Thursday, January 28, 2010

मदतीचा हात


आज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला नव्हता. लक्ष्मी म्हणजे माझी वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी असणारी, पण अतिशय बोलघेवडी, माणूसवेडी, अगत्यशील दाक्षिणात्य मैत्रीण! आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे तेवढीच अनौपचारिक! तिच्या घरच्या समस्या ती मोकळेपणाने सांगणार, माझ्या टिपिकल मराठी वागण्यावर खळखळून हसणार, कामात असली तर मला तिच्या नऊ वर्षांच्या चिमुरडीच्या - मीनूच्या तावडीत सोडून एकाच वेळी स्वैपाक, फोन, दरवाज्याची बेल, कामाच्या बाईवर देखरेख, वृद्ध सासऱ्यांना काय हवे-नको ते बघणे अशा अनेक जबाबदाऱ्या दशभुजेच्या आवेशात लीलया पेलून चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम राखणार....


दरवाज्याबाहेर घातलेली सुबक रांगोळी मी कौतुकाने न्याहाळत असतानाच लक्ष्मीने दार उघडले. नेहमी टवटवीत असणारा तिचा चेहरा थोडा काळजीत दिसत होता. मला पाहून तिच्या चर्येवर आनंदमिश्रित आश्चर्य उमटले खरे, पण त्यात एरवीची चमक नव्हती. काहीतरी नक्की बिनसले होते! ती एकीकडे माझ्याशी बोलत होती पण वारंवार तिची अस्वस्थ नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे व दरवाज्याकडे जात होती. तिची चलबिचल मला पाहवेना. "काय झाले गं? " माझ्या प्रश्नासरशी ती ताडकन उठली व बाल्कनीत जाऊन खालच्या रस्त्यावर एक नजर घालून आली.

"अगं, सांगशील का काय झालं ते? " मी पुन्हा विचारले.

एवढा वेळ आणलेले अवसान गळल्यासारखे ती धपदिशी सोफ्यावर बसली. "मीनू अजून आली नाही परत तिच्या मैत्रिणीकडून! अर्ध्या तासापूर्वीच घरी पोचायला हवी होती. मी फोन केला तिच्या मैत्रिणीला. इथे पलीकडच्या रस्त्यावर राहते ती. चालत घरी यायला जेमतेम दहा मिनिटे लागतात. रस्त्यात कोणी भेटले तरी एव्हाना घरी यायला हवी होती गं ती.... छे! मी तिला एकटं घरी परत यायची परवानगीच द्यायला नको होती!! " लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचे कावरेबावरे भाव मला अनोखे होते. कायम जिला उत्साहाने खळाळताना पाहिले आहे तिला असे पाहायची सवय नव्हती ना! मी तिचे गार पडलेले हात हातात घेऊन म्हटले, "आपण जायचं का तिला रस्त्यावर शोधायला? कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय तिनं? चल, एकीला दोघी असलो की पटापट शोधता येईल... "

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच घरातला फोन वाजला. लक्ष्मीने अक्षरशः फोनवर झडप घातली. पलीकडे मीनूच्या मैत्रिणीची आई होती. थोडा वेळ मला अगम्य भाषेत तिच्याशी बोलल्यावर लक्ष्मीने फोनचा रिसीव्हर जाग्यावर ठेवून दिला.

"ती म्हणते आहे की त्यांच्या सोसायटीच्या चौकीदाराने तिला साधारण पाऊण तासापूर्वी सोसायटीतून बाहेर पडताना पाहिलंय, " लक्ष्मीच्या आवाजात चिंता दाटून आली होती. "कुठे, गेली कुठे ही मुलगी अशी अचानक?"

"अगं, तिची कोणी मैत्रीण-मित्र भेटले असतील रस्त्यात तिला.... त्यांच्याशी गप्पा मारत बसली असेल.... " माझा तिची समजूत काढायचा प्रयत्न. त्यावर मान नकारार्थी हालवीत लक्ष्मीने ती शक्यता फेटाळून लावली.

थोडा वेळ आम्ही दोघी शांत बसलो, आपापल्या विचारात हरवून.

माझ्या नजरेसमोर मीनूचा तरतरीत, गोड चेहरा येत होता. आपल्या आईसारखीच सतत उत्साहाने लवलवणारी, लाघवी, खट्याळ मीनू. आपल्या आजोबांना नीट दिसत नाही म्हणून त्यांना जमेल तसा पेपर वाचून दाखविणारी, घरात आलेल्या पाहुण्यांकडे एखाद्या मोठ्या बाईच्या थाटात लक्ष देणारी, अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून कुरकूर करणारी, आइसक्रीमचे नाव काढले की गळ्यात पडणारी....

अचानक लक्ष्मी उठली, आतल्या खोलीतून तिची पर्स व मोबाईल घेऊन आली. मी पण उठले, पर्स काखोटीला मारली. पायात चपला सरकवणार तेवढ्यात आठवण झाली, "अगं, मीनूचे आजोबा कुठं आहेत? " लक्ष्मीने पर्समधून घराच्या चाव्या बाहेर काढल्या होत्या.

"ते माझ्या धाकट्या दिरांकडे गेलेत आठवडाभरासाठी. चल, तू लिफ्ट बोलाव तोवर मी घर लॉक करते, " इति लक्ष्मी.

मी दारातून बाहेर पडून लिफ्टकडे वळणार तोच लिफ्टचा आवाज आला, दारातून बाहेर येणारी मीनूची छोटीशी मूर्ती पाहून किती हायसे वाटले ते आता शब्दांत सांगू शकणार नाही. मीनू बाहेर आली आणि तीरासारखी धावत दार लॉक करत असलेल्या लक्ष्मीच्या गळ्यातच पडली. 'अगं, अगं, अगं... " करत लक्ष्मीने कसाबसा आपला तोल सांभाळला, हातातून पडत असलेली पर्स टाकून लेकीचा छोटासा देह पोटाशी धरला. काही सेकंद मायलेकी काहीच बोलल्या नाहीत. एकमेकींना घट्ट धरून होत्या. शेवटी मीनूची आईच्या मिठीतून सुटण्यासाठी चुळबूळ सुरू झाली. "अम्मा, आता बस्स ना... " लक्ष्मीने काही न बोलता दार पुन्हा उघडले, लेकीला आत घेतले. त्यांच्या मागून मीही लक्ष्मीची विसरलेली पर्स उचलून आत शिरले.

आत गेल्यावर मात्र लक्ष्मीचा एवढा वेळ मनावर ठेवलेला संयम सुटला. तिने मीनूच्या समोरच बसकण ठोकली, लेकीला तिच्या दोन्ही दंडांना धरून स्वतःसमोर उभे केले. दोघींमध्ये पुन्हा मला न कळणाऱ्या खडडम खडडम भाषेत बरेच संभाषण झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून मी त्या काय म्हणत असतील ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. मीनू बराच वेळ श्वासाचीही उसंत न घेता जोरजोरात हातवारे करून तिच्या आईला घडलेले सांगत होती. सुरुवातीला काहीसा घुश्शात असलेला लक्ष्मीचा चेहरा लेकीच्या स्पष्टीकरणाबरोबर हळूहळू निवळत गेला. पण तरीही तिने मीनूचे बोलणे संपत आले तशी इंग्रजीमिश्रित खडडम भाषेत तिला ताकीद दिली. लेकीने समजल्यागत मुंडी हालविली व आतल्या खोलीत खेळायला निघून गेली.

"काय म्हणत होती मीनू? " मी उत्सुकतेने विचारले.

" आज माझ्या लेकीने खूप चांगले काम केले आहे गं.... " लक्ष्मीचे गोल टपोरे डोळे पाण्याने भरून आले होते. घशाशी आलेला आवंढा गिळून ती म्हणाली, " आज परत येताना रस्त्याच्या बाजूला तिला आमच्या घराच्या कोपऱ्यावर भाजी विकायला येणारी भाजीवाली बेशुद्ध पडलेली दिसली. मीनूने लगेच शेजारच्या एका दुकानात जाऊन त्या दुकानदाराकडे मदत मागितली.




आजूबाजूचे इतर काही विक्रेतेही तोवर जमा झाले. मग त्यातल्याच एका बाईने त्या भाजीवालीला पाणी पाजून शुद्धीवर आणले आणि तिला रिक्शात घालून दवाखान्यात घेऊन गेली. तोवर कोणीतरी त्या भाजीवाल्या बाईच्या मुलाला निरोप धाडला होता. तो मुलगा येईपर्यंत मीनू त्या भाजीवालीची हातगाडी सांभाळत रस्त्यातच उभी होती. मगाशी तो आला म्हटल्यावर ही तिथून निघाली व तडक घरी आली! म्हणून उशीर!!" लक्ष्मीच्या आवाजात लेकीविषयी कौतुक होते, पण काळजीचा स्वर पुरता मिटला नव्हता.

मी तिला म्हटलेही, "अगं, आता आली ना ती परत? मग पुन्हा कसली काळजी करतेस? "

त्यावर लक्ष्मीचे ट्रेडमार्क हसू पुन्हा तिच्या ओठांवर उमटले आणि जणू डोक्यातले विचार झटकत ती पुटपुटली, "कायम मीच तिला सांगत आले आहे की दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, अडल्यानडल्याला मदत करावी.... आता या बाईसाहेब कोणाकोणाच्या मदतीला अशा धावून जातात ते पाहायचं.... हां! मात्र आता तिला वॉर्निंग मिळाली आहे की असं काही झालं की आधी फोन करून आईला कळवायचं... "

लक्ष्मीच्या उद्गारांवर मी कुतूहलाने विचारले, "म्हणजे त्याने काय साध्य होईल?"

त्यावर खळखळून हसत लक्ष्मीने माझे हात हातात घेतले व आपल्या हसण्याचे चांदणे डोळ्यांतून उधळत उद्गारली, "म्हणजे मग मीपण तिच्या मदतीला जाईन!! "

-- अरुंधती

Tuesday, January 19, 2010

नैनितालच्या आठवणी



नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर.....

माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता.

महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो. अभ्यासाच्या सर्व स्थळांची सहल करून झाल्यावर आमच्या सहलीचा मोर्चा नैनितालकडे वळला. प्रवासात अखंड टिवल्याबावल्या करणे, चिडवाचिडवी, भेंड्या, उखाळ्यापाखाळ्या, खोड्या असे उद्योग चालू होते.

दिल्लीहून एक संपूर्ण रात्र नागमोडी, वळणावळणाच्या रस्त्यांनी बसचा प्रवास केल्यावर पहाटे आलेल्या नैनितालमधील ऐन नोव्हेंबर महिन्यातील हाडे गोठवून टाकणारी थंडी आम्हाला जरा अनपेक्षितच होती.

तशी आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी पूर्वसूचना दिली होती. परंतु तरुणाईच्या जोषात आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

परिणामी, चाळीस जणांचा आमचा जथा कुडकुडत, थरथरत, सुन्न होऊन नैनितालच्या नैनी सरोवराच्या काठालाच लागून असलेल्या पर्यटक निवासात दाखल झाला. दिवसा साधारण तीन ते चार डिग्रीज सेल्सियस तापमान असायचे. रात्री ते किती घसरायचे ह्याची कल्पनाच न केलेली बरी! त्यात आम्ही सरोवराच्या काठालाच असल्याने तो गारठा अजूनच वेगळा! सकाळी दहा वाजता सूर्य उगवायचा (म्हणजे आभाळात धुगधुगी आल्यासारखा दिसायचा! ) बाकी वेळी धुकाळ वातावरण, बोचरी थंडी, रक्त गोठविणारे वारे आणि मधूनच दाटून येणारा अंधार! अहाहा!!


आमची स्थिती तर काय वर्णावी!! नाक, कान, चेहरे थंडीने कोरडे, लाल पडलेले... हात-पाय कधीही दगा देतील अशा स्थितीत! स्थानिक बाजारातील दुकाने उघडल्यासरशी आमची टोळी तेथील दुकानांमधून ढीगभर स्वेटर्स, शाली, कानटोप्या इत्यादी खरेदी करून आली. इतकेच नव्हे तर पुण्यातील आपल्या कुटुंबियांसाठीही प्रत्येकाने पुण्यात तीन - चार डिग्रीज सेल्सियस तापमान असल्याच्या थाटात वारेमाप गरम कपडे घेतले! (अजूनही १२ - १३ वर्षांनंतर आमच्या घरी नैनितालच्या लोकरी स्वेटर - शालींची पुण्याई पुरी पडत आहे, म्हणजे बोला! ) एवढ्या थंडीत प्रवासाने आखडलेले आमचे हात-पायही चटचट हालत नव्हते. अंघोळीच्या नुसत्या कल्पनेनेही जीव नकोसा होत होता. स्नानगृहात एरवी तासंतास रेंगाळणाऱ्या भद्रकन्या विजेच्या चपळाईने स्नानादिकर्म आटोपून बाहेर येत होत्या.

थंडीच्या मोसमामुळे नैनितालमध्ये प्रवाशांची फारशी गर्दी दिसत नव्हती. दुकाने, हॉटेल्सही पटापट बंद होत असत. आम्ही त्यातल्या त्यात स्वस्त व मस्त अशा ढाबावजा टपरीत बसून गरम चहा आणि विस्तवाच्या उबेचा आनंद घेत असू.

आमच्या रूममध्ये तसा पाचजणींमध्ये मिळून एक हीटर होता, पण ऐन रात्री तो बंद पडत असे. रूमची एक बाजू सरोवराच्या दिशेने उघडत होती. त्या बाजूला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या, जेणेकरून सरोवर व पलीकडील पर्वतराजींचा नयनरम्य देखावा सतत समोर असावा. पण आमच्या लेखी ह्या खिडक्या म्हणजे अधिक गारठण्याची क्रूर हमी होत्या! माझ्या मैत्रिणी थंडगार पडलेल्या गादीवर कूस जरी बदलावी लागली तरी अक्षरशः किंचाळत उठत असत, इतकी ती गादी बर्फासमान गार पडलेली असे. मला तर थंडीने झोपच नव्हती.

पहिल्याच रात्री माझ्या एका मैत्रिणीच्या पायात थंडीमुळे प्रचंड गोळे व मुंग्या आल्या.

आमच्या वर्गमित्रांना हे कळल्यावर त्यातील एकाने गुपचूप तिला थोडी ब्रँडी आणून दिली व रात्री ती पायाला चोळायला सांगितले.

