Sunday, October 20, 2013

संहिता - मनात दडलेली!

प्रत्येकाच्या मनात एक संहिता दडलेली असते. आपल्या आयुष्याची संहिता, आपले विचार, अनुभव आणि आपल्या दृष्टिकोनांची संहिता. खरं तर एकच काय ते आयुष्य! पण वेगवेगळ्या चष्म्यांमधून पाहिले तर त्याचे विविध कंगोरे, चढ-उतार, मर्यादा आणि परिसीमा नव्याने जाणवतात, दिसतात, दिसू शकतात. ही जाणीवच मुळात साक्षात्कारी आहे. आणि अशा जाणिवांची लड उलगडताना दरवेळी त्याच त्या परिघांमध्ये फिरणारे कथानक आपल्या सीमा ओलांडून त्यात वेगवेगळ्या वर्तुळांना जसजसे समाविष्ट करत जाते तसतशी त्यातून येणारी अनुभूतीही बदलत जाते. ही अनुभूती म्हणजे संहिता. 



मायबोली.कॉमच्या माध्यमातून संहिता चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहता येणे हा माझ्यासाठी खरोखरी एक सुखद व अविस्मरणीय अनुभव होता. संहिता चित्रपटाची पोस्टर्स पाहिल्यापासून ह्या चित्रपटाबद्दल मनात अतीव उत्सुकता तर होतीच, शिवाय सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांची जोडी असल्यामुळे उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन, नेत्रसुखद चित्रांकन आणि दर्जेदार अभिनय पुन्हा एकदा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार याचीही खात्री होती. इतक्या सुंदर अनुभवाची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मायबोली व माध्यम प्रायोजकांचे खास खास आभार! :)

पुण्यात प्रीमियरच्या ठिकाणी सिटीप्राईड कोथरूड येथे गुरुवारी सायंकाळी मी पोचले तेव्हा मिलिंद सोमण, देविका दप्तरदार, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर तिथे अगोदरच आलेले दिसले. नंतर मोहन आगाशे, दीपा श्रीराम, अमोल पालेकर, चंद्रकांत काळे, शेखर कुलकर्णी हेही दिसले. मायबोलीचा लोगो असलेले मोठे बॅनर प्रवेशाच्या जवळच पाहायला मिळाल्यावर छान वाटले. मायबोलीचा लोगो चांगला ठसठशीत उठून दिसत होता. (नंतर स्क्रीनवरही माबोचा लोगो जेव्हा झळकला तेव्हा असाच आनंद झाला!) आपल्या मायबोलीकरांचीही ह्या खेळाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. :)

सर्वात अगोदर झाले ते मायबोलीकरांचे कलावंतांबरोबरचे फोटोसेशन! हर्पेनच्या कॅमेर्‍याचा चांगलाच क्लिकक्लिकाट झाला! :) चित्रपटाच्या टीमबरोबर वेगवेगळे व ग्रुप फोटोज काढण्यात आले. देविका व मिलिंद सोमण यांच्याबरोबरही मायबोलीकरांनी भरपूर फोटो काढले. दोघेही अगदी सहजपणे फोटोंसाठी पोझ देत होते. मजा आली. 'से चीज' म्हणत हसताना गाल दुखले! 

आरती ताई अंकलीकरांनी या चित्रपटात आपल्या आर्त, मधुर गाण्याने जान ओतली आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांनी गायलेल्या सुरांनी जे उत्कट भावविश्व उभे केले आहे त्याला तोड नाही! प्रीमियरच्या निमित्ताने आरतीताईंशीही छान भेट झाली.

