Sunday, March 20, 2011

संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग



ग्रंथसाहिबातील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या ''शबद'' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणार्‍या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे. एरवी हरीभक्तीबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी व पाखंडीपणावर आपल्या अभंगांमधून शब्दांचे आसूड उगारून खरमरीत टीका करणार्‍या संत नामदेवांच्या या एकूण ६१ रचनांमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारांचे त्यांनी काव्यरूपात केलेले वर्णनही आगळे व अभ्यास करण्याजोगे आहे. नवरसांमधील अद्भुतरसाला, विस्मयाला जागृत करणार्‍या या रचनांमधील शब्दप्रयोग काहीवेळा मराठी धाटणीचेही आहेत.
आजच्या युगात चमत्कारांच्या विरोधात बोलणारे 'अशा घटना खरोखरी घडू शकतात का?' म्हणून त्यांना वैचारिक आव्हानही देऊ शकतील. परंतु खुद्द संत नामदेव ह्या घटनांचे वर्णन फार मार्मिकपणे करतात. त्यांत कसलाही अभिनिवेश नाही. उलट एकप्रकारचा तटस्थपणाच आढळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व रचना पंजाबी गुरुमुखीतील असून विशिष्ट संगीत रागांत रचलेल्या आहेत. ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा ह्या संताने बाराव्या शतकात भागवतधर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकले. नामदेवांनी पंजाबात वीस वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले. तेथील भाषा, संस्कृती फक्त आत्मसातच केली असे नव्हे; तर त्या भाषेत सुंदर काव्येही रचली. हे सर्व अभंग शीख संप्रदायाच्या आद्य धर्मग्रंथाचा, गुरु ग्रंथसाहिबचा एक भाग आहेत. अभंगांच्या भाषेची प्रासादिकता, वर्णनातील नाट्यमयता, आपला भाव नेटक्या शब्दांनी मांडण्याची कला आणि ह्या सर्वांमधून ठायी ठायी जाणवणारे भक्तीमाधुर्य बघू जाता नामदेवांच्या रचनांचे आगळेपण लक्षात येऊ लागते.

आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेल्या संत नामदेव रचित अभंगांमधील हे तीन चमत्कृतीपूर्ण प्रसंग इथे त्यांच्याच शब्दांमध्ये देऊन त्यांचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न आहे.
एका रचनेत ते आपल्या हातून देवाने (विठ्ठलाने) दूध कसे प्यायले ह्याचे सरळ, साधे, प्रांजळ वर्णन करतात :
दूधु कटोरै गडवै पानी ॥
कपल गाइ नामै दुहि आनी ॥१॥
दूधु पीउ गोबिंदे राइ ॥
दूधु पीउ मेरो मनु पतीआइ ॥
नाही त घर को बापु रिसाइ ॥१॥

कपिला गाईचं दोहन करून कटोराभर दूध आणि गडूभर पाणी नामदेव (कुल)देवासाठी घेऊन गेले. माझ्या देवाधिदेवा, गोविंद राया, हे दूध पी बरं! तू हे दूध प्यायलास की मला बरं वाटेल. नाहीतर माझे वडील नाराज होतील.
सोइन कटोरी अम्रित भरी ॥
लै नामै हरि आगै धरी ॥२॥
एकु भगतु मेरे हिरदे बसै ॥
नामे देखि नराइनु हसै ॥३॥
दूधु पीआइ भगतु घरि गइआ ॥
नामे हरि का दरसनु भइआ ॥४॥

नामदेवाने अमृतरूपी दुधाने सोन्याची कटोरी भरली आणि देवाच्या समोर धरली. हा माझा भक्त माझ्या हृदयात निवास करतो (असे म्हणत) देवाने (नारायणाने) नामदेवाकडे पाहून स्मित केले. देवाने दूध प्यायले, भक्त घरी परतला, अशा रीतीने नामदेवाला हरीचे दर्शन झाले.
किती सरळसोट वर्णन.... पण थेट हृदयाला भिडणारे! ''माझ्या देवाधिदेवा, गोविंद राया, हे दूध पी बरं! तू हे दूध प्यायलास की मला बरं वाटेल. नाहीतर माझे वडील नाराज होतील.'' हा त्यांचा आग्रह जितका निर्व्याज, निरागस आहे तितकाच त्यामागील भावही!
''देवाने दूध प्यायले, भक्त घरी परतला, अशा रीतीने नामदेवाला हरीचे दर्शन झाले.'' जणू काही नामदेव दुसर्‍याच कोणाबद्दल सांगत आहेत अशा तर्‍हेने केलेले हे वर्णन!
पुढे एका अभंगात तत्कालीन वर्णव्यवस्था, जातिभेदापायी नामदेवांना एकदा देवळाबाहेर हुसकावले जाते त्या प्रसंगाचे वर्णन आहे. व्यथित अंतःकरणाने नामदेव देवळाच्या पिछाडीस हरिनामाला आळवत बसतात. आणि काय आश्चर्य!! काही काळाने देऊळच फिरते आणि पिछाडीस बसलेल्या ह्या हरिभक्ताला सन्मुख होते.
प्रसंगाचे वर्णन करताना नामदेव म्हणतात :
हसत खेलत तेरे देहुरे आइआ ॥
भगति करत नामा पकरि उठाइआ ॥
हीनड़ी जाति मेरी जादिम राइआ ॥
छीपे के जनमि काहे कउ आइआ ॥१॥

हसत खेळत मी तुझ्या मंदिरी आलो. हे भगवंता, तुझी आराधना करत असताना नामदेवाला पकडून मंदिराबाहेर हुसकावले गेले. हे देवा, माझी जात हीन आहे. मी शिंप्याच्या घरी का जन्मलो?
लै कमली चलिओ पलटाइ ॥
देहुरै पाछै बैठा जाइ ॥२॥
जिउ जिउ नामा हरि गुण उचरै ॥
भगत जनां कउ देहुरा फिरै ॥३॥

मी माझं कांबळं उचललं आणि देवळाच्या पिछाडीस जाऊन बसलो. नामदेवाने जसजसे भगवंताचे स्तुतीगान सुरू केले तसे देऊळ मूळस्थानावरून फिरले आणि देवाच्या या पामर भक्ताकडे तोंड करून बसले.
आपण हीन कुळात का जन्माला आलो ह्या नामदेवांच्या प्रश्नात जी आर्तता आहे ती व्याकुळ करणारी आहे. त्यामागचे दु:ख हे आपल्या प्राणप्रिय भगवंताची मनाजोगती आराधना करता न येण्याचे दु:ख आहे.
ह्या अभंगासंदर्भात जी कथा प्रसिद्ध आहे ती अशी की, एकदा विठोबा खेचर, नामदेव व ज्ञानेश्वर ह्या देवळाच्या समोर इतर वारकर्‍यांसमवेत भजनकीर्तनात मग्न होते तेव्हा तेथील पुजार्‍यांनी त्यांना हटकले व तिथून बाहेर काढले. मग सर्व वारकर्‍यांसह नामदेव मंदिराच्या पिछाडीस गेले व तिथे भजनाचे रंगी दंग झाले. आणि काय आश्चर्य! देवाने आपल्या प्रिय भक्ताच्या आळवणीला साद देत सारे देऊळच फिरवले व भक्ताला दर्शन दिले.
देवाने आपल्या भक्ताकडे मुख करून त्याच्या कीर्तनाचा, स्तुतीगानाचा आनंद घेतला.
औरंगाबाद जवळ औंढे नागनाथाचे जे प्रसिद्ध शिवमंदिर आहे तेच हे मंदिर अशी कथा आहे. ह्या देवळाच्या पिछाडीस नंदी आहे.
तिसर्‍या अभंगात नामदेव ईश्वराच्या कृपेने मृत गाय कशी जिवंत झाली व दूध देऊ लागली हे वर्णितात.
ह्या वर्णनातील सुलतान हा मोहम्मद बिन तुघलक हा सुलतान होय. तसे हा सुलतान तत्त्वज्ञान, तर्क, गणित, अवकाशविज्ञान, वैद्यकशास्त्र, भाषा इत्यादींत पारंगत होता, परंतु हिंदूंचा द्वेष करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
नामदेवांच्या हरीभक्तीने व लोकप्रियतेने अस्वस्थ होऊन तुघलकाने त्यांना साखळदंडांत बंदिस्त केले. त्याची अट होती, तुझा विठ्ठल खराच असेल तर त्याला बोलाव व मेलेल्या गायीला पुन्हा जिवंत करून दाखव. अन्यथा मी तुझा येथेच वध करेन. नामदेवांच्याच शब्दांमध्ये हा प्रसंग :
सुलतानु पूछै सुनु बे नामा ॥
देखउ राम तुम्हारे कामा ॥१॥
नामा सुलताने बाधिला ॥
देखउ तेरा हरि बीठुला ॥१॥
बिसमिलि गऊ देहु जीवाइ ॥
नातरु गरदनि मारउ ठांइ ॥२॥