पण ही मुलगी तर फार महान निघाली.... तिला औषधासाठी चमचाभर ब्रँडी पोटात तर घेणे सोडाच, पण ती पायाला चोळायलाही महासंकोच वाटत होता. शेवटी रात्री पुन्हा एकदा थंडीने किंचाळून झाल्यावर तिने पायाला कण्हत कुथत ब्रँडी चोळली व खोलीतील इतर सर्व जाग्या मुलींकडून बाकी कोणालाही न सांगण्याचे वचन घेतले! (जसे काही आम्ही हिची बदनामीच करणार होतो, कप्पाळ! )

थंडीमुळे आमचे सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे बेत बारगळले. एक तर धुक्यामुळे व कधीही पडणाऱ्या अंधारामुळे मुख्य शहरापासून फार लांब जाणे, डोंगर तुडविणे जरा आमच्यासारख्या नवख्यांना धोक्याचेच वाटत होते. शिवाय थंडीपायी सगळेजण एवढे गळाठले होते की दिवसभर बाजारात हिंडणे, रोप-वे वरून राईड घेणे, घुडसवारी करणे व नौकानयन याखेरीज खाणे-पिणे व झोपा काढणे (जमल्या तर, कारण थंडीमुळे झोपही यायची नाही! ) हाच उद्योग! त्यामुळे अनेकदा आम्ही क्वचितच उघड्या असणाऱ्या पर्यटन ऑफिसमध्ये घुसत असू व त्यांच्याकडील नैनिताल परिसराचे विविध रंगीत नकाशे, पुस्तिका यांच्यावर ताव मारून जणू आपण ती ती स्थळे प्रत्यक्ष बघत आहोत अशा तऱ्हेचे सोंग आणून मुक्त बडबड करीत असू.


एके दुपारी, मनाचा हिय्या करून मी व माझ्या दोन मैत्रिणींनी आतापर्यंत टाळत आलेल्या नौकानयनाचा लाभ घेण्याचे ठरविले. एक नावाडी ठरविला. दुपारची वेळ असल्याने सूर्य नावाला का होईना, आकाशात दिसत होता. अर्थात त्या उन्हात काही दम नव्हता. गार वारे वाहत होते. सरोवरात बोटींची जास्त वर्दळ नसली तरी अनेक लोक आमच्यासारखाच नौकानयनाचा आनंद लुटायला आल्याचे दिसत होते. हवेतला बोचरा गारठा कमी होण्याची कसलीच लक्षणे नसल्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजवयातील फॅशन सेन्स ला शोभणारे गरम कपडे घालून आलो होतो. (म्हणजेच, कपड्याच्या उबदारपणापेक्षा 'दिखावा' जास्त, हे सुज्ञांनी समजून घ्यावे! ) नावाड्याने नाव वल्हवायला सुरुवात केल्याबरोबर थोड्याच अंतरावर अचानक आभाळ दाटून आले. जोरात वारे वाहू लागले. आमची नाव गदगदा हालू लागली. सरोवरात इतरही बोटी होत्या. अंधारात नाव तशीच वल्हवली असती तर त्यांच्याशी टक्कर होण्याचा धोका असतो असे मौलिक ज्ञान आम्हाला नावाड्याकरवी मिळाले. कोंदलेला अंधार आकस्मिक होता. पण नावाड्याला ह्याची सवय असल्यामुळे त्याने सराईतपणे नाव थांबविली, स्थिर केली व अचानक दाटून आलेला अंधार सरायची वाट पाहत विडी शिलगावून बर्फाळ हवेत धुराची वलये सोडू लागला. इथे आमचे प्राण मात्र कंठाशी आले होते! आमच्यापैकी एकीलाच पोहोता येत होते. आजूबाजूला डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, एवढा गुडुप्प अंधार होता. नाव वाऱ्याच्या वेगासरशी डुगडुगत, डळमळत होती. नावाडी जगाची पर्वा नसल्यासारखा आपल्याच नादात होता. डोंगरातील एका देवळातून ऐकू येणारा अखंड घंटा गजर मात्र त्या अंधारातही आश्वासन देत होता. माझे सारे लक्ष त्या घंटानादाकडे एकवटले होते. मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना चालली होती. इतके दिवस आमची सर्वांची जी मौजमजा चालली होती, तिची चमक आता फिकी पडू लागली होती. अजून किती बघणार, किती पाहणार? किती प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर हे डोळे निवणार? किती वेगळे वेगळे पदार्थ चाखणार? असे किती पदार्थ चाखले म्हणजे समाधान होणार? अजून किती मौजमजा करणार? याला काही अंत आहे का? मनात असे आणि अजून बरेच विचार उमटत होते.


सरोवरावर निःस्तब्ध शांतता पसरली होती. पक्षीही अंधारात चिडीचूप झाले होते. वातावरणात भरून राहिला होता तो फक्त घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज व अविरत चाललेला घंटानाद! त्याक्षणी मनात काहीतरी हालले. एक पडदा गळून पडला. आपण जे काही करतोय त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या कार्याच्या दिशेने जाण्याची अंतर्सूचना मिळाली. गोंधळलेले मन जसे सावरत होते तोच सूर्यानेही अचानक काळ्यासावळ्या ढगांच्या व धुक्याच्या आडून एकदम बहारदार दर्शन दिले! सरोवरातील नौकाप्रवाशांमधून आनंदाचे एकच चीत्कार उमटले. आमच्या नावाड्याने नाव वळवून पुन्हा काठाला आणली. एवढा वेळ निसर्गाच्या ह्या आकस्मिक रूपाने अवाक झालेल्या माझ्या मैत्रिणींनाही कंठ फुटले. माझ्या डोळ्यांत आलेले कृतार्थतेचे अश्रू लपवितच मीही त्यांच्या चटपटीत गप्पांमध्ये सामील झाले.

काठावर आमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणी आमची वाटच पाहत होते. आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला तासाभरात मुक्काम हालविण्यासाठी तयार होण्याचा निरोप दिला होता.

कॉलेजवयीन नियमाला अनुसरून मी मनोमनच त्या सूर्यदेवतेला नमस्कार केला व एका अनामिक उत्साहाने पुढील प्रवासासाठी सज्ज झाले!

--- अरुंधती

Tuesday, January 05, 2010

भागवतकथेने घडविले व्रत!

आयुष्यात एकदा तरी भागवतकथा ऐकावी असे म्हणतात. मला आपल्या आयुष्यात हा योग किमान साठी-सत्तरी उलटल्याशिवाय येणार नाही ह्याची खात्री होती. परंतु बहुधा परमेश्वराला मला त्या भक्तिसागरात लवकरात लवकर बुचकळून काढायचे असावे. परिणामी माझ्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर, म्हणजे वयाच्या तिशीच्या आतच तो सुवर्णयोग जुळून आला.

