Monday, June 14, 2010

भेट तिची माझी

ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून?

मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले.
आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे. आणि ज्या सायंकाळी मी मोकळी असे त्या वेळेस तिच्या इतर भेटीगाठी ठरलेल्या असत. शेवटी आम्ही दोघीही कंटाळलो. असा काही नियम आहे का, की संध्याकाळीच भेटले पाहिजे? ठरले तर मग! सकाळी आमच्या आवडत्या रुपालीत नाश्त्यालाच भेटायचे, भरपूर गप्पा ठोकायच्या, सकाळच्या शांत वेळेचा आनंद घेत एकमेकींची ख्यालीखुशाली जाणून घ्यायची असा काहीसा होता आमचा बेत! आधी वाटले होते, तिला घरी बोलवावे किंवा आपण तिच्या माहेरी धडकावे... पण तिच्या-माझ्या घरातले अंतर, घरी गप्पांमध्ये येणारे व्यत्यय वगैरे बघता बाहेरच भेटणे जास्त सोयीचे होते.
सकाळच्या थंडगार हवेत अंगावर झुळुझुळू वारे घेत रिक्शाने जात असताना मनात अनेक विचार येत होते.... कशी दिसत असेल आपली मैत्रीण? आधी होती तशीच असेल की आता वागण्या-बोलण्यात आणि स्वभावातही फरक पडला असेल? कारण मध्ये तब्बल एक तपाहून जास्त काळ लोटलेला. कॉलेज सुटले तसा आमचा संपर्कही तुटला. मधल्या काळात मी पुण्याबाहेर होते. आणि मी परत आले तेव्हा तिने घर बदलले होते व लग्न होऊन ती सासरीही गेली होती. पुढची अनेक वर्षे आम्ही एकमेकींविषयी ''आता ती कोठे असेल, काय करत असेल, कशी असेल, '' वगैरे विचार करण्यात घालवली. मग दोन वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे जे स्नेहसंमेलन झाले त्यात सर्वांना एकमेकांचे ठावठिकाणे लागत गेले. अचानक मंडळी ऑर्कुटवर, फेसबुकवर दिसू लागली. बघता बघता आमच्या बॅचचे बरेच विद्यार्थी ह्या सोशल नेटवर्किंग साईट्सचे सदस्य झाले. त्यातच माझी ही हरवलेली मैत्रीण पुन्हा गवसली.
तसे गेल्या सहा-आठ महिन्यांमध्ये आम्ही एकमेकींशी इ-मेल, चॅट, स्क्रॅप्स द्वारा संपर्कात होतो. पण प्रत्यक्ष भेट ही वेगळीच असते ना! ती पुण्यात सुट्टीला आल्याचे निमित्त साधून आमचा हा थेट भेटीचा कार्यक्रम ठरला होता!
मी रुपालीला पोचले तेव्हा आठ अडतीस झाले होते. क्षणभर मला वाटले, ही बायो येऊन ताटकळत थांबली तर नसेल ना? आमचे ठीक साडे आठला भेटायचे ठरले होते! हो, आता इतकी वर्षे ती आर्मी वाइफ आहे म्हटल्यावर वेळेच्या बाबतीत कडकपणा नक्की येऊ शकतो! पण नाही.... बाईसाहेब माझ्यापेक्षाही लेटच होत्या! तरी मी एकदा तिच्या घरी फोन करून ती निघाल्याची खात्री करून घेतली.
एव्हाना मनात खूप हुरहूर दाटली होती. कधी एकदा भेटेन तिला, असे झाले होते. खरे सांगायचे तर आम्ही एवढ्या काही घट्ट मैत्रिणी अजिबात नव्हतो. पण परप्रांतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या भाऊगर्दीत आमच्या वर्गातील तुटपुंज्या आद्य पुणेकर विद्यार्थ्यांपैकी असल्यामुळे नकळतच आमचे स्नेहबंध पक्के झाले होते. एकमेकींच्या स्वभावातील गुणदोषांसह पारखून घेऊन त्याबद्दलची मैत्रीतील स्वीकृतीही होती त्यात! आणि म्हणूनच बऱ्याच वर्षांनी तिला जेव्हा भेटायचा योग जुळून आला तेव्हा मनात संमिश्र भावनांनी दाटी केली होती!
''हाssssय डियर!! '' तिच्या आवाजासरशी एवढा वेळ रस्त्याकडे गुंगून पाहणारी मी एकदम भानावर आले. बाईसाहेब बहिणीची स्कूटी घेऊन आलेल्या दिसत होत्या. तोच चेहरा, तेच ते हसू.... फक्त आता सर्वच आकार रुंदावलेले.... तिचीही तीच प्रतिक्रिया असणार! डोळा मारा
दोघींनीही लगोलग रुपालीत प्रवेश करून एका बाजूचे, रस्त्यालगतचे रिकामे टेबल पटकावले. येथून रस्त्यावरची ''वर्दळ'', ''हिरवळ'' पण छान दिसत होती आणि शांतपणे, विनाव्यत्यय गप्पाही मारता येणार होत्या!
