Tuesday, January 25, 2011

शबद गुरबानी


काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

काही काळाने माझ्या एका जाट मैत्रिणीने माझा परिचय शबद साहित्याशी करून दिला. तिच्यासोबत काही गुरुद्वारांमध्ये जाऊन तेथील वातावरण अनुभवायचा, लंगराचा तसेच शबद कीर्तन ऐकायचा योगही जुळून आला. एका नव्या दुनियेचे द्वारच जणू माझ्यासाठी खुले झाले!

शबद म्हणजे शीख संप्रदायाच्या धार्मिक ग्रंथांमधील आणि गुरु ग्रंथ साहिबातील पवित्र रचना. त्यात त्यांची सूक्ते/सूत्रे, परिच्छेद किंवा पवित्र ग्रंथांचा काही भाग अंतर्भूत असू शकतो. त्याची भाषालिपी आहे गुरुमुखी. शबदचा दुसरा अर्थ म्हणजे वाहेगुरू किंवा परमेश्वर. शीख संप्रदायाचा सर्वात प्रथम असा पवित्र ग्रंथ म्हणजे गुरु ग्रंथ साहेब. त्याची सुरुवातच मूल मंतर किंवा मूल मंत्राने होते. आठवतोय 'रंग दे बसंती' हा हिंदी चित्रपट? त्यात ह्या मूल मंत्राचा फार सुरेख उपयोग केला आहे :

इक ओंकार सतिनामु कर्ता पुरख निरभउ निरवैर अकालमूरति अजूनी सैभं गुरुप्रसादि || 

जपु

आदि सचु जुगादि सचु है भी सचु नानक होसी भी सचु ||१||

इक ओंकार : एकच निर्माता / ईश्वर
सतिनामु : त्याचे नाम सत्य
कर्ता पुरख : निर्माता पालनकर्ता
निरभउ : निर्भय
निरवैर : ज्याला कोणी वैरी नाही असा
अकालमूरति : आदिमूर्ती
अजूनी : जो कधी जन्मला नाही असा
सैभं : स्वयंभू
गुरुप्रसादि :  गुरुची कृपा
जपु : जप (जप करा व ध्यान)
आदि सचु : आदिसत्य
जुगादि सचु : युगातीत सत्य
है भी सचु : आताही सत्य
नानक : गुरु नानक
होसी भी सचु : कायम सत्य राहील.

एकच ईश्वर, सतनाम, निर्माता पालनकर्ता, निर्भय, वैरभाव विहीन, आदिमूर्ती, कालातीत, स्वयंभू, गुरूकृपेमुळे ज्ञात. 

जप ( जप व ध्यान करा.)

आदिम सत्य, युगातीत सत्य, आजही सत्य, हे नानक, पुढेही कायम सत्य राहील. 


दहा गुरू 
मला कायम वाटत आलं आहे की शबद हे '' शब्द '' चे अपभ्रष्ट रूप असावे. शबद कीर्तन हा अतिशय श्रवणीय असा भक्तिपूर्ण संगीत सोहळा असतो. गुरु ग्रंथ साहिबातील सर्व शबद हे वेगवेगळ्या रागांमध्ये गुंफले असून ते तसेच गायले जातात. सुरुवातीची जपजी साहिब ही रचना व शेवटचा काही भाग सोडला तर उर्वरित सर्व ग्रंथातील रचना ह्या निरनिराळ्या एकतीस रागांमध्ये आहेत. अनुक्रमे श्री, मांझ, गौरी, असा, गुजरी, देवगंधारी, बिहागरा, वदहंस, सोरथ, धनश्री, जैतश्री, तोडी, बैरारी, तिलंग, सूही, बिलावल, गौंड, रामकली, नट-नारायण, मालिगौर, मरु, तुखार, केदार, भैरव (भैरो), बसंत, सारंग, मलार (मल्हार), कानरा (कानडा), कल्याण, प्रभाती आणि जयजयवंती ह्या रागांमध्ये ह्या सर्व रचना आहेत असे ग्रंथ साहिब सांगतो.
(संदर्भ :  http://www.sikhiwiki.org/index.php/Sikh_Ragas )
त्यांमध्ये द्विपदी, चौपदी, पंचपदी, षट्पदी, अष्टपदी व षोडशपदी रचना आहेत.

