Sunday, May 16, 2010

मलंग आणि माणुसकी

मलंग गड माची 
(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया) 

काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी.

माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी आम्हाला (मला व बहिणीला) मंदिरे, दर्गे, चर्चेस इत्यादी धर्मस्थळांकडे सारख्याच आत्मीयतेने बघायला शिकवले. कोणत्याही सहलीच्या ठिकाणी गेल्यावर तेथील मंदिरे जशी पालथी घातली तशीच इतर प्रसिद्ध धर्मस्थळेही औत्सुक्याने पाहिली. 

तर अशीच एकदा आमची श्री मलंग किंवा हाजी मलंग ह्या कल्याण येथील सुप्रसिद्ध गडावर जायची टूम निघाली. आईवडीलांना मच्छिन्द्रनाथांचे मंदिर तर पाहवयाचे होतेच शिवाय मलंगबाबांच्या दर्ग्याची पूजा हिंदूच करतात त्याबद्दलही उत्सुकता होती. येथे भाविकांकडून मच्छिंद्रनाथांच्या शक्तिस्थळाची पूजाही केली जाते व मलंगबाबांच्या दर्ग्यावर चादरही चढवली जाते असे ऐकून होतो. आम्हा मुलींना पुण्याबाहेर प्रवास करायला मिळणार ह्याचेच अप्रूप होते. वडिलांना ह्या स्थळी दत्तजयंतीलाच जायचे होते. का, तर दत्तात्रेयांपासून नाथपंथाची सुरुवात होते आणि पौर्णिमेला गडावर खास उत्सव असतो म्हणे! ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या रात्री जरा उशीरानेच आम्ही लाल डब्यातून कल्याणला थडकलो. तिथून टांग्याने हाजी मलंग गडाचा पायथा गाठला. रात्रीचे दहा- साडेदहा वाजत आले होते. थोडा वेळ तेथील बाजारातून भटकल्यावर एका छोट्याशा उपाहारगृहांत थोडी खादाडी केली. आम्ही घरातील सगळेच गड-आरोहणाच्या बाबतीत अतीव निष्णात (? ) असल्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानातून चढताना आधारासाठी दोन काठ्या घेतल्या!! सामान-बॅगा वगैरे त्या दुकानातच ठेवले व बरोबर एका शबनममध्ये फक्त एक शाल आणि थोड्या जरुरी वस्तू घेऊन गडाच्या रोखाने मार्गक्रमण करू लागलो.

डिसेंबरातील थंड हवा गडाच्या पायथ्याशीही एव्हाना जाणवू लागली होती. तेथील एक चहाची टपरी बंद होणार एवढ्यात आम्ही घाईघाईने तिथे पोचलो व दुकानदाराला आम्हाला चहा पाजण्याची गळ घातली. आम्हीच त्याचे दिवसातील शेवटचे गिऱ्हाईक दिसत होतो. टपरीतील लाकडी बाकावर बसून डगमगत्या टेबलाला हाताचा टेकू देत सावरत बसलो होतो खरे, पण मला तरी जाम थंडी वाजत होती. तेवढ्यात आमचा चहा आला. गरम गरम वाफाळता आल्याचा चहा.... अहाहा!! त्या क्षणी ते स्वर्गसुख होते. तेवढ्यात वडिलांचे लक्ष सहज बाहेर गेले. टपरीच्या दगडी पायरीवर एक म्हातारी अंधारात कुडकुडत बसून होती. तिच्या वेषावरून तरी गरीब वाटत होती. मेंदी लावल्याने तांबडे झालेले केस, तोंडातला पानाचा तोबरा, पेहराव यांवरून लगेच ती म्हातारी स्त्री मुस्लिम असल्याचे लक्षात येत होते. वडिलांना अचानक काय वाटले कोणास ठाऊक, पण त्यांनी चहावाल्याला त्या म्हातारीलाही चहा नेऊन देण्याची खूण केली. आमचा चहा पिऊन होईपर्यंत त्या म्हातारबाईंचा चहाही बशीत ओतून फुर्र फुर्र करत पिऊन झाला होता. वडिलांनी बिलाचे पैसे दिले व आम्ही टपरीच्या बाहेर पडलो. बघतो तर दारात म्हातारबाई. त्यांनी चहाबद्दल शुक्रिया सांगितले आणि म्हणाल्या, चला, मी पण वर गडावरच जाणार आहे. तुम्हाला रस्ता दाखवते! 

