Thursday, June 23, 2011

पनिशमेन्ट


''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती.
''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता.
'' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...''
''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...''
''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!''
आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती.
आर्या आणि हर्षमधील भांडणे तिला काही नवीन नव्हती. दर पंधरा-वीस मिनिटांनी ह्या आते-मामे भावंडांची आपापसात कधी मुद्द्याने तर कधी गुद्द्याने बातचीत चालू असे. आर्या साडेपाच वर्षांची तर हर्ष चार वर्षांचा. आर्या सारखी ताईगिरी करायला जाणार, तर हर्ष थोडा वेळ तिचे ऐकणार आणि मग तिला धुडकावून लावणार हेही ठरलेले. एकमेकांना ढकलणे, केस ओढणे वगैरे प्रकार हाताबाहेर जायच्या आधीच मग आजी तिचा ठेवणीतला दटावणीचा स्वर काढत असे...
''आर्या... हर्ष... माझं लक्ष आहे हां!''
आजीचा तो सूर ऐकता क्षणी दोन्ही भावंडे काही क्षण गप्प बसत. मग थोडा वेळ एकमेकांना वेडावून दाखविणे, त्यावर खदखदून हसणे आणि भांडण विसरून जाणे हेही नेहमीचेच.

आजीला एरवी त्यांना शिक्षा द्यायची वेळच येत नसे. पण काल दुपारी त्यांनी केलेले उपद्व्याप पाहिल्यावर मात्र कायम नातवंडांचे लाड करणार्‍या आजीने कधी नव्हे तो शिक्षेचे फर्मान सोडले होते! दोन्ही मुलांनी कारभारच तसा केला होता. आजी दुपारी डोकं दुखत असल्यामुळे गोळी घेऊन झोपली होती. आजोबांनाही बैठकीच्या खोलीत डुलकी लागली होती. हाती आलेल्या संधीचा नामी फायदा घेत दोन्ही मुलांनी ''फार उकडतंय.... आपण पाण्यात खेळू,'' म्हणत स्वतः भिजत बेडरूम आणि बाल्कनीतही पाणी ओतून ठेवले होते. बेडरूममधील गालिचा, कोपर्‍यातील सामान, बाल्कनीतील सामान त्यांच्या ह्या खेळात पार भिजून गेले होते.
आजीने झोपेतून उठल्यावर नातवंडांचा हा उद्योग पाहिला आणि कधी नव्हे तो तिचाही पारा चढला.
''आज तुम्हाला दोघांना पनिशमेन्ट! बेडरूम आणि बाल्कनी ही काय पाण्यात खेळायची जागा आहे का? बघा, हे सामान खराब झालं ना आता... ते सुकवायचं म्हणजे मलाच दुप्पट काम पडणार आहे!! ते काही नाही, आता तुम्ही बाथरुममध्येच बसायचं... चुपचाप... दार उघडं ठेवायचंय... तो घड्याळातला मोठा काटा सहावर येईपर्यंत बाथरुममध्येच थांबायचं.... हाताची घडी-तोंडावर बोट!'' आजीने कडक शब्दांत फर्मान सोडलं होतं. आजोबाही आजीचा चढलेला पारा बघून काही बोलले नव्हते.
तशी जास्त वेळाची शिक्षा नव्हती ती! जेमतेम अर्धा तास दोन खोडकर मुलांना बाथरुममध्ये वेळ काढायला लागणार होता. पण आर्या - हर्षसाठी आजीचे असे रागावणे आणि पनिशमेन्ट देणेच विरळे होते.
