Thursday, April 08, 2010

आम्रपाली


आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी!
इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली. प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक सरदार, नामदार तरुणांना तिचे आकर्षण वाटू लागले. तिच्यावरून वैशाली नगरीत अराजक नको म्हणून मग तिला वैशालीच्या प्रमुख गणिकापदी नियुक्त करण्यात आले.
अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे.

तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतुहल आवरता आले नाही. त्याने वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महाली पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युध्द समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने खरोखरीच आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युध्द संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली.ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले.

पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला.
एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौध्द भिख्खुला इतर भिख्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बर्‍याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिख्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली.
तिने त्या भिख्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. साहजिकच इतर भिख्खूंचा थोडा जळफळाट झाला. ''तो एका क्षुद्र गणिकेच्या घरी कसे काय भोजन करू शकतो?'' त्यांची मने कुरबुरली.
काही काळाने तो बौध्द भिख्खु परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौध्द भिख्खु वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिख्खूने स्वीकारले नाही. गौतम बुध्दाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.
जेव्हा बुध्दाला ह्या आमंत्रणाविषयी कळले तेव्हा त्याने तक्रार करणार्‍या इतर भिख्खूंना गप्प बसवले व त्या तरुण भिख्खूस पाचारण केले. बुध्दाने विचारल्यावर त्या तेजस्वी तरुणाने सर्व वृत्तांत कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुध्दाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली. इतर उपस्थितांना ह्याने जबर धक्का बसला आणि लवकरच आम्रपाली व बौध्द भिख्खूच्या संदर्भातील अफवांचे पेव फुटले.
चार महिने होत आले तसे लोक उत्सुकतेने भिख्खू परत येण्याची वाट पाहू लागले. आणि काय आश्चर्य! भिख्खू परत आला पण त्याच्या पाठोपाठ आम्रपालीही भिख्खुणीच्या वेषात चालत येत होती. तिने गौतम बुध्दाची भेट घेतल्यावर आपण कसे त्या तरुण भिख्खूला भुरळ पाडण्याचा, आकर्षित करण्याचा, अनुरक्त करण्याचा वृथा प्रयत्न केला याचे त्यांच्यापाशी वर्णन केले.
बुध्दाने नंतर आपल्या शिष्यांना सांगितले की त्याने तरुण भिख्खूस आम्रपालीच्या घरी राहण्याची परवानगी दिली कारण त्याला त्या भिख्खूच्या डोळ्यांत कसलीही कामवासना दिसली नाही. त्याच्या आत्मभानाने, मनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. परिणामवश आम्रपालीचे स्वतःच्या सौंदर्याविषयीचे गर्वहरण झाले व तिला वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली.
अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुध्दाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुध्दानेही ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर तिने राजगणिकेच्या आपल्या पदाचा त्याग केला व बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला.

बौध्द संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. वयात आल्यावर विमल कौंडिण्यही बौध्द भिख्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुध्द राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुध्दांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुध्दांनी प्रसिध्द अंबपालिका सूक्त सांगितले.


आम्रपालीच्या जीवनावर आधारित ह्याच नावाचा हिंदी सिनेमा बर्‍याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. वैजयंतीमाला व सुनील दत्त ह्यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या.
त्यातील एका गाण्याचा हा दुवा :
एक अनोखे आयुष्य जगणारी, सर्व भोगविलास भोगून झाल्यावर जेव्हा आत्मभान येऊ लागले तेव्हा तो प्रवासही धैर्यपूर्वक करणारी, सर्व सुखांचा -मान मरातब - प्रतिष्ठेचा परित्याग करून खडतर वाट पत्करणारी, ज्ञान व भक्तीच्या मार्गात लीन होऊन साक्षात्कारापर्यंत पोहोचलेली ही निश्चयी स्त्री! तिचा हा जीवनप्रवास नक्कीच वेगळा व स्फूर्तीदायी आहे.
--- अरुंधती

18 comments:

 1. खरंच विलक्षण प्रवास आहे आयुष्याचा!

  ReplyDelete
 2. धन्यवाद विद्याधर!