आता ही कोण कुठली म्हातारबाई, तिचा ना कसला ठावठिकाणा, लांब बाह्यांच्या पोलक्यावर बिनबाह्यांचे वेगळ्याच रंगाचे पोलके - विटकी साडी असा थोडासा चमत्कारिक वेष, हातात डालड्याच्या डब्यापासून बनवलेली ''लालटेन'', चालताना वयोपरत्वे जाणारे झोक....  आणि ती कसला रस्ता दाखवणार! वडिलांनी तिला नम्रपणे नको सांगितले, पण ही बाई ऐकायलाच तयार होईना! शेवटी आम्ही तिने रस्ता दाखवावा हे मान्य केल्यावरच आमची तिच्या आग्रहातून सुटका झाली. 

चढणीच्या पहिल्या टप्प्यातच त्या बाईंनी आमच्या चौकशीला सुरुवात केली. आईवडील अगदी त्रोटक उत्तरे देत होते. पण त्यांमुळे नाउमेद न होता म्हातारबाईंचा तोंडपट्टा सारखा चालूच होता. त्यांची ती कृश मूर्ती हवेच्या जोरदार झोताप्रमाणे कधी डावीकडे झुके तर कधी उजवीकडे! त्यांच्या हालचालींप्रमाणे त्यांच्या हातातला, डालड्याच्या डब्याला दोन्ही बाजूंना हिरवा व लाल रंगाचा जिलेटीन पेपर लावलेला लालटेन झोकांड्या खाई. आम्हाला भीती वाटे की म्हातारबाई कलंडणार तर नाहीत? पण आमच्या तुलनेत गड चढण्याच्या बाबतीत त्याच जास्त तंदुरुस्त वाटत होत्या. इकडे आईवडील चढण चढताना जणू मूक झालेले!  एक तर चढताना वजनापरत्वे व सवय नसल्याने दम लागत होता. त्यात धाकटी बहीण नुकतीच आजारातून उठल्यामुळे व अशक्तपणामुळे चढण स्वतःहून चढायला अजिबात राजी नव्हती. सात-आठ वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन चढणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे! तरी आई-वडील आलटून पालटून तिला कडेवर घेऊन चढत होते खरे!

म्हातारबाई ठरविल्याप्रमाणे आमच्या पुढेच चालल्या होत्या. आकाशातल्या पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याने आसमंत व सारी डोंगरराजी उजळून निघाली होती. त्या प्रकाशात ते डोंगर ध्यानस्थ योग्याप्रमाणे अजूनच गूढ भासत होते. दुरून कोठूनतरी रेडियोवरच्या गाण्यांचा अस्पष्टसा आवाज येत होता. मधूनच कोणाचे तरी हसणे. नाहीतर रात्रीच्या शांततेची दुलई गडावर पण पसरू लागली होती. अधून मधून कोणी हौशी लोक आम्हाला ओलांडून झरझर पुढे जात होते. आमच्या गोगलगायीच्या गतीने, धापा टाकत चालणाऱ्या चिमुकल्या समूहाकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. चांदण्याचा प्रकाश असला तरी मला आजूबाजूला पडलेल्या अंधाराची उगाच भीती वाटत होती. मधूनच झुडुपांमधून खुसफूस ऐकू येई. रातकिड्यांच्या किरकिरीबरोबर अचानक एखादा काजवा दर्शन देई. झाडांच्या हालचालीबरोबर त्यांच्या सावल्याही हालत. त्या पानांच्या सळसळीला ऐकले की माझी कल्पनाशक्ती काळोखात काही वेगळे तर दिसत नाही ना याचा विचार करत असे. त्यामुळेच की काय, हातातला टॉर्च उगाच काळोखात फिरवत मी सावल्यांचा अंदाज घेत पुढे चालले होते.