सुलतान म्हणाला, ''नामदेवा, मला तुझ्या देवाची करामत बघायची आहे.''
सुलतानाने नामदेवाला अटक केली आणि फर्मान सोडले, ''मला तुझा देव दाखव.''
''ही मेलेली गाय जिवंत करून दाखव, नाहीतर मी तुझं शिर आताच्या आता इथे धडावेगळं करेन.''
बादिसाह ऐसी किउ होइ ॥
बिसमिलि कीआ न जीवै कोइ ॥३॥
मेरा कीआ कछू न होइ ॥
करि है रामु होइ है सोइ ॥४॥
नामदेव उत्तरले, ''महाराज, हे असं कसं घडून येणार? कोणीही मेलेल्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही. मी स्वतः ह्याबाबत काहीच करू शकत नाही. जे काही राम (ईश्वर) करेल त्याप्रमाणे घडेल.''
बादिसाहु चड़्हिओ अहंकारि ॥
गज हसती दीनो चमकारि ॥५॥
रुदनु करै नामे की माइ ॥
छोडि रामु की न भजहि खुदाइ ॥६॥
न हउ तेरा पूंगड़ा न तू मेरी माइ ॥
पिंडु पड़ै तउ हरि गुन गाइ ॥७॥

उद्धट राजा ह्या उत्तराने संतप्त झाला आणि त्याने नामदेवावर हत्तीचा हल्ला घडवून आणला. नामदेवाची आई रडू लागली आणि म्हणू लागली, ''तू तुझ्या रामाला सोडून देऊन त्याच्या अल्लाची भक्ती का करत नाहीस?''
नामदेवाने उत्तर दिले, '' मी तुझा मुलगा नाही आणि तू माझी माता नाहीस! माझं शरीर नष्ट झालं तरी मी हरीचं स्तुतीगान करतच राहीन.''
करै गजिंदु सुंड की चोट ॥
नामा उबरै हरि की ओट ॥८॥
काजी मुलां करहि सलामु ॥
इनि हिंदू मेरा मलिआ मानु ॥९॥
बादिसाह बेनती सुनेहु ॥
नामे सर भरि सोना लेहु ॥१०॥
मालु लेउ तउ दोजकि परउ ॥
दीनु छोडि दुनीआ कउ भरउ ॥११॥

हत्तीने सोंडेने प्रहार केला, पण नामदेव हरीकृपेने त्यातून वाचले.
राजा उद्गारला, ''माझ्यासमोर काजी, मुल्ला मान तुकवितात आणि ह्या हिंदूने माझा अवमान केला आहे.''
लोकांनी राजाला विनविले, '' हे राजा, आमची प्रार्थना ऐक. नामदेवाच्या वजनाचे सोने घे आणि त्याला सोडून दे.'' त्यावर राजा उत्तरला, '' मी जर सोने घेतले तर मला माझ्या श्रद्धेचा बळी देऊन भौतिक संपत्ती गोळा करत बसल्याबद्दल नरकात जावे लागेल.''
पावहु बेड़ी हाथहु ताल ॥
नामा गावै गुन गोपाल ॥१२॥
गंग जमुन जउ उलटी बहै ॥
तउ नामा हरि करता रहै ॥१३॥
सात घड़ी जब बीती सुणी ॥
अजहु न आइओ त्रिभवण धणी ॥१४॥

पायांना साखळदंडांनी बांधून जखडलेल्या अवस्थेत नामदेवांनी हाताने ताल धरला आणि ईश्वराचे स्तुतीगान करू लागले.
''हे देवा! गंगा आणि यमुनेचे पाणी जरी उलटे वाहू लागले तरी मी तुझेच स्तुतिगान करत राहीन,'' त्यांनी आळविले. तीन तास (सात घटिका) उलटले. आणि तरीही त्रिभुवनाचा स्वामी आला नाही.
पाखंतण बाज बजाइला ॥
गरुड़ चड़्हे गोबिंद आइला ॥१५॥
अपने भगत परि की प्रतिपाल ॥
गरुड़ चड़्हे आए गोपाल ॥१६॥
कहहि त धरणि इकोडी करउ ॥
कहहि त ले करि ऊपरि धरउ ॥१७॥
कहहि त मुई गऊ देउ जीआइ ॥
सभु कोई देखै पतीआइ ॥१८॥

पंखांच्या पिसांपासून बनविलेले पाखंतण वाद्य वाजवित, गरुडारूढ विश्वेश्वर अखेरीस प्रकटला. आपल्या भक्ताचा प्रतिपालक असा तो गोपाल गरूडारूढ होऊन प्रकट झाला. ईश्वर त्याला (नामदेवाला) म्हणाला, ''तुझी इच्छा असेल तर मी पृथ्वी तिरपी करेन, तुझी इच्छा असेल तर तिला उलटी-पालटी करेन. तुझी इच्छा असेल तर मी मेलेल्या गायीला पुन्हा जिवंत करेन. सर्वजण पाहतील आणि त्यांची खात्री पटेल.''
नामा प्रणवै सेल मसेल ॥
गऊ दुहाई बछरा मेलि ॥१९॥
दूधहि दुहि जब मटुकी भरी ॥
ले बादिसाह के आगे धरी ॥२०॥
बादिसाहु महल महि जाइ ॥
अउघट की घट लागी आइ ॥२१॥

नामदेवाने प्रार्थना केली आणि गायीचे दोहन केले. त्याने वासराला गायीजवळ आणले आणि तिचे दोहन केले.
जेव्हा दुधाने घडा पूर्ण भरला तेव्हा नामदेवाने तो घडा राजासमोर नेऊन ठेवला. राजा व्यथित मनाने राजवाड्यात परतला.
काजी मुलां बिनती फुरमाइ ॥
बखसी हिंदू मै तेरी गाइ ॥२२॥
नामा कहै सुनहु बादिसाह ॥
इहु किछु पतीआ मुझै दिखाइ ॥२३॥
इस पतीआ का इहै परवानु ॥
साचि सीलि चालहु सुलितान ॥२४॥

काजी आणि मुल्लांच्या माध्यमातून राजाने नामदेवाची प्रार्थना केली, ''हे हिंदू, मला माफ कर. मी तुझ्यासमोर केवळ एखाद्या गायीसमान आहे.'' नामदेव उत्तरले, ''हे राजा, ऐक. हा चमत्कार मी घडवला का? ह्या चमत्काराचा उद्देश होता की हे राजा, तू सत्याच्या व विनयाच्या मार्गाने चालावेस.''
नामदेउ सभ रहिआ समाइ ॥
मिलि हिंदू सभ नामे पहि जाहि ॥२५॥
जउ अब की बार न जीवै गाइ ॥
त नामदेव का पतीआ जाइ ॥२६॥
नामे की कीरति रही संसारि ॥
भगत जनां ले उधरिआ पारि ॥२७॥
सगल कलेस निंदक भइआ खेदु ॥
नामे नाराइन नाही भेदु ॥२८॥१॥१०॥

नामदेवाला ह्यामुळे सगळीकडे प्रसिद्धी मिळाली. सारे हिंदू गोळा झाले व नामदेवाला भेटायला गेले. जर गाय जिवंत झाली नसती तर लोकांचा नामदेवावरचा विश्वास उडाला असता. नामदेवाची कीर्ती चारही दिशांना पसरली. इतर विनयशील भक्तही वाचले व त्याच्याबरोबर पैलतिरी जाऊ शकले. जो निंदक होता त्याला अनेक त्रास, क्लेश भोगावे लागले. नामदेव व ईश्वरात भेद उरला नाही.
---------------------
''आपल्यात व नारायणात कोणताच भेद उरलेला नाही,'' हे सांगणारी नामदेवांची वाणी घडलेल्या चमत्कारामुळे इतर हिंदूंना कशा प्रकारे जीवनदान मिळाले याचे संकेताने मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करते. गाय जर जिवंत झाली नसती तर सुलतानाने फक्त नामदेवालाच चिरडले नसते तर त्याच्याबरोबर इतर भक्तांवरही आपत्ती ओढविली असती. प्राण गमावण्यापासून ते सक्तीच्या धर्मांतरापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संकटाला त्यांना सामोरे जावे लागले असते. परंतु ती गाय जिवंत झाल्यामुळे पुढच्या घटना टळल्या.
आता गाय कशी काय जिवंत झाली? देवाच्या मूर्तीने दूध कसे काय प्यायले? देऊळ कसे काय फिरले? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे तर्काच्या, बुद्धिवादाच्या भाषेत दिली जाऊ शकतील की नाही ही शंकाच आहे. कारण या सर्व घटना सामान्य बुद्धीपलीकडील आहेत. अनाकलनीय आहेत. नामदेवांच्या वर्णनानुसार तरी त्या त्या घटना त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडल्या. कथा, कीर्तने, पोथ्या, अभंगांतून त्या घटना लोकांपर्यंत पोहोचल्या. आज त्या संतसाहित्याचा एक अविभाज्य हिस्सा आहेत. अशा प्रसंगांतून संत नामदेवांची हरिभक्ती अधिकच दृढ झाली.
-- अरुंधती
लेखासाठी वापरलेले संदर्भ :
नामदेव व तुघलकाविषयीची माहिती : विकिपीडिया
शबद रचना : शीख संप्रदायाची संकेतस्थळे
(विशेष टीप : वरील अभंगांमधील प्रसंगांचे वर्णन करणारे नामदेवांचे मराठीतील अभंग कोणास माहित असल्यास कृपया प्रतिसादात द्यावेत ही विनंती.)

