Friday, April 16, 2010

शोलेची आग


काही दशकांपूर्वी शोले चित्रपटाने सारा भारत गाजवला आणि हिंदी चित्रसृष्टीत एक झंझावात निर्माण केला. काल आंतरजालावर मुशाफिरगिरी करत असताना कोठेतरी ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस!

शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते. त्यामुळे मी व बहीण आईसोबत अगदी आयत्या वेळेस तिकिट काढून गेलो चित्रपट पाहायला! [तेव्हाही तो हाऊसफुल्ल व्हायचा कधी कधी!] बहिणीचे वय होते सात वर्षे आणि माझे दहा वर्षे! आमचा सर्व चित्रपट पाहून झाला, चित्रपटगृहातले दिवे लागले, प्रेक्षक बाहेर पडू लागले. आम्हीही जायला उठलो. पाहिले तर धाकटी बहीण मुसमुसून रडत होती. तिला विचारल्यावर ती काही उत्तरही देईना! वाटले, हिला काही दुखले-खुपले तर नाही ना, बरे वाटत नाही का.... काय झाले काहीच कळेना!

कसेबसे तिला चित्रपटगृहाच्या बाहेरच्या आवारापर्यंत आणले. पण तिथे मात्र तिने जोरात भोकांडच पसरला. मी व आई हतबुद्ध! लोकांच्या कुतूहलाच्या नजरांची जागा नंतर काळजीने घेतली. तिथला रखवालदार ओळखीचा होता. तो विचारू लागला, ''बेबीको क्या हो गया? सब ठीक है ना? पानी लाऊ क्या?'' त्याने बिचार्‍याने पाणीही आणले. पण आमच्या बहिणाबाईंना पाणीही नको होते. तिचा हंबरडा काही केल्या आटोपायचे चिन्ह दिसत नव्हते. आंजारून -गोंजारून झाले, जरबेने विचारून झाले, जवळ घेऊन झाले, सर्व शक्य उपाय चालू होते!
बहिणीने तर जमिनीवर लोळणच घ्यायची शिल्लक ठेवली होती!!!

दहा-पंधरा मिनिटे हे नाटक चालू होते. मग मात्र आईचा संयम सुटला. तिने तिच्या खास ठेवणीतल्या करड्या आवाजात बहिणीला विचारले, ''आता काय झाले ते सांगतेस की नाही? का देऊ एक फटका?''
ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडली.
बहिणीचा टाहो एकदम तार सप्तकातून मध्य, तिथून मंद्र सप्तकावर आला... अश्रू वाळले होते त्यांच्या जागी नवे अश्रू येणे बंद झाले. हंबरड्याची जागा हुंदक्यांनी व मुसमुसण्याने घेतली. तिचा तो ओसरलेला आवेग पाहून आईलाही जरा धीर आला. मग मोठ्या प्रेमाने तिने बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला पुन्हा विचारलं, ''काय झालं माझ्या राजाला, सांगशील का आता तरी?''

बहिणीने डबडबलेल्या डोळ्यांनी, आईच्या पदरात तोंड खुपसून स्फुंदत उत्तर दिलं..... ''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''

क्षण-दोन क्षण आईच्या डोक्यात काहीच प्रकाश पडेना! मग तिला उलगडले.... शोलेमध्ये अमिताभ शेवटी मरताना दाखवला आहे! बहिणीचा अमिताभ अतिशय लाडका होता तेव्हा! तिला चित्रपटातील अमिताभची मारामारीही खरीखुरी वाटायची आणि घरी ती अदृश्य शत्रूंबरोबर तोंडाने ढिश्शुम् ढिश्शुम् आवाज काढत हाणामारी करत असायची! तिच्या लेखी ते सर्व खरे असायचे. आणि आता तिला चित्रपटाचे कथानक इतके सत्य वाटत होते की अमिताभ खरोखर मेला आणि तो आता आपल्याला पुन्हा कध्धी कध्धी दिसणार नाही म्हणून तिला अगदी भडभडून व भरभरून रडायला येत होते!!!!!!!

तिच्या त्या निरागसपणापुढे आणि समजेच्या अभावापुढे आई पार शरणागत झाली! बहिणीला काही केल्या चित्रपटातील गोष्टी खोट्या असतात, त्यातील कलाकार असे चित्रपटात दाखवले म्हणजे खरेखुरे मरत नाहीत हे पटायला जाम तयार नव्हते. दादापुता करून तिला घरी घेऊन आल्यावरही तिचे डोळे वारंवार अमिताभच्या आठवणीने (!!) भरून वाहत होते. आम्हाला मात्र आता हसू दाबणे अवघड जात होते.

शेवटी दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा शोले बघितला. त्यात अमिताभला जिवंत पाहून तिला एकदाचे हायसे वाटले! ह्या खेपेस तो मेला तेव्हा ती एवढी रडली नाही!
तिच्या बालमनाला समजेल पण ते दुखावले जाणार नाही अशा रीतीने तिला समजावता समजावता घरच्यांच्या नाकी नऊ आले! पण मग हळूहळू तिला उमजू लागले की चित्रपटातील कथानक सत्य नसते, मारामारी - ढिश्शुम् ढिश्शुम् वगैरे सगळे खोटे असते.... पुढे आम्ही अनेक मारधाड चित्रपट खदखदा हसत पाहिले. पण शोलेचा तो अनुभव अविस्मरणीय होता!!