माझ्या मैत्रिणीच्या आईने तिच्या कालवश झालेल्या सासूसासऱ्यांच्या पुण्यस्मरणार्थ हरिद्वार येथे ऐन मे महिन्यात आयोजित केलेल्या भागवत सप्ताहाचे मला व माझ्या आईला साग्रसंगीत आग्रहाचे निमंत्रण दिले. मी उन्हाळ्याचे कारण पुढे करणार, तोच तिने माझ्यासाठी खास ए‌. सी. प्रवास व ए‌. सी. खोलीची व्यवस्था करू असे भरघोस आश्वासन दिले. आधीच मला भागवतकथासप्ताहा विषयी अपार उत्कंठा होती, त्यात महाराष्ट्रातील अतिशय नामवंत भागवत कथाकारांना मैत्रिणीच्या आईने कथेसाठी आमंत्रित केले होते. चोख बडदास्त ठेवली जाण्याची खात्री होती आणि सर्वात कळस म्हणजे हरिद्वारला गंगेच्या काठापासून थोड्या अंतरावरच कथासप्ताहाचे स्थळ होते! सर्वच गोष्टी एवढ्या सुंदर जुळून आल्यावर पुढचे दहा दिवस अविस्मरणीय रीतीने पार पडणार याची मला पक्की खात्री होती आणि झालेही तसेच! १४ मे ला पहाटे चार वाजता पुण्याहून गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस ने आमचा जवळपास शंभर - दीडशे लोकांचा जथा निघणार होता. आमच्यापैकी चार-पाच लोक सोडले तर बाकी सर्व मैत्रिणीचे नातेवाईक होते. १३ मे ला सायंकाळी माझा नाशिक येथे कार्यक्रम होता. कार्यक्रम रात्री उशीरा संपणार व मला तर लगेच पहाटेपर्यंत पुणे स्टेशन गाठायचे होते. कार्यक्रमाच्या आयोजकांना मी माझी अडचण सांगितली. त्यांनीही तत्परतेने माझ्या दिमतीला त्यांची गाडी व विश्वासू ड्रायव्हर दिला व सांगितले की माझा ड्रायव्हर तुम्हाला पहाटेपर्यंत वेळेत ट्रेनमध्ये बसवून देईल. आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. रात्री उशीरा ११ वाजता कार्यक्रम संपल्यावर मी गाडीत बसले आणि आयोजकांच्या ड्रायव्हरने कोठेही गाडी न थांबविता मला ठीक पहाटे पावणेचार पर्यंत पुणे रेल्वे स्टेशन वर आणून देखील सोडले होते! आमची ट्रेन आल्यावर सगळेजण भराभर गाडीत चढलो. माझा व आईचा ए‌. सी. डबा असल्याने तिथे फारशी गर्दी नव्हती. रात्रभर जागून काढल्याने मला कधी एकदा बर्थ वर देह लोटून देतो व सुखनिद्रेचा अनुभव घेतो ह्याची घाई झाली होती. पण जेमतेम तास-दोन तास डोळा लागला असेल तोवर आमच्या यजमान परिवाराने त्यांच्या आदरातिथ्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली. प्रथम गरमागरम वाफाळता चहा आला, त्या नंतर नाश्त्याची पाकिटे व बिसलेरी पाण्याच्या बाटल्या घेऊन चक्क यजमान स्वतः हजर झाले. गाडीतील त्यांच्या सर्व नातेवाईकांना ते जातीने नाश्त्याची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या पुरवित होते. मग दर अर्ध्या तासाने खाण्याच्या विविध पदार्थांची सरबत्तीच सुरू झाली. पोहे, कचोरी, समोसे, मिठाया, ज्यूस, चहा, पाणी, ढोकळा..... माणसाने खायचे खायचे म्हणून किती खावे? एक तर उन्हाळ्याचे दिवस आणि त्यातून हा आदरातिथ्याचा महापूर....!!!! थोड्याच वेळात मला ट्रिक लक्षात आली. आपण एखाद्या पदार्थाला नाही म्हटले तर तो पदार्थ घेऊन येणारे इतका आग्रह करीत की आपल्यालाच लाजायला होत असे. मग त्यांचा असा आग्रह 'सहन' करण्यापेक्षा तो पदार्थ मुकाट्याने ठेवून घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या स्टेशनला आमच्या यजमानांचे अजून नातेवाईक ह्या यात्रेत सामील होत होते व येताना त्यांच्याबरोबर खाद्यपदार्थांचे मोठमोठे बॉक्सेस घेऊन येत होते!! एका प्रकारे अतिशय सुरेख नियोजन केले होते ह्या सफरीचे! कोणालाही कसलीही उणीव भासू नये, त्रास होऊ नये ह्यासाठी यजमान परिवार व त्यांचे नातेवाईक खरोखरीच मनापासून झटत होते. त्यांच्या दिवसभरात ट्रेनमधून असंख्य चकरा झाल्या असतील व रात्रीही त्यांच्यातील पुरुषमंडळी जागरूकतेने डब्यांमधून गस्त घालत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली आले आणि एवढा वेळ ए. सी. चे सुख घेतलेल्या मला दिल्लीच्या उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली. सर्वांनी स्टेशनवरील क्लोकरूममध्येच अंघोळी-पांघोळी उरकून घेतल्या. भुकेचा तर प्रश्नच नव्हता एवढी आमची पोटे आदल्या दिवशीच्या अखंड खाद्य माऱ्याने तुडुंब भरली होती. तरीही ठराविक अंतराने खाद्यपदार्थ आमच्या दिशेने येतच होते! अखेर हरिद्वारला जायच्या गाडीत बसलो. एव्हाना तीन बसेस भरतील एवढी आमची जनसंख्या होती. माहोल पूर्ण पिकनिकचा, धमालीचा होता. गाणी, गप्पा, अंताक्षरी....प्रवासाचा पहिला टप्पा सुरळीत पार पडल्याने सगळेच जरा निवांत झाले होते. कडकडीत उन्हात प्रवास केल्यावर पुन्हा आमच्या बसेस मुख्य रस्त्यापासून जवळच एका निसर्गरम्य स्थळी दुपारच्या भोजनासाठी थांबल्या. येथे मात्र यजमान परिवाराने आतिथ्याची शर्थच केली होती. आमच्या जवळपास दोनशे लोकांच्या तांड्यासाठी त्यांनी दिल्लीहून एका आचाऱ्यालाच पाचारण केले होते, आणि आम्ही जेव्हा भोजनस्थळी पोचलो तेव्हा आचाऱ्याच्या मदतनीसांनी व यजमानांच्या अजून काही नातेवाईकांनी पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. झाडांच्या सावल्यांत, प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसून आम्ही तळपत्या सूर्याच्या साक्षीने पुरी, भाजी, हलवा, पुलाव, मठ्ठा, लोणचे अशा शाही भोजनाचा आस्वाद घेतला व पुढे निघालो. आतापर्यंत माझ्या मनात आपण भागवतकथेला चाललोय की खाद्ययात्रेला, असे सवाल येऊ लागले होते. परंतु 'आलीया भोगासी असावे सादर' अशा अर्थाचे थोर विचार करत आला क्षण सुखाचा मानण्यात मला धन्यता वाटू लागली होती. मजल-दरमजल करीत एकदाचे आम्ही हरिद्वारला पोहोचलो. सायंकाळची वेळ होती. गंगेच्या दर्शनाची घाई झाली होती. यजमान परिवाराने त्यांच्या समाजाच्या अद्ययावत धर्मशाळेत आम्हा सर्वांसाठी खोल्या आरक्षित केल्या होत्या. पण त्या खोल्या ताब्यात घेईपर्यंत धीर कोणाला होता! सर्वांनी बॅगा लॉबीतच सोडल्या व मिळेल त्या वाहनाने गंगातीरी पोहोचलो. "मातस्त्वं परमासि शक्तिरतुला सर्वाश्रया पावनी । लोकानां सुखमोक्षदाखिलजगत्संवंद्यपादांबुजा ॥ " हे गंगे, हे माते, हे जगत जननी, तुझ्या चरणकमलांचे दर्शन घेण्यास सारे विश्व व्याकुळले असते... त्या तुझ्या चरणांशी मी नतमस्तक आहे! सायंकाळचे ते गंगेचे मनोहर रुप डोळ्यांत साठवित हुरहुरत्या मनांनी आम्ही पुनश्च मुक्कामी पोहोचलो. वचन दिल्याप्रमाणे खरोखरीच यजमानांनी माझ्या खोलीत विशेष ए‌. सी. ची सोय केली होती! स्वर्गसुख ह्यापेक्षा वेगळं काय असतं? खोलीत जाऊन जरा फ्रेश होत होतो तोवर रात्रीच्या जेवणाची वर्दी आली. खरे तर आता प्रवासाचा शीण जाणवत होता. फारसे खायची पण इच्छा नव्हती. मात्र गेलो नसतो तर यजमानांना वाईट वाटले असते. एवं च काय, मी व आई खाली आवारात उभारलेल्या खास भोजनशाळेकडे निघालो. सर्व पाहुण्यांच्या स्वागताची चोख तयारी केलेली दिसत होती. मांडवाबाहेरही लोकांना बसायला खुर्च्या टेबले मांडली होती. मांडवात तर सर्वत्र चकचकाटच होता. यजमानांच्या जवळच्या परिवारातील सर्व पुरुष जातीने पगडी, फेटे घालून स्वागताला उभे होते. वयस्कर लोकांचे पायी पडून आशीर्वाद घेण्यात येत होते. प्रत्येक माणूस व्यवस्थित जेवतोय ना ह्याकडे घरातील स्त्रियांचे बारीक लक्ष होते. आम्हाला बरेचसे लोक अनोळखी होते. मग त्यांच्या परिवारातील विविध लोक आमची ओळख स्वतःहून करून घेत होते. आमचा अंदाज होता, रात्री प्रवास करून आल्यावर साधे कढीभाताचे जेवण असेल. पण येथेही त्यांनी साग्रसंगीत जेवणाचे आयोजन केले होते. मी कसेबसे दोन घास खाल्ले. सर्व स्वयंपाक साजूक तुपातील.... जेवणात भरपूर तळलेल्या, तुपातील पदार्थांची रेलचेल... असले जेवण मला नक्कीच मानवणारे नव्हते. खोलीवर परत आले पण अस्वस्थ वाटू लागले. जरा शतपावली करावी म्हणून बाहेर आले तोच माझ्यासाठी खास निरोप आला की तुम्हाला यजमानीण बाई शोधत आहेत. आता नवे काय? असे वाटून काहीशा बुचकळ्यानेच मी यजमानीण बाईंना गाठले. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शनचे ढग जरा मावळलेले दिसले. "बरं झालं बाई तू भेटलीस ते! एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय... बघ ना तुला काही करता आलं तर.... " मला काहीच उलगडा होईना.... आता कसला प्रॉब्लेम? आणि मी काय मदत करणार? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून त्या उत्तरल्या, " अगं, आमच्या भागवत कथा सांगणाऱ्या महाराजांबरोबर त्यांना साथ करणारी गायक, वादक मंडळी असतात. आमचे महाराज वेगळ्या ट्रेनने आले आणि त्या गायक-वादक मंडळींपैकी मुख्य गायकांची ट्रेन चुकली. गाड्यांना गर्दी एवढी आहे की ते लगेच येऊ शकतील असे वाटत नाही. तर तू गाशील का त्यांच्या ऐवजी? " आता थक्क होण्याची माझी खेप होती. मी जरा चाचरतच उद्गारले, "पण मला तुमची ती भजने, गाणी कशी येणार? मला तर काही माहीत नाही.... " ताबडतोब त्यांनी माझा हात धरला व मला लगोलग त्यांच्या महाराजांच्या कक्षात घेऊन गेल्या. महाराजांना त्यांनी अगोदर सांगून ठेवले असावे, कारण त्यांनीही माझे खुल्या हास्याने स्वागत केले. मी माझी अडचण सांगितल्यावर त्यांनी, ''तुम कुछ चिंता मत करो, यह किताब रख लो । बहुत ही सरल, सीधे भजन है । गानेमें कोई दिक्कत नही होगी तुम्हे । बस, मैं जैसा गाता हूं उसे ठीक ठीक वैसेही फॉलो करना... यदी कुछ यहां वहां हो गया तो हमारे और बाकी साथी सम्हाल लेंगे.... तुम बस मन लगा के गाना । राधेश्यामके चरणोंमें तुम्हारी सेवा अर्पन करना ।" इत्यादी इत्यादी बोलून मला अगदी निरुत्तर करून सोडले. झाले! एका अपरिचित ठिकाणी, अपरिचित समूहाबरोबर, अपरिचित गाण्यांना गायचे मी कबूल करून बसले..... दुसऱ्या दिवशीपासून माझ्या एका अनोख्या व्रताचा आरंभ झाला.... येथील जेवण, खाणे अतिशय रुचकर होते, परंतु जड होते. तुपातील पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ खाण्याची सवय नसल्याने असे खाणे घशाशी येत असे. त्यात मी गायचे कबूल केल्यामुळे सगळीच पंचाईत! मग सकाळी माफक फलाहार करायचा, गंगेत डुबकी घ्यायची, खोलीवर येऊन आवरायचे व त्यानंतर भागवत कथा सप्ताह स्थळी जाऊन इतर वादकांबरोबर त्या त्या सत्रात म्हणावयाच्या भजनांची व आरत्यांची तालीम करायची.. अल्प वेळातच सत्र सुरू झाले की जागरूकतेने कथेचा आनंद लुटतानाच महाराजांच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवायचे, योग्य ठिकाणी गायचे, आरत्या म्हणायच्या असा कार्यक्रम सुरू झाला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात लोक हमखास डुलक्या काढायचे. पण मी भागवत कथा पहिल्यांदाच ऐकत होते. महाराजांची ओघवती, रसाळ वाणी, मनोरम हृदयस्पर्शी कथापट, कसलेल्या वादकांची प्रोत्साहक साथ आणि शेवटच्या कर्पूरारतीत रोमांरोमांत जाणवणारे चैतन्य..... भक्ती, भक्ती म्हणतात ती हीच काय? तासनतास एकाच ठिकाणी बसल्यावरही पाठीला रग न लागणे, थकावट न जाणवणे, चित्तवृत्ती आल्हादित राहणे, कथेत इतके गुंगून जाणे की वेळेचेही भान न उरणे.... मला खूप मजा येत होती. सकाळ सायंकाळ गंगेचे दर्शन, गंगास्नान, गंगारतीचा सोहोळा अशी पर्वणी मिळत होती. जवळपास खूप सुंदर देवळे होती, तिथेही गेल्यावर उल्हसित वाटत असे. आणि गाण्याच्या ह्या अनपेक्षित संधीमुळे माझा रोजचा आहार अगदीच मित झाला होता. दुपारी व सायंकाळी घासभर ताकभात खायचा (फक्त त्याच एका पदार्थात साजूक तूप नसायचे! ) आणि इतर लोकांना अक्षरशः छप्पनभोगांवर ताव मारताना निरिच्छ वृत्तीने पाहायचे हाच माझा खाण्यापिण्याशी त्या दहा दिवसांत आलेला संबंध! नाही म्हणायला एके सायंकाळी आम्ही समोरच्या विशाल निसर्गरम्य क्षेत्र व्यापलेल्या हनुमानाच्या सुंदर मंदिरात गेल्यावर तेथील मुख्य पुजाऱ्यांनी प्रसादाचा खिचडी व शिऱ्याचा द्रोण हातात ठेवला.... प्रसादच तो! त्यामुळे तो खाल्ल्यावर घसा व पोट दोन्ही शांत राहिले. एक दिवस आमच्याबरोबर पुण्याहून आलेल्यांपैकी एकाने हार की पोडीवरील विशिष्ट ठिकाणी मिळणाऱ्या चाट-कचोरी-पकोड्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. (म्हणजे हे महाशय रोज आमच्याबरोबर सकाळ-सायंकाळ भोजनशाळेत जेवून पुन्हा खवय्येगिरी करायला भ्रमंती करत होते तर! ) साहजिकच मनात ते ते पदार्थ चाखण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या ठिकाणी जाऊन एका पदार्थाची ऑर्डर दिली... म्हटले बघू या, जर चव आवडली तर पुढची ऑर्डर देऊ. पण हाय! येथेही मला आडवे आले 'सरसोंचे तेल'! तेथील सर्व व्यंजने एकतर सरसोंच्या तेलात किंवा साजूक तुपात तळली जात होती. पहिल्या घासालाच माझा चेहरा बघण्यासारखा झाला आणि बहुधा हा सप्ताह पूर्ण होईपर्यंत आपली 'ताकभात व्रता'तून सुटका नाही ह्याची खात्री पटली. आहाराची किरकोळ बाब सोडली तर मला खूप मजा येत होती. रोजची कथा संपल्यावर पुढच्या कथेची उत्सुकता लागत असे. नव्या नव्या चालींची, ब्रज शैलीची, त्या त्या उच्चारांसहित भजने गाताना ही मजा येत असे. कधी मी थोडी चुकले तरी महाराज व श्रोते सावरून घेत असत. नंतर दोन दिवस अचानक महाराजांचा आवाज बसला. त्याही परिस्थितीत ते मोठ्या कष्टाने, संयमाने व धीराने कथा सांगत होते. माझ्यावरची गाण्याची जबाबदारी अजूनच वाढली होती. दुसरीकडे त्यांच्या मुख्य गायकाचा गावाहून निरोप आला होता की तो काही गाड्यांच्या गर्दीमुळे येऊ शकत नाही. आमच्या यजमानीण बाई माझ्यावर विलक्षण खूश होत्या. त्या व त्यांच्या परिवारातील इतर लोक येऊन माझ्या गाण्याची, अडचणीच्या वेळी मदत करण्याची स्तुती करून मला संकोचून टाकत असत. खरे तर मी वेगळे काहीच करत नव्हते! पण त्या लोकांना त्याचे अतिशय अप्रूप वाटत होते हेच खरे! बघता बघता दहा दिवस भुर्रकन उडून गेले. कथा मोठ्या जल्लोषात, उत्सवात समाप्त झाली. त्या रात्री आयोजित केलेला भोजन समारंभ आतापर्यंतच्या भोजनांना लाजवेल एवढा जंगी, शाही होता. मी अर्थातच ताकभाताच्या डायटवर होते! दुसऱ्या दिवशी सर्व लोकांनी आपला मुक्काम हालविला. आम्हीही साश्रू नयनांनी गंगामाईचा निरोप घेतला. तिच्याकडे पुन्हा लवकर बोलाव म्हणून प्रार्थना केली आणि निघालो. येताना आम्ही वेगवेगळे झालो होतो, कारण अनेकांचे पुढे इतर प्रवासाचे बेत होते. यजमान परिवार मागील सर्व आवरासवर करायला हरिद्वारलाच थांबले होते. ह्या खेपेस आमचा परतीचा प्रवास अतिशय शांत पार पडला. घरी पोचलो, अंघोळी उरकल्या, आवरले. बहिणीने जेवणाची ताटे घेतली होती. पानात वरणभात पाहून मला काय आनंद झाला ते वर्णन करणे कठीण आहे! गेले दहा दिवस सकाळ सायंकाळ दालबाटी, मालपुवा, छोले, कचोरी, समोसे, ढोकळे, गट्ट्याची भाजी, फाफडा, खाकरा, पकौडी वगैरे पदार्थ आणि मिष्टान्नांचे हारेच्या हारे पाहून थकलेल्या माझ्या मनाला व जिभेला घरच्या वरणभाताने जणू नवसंजीवनी मिळाली! ती सहल कायम स्मरणात राहील ती अविस्मरणीय अशा भागवत कथेच्या अनुभवाने, गंगेच्या मनोहारी सहवासाने आणि न भूतो न भविष्यति अशा अन्नवर्षावामुळे! आज ह्या घटनेला अनेक वर्षे लोटली. आमच्या यजमानांनी उदार पाहुणचार हा काय असतो हे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आणि परमेश्वराने गंगेच्या तीरी भागवत कथेचे अविस्मरणीय श्रवण करताना मला अनोख्या अशा कृष्णप्रिय 'ताकभात' व्रताची ओळख करून दिली!!
--- अरुंधती

Monday, January 04, 2010

नक्को नक्को रे!


"केतन, नाकात बोटं नको घालू.... "

"केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का? थोडा वेळ ऐकल्याचे दाखवतील कदाचित! पण जरा तुमचे लक्ष दुसरीकडे वळले की पुन्हा आपले ह्यांचे उद्योग सुरुच! मग तरीही आपण त्यांना सारखे सारखे का हटकत राहतो? त्या ऐवजी त्याला एखाद्या खेळात, गाण्यात गुंतवता आले तर? उदाहरणार्थ, तिथे ती माता तिच्या मुलाचे लक्ष रस्त्यावरच्या विविध गोष्टींकडे वेधू शकली असती.... जसे, तुला रस्त्यात किती दिव्याचे खांब दिसतात? आपण रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा मोजूयात. किंवा समोरच्या फळवाल्याकडे कोणती फळे दिसत आहेत रे? इत्यादी इत्यादी. आपण मुलांशी अनेकदा संवाद साधायचे विसरून जातो. आणि ती बोअर झाल्यावर जे काही करतात त्यावर नकारात्मक शेरे ओढत राहातो. माझ्या मैत्रिणींच्या, परिचितांच्या अनेक मुलांमध्ये मी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली आहे. मोठ्यांना जेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते, ते आपल्या गप्पा-कार्यक्रमांत मश्गुल असतात तेव्हा ही मुले आपल्या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायला असेच काहीबाही उद्योग करत असतात. कधी पाणीच सांडून ठेव, कधी पसारा कर, कधी कोणा दुसऱ्या पोराला त्रास दे, कधी मांजरीची शेपटीच ओढ.... त्यात त्या मुलांचा तरी काय दोष असतो म्हणा! त्यांना तुम्हाला काही तरी इंटरेस्टिंग दाखवायचे असते.... अगदी रस्त्यात पडलेल्या चॉकलेटच्या चांदीपासून ते त्यांच्या मोज्याला पडलेल्या भोकापर्यंत! पण आपल्यालाच त्यांच्याकडे पहायला वेळ नसतो. रोजच्या रामरगाड्यात दमछाक होईपर्यंत धावताना त्यांच्या चिमुकल्या विश्वाचा आपल्यालाच अनेकदा विसर पडतो. ती मात्र सदैव आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जायला उत्सुक असतात. आपल्यालाच त्यांच्या विश्वात डोकावायची सवड नसते. आणि त्यातून कित्येक वेळा आपला धीर संपुष्टात येतो.... एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची बस आली. केतनचे बखोट पकडून केतनची आई बसमध्ये चढली. चढतानाही सूचनांचा सपाटा आणि तोंडाचा पट्टा चालूच होता. "नीट चढ. तिथे हात लावू नकोस - हात खराब होतील. पुढे धावू नकोस. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. तोंडात बोटं घालू नकोस.... " नकोस, नकोस, नकोस आणि पुन्हा नकोस! मान्य आहे, सर्व काही त्याच्याच भल्यासाठी आहे. पण सारखा 'नको' चा पाढा लावणे टाळून हेच वेगळ्या पद्धतीने समजावता आले असते. आजकालच्या पद्धतीप्रमाणे पालक हल्ली एकाच मुलाला जन्म देणे पसंत करतात....त्याच्यावर सर्व वस्तूंचा वर्षाव करतात, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवितात आणि मग त्याचबरोबर त्या मुलाची प्रत्येक कृती स्कॅनरखाली येते. त्यातून असा 'ना' चा पाढा असेल तर अजूनच आनंद! चिमुकला केतन थोड्याच वेळात बसच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहत रमून गेला व त्याच्या आईने हुश्श करीत आपले लक्ष इतरत्र वळवले. आता पुरता तरी तो स्थिरावला होता. सगळीकडे टकामका डोळ्यांनी पाहत होता. पण त्याची ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. हे बहुधा त्याच्या आईला देखील माहित असावे. म्हणूनच ती डोके मागे टेकवून, डोळे मिटून थकलेल्या बॅटरीज रीचार्ज करत असावी. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक उंट जाताना केतनला दिसला. तो लगेच, "मम्मा, उंट बघ" म्हणून किंचाळत खिडकीतून हात बाहेर काढू लागला. "केतन, किती वेळा सांगितलंय असला वेडेपणा करायचा नाही म्हणून! आधी हात आत घे.... पुन्हा हात बाहेर काढायचा नाही.... आणि असा उसळ्या मारू नकोस रे, माझा ड्रेस खराब होतोय.... " तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला. मायलेक दोघेही खाली उतरले.... लेक आईच्या हाताला लोंबकळत होता. "अरे, असा लोंबकळू नको रे.... " बसचा थांबा आला, प्रवास संपला पण केतनच्या आईचा 'नको' प्रवास अद्याप जारीच होता.....
--- अरुंधती.