बाथरुममध्ये आर्या तिचं लहान स्टूल घेऊन आली. त्यावर आळीपाळीने बसत दोघेही घड्याळाचा मोठा काटा सहावर कधी येतोय ह्याची वाट बघत बसले होते. त्या अर्ध्या तासात त्यांना दोनदा तहान लागली, एकदा आजोबांनी आणि दोनदा शेजारील इमारतीतील मुलांनी हाक मारल्यासारखे वाटले ती गोष्ट वेगळीच! पण अर्ध्या तासाच्या 'पनिशमेन्ट' नंतर आजीने बाहेर यायला सांगितल्यावर दोघांनाही खूप 'हुश्श' वाटले होते. नंतर आजीच्या पदरात तोंड खुपसून तिच्या हाताला लोंबकळताना, आपण खोडी काढली, चुकीचे वागलो की आजी 'पनिशमेन्ट' देते हेही कळले होते.
संध्याकाळी मग आजीने साजूक तुपातला मऊ मऊ शिरा करून नातवंडांना खायला घातला. मुलांचे आईवडील घरी आल्यावर ''मी मुलांना अगोदरच पनिशमेन्ट दिली आहे, आता तुम्ही त्यांना वेगळे रागावू नका,'' म्हणून बजावून सांगितले. दिवसभर दंगा करकरून थकून गेलेली मुले रात्री बघता बघता पेंगुळली व झटकन झोपूनही गेली.
आजीने 'पनिशमेन्ट' दिल्यापासून आर्याला शिक्षेची 'पॉवर' कळली होती. आज हर्षने तिचा हेअरबॅन्ड मोडल्यावर तिला ही पॉवर अजमावण्याची हुकुमी संधी चालून आली होती.
''मी आता तुला पनिशमेन्ट करणार आहे! तू माझा टू हंड्रेड रुपीज चा हेअरबॅन्ड मोडलास!'' हेअरबॅन्डचे तुकडे एकमेकांवर आपटून त्यांचा नाद निर्माण करायच्या प्रयत्नांत असलेल्या हर्षला आर्याने ठणकावले.
(आर्याने परवाच शेजारच्या कॉलेजवयीन स्नेहाताईच्या तोंडी 'टू हंड्रेड रुपीज' ही रक्कम ऐकल्यापासून तिला ह्या शब्दाचे व आकड्याचे कमालीचे आकर्षण वाटू लागले होते. जी जी वस्तू छान असेल ती ती 'टू हंड्रेड रुपीज' ची आहे हे तिचे मत!)
''ह्यँ... तो हेअरबॅन्ड टू हन्ड्रेड रुपीजचा नव्हताच मुळी! तो फोर हंड्रेडचा होता. फोर, फोर!'' (हे हर्षचे आपल्या दोन्ही हातांची चार बोटे आर्यासमोर नाचवत काढलेले उद्गार!)
''ठीक आहे, मग तू पनिशमेन्टला तयार हो. आज तू घड्याळाचा मोठा काटा सहावर येईपर्यंत बाल्कनीतच थांबायचंस!'' आर्याने मोठ्या बहिणीच्या थाटात हर्षला ठासून सांगितले.
खरं तर आजीला आर्याचा आविर्भाव पाहून जाम हसू येत होते. जवळपास आजीच्या बोलण्याचीच हुबेहूब नक्कल करत होती ती! आजीने पुढे काय घडतंय ते पाहायचं ठरवलं आणि वर्तमानपत्राच्या आडून हळूच नातवंडांकडे लक्ष देत राहिली.
ठरल्याप्रमाणे हर्ष बाल्कनीत जाऊन उभा राहिला. समोर गुलमोहर, आंबा आणि जांभळाची मस्त डेरेदार झाडे होती. झाडांच्या काही फांद्या बाल्कनीला अगदी खेटून वार्‍याच्या झोक्यासरशी डोलत होत्या. फांद्यांवर येणारे पक्षी, बाल्कनीतून दिसणारे समोरचे पटांगण बघत हर्षचा वेळ तर मस्त मजेत चालला होता.
इकडे घरात आर्याचा जीव काही समोर पसरलेल्या खेळण्यांमध्ये लागत नव्हता.
मुकाट उठून ती आपले छोटेसे स्टूल बाल्कनीत घेऊन गेली.
''हर्ष, तुझे पाय दुखू लागले तर तू ह्या स्टूलवर बस हांऽ!'' हर्षने मान डोलवली. तो बाल्कनीच्या कठड्यावर सरपटणार्‍या अळीकडे बघण्यात गुंगला होता.
