं धरून बसलात, मग ग्रामीण भागातील शेतकर्‍यानं काय करायचं? तिथे तर बारा - बारा तास वीज जाते.... सगळं शेतीचं काम खोळंबतं....किती नुकसान होतं माहीत आहे?" वर्तमानपत्राच्या ग्रामीण पुरवणीचे संपादक गरजतात. अस्मादिकांना उगीचच अपराधी वाटू लागतं. आम्ही वीजबिल नियमित भरतो, खाडे करत नाही, वीजचोरी करत नाही....याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनांना आपला हक्क समजावा....
घरचे लोक ह्याही वर्षी ए.सी. खरेदीचे बेत कॅन्सल करतात. शेवटी ए.सी. चालायला वीज तर हवी ना!
पण अजूनही मी आस सोडलेली नाही.... घरच्या, दारच्या अंधाराला व उकाड्याला कंटाळून जनरेटर बॅक-अप असलेल्या वातानुकूलित मॉल्स व मल्टिप्लेक्सची वाट धरलेली नाही! रोज वर्तमानपत्रांत 'आज तरी भारनियमनाची बातमी देणार का' असे पुटपुटत सर्व निवेदने, जाहिराती, श्रद्धांजल्या नीट कसून वाचणे सोडलेले नाही. न जाणो, कोठे ती बातमी छोट्या प्रिंटमध्ये छापली असली तर......!!!! मन्त्रीबोवांनी कोणत्या तरी भाषणात भारनियमनमुक्तीच्या नव्या आश्वासनांची हवा आमच्या जनतेच्या मनांत भरली असली तर?
तर अशा ह्या वीजलपंडावामुळे हैराण झालेल्या जीवांनो, असे गप्प बसू नका. खेळकर बना! आजच थंड हवेच्या स्थळांच्या सहलीचे बुकिंग करून (बे)जबाबदार अधिकार्‍यांना खो द्या. [मोर्चे, घेराव, धरणी, आंदोलने करून काहीही साध्य होत नाही... म्हणून! ] किंवा माझ्यासारखे लेखनाचे माध्यम स्वीकारून आपल्या घोर आशावादाला साजरे करा! Wink
-- अरुंधती

4 comments:

  1. मस्त लिहिले आहे!

    ReplyDelete
  2. धन्यवाद निरंजन! :-)

    ReplyDelete
  3. ताई,
    सगळी आश्वासनं, घोषणा हवेत विरायच्या आधीच आपल्याला माहीत असतं की निवडणुका संपल्यावर ह्या सगळ्या केराच्या टोपलीत जाणार आहेत. पण तरीही आपण पुन्हा नव्या आशेने नव्या दिवसाकडे बघतो. तुमचा उपहासात्मक लेख छानच झालाय, पण उपहासामागची अगतिकता खरी आहे, आणि आपल्या सगळ्यांचीच ती आहे.

    ReplyDelete
  4. धन्यवाद विद्याधर! 'आम आदमी' म्हटल्यावर हेच चालायचं....पण तरीही बोंब ठोकल्याशिवाय बरं पण वाटत नाही! :-)

    ReplyDelete