आजही कधी कधी आम्ही तिला शोलेची आठवण काढून चिडवतो! :-)

--- अरुंधती 


12 comments:

  1. अगदी जिव्हाळ्याचा चित्रपट आहे हा. एक एक फ्रेम, एक एक संवाद पाठ आहे. तुमच्या बहिणीसारखंच मलाही बच्चनच्या मरण्याचं वाईट वाटलं होतं पण ते मुकद्दर का सिकंदरच्या वेळेस. त्याची आठवण मी ’अब तक बच्च्नच’ (http://www.mogaraafulalaa.com/2009/10/blog-post_07.html) या लेखात लिहिली आहे. शोले म्हणजे चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड समजला जातो. कथा, पटकथा, संवाद, संगीत, दिग्दर्शन अगदी सर्वच बाबतीत. या शोलेचे तीन निरनिराळे शेवट होते, त्यातील दोन शेवटांमधे बच्चन मरताना दाखवलाय. सुरूवातीला शोले बच्चन जिवंत आहे, असा शेवट दाखवला होता, पण तो लोकांना पटला नाही मग शेवटा बदलला.

    ReplyDelete
  2. हाहाहा..हि पोस्त वाचून माझी लहानपणाची आठवण ताजी झाली..मी लहान होतो तेव्हा 'जंजीर' सिनेमात अमिताभला रुळावर टाकतात तेव्हा टेन्शनमध्ये यायचो आणि त्याला प्राण बाजूला ओढतो तेव्हा जीवात जीव यायचा...

    ReplyDelete
  3. हे..हे...मस्तच...

    ReplyDelete
  4. कांचन, खरंच लहानपणी खरे आणि आभास यांच्यातला फरकच कळत नाही! मोठेपणी तरी तेवढा कुठे कळतो म्हणा! ;-) तुझा मुकद्दर बच्चन लेख नक्की वाचेन! मला पण तो शेवट आवडला नव्हता.... अगदी पातेलं भर रडले होते तेव्हा! हा हा हा.... असो! प्रतिसादाबद्दल धन्स!

    ReplyDelete
  5. विद्याधर, काळजी करू नका.... मी हातात असलेला रुमाल/ चादर/ आईचा पदर/ स्कर्टचा बोंगा....मिळेल ते तोंडात कोंबून, डोळ्यांत प्राण आणून हुंदके दाबत असे सीन्स पाहिलेत..... आणि टेन्शन दूर झाल्यावर आपल्याला कसं येडं बनवलं गेलंय याची होणारी जाणीव! ;-)

    ReplyDelete
  6. आनंद, ब्लॉगवर आपलं स्वागत व प्रतिसादाबद्दल धन्स!:-)

    ReplyDelete
  7. खरंच मस्त झालय .. प्रसंग समोर उभा केलाय.शोले, गाईड आणि अलबेला - (भगवानचा बरं नाही तर तुम्हाला त्या खुळ्या गोविंदाचा वाटेल )तर मला तर पाठ आहेत. ऑल टाइम फेवरेट्स..

    ReplyDelete
  8. धन्यवाद महेंद्र! गाईड तर माझाही आवडता.... आणि त्यातील गाणी.... उफ्फ्फ! :-)

    ReplyDelete
  9. मस्तच आहे हा अनुभव.
    "कस्मे वादे' चित्रपट मी लहान असताना बाबांसोबत पाहिला होता. या चित्रपटातील पहिला अमिताभ विजयेंद्र घाटगेच्या हातून चाकू लागून मरतो असे दृष्य आहे. ते पाहून मी एवढ्या जोरात भोकाड पसरले होते की बस्स. (असे बाबा मला नेहमी सांगतात) मग बाबा मला घेऊन बाहेरच्या पॅसेजमध्ये समजूत घालत बराच वेळ फिरले. त्यानंतर दुसऱ्या अमिताभची "एन्ट्री' झाल्यानंतर ते पुन्हा जागेवर येऊन बसले आणि मला अमिताभ जीवंत असल्याचे त्यांनी दाखविले. माझे रडणे गायब. अजूनही "कस्मे वादे' पाहताना हा किस्सा हमखास आठवतो.
    हा अमिताभचा करिष्मा दुसरे काय?

    ReplyDelete
  10. धन्यवाद गं प्राजक्ता.... अमिताभच्या प्रत्येक ''हिट'' पिक्चरसोबत आठवणींचा खजिना आहे नुसता.... अमिताभ म्हणजे फुलटू करमणूक हे समीकरण होतं एकेकाळी... म्हणूनच आजही ह्या वयात तो प्रेक्षक खेचून आणतो... :)

    ReplyDelete
  11. 'शोले' मी गब्बर आला की डोळे गच्च मिटुन राहायची इतकंच आठवतंय...शेवटी आता कधीतरी नीट पाहिला शांतपणे...

    ReplyDelete
  12. हा हा हा .... अपर्णा.... अगं मी सुध्दा सीटखाली लपून बसायचे मारामारी चालू असली की स्क्रीनवर! किंवा रडत बसायचे!! :-) प्रतिसादाबद्दल थांकू!

    ReplyDelete