Friday, March 11, 2011

साधो, हे मुडद्यांचे गाव



संत कबीराच्या एका आगळ्या रचनेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे :
साधो, हे मुडद्यांचे गाव
साधो, हे मुडद्यांचे गाव
पीर मरे पैगंबरही जो मरे
मरती जिवंत योगी
राजा मरे प्रजाही मरणशील
मरती वैद्य अन् रोगी
चंद्रही मरतो मरेल सूर्यही
मरते धरणी अन् आकाश
चौदा भुवनीचे प्रतिपालही मरती
त्यांची काय ती आशा!
नऊही मरती दशही मरती
मरती सहज अठ्ठ्याऐंशी
तेहतीस कोटी देवता मरती
काळाची ही सरशी
नाम अनाम अनंत कायम
दूजे तत्त्व ना होई
कबीर म्हणे ऐक हे साधो
ना भटकत मरणी जाई
-- संत कबीर
मायबोलीकरीण स्वाती आंबोळे यांनी शेवटच्या ओळींचा खूप छान अनुवाद सुचविला. तोही इथे देत आहे :
शाश्वत केवळ ब्रह्मच साधो, बाकी सगळी माया
कबिर म्हणे सन्मार्ग न सोडी, जन्म न जावो वाया



मूळ काव्य : साधो ये मुरदों का गाँव
मूळ भाषा : हिंदी, रचनाकार : संत कबीर
साधो ये मुरदों का गाँव
साधो ये मुरदों का गाँव
पीर मरे पैगम्बर मरिहैं
मरि हैं जिन्दा जोगी
राजा मरिहैं परजा मरिहै
मरिहैं बैद और रोगी
चंदा मरिहै सूरज मरिहै
मरिहैं धरणि आकासा
चौदां भुवन के चौधरी मरिहैं
इन्हूं की का आसा
नौहूं मरिहैं दसहूं मरिहैं
मरि हैं सहज अठ्ठासी
तैंतीस कोट देवता मरि हैं
बड़ी काल की बाजी
नाम अनाम अनंत रहत है
दूजा तत्व न होइ
कहत कबीर सुनो भाई साधो
भटक मरो ना कोई

Monday, March 07, 2011

आता काय करणार, तो काय करणार?


मूळ कवी : बुल्ले शाह (इ.स.१६८०-१७५८)
भाषा : पंजाबी
आता काय करणार, तो काय करणार?
आता काय करणार, तो काय करणार?
तुम्हीच सांगा प्रियतम काय करणार?
एक घरी ते नांदत असती पडदा हवा कशाला
मशीदीत तो नमाज पढला, मंदिरीही तरी तो गेला
तो एकचि पण लक्ष आलये, हर घरचा स्वामी तो
चहूदिशांना ईश्वर जो सर्वांच्या साथी असतो
मूसा फरोहा जन्मुनी मग तो दोन बनुनी का लढतो?
सर्वव्यापी तो स्वयंसाक्षी मग नरकात कुणाला नेतो?
गोष्ट ही हळवी नाजूक, कोणा सांगू, कैसे साहू
इतुकी सुंदर भूमी जेथ एक जळतो, एक दफनतो
अद्वैत अन् सत्य-सरितेत सारेचि तरंगत आहे
ह्या बाजू तोचि त्या बाजू, तोचि सकल स्वामी अन् दास
वाघासमान प्रीत ही बुल्ले शाहची जो पीतो रक्त अन् खातो मांस.
अनुवाद - अरुंधती 

मूळ पंजाबी पाठ
की करदा हुण की करदा,
तुसी कहो खाँ दिलबर की करदा।
इकसे घर विच वसदियाँ रसदियाँ नहीं बणदा हुण पर्दा,
विच मसीत नमाज़ गुज़ारे बुत-ख़ाने जा सजदा,
आप इक्को कई लख घाराँ दे मालक है घर-घर दा,
जित वल वेखाँ तित वल तूं ही हर इक दा संग करदा,
मूसा ते फिरौन बणा के दो हो कियों कर लड़दा,
हाज़र नाज़र खुद नवीस है दोज़ख किस नूं खड़दा,
नाज़क बात है कियों कहंदा ना कह सक्दा ना जर्दा,
वाह वाह वतन कहींदा एहो इक दबींदा इक सड़दा,
वाहदत दा दरीयायो सचव, उथे दिस्से सभ को तरदा,
इत वल आपे उत वल आपे, आपे साहिब आपे बरदा,
बुल्ला शाह दा इश्क़ बघेला, रत पींदा गोशत चरदा |

Wednesday, March 02, 2011

मला काय झाले? मला काय झाले?


मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मायबोलीवर आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये हा मूळ पंजाबी काव्याचा मराठीतील अनुवाद मी सादर केला. मूळ काव्य बाबा बुल्ले शाह यांचे असून काव्याचा आशय फार सुंदर आहे :

मला काय झाले? मला काय झाले?
ममत्व माझ्यातुनी ऐसे हरपले
खुळ्यासारखा मी विचारीत बसतो
सांगाल जन हो, मला काय झाले
हृदयात माझ्या डोकावलो मी
स्वतः नाही उरलो हे मलाही कळाले
तूचि वससी सदा ह्या मम अंतरी
आपादमस्तकी तूचि तू
आत - बाहेर केवळ तू!


मूळ काव्य : मैनूँ की होया मैथों गई गवाती मैं

कवी : बुल्ले शाह (इ.स.१६८० ते १७५७)
भाषा : पंजाबी

मैनूँ की होया मैथों गई गवाती मैं,
जियों कमली आखे लोकों मैनूं की होया
मैं विच वेखन ते नैं नहीं बण दी,
मैं विच वसना तूं।
सिर तो पैरीं तीक वी तू ही,
अन्दर बाहर तूँ |

Monday, February 28, 2011

रविवारी भल्या सकाळी


वेळ : सकाळी ७:०० वाजता

स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप

वार : रविवार

काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्‍या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्‍यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!

मी कोपर्‍यातील माझ्या जागेवरून आमच्या विस्कळीत घोळक्याचा अंदाज घेत बसले आहे.

स्मिता, साना आणि श्वेता नेहमीप्रमाणे एकमेकींशीच बोलण्यात मग्न आहेत. त्यांच्या चकाकत्या पर्सेस त्यांच्या आजूबाजूला विखरून पडल्या आहेत. आपल्याच घरच्या दिवाणखान्यात बसल्याचा थाट. पर्‍या, लाल्या, मट्टू, खंडू एका ऐसपैस सोफ्यावर आपापल्या ''बियर बेलीज्'' सांभाळत दाटीवाटीने बसले आहेत. लाल्या बगळ्यासारखी मान तिरकी करून फ्रेंच विंडोच्या काचेतून दिसणार्‍या इनफिनिटी स्विमिंग पुलाकडे आणि त्यात तरंगणार्‍या दोन-तीन आंग्ल जोडप्यांकडे डोळे विस्फारून बघत आहे.

सुभ्याने मेन्यू कार्डात डोकं खुपसलंय. आंद्या त्याच्या खांद्यावरून मेनूकार्ड वाचायचा वृथा प्रयत्न करत आहे. शैली एक पाय हेलकावत शून्यात नजर लावून आपल्याच हाताच्या बोटाचे नख कुरतडत बसली आहे. विनू मोबाईलवरचा मेसेज धीरगंभीरपणे तपासतोय. सूझन बोअर होऊन कॉफी शॉपमधील तुरळक गर्दीकडे, इकडे-तिकडे भिरभीर नजर फिरवते आहे. दीपा आणि सुशांत हळूऱ्हळू आवाजात एकमेकांशी काहीतरी गुफ्तगू करत आहेत.



एवढ्यात वेटर आमची ऑर्डर घ्यायला येतो. त्याच्या आगमनासरशी समोर बसलेल्या गलितगात्रांच्या अंगात त्राण संचारते.

''ए आधी सर्वांना कडक चहा मागव! झोपलेत सगळे!''

''ए गपे, तुला काय कळतंय! माहितेय ना, इथला चहा किती फुळकवणी असतो ते... तो कडक चहा प्यायचा असेल तर इथून उठायचं आणि अमृततुल्यमध्ये जायचं हां... त्यापेक्षा कॉफी सांगा सगळ्यांना!''

''नको, चहाच बरा!''

''पर्‍यासाठी बोर्नव्हिटा सांगा रे! तो ग्रोईंग बॉय आहे ना!!'' हे पर्‍याच्या ढेरीला ढोसत आणि डोळा मारत.

''बरं तो पॉट-टी मागवूयात ना! खूप दिवसात प्यायला नाहीए...''

''हा हा हा.... काय गं श्वेते, तुला काय म्हणायचंय नक्की? सकाळच्या पारी पॉट्टी.... ''

''ईईईई... कसला घाणेरडा आहेस रे तू! बरं बरं... तो किटलीतला चहा असतो ना, तो मागवूयात, झालं?''

''ए त्या सुशाला हालवा जरा.... काय त्या दीपाशी लाडंलाडं बोलत बसलाय.... जाम कन्फ्यूज्ड आहे ती! त्यालाही कन्फ्यूज करून सोडेल!''

''छोड ना यार, काय को उन के बीच अपनी तंगडी अडाता है.... ते काय चिल्लीपिल्ली नाहीएत. असेल कायतरी सीरियस.''