सुरुवातीच्या चौकश्या झाल्यावर तिने तिच्या प्रेमविवाहाची चित्तरकथा सांगितली. तिचा नवरा दाक्षिणात्य, आणि त्यात आर्मीतला! घरून वडिलांचा प्रचंड विरोध होता ह्या लग्नाला. त्यांना शक्यतो पुण्यात राहणारा, सर्वसामान्य आयुष्य जगणारा जावई हवा होता. पण माझ्या मैत्रिणीने सुरुवातीपासूनच आर्मीतल्या मुलाशीच लग्न करायचे ठरवले होते. त्यापुढे मग वडिलांनाही माघार घ्यावी लागली. तिचे लग्न ठरले तेव्हा तिचा नवरा सी. एम. ई मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. त्याच वर्षी कारगिलचे युद्ध घडले. मैत्रिणीच्या वडिलांना कोण तो आनंद! कारण युद्ध म्हटल्यावर सर्व आर्मी कोर्सेस बंद झाले होते व मैत्रिणीच्या भावी नवऱ्याला कधीही सीमेवर जावे लागणार होते! तिच्या वडिलांना वाटले, आता ह्यांचे लग्न नक्की लांबणीवर पडणार! पण सुदैवाने त्याला सीमेवर जावे लागले नाही व लग्न ठरल्या प्रमाणे वेळेतच पार पडले! कालांतराने वडिलांचा विरोध मावळला आणि आता सासरे-जावई गुण्यागोविंदाने नांदतात. मला हा सर्व किस्सा ऐकून खूपच मजा वाटली. दोघींनीही त्यावर मोकळेपणाने हसून घेतले.
आर्मी वाइफ म्हटल्यावर नवऱ्यापासून अनेक महिने होणारी ताटातूट, मनात असलेली धाकधूक, एकटीने घ्यावे लागणारे निर्णय, निभवाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, त्याचबरोबर संपन्न लोकसंग्रह, समृद्ध जीवनशैली, आर्मीमधील एकमेकांच्या कुटुंबांना आधार देण्याची पद्धत यांसारख्या तिच्या आयुष्यातील अनेक कडू-गोड घटना ऐकतानाच आम्ही आमच्या रुपाली स्पेशल लाडक्या पदार्थांना ऑर्डर करत होतो. निघायची घाई नव्हती, त्यामुळे अगदी संथ लयीत ऑर्डरी देणे चालू होते. एव्हाना शेजारच्या टेबलावर एक कॉलेजवयीन प्रणयी जोडपे एकमेकांचे हात हातात घेऊन बसले होते. त्यांच्याकडे आमच्या ''पोक्त'' नजरांतून हसून बघत आम्हालाही कॉलेजचे ते रंगीबेरंगी दिवस आठवले. त्या गुट्टरगू करणाऱ्या जोड्या, ब्रेक-अप्स, मेक-अप्स, ड्रामेबाजी, वावड्या, भानगडी आणि अजून बरेच काही. आमच्या बॅचमधील काही जोड्यांच्या प्रेमप्रकरणांची परिणिती लग्नांत झाली खरी... पण त्यातही काहींचे ब्रेक-अप्स झाले. उरलेल्या काहींमधील सर्वांचीच लग्नेही यशस्वी झाली नाहीत. कोणाचे करियर गडबडले. कोणी उध्वस्त झाले. कोणी पार वाया गेले. यशोगाथाही अनेक घडल्या. आज आमच्या वर्गातील बारा-पंधराजण देशभरातील मानाच्या पदांवर कार्यरत आहेत किंवा नाव कमावून आहेत. सर्वांचे ताळेबंद घेत असताना जाणवत होते, की त्या वयात जीवनमरणाचे वाटणारे गहन प्रश्न आता त्यांचे महत्त्व पार गमावून बसले होते! असेच होत असते का आयुष्यात? त्या त्या टप्प्यावर खूप गुंतागुंतीचे वाटणारे प्रश्न, समस्या कालांतराने धार गेलेल्या बोथट शस्त्रासारखे गुळमुळीत होऊन जातात? की ती आपल्या दृष्टिकोनातील परिपक्वता असते? त्या काळात अनेक फसलेल्या जोड्यांमधील मुले-मुली आज आपल्या वेगळ्या जोडीदारांबरोबर आनंदात संसार करत आहेत.... पण जेव्हा त्यांचा ब्रेक-अप झाला तेव्हा हेच लोक जीवाचे बरेवाईट करायला निघाले होते... किंवा महिनोंमहिने निराशेने घेरले गेले होते. काहीजण तू नही तो और सही, और नही तो और सही ह्याही पठडीतले होते... पण त्या फुलपाखरांकडे कोणीच फार सीरियसली बघत नसे!