ह्या रचना शीख परंपरेतील वेगवेगळ्या गुरुंच्या असून त्यात गुरु नानक, गुरु राम दास, गुरु अर्जुन दास यांच्या रचनांबरोबरच संत रविदास, संत कबीर ह्यांसह शेख़ खरीद, जयदेव, त्रिलोचन, सधना, नामदेव, वेणी, रामानन्द, पीपा, सैठा, धन्ना, भीखन, परमानन्द आणि सूरदास अशा पंधरा संतांच्या अनेक रचना गुरु ग्रंथ साहिबचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. एवढेच नव्हे तर अन्य चौदा कवींच्या भावगर्भी रचनांचा ग्रंथ साहिबात समावेश आहे. ते रचनाकार म्हणजे हरिबंस, बल्हा, मथुरा, गयन्द, नल्ह, भल्ल, सल्ह भिक्खा, कीरत, भाई मरदाना, सुन्दरदास, राइ बलवंड तसेच सत्ता डूम, कलसहार, जालप हे होत. प्रत्येक शबद हा भक्तिरसाने, उत्कट भावाने परिपूर्ण असून मानवतेचा, परमार्थाचा संदेश देणारा आहे.

ग्रंथसाहिबातील सर्व साहित्य हे गुरबानी म्हणून ओळखले जाते. नानकांच्या अनुसार गुरबानी थेट ईश्वराकडून आली आणि लेखकांनी ती भक्तांसाठी लिखित स्वरूपात, गुरुमुखी लिपीत आणली. नानकांच्या संत परंपरेत गुरु म्हणजे साक्षात ईश्वराची वाणी होती. नानकांनंतर झालेल्या प्रत्येक गुरुंनी आपल्या रचनांना गुरबानीत समाविष्ट केले. गुरु गोविंद सिंग हे ह्या परंपरेतील शेवटचे गुरु होत. त्यांच्या नंतर शीख संप्रदाय हा 'गुरु ग्रंथसाहिब'लाच कायमच्या गुरुस्थानी मानू लागला.  

हिंदू व मुसलमान यांचा ईश्वर एकच आहे, ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत आणि ईश्वरासाठी सर्वजण समान आहेत हा उपदेश करताना गुरु नानकांनी सर्व धर्मांमधील चांगल्या गोष्टी एकत्रित केल्या. मनुष्याने सतत चांगली कर्मे करावीत म्हणजे ईश्वराच्या दरबारी त्याला शरमिंदे व्हावे लागणार नाही अशा अर्थीच्या शबद रचना ग्रंथ साहेबात जागोजागी आढळतात. पंजाबी, ब्रज, हिंदी, संस्कृत, पर्शियन तसेच स्थानिक भाषांतील साहित्याचा ह्यात समावेश आहे. मध्ययुगीन संतभाषेतील साहित्यही त्यात आढळते. शीख संप्रदायाचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून गणल्या जाणार्‍या गुरु ग्रंथ साहिबचे संपादन पाचवे गुरु अर्जुन सिंग देव यांनी केले. ह्या ग्रंथाचे प्रकाशन १६ ऑगस्ट १६०४ रोजी अमृतसरच्या हरिमंदिर साहिब मध्ये झाले. गुरु ग्रंथ साहिबात एकूण १४३० पृष्ठे आहेत. दहावे गुरु गोविंद सिंह यांनी इ.स. १७०५ मध्ये ह्या ग्रंथास पूर्ण केले. फक्त शीख गुरुच नव्हे तर तत्कालीन अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांची वाणी समाविष्ट करण्यात आलेला हा ग्रंथ जातीपाती, भेदभाव यांपलीकडे जातो. आपल्या सरळ, सुबोध भाषेमुळे सर्वसामान्य माणसास तो समजण्यासही सोपा जातो. त्यातील भाषा रसाळ, अर्थगर्भ असून अभिव्यक्ती, चिंतन, दार्शनिकता व त्यातून जनमानसास दिला जाणारा संदेश बघू जाता गुरु ग्रंथ साहेबाचे आगळे स्थान लक्षात येऊ लागते. जगातील सर्व मानवांना समान लेखणारा, स्त्रियांना घरात व समाजात आदराचे स्थान देणारा, सर्वांचा ईश्वर हा एकच आहे हे ठासून सांगणारा, सचोटीने जगण्या-बोलण्याचा संदेश देणारा, काम-क्रोध-लोभ-मोह-मद ह्यांसारख्या पंचरिपूंना दूर ठेवायला सांगणारा, कर्मवादाला मान्यता देणारा, आत्मनिरीक्षण व ध्यानाचे महत्त्व समजावणारा, लोककल्याणाला प्रेरक असा गुरु ग्रंथ साहिबातील संदेश व्यवहारातही मधुर शब्द वापरण्याची व विनम्रतेने वागण्याची शिकवण देतो.