''अरे कसले मरगळल्यासारखे बसलेत रे सगळे!! सर्वांची पी.टी. घेतली पायजेल आपल्या ड्रॅगन मास्तरासारखी. उठा की राव आता! इथं काय झोपायला आलात का रे?''

''ह्यॅ! ही काय वेळ आहे का सोशलायझिंगची! फक्त अन् फक्त विन्यासाठी आलोय मी इथं! समजला ना?''

''व्वा! म्हणजे जसं काही आम्ही इथं गोट्या खेळायलाच आलोत जणू! कै च्या कै.....''

''लाल्या, लेका, अरे मान मोडेल रे तुझी... किती ताणतोस! तू कधी गोर्‍यांना स्विमिंग करताना बघितलं नाहीएस का?''

''तुम्हाला काय करायचंय रे लेको, माझी मान हाय.... मी काय पण करंल....''

''विन्या, तो मोबाईल बाजूला ठेव आता.... अरे ठरवा रे चटकन काय ऑर्डर करायचंय ते!''

''असं करुयात, चहा - कॉफी दोन्ही मागवूयात. ज्याला जे हवंय ते तो घेईल. सोबत ब्रेड बटर.''

''नको, त्यापेक्षा सँडविचेस मागवू.''

''हे बघा, तुम्ही सँडविच मागवा नायतर ब्रेडबटर मागवा.... पण लाल्यासाठी चहाबरोबर केचप पण मागवा.''

''आँ??''

''काय राव, विसरलात का.... कॉलेजात असताना आपण वेंकीजला गेलेलो.... लै बिल झालं व्हतं.... तर ह्या पठ्ठ्यानं टेबलावरच्या केचपची बाटली सरळ चहात उपडी केलेली.... म्हणे पैशान् पैशाची किंमत वसूल केली पायजेल.... काय तुमी... विसरलात येवढ्यात?!!!''

''ए पण मला इथला कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट ट्राय करायचा होता ना!'' सूझन मधूनच गळा काढते.

''सुझू, तू तुझ्या घों बरोबर येशील ना इथं तेव्हा ट्राय कर हां कॉन्टिनेन्टल.... आत्ता आपण मेजॉरिटी बघतोय ना...'' आंद्याचा सूझनला प्रेमळ स्वरात समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न.

''आंद्या, लेका, बायकोशी बोलतोस का रे इतका प्रेमाने.... बिच्चारी परवा फोनवर इतकी वैतागली होती!!''साना आंद्याला टोकते. लगेच स्मिता तिची 'री' ओढते. दोघींची सवयच आहे तशी.

खंडू अस्वस्थपणे केसांतून हात फिरवतोय. त्याला सिगरेट सोडून जेमतेम आठ दिवस झालेत. पण जरा आजूबाजूला सिगरेटच्या धुराचा वास आला की तो लगेच अस्वस्थ होत असतो.

''ए विन्या, तुझी बायडी आणि पोर ठीक आहेत. चांगली डाराडूर झोपली आहेत ना वर तुमच्या खोलीत? आम्ही तू राजस्थानातून इथं आला आहेस सुट्टीसाठी, म्हणून खास तुझ्यासाठी जमलो आहोत बरं का इथं! तेव्हा तो मोबाईल बाजूला ठेव आणि बोल गुमान आमच्याशी!!'' शैलीचा धमकावणीचा स्वर.

''आरे, पण चा-कॉफीचं कायतरी सांगा नं राव...!!!'' इतका वेळ गप्प बसलेला मट्टू उसळून म्हणतो. त्याच्या चेहर्‍यावरून त्याला भूक लागली आहे हे स्पष्ट दिसतंय. पण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.

सँडविच की ब्रेड-बटर की चीज-टोस्ट..... की कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट.... चहा की कॉफी की पॉट टी....

घोळवून घोळवून, एकमेकांना ढोसत, चिमकुटे काढत, फटकारत चर्चा चालूच राहते.

एवढा वेळ अदबीने उभा राहिलेला वेटर वैतागून हातातली वही-पेन्सिल परजतो आणि जरा खाकरतो.

''मी एक सजेस्ट करू का सर?''

''हा, बोल...''

''तुम्ही जी असेल ती ऑर्डर देऊन टाका, नंतर काय हवं-नको ते मागवता येईल...''

''हम्म्म... गुड... गुड... बरं, असं कर...'' आंद्याचं उरलेलं बोलणं स्मिताच्या किंकाळीत नाहीसं होतं....

सगळेजण दचकून तिच्याकडे पाहू लागतात, तर ती खिडकीतून बाहेर बघत असते.... 'ए, ए, ते बघ खारीचं पिल्लू!!!!!!'' कोवळ्या उन्हात टुकूरमुकूर बघत एक खारीचं पिल्लू तुरुतुरु खिडकीजवळ आलेलं असतं. त्याला बघायला साना आणि श्वेताही पुढे झेपावतात. खंडू कपाळ बडवून घेतो. बाकीचे लोक सुटकेचा नि:श्वास टाकतात.

''मग विनू, बायडीला फिरवलंस की नाही इथं? शॉपिंग केलंस की नै काही?'' शैली मुलाखतकाराच्या आवेशात विनूला टोकरू लागते. शॉपिंग चं नाव काढता क्षणी विनू शहारतो, त्याच्या चेहर्‍यावरचे झरझर बदलणारे भाव जाम कॉमेडी असतात. त्याची कणव येऊन पर्‍या मध्येच आपलं नाक खुपसतो आणि विन्याच्या गेल्या भेटीनंतर शहरात किती बदल झालेत ह्याची चर्चा सुरू करतो. सगळेजण अहमहमिकेने आपापली मते, दृष्टिकोन, विचार इत्यादी इत्यादी मांडतात. चर्चा रंगत असतानाच चहा-कॉफी व बाकीची ऑर्डर येते.

कॉलेजातील आठवणींना स्मरून मीठ मिरपुडीला चहा-कॉफीत मिसळण्याची ऑफर आग्रहाने केली जाते. कॉलेजातील तेलकट वडा-पाव आणि कळकट कपातील चहाच्या उकळपाण्याच्या आठवणीने क्षणभर काहीजणांचे गळे भरून येतात. मधूनच हास्याचे फवारे, मधूनच खेचाखेची, काटे-चमच्यांची पळवापळवी असले माकड उद्योग चालूच असतात.

काटे-चमचे-कप-बश्यांच्या किणकिणाटासोबत संभाषणाचे स्वर हेलकावे घेत राहतात.

चर्चेची गाडी रस्त्यांची खराब अवस्था, पेट्रोलचे चढते भाव, मुलांच्या शाळांच्या अवाढव्य फिया, नवा सिनेमा, आवडते हिरोऱ्हिरॉईन अशा अनेक वळणा-वळणांनी सरकत पुढे जात राहते.

बघता बघता नऊ वाजून जातात. बाहेर लख्ख ऊन पडलेले असते. दूरवर ट्रॅफिकचा आवाज शहर पुरते जागे झाल्याची साक्ष देत असतो. कॉफी शॉपमध्ये आता लोकांची वर्दळ वाढलेली असते. एक-दोनदा वेटर आमच्या टेबलांपाशी घुटमळून जातो. पण त्याला हातानेच ''नंतर ये'' ची खूण केली जाते.

संभाषणाच्या आवर्तात पर्‍यानं शहरात आपलं पाचवं दुकान खोललं आहे आणि गेल्याच महिन्यात स्वारीने राजकारणात प्रवेश केलाय ही बातमी कळते. खंडूच्या साखर कारखान्याला यंदा चांगला नफा झालाय. त्यामुळे कारखानदार साहेब खूश आहेत. त्याच्याकडूनच आज हजर नसलेल्या जग्गूची बातमी कळते. जग्गूच्या मालकीची बागायती जमीन आहे बरीच एकर. शेतीचं काम निघाल्यामुळेच त्याला यायची फुरसत झालेली नसते.

सुभ्या त्याच्या नव्या बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये एक मोठं देऊळ बांधतोय. त्याच्या वडिलांच्या नावाने त्याला तिथे दरवर्षी सांस्कृतिक उत्सव सुरू करायचाय. दीपाचा डिवोर्स फायनल झाल्याची बातमी कुजबुजत सांगितली जाते. सुशांत तिला गुंतवणुकीचे सल्ले देतोय म्हणे! विनू लाजत आपल्याकडे दुसर्‍यांदा गुड न्यूज असल्याचे कन्फर्म करतो. मट्टूला मॅजिस्ट्रेटच्या पोस्टचा कंटाळा आलाय. त्याला पुन्हा प्रॅक्टिस सुरू करायची आहे. सानाचं बाळ आता तीन वर्षांचं झालंय, आपल्या मोबाईलमधले बाळाचे फोटो ती सर्वांना कौतुकाने दाखवत आहे. सूझनचं बूटिक मस्त चाललंय. तिला तिचा बिझनेस वाढवायचाय.....

अचानक शैलीचा मोबाईल घणघणतो. ''येस बेबीऽऽ..... एक्स्क्यूज मी प्लीऽज...'' म्हणत ती जागेवरून उठून एका कोपर्‍यात जाऊन मोबाईलमध्ये लाडं लाडं बोलत राहते. मग टेबलापाशी येऊन ''सॉरी हां लोक्स! मला घरी जायला हवं... आमचं पिल्लू उठलंय मगाशीच आणि ममाच हवीए म्हणून गळा काढलाय...'' असे म्हणत खांद्याला पर्स लटकवते. तिला तिच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी खंडू लगबगीने उठतो. मट्टू आणि पर्‍या सर्वांचा एक घाईघाईतला ग्रुप फोटो घेतात.