  ReplyDelete
 3. सरस्वती देवीनी संगीत दिलेला 'आम्रपाली' नावाचाच अ‍ेक चित्रपट १९४५ साली आला होता. त्यात प्रेम अदीब आणि सबिता देवी यांच्या भूमिका होत्या. तो सिनेमा या बुद्‌ध भिक्षुणीच्या जीवनावरच आधारित असणार. नाही म्हणायला शंकर-जयकिशननी वैजयन्ती मालेच्या 'आम्रपाली' सिनेमात 'जाओ रे, जोगी तुम जाओ रे' हे कामोद रागावर आधारित सुन्दर गाणं लताला दिलं, पण ते सोडून एस-जे आणि लतानी 'आम्रपाली'त ज़ो गोंगाट केला आहे त्यापेक्षा सरस्वती देवीचं संगीत नक्कीच सभ्य असणार. ज़ुन्या आम्रपाली मधे गाणी गायली आहे अमीर बाई कर्नाटकी. मराठीत वसन्त प्रभूची ज़शी ज़वळज़वळ सगळीच गाणी खूप चांगली आहेत, तशी अमीरबाईही तिचं प्रत्येक गाणं जीव तोडून गायली आहे. लता अनेक गाणी बिगार भरल्यासारखी गायली आहे, तो प्रकार अमीरबाईकडे नाही. तिची कलेप्रती निष्ठा कायम चोख. माझ्या मते नूर जहाँ, खुर्शीद या अमीरबाईपुढे काहीच नाहीत. एक लता सोडली तर अमीरबाईसारखी गायिका सिनेमाविश्वात झाली नाही.

  'आम्रपाली' मधे अमीरबाईची सात गाणी आहेत, पैकी किमान तीन खाज़गी संग्राहकांकडे उपलब्ध आहेत. पण मला त्यातलं अ‍ेकच आठवतं आहे. 'इस दुनिया की पगडंडी पर तुम्ही हो मेरे साथी' असे त्याचे शब्द आहेत. फार सुन्दर गाणं आहे. हे बहुतेक indianscreen.com वर काही वर्षांपूर्वी अ‍ुपलब्ध होतं.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 4. धन्यवाद नानिवडेकर साहेब, इतकी छान माहिती दिल्याबद्दल. नक्की पाहाते लिंक्स! :-)

  ReplyDelete
 5. अरुंधती, खुपच छान माहिती दिली आहेस. अतिशय ओघवती.. आम्रपालीबद्दल पुसटसं ऐकलं होतं आणि तो चित्रपटही लहानपणी बघितला होता (आता आठवतही नाही)..

  ReplyDelete
 6. धन्यवाद हेरंब! आम्रपालीच्या संपूर्ण आयुष्या विषयी मला आजही खूप कुतूहल आहे.... कसा झाला असेल तिचा प्रवास? त्या मानाने इथे मी अगदीच त्रोटक माहिती दिली आहे. आम्रपाली चित्रपटातील वैजयंतीमाला ची नृत्ये अजून आठवतात. ''छायागीत''वर लागायची ना! :-)

  ReplyDelete
 7. अ‍िरावती बाअ‍ी : 'आम्रपाली' नावाची वेश्यांची संघटना नागपूरला (की पूर्ण महाराष्ट्रभर?) आहे. त्यामुळे या नावाचा वेश्याव्यवसायाशी सम्बन्ध आहे, यापलीकडे मला आम्रपालीविषयी काहीच माहिती नव्हती. ती तुमच्यामुळे मिळाली. 'आम्रपाली' मधले काही गाण्यांचे उल्लेख आज़ मिसळपाव वर पाहिले. अपेक्षेप्रमाणे शंकर जयकिशनची गाणी भंकसच निघाली. कुठे बरसात-शिकस्त-पूनम-दाग़ चे अव्वल दर्जाचे एस-जे, आणि कुठे नन्तरचे संगम-आम्रपाली वगैरे गल्लाभरू बेईमान एस-जे. मग giitaayan.com वर त्या सिनेमाची किती गाणी दिसतात हे पहायला गेलो. आणि चक्क सरस्वती देवीचा त्या नावाचा सिनेमा दिसला. या नावाचा असाही सिनेमा होता हे मी विसरलोच होतो, आणि 'इस दुनिया की पगडण्डी पर' हे गाणंही विसरलो होतो. त्या गाण्याची आठवण तुमच्यामुळे झाली, याबद्‌दलही मी तुमचा आभारी आहे.