गुरू अर्जुन देव रचना सांगत आहेत 

शबद साहित्याचा माझा स्वतःचा अजिबात अभ्यास नाही. पण अनेकदा कानावर पडलेल्या शबद रचना ऐकून काही रचनांचे अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली. त्याविषयी थोडे थोडे वाचन सुरू झाले. आणि जाणवले, हा तर अनमोल खजिना आहे!! संतसाहित्य वाचताना मनात जे आनंदतरंग उमटतात तेच आनंदतरंग हे साहित्य वाचताना जाणवत राहतात. कधी निश्चेष्ट पडलेल्या मनाला खडबडून जागे करतात तर कधी आपल्या आर्त सुराने त्यातील तळमळ आपल्यापर्यंत पोहोचवितात. काही ठिकाणी हे शबद पढत पांडित्यावर ताशेरे ओढतात, काही ठिकाणी समाजातील अंधश्रद्धा, पाखंडी वृत्ती,  अनिष्ट चालीरीतींवर कडकडून टीका करतात. आणि काही स्थळी हेच शबद इतके मृदू - मुलायम, लडिवाळ होतात की जणू रेशमाच्या लडीच!

गुरु अर्जुन सिंग देव रचित सुखमनी साहिब मध्ये ते सांगतात :

सुखमनीसुख अमृत प्रभु नामु।
भगत जनां के मन बिसरामु॥

भक्तांच्या मनाला सुख देणारी, प्रसन्नता देणारी अशी ही अमृतवाणी आहे.

गुरुचा महिमा, गुरुची थोरवी आणि गुरुप्रती समर्पण भावनेने आकंठ न्हालेले हे शबद ऐकणे म्हणजेही श्रवणेंद्रियांना अपार समाधान देणारा अनुभव असतो. ती भाषा न कळणार्‍यालाही त्यातील स्वर भावतात. आणि जर तुम्हाला गायल्या जात असलेल्या शबदचा अर्थ कळत असेल तर मग भावमधुर रसाच्या भक्तीसागरात बुडून जाण्यात अजूनच आनंद मिळतो!

मेरा सतिगुरु रखवाला होआ ॥
धारि क्रिपा प्रभ हाथ दे राखिआ हरि गोविदु नवा निरोआ ॥१॥ रहाउ ॥
तापु गइआ प्रभि आपि मिटाइआ जन की लाज रखाई ॥
साधसंगति ते सभ फल पाए सतिगुर कै बलि जांई ॥१॥
हलतु पलतु प्रभ दोवै सवारे हमरा गुणु अवगुणु न बीचारिआ ॥
अटल बचनु नानक गुर तेरा सफल करु मसतकि धारिआ ॥२॥२१॥४९॥

अर्थ :  माझा सतगुरु हाच माझा रक्षक आणि त्राता आहे. ईश्वराने आपल्या दयेचा व कृपेचा वर्षाव करून हर गोविंद सिंगाला वाचविले, जो आता सुरक्षित आहे. ताप निवाला, ईश्वरानेच त्याला घालविले आणि त्याच्या सेवकाची लाज राखली. साध संगतीचे (साधुजनांचे) आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी सतगुरुला समर्पित आहे. ईश्वराने मला इथवर आणि इथून पुढेही वाचवले. त्याने माझी पापपुण्ये विचारात घेतली नाहीत. हे गुरु नानक, तुमचा शब्द अमर आहे, अटळ आहे. तुम्ही तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या ललाटी ठेवलात!

सगल वनस्पति महि बैसन्तरु सगल दूध महि घीआ।।
ऊँच-नीच महि जोति समाणी, घटि-घटि माथउ जीआ।।

गुरु अर्जुन देव ह्या रचनेत सांगतात, ज्याप्रमाणे सर्व वनस्पतींमध्ये आग सामावली आहे, ज्याप्रमाणे दुधात तूप मिसळले जाते त्याप्रमाणे परमात्मा हा सर्वव्यापी आहे. तो उच्च-नीच सर्वांमध्ये व्याप्त आहे, घटा-घटांत तो सामावलेला आहे.