अचानक एक मोठा हिंदी भाषक घोळका मागून आला आणि आम्हाला पाहून थबकला. सगळी तरुण पोरं पोरं होती. त्यांच्यात दोन-तीनच स्त्रिया दिसत होत्या. त्या बायकांचे गोषे मोठे कलापूर्ण होते. माझ्या वडिलांना धापा टाकत एकाच जागी उभे असल्याचे पाहून त्यांच्यातील एका तरुणाने विचारले, ''भाईसाहब, कुछ मदद चाहिए क्या? '' वडिलांनी मानेनेच नकार दिला. तरीही तो जथा थोडा वेळ आमच्याबरोबरच रेंगाळला. सहजच चौकश्या झाल्या - तुम्ही कुठले, आम्ही कुठले इ. इ. ते सर्व तरुण मुंबईतच राहणारे, एकाच परिवारातील होते. त्यांच्यातील एकाचे नुकतेच लग्न झाले होते. म्हणून तो त्याच्या पत्नीसह गडावर दर्शनासाठी चालला होता, आणि सोबत ही जत्रा. त्यांचे आपापसात एकमेकांना चिडवणे, खिदळणे मजेत चालू होती. नववधू फारच सुंदर होती दिसायला. मोठे टप्पोरे डोळे, केतकी गुलाबी वर्ण, धारदार नाक, गुलाबी जिवणी - अगदी काश्मिरी वाटत होती चेहऱ्यावरून. ह्या सर्वांच्या थट्टामस्करीत लाजून लाजून चूर झाली होती. तिची माझी छान गट्टी जमली. आम्ही दोघींनी जवळच पडलेल्या एका झुडुपाच्या दोन वाळक्या फांद्या हातात घेतल्या, आणि अंधाऱ्या पायऱ्यांवर काठ्या आपटत आपटत चालू लागलो. बोलता - बोलता, गप्पांच्या नादात त्या जथ्याबरोबर मी बरीच पुढे आले होते. पण मग अचानक आठवण झाली की आमच्या घरातले बाकी तीन सदस्य मागेच राहिलेत की! त्या नववधूचा- रुख्सानाचा निरोप घेऊन मी पुन्हा माकडाप्रमाणे उड्या मारत खाली आले. आमच्या गोगलगायी फार पुढे सरकल्या नव्हत्या. म्हातारबाईही त्यांना गोंदाप्रमाणे चिकटून होत्या.

एका विश्रामाच्या वेळी आई हळूच वडिलांना म्हणाली, ''त्या बाईंचे लक्षण मला काही ठीक दिसत नाहीए.... मधूनच स्वतःशी पुटपुटत असतात त्या.... कोणी वेडीबिडी तर नसेल? तू त्यांना सांग ना पुढे जायला.... मला तर जरा विचित्र वाटतंय प्रकरण! '' मी पुन्हा एकदा त्या बाईंकडे निरखून पाहिले आणि आईचे बोलणे मलाही जरा पटले. त्या बाई खरेच मधूनच स्वतःशी बोलत होत्या, माना हालवत होत्या. आणि खरे सांगायचे तर चांदण्यात त्यांचा सर्व अवतार जरा भेसूरच दिसत होता. मला उगाचच हौसेहौसेने वाचलेल्या भुतांच्या गोष्टी आठवू लागल्या आणि मी चुपचाप आईवडीलांच्या जवळ सरकले. वडिलांच्या खांद्यावर माझी धाकटी बहीण एव्हाना गाढ झोपून गेली होती. आमचा मंदावलेला वेग बघून त्या बाई कंटाळतील व निघून जातील असा वडिलांचा कयास होता. पण त्या चिवट म्हातारबाईंनी तो खोटा ठरवला. 

एव्हाना गडाचा मधला टप्पा आम्ही पार केला होता. जसजसे गडावरच्या तुरळक वस्तीची जाग जाणवू लागली तसतसा म्हातारबाईंमध्येही हळूहळू फरक पडू लागला. त्यांची पुटपूट थांबली, चाल सुधारली, जणू कोणी त्यांची वर वाट बघत होते अशी आतुरता त्यांच्या चालीत आली. आम्हालाही 'आता संपली बुवा एकदाची चढण' ह्या विचारानेच हायसे वाटत होते. मस्त भन्नाट वारा व शिरशिरी आणणारी थंडीही आता अंगाला झोंबत नव्हती. 