सुरुवातीस सुनील सुकथनकर यांच्यासोबत निर्मात्या टीमने सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, संपूर्ण टीम व चित्रपटास हातभार लावणार्‍या अनेक हितचिंतकांचे आभार मानले आणि 'संहिते' च्या खेळाचा प्रारंभ झाला. मुंबईच्या आलिशान वातावरणातील एका रंगात आलेल्या पार्टीच्या पहिल्याच सीनपासून संहितेने जे मन काबीज केले ते चित्रपट संपला तरी त्यातली प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम मनात तरळत राहिली. आधुनिक मुंबईच्या वातावरणातून आणि अगदी आताच्या जमान्यातल्या रेवती-रणवीर-शिरीन-तारा-हेमांगिनी-दर्शन यांच्या ओझरत्या, वास्तवदर्शी कथेपासून ही कहाणी कधी संस्थानिकांच्या काळात पोचते, त्या कहाणीतली पात्रे कशी जिवंत होत जातात, त्यांचे कथानक कसे उलगडत जाते -- हा सारा प्रवास अतिशय लक्षवेधी आणि समरसून टाकणारा आहे. प्रेक्षक त्या कहाणीत कसा आणि कधी गुंतत जातो हे त्याचे त्यालाच कळत नाही! कथेतले प्रत्येक पात्र सुरेख उमटले आहे. कलावंतांच्या सौष्ठवपूर्ण अभिनयाची जोड आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची समर्थ हाताळणी, त्यातले बारकावे ह्या चित्रपटाला सर्वसाधारण प्रेमकथांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. संस्थानिकांच्या काळातील, त्यांच्या महालांमधील राजेशाही, खानदानी व कधी विलासी वातावरण, त्यांचा विहार, मानसिकता, स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यांत घडून (किंवा न घडून) येणारे बदल हे कथेच्या ओघात खूप सुरेख पद्धतीने व्यक्त होत जातात. कथेतील आधुनिक दांपत्याचा आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करतानाचा जो संघर्ष दाखवलाय तो अगदी सहज पटणारा आहे. आणि त्याच जोडीला संस्थानिक राजा, त्याची राणी आणि त्याची प्रेमिका यांच्यातील परस्पर-नाते कोठेही ओढून ताणून वाटत नाही, ना त्यांचे संघर्ष! त्यांचे विश्व जसजसे उलगडत जाते तसतसे हे संघर्ष व बंध अधिक गहिरे होत जातात. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. आणि त्यांचे हे प्रामाणिकपण सर्वाधिक भावते. त्यात कोण बरोबर, कोण चूक, कोण उचित असे प्रश्नच येत नाहीत. आणि माझ्या मते कोणताही ग्रह न ठेवता, नॉन-जजमेंटल पद्धतीने ह्या सर्व माणसांची, त्यांच्या नात्याची आणि त्या नात्यातून विकसित झालेल्या प्रगल्भ अनुभवांची कथा सांगण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. 

राजेश्वरी सचदेव हेमांगिनी व भैरवीच्या भूमिकेत नजाकत आणते. एक यशस्वी अभिनेत्री, एक उदयोन्मुख - कसदार गायिका आणि समर्पित प्रेमिका या तिन्ही भूमिका ती सार्थपणे तोलते. मिलिंद सोमणने साकारलेला रांगडा रणवीर हा त्याने साकारलेल्या सत्यशील राजापेक्षा जास्त भावतो. राजा प्रेमात विकल आहे. आपल्या वर्तनाने इतर आयुष्यांमध्ये झालेल्या उलथापालथीची त्याला जाणीव आहे, पुरुषी अहंकार तर ठासून भरलेला आहे, पण त्याचबरोबर तो आपल्या भावना व कर्तव्य यांसमोर हतबलही आहे. तर रणवीरचे पात्र हे स्वतःच्या मर्यादांची जाणीव असून त्यापुढे जायचा प्रयत्न करणारे, मार्ग शोधणारे आहे. देविकाचा रेवतीच्या भूमिकेतील अभिनय अतिशय सहजपणे उतरला आहे. अगदी गर्ल नेक्स्ट डोअर वाटावे असे हे पात्र. आणि संस्थानिकांच्या पारंपरिक घरात स्वतंत्र विचारांचे पंख लावून कल्पनेच्या विश्वात विहरणारी, अपेक्षित असणार्‍या भूमिकेपेक्षा वेगळ्या तर्‍हेने आयुष्य जगू इच्छिणारी, राज्ञीपदाचा, बुद्धिमत्तेचा व स्वतःच्या आधुनिकतेचा तोरा बाळगणारी राणीही तिने प्रगल्भपणे साकारली आहे. उत्तरा बावकर, ज्योती सुभाष यांच्या अभिनयाबद्दल काय लिहिणार!! दुधात जशी साखर मिसळावी तितक्या सहजतेने सर्व चित्रपटभर त्यांचा वावर आहे! दोघी इतक्या सहज भावातून व परिपक्वतेने आपली पात्रे साकारतात... त्या अभिनय करत आहेत असे कोणत्याच अँगलमधून वाटत नाही! चित्रपटात सर्वच स्त्री पात्रांच्या भूमिका ह्या स्ट्राँग - सशक्त स्त्रियांच्या आहेत. आयुष्यात जाणीवपूर्वक केलेल्या तडजोडींची किंमत त्यांनी मोजली आहे. त्यांची बलस्थाने, आयुष्यातील शोध विभिन्न आहेत. आणि तरीही त्या एका अदृश्य धाग्याने बांधल्या गेल्या आहेत. कोणता धागा असेल हा?