शैलीच्या निघण्यासरशी इतर मंडळींना वेळेचं भान येऊ लागतं.

''ओ गॉड! दहा वाजत आले.... नो वंडर! ए मलाही गेलंच पाहिजे...'' स्मिता चित्कारते. एकेक करत ललना वर्ग कॉफी शॉपमधून पाय काढू लागतो. व्हिजिटिंग कार्डस् ची देवाण-घेवाण होते.

सुभ्या देखील बरीच कामं आहेत असे म्हणत निघाल्यावर त्याला दमदाटी करून पुन्हा बळजबरीने जागेवर बसविण्यात येतं. खिशांतून सिगरेट पाकिटं-लायटर बाहेर येतात. नाश्त्याचा अजून एक राउंड होतो. कॉलेजच्या आठवणी, जुनी प्रेमप्रकरणं, बाज्याचा अपघाती मृत्यू, शर्‍याला निघालेला डायबिटीस, वाढणारं वजन, विरळ होत चाललेले केस....

विन्याचा मोबाईल वाजतो. पलीकडून एक बायकी स्वर जरा घुश्शातच काहीतरी विचारतो. विन्या थयुं थयुं करत काहीतरी उत्तर देतो. इतरांना बरोब्बर त्या फोनचा अर्थ कळलेला असतो. खिशातून पैशाची पाकिटे काढली जातात. इतका वेळ कोपर्‍यात सरकवून ठेवलेले बिल चुकते केले जाते.

''ए नेक्स्ट टाइम आपण कोठेतरी पिकनिकला जाऊयात. मस्त लाँग ड्राइव्ह किंवा बीचवर कोठेतरी.... व्हॉट से?''

सर्वांनाच नुसत्या कल्पनेनेही हुरूप चढतो. मनातल्या मनात त्या पिकनिकचे प्लॅनिंगही सुरू होते....

पुन्हा एकदा कोणाचा तरी मोबाईल वाजतो. लोकांना आपण घरी निघालो होतो ह्याची आठवण येते. एकमेकांशी हस्तांदोलन करून निरोपानिरोपी होते. फोन, ईमेल, भेटीची आश्वासने दिली घेतली जातात. आपापल्या गाड्यांच्या दिशेने लोकांचे मोर्चे वळतात.

फारसं महत्त्वाचं असं काहीच बोलणं झालेलं नसतं. तरीही मनावर अनामिक आनंदाची सुस्ती दाटलेली असते. चेहर्‍यावर विलसत असते एक खुळे हास्य. बोलून बोलून आणि हसून खिदळून गाल दुखत असतात. अनेक दिवसांनी सगळेजण आपापली पदे, जबाबदार्‍या, व्याप विसरून जुन्या मैत्रीच्या अनौपचारिक आणि निखळ वातावरणात मनावरचे ताण विसरलेले असतात. थोड्याच वेळात जणू त्यांना आपलं तारुण्य परत मिळालेलं असतं. मनावरचं दडपण दूर झालेलं असतं. अल्लड, टपोर्‍या वयातील गुलनार आठवणी जागवून काळजात एक नवा उत्साह नाचू लागलेला असतो. विसर पडलेली स्वप्ने पुन्हा खुणावू लागलेली.... आणि त्याचवेळी मनाची व्यवहारी बाजूही जागी झालेली....आळसाची वेळ संपल्याचे संकेत येऊ लागतात.... नकळतच पुढच्या आठवड्याचे प्लॅन्स मनात घोळू लागतात.

रविवारची एक सुरम्य सकाळ आता ओसरलेली असते.

-- अरुंधती

**********************************************************************************

हे असंच जाता जाता सुचलेलं! वरील ललितामधील सर्व पात्रे काल्पनिक आहेत व त्यांचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा! :-P    

Tuesday, January 25, 2011

शबद गुरबानी


काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

काही काळाने माझ्या एका जाट मैत्रिणीने माझा परिचय शबद साहित्याशी करून दिला. तिच्यासोबत काही गुरुद्वारांमध्ये जाऊन तेथील वातावरण अनुभवायचा, लंगराचा तसेच शबद कीर्तन ऐकायचा योगही जुळून आला. एका नव्या दुनियेचे द्वारच जणू माझ्यासाठी खुले झाले!

शबद म्हणजे शीख संप्रदायाच्या धार्मिक ग्रंथांमधील आणि गुरु ग्रंथ साहिबातील पवित्र रचना. त्यात त्यांची सूक्ते/सूत्रे, परिच्छेद किंवा पवित्र ग्रंथांचा काही भाग अंतर्भूत असू शकतो. त्याची भाषालिपी आहे गुरुमुखी. शबदचा दुसरा अर्थ म्हणजे वाहेगुरू किंवा परमेश्वर. शीख संप्रदायाचा सर्वात प्रथम असा पवित्र ग्रंथ म्हणजे गुरु ग्रंथ साहेब. त्याची सुरुवातच मूल मंतर किंवा मूल मंत्राने होते. आठवतोय 'रंग दे बसंती' हा हिंदी चित्रपट? त्यात ह्या मूल मंत्राचा फार सुरेख उपयोग केला आहे :

इक ओंकार सतिनामु कर्ता पुरख निरभउ निरवैर अकालमूरति अजूनी सैभं गुरुप्रसादि || 

जपु

आदि सचु जुगादि सचु है भी सचु नानक होसी भी सचु ||१||

इक ओंकार : एकच निर्माता / ईश्वर
सतिनामु : त्याचे नाम सत्य
कर्ता पुरख : निर्माता पालनकर्ता
निरभउ : निर्भय
निरवैर : ज्याला कोणी वैरी नाही असा
अकालमूरति : आदिमूर्ती
अजूनी : जो कधी जन्मला नाही असा
सैभं : स्वयंभू
गुरुप्रसादि :  गुरुची कृपा
जपु : जप (जप करा व ध्यान)
आदि सचु : आदिसत्य
जुगादि सचु : युगातीत सत्य
है भी सचु : आताही सत्य
नानक : गुरु नानक
होसी भी सचु : कायम सत्य राहील.

एकच ईश्वर, सतनाम, निर्माता पालनकर्ता, निर्भय, वैरभाव विहीन, आदिमूर्ती, कालातीत, स्वयंभू, गुरूकृपेमुळे ज्ञात. 

जप ( जप व ध्यान करा.)

आदिम सत्य, युगातीत सत्य, आजही सत्य, हे नानक, पुढेही कायम सत्य राहील. 


दहा गुरू 
मला कायम वाटत आलं आहे की शबद हे '' शब्द '' चे अपभ्रष्ट रूप असावे. शबद कीर्तन हा अतिशय श्रवणीय असा भक्तिपूर्ण संगीत सोहळा असतो. गुरु ग्रंथ साहिबातील सर्व शबद हे वेगवेगळ्या रागांमध्ये गुंफले असून ते तसेच गायले जातात. सुरुवातीची जपजी साहिब ही रचना व शेवटचा काही भाग सोडला तर उर्वरित सर्व ग्रंथातील रचना ह्या निरनिराळ्या एकतीस रागांमध्ये आहेत. अनुक्रमे श्री, मांझ, गौरी, असा, गुजरी, देवगंधारी, बिहागरा, वदहंस, सोरथ, धनश्री, जैतश्री, तोडी, बैरारी, तिलंग, सूही, बिलावल, गौंड, रामकली, नट-नारायण, मालिगौर, मरु, तुखार, केदार, भैरव (भैरो), बसंत, सारंग, मलार (मल्हार), कानरा (कानडा), कल्याण, प्रभाती आणि जयजयवंती ह्या रागांमध्ये ह्या सर्व रचना आहेत असे ग्रंथ साहिब सांगतो.
(संदर्भ :  http://www.sikhiwiki.org/index.php/Sikh_Ragas )
त्यांमध्ये द्विपदी, चौपदी, पंचपदी, षट्पदी, अष्टपदी व षोडशपदी रचना आहेत.

ह्या रचना शीख परंपरेतील वेगवेगळ्या गुरुंच्या असून त्यात गुरु नानक, गुरु राम दास, गुरु अर्जुन दास यांच्या रचनांबरोबरच संत रविदास, संत कबीर ह्यांसह शेख़ खरीद, जयदेव, त्रिलोचन, सधना, नामदेव, वेणी, रामानन्द, पीपा, सैठा, धन्ना, भीखन, परमानन्द आणि सूरदास अशा पंधरा संतांच्या अनेक रचना गुरु ग्रंथ साहिबचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. एवढेच नव्हे तर अन्य चौदा कवींच्या भावगर्भी रचनांचा ग्रंथ साहिबात समावेश आहे. ते रचनाकार म्हणजे हरिबंस, बल्हा, मथुरा, गयन्द, नल्ह, भल्ल, सल्ह भिक्खा, कीरत, भाई मरदाना, सुन्दरदास, राइ बलवंड तसेच सत्ता डूम, कलसहार, जालप हे होत. प्रत्येक शबद हा भक्तिरसाने, उत्कट भावाने परिपूर्ण असून मानवतेचा, परमार्थाचा संदेश देणारा आहे.