जरा वेळ झाल्यावर आर्याने घड्याळाकडे बघितले. अजून मोठा काटा सहावर आला नव्हता.
''आजी, हर्षला बाल्कनीत तहान लागेल नं?" आजीच्या उत्तराची वाट न बघता आर्याने पाण्याने भरलेले फुलपात्र थोडे हिंदकळत बाल्कनीत नेऊन ठेवले.
''हर्ष, तहान लागली तर हे पाणी ठेवलंय हं तुझ्यासाठी!''
हर्षचा फक्त मान डोलवून होकार.
थोड्या वेळाने आर्याने पुन्हा घड्याळ पाहिले.
''आजी, मोठा काटा सहावर यायला किती वेळ आहे गं?''
आर्याला आता हर्षशिवाय करमत नव्हते. आजीने ''वीस मिनिटे'' असे उत्तर दिल्यावर ती उठून किचनमध्ये गेली. प्लॅस्टिकच्या एका छोट्या बरणीत बिस्किटे ठेवली होती, ती बरणी उचलून हर्षला बाल्कनीत ''भूक लागली तर खा हं!'' म्हणून देऊन आली.
आर्याची ती निरागस घालमेल पाहून आजीला आता तर फारच हसू येत होते. तरीही ती काही न बोलता हळूच नातवंडांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती.
अशीच काही मिनिटे गेली. आर्याने गुपचूप बेडरूमच्या कोपर्‍यात गुंडाळलेली चटई आणि आवडती पिसांची उशी उचलली व ते सारे फरपटत बाल्कनीत घेऊन गेली. ''हर्ष, तुला झोप आली तर मी इथं चटई पसरून ठेवतेय हं!'' असे म्हणत तिने बाल्कनीत चटई अंथरली व त्यावर आपली उशी ठेवून दिली. हर्ष तोंडातून ट्रकचे ''ड्रर्रर्र डुर्रर्र'' आवाज काढत बाल्कनीच्या कठड्याला लोंबकळत होता.
आर्याचा पाय खरे तर बाल्कनीतून निघत नव्हता. पण घड्याळाकडे तिच्याखेरीज कोण लक्ष देणार?!!
घरात येऊन तिने मग घड्याळासमोरच मुक्काम ठोकला. बार्बीचे केस विंचरून झाले, खेळण्यातील पोनीच्या झुबकेदार शेपटीची वेणी घालून झाली, पसरलेली कलर बुक्स नीट ठेवून झाली....
''आज्जीऽऽ...'' आर्याचा कंटाळलेला स्वर.
''झाली बरं का वेळ आर्या... घड्याळाचा काटा आलाय सहावर आता!''
आर्याला कोण तो आनंद झाला! तिने हर्षला दिलेली 'पनिशमेन्ट' पूर्ण झाली होती. उड्या मारत मारतच ती बाल्कनीत पोचली. हर्ष तिच्या स्टूलवर आरामात बसला होता. आर्याने त्याला थोडेसे ढकलून स्वतःला बसायला स्टूलवर जागा करून घेतली. मग हर्षच्या गळ्यात हात टाकून उद्गारली, ''पनिशमेन्ट संपलीऽऽऽ!!! चल ना हर्ष, आता काय खेळायचं?''
-- अरुंधती

7 comments:

  1. छोटुकल्यांचे निरागस भावविश्व!

    आवडली. :)

    ReplyDelete
  2. Anonymous7:37 AM

    मस्तच ...


    ......शिवचंद्र

    ReplyDelete
  3. Anonymous11:31 AM

    मस्तच लिहिलंय...

    ReplyDelete
  4. धन्यवाद भानस! खरंय, मुलांचं भावविश्व फार निरागस असतं. तेच रेखाटायचा प्रयत्न केलाय. :-)

    ReplyDelete
  5. धन्यवाद गायत्री व शिवचंद्र! :)

    ReplyDelete
  6. कित्ती गोड!! :)

    ReplyDelete
  7. धन्यवाद श्रध्दा! ^_^

    ReplyDelete