Friday, January 01, 2010

चुटपुटसुंदरी


आमच्या त्या मैत्रिणीला सर्व ग्रुपने ते एक सांकेतिक नावच पाडलंय..... "चुटपुटसुंदरी". आता तुम्ही म्हणाल, हा काय सौंदर्याचा निकष झाला का? पण आमची ही मैत्रीण तिच्या चुटपुटण्याच्या ह्या अनोख्या गुणामुळेच आमच्या ग्रुपमध्ये स्वतःची अशी खास ओळख बाळगून आहे. कोठेही जा, कधीही बघा, ही आपली कसल्या ना कसल्या गोष्टीबद्दल चुटपुटत असते. कधी ती सीरियल मधील रमाच्या पात्राबद्दल चुटपुटते तर कधी कोथिंबीर स्वस्त असतानाच का नाही भरपूर खरेदी केली - जेणेकरून सर्वांना कोथिंबीरवड्या बनवून खिलवता आल्या असत्या ह्याबद्दल चुटपुटलेली असते. कधी त्या सान्यांच्या वैशालीला तिथल्या तिथे खरमरीत उत्तर का नाही दिले म्हणून आमची मैत्रीण अस्वस्थ असते तर कधी सेलमधून आणलेली साडी चांगली नाही लागली म्हणून तिचे मन खंतावलेले असते. तिच्या ह्या चुटपुटीला कंटाळून घरच्यांनी तिचा नादच सोडलाय.... पण आम्ही पडलो मैत्रिणी... त्या ही हक्काच्या! त्यामुळे वेळोवेळी तिला दोन बोल सुनावून तिच्या चुटपुटीतून तिला बाहेर आणण्या पलीकडे काहीच करू शकत नाही. आता परवाचीच गोष्ट घ्या ना! तिच्या सासूबाईंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम होता. आमच्या मैत्रिणीने कसून मोठ्या कौतुकाने सर्व सोहोळ्याची तयारी केली होती. तिच्या काटेकोर नियोजनाप्रमाणे सोहोळा उत्तम पार पडला. निमंत्रितांची जेवणे आटोपली. पण ठरविल्याप्रमाणे त्यांना घरी विडा बनवून देण्या ऐवजी बाहेरून विडे मागवावे लागले ह्याचे आमच्या बाईसाहेबांना काय ते शल्य लागून राहिले! खरे तर कोणालाच एवढ्या छोट्याशा गोष्टीचे तितकेसे महत्त्व वाटले नाही. कारण सर्व समारंभ उत्कृष्ट झाला होता, जे जे ठरविले होते ते ते सर्व पार पडले होते. अशा वेळी आपला आनंद इतक्या लहानशा गोष्टीने का कमी करायचा? पण आमची चुटपुटसुंदरी हा sss चेहरा लांब करून बसली. शेवटी नवऱ्याला राहवले नाही. तो एकदाचा खेकसला! मग झाssले! अश्रूंचा महापूर लोटला. दुसऱ्या दिवशी मैत्रिणींना फोन करून सर्व दुःखी गाथा ऐकवून झाली. अर्थात प्रत्येकीला व्यवस्थित कल्पना असल्याने माहीत होते की आपल्या कितीही समजविण्याने हिच्यावर परिणाम होणार नाही! ह्यावर आम्हाला माहीत असलेला एकच जालीम उपाय! तिचे लक्ष दुसरीकडे वळविणे!! बऱ्याच दिवसांत एकत्र भेटलो नव्हतो, म्हटलं प्रोग्रॅम बनवूयात. आमची सुंदरी लगेच टवटवली. तिचे जोरदार प्लॅनिंग सुरू झाले. बघता बघता बाईसाहेबांचा मूड ठीक झाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.
खरेच, काही काही लोक त्यांनी योजल्याप्रमाणे एखादी गोष्ट तंतोतंत नाही झाली तर एवढे का दुःखी होतात? त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे इतके मोठे शल्य का लागून राहते? परिस्थिती, मानवी हस्तक्षेप, इतर घटकांनी कधीही, कोणतीही गोष्ट आपल्या यशापयशाचे समीकरण बदलू शकते. आपल्याला जसे हवे तसे घडले नाही म्हणून निराश होणे, खंत करीत राहणे हे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायी ठरू शकते! ठीक आहे! नाही घडलं तुमच्या मनासारखं! पण म्हणून किती काळ तेच ते उगाळत राहणार? किती वेळ त्यात दवडणार? त्यातून बाहेर येण्यात एवढे कष्ट का पडतात? आणि ज्यांना अशा प्रकारे सारखे सारखे चुटपुटण्याची सवय असते त्यांना पुढे पुढे इतरांची सहानुभूती मिळणे देखील बंद होते. कारण काळ हा पुढे धावत असतो. तुम्ही जर वारंवार झालेल्या घटनेलाच चिकटून बसू राहू लागलात तर काळ व लोक तुम्हाला मागे टाकून पुढे जातात. आणि मग भविष्यात कधीतरी तुम्हाला 'एवढा वेळ चुटपुटण्यात घालविला त्या ऐवजी वेगळ्या गोष्टीत घालविला असता तर बरे झाले असते' असे चुटपुटण्याची वेळ येते! आमच्या चुटपुटसुंदरीसारखे अनेक लोक भवताली दिसतात. सारे काही चांगले, सुरळीत घडत असताना देखील त्यांना एखाद्या होऊ न शकलेल्या गोष्टीची रुखरुख लागलेली असते. त्या सर्वांना आणि आमच्या चुटपुटसुंदरीला सांगावेसे वाटते, "जरा जागे होऊन आजूबाजूला बघा तरी! सगळे किती आनंदात आहेत. तुम्ही पण आनंदी व्हा. इतरांना आनंद द्या! जे नाही झाले, ते नाही झाले... त्याने खंतावून जाण्यापेक्षा जे होत आहे, घडत आहे, त्याचा आनंद घ्या.' असे एक जरी चुटपुटकुमार वा चुटपुटसुंदरी ह्या लेखाने वेगळा विचार करू लागले तरी ह्या लेखाचे सार्थक झाले!
--- अरुंधती.

असा कसा हा पेपरवाला!

आम्ही या नव्या भागात राहायला आलो त्यासरशी आमच्या शेजारच्या आजीबाईंनी दुसऱ्याच दिवशी दार ठोठावले. पाठीची पार धनुकली झालेली, अंगावर सुरकुत्यांचे जाळे, डोईवर पदर अशा त्या नऊवारी नेसलेल्या आजीबाई दारातूनच म्हणाल्या, "तुमाला पेपर लावायचा आसंल तर माज्याकडनं घ्यावा. माझी एजन्सी हाय. " त्यांच्याकडे काही क्षण थक्क होऊन पाहिल्यावर आमच्या मातुःश्रींनी भारल्यागत होकारार्थी मुंडी हलविली आणि म्हातारबाईंच्या पेपर एजन्सीचा माणूस रोज दारात पेपर टाकू लागला. बघता बघता वर्ष लोटले. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की ह्या भागात, खास करून आम्ही जिथे राहतो त्या गल्लीत असे अनेकजण पेपर एजन्सी चालवितात. आमच्या इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत भल्या पहाटे वर्तमानपत्रांचा टेम्पो दे दणाद्दण वर्तमानपत्रांचे गठ्ठे टाकून जातो. मग पहाटे चार वाजल्यापासून सॉर्टर्स येऊन त्यांचे वर्गीकरण करतात. साडेपाच-सहा च्या दरम्यान पेपर टाकणारी मुले आपापल्या सायकल्स, बाईक वरून ही वर्तमानपत्रे घरोघरी टाकायला घेऊन जातात. हे काम एवढे शिस्तीत चालते की गल्लीच्या कुत्र्यांना पण ह्या लोकांची सवय झाली आहे. तर अशा परिस्थितीत आम्हाला अगदी घरबसल्या विविध पेपरवाल्यांचा सहवास मिळत होता. दररोज पहाटे साखरझोपेची दुलई बाजूला सारून नित्यकर्माला लागण्यासाठी ह्या पेपरवाल्यांच्या आवाजाचा, त्यांच्या गप्पांचा , त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचा फार फायदा होई. आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात त्यांच्यापैकी कोणी शिंकले तरी खणखणीतपणे ऐकू येई. आजीबाई सर्व पेपरवाल्यांची वर्दळ संपली की इमारतीच्या दारातच सकाळची कोवळी उन्हे खात एका तरटावर बसून पेपर विकायला सज्ज होत असत. शिवाय त्यांची नजर चौफेर असे.... त्यामुळे कोठे काय चालले आहे ह्याची बऱ्यापैकी खबर त्यांना लागलेली असे. एक दिवस आजीबाई अचानक आजारी पडल्या. एक-दोन महिन्याचे हॉस्पिटलाचे दुखणे झाले आणि आजीबाईंची प्राणज्योत मावळली. त्यांच्या घरच्यांनी पेपर एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरेच दिवशी आमच्याकडे अजून एक पेपर एजंट आला. (ह्या एजंटांना कसा सगळा पत्ता लागायचा कोणास ठाऊक! ) चांगल्या झुबकेदार मिशा, कपाळाला टिळा, अंगात शर्ट -पँट, काखोटीला चामड्याची बॅग, पायात वहाणा अशा वेषातला हा एजंट बोलण्यावरून शिकलेला वाटला. झाले! त्याने दुसऱ्या दिवशीपासून पेपर टाकायचे ठरले. त्याच्या भेटीत त्याने सांगितले होते की तो रीयल इस्टेट एजंटपण आहे, दुधाचा ही धंदा आहे इत्यादी इत्यादी. खरे तर आपल्या पेपरवाल्याची कोण एवढी चौकशी करतो! पण त्याने आपण होऊनच ही माहिती दिली. त्या नंतर सुरू झाला एक मजेदार अनुभव! आमच्या मातुःश्रींचे व पेपर टाकायला येणाऱ्या मुलाचे वारंवार खटके उडू लागले. कधी तो दाराच्या बाहेर कोणीही उचलून न्यावा अशा पद्धतीने पेपर टाकत असे तर कधी त्याला उशीर होत असे. मातृदैवताला सकाळी साडेसातच्या आत वर्तमानपत्र वाचण्याची सवय असल्याने तिला हा उशीर जराही खपत नसे. मग काय! आई तो यायच्या वेळेला दबा धरूनच बसत असे आणि तो अवतरला की त्यांची किरकोळ हुज्जत रंगत असे. मग एक दिवस कंटाळून आईने त्या पेपर एजंटचा फोन नंबर धुंडाळून थेट त्याच्याकडेच तक्रार केली. दुसऱ्या दिवसापासून आमचा पेपर वेळेत येऊ लागला, दारात लोळत पडण्या ऐवजी कडी-कोयंड्यात खोचला जाऊ लागला. पण मग त्या महिन्यापासून पेपरचे बिल येणेच बंद झाले. आमच्या पांढरपेशा मनांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती. अशी उधारी ठेवायची म्हणजे काय! आपल्याला अशा गोष्टी जमत नाहीत आणि ती वस्तुस्थिती आहे! अखेर रात्रीच्या निवांत झोपेचा प्रश्न आहे, राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते. तर अशा आमच्या ह्या वर्तमानपत्राचे बिल घेण्यास उदासीन पेपर-एजंटला आईने अनेक निरोप धाडले, फोन केले. त्याचे उत्तर ठरलेले, "ताई, काय घाई आहे! घेऊ की निवांत बिल, कुठं पळून का जातंय... " त्याच्या अशा उत्तरांनी आम्ही अजूनच अस्वस्थ होऊ लागलो. दरम्यान येथील रीयल इस्टेट वाल्यांचे राजकारणी व गुंडांशी असलेले संबंध कोणीतरी मोठ्या अक्कलहुशारीने आमच्या कानी घातले होते. मग तर काय! आम्हाला दरदरून घाम फुटायचाच काय तो शिल्लक राहिला. न जाणो हा पेपर एजंट कोणत्या गँगचा माणूस असला तर? तो उद्या-परवा कर्जवसुलीसारखी दारात माणसे घेऊन उभा ठाकला तर? निरनिराळ्या हिंदी पिक्चर्समधील असे गावठी गुंड, त्यांची दहशत वगैरे सीन्स आमच्या चक्षूंसमोर तरळू लागले. घरापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर एक खाटिकखाना आहे. तिथे घेऊन जाणाऱ्या बकऱ्या, बोकडांमध्ये आम्हाला आमचे चेहरे दिसू लागले. शेवटी आम्ही गृह-सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.... पेपरवाला बदलायचा.... आमच्याकडे पेपर टाकणाऱ्या पोराकडे निरोप दिला. तो तर हसायलाच लागला. झाले! आमच्या छातीचे ठोके चुकले. दुसऱ्याच दिवशी त्या पेपर एजंटचा फोन आला.... "ताई, काय नाराज आहात का आमच्यावर? जाऊ की घेऊन बिलाचे पैसे निवांत! तुम्ही नका काळजी करू!" (त्याने सबंध वर्ष बिलाचे पैसे घेतले नव्हते!)