ह्या गुरूमुखी भाषेचा गोडवा, लय, ठसका आणि भावमधुरता पार हृदयाला भिडणारी! पंजाबच्या मातीत जन्मलेल्या या रचना तेथील माणसांसारख्याच उत्कट आणि विलक्षण ताकदीच्या!

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर संस्कार चॅनलवर शबद कीर्तन-पाठ सुरू झाले तसे शीख संप्रदायाखेरीज अन्य लोकांनाही घरबसल्या या शबदांचा आनंद घेता येऊ लागला. आजवर अनेक प्रख्यात गायक - गायिकांनी आपल्या स्वरसाजाने ह्या रचनांना अजूनच नटविले आहे. जगजीत सिंग - चित्रा सिंग, हंस-राज-हंस, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांखेरीज शीख संप्रदायातील अनेक गायक भक्तांनी आपल्या सुरांनी त्या रचना सामान्यजनांपर्यंत पोहोचविल्या आहेत. चित्रा रॉय यांच्या सुस्वर आवाजात भक्तिरसाने परिपूर्ण अशा ह्या शबदना ऐकणे म्हणजे तर प्रासादिक अनुभव!

माझ्या आवडीच्या, नेहमीच्या ऐकण्यातील काही सुमधुर शबद रचना इथे देत आहे :

माझ्या आवडीच्या काही शबद रचना : 

दसम ग्रंथातील ही शबद रचना माझी विशेष लाडकी आहे. ह्या शबदची रचना श्री गुरु गोविंद सिंहजी यांची असून असे सांगितले जाते की चमकौर येथील लढाईत आपल्या डोळ्यांसमोर आपल्या पुत्रांना वीरमरण येताना पाहिलेल्या गुरु गोविंद सिंहजींनी त्या थंडीच्या रात्री ही आपल्या ईश्वराला, वाहेगुरुला आर्त साद घातली.

गुरू गोविन्द सिंह जी गुरू नानक यांना भेटत असल्याचे काल्पनिक चित्र 

१] अंग : १, दसम ग्रंथ, लेखक : गुरु गोविंद सिंह 

गायिका : चित्रा रॉय यांच्या स्वरात येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/mitar-piyaare

मित्र पिआरे नूं हाल मुरीदां दा कहिणा ॥
तुधु बिनु रोगु रजाईआं दा ओढण नाग निवासां दे रहिणा ॥
सूल सुराही खंजरु पिआला बिंग कसाईआं दा सहिणा ॥
यारड़े दा सानूं स्थरु चंगा भ्ठ खेड़िआं दा रहिणा ॥१॥१॥

माझ्या प्रिय सख्याला त्याच्या शिष्याची काय स्थिती झाली आहे ते कळवा. तुझ्याशिवाय ऊबदार रजई अंगावर ओढणं म्हणजे रोगासमान आहे आणि घरात राहणं हे सापांबरोबर राहण्यासारखं आहे. पाण्याची सुरई सुळासारखी आहे, प्याला खंजिरासमान आहे. तुझा विरह हा कसायाचा सुरा अंगावर चालताना सहन करावा तसा आहे. प्रियतम सख्याची गवताची शय्या ही सर्वात सुखकारी आहे आणि बाकी सारी भौतिक सुखे ही भट्टीसारखी (जाळणारी) आहेत.  

२] अंग : १२०९, राग : सारंग, लेखक : गुरु अर्जुन देव जी

मेरा मनु एकै ही प्रिअ मांगै : ऐका इथे : http://www.sikhnet.com/audio/mera-maan

मेरा मनु एकै ही प्रिअ मांगै ॥
पेखि आइओ सरब थान देस प्रिअ रोम न समसरि लागै ॥१॥ रहाउ ॥
मै नीरे अनिक भोजन बहु बिंजन तिन सिउ द्रिसटि न करै रुचांगै ॥
हरि रसु चाहै प्रिअ प्रिअ मुखि टेरै जिउ अलि कमला लोभांगै ॥१॥
गुण निधान मनमोहन लालन सुखदाई सरबांगै ॥
गुरि नानक प्रभ पाहि पठाइओ मिलहु सखा गलि लागै ॥२॥५॥२८॥