संहिता चित्रपट हा दर्जेदार, कलापूर्ण मराठी चित्रपटांच्या यादीतील एक अग्रगण्य चित्रपट ठरेल ह्यात शंका नाही. राजा-राणी- दरबारी गायिका असणार्‍या प्रेमिकेच्या सर्वसाधारण प्रेमत्रिकोणात्मक कहाणीला कथेतील पात्रांच्या त्या कथेकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि त्या कथेची आजच्या काळाशी वैचारिक व अनुभवात्मक पातळीवर सांगड घालायचे कौशल्य ह्या चित्रपटाने साधले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक समृद्ध, सकस विचार मिळतो. तो विचार आपल्याला स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहायलाही प्रवृत्त करतो. आपल्या आयुष्याकडे नेहमीच्या साच्याबाहेर जाऊन बघताना जे काही मिळते तिथेच आपलीही एक संहिता आकाराला येत असते.  

महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात मांडलेल्या कथानकाशी प्रेक्षक रिलेट करू शकतो. त्यातली आधुनिक काळातली पात्रे तर आपल्या आजूबाजूला वावरणारी वाटतात. त्यांच्या कथा त्यामुळे तितक्याच जिव्हाळ्याच्या वाटतात. सुनील सुकथनकरांनी रचलेली गीते, शैलेन्द्र बर्वेंची संगीतयोजना आणि आरतीताईंच्या गळ्यातून थेट मनात खोल आतवर कोठेतरी भिडणारे सूर... क्या कहना!

सर्वांनी आवर्जून हा चित्रपट स्वतः तर पाहावाच आणि आपल्यासोबत इतरांनाही इतका सुंदर अनुभव मोठ्या पडद्यावर पाहण्यास उद्युक्त करावे. चित्रपटातील संवाद व गाण्यांची इंग्रजी सबटायटल्स समर्पक आहेत. मला खास 'वाचत वाचत' हा चित्रपट पुन्हा एकदा बघायचा आहे! :)

3 comments:

  1. Prachiti9:10 AM

    किती सुंदर शब्द बद्ध केलायस तुझा अनुभव …… चित्रपटाच्या कथे विषई जे विचार मांडले आहेस ते वाचून हा चित्रपट पहायचा ते सुद्धा आवर्जून असे वाटले …इतक प्रगल्भ विषय ,किती हळुवार पणे मांडण्यात आलाय हे तुझ्या लेखनातून कळते …चित्रपटाला आणि तुझ्या लेखाला मनापासून माझी

    ReplyDelete
  2. छन लिहिलास. सिनेमा पहायलाच हवा.माझ्या मुलीची प्रतिक्रिया.मिलिंद सोमण साठी गेले पण देविकानी सर्वाना खाऊन टाकलय

    ReplyDelete
  3. प्रतिसादासाठी धन्यवाद प्रचिती आणि शोभनाताई!
    हो, देविकाने खरोखरी खाऊन टाकलंय सर्वांना! :)

    ReplyDelete