पण आमचा निर्णय ठाम होता. एकतर बिलाचे पैसे घे, नाहीतर पेपर टाकणे बंद कर. आम्ही दुसरा पेपरवाला शोधतो. काहीसे कुरकुरतच त्याने फोन ठेवून दिला. पुढचे दोन दिवस पेपर आला नाही. एरवी सकाळी सकाळी पेपर दृष्टीस पडला नाही की अस्वस्थ होणारी आमची आई कधी नव्हे ते पेपर आला नाही म्हणून आनंदात होती! दोन दिवसांनी शेजारील फ्लॅटमध्ये पेपर टाकणाऱ्या नव्या पेपर-एजंटला सांगून पुन्हा आमच्याकडे पेपर सुरू झाला. त्या आधीच्या पेपरवाल्याने अजूनही बिल दिले नव्हते व बिलाचे पैसेही नेले नव्हते. वाटले, लवकरच तो बिलासकट हजर होईल. पण छे! तिसऱ्या दिवशी त्याच्या पेपर टाकणाऱ्या मुलाने आधीप्रमाणे पुन्हा आमच्याकडे पेपर टाकायला सुरुवात केली. जणू काही मधल्या काळात काहीच घडले नव्हते! आता मात्र अती झाले होते. एकाच वेळी घरात दोन-दोन पेपर एजंट कडून पेपर येत होते! पुन्हा एकदा आमची गोलमेज बैठक झाली. दुसऱ्या दिवशी आई पेपरवाल्याच्या प्रतीक्षेत दबाच धरून बसली. तो आल्यासरशी त्याला 'का टाकतोस आता पेपर? ' म्हणून फैलावर घेण्यात आले. त्यावर तो मुंडी हालवत, हसत 'तुम्ही आमच्या मालकांनाच विचारा' असे म्हणून खांदे उडवित निघून गेला....!!!!! मालक अर्थातच फोनवर उपलब्ध झाले नाहीत! आता रोज आम्ही दोन-दोन पेपर्स चा संशयी मनाने आनंद लुटतो. कदाचित आमचा आधीचा पेपर एजंट येईल, बिलाचे पैसे घेईल, कदाचित घेणारही नाही. आमच्या दमल्या थकल्या मनांनी त्याच्या वागण्याचे कोडे उलगडविण्याचे तूर्तास रहित केले आहे. रात्री झोपेत पेपरच्या गठ्ठ्यांखाली आपण गुदमरत आहोत असले काही स्वप्न पडल्यास आम्ही त्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करतो. कसली वर्गणी मागायला कोणती तरुण मंडळे आली की 'आली आपल्या पेपर एजंटची माणसं! ' असा डरपोक विचार आम्ही अजिब्बात म्हणजे अजिब्बात करत नाही. त्यांना जुजबी पैसे देऊन वाटेला लावतो. वेळप्रसंगी घरात कोणीच नसल्याचा बहाणा करतो. आणि रोज देवाकडे आमच्यासारखा उदार, कनवाळू पेपर एजंट इतर कोणालाही न मिळो म्हणून कळकळीने प्रार्थना करतो. न जाणो देव ऐकेल आणि पुन्हा एकदा आमच्या राज्यात सर्व काही आलबेल होऊन आम्ही सुखाने झोपू लागू!
--- अरुंधती.

Friday, December 04, 2009

असे जाहले सुलेखन!


दाराची बेल वाजली, दार उघडले तर शेजारच्या जोशीकाकू उभ्या होत्या. त्यांना कसलासा पत्ता हवा होता. एका कागदाच्या चिटकुर्‍यावर तो पत्ता मी घाईघाईने लिहून दिला. सहजच त्यांची नजर माझ्या हस्ताक्षराकडे गेली व त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार निघाले, "काय सुंदर हस्ताक्षर आहे हो! अगदी मोत्यासारखं... आमच्या मीताला शिकवा ना जरा... तिच्या बाई तक्रार करत होत्या तिच्या हस्ताक्षराबद्दल!" मी काकूंना मीताला तिच्या हस्ताक्षराबाबत मदत करायचे आश्वासन दिले खरे, पण त्यांनी केलेल्या कौतुकाने ह्या बोटांना ज्या ज्या लोकांनी उत्तम वळणाचे, शिस्तीचे आणि सौन्दर्याचे 'अक्षर'दान दिले त्यांच्या त्या अथक प्रोत्साहनाला मनाने उत्स्फूर्त अभिवादन केले.

असे म्हणतात की घरातील वातावरणाचा परिणाम घरातील लहान मुलांवर होत असतो. भाग्य म्हणजे आमच्या घरात आजी-आजोबा दोघेही सुशिक्षित होते. आजोबा ब्रिटिश साहेबाच्या हाताखाली मिलिटरीमध्ये हिशेबनीस होते. त्यांचे हस्ताक्षर मोडीच्या वळणाचे, तिरपे पण सुवाच्य होते. त्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी पुठ्ठ्यावर कागद चिकटवून त्यांवर विविध श्लोक, आरत्या, सुविचार, स्तोत्रे, वंशावळ लिहून घरात तक्त्याप्रमाणे टांगले होते. जाता-येता त्यांवर नजर पडत असे. दत्ताची आरती, स्नानाचे वेळी म्हणावयाचे श्लोक, मानसपूजा आणि अजून बरेच काही....शिवाय रोज ते आपल्या दिनक्रमातून वेळ काढून त्यांच्या खास डायरीत दैनंदिनी लिहायचे.... त्यांना असे एकाग्र होऊन, डोळ्यावरचा चष्मा सावरत, एक हाती लिखाण करताना पाहिल्याचे मला अजून स्मरते आहे. ते लिहायचे ते देखील त्यांच्या एका ठराविक, ठेवणीतील फाऊंटन पेन ने! त्या पेनची अगदी एखाद्या मौल्यवान चीजवस्तूप्रमाणे काळजी घ्यायचे ते! पेनात शाई भरणे, त्याच्या नीब मध्ये साचलेला कचरा साफसूफ करणे, आधीचे नीब खराब झाल्यावर नवे नीब बसविणे हे सगळे अगदी समारंभपूर्वक व्हायचे! मग त्यात जराही व्यत्यय आलेला त्यांना खपत नसे. शिवाय म्हणायचे, "ह्या लेखणीनेच माझ्या कुटुंबाचे पोट भरले. ती सरस्वती आहे. तिची नीटच काळजी घ्यायला पाहिजे!" आजीचा पिंड शिक्षिकेचा. उभी हयात तिने प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करणे व शिकवण्या घेणे ह्यांत घालवली. आपल्या गोलसर, वळणदार अक्षरांत तिच्या एका खास वहीत ती बालगीते, कविता, कोडी, कूटप्रश्न, उखाणे इत्यादी लिहून ठेवायची. त्यातील गाणी तिच्या गोड किनर्‍या आवाजात म्हणून दाखविताना आमच्यासमोर तिची वही ठेवायची. "बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून" पासून ते "किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्ही सांजा, अजून कसे येती ना परधान्या राजा..." अशी कैक अवीट गोडीची गाणी तिच्या त्या जादुई वहीत तिने टपोर्‍या अक्षरांत टिपून ठेवली होती. आम्हीपण तिच्या बरोबर ती गाणी म्हणायचा प्रयत्न करीत असू. ती कधी आम्हाला बागेत, मैदानात खेळायला घेऊन जायची तेव्हा तिच्याबरोबर काठीच्या, काड्यांच्या सहाय्याने मातीत गिरगिटलेली धुळाक्षरेही चांगलीच आठवतात. त्या दोघांमुळे चांगल्या अक्षराचे संस्कार बालवयापासून मनावर झाले.
आई - वडिलांचे अक्षरही देखणे, गोमटे होते. नकळत आपले अक्षरही त्यांच्याइतकेच चांगले झाले पाहिजे हा विचार मनात पक्का होत गेला. जेव्हा जेव्हा नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या सुंदर अक्षराची वाखाणणी करीत तेव्हा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आम्हां मुलांना त्या अक्षराचा वारसा पुढे नेण्याची आठवण करून देत. मग आमची काय बिशाद खराब अक्षर काढण्याची? पाटीवर, फळ्यावर आणि कोणी पाहत नसताना घरातील दारांवर, भिंतींवरही आम्ही सुलेखनाचे धडे गिरवत असू! वेळप्रसंगी एखादा धपाटा मिळे, पण घरातील भिंतींच्या जमीनीलगतच्या भागावर जाणीवपूर्वक आमच्या लेखन-सहाय्यासाठी ऑईलपेन्ट देण्यात येई. सरावासाठी गुंडाळी फळा आणून त्याला भिंतीवर मानाचे स्थान दिले जाई. त्यातही एक प्रकारचे सुप्त कौतुक असे. कधी कधी घरी आलेल्या पाहुण्यांना हळूच आमचे वह्या, फळे, भिंतींवरचे हस्तकौशल्य दाखविले जाई.

शाळेत हस्ताक्षर - सुलेखनाचा तास सक्तीचा असायचा. अक्षर-लेखनासाठी वेगळ्या वह्या पुस्तके असायची. त्या वहीला आम्ही पुस्ती म्हणत असू. आमच्या शिक्षिकाही तळमळीने, जीव ओतून शिकवायच्या, प्रोत्साहन द्यायच्या. सुलेखन-पुस्तिकेबरोबरच बोरूनेही लिखाणाचा सराव घेतला जायचा. बोरूला तासायचे, टोक करायचे, शाईच्या दौतीत बुडवून वळणदार अक्षर काढायचे - त्यातल्या त्यात काना, मात्रा, वेलांट्या, आकार, उकार सुबक देखणे कसे आकारतील याकडे श्वास रोधून लक्ष दिले जायचे. या सर्वांत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. अक्षरलिखाणात गुंग झाल्यावर कधी हळूच जिभलीचे टोक बाहेर येऊन नाकाच्या अग्राला स्पर्श करायचे तेही कळायचे नाही.
प्रत्येक वही मोत्यासारख्या अक्षरांनी सजलेली पाहताना मनात गुदगुल्या व्हायच्या. आपलीच पाठ आपण थोपटावी असे वाटून जायचे. त्याला अपवाद मात्र गणिताच्या वह्या! इथे तेवढी आकड्यांची खाडाखोड, फुल्या, उलट्या-सुलट्या बाणांची रांगोळी असायची.
चांगल्या हस्ताक्षराचा फायदा असायचा तसाच तोटाही! शाळेत निबंध, भाषेच्या विषयांत उत्तम हस्ताक्षराबद्दल हटकून अधिक गुण मिळायचे, त्याचबरोबर गणित-शास्त्र-भूगोलांच्या उत्तरपत्रिकेत थापाथापी केली असेल तर लीलया पकडली जायची. मैत्रिणीची गृहपाठाची वही आपली म्हणून पुढे करता यायची नाही आणि मैत्रिणीलाही बिकट प्रसंगात आपली वही तिची म्हणून पुढे करणे दुरापास्त होऊन बसायचे! वरच्या वर्गांतील उत्तम हस्ताक्षराच्या, चांगल्या गुणांच्या वह्या पिढीजात वारशाप्रमाणे आमच्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श बाळगून आम्ही आपापले लिखाण सुधारावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात असे.
कधी शाळेच्या बाहेरील किंवा दर्शनी भागांतील फळ्यांवर लिखाण करायला मिळत असे. त्या निमित्ताने कोणता तरी नावडता तास बुडविता आल्याचा आनंदच अधिक असे! प्रगतीपुस्तकावरील 'सुन्दर अक्षर' हा शेरा कॉलर ताठ करत असे, आणि वर्गाच्या हस्तलिखितासाठी पानेच्या पाने सुवाच्य, एकसारख्या अक्षरात लिहायला लागल्याने हाताची बोटे दुखून येत असत. परंतु तेच हस्तलिखित शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात जेव्हा मानाचे स्थान पटकावत असे व सगळेजण त्यातील हस्ताक्षराचे भरभरून कौतुक करत तेव्हा सारे श्रम सार्थकी लागल्याचा आनंद मिळत असे. चवथी व सातवीची स्कॉलरशिपची वर्षे वगळता उरलेल्या सर्व वर्षांमध्ये हे अक्षर चांगले राहिले. त्या वर्षांमध्ये मात्र भराभरा लिहिण्याच्या नादात 'अक्षराची पार वाट लावली आहे पोरीने' हे ऐकणेही अनुभवले.
शालेय वर्षांमध्ये शाईचे फाऊन्टन पेन वापरणे सक्तीचे असल्याने अक्षर आपोआप चांगले येई. पण कॉलेजमध्ये गेल्यावर बॉलपेन हाती आले आणि हस्ताक्षराचे मूळचे सौंदर्य कमी झाले. शिवाय आता अक्षरापेक्षा लिखित मजकुराला जास्त महत्त्व होते. तरीही अगदी बिघडून बिघडूनसुध्दा अक्षराचा घोटीवपणा, सुवाच्यता अबाधित राहिली.
कॉलेज संपल्यावर रोजच्या नियमित लिखाणाची सवयही संपुष्टात आली. गरजेप्रमाणे हातात पेन घेतले जात असे. मग संगणकाचे आगमन झाले. आता त्याच्यावरही लिखाण (टंकलेखन) करता येऊ लागले. पाहता पाहता वह्या-पेनांचा जमाना मागे पडला. आता तर कागदावर लिखाण करणे कमीच झाले आहे. शिवाय कागदनिर्मितीसाठी किती झाडे खर्ची पडतात हे वाचल्यावर पूर्वीसारखे कागदांचा फडशा पाडणे होत नाही. पूर्वी घरी रीमच्या रीम फूलस्केप कागद आणले तरी ते आठवड्यात संपायचे.... कारण घरातील सगळेच माना खाली घालून कुरूकुरू लिहिण्यात पटाईत! पण आता असे होणे नाही.... त्या ऐवजी आम्ही नित्यनियमाने, प्रामाणिकपणे संगणकाच्या कळफलकाला वेठीला धरत असतो.
तरीही आज कोणी हस्ताक्षराची स्तुती केली की नकळत मन सुखावते. शुभेच्छापत्रांत, गिफ्टवरील लेबलवर मजकूर लिहिताना आपोआप डौलदार अक्षरांची माला आकार घेते. चुकूनमाकून कोणाला पत्र पाठवायचे झाल्यास आपल्याच हातातून कागदावर उमटलेल्या अक्षरांची दृष्ट काढावीशी वाटते!
परवा इमारतीतून खाली उतरत असताना देशमुख काकू त्यांच्या चार वर्षांच्या नातवावर कडाडताना दिसल्या. विचारले तर म्हणाल्या, "अहो, दोन महिनेपण झाले नाहीत नवा रंग देऊन! आणि ह्याने पहा भिंतींवर काय काय लिहून, गिरगिटून ठेवलंय माझं लक्ष नसताना...." मला क्षणभर भिंतींवरील आमच्या उभ्या-आडव्या-तिरप्या रेघांच्या गिरगिटीला, रेखाटनांना कणभरही नावे न ठेवता त्यांचे कौतुक करणारे, आम्हाला समजावून फळ्यावर लिहिण्यास प्रवृत्त करणारे आजी-आजोबा, आई-बाबा आठवले आणि मीदेखील हसून देशमुख काकूंना म्हणाले, "जाऊ द्या ना काकू, त्याला आजच एक मस्त फळा आणि खडू द्या आणून.... आणि बघा, तुमच्याकडे एक नवा अक्षरवीर जन्माला येईल."
--- अरुंधती