माझे मन ईश्वरासाठी व्याकुळ झाले आहे. मी सर्व देशांतील सर्व जागा शोधल्या...पण कशालाही माझ्या प्रियतमाच्या केसाचीही सर नाही. माझ्यासमोर सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम मिठाया, पेये, पदार्थ ठेवलेले आहेत, पण मला त्यांच्याकडे बघायचीही इच्छा होत नाही. मला फक्त सुमधुर अशा हरी रसाची आस आहे, जसा एखादा भुंगा कमळासाठी झुरतो त्याप्रमाणे मी ''प्रिया प्रिया'' अशी माझ्या प्रियतमाला हाक मारत झुरतो आहे.
गुणनिधान, मनमोहन असा माझा प्रियतम सर्वांना सुख-शांती देणारा आहे. गुरु नानकांनी मला तुझा रस्ता दाखवला. हे ईश्वरा, मला भेट. हे माझ्या सख्या, मला आपल्या मिठीत सामावून घे.

३] अंग : ७४९, राग : सूही, लेखक : गुरु अर्जुन देव जी

मेरे साहिब : ऐका इथे : http://www.sikhnet.com/audio/mere-saheb

आशाताई भोसले यांच्या स्वरात : http://www.sikhnet.com/audio/mere-sahib-mere-sahib

तुधु चिति आए महा अनंदा जिसु विसरहि सो मरि जाए ॥
दइआलु होवहि जिसु ऊपरि करते सो तुधु सदा धिआए ॥१॥
मेरे साहिब तूं मै माणु निमाणी ॥
अरदासि करी प्रभ अपने आगै सुणि सुणि जीवा तेरी बाणी ॥१॥ रहाउ ॥
चरण धूड़ि तेरे जन की होवा तेरे दरसन कउ बलि जाई ॥
अम्रित बचन रिदै उरि धारी तउ किरपा ते संगु पाई ॥२॥
अंतर की गति तुधु पहि सारी तुधु जेवडु अवरु न कोई ॥
जिस नो लाइ लैहि सो लागै भगतु तुहारा सोई ॥३॥
दुइ कर जोड़ि मागउ इकु दाना साहिबि तुठै पावा ॥
सासि सासि नानकु आराधे आठ पहर गुण गावा ॥४॥९॥५६॥

तू जेव्हा मनात येतोस तेव्हा मी परमानंदात बुडून जातो. इतका, की तू जिवंत आहेस की मृत याचीही तमा उरत नाही! ज्या जीवावर तू आपल्या परम दयेची कृपा केलीस, हे निर्मात्या ईश्वरा, तो (जीव) सदोदित तुझेच ध्यान करतो. हे माझ्या स्वामी, तू माझ्यासारख्या पतितांचा, मानहीनांचा सन्मान आहेस. माझी प्रार्थना मी तुला अर्पण करतो, हे ईश्वरा, तुझ्या वाणीचे शब्द ऐकत ऐकत मी जगतो. तुझ्या विनम्र चाकरांच्या चरणांची रजोधूळ बनण्याचे भाग्य मला लाभो. तुझ्या दर्शनाच्या परमसुखासाठी मी तुला शरण जातो.  तुझ्या अमृतवाणीची मी माझ्या हृदयात पूजा बांधली आहे. तुझ्या कृपेने मला साधुसंगती लाभली आहे. माझे अंतरंग तू जाणतोसच, तुझ्याखेरीज अन्य कोणाचे महत्त्व नाही. तू ज्याला संगे ठेवतोस तोच तुझ्याबरोबर राहतो, तोच तुझा भक्त. हे माझ्या स्वामी, माझे दोन्ही हात जोडून मी तुझ्याकडे ह्या एका भेटीची याचना करतो, तू प्रसन्न झालास तर मला ती मिळेल. प्रत्येक श्वासागणिक नानक तुझी आराधना करतो, अष्टौप्रहर तुझी स्तुतीकवने गातो.  

संत रवि दास     

४] अंग : ६५८, राग : सोरथ, लेखक : संत रविदासजी

तुम सिउ जोरी : भावमधुर रचना येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/tumse-jori

जउ तुम गिरिवर तउ हम मोरा ॥
जउ तुम चंद तउ हम भए है चकोरा ॥१॥
माधवे तुम न तोरहु तउ हम नही तोरहि ॥
तुम सिउ तोरि कवन सिउ जोरहि ॥१॥ रहाउ ॥
जउ तुम दीवरा तउ हम बाती ॥
जउ तुम तीरथ तउ हम जाती ॥२॥
साची प्रीति हम तुम सिउ जोरी ॥
तुम सिउ जोरि अवर संगि तोरी ॥३॥
जह जह जाउ तहा तेरी सेवा ॥
तुम सो ठाकुरु अउरु न देवा ॥४॥
तुमरे भजन कटहि जम फांसा ॥
भगति हेत गावै रविदासा ॥५॥५॥