दर्ग्याजवळचे लाइट्स, विद्युत रोषणाई जसे नजरेच्या टप्प्यात आले तशा म्हातारबाई आम्हाला काहीही न बोलता तरातरा पुढे जात दिसेनाशा झाल्या. आईवडीलांनाही ''सुटलो एकदाचे त्यांच्या तावडीतून! '' असे झाले. आता गडावर मुक्कामाला दर्ग्याच्या जवळपास कोठेतरी चौकशी करून जागा शोधायची, तण्णावून द्यायची व पहाटे दर्शन घेऊन उगवतीला गड उतरू लागायचे असा साधारण बेत होता.

रात्री एवढ्या उशीरा पोचल्यावर अनेक दुकाने बंद अवस्थेत न दिसली तरच नवल! दुकानदारांच्या ओळखीने गडावरच कोठेतरी मुक्काम करायचा आमचा बेत होता. पण इथे तर दुकानांना टाळे! तरीही आम्हाला राहण्या-खाण्याची फारशी फिकीर नव्हती. पट्टीच्या चहाबाज असलेल्या माझ्या वडिलांना काही अंतरावरून खास ''अमृततुल्य'' चहाचा खासा दरवळ आला आणि मग बस्सच! पुढचे अंतर आम्ही विठ्ठलाच्या ओढीने वारकरी जसा पळत सुटतो तसे झराझर कापले. एका उंच जोत्यावरच्या घरासमोर बरीच गर्दी दिसत होती. बहुधा हीच ती चहाची ''टपरी'' होती. कोणीतरी एक व्यक्ती त्या घरासमोर टाकलेल्या बाजेवर बसली होती आणि येणारे-जाणारे त्या व्यक्तीच्या पाया पडत होते. कुतूहलाने आम्ही त्या व्यक्तीकडे पाहिले आणि उडालोच! ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एवढा वेळ आम्हाला सक्तीचा सहवास देणारी डालड्याच्या डब्याचा लालटेन घेतलेली म्हातारी होती!!! त्या बाजेच्या भोवती जणू दरबार भरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांकडून सलाम स्वीकारण्याबरोबरच म्हातारबाई आजूबाजूच्या लोकांची म्हणणी ऐकून घेत होत्या. सर्वांच्या वागण्यात त्यांच्याप्रती अदब दिसून येत होती. म्हातारबाई मधूनच गुडगुडी ओढत होत्या, कधी कोणाच्या पाठीवर थाप देऊन हसत होत्या तर कधी कोणाच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

तेवढ्यात त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले. आम्ही एका कोपऱ्यात 'आता नक्की काय करावे' या विचारात जरासे संकोचून उभे होतो. त्या बाईंनी लगेच आम्हाला पुढे येण्याची खूण केली. मग सर्वांकडे वळून हिंदीत म्हणाल्या, ''आज या कुटुंबाने मला माणुसकी दाखवली. मी थंडीने कुडकुडत असताना त्यांनी मला एक कप चहा काय पाजला आणि मला ऋणी करून टाकले! '' मग घराच्या दरवाज्याकडे बघून आपल्या घोगऱ्या आवाजात त्यांनी मोठ्याने फर्मान सोडले, ''हे कुटुंब माझे खास पाहुणे आहेत. त्यांचे स्पेशल स्वागत करा. '' आम्ही सर्द! बाहेरच्या गारठ्यातून आतल्या घरगुती उबेत गेल्यावर खरंच खूप छान वाटत होते. ढणाणणाऱ्या स्टोव्हवर एका मोठ्या पातेल्यात दूध उकळत होते. दुसरीकडे चहाचे आधण ठेवलेले होतेच! थोड्याच वेळात आमच्यासमोर फेसाळ, दुधाळ अमृततुल्य असा दरवळणारा चहा आला. थंडीने काकडलेल्या शरीरांमध्ये जरा धुगधुगी आल्यावर वडिलांनी सहज करतोय असे दाखवत त्या म्हातारबाईंची चौकशी केली. आम्हाला चहा देणारा माणूस अस्सल मराठी होता. त्याच्याशी आतापर्यंत हवापाण्याच्या गप्पा मारून झाल्या होत्या. तो तर वडिलांकडे थक्क होऊन पाहतच राहिला. ''काय सांगताय साहेब! तुम्हाला माहीतच नाही त्या बाई कोन आहेत ते? नका करू चेष्टा अशी गरीबाची! '' त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगितल्यावर मात्र त्याला खात्री पटली. पण तरीही तो ती बाई कोण हे सांगायलाच तयार नाही. शेवटी आई मध्ये पडली, ''अहो भाऊ, आम्हाला खरंच माहीत नाही काही त्या बाईंबद्दल! जरा सांगा ना! ''