Thursday, November 26, 2009

द्रोण पत्रावळींच्या खादाड आठवणी


श्रावण-भाद्रपदाचे दिवस म्हणजे घरात विशेष पूजा, होम- हवन, धार्मिक कार्यांचे दिवस. ह्या कालाला त्यांमुळे एक वेगळाच सुगंध प्राप्त असतो. वेगवेगळी फुले, पत्री, पूजा द्रव्य, प्रसादाचे जेवण, होमाच्या धुरांचे वास स्मृतिपटलावर बहुधा कायमचे कोरून ठेवले गेलेत. निरनिराळ्या सणांच्या निमित्ताने घरात भरपूर पाहुणे जेवायला येणेही त्यातलेच! पण सध्याच्या 'फास्ट' जमान्यातील प्लास्टिक, स्टायरोफोम, फॉईलच्या ताटवाट्यांची तेव्हा डाळ शिजत नाही. आजही तिथे पत्रावळी, द्रोणच लागतात. मग भले पत्रावळीतून पातळ कालवणाचा ओहोळ जमिनीच्या दिशेने झेपावो की द्रोण कलंडू नये म्हणून त्याला पानातीलच अन्नपदार्थांचे टेकू द्यावयास लागोत! पत्रावळीतील जेवणाची मजाच न्यारी! निमित्त कोणते का असेना - अगदी पाणीकपातीपासून मोलकरणीच्या खाड्यापर्यंत! पत्रावळींचा बहुगुणी पर्याय गृहिणींचा लाडकाच!
पत्रावळींचेही कितीतरी प्रकार आहेत. त्या त्या प्रदेशात सहज मिळणाऱ्या पानांपासून पत्रावळी टाचायचे काम पूर्वी घरीच केले जायचे. पण शहरीकरणाबरोबर ह्या पत्रावळीही बाजारात आयत्या मिळू लागल्या. अर्थात म्हणून त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. कधी वडाच्या तर कधी पळसांच्या पानांची असते ही पत्रावळ. एकमेकांना काड्यांनी टाचलेली ही पाने जेवणात किती अनोखा स्वाद आणतात! अनेक बायाबापड्यांचे चंद्रमौळी संसार त्यांच्या आधारावर चालतात. पंक्तींच्या जेवणाचा अविभाज्य हिस्सा ठरलेल्या ह्या पर्यावरणपूरक (तेव्हा असे शब्दही माहीत नव्हते) पत्रावळी - द्रोण घरात कार्य निघाले की आम्ही मंडईच्या मागील बाजूला जाऊन शेकड्यात आणायचो! त्या पानांचा घमघमाटही खास असतो. अन्नाच्या स्वादात लीलया मिसळणारा आणि तरीही त्याची वेगळी ओळख कायम राखणारा.
कधी केळीच्या पानावर जेवलाय तुम्ही? हिरवेगार निमुळते पान, त्यांवर देखणा सजलेला पांढराशुभ्र वाफाळता भात - पिवळेधम्म वरण, भाजी, कोशिंबीर, चटण्या, मिष्टान्ने, पापड - कुरडया... सगळी मांडणी सुबक, नेटकी. अगदी चित्र काढावे तशी. केळीच्या पानावर जेवायचा योग तसा क्वचितच यायचा, पण जेव्हा यायचा तेव्हा त्या आकर्षक रंगसंगतीला पाहूनच निम्मे पोट भरत असे. पानात वाढणी करण्या अगोदर ते पान स्वच्छ धुवून घ्यायचाही एक सोहळा असायचा. हमखास घरातील वडीलधारी मंडळी त्या वेळी आजूबाजूला असायची. मग ते पान कसे स्वच्छ धुवायचे यावर सप्रात्यक्षिक निरूपण व्हायचे! जेवण संपल्यावरही आपले खरकटे पानात गोळा करून पान अर्धे दुमडून ठेवायचे, म्हणजे वाढपी मंडळींचा घोटाळा होत नाही, हेही ठासून सांगितले जायचे. पूर्वी घराजवळ गायीम्हशींचा एकतरी गोठा हमखास असायचा, किंवा रस्त्यातून गायीम्हशींना धुंडाळून धुंडाळून आम्ही मुले त्यांच्या पुढ्यात खरकट्या पत्रावळी ठेवत असू आणि त्या पत्रावळींमधील अन्न फस्त करीत असताना मोठ्या धैर्याने व प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांच्याशी बोलत असू. कोणत्याही सांडलवंडीची विशेष पर्वा न करता केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणावर ताव मारायचे स्वप्न काही वर्षांपूर्वी जेव्हा दक्षिण भारतात प्रवासाचा योग आला तेव्हा पूर्ण झाले. अनेक ठिकाणी केळीच्या पानावर उदार हस्ते वाढलेल्या सुग्रास व वैविध्यपूर्ण दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेता आला व ती सफर अजूनच संस्मरणीय झाली.
पानांवरून आठवले, कर्दळीच्या पानांनाही सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिऱ्याबरोबर मिळणारा मान आगळाच! गरम गरम शिऱ्याने कर्दळीचे पान काळवंडते खरे, पण त्या प्रसादाच्या शिऱ्याची रुची अजून वाढविते. पानग्यांना येणारा हळदीच्या पानांचा गंधही अविस्मरणीय! आमच्या लहानपणी माझी आई दर रविवारी सकाळी आम्हाला देवपिंपळाच्या लुसलुशीत हिरव्यागार पानावर गरमागरम तूपभात खायला घालत असे. भाताच्या उष्णतेने पिंपळपान अक्षरशः काळेठिक्कर पडत असे! पण त्या भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.
मागे एकदा धर्मस्थळनामक दक्षिणेतील पवित्र क्षेत्री मंजुनाथाच्या देवळातील प्रसादाचे भोजन घेतानाची आठवण! बसायला चटया होत्या आणि समोर पानाच्या जागीही चटयाच! स्वच्छ धुतलेल्या! जेव्हा त्यांच्यावर ठेवायला केळीची पाने आली तेव्हा माझा पुणेरी जीव भांड्यात पडला. तोवर मी 'आता चटईवर वाढतात की काय' ह्या शंकेने चिंतातुर झाले होते. त्या भोजनशाळेतील बाबागाडीवजा ढकलगाडीतून बादल्यांच्या माध्यमातून आमच्या पानांपर्यंत पोचलेल्या 'सारम भातम'ची आठवण मनात आजही ताजी आहे.
सुपारीच्या झाडापासून बनवलेल्या सुंदर गोमट्या पत्रावळी मी सर्वात प्रथम बंगलोरच्या एका ख्यातनाम आश्रमातील नवरात्रोत्सवात पाहिल्या. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तगणांच्या प्रसादव्यवस्थेसाठी अतिशय उत्कृष्ट! त्या वर्षी माझ्या सेवा टीमकडे पत्रावळींचे गठ्ठे खोलायचे व ओल्या अन कोरड्या फडक्याने त्यांना साफ करण्याचीच सेवा होती. असे किती गठ्ठे खोलले व पत्रावळी पुसल्या ते आता आठवत नाही. मात्र तेव्हा आमची सर्वांची बोटे पत्रावळी हाताळून काळी पडली होती एवढे खरे! सर्वात मजा परदेशी पाहुण्यांची - मोठ्या नवलाईने व कुतूहलाने ते हातात त्या पत्रावळी घेऊन त्यांना उलटून पालटून, निरखून आमच्याकडून त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते! पुढे पुढे तशा पत्रावळी व द्रोण आपल्याकडेही मिळू लागले. आता तर आपल्याकडे ह्या द्रोणांनी मानाचे स्थान पटकावले आहे. पूर्वी द्रोणातील कुल्फी, जांभळे फक्त लोणावळ्यातच मिळायची. द्रोणातील कुल्फी खाताना निम्मी भूमातेला व कपड्यांना दान व्हायची. तरीही त्या चिकट ओघळांची तमा न बाळगता सर्व बच्चेकंपनी द्रोणातल्या कुल्फीवर तुटून पडत असे. शहरांमधून द्रोणाला फक्त देवळांमधून मिळणारे प्रसाद व हलवायाच्या दुकानातील मिठाई-फरसाणातून मिरवता यायचे. पण आता तर भेळवाल्यांपासून चाट, पाणीपुरी, रगडा विकणारे 'पार्सल' साठी द्रोणाला पसंती देतात. इतकेच काय तर 'खैके पान बनारसवाला' वाले पानही द्रोणांतून मिळते. आपण 'विडा' खातोय की एखादी स्वीटडिश असा प्रश्न पडण्याइतपत मालमसाला त्यात ठासून भरलेला असतो.

द्रोणांचे तरी आकार किती असावेत! बनवणाऱ्याच्या मर्जीने व बनवून घेणाऱ्याच्या गरजेनुसार त्यांची आकृतीही बदलत जाते. उज्जैनला एका रम्य गारठलेल्या धुके भरल्या सकाळी हातगाडीवर घेतलेल्या उभट हिरव्या द्रोणातील 'पहुवा' (पोहे) व शुद्ध तुपातील गरम इम्रतीची आठवण अशीच कधी थंडीच्या दिवसांत हुरहूर लावते.
आयुष्यातील खाद्यप्रवासात आपल्या ह्या द्रोण पत्रावळींना नक्कीच कोठेतरी खास महत्त्व आहे. एरवी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही आणि सणासुदींच्या दिवसांत त्यांचे अस्तित्व उत्सवाला अजून रंगत आणते. बारशापासून सुतकापर्यंत साथ निभावणाऱ्या ह्या द्रोण पत्रावळींनी पुढील काळातही आपले अस्तित्व असेच जोपासावे व त्यांना भरभरून लोकाधार मिळावा हीच मंगलकामना!
--- अरुंधती

Friday, November 20, 2009

पावसात चिंब व्हावे



पावसात चिंब व्हावे 
वेध नभीचे लागावे 
अनंताच्या पसार्‍यात 
देवा तुझे गीत गावे ||

हिरव्याची नवलाई 
पर्णसंभारी फुलोनी 
उमलत्या कलिकांनी 
तुझ्या श्वासे बहरावे ||

माझ्या केतकी मनाला 
तुझे सुगंधाचे दान 
त्याच्या रोमांरोमांतून 
देवा घडो तुझे ध्यान ||

असा वर्षाव जो व्हावा 
देह आभाळीच ल्यावा 
माती मातींत सुगंधे 
त्याचा मुक्त शिडकावा ||
-- अरुंधती

Wednesday, November 18, 2009

सिंहगडावर चढाई! एक प्रत्यक्ष अनुभव!

आयुष्यात मराठी माणसाने एकदा तरी सिंहगड चढावा. हे माझे स्वाभिमानाचेच नव्हे तर स्वानुभवाचे बोल आहेत. खास करून आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर घाम गाळत, धापा टाकत, हाकारे पिटारे देत पायथ्यापासून गड चढण्यात जी काय मजा आहे ती अनुभवूनच पाहावी!

असेच आम्ही मित्रमैत्रिणी जूनच्या एका रविवारच्या भल्या सकाळी सारसबागेपाशी सिंहगडाकडे नेणाऱ्या एस. टी. च्या प्रतीक्षेत एकत्र जमलो होतो. एरवीचा, आरामात आपापल्या गाड्यांनी सिंहगडाच्या वाहनतळापर्यंत थेट पोहोचून शरीराला फारसे कष्ट न देता निसर्गनिरीक्षण व खादाडी करून परत फिरण्याचा राजमार्ग त्यागून आमच्याचपैकी कोण्या बहाद्दराच्या सुपीक डोक्यातून असे 'वेगळे' आऊटिंग करण्याची अफलातून कल्पना चमकली होती. सगळेजण मोठ्या उत्साहात निघाले तर खरे, पण आम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडून एस. टी. धुरळा उडवीत जणू वाकुल्या दाखविल्याप्रमाणे अंतर्धान पावली तशी एकेकाने वर गडाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि एक दीर्घ श्वास घेत मोठ्या धैर्याने गडचढणीस आरंभ केला!

आमच्या कंपूमध्ये साधारण पंचेचाळीस वर्षाची प्राजक्ताची मावशी, अशोकच्या शेजारी राहणारे करंदीकर आजोबा, परागची वय वर्षे १४ व १२ ची २ भाचरे आणि आम्ही १०-१२ मित्रमैत्रिणी असे वैविध्यपूर्ण लोक ठासून भरले होते. मावशींचे वजन जरा अंमळ जास्तच होते, पण त्यांचा उत्साह लाजवाब होता. पाठीवरच्या सॅकमधील पाण्याच्या बाटल्यांचे ओझे सांभाळत सांभाळतच आम्ही मार्गक्रमणा करीत होतो. माझा 'गिर्यारोहणाचा' अनुभव म्हणजे अधून मधून कधीतरी टंगळमंगळ करीत आरामात पर्वती चढणे. म्हणूनच की काय, मराठी मावळ्यांच्या ताकदीला आणि काटकपणाला मनोमन अभिवादन करीत मी घाम पुसत पायऱ्या चढत होते. आमच्यातील ४-५ सराईत वीर माकडांप्रमाणे टणाटणा उड्या मारत पाहता पाहता झपाझप दिसेनासे झाले. एव्हाना आमची विभागणी साधारण ३ गटांमध्ये झालेली! रोजच्या व्यायामाची सवय असलेला, उत्साही गट; मध्यममार्गाचे अनुसरण करणारा आशावादी गट आणि सगळ्यांत मागे असलेला, पाय ओढत - धापा टाकत रेंगाळत चालणारा दिरंगाई गट. अस्मादिकांची वर्गवारी कोणत्या गटांत झाली हे सुज्ञांस सांगणे नलगे!

२०-२५ मिनिटांच्या दमछाक करणाऱ्या चढणीनंतर प्राजक्ताच्या मावशीने अचानक वाटेतच बसकण ठोकली. "पुरे झालं बाई आता! माझ्यात काही अजून वर चढण्याची ताकद नाही! " घामाने डबडबलेल्या मावशी धपापल्या. आजूबाजूला कोंडाळे करून उभ्या आमच्या डोळ्यांसमोर मात्र आता या भारदस्त महिलेस उचलून वर न्यावे लागणार की काय ह्या कल्पनेने भरदिवसा काजवे चमकले. "मावशी, तुम्ही आधी जरा पाणी प्या आणि शांत व्हा पाहू! प्राजक्ता, अगं मावशींना वारा घाल म्हणजे थोडं बरं वाटेल त्यांना!" आमच्यातील एक हुशार वीर उद्गारले. आमचा घोळका अडेल म्हशीसारखा जागीच हंबरत थबकल्याचे लक्षात येताच पुढच्या वळणावर पोहोचलेले काही जण "काय झाले? "सदृश खाणाखुणा करीत पुनश्च माघारी आले. थोडावेळ प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण चांगलीच रंगली. "मावशी, दम गेला का आता? चला, आम्ही बरोबर आहोत तुमच्या... लवकर निघालो की लवकर पोचू वर! " अशा धीराच्या बोलण्याने मावशींची समजूत काढत आमचा तांडा तेथून मार्गस्थ झाला.