ग्रंथसाहिबातील सर्व साहित्य हे गुरबानी म्हणून ओळखले जाते. नानकांच्या अनुसार गुरबानी थेट ईश्वराकडून आली आणि लेखकांनी ती भक्तांसाठी लिखित स्वरूपात, गुरुमुखी लिपीत आणली. नानकांच्या संत परंपरेत गुरु म्हणजे साक्षात ईश्वराची वाणी होती. नानकांनंतर झालेल्या प्रत्येक गुरुंनी आपल्या रचनांना गुरबानीत समाविष्ट केले. गुरु गोविंद सिंग हे ह्या परंपरेतील शेवटचे गुरु होत. त्यांच्या नंतर शीख संप्रदाय हा 'गुरु ग्रंथसाहिब'लाच कायमच्या गुरुस्थानी मानू लागला.  

हिंदू व मुसलमान यांचा ईश्वर एकच आहे, ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत आणि ईश्वरासाठी सर्वजण समान आहेत हा उपदेश करताना गुरु नानकांनी सर्व धर्मांमधील चांगल्या गोष्टी एकत्रित केल्या. मनुष्याने सतत चांगली कर्मे करावीत म्हणजे ईश्वराच्या दरबारी त्याला शरमिंदे व्हावे लागणार नाही अशा अर्थीच्या शबद रचना ग्रंथ साहेबात जागोजागी आढळतात. पंजाबी, ब्रज, हिंदी, संस्कृत, पर्शियन तसेच स्थानिक भाषांतील साहित्याचा ह्यात समावेश आहे. मध्ययुगीन संतभाषेतील साहित्यही त्यात आढळते. शीख संप्रदायाचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून गणल्या जाणार्‍या गुरु ग्रंथ साहिबचे संपादन पाचवे गुरु अर्जुन सिंग देव यांनी केले. ह्या ग्रंथाचे प्रकाशन १६ ऑगस्ट १६०४ रोजी अमृतसरच्या हरिमंदिर साहिब मध्ये झाले. गुरु ग्रंथ साहिबात एकूण १४३० पृष्ठे आहेत. दहावे गुरु गोविंद सिंह यांनी इ.स. १७०५ मध्ये ह्या ग्रंथास पूर्ण केले. फक्त शीख गुरुच नव्हे तर तत्कालीन अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांची वाणी समाविष्ट करण्यात आलेला हा ग्रंथ जातीपाती, भेदभाव यांपलीकडे जातो. आपल्या सरळ, सुबोध भाषेमुळे सर्वसामान्य माणसास तो समजण्यासही सोपा जातो. त्यातील भाषा रसाळ, अर्थगर्भ असून अभिव्यक्ती, चिंतन, दार्शनिकता व त्यातून जनमानसास दिला जाणारा संदेश बघू जाता गुरु ग्रंथ साहेबाचे आगळे स्थान लक्षात येऊ लागते. जगातील सर्व मानवांना समान लेखणारा, स्त्रियांना घरात व समाजात आदराचे स्थान देणारा, सर्वांचा ईश्वर हा एकच आहे हे ठासून सांगणारा, सचोटीने जगण्या-बोलण्याचा संदेश देणारा, काम-क्रोध-लोभ-मोह-मद ह्यांसारख्या पंचरिपूंना दूर ठेवायला सांगणारा, कर्मवादाला मान्यता देणारा, आत्मनिरीक्षण व ध्यानाचे महत्त्व समजावणारा, लोककल्याणाला प्रेरक असा गुरु ग्रंथ साहिबातील संदेश व्यवहारातही मधुर शब्द वापरण्याची व विनम्रतेने वागण्याची शिकवण देतो.

गुरू अर्जुन देव रचना सांगत आहेत 

शबद साहित्याचा माझा स्वतःचा अजिबात अभ्यास नाही. पण अनेकदा कानावर पडलेल्या शबद रचना ऐकून काही रचनांचे अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली. त्याविषयी थोडे थोडे वाचन सुरू झाले. आणि जाणवले, हा तर अनमोल खजिना आहे!! संतसाहित्य वाचताना मनात जे आनंदतरंग उमटतात तेच आनंदतरंग हे साहित्य वाचताना जाणवत राहतात. कधी निश्चेष्ट पडलेल्या मनाला खडबडून जागे करतात तर कधी आपल्या आर्त सुराने त्यातील तळमळ आपल्यापर्यंत पोहोचवितात. काही ठिकाणी हे शबद पढत पांडित्यावर ताशेरे ओढतात, काही ठिकाणी समाजातील अंधश्रद्धा, पाखंडी वृत्ती,  अनिष्ट चालीरीतींवर कडकडून टीका करतात. आणि काही स्थळी हेच शबद इतके मृदू - मुलायम, लडिवाळ होतात की जणू रेशमाच्या लडीच!

गुरु अर्जुन सिंग देव रचित सुखमनी साहिब मध्ये ते सांगतात :

सुखमनीसुख अमृत प्रभु नामु।
भगत जनां के मन बिसरामु॥

भक्तांच्या मनाला सुख देणारी, प्रसन्नता देणारी अशी ही अमृतवाणी आहे.

गुरुचा महिमा, गुरुची थोरवी आणि गुरुप्रती समर्पण भावनेने आकंठ न्हालेले हे शबद ऐकणे म्हणजेही श्रवणेंद्रियांना अपार समाधान देणारा अनुभव असतो. ती भाषा न कळणार्‍यालाही त्यातील स्वर भावतात. आणि जर तुम्हाला गायल्या जात असलेल्या शबदचा अर्थ कळत असेल तर मग भावमधुर रसाच्या भक्तीसागरात बुडून जाण्यात अजूनच आनंद मिळतो!

मेरा सतिगुरु रखवाला होआ ॥
धारि क्रिपा प्रभ हाथ दे राखिआ हरि गोविदु नवा निरोआ ॥१॥ रहाउ ॥
तापु गइआ प्रभि आपि मिटाइआ जन की लाज रखाई ॥
साधसंगति ते सभ फल पाए सतिगुर कै बलि जांई ॥१॥
हलतु पलतु प्रभ दोवै सवारे हमरा गुणु अवगुणु न बीचारिआ ॥
अटल बचनु नानक गुर तेरा सफल करु मसतकि धारिआ ॥२॥२१॥४९॥

अर्थ :  माझा सतगुरु हाच माझा रक्षक आणि त्राता आहे. ईश्वराने आपल्या दयेचा व कृपेचा वर्षाव करून हर गोविंद सिंगाला वाचविले, जो आता सुरक्षित आहे. ताप निवाला, ईश्वरानेच त्याला घालविले आणि त्याच्या सेवकाची लाज राखली. साध संगतीचे (साधुजनांचे) आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी सतगुरुला समर्पित आहे. ईश्वराने मला इथवर आणि इथून पुढेही वाचवले. त्याने माझी पापपुण्ये विचारात घेतली नाहीत. हे गुरु नानक, तुमचा शब्द अमर आहे, अटळ आहे. तुम्ही तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या ललाटी ठेवलात!

सगल वनस्पति महि बैसन्तरु सगल दूध महि घीआ।।
ऊँच-नीच महि जोति समाणी, घटि-घटि माथउ जीआ।।

गुरु अर्जुन देव ह्या रचनेत सांगतात, ज्याप्रमाणे सर्व वनस्पतींमध्ये आग सामावली आहे, ज्याप्रमाणे दुधात तूप मिसळले जाते त्याप्रमाणे परमात्मा हा सर्वव्यापी आहे. तो उच्च-नीच सर्वांमध्ये व्याप्त आहे, घटा-घटांत तो सामावलेला आहे.

ह्या गुरूमुखी भाषेचा गोडवा, लय, ठसका आणि भावमधुरता पार हृदयाला भिडणारी! पंजाबच्या मातीत जन्मलेल्या या रचना तेथील माणसांसारख्याच उत्कट आणि विलक्षण ताकदीच्या!

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर संस्कार चॅनलवर शबद कीर्तन-पाठ सुरू झाले तसे शीख संप्रदायाखेरीज अन्य लोकांनाही घरबसल्या या शबदांचा आनंद घेता येऊ लागला. आजवर अनेक प्रख्यात गायक - गायिकांनी आपल्या स्वरसाजाने ह्या रचनांना अजूनच नटविले आहे. जगजीत सिंग - चित्रा सिंग, हंस-राज-हंस, आशा भोसले, अनुराधा पौडवाल यांखेरीज शीख संप्रदायातील अनेक गायक भक्तांनी आपल्या सुरांनी त्या रचना सामान्यजनांपर्यंत पोहोचविल्या आहेत. चित्रा रॉय यांच्या सुस्वर आवाजात भक्तिरसाने परिपूर्ण अशा ह्या शबदना ऐकणे म्हणजे तर प्रासादिक अनुभव!

माझ्या आवडीच्या, नेहमीच्या ऐकण्यातील काही सुमधुर शबद रचना इथे देत आहे :

माझ्या आवडीच्या काही शबद रचना : 

दसम ग्रंथातील ही शबद रचना माझी विशेष लाडकी आहे. ह्या शबदची रचना श्री गुरु गोविंद सिंहजी यांची असून असे सांगितले जाते की चमकौर येथील लढाईत आपल्या डोळ्यांसमोर आपल्या पुत्रांना वीरमरण येताना पाहिलेल्या गुरु गोविंद सिंहजींनी त्या थंडीच्या रात्री ही आपल्या ईश्वराला, वाहेगुरुला आर्त साद घातली.