तू जर पर्वत आहेस, तर हे ईश्वरा, मी मयूर आहे. तू चंद्रमा असलास तर मी चकोर आहे.
तू माझा संग सोडला नाहीस तर मीही तुझा संग सोडणार नाही. कारण तुझा संग सोडून तो मी दुसर्‍या कोणाशी जोडू? तू जर दिवा असशील तर मी त्यातील वात आहे, तू जर तीर्थक्षेत्र असशील तर मी तुझ्या तीर्थाचा पथिक आहे. हे ईश्वरा, तुझ्या संगे माझी प्रीत जुळली आहे. मी आता तुझ्याच संगे आहे आणि इतरांशी माझा संग मी तोडला आहे. जिथे जिथे मी जातो तिथे तिथे तुझ्या सेवेत असतो. हे परमेश्वरा, तुझ्याखेरीज अन्य स्वामी नाही. तुझे ध्यान करून मृत्यूचा फासही तुटतो. तुझ्या भक्तीपायी तुझी आराधना करत रविदास तुझे स्तुतिगान करत आहे.


५] अंग : १३७५, लेखक : संत कबीर (सालोक रचना) 

संत कबीर यांची ही उत्कट भावाने ओतप्रोत रचना : http://www.sikhnet.com/audio/mera-mujhme

कबीर मेरा मुझ महि किछु नही जो किछु है सो तेरा ॥
तेरा तुझ कउ सउपते किआ लागै मेरा ॥२०३॥
कबीर तूं तूं करता तू हूआ मुझ महि रहा न हूं ॥
जब आपा पर का मिटि गइआ जत देखउ तत तू ॥२०४॥
कबीर बिकारह चितवते झूठे करते आस ॥
मनोरथु कोइ न पूरिओ चाले ऊठि निरास ॥२०५॥

माझ्यातलं काहीही माझं उरलं नाही. कबीर म्हणतो, जे जे काही आहे ते तुझंच आहे, हे ईश्वरा! मी तुला शरण जातो ते तुझंच तुला अर्पण करतो. त्याचं मला काय? (मला त्याची काहीच किंमत मोजायला लागत नाही.) कबीर म्हणतो, ''तू, तू'' पुन्हा पुन्हा जपत राहिल्याने मी तुझ्यासारखाच झालोय रे! माझ्यात माझं असं काही उरलंच नाही. माझ्यातला आणि इतरांमधला भेद मिटला तेव्हा जिथे जिथे मी पाहतो तिथे तिथे फक्त तूच नजरेला येतोस. कबीर म्हणतो, जे जे दुष्ट विचार करतात किंवा खोटी आशा करतात त्यांचे कोणतेही मनोरथ पूर्ण होत नाहीत आणि ते निराश होऊन परततात.

संत कबीर 

६] अंग : ७४२, राग : सूही, लेखक : गुरु अर्जुन देव जी

दरसनु देखि : येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/darsan-dekh-jeevan

दरसनु देखि जीवा गुर तेरा ॥
पूरन करमु होइ प्रभ मेरा ॥१॥
इह बेनंती सुणि प्रभ मेरे ॥
देहि नामु करि अपणे चेरे ॥१॥ रहाउ ॥
अपणी सरणि राखु प्रभ दाते ॥
गुर प्रसादि किनै विरलै जाते ॥२॥
सुनहु बिनउ प्रभ मेरे मीता ॥
चरण कमल वसहि मेरै चीता ॥३॥
नानकु एक करै अरदासि ॥
विसरु नाही पूरन गुणतासि ॥४॥१८॥२४॥

तुझ्या कृपादर्शनाकडे नजर लावून मी जगत आहे. हे मम ईश्वरा, माझे कर्म पूर्ण आहे. माझ्या देवा, ह्या प्रार्थनेला कृपा करुन ऐकावेस. मला तुझ्या नामाचा आशीर्वाद दे, मला तुझी छाया, तुझा शिष्य बनव. हे ईश्वरा, मला तुझ्या छत्रछायेखाली ठेव. फार थोड्यांना हे गुरुकृपेमुळे आकळते. माझ्या सख्या, माझी प्रार्थना ऐक ना रे! तुझे चरणकमल कायम माझ्या चित्ती वसू देत. हे पूर्ण गुणनिधाना, नानक एकच प्रार्थना करतो, मला तुझे विस्मरण कधीही न घडो!  