लिटरच्या लिटर पाणी ढोसत, मांड्या - पोटऱ्यांच्या बंडाकडे साफ दुर्लक्ष करत, बरगड्यांजवळून येणाऱ्या कळांना मराठ्यांच्या शौर्याची शपथ देत व मनातल्या मनात घरी परतल्यावर रोज सकाळी नियमित व्यायामाचा सुनिश्चय बाळगत आम्ही स्वतःला पुढे ढकलत होतो. करंदीकर आजोबा मात्र तुडतुडीत हरणाच्या चपळाईने आमच्या पुढे होते. मध्येच दीपाला चक्करल्यासारखे झाले. लगेच तत्परतेने अजून एक 'ब्रेक' घेण्यात आला. कोणी तिला आपली धूळ व आणखी कशाकशाने माखलेली पादत्राणे हुंगविली, कोणी लिमलेटच्या गोळ्या चारल्या तर कोण्या स्वयंघोषित 'डॉक्टर'ने तिला 'अमुक ऍक्युप्रेशरचा पॉंईंट दाब म्हणजे बरे वाटेल' इत्यादी मौलिक सूचना दिल्या. एव्हाना उन्हे चांगलीच कडकडली होती. अनेक सराईत व नवखे हौशे गौशे गडप्रेमी आमच्या एकमेकांना रेटत मुंगीच्या गतीने सरकणाऱ्या कडबोळ्याकडे मिष्किलपणे पाहत आम्हाला मागे टाकून सरसर पुढे जात होते. आमच्या जवळून जाणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोईवरील पाटीत दह्याची मडकी आहेत हे कळल्यावर आम्हाला साक्षात अमृतकुंभ गवसल्याचा आनंद झाला. बाजूच्या झाडाच्या सावलीत हाश्शहुश्श करीत देह लोटून देत आम्ही एकदिलाने दह्याचा फन्ना उडविला. आमची गलितगात्र अवस्था पाहून त्या ग्रामस्थालाही दया आली असावी. कारण आपल्या पाटीत रिकामी मडकी गोळा करून जमा झालेले पैसे कनवटीला बांधताना तो गालातल्या गालात हसत म्हणाला, "आता येकदम थोडक्यावर राह्यला बघा गड!" त्याच्या शब्दांनी काय धीर आला म्हणून सांगू! अंगात जणू हजार हत्तींचे बळ संचारले. जणू नरवीर तानाजी मालुसरेंच्या अपार शौर्याची पुसटशी झुळूक आम्हा थकल्याभागल्या व पस्तावलेल्या वीरांना अखेरच्या टप्प्यासाठी आवश्यक ताकद देत होती!

अखेर तो सुवर्णक्षण आला! ज्या पळाची आम्ही मनापासून आसुसून वाट पाहत होतो, जे सिंहगडाच्या मुख्य दरवाज्याचे व वाहनतळाजवळील पिठलंभाकरी, कांदाभजी विकणाऱ्या टपऱ्यांचे चित्र मनःचक्षुंसमोर रंगवीत आम्ही तो विशाल भूखंड पादाक्रांत केला होता ते सारे सारे आमच्या नजरेच्या टप्प्यात आले. मावशीबाईंनी तर मोठा नि:श्वास टाकून त्यांचा देह एका टपरीबाहेरच्या प्लास्टिकच्या खुर्चीत लोटून दिला. आमच्या अगोदर गडावर पोहोचलेली मंडळी खाऊनपिऊन, विश्रांती घेऊन गडावर फेरफटका मारून येण्याच्या बेतात होती. त्यांना मानेनेच 'जा' अशा अर्थी खुणा करून आम्ही श्रांत क्लांत जीव श्वास पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा करण्यात मग्न होतो. अचानक आमच्यातील कोणीतरी किंचाळले, "ए, ते बघ, काय सॉल्लिड देखावा आहे!" चमकून आमच्या सर्वांच्या नजरा समोर वळल्या, आणि खरेच की! ज्या निसर्गरम्य डोंगररांगांना व वृक्षराजीला पाहण्याच्या अट्टहासापायी आम्ही हा थोर पराक्रम केला होता, ते सारे सृष्टीचे सुंदर स्वप्न आमच्या नजरांपुढे सुहास्यवदनाने उभे ठाकले होते. संपूर्ण चढणीत ह्या 'आरोहण' कल्पनेच्या आमच्या टोळक्यातील 'शिल्पकारा'वर मनस्वी सूड घेण्याचे माझे सर्व बेत तात्काळ तिथल्या तिथे मावळले आणि परतीच्या उतरणीपेक्षाही अधिक वेगाने मन पुढच्या प्रवासाचे बेत आखू लागले.

-- अरुंधती

बीटी चा बडगा


कोंकणात लहान मुलांना हमखास सांगण्यात येणारी एक मजेशीर गोष्ट माझी आजी आम्हां सर्व नातवंडांना रात्री सांगायची.

गोष्टीतला गरीब शेतकरी घरात भाजी नसते, म्हणून बायकोच्या सांगण्यावरून गावातल्या सधन माणसाच्या वाडीवर लपत-छपत जातो. तिथे गेल्यावर वाडीतून भाजी चोरायचे त्याला येते दडपण! मग तो जणू त्या वाडीशीच संवाद साधत असल्याप्रमाणे तिला भाजी नेण्याची परवानगी विचारतो आणि स्वतःच वाडीच्या वतीने उत्तरेही देतो.... त्यांचा हा मजेशीर संवाद आजी रंगवून रंगवून सांगायची.... "वाडी गं बाई वाडी.... " "काय म्हणतोस रे फुल्या तरवाडी? " (फुल्या तरवाडी हे शेतकऱ्याचे नाव) "वांगी नेऊ का गं, दोन-चार? " "आरं, ने की धा बारा... " पुढे अनेक वर्षांनी ही गोष्ट विशेष लक्षात राहण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील त्या गरीब शेतकऱ्याची असहाय अवस्था आणि वांग्यांच्या चोरीसाठी त्याने स्वतःची घातलेली समजूत कोठेतरी मनास स्पर्शून गेली. सध्या बी. टी. वांगी प्रकरण गाजत आहे. निसर्गाच्या नियमांना धाब्यावर बसवून अल्पकालीन फायद्यांसाठी दीर्घ मुदतीचे नुकसान दर्शवणारी बी. टी. वांगी सरकारकडून हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पर्यावरण अभ्यासकांनी, कृषी वैज्ञानिकांनी बी. टी. वांग्यांना भारतात आणण्यासाठी स्पष्ट विरोध केला आहे. तरीही वांग्याच्या गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून आणून त्याद्वारे आर्थिक फायदा घडवून आणण्याचा ह्या वांग्यांचा उदो उदो करणाऱ्या कंपन्या व अधिकाऱ्यांचा दावा कितपत योग्य आहे यावर भारतात अजूनही नीट संशोधन झालेले नाही. बाकीच्या अनेक देशांत गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून अन्नोत्पादन करण्यास कडक बंदी आहे. परंतु भारतातील काही अधिकारी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्या देशांमध्ये असे अन्नपदार्थ विकले व उत्पन्न केले जातात तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या गेल्या काही वर्षांत निर्माण झाल्या आहेत. असे असताना बी. टी. चा अट्टाहास भारतात का? ह्यापूर्वी भारतात बीटी कापसाचे उत्पादन यशस्वी झाले आहे असा युक्तिवाद काही मंडळी करतात. परंतु कोठे कापूस आणि कोठे लोकांच्या पोटात जाणारी, गोरगरीबांना परवडणारी, प्रचंड खपाची वांग्यासारखी भाजी!! बी. टी. वांग्यांचे तब्येतीवर काही संभाव्य परिणाम असे सांगितले जातात : १. प्रतिकारशक्ती कमी होणे २. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रोग्यांना जास्त धोका ३. एलर्जीज ४. यकृत, मूत्रपिंडांचे आजार असणाऱ्यांना हानीकारक तरीही हे सर्व अल्पकाळात दिसून येणारे परिणाम आहेत. काही अभ्यासक याहीपुढे जाऊन सांगतात की दीर्घकाळात अशा अन्नामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा संभव आहे. असे असताना विषाची परीक्षा कशाला? महिकोसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीने जी. एम. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बी. टी. वांग्यांचे बियाणे आपल्याला विकता यावे म्हणून मोठ्या नेटाने रेटा लावला आहे. परंतु जर व्यावसायिक दृष्ट्या या वांग्यांचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली तर गेली अनेक शतके भारतात उपलब्ध असलेल्या देशी प्रजातीच्या वांग्यांवर गदा येणार आहे. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे. शिवाय ज्या रोग, किडींवर उपाय म्हणून बीटी चा गवगवा केला जात आहे त्या रोगांवर सेंद्रीय शेती पद्धतीत उपाय आहेत. ही बी. टी. वांगी बाजारात आली तर ती इतर देशी वांग्यांपासून वेगळी ओळखता येणे अशक्य आहे, एवढे त्यांच्या रंगरूपात साधर्म्य आहे! हे सर्व वाचनात आले मात्र, आणि मी अस्वस्थ झाले!! उगीचच लहानपणीच्या ऐकलेल्या त्या कथेतील भाबडा, गरीब फुल्या तरवाडी आठवला. ती वांग्याचे पीक असणारी वाडी डोळ्यांसमोर आली. त्याच्या घरातील भुकेली लेकरे, अस्वस्थ माय आणि आजही आपल्या खपाटलेल्या पोटाला चिमटा काढून किडूकमिडूक शेतीत आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करणारा अडाणी शेतकरी यांच्यामध्ये मनात तुलना सुरू झाली. फक्त एकच गोष्ट जाणवली : कथेतील फुल्या तरवाडीच्या परिस्थितीविषयी आपण काहीही करू शकत नाही. पण आजच्या शेतकऱ्याची, गरीब माणसाची फसवणूक न होऊ देणे आपल्या हाती आहे. चूक घडण्याअगोदरच जर सावरता आले तर त्यातून आपल्या देशाचेच भले होणार आहे. आता गरज आहे ती शास्त्रशुद्ध, निःपक्षपाती, पारदर्शी व प्रदीर्घ संशोधनाची, व त्या संशोधनाचे निष्कर्ष जनताजनार्दनासमोर पोहोचत नाहीत तोवर बीटी वांग्यांसारख्या कोणत्याही अनैसर्गिक उत्पादनाला भारतात सक्त मज्जाव करण्याची!
--- अरुंधती

Tuesday, November 17, 2009

रंगीत साड्या


वर्ष होते महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) रौप्यमहोत्सवाचे! त्यानिमित्त पोलिस परेड मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमातील आंतरशालेय लेझीम पथकात आमच्या वर्गातील काही मुलींची माझ्यासकट निवड झाली. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे चौखूर उधळलेल्या गुरांच्या उत्साहात आम्ही सरावासाठी एका प्रथतयश शाळेच्या मैदानावर एकत्र जमू लागलो. पहिल्यात दिवशी प्राथमिक सरावानंतर आमच्या प्रशिक्षक लोकांनी सर्व मुलींना दुसऱ्या दिवशीपासून केसांचे अंबाडे घालून येण्यास सांगितले. माझ्यासारख्या आखूड केसधारी बालांसमोर आता काय करायचे असे मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले.
तत्काळ तुळशीबागेतून तयार अंबाडे, गंगावने, आकडे, पिना, रिबिनींची जंगी खरेदी झाली. दुसऱ्या दिवशी आपापल्या शाळांचे युनिफॉर्म, पायात बूट-मोजे व मानेवर डुगूडुगू हलणारे अंबाडे अशा अवतारात भर उन्हात घाम गाळत आम्ही सरावासाठी हजर झालो. त्यानंतरचे चार-पाच दिवस पथकातील सर्व मुलांची (व थोडीफार आमची देखील!) बेहद्द करमणूक झाली.
सराव ऐन भरात आलेला असताना मुलींचे अंबाडे धडाधड गळून खाली पडत. कोणाचे गंगावन सुटून चरणाशी लोळण घेई, तर कोणाच्या लत्ताप्रहाराने खाली पडलेला अंबाडा फुटबॉलप्रमाणे उडून शेजारच्या रांगेत जाऊन पडे. एका क्षणात भरगच्च केशसंभाराचे आखूड गवतात रूपांतर होई. एक-दोन मुली शरमून रडू लागल्याचंही मला आठवतंय. अंबाड्याला सरावल्यावर नंतरचा आदेश आला तो पाचवारी साडीची दुटांगी पद्धतीने (कोळिणी नेसतात तशा काहीशा पद्धतीने) नऊवारी नेसून येण्याचा! आधीच घरातील आया, ताया, मावशा, काकवांच्या गंगावनांवर डल्ले मारून झाले होते. त्यात आता साडीची भर! दुसऱ्या दिवसापासून शाळेच्या युनिफॉर्मचा ब्लाऊज, दुटांगी साडी, पायात बूट मोजे व मानेवर अंबाडा अशा रम्य अवतारात आम्ही मुली सरावासाठी दाखल झालो.

हळूहळू त्याचीही सवय झाली. एक मेच्या एक-दोन दिवस अगोदर आम्हाला कार्यक्रमात नेसण्यासाठीच्या साड्या व नकली अलंकारांचे (पुतळीमाळ, डूल इ.) वाटप झाले. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. भरपूर सराव, दिमाखदार रचना व सळसळता उत्साह यामुळे आमचा लेझीम कार्यक्रम मस्त होणार यात शंकाच नव्हती! सर्व मुली नऊवाऱ्या नेसून नकली अलंकार घालून नटून थटून, अंबाड्यावर गजरे मिरवीत समारंभस्थळी पोचल्या होत्या. मुलेदेखील पांढऱ्याशुभ्र सलवार कुडत्यांत व लाल-भगव्या फेट्यात उठून दिसत होती. आमचा कार्यक्रम छानच पार पडला. अभिनंदनाचा वर्षाव झेलत आणि श्रमपरिहारार्थ दिलेल्या खाऊचा फन्ना उडवीत आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर मी साडी बदलली तो काय- साडीच्या कच्च्या रंगामुळे तिचा सगळा पिवळा रंग माझ्या अंगावर उतरलेला! संध्याकाळी पथकातील दुसरी मैत्रीण भेटली. ती तर "आरक्तवर्णा' म्हणजे लालमहाल झाली होती. तिची साडी लाल रंगाची होती ना!
दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा तिथे आमच्याचसारख्या लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांच्या मैत्रिणी पाहून आम्हाला हसून हसून कोसळावे, की शरमेने बेजार व्हावे ते समजत नव्हते. अखेरीस आमच्या शिक्षिकांतर्फे आम्हाला निरोप आला की सर्व लेझीम पथकातील मुलींनी त्यांना मिळालेल्या साड्या शाळेच्या लोकनृत्यसंघाच्या रंगपटासाठी शाळेत जमा कराव्यात, झाडून सगळ्या मुलींनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्या साड्या शाळेत जमा केल्या आणि एकमेकींच्या रंगीबेरंगी वर्णाची यथेच्छ टिंगलटवाळी करीत सुटकेचा निःश्‍वास सोडला!
महाराष्ट्र दिनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आम्हा सर्व मुलींना अशा वेगळ्या तऱ्हेने संस्मरणीय ठरले.!!

--- अरुंधती
(सकाळ मुक्तपीठ मध्ये माझा छापून आलेला लेख) http://beta.esakal.com/2009/05/13160641/muktapeethe-experience-about-s.html
My Master Poojya H. H. Sri Sri Ravi Shankar ji!