जी मुले आमच्या वर्गात अगदी सर्वसाधारण समजली जायची, काठावर पास व्हायची, तीच आज आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. आणि जे लोक मेरिटामध्ये यायचे, वर्गात कायम पुढे असायचे ते आज करियरच्या वेगळ्याच वाटा चोखाळत आहेत! आमच्या वर्गमैत्रिणींपैकी अनेकींनी लग्नानंतर मुले-बाळे झाल्यावर घरी बसणेच पसंत केले किंवा स्वीकारले. कोणी त्यातूनही मार्ग काढून वेगळा व्यवसाय करायच्या प्रयत्नात आहेत. पण घेतलेल्या शिक्षणाचा वापर करून त्याच क्षेत्रात उडी टाकण्यास, उमेदवारी करण्यास इच्छुक मात्र विरळ्याच!
अश्या आणि अजून बऱ्याच साऱ्या गप्पा मारता मारता तीन तास कसे सरले ते कळलेच नाही. वेटर एव्हाना तीनदा बिले बदलून गेला होता! कारण दर खेपेस त्याने बिल दिले की आम्ही थोड्या वेळाने पुन्हा अजून काही तरी ऑर्डर करत असू... कॉलेजची ही सवय मात्र अद्यापही कायम होती!
शेजारच्या प्रणयी जोडप्याची जागा पन्नाशीतील एका जोडप्याने घेतली होती. दोघेही आपापल्या जॉगिंग सूटमध्येच आले होते. आमच्यासमोर त्यांनी भराभर नाश्ता, ज्यूस संपवला आणि एकमेकांशी फार न बोलता, न रेंगाळता ते रवानाही झाले. मग मात्र एक मोठा पेन्शनरांचा जथा आला. आमच्या आजूबाजूच्या सर्व खुर्च्या-टेबलांना व्यापून उरत कलकलाट करू लागला. मला गंमतच वाटली! एरवी कॉलेजकुमारांच्या जोरजोरात गप्पा मारणाऱ्या घोळक्याकडे आजूबाजूचे आजी-आजोबा कपाळाला आठ्या घालून पाहताना दिसतात. आज इथे ह्या कलकलाट करणाऱ्या पेन्शनरांच्या घोळक्याकडे बघताना आजूबाजूच्या तुरळक तरुण जोड्यांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्यांचे जाळे विणले गेले होते.... मीही त्याला अपवाद नव्हते!
शेजारच्या टेबलवरच्या आजोबांनी आपल्या मित्राच्या मांडीवर हसत जोरात थाप मारली आणि त्या धक्क्याने टेबलावरचा पाण्याचा ग्लास लवंडून सभोवताली पाणीच पाणी झाले. सर्वांची ते पाणी आपल्या कपड्यांपासून दूर ठेवता ठेवता एकच तारांबळ उडाली. त्यांचा तो अशक्य गोंधळ पाहताना मला हसू येत होते व आता निघायला हवे ह्याचीही जाणीव होत होती.
जणू माझ्या मनातले विचार पकडल्याप्रमाणे मैत्रिणीच्या सेलफोनची रिंग वाजली. पलीकडून तिचा लेक बोलत होता, ''मम्मा, आप घर वापिस कब आ रही हो? पापा बोल रहे है, हमारे लिए भी इडली पार्सल लेके आना... नानीमां ने फिरसे वो बोअरिंग उप्पीट बनाया है । मैं नही खानेवाला... ''
आमच्या मैत्रीच्या वर्तुळाबाहेरचे जग आता पुन्हा खुणावू लागले होते. मन अजून गप्पा मारून भरले नव्हते... कदाचित ते कधी भरणारही नाही.... तीच तर मजा असते मैत्रीची.... पण आता आपापल्या कामाला निघायलाच हवे होते! मैत्रिणीला तिचा लेक पुकारत होता आणि मलाही बाजूला ठेवलेले उद्योग दिसू लागले होते! आता निरोप घेतला की आपण एकमेकींना एकदम एका वर्षाने, पुढील खेपेस ती पुण्यात येईल तेव्हाच भेटू शकणार ही भावना अस्वस्थ करत होती. पण ईमेल्स, ऑर्कुट वगैरे माध्यमातून एकमेकींशी तुटक का होईना, गप्पा नक्की मारता येतील हीदेखील खात्री होती आता! जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकींचा निरोप घेतला. मन तरीही कोठेतरी हलके-फुलके झाले होते. मैत्रीचे धागे पुन्हा एकदा जुळले होते.... नव्हे, होत्या धाग्यांची वीण अजूनच पक्की झाली होती! जुन्या आठवणींना उजाळा मिळताना नव्या आठवणीही तयार झाल्या होत्या. एकीकडे तिची स्कूटी रहदारीत भर्रदिशी दिसेनाशी झाली आणि दुसरीकडे माझ्यासमोरही एक रिकामी रिक्शा येऊन थांबली.
काळाच्या ओघात दूर गेलेल्या, मागे पडलेल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींनाही लवकरच संपर्क करायचे मनाशी ठरवून मी रिक्शावाल्याला पत्ता सांगितला आणि एका अनामिक नव्या हुरुपाने मार्गस्थ झाले!
--- अरुंधती

No comments:

Post a Comment