७] अंग : ११४२, राग : भैरो, लेखक : गुरु अर्जुन देव जी

गुर जैसा : इथे ऐका ही सुमधुर रचना : http://www.sikhnet.com/audio/gur-jaisa

सतिगुरु मेरा बेमुहताजु ॥
सतिगुर मेरे सचा साजु ॥
सतिगुरु मेरा सभस का दाता ॥
सतिगुरु मेरा पुरखु बिधाता ॥१॥
गुर जैसा नाही को देव ॥
जिसु मसतकि भागु सु लागा सेव ॥१॥ रहाउ ॥
सतिगुरु मेरा सरब प्रतिपालै ॥
सतिगुरु मेरा मारि जीवालै ॥
सतिगुर मेरे की वडिआई ॥
प्रगटु भई है सभनी थाई ॥२॥
सतिगुरु मेरा ताणु निताणु ॥
सतिगुरु मेरा घरि दीबाणु ॥
सतिगुर कै हउ सद बलि जाइआ ॥
प्रगटु मारगु जिनि करि दिखलाइआ ॥३॥
जिनि गुरु सेविआ तिसु भउ न बिआपै ॥
जिनि गुरु सेविआ तिसु दुखु न संतापै ॥
नानक सोधे सिम्रिति बेद ॥
पारब्रहम गुर नाही भेद ॥४॥११॥२४॥

माझा सतगुरु हा संपूर्ण स्वयंभू आहे. माझा सतगुरु सत्याने सजला आहे. माझा सतगुरु परमदाता आहे. माझा सतगुरु आद्य निर्माता, भाग्यविधाता आहे. गुरुसमान कोणतीही देवता नाही. ज्याच्या कपाळीचे भाग्य थोर तो सेवेला, नि:स्वार्थबुध्दीने सेवाकर्माला लागतो. माझा सतगुरु सर्वांचा पालनकर्ता, पोषविता आहे. तो संहार करतो आणि पुनर्निर्मितीही! माझ्या गुरुची महानता काय वर्णन करावी! जिथे तिथे तोच आहे. माझा सतगुरु दीनांची ताकद आहे. माझा सतगुरु माझे घर आणि दरबार आहे. अशा माझ्या सतगुरुला मी कायमचा शरण आहे.
त्याने मला सुमार्ग दाखविला. जो गुरुची सेवा करतो त्याला भीती शिवत नाही, वेदना सतावत नाही. नानकाने स्मृती व वेद अभ्यासले. परमेश्वर व गुरुत काही अंतर नाही.

गुरू नानक 

८] अंग : ९४, राग : मांझ, लेखक : गुरु रामदासजी

मै बिनु गुर देखे : ही सुंदर रचना येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/main-bin-guru

मधुसूदन मेरे मन तन प्राना ॥
हउ हरि बिनु दूजा अवरु न जाना ॥
कोई सजणु संतु मिलै वडभागी मै हरि प्रभु पिआरा दसै जीउ ॥१॥
हउ मनु तनु खोजी भालि भालाई ॥
किउ पिआरा प्रीतमु मिलै मेरी माई ॥
मिलि सतसंगति खोजु दसाई विचि संगति हरि प्रभु वसै जीउ ॥२॥
मेरा पिआरा प्रीतमु सतिगुरु रखवाला ॥
हम बारिक दीन करहु प्रतिपाला ॥
मेरा मात पिता गुरु सतिगुरु पूरा गुर जल मिलि कमलु विगसै जीउ ॥३॥
मै बिनु गुर देखे नीद न आवै ॥
मेरे मन तनि वेदन गुर बिरहु लगावै ॥
हरि हरि दइआ करहु गुरु मेलहु जन नानक गुर मिलि रहसै जीउ ॥४॥२॥