Monday, November 16, 2009

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृतीआकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगलया मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तणउगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!! अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली. एक देखणी, सालंकृत ललना तिथे प्रेक्षकांना तिने बनवलेल्या क्रोशाच्या पिशव्या, पर्सेस, रुमाल वगैरे मोठ्या अभिमानाने व उत्साहाने दाखवत होती. झाले! ठिणगी पडली!! मला फार पूर्वी मी बनवलेल्या क्रोशाच्या वस्तूंची आठवण झाली. घाईघाईने मी कपाटे हुडकायला सुरुवात केली. बऱ्याच खटपटी-लटपटींनंतर लक्षात आले की आपण त्यांतील बऱ्याच वस्तू कोणाकोणाच्या हातांत कोंबल्या आहेत..... व त्यांच्या प्रतिक्रियेसाठी क्षणभरही प्रतीक्षा न करता तिथून काढता पाय घेतला आहे!!! पण अशा बेइमान स्मृतींनी नाउमेद होणे आमच्या रक्तात नाही बरे! म्हणूनच, कपाटातील कपड्यांच्या अक्षम्य उलथापालथीनंतर जेव्हा मम हाती एवढे दिवस तोंड लपवून बसलेली क्रोशाची सुई लागली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला! 'हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे' अशा गाण्याच्या लकेरी घेत मी एका कोपऱ्यातील प्लॅस्टिकच्या पिशवीतील दुर्लक्षित लोकरीच्या गुंड्यांकडे माझा मोर्चा वळवला. येथे मी विनम्रपणे नमूद करू इच्छिते की माझ्या एका मावसबहिणीचा लोकरी कपडे विणण्याचा व्यवसाय असल्यामुळे तिच्या कृपेने आमच्या घरी कधीच लोकरीचा तुटवडा भासत नाही. तिच्या कपडे विणून उरलेल्या लोकरीला खासा न्याय देण्याचे धार्ष्ट्य मी वेळोवेळी माझ्या 'अनवट कलाकृती'च्या माध्यमातून समस्त जगताला दाखवून देत असते. असो. तर आता लोकरही सापडली होती, आणि क्रोशाची सुईदेखील! माझ्यासारख्या अट्टल कलावंताला दुसरे काय लागते! तत्काळ माझ्याकोमल, कुशल हस्तांनी टाके विणायला सुरुवात केली. औदार्याचा जन्मजात वस्तुपाठ मिळाल्याने आपण विणताना टाके मोजावेत, आकारठरवावा असे माझ्यासारख्या मनस्वी कलावंताला शोभून दिसत नाही. मग कितीही टाके गळाले, उसवले, आक्रसले किंवा ढिले पडले तरीबेहत्तर.... आम्ही आमच्या कलेशी कोणतीही तडजोड करीत नाही! एक लोकरीचा गुंडा संपला तर दुसऱ्या रंगाचा गुंडा घ्यायचा.... अगदीविणीच्या एका ओळीच्या मधोमधदेखील! पारंपारिक, संकुचित दृष्टीच्या पल्याड जाऊन धाडस दाखवणाऱ्यालाच खरी कला उमगते असेम्हणतात. कदाचित म्हणूनच मी क्रोशाच्या बारीकशा सुईच्या माध्यमातून माझी बेदरकार, धाडसी वृत्ती जगाला दाखवून देत असावे! तर, अशा वर्णनातून वाचकांना जो अर्थबोध व्हायचा तो एव्हाना झाला असेलच... हिरव्यागार, पोपटी रंगाचे दोन मोठे लोकरी गुंडे माझ्यासमोर आ वासून पडले होते.... त्यांच्या डोळ्यांत भरणाऱ्या (की खुपणाऱ्या? ) रूपाकडेदुर्लक्ष करीत मी दात-ओठ खाऊन त्यांच्या मूक आव्हानाला प्रतिसाद देत होते. टाक्यांमागून टाके, ओळींमागून ओळी, विणलेल्या खांबांमधूनलपंडाव खेळताना मी जणू देह-काळाचे भानच विसरले होते. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तशी मला फक्त पोपटी लोकर दिसतहोती. झरझर धावणाऱ्या हातांमधून एक गोजिरा आकृतिबंध जन्म घेत होता. येणारे-जाणारे माझी ही (अ)घोर तपश्चर्या पाहून (बहुधा)कौतुकाने तोंडातून 'च च' असले काहीसे उद्गार काढून मला प्रोत्साहन (की सांत्वना? ) देत होते. वडिलांना वाटले मी त्यांच्यासाठी खासहिवाळ्याच्या मुहूर्तांवर मफलर विणत आहे! तसे त्यांनी बोलूनही दाखवले. परंतु अहोरात्र माझ्या लोकरी कलाकृतीच्या आराधनेत (शब्दशः)गुंतलेल्या मला त्यांचे शब्द जाणवले तरच नवल! तर असेच तीन दिवस गेले. बाकीचे जग आपापल्या दिनक्रमांत गुंग होते.... पण माझ्या तारवटलेल्या डोळ्यांना एकच लोकरी स्वप्न दिसत होते. बघता बघता अर्धा हात लांबीचा, सुबक विणीचा एक देखणा चौकोन तयार झाला होता. वडील अधून-मधून त्याच्याकडे अनिमिष दृष्टीने पाहत 'वा! छान! ' असले काहीसे उद्गार काढत. पण मला त्यांमागील मर्म उमगत नव्हते. त्या चौकोनातून मस्तपर्स साकारेल अशा दिवास्वप्नांत मी गढले होते. लोकरीचे गुंडे संपत आले तसे माझे विणकामही संपुष्टात आले. चौकोन शिवून घेतला. त्याच्या कडांना दोन सुंदर गोफ विणूनअडकावले... पण माझी पर्स अचानक झोळीप्रमाणे मध्यावर खचू लागली... आ वासलेले तिचे तोंड मिटता मिटेना! गोफांचे ठिकाण बदलून पाहिले, परंतु एकदा रुसलेली पर्स माझ्यामनातला आकार घेईना.... अशीच खटपटत असताना पिताश्रींची नजर माझ्या हातातील केविलवाण्या दिसणाऱ्या आकारावर पडली. "हेकाय?!! तू मफलर नाही बनवलास? " त्यांचा प्रश्न आत्ता कोठे माझ्या ध्यानात येत होता. मीही मग ओशाळे हसत "अहो, लोकरच संपली! " अशी सारवासारव केली. अखेर माझ्या सर्व प्रयत्नांना त्या आडमुठ्या पर्सने दाद न दिल्याने मीही तिला रागारागाने तिचे गोफांचे अलंकार काढूनविणकामाच्या पिशवीत पुन्हा ढकलून दिले. रात्री त्या फसलेल्या पर्सच्या विचारांनी डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय योजिले होते आणि काय घडले! केवढी ही घोर फसवणूक!! मनाचीसमजूत घालूनही मन जुमानत नव्हते. ती पोपटी लोकर माझ्या मिटल्या पांपण्यांआडून मला वाकुल्या दाखवीत होती. क्रूर! निष्ठुर!! तिलाआता चांगलाच धडा शिकवावा हा विचार मनास चाटून गेला आणि मी अंथरुणावरच ताडकन उठून बसले. वडिलांना जोरात हाक मारली. तेबिचारे झोपायच्या तयारीतच होते. ते 'काय गं? ' असे विचारत आले मात्र, आणि मी जादूगाराच्या पोतडीतून काढावी तशी ती अडेलतट्टू पोपटीबिनबंदाची पर्स पिशवीतून काढून त्यांच्यासमोर धरली. त्यांनी माझ्याकडे बुचकळलेल्या नजरेने पाहिले. तो शिवलेला चौकोन मी त्यांच्याहातांत कोंबला व मोठ्या ऐटीत उद्गारले, "बघा बरं, डोक्याला बसते आहे का ही टोपी... " त्यांनीही लगेच ती नक्षीदार, जाळीदार 'टोपी'डोक्यावर चढवली. अगदी फिट्ट बसली. कानही झाकले जात होते. वा! जणू त्यांच्या डोक्याच्या मापानेच ही टोपी विणल्यासारखे वाटत होते.माझा त्या पर्सवरचा सूड पूर्ण झाला होता!!! "बाबा, राहू देत तुम्हालाच ही टोपी.... मी तुम्हाला मफलर विणेपर्यंत नक्की कामी येईल... हां,बाहेर घालता नाही येणार तिच्या पोपटी रंगामुळे, पण घरी घालायला काही हरकत नाही. " वडील नव्या लोकरी टोपीला मस्तकावर चढवून पुन्हा झोपायला निघून गेले आणि पर्सच्या आक्रसलेल्या नव्या रूपात क्रोशाच्या पुढील कलाकृतीची मधुर स्वप्ने पाहत मीही निद्रादेवीस शरणाधीन झाले!
-- अरुंधती

Sunday, November 15, 2009

निळामिठी



कृष्णमेघ घननीळ दिगंतर 
चांदेरी किरणांची प्रभावळ |
गहिर्‍या कोमल मंतरल्या क्षणी 
तुझ्या मंद हास्याची चाहुल ||

  पिऊन टाकिले गगन अंतरी 
नेत्री सावळे स्वप्निल काजळ |
तृषार्त मीही तरीही का रे 
तुझ्या ओढीने कातर पाऊल ||

  पुष्करिणींचे सलिल सुगंधी 
वृक्षजटांचे हिरवे जावळ |
तुझ्याचसाठी कुसुमकळांनी 
मऊ रेशमी भरीली ओंजळ ||

  गभिर घना तू धावत ये रे 
निळामिठीने अथांग व्याकुळ |
अनंतब्रह्मा द्वैत मिटवुनी 
पुन्हा बरसू दे सगुण तीर्थजल ||
--- अरुंधती

Saturday, November 14, 2009

शंभर अधिक एक

रात्रीची जेवणे आटोपली की पूर्वी एक हमखास उद्योग असायचा! चौसोपी वाड्याच्या प्रशस्त अंगणात आजूबाजूच्या झाडांच्या काळोख्या सावल्या निरखत, रामरक्षा पुटपुटत झपाझप शतपावली घालणे हा असायचा तो उद्योग.... आजोबांच्या किंवा वडीलांच्या पायांत लुडबुडत,त्यांच्या हातवाऱ्यांची नक्कल करीत (वेळप्रसंगी त्यांचे धपाटे खात) घातलेल्या ह्या शतपावल्यांची सोनेरी आठवण अजूनही मनात रुंजी घालते. उन्हाळ्यात शतपावलीचा कार्यक्रम गप्पांमध्ये रेंगाळायचा... कधी गप्पा, कधी अंताक्षरी, कधी ठिकरीचा किंवा साप-शिडीचा डाव, कधी भुतांच्या गोष्टी... पाऊसपाण्याच्या दिवसांतआणि थंडीत मात्र आम्ही शतपावल्या लवकर आटपत्या घेत असू. कोणी बरोबर असले तर त्यांच्याशी मनातल्या मनात स्पर्धा लावत त्या शंभर फेऱ्या भराभर पार पडत, तर एकटे
असताना कंटाळा करत, किंवा वाघ मागे लागल्याप्रमाणे आम्ही शतपावली'उरकत' असू. कधी त्यांत खंड पाडला, तर घरातील वडीलधारी मंडळी रागे भरत. एखाद्या घरातील आजी नातवंडांना फडताळावरील डब्यातील लाडू किंवा भाजकी बडीशेप अशी लालूच दाखवून 'शतपावली' करण्यास उद्युक्त करीत असे. अंगणातील वाऱ्याच्या झुळुकींना दाद देत बाजूचे ताड-माड डोलू लागत, टिपूर चांदण्यांत आसमंत उजळून निघे तेव्हा शतपावली घालण्यातही अनामिक आनंद मिळत असे. पुढे वाडे पडले, तिथे टुमदार इमारती उभ्या राहिल्या. पूर्वीसारखे अंगण उरले नाही. सदनिकांच्या 'बाल्कनीज' मध्ये प्रशस्त अंगणाची मजा नव्हती. आजी-आजोबांनाही जेवणानंतर चालायचे कुठे असा प्रश्न पडू लागला. बाल्कनीतील टिचकीभर जागेत येरझाऱ्या घालून त्यांना शतपावलीचे समाधान मिळेना! मग काहीजण सदनिकांच्या आवारातील पार्किंग मध्ये, इटुकल्या पिटुकल्या 'गार्डन' मध्ये सोडियमव्हेपरच्या कठोर प्रकाशात आकाशातले फिकुटलेले चांदणे न्याहाळत दुधाची तहान ताकावर भागवू लागले. हमरस्त्यावर फेरी म्हणजे जीवमुठीत धरून जाणे हे त्यांना माहीत होते. कारण कोणतेही वाहन भरधाव वेगाने कधी अंगाला चाटून जाईल ह्याची शाश्वती नसे. शिवाय,भटकी कुत्री, चोर-पाकिटमार, असंख्य खड्डे अशा विविधांगी आपत्तीतून सहीसलामत जीव बचावला तर खरे बहाद्दर! अखेरीस तंत्रज्ञानाला दया आली. मनोरंजनाच्या टी. व्ही. पर्वात सॅटेलाईट केबलचे आगमन झाले आणि रात्रीच्या जेवणपश्चात शतपावलीचा प्रश्न (काहीजणांसाठी तरी) कायमचा संपला. आता ते जेवण उपरांत टी. व्ही. समोर बसतात व शंभर- दोनशे चॅनल्स फिरतफिरत कोचावर ऐस-पैस बसल्या बसल्याच शतपावली करतात! जागेचे झंजटच नको ना यार! शिवाय एका ठिकाणी बसून तुम्ही अख्खे जग हिंडून येता ते वेगळेच! आजी-आजोबा पण खूश आणि नातवंडेदेखील खूश!!! हां... आता अपचनाचा त्रास झाला तर शेकडो पाचक चूर्णे,गोळ्या आहेत ना मदतीला.... आणि व्यायामाचे म्हणाल तर घरबसल्या व्यायामाची आजकाल चिक्कार साधने उपलब्ध आहेत. आणि मोकळी हवा कधीच येथून गायब झाली आहे... सध्या असतात त्या फक्त पेट्रोल, डिझेलच्या फ्यूम्स! त्यामुळे घरातल्या घरात एअरकंडिशनर्ची गार गार हवा खात मनोरंजनाचा खजिना उलगडणाऱ्या ह्या आधुनिक शतपावलीची चटक तुम्हां-आम्हांस लागली तर आता कोण काय करणार??!!! पण कधी-कधी आम्ही 'वीकएंड' रीट्रीट ला जातो बरं का! एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, हिरवाईच्या कुशीत, मोकळ्या वातावरणात नभांगण न्याहाळताना आम्हांला उगीचच लहानपणीचे ते सुबक अंगण, गार वारे, शतपावली आठवते आणि पावले थबकतात. मुक्त उधळलेला सुगंध जेव्हा कुपीतून विकत घ्यावा लागतो तेव्हा होणारी मनाची काहीशी अवस्था आम्ही अनुभवतो. पण मग एक उसासा सोडून असले सर्व विचार झटकून टाकतो, व त्या लोभस आठवणींना मनोमन उजाळा देत पुन्हा एकदा आपापल्या सदनिकांचा व बैठकीच्या खोलीतील विशाल टीव्हीरूपी अंगणाचा मार्ग धरतो!
-- अरुंधती