त्याने एकवार बाहेर नजर टाकली. बाहेरचा दरबार अजून चालूच होता. लोकांची गर्दी कायम होती. मग तो चहावाला आमच्याकडे वळून घसा खाकरून म्हणाला, ''त्या बाई इथून जवळच एक लई मोठा जागृत दर्गा हाय, त्याच्या मुख्य पुजारीण बाई हायेत. लई मान हाय बघा त्यांना हितं.... समदे लोग त्यांचा शबुद पाळत्याती. '' खरे तर आमचा विश्वासच बसत नव्हता त्याच्या सांगण्यावर! पण अशा बाबतीत कोणी कोणाची टांगखिचाई सहसा करत नाही. तरीही मनात थोडासा संदेह बाळगूनच आम्ही तिथून निघालो. चहावाल्याने अर्थातच चहाचे पैसे घेण्यास साफ नकार दिला.

म्हातारबाईंनी आम्हाला जाताना पाहिले आणि हसून मान हालवून म्हणाल्या, ''कल फिर मिलेंगे, खुदा हाफिज।''
गडावर आम्हाला मुक्कामासाठी म्हातारबाईंच्या कृपेने एक कुटी लगेच मिळाली. बांबूच्या भिंती आणि छत एवढाच तो काय थंडीपासून आडोसा! बघतो तर तिथे रुख्सानाचा सर्व परिवार! मग काय, मला तर जाम आनंद झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनीही त्या म्हातारबाई दर्ग्याच्या मुख्य गुरवीण असल्याचे सांगितले. मग त्यांचा वेष असा फाटका का? गडाच्या पायथ्याशी अंधारात व थंडीत कुडकुडत त्या एकट्याच काय करत होत्या? प्रश्न अनेक होते, पण त्यांची उत्तरे आमच्यापाशी नव्हती. एव्हाना सर्व पुरुष दुसऱ्या कुटीत झोपायला निघून गेले, आणि आम्ही मुली-बायका तिथल्या चटयांवर आडव्या झालो. रात्रीचे बारा तर कधीच वाजून गेले होते. तरीही मी व रुख्साना हलक्या आवाजात गप्पा मारत होतो व खुसुखुसू हसत होतो. शिवाय त्या ओबडधोबड जमिनीवर घातलेल्या चटया अंगाला टोचतही होत्या. कुटीच्या बांबूच्या तट्ट्या पहाटेच्या गार वाऱ्याला अजिबात अटकाव करत नसल्यामुळे आईने आणलेली शाल पांघरून ती रात्र मी थंडीत कुडकुडतच घालवली.