गुरू गोविन्द सिंह जी गुरू नानक यांना भेटत असल्याचे काल्पनिक चित्र 

१] अंग : १, दसम ग्रंथ, लेखक : गुरु गोविंद सिंह 

गायिका : चित्रा रॉय यांच्या स्वरात येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/mitar-piyaare

मित्र पिआरे नूं हाल मुरीदां दा कहिणा ॥
तुधु बिनु रोगु रजाईआं दा ओढण नाग निवासां दे रहिणा ॥
सूल सुराही खंजरु पिआला बिंग कसाईआं दा सहिणा ॥
यारड़े दा सानूं स्थरु चंगा भ्ठ खेड़िआं दा रहिणा ॥१॥१॥

माझ्या प्रिय सख्याला त्याच्या शिष्याची काय स्थिती झाली आहे ते कळवा. तुझ्याशिवाय ऊबदार रजई अंगावर ओढणं म्हणजे रोगासमान आहे आणि घरात राहणं हे सापांबरोबर राहण्यासारखं आहे. पाण्याची सुरई सुळासारखी आहे, प्याला खंजिरासमान आहे. तुझा विरह हा कसायाचा सुरा अंगावर चालताना सहन करावा तसा आहे. प्रियतम सख्याची गवताची शय्या ही सर्वात सुखकारी आहे आणि बाकी सारी भौतिक सुखे ही भट्टीसारखी (जाळणारी) आहेत.  

२] अंग : १२०९, राग : सारंग, लेखक : गुरु अर्जुन देव जी

मेरा मनु एकै ही प्रिअ मांगै : ऐका इथे : http://www.sikhnet.com/audio/mera-maan

मेरा मनु एकै ही प्रिअ मांगै ॥
पेखि आइओ सरब थान देस प्रिअ रोम न समसरि लागै ॥१॥ रहाउ ॥
मै नीरे अनिक भोजन बहु बिंजन तिन सिउ द्रिसटि न करै रुचांगै ॥
हरि रसु चाहै प्रिअ प्रिअ मुखि टेरै जिउ अलि कमला लोभांगै ॥१॥
गुण निधान मनमोहन लालन सुखदाई सरबांगै ॥
गुरि नानक प्रभ पाहि पठाइओ मिलहु सखा गलि लागै ॥२॥५॥२८॥

माझे मन ईश्वरासाठी व्याकुळ झाले आहे. मी सर्व देशांतील सर्व जागा शोधल्या...पण कशालाही माझ्या प्रियतमाच्या केसाचीही सर नाही. माझ्यासमोर सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम मिठाया, पेये, पदार्थ ठेवलेले आहेत, पण मला त्यांच्याकडे बघायचीही इच्छा होत नाही. मला फक्त सुमधुर अशा हरी रसाची आस आहे, जसा एखादा भुंगा कमळासाठी झुरतो त्याप्रमाणे मी ''प्रिया प्रिया'' अशी माझ्या प्रियतमाला हाक मारत झुरतो आहे.
गुणनिधान, मनमोहन असा माझा प्रियतम सर्वांना सुख-शांती देणारा आहे. गुरु नानकांनी मला तुझा रस्ता दाखवला. हे ईश्वरा, मला भेट. हे माझ्या सख्या, मला आपल्या मिठीत सामावून घे.

३] अंग : ७४९, राग : सूही, लेखक : गुरु अर्जुन देव जी

मेरे साहिब : ऐका इथे : http://www.sikhnet.com/audio/mere-saheb

आशाताई भोसले यांच्या स्वरात : http://www.sikhnet.com/audio/mere-sahib-mere-sahib

तुधु चिति आए महा अनंदा जिसु विसरहि सो मरि जाए ॥
दइआलु होवहि जिसु ऊपरि करते सो तुधु सदा धिआए ॥१॥
मेरे साहिब तूं मै माणु निमाणी ॥
अरदासि करी प्रभ अपने आगै सुणि सुणि जीवा तेरी बाणी ॥१॥ रहाउ ॥
चरण धूड़ि तेरे जन की होवा तेरे दरसन कउ बलि जाई ॥
अम्रित बचन रिदै उरि धारी तउ किरपा ते संगु पाई ॥२॥
अंतर की गति तुधु पहि सारी तुधु जेवडु अवरु न कोई ॥
जिस नो लाइ लैहि सो लागै भगतु तुहारा सोई ॥३॥
दुइ कर जोड़ि मागउ इकु दाना साहिबि तुठै पावा ॥
सासि सासि नानकु आराधे आठ पहर गुण गावा ॥४॥९॥५६॥

तू जेव्हा मनात येतोस तेव्हा मी परमानंदात बुडून जातो. इतका, की तू जिवंत आहेस की मृत याचीही तमा उरत नाही! ज्या जीवावर तू आपल्या परम दयेची कृपा केलीस, हे निर्मात्या ईश्वरा, तो (जीव) सदोदित तुझेच ध्यान करतो. हे माझ्या स्वामी, तू माझ्यासारख्या पतितांचा, मानहीनांचा सन्मान आहेस. माझी प्रार्थना मी तुला अर्पण करतो, हे ईश्वरा, तुझ्या वाणीचे शब्द ऐकत ऐकत मी जगतो. तुझ्या विनम्र चाकरांच्या चरणांची रजोधूळ बनण्याचे भाग्य मला लाभो. तुझ्या दर्शनाच्या परमसुखासाठी मी तुला शरण जातो.  तुझ्या अमृतवाणीची मी माझ्या हृदयात पूजा बांधली आहे. तुझ्या कृपेने मला साधुसंगती लाभली आहे. माझे अंतरंग तू जाणतोसच, तुझ्याखेरीज अन्य कोणाचे महत्त्व नाही. तू ज्याला संगे ठेवतोस तोच तुझ्याबरोबर राहतो, तोच तुझा भक्त. हे माझ्या स्वामी, माझे दोन्ही हात जोडून मी तुझ्याकडे ह्या एका भेटीची याचना करतो, तू प्रसन्न झालास तर मला ती मिळेल. प्रत्येक श्वासागणिक नानक तुझी आराधना करतो, अष्टौप्रहर तुझी स्तुतीकवने गातो.  

संत रवि दास     

४] अंग : ६५८, राग : सोरथ, लेखक : संत रविदासजी

तुम सिउ जोरी : भावमधुर रचना येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/tumse-jori

जउ तुम गिरिवर तउ हम मोरा ॥
जउ तुम चंद तउ हम भए है चकोरा ॥१॥
माधवे तुम न तोरहु तउ हम नही तोरहि ॥
तुम सिउ तोरि कवन सिउ जोरहि ॥१॥ रहाउ ॥
जउ तुम दीवरा तउ हम बाती ॥
जउ तुम तीरथ तउ हम जाती ॥२॥
साची प्रीति हम तुम सिउ जोरी ॥
तुम सिउ जोरि अवर संगि तोरी ॥३॥
जह जह जाउ तहा तेरी सेवा ॥
तुम सो ठाकुरु अउरु न देवा ॥४॥
तुमरे भजन कटहि जम फांसा ॥
भगति हेत गावै रविदासा ॥५॥५॥

तू जर पर्वत आहेस, तर हे ईश्वरा, मी मयूर आहे. तू चंद्रमा असलास तर मी चकोर आहे.
तू माझा संग सोडला नाहीस तर मीही तुझा संग सोडणार नाही. कारण तुझा संग सोडून तो मी दुसर्‍या कोणाशी जोडू? तू जर दिवा असशील तर मी त्यातील वात आहे, तू जर तीर्थक्षेत्र असशील तर मी तुझ्या तीर्थाचा पथिक आहे. हे ईश्वरा, तुझ्या संगे माझी प्रीत जुळली आहे. मी आता तुझ्याच संगे आहे आणि इतरांशी माझा संग मी तोडला आहे. जिथे जिथे मी जातो तिथे तिथे तुझ्या सेवेत असतो. हे परमेश्वरा, तुझ्याखेरीज अन्य स्वामी नाही. तुझे ध्यान करून मृत्यूचा फासही तुटतो. तुझ्या भक्तीपायी तुझी आराधना करत रविदास तुझे स्तुतिगान करत आहे.


५] अंग : १३७५, लेखक : संत कबीर (सालोक रचना) 

संत कबीर यांची ही उत्कट भावाने ओतप्रोत रचना : http://www.sikhnet.com/audio/mera-mujhme

कबीर मेरा मुझ महि किछु नही जो किछु है सो तेरा ॥
तेरा तुझ कउ सउपते किआ लागै मेरा ॥२०३॥
कबीर तूं तूं करता तू हूआ मुझ महि रहा न हूं ॥
जब आपा पर का मिटि गइआ जत देखउ तत तू ॥२०४॥
कबीर बिकारह चितवते झूठे करते आस ॥
मनोरथु कोइ न पूरिओ चाले ऊठि निरास ॥२०५॥

माझ्यातलं काहीही माझं उरलं नाही. कबीर म्हणतो, जे जे काही आहे ते तुझंच आहे, हे ईश्वरा! मी तुला शरण जातो ते तुझंच तुला अर्पण करतो. त्याचं मला काय? (मला त्याची काहीच किंमत मोजायला लागत नाही.) कबीर म्हणतो, ''तू, तू'' पुन्हा पुन्हा जपत राहिल्याने मी तुझ्यासारखाच झालोय रे! माझ्यात माझं असं काही उरलंच नाही. माझ्यातला आणि इतरांमधला भेद मिटला तेव्हा जिथे जिथे मी पाहतो तिथे तिथे फक्त तूच नजरेला येतोस. कबीर म्हणतो, जे जे दुष्ट विचार करतात किंवा खोटी आशा करतात त्यांचे कोणतेही मनोरथ पूर्ण होत नाहीत आणि ते निराश होऊन परततात.