  ReplyDelete
 8. धन्यवाद नानिवडेकर साहेब! ते गाणे ऐकले.... सुंदर शब्द व गायकीही सध्याच्या गायकीपेक्षा खूप वेगळी :)!!! त्याची लिंक ही आहे : http://www.musicglitz.com/hindi/albums/Amrapali%20(1945).html

  ReplyDelete
 9. Anonymous8:09 PM

  And here is the link to the lyrics : http://giitaayan.com/search.asp?s=Amrapali&browse=Film

  I had posted the lyrics in iTrans (in Roman) many years ago; thanks to Vinay Jain of giitaayan.com fame, the lyrics can be seen in Devnagari now, too. The lyrics of one more song from the film are also available at that link, thanks to the crazy (but still amazing) man V S Rawat. Rawat has posted lyrics of 2,000+ songs single-handedly. I did so for merely 100 songs, over 2-3 years, and that itself was very exhausting for me. For Rawat, 100 songs was less than a week's work.

  - dn

  ReplyDelete
 10. Thanks to both of you, the lyrics of these songs can be found on the internet at a mouse-click's notice! :-)

  ReplyDelete
 11. Anonymous8:35 PM

  दारुडा किंवा वेडा बरळताना पु लं च्या लेखात वा तुकारामाच्या अभंगात एरवी दिसणारेच शब्द वापरतो, म्हणून त्या बरळण्याला भाषा म्हणतात. तो न्याय लावला तरच सध्याच्या 'गायकी'ला गायकी म्हणता येईल.

  २०० वर्षांपूर्वी बायांना सती ज़ाळण्याइतपत वा १०० वर्षांपूर्वी अस्पृश्यांची सावली न पडू देण्याअ‍ितपत आपला समाज़ उलट्या काळज़ाचा कसा होता, हे आज़ आपण म्हणतो. मानवज़ातीत पुन्हा ज़र कधी माथेफिरुपणा कमी झालाच तर १०० वर्षांनी लोक म्हणतील की २००५ सालचे लोक घृणास्पद आवाज़ाला 'संगीत' म्हणण्याइतके मूर्ख कसे होते? किंवा असंही होईल की संगीत याहूनही गचाळ होईल, आणि आज़चा गोंधळ २१०५ च्या मानानी बरा ठरेल.

  कुलकर्णी बाई, हे भलतंच विषयान्तर झालं. माफ करा. आपण (म्हणजे आम्रपालीविषयी माहिती वा कुतुहल असलेले इतर लोक) आता चर्चा आम्रपालीकडे परत वळवू.

  - डी एन

  ReplyDelete
 12. Anonymous9:06 PM

  या कावळ्याच्या छत्र्यांसारख्या वाढलेल्या वेबसाइटस्‌ला लोक उगीच शिव्या नाही देत. त्या musicglitz वाल्या लोकांनी 'देव कन्या' सिनेमातलं 'पिया मिलन को जाने वाली' हे श्यामसुन्दरचं गाणं 'आम्रपाली'मधे घातलं. ते ही भलतेच शब्द वापरून. या निमित्ते एक लागलेला शोध म्हणजे 'इस दुनिया की पगडण्डी पर' हे गाणं ६ मिनिटांचं आहे. मी त्यातले तीनच मिनिट ऐकले आहेत. आता पूर्ण गाणं मिळवावं लागणार.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 13. मी या लेखावर प्रतिक्रिया दिली होती, ती दिसत नाही. असो. या विलक्षण स्त्रीची कहाणी वाचल्यावर पुन्हा आम्रपाली पहावासा वाटत आहे. जुना १९४५ सालचा आम्रपालीही पहायला मिळाला तर छानच!

  ReplyDelete
 14. कांचन, अगं तुझी प्रतिक्रिया माझ्या पर्यंत पोचलीच नाही!!! मधोमध कुठे गायब झाली??? असो! पुन्हा देशील का प्रतिक्रिया? :-) तो जुना आम्रपाली कसा असेल ह्याविषयी मला पण आता कुतूहल निर्माण झाले आहे!

  ReplyDelete
 15. अरुंधती, खुपच छान माहिती दिलीत....धन्यवाद.

  ReplyDelete
 16. धन्यवाद अपर्णा! :-)

  ReplyDelete
 17. व्यक्तिरेखेची सुरेख आणि सुस्पष्ट ओळख करून दिली आहेत. धन्यवाद!

  अशाच अनेक बुद्धकालीन किरदारांची नीट ओळख करून घ्यावी अशी मला इच्छा आहे. उदा. कुणाल, तिष्यरक्षिता.

  ReplyDelete
 18. नरेंद्रजी, तुम्ही तर अगदी माझ्या मनातली गोष्ट व्यक्त केलीत! जसा वेळ होईल त्याप्रमाणे ह्या इतर व्यक्तिमत्वांची ओळख करून घ्यायचा माझाही विचार आहे! तुम्हीसुध्दा लिहा ना... अजून नवी नवी माहिती कळेल! :-)

  ReplyDelete