अशीच मग गप्पा मारता मारता कधीतरी झोप लागली. उठले, जाग आली तेव्हा आकाशाचा रंग पालटू लागला होता. सकाळचे साडेपाच-सहा वाजले असावेत. आम्ही दोघी बहिणी, रुख्साना आणि तिच्या इतर महिला नातेवाईक एवढ्याचजणी कुटीमध्ये होतो. त्या बाकी महिला गाढ झोपलेल्या. आई-वडील दोघेही लवकर उठून स्नान वगैरे करून पुढे दर्शनाला गेले होते. मी व बहिणीने कुटीच्या बाहेर येऊन तेथीलच एका मोकळ्या जागेत बोटानेच दात घासले. अंघोळीची तर गोळीच घेतली होती. एवढ्या थंडीत पहाटे थंड पाण्याने आंघोळी करणे म्हणजे महापाप! मग आवरून झाल्यावर आईवडीलांच्या वाटेकडे डोळे लावून आम्ही दोघी बहिणी फटफटणारे आकाश, प्रभातीची प्रसन्न निसर्गराजी अन त्या प्रकाशात वेगळेच रूप ल्यालेल्या डोंगराकडे अनिमिष नेत्रांनी मूकपणे बघत बसलो होतो. धुक्याच्या आच्छादनातून मध्येच वर डोंगरावर एका ठिकाणी धुनी पेटलेली दिसत होती. का कोण जाणे, त्या प्रसन्न वातावरणाचे पावित्र्य माझ्या मनात घर करून बसले.

आईवडील परत येईपर्यंत मला व बहिणीला खूप भूक लागली होती. गड उतरूनच नाश्ता करायचे ठरले. आदल्या रात्री दहा पावलेही चालायला तयार नसलेली माझी बहीण आज मात्र हरणासारख्या उड्या मारत गड उतरत होती!! तिच्या ह्या प्रगतीचे नवल करतो न करतो तोच गडावरची फुलमाळा विकणारी दुकाने लागली. आणि एका दुकानासमोर त्या म्हातारबाई जणू आमची वाट बघत असल्याप्रमाणे उभ्या! आम्हाला पाहताच तोंड भरून, आपले पानाने लाल झालेले दात दाखवत हसल्या. आम्हाला त्यांच्या अखत्यारीत असलेल्या दर्ग्यावर कधीही यायचे आमंत्रण दिले. कोण कुठली ही म्हातारबाई... पण त्या एक कप चहाच्या माणुसकीला अजून किती जागणार होती? वडिलांनी काहीही न बोलता तेथील दुकानातून एक फुलांची चादर विकत घेतली आणि म्हातारबाईंच्या हातात तिचे पुडके ठेवून त्यांना ती चादर आमच्यातर्फे दर्ग्यावर चढवायला सांगितली. पुन्हा एकदा म्हातारबाई तोंड भरून हसल्या. ''जाओ, खुश रहो, खुदा हाफिज।'' म्हणत आमचा निरोप घेतला व बाजारातून तुरुतुरु चालत दिसेनाश्या झाल्या. त्यांच्या त्या लहान होत जाणाऱ्या आकृतीकडे आम्ही तसेच बघत राहिलो. 

गड उतरून आम्ही परतीच्या पुणे प्रवासाच्या तयारीला लागलो. पुढे आईवडीलांच्या गप्पांमध्ये ह्या प्रसंगाचे अनेकदा संदर्भही येत. आणि आपण त्या रात्री माणुसकीचा एक नवा धडा शिकलो, माणुसकीचे एक नवे रूप पाहिले याची जाणीव पुन्हा एकवार मनात वेगळीच स्पंदने निर्माण करून जाई.

--- अरुंधती  

5 comments:

  1. खुप सुंदर अनुभव, ही मानुसकी आता विसरलो आहोत. सहसा कुणावर एव्हडा विश्वास ठेवावासा वाटत नाही..

    ReplyDelete
  2. खरंच छान अनुभव. एक साधीशी माणुसकीची कृतीसुद्धा खूपदा कुणालातरी स्पर्शून जाते. हल्ली अशी माणसं भेटंणं विरळाच.

    ReplyDelete
  3. धन्यवाद आनंद आणि विद्याधर! खरंय, आजकाल कोणावरही चटकन विश्वास टाकायला मन कचरते..... पण हा विश्वास पुन्हा सांधायला हवा, नाही का? :-)

    ReplyDelete
  4. मस्त लेखन .. एकंदरीतच !

    ReplyDelete
  5. धन्यवाद प्रदीप! आणि तुमचे ब्लॉगवर स्वागतही! :-)

    ReplyDelete