संत कबीर 

६] अंग : ७४२, राग : सूही, लेखक : गुरु अर्जुन देव जी

दरसनु देखि : येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/darsan-dekh-jeevan

दरसनु देखि जीवा गुर तेरा ॥
पूरन करमु होइ प्रभ मेरा ॥१॥
इह बेनंती सुणि प्रभ मेरे ॥
देहि नामु करि अपणे चेरे ॥१॥ रहाउ ॥
अपणी सरणि राखु प्रभ दाते ॥
गुर प्रसादि किनै विरलै जाते ॥२॥
सुनहु बिनउ प्रभ मेरे मीता ॥
चरण कमल वसहि मेरै चीता ॥३॥
नानकु एक करै अरदासि ॥
विसरु नाही पूरन गुणतासि ॥४॥१८॥२४॥

तुझ्या कृपादर्शनाकडे नजर लावून मी जगत आहे. हे मम ईश्वरा, माझे कर्म पूर्ण आहे. माझ्या देवा, ह्या प्रार्थनेला कृपा करुन ऐकावेस. मला तुझ्या नामाचा आशीर्वाद दे, मला तुझी छाया, तुझा शिष्य बनव. हे ईश्वरा, मला तुझ्या छत्रछायेखाली ठेव. फार थोड्यांना हे गुरुकृपेमुळे आकळते. माझ्या सख्या, माझी प्रार्थना ऐक ना रे! तुझे चरणकमल कायम माझ्या चित्ती वसू देत. हे पूर्ण गुणनिधाना, नानक एकच प्रार्थना करतो, मला तुझे विस्मरण कधीही न घडो!  

७] अंग : ११४२, राग : भैरो, लेखक : गुरु अर्जुन देव जी

गुर जैसा : इथे ऐका ही सुमधुर रचना : http://www.sikhnet.com/audio/gur-jaisa

सतिगुरु मेरा बेमुहताजु ॥
सतिगुर मेरे सचा साजु ॥
सतिगुरु मेरा सभस का दाता ॥
सतिगुरु मेरा पुरखु बिधाता ॥१॥
गुर जैसा नाही को देव ॥
जिसु मसतकि भागु सु लागा सेव ॥१॥ रहाउ ॥
सतिगुरु मेरा सरब प्रतिपालै ॥
सतिगुरु मेरा मारि जीवालै ॥
सतिगुर मेरे की वडिआई ॥
प्रगटु भई है सभनी थाई ॥२॥
सतिगुरु मेरा ताणु निताणु ॥
सतिगुरु मेरा घरि दीबाणु ॥
सतिगुर कै हउ सद बलि जाइआ ॥
प्रगटु मारगु जिनि करि दिखलाइआ ॥३॥
जिनि गुरु सेविआ तिसु भउ न बिआपै ॥
जिनि गुरु सेविआ तिसु दुखु न संतापै ॥
नानक सोधे सिम्रिति बेद ॥
पारब्रहम गुर नाही भेद ॥४॥११॥२४॥

माझा सतगुरु हा संपूर्ण स्वयंभू आहे. माझा सतगुरु सत्याने सजला आहे. माझा सतगुरु परमदाता आहे. माझा सतगुरु आद्य निर्माता, भाग्यविधाता आहे. गुरुसमान कोणतीही देवता नाही. ज्याच्या कपाळीचे भाग्य थोर तो सेवेला, नि:स्वार्थबुध्दीने सेवाकर्माला लागतो. माझा सतगुरु सर्वांचा पालनकर्ता, पोषविता आहे. तो संहार करतो आणि पुनर्निर्मितीही! माझ्या गुरुची महानता काय वर्णन करावी! जिथे तिथे तोच आहे. माझा सतगुरु दीनांची ताकद आहे. माझा सतगुरु माझे घर आणि दरबार आहे. अशा माझ्या सतगुरुला मी कायमचा शरण आहे.
त्याने मला सुमार्ग दाखविला. जो गुरुची सेवा करतो त्याला भीती शिवत नाही, वेदना सतावत नाही. नानकाने स्मृती व वेद अभ्यासले. परमेश्वर व गुरुत काही अंतर नाही.

गुरू नानक 

८] अंग : ९४, राग : मांझ, लेखक : गुरु रामदासजी

मै बिनु गुर देखे : ही सुंदर रचना येथे ऐका : http://www.sikhnet.com/audio/main-bin-guru

मधुसूदन मेरे मन तन प्राना ॥
हउ हरि बिनु दूजा अवरु न जाना ॥
कोई सजणु संतु मिलै वडभागी मै हरि प्रभु पिआरा दसै जीउ ॥१॥
हउ मनु तनु खोजी भालि भालाई ॥
किउ पिआरा प्रीतमु मिलै मेरी माई ॥
मिलि सतसंगति खोजु दसाई विचि संगति हरि प्रभु वसै जीउ ॥२॥
मेरा पिआरा प्रीतमु सतिगुरु रखवाला ॥
हम बारिक दीन करहु प्रतिपाला ॥
मेरा मात पिता गुरु सतिगुरु पूरा गुर जल मिलि कमलु विगसै जीउ ॥३॥
मै बिनु गुर देखे नीद न आवै ॥
मेरे मन तनि वेदन गुर बिरहु लगावै ॥
हरि हरि दइआ करहु गुरु मेलहु जन नानक गुर मिलि रहसै जीउ ॥४॥२॥

ईश्वर (मधुसूदन) हाच माझे शरीर, मन आणि श्वास आहे. मला ईश्वराखेरीज अन्य कोणी ठाऊक नाही. जर मला कोणी मार्ग दाखविणारा सहृदय संत मिळाला तर तो मला माझ्या प्रियतम ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सुचवू शकेल. मी माझं शरीर आणि मन खूप शोधलं. हे माझे माई, मला माझा प्रियतम कसा बरे भेटेल?
सतसंगतमध्ये भाग घेऊन मी ईश्वराचा मार्ग विचारतो. त्या सतसंगतमध्ये ईश्वर वास करतो. माझा सतगुरु माझा रक्षणकर्ता आहे. मी असहाय बालक आहे, माझं पालन कर. गुरु सतगुरु माझी माता आणि पिता आहे. गुरुकडून मिळणाऱ्या कृपारूपी जलाने माझे हृदयकमल उमलून आले आहे. सतगुरुला पाहिल्याशिवाय झोप येत नाही. माझं शरीर आणि मन गुरुच्या विरहाने व्याकुळ होते. हे हरी हरी, माझ्यावर कृपा कर की मी माझ्या गुरुला भेटू शकेन. गुरुभेटीने सेवक नानकाला जीवनदान मिळेल व तो बहरून येईल.

------------------------------------------------------------------------

एवढ्या सुंदर रचना वाचल्या - ऐकल्यावर लिहिण्यासारखे काहीही उरत नाही. तरीही, मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता ह्या रचनांमागील संतकवींची आर्तता, तळमळ, ध्येयासक्ती, विरागी भाव यांना वेगळाच पैलू प्राप्त होतो. आणि तरीही ह्या रचना कालातीत सत्य अधोरेखित करत जातात. त्यांच्यामधून मिळणारा पारमार्थिक संदेश हा अद्वितीय आहे. आज भारतात व भारताबाहेर शीख समाज सर्वदूर पसरला आहे. आपल्या बरोबरीने समाजात नांदणार्‍या, आपल्या समाजाचा व अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या शीख संप्रदायाच्या शिकवणीविषयी आणि त्यांच्या शबद साहित्याविषयी जाणून घेताना पुन्हा एकदा माझ्यासाठी अधोरेखित झालेले सत्य : सर्व धर्म एकच शिकवण देतात. मानवतेचा पुरस्कार करतात. श्रद्धेला जोपासतात. शांती, समानता, बंधुत्व, स्नेह, आदर यांनी युक्त आचरण व विचारांची शिदोरी देतात. ही वैश्विक शिकवण आहे. माणसां-माणसांमधील भेद, दुजाभाव, अंतर दूर करण्याचे ते एक मोठे साधन आहे. एकमेकांच्या धर्मांविषयी, श्रद्धांविषयी जाणून घेऊन, सहृदयता बाळगून आपण भविष्याची वाटचाल केली, संतांच्या शिकवणुकीचे प्रत्यक्षात आचरण केले तर त्यामुळे आपलाच मार्ग सुकर होणार आहे.

धन्यवाद!

--- अरुंधती

(वरील लेखाचे व फोटोंचे स्रोत : विकिपीडिया, शीख संप्रदायाची अनेक संकेतस्थळे, काही शीख स्नेही व माझ्याजवळील माहिती)