ईश्वर (मधुसूदन) हाच माझे शरीर, मन आणि श्वास आहे. मला ईश्वराखेरीज अन्य कोणी ठाऊक नाही. जर मला कोणी मार्ग दाखविणारा सहृदय संत मिळाला तर तो मला माझ्या प्रियतम ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सुचवू शकेल. मी माझं शरीर आणि मन खूप शोधलं. हे माझे माई, मला माझा प्रियतम कसा बरे भेटेल?
सतसंगतमध्ये भाग घेऊन मी ईश्वराचा मार्ग विचारतो. त्या सतसंगतमध्ये ईश्वर वास करतो. माझा सतगुरु माझा रक्षणकर्ता आहे. मी असहाय बालक आहे, माझं पालन कर. गुरु सतगुरु माझी माता आणि पिता आहे. गुरुकडून मिळणाऱ्या कृपारूपी जलाने माझे हृदयकमल उमलून आले आहे. सतगुरुला पाहिल्याशिवाय झोप येत नाही. माझं शरीर आणि मन गुरुच्या विरहाने व्याकुळ होते. हे हरी हरी, माझ्यावर कृपा कर की मी माझ्या गुरुला भेटू शकेन. गुरुभेटीने सेवक नानकाला जीवनदान मिळेल व तो बहरून येईल.

------------------------------------------------------------------------

एवढ्या सुंदर रचना वाचल्या - ऐकल्यावर लिहिण्यासारखे काहीही उरत नाही. तरीही, मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता ह्या रचनांमागील संतकवींची आर्तता, तळमळ, ध्येयासक्ती, विरागी भाव यांना वेगळाच पैलू प्राप्त होतो. आणि तरीही ह्या रचना कालातीत सत्य अधोरेखित करत जातात. त्यांच्यामधून मिळणारा पारमार्थिक संदेश हा अद्वितीय आहे. आज भारतात व भारताबाहेर शीख समाज सर्वदूर पसरला आहे. आपल्या बरोबरीने समाजात नांदणार्‍या, आपल्या समाजाचा व अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या शीख संप्रदायाच्या शिकवणीविषयी आणि त्यांच्या शबद साहित्याविषयी जाणून घेताना पुन्हा एकदा माझ्यासाठी अधोरेखित झालेले सत्य : सर्व धर्म एकच शिकवण देतात. मानवतेचा पुरस्कार करतात. श्रद्धेला जोपासतात. शांती, समानता, बंधुत्व, स्नेह, आदर यांनी युक्त आचरण व विचारांची शिदोरी देतात. ही वैश्विक शिकवण आहे. माणसां-माणसांमधील भेद, दुजाभाव, अंतर दूर करण्याचे ते एक मोठे साधन आहे. एकमेकांच्या धर्मांविषयी, श्रद्धांविषयी जाणून घेऊन, सहृदयता बाळगून आपण भविष्याची वाटचाल केली, संतांच्या शिकवणुकीचे प्रत्यक्षात आचरण केले तर त्यामुळे आपलाच मार्ग सुकर होणार आहे.

धन्यवाद!

--- अरुंधती

(वरील लेखाचे व फोटोंचे स्रोत : विकिपीडिया, शीख संप्रदायाची अनेक संकेतस्थळे, काही शीख स्नेही व माझ्याजवळील माहिती)

5 comments:

 1. This is an interesting write-up. (Sorry for responding in English!). Since last couple of months I came into contact with Sikh community and since then I am interested in learning Gurumukhi and reading Guru Granth Sahib. This post is indeed very useful for me.

  ReplyDelete
 2. धन्यवाद आतिवास (सविता)! तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी अवश्य देईन! (अर्थात, माझ्या शीख स्नेह्यांना विचारून! :-))

  ReplyDelete
 3. तुमचा email id कळवलात मला तर तिथे लिहिते. माझा id aativas@gmail.com आहे.

  ReplyDelete
 4. फार छान माहिती दिली आहेत तुम्ही. अनेकदा गुरुद्वारांत गेल्यावर तिथलं वातावरण भारून टाकणारं असतं, काही रचना कानावर पडतात, त्यांचे स्वर मोहवून टाकतात पण अर्थ कळत नाही, कोणाला विचारावा तर त्यांनाही तो नीटपणे सांगता येत नाही, असा अनुभव मी अनेकदा घेतलाय. आज तुमच्यामुळे काही छान रचनांचा अर्थ कळला. धन्यवाद! यापुढील काळात तुमच्यामुळे आमच्या गुरुमुखी-पंजाबीच्या ज्ञानात अशीच भर पडत राहो, ही प्रार्थना!

  ReplyDelete
 5. धन्यवाद अभिजीत, ह्याखेरीज मी ब्लॉगवर बुल्ले शाह व कबीराच्या पंजाबीतील रचनाही अनुवादित करून लिहिल्या आहेत. अवश्य वाचा! :-)

  ReplyDelete