Friday, December 04, 2009

असे जाहले सुलेखन!


दाराची बेल वाजली, दार उघडले तर शेजारच्या जोशीकाकू उभ्या होत्या. त्यांना कसलासा पत्ता हवा होता. एका कागदाच्या चिटकुर्‍यावर तो पत्ता मी घाईघाईने लिहून दिला. सहजच त्यांची नजर माझ्या हस्ताक्षराकडे गेली व त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार निघाले, "काय सुंदर हस्ताक्षर आहे हो! अगदी मोत्यासारखं... आमच्या मीताला शिकवा ना जरा... तिच्या बाई तक्रार करत होत्या तिच्या हस्ताक्षराबद्दल!" मी काकूंना मीताला तिच्या हस्ताक्षराबाबत मदत करायचे आश्वासन दिले खरे, पण त्यांनी केलेल्या कौतुकाने ह्या बोटांना ज्या ज्या लोकांनी उत्तम वळणाचे, शिस्तीचे आणि सौन्दर्याचे 'अक्षर'दान दिले त्यांच्या त्या अथक प्रोत्साहनाला मनाने उत्स्फूर्त अभिवादन केले.

असे म्हणतात की घरातील वातावरणाचा परिणाम घरातील लहान मुलांवर होत असतो. भाग्य म्हणजे आमच्या घरात आजी-आजोबा दोघेही सुशिक्षित होते. आजोबा ब्रिटिश साहेबाच्या हाताखाली मिलिटरीमध्ये हिशेबनीस होते. त्यांचे हस्ताक्षर मोडीच्या वळणाचे, तिरपे पण सुवाच्य होते. त्यांच्या हस्ताक्षरात त्यांनी पुठ्ठ्यावर कागद चिकटवून त्यांवर विविध श्लोक, आरत्या, सुविचार, स्तोत्रे, वंशावळ लिहून घरात तक्त्याप्रमाणे टांगले होते. जाता-येता त्यांवर नजर पडत असे. दत्ताची आरती, स्नानाचे वेळी म्हणावयाचे श्लोक, मानसपूजा आणि अजून बरेच काही....शिवाय रोज ते आपल्या दिनक्रमातून वेळ काढून त्यांच्या खास डायरीत दैनंदिनी लिहायचे.... त्यांना असे एकाग्र होऊन, डोळ्यावरचा चष्मा सावरत, एक हाती लिखाण करताना पाहिल्याचे मला अजून स्मरते आहे. ते लिहायचे ते देखील त्यांच्या एका ठराविक, ठेवणीतील फाऊंटन पेन ने! त्या पेनची अगदी एखाद्या मौल्यवान चीजवस्तूप्रमाणे काळजी घ्यायचे ते! पेनात शाई भरणे, त्याच्या नीब मध्ये साचलेला कचरा साफसूफ करणे, आधीचे नीब खराब झाल्यावर नवे नीब बसविणे हे सगळे अगदी समारंभपूर्वक व्हायचे! मग त्यात जराही व्यत्यय आलेला त्यांना खपत नसे. शिवाय म्हणायचे, "ह्या लेखणीनेच माझ्या कुटुंबाचे पोट भरले. ती सरस्वती आहे. तिची नीटच काळजी घ्यायला पाहिजे!" आजीचा पिंड शिक्षिकेचा. उभी हयात तिने प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी करणे व शिकवण्या घेणे ह्यांत घालवली. आपल्या गोलसर, वळणदार अक्षरांत तिच्या एका खास वहीत ती बालगीते, कविता, कोडी, कूटप्रश्न, उखाणे इत्यादी लिहून ठेवायची. त्यातील गाणी तिच्या गोड किनर्‍या आवाजात म्हणून दाखविताना आमच्यासमोर तिची वही ठेवायची. "बाळ जातो दूर देशा मन गेले वेडावून" पासून ते "किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्ही सांजा, अजून कसे येती ना परधान्या राजा..." अशी कैक अवीट गोडीची गाणी तिच्या त्या जादुई वहीत तिने टपोर्‍या अक्षरांत टिपून ठेवली होती. आम्हीपण तिच्या बरोबर ती गाणी म्हणायचा प्रयत्न करीत असू. ती कधी आम्हाला बागेत, मैदानात खेळायला घेऊन जायची तेव्हा तिच्याबरोबर काठीच्या, काड्यांच्या सहाय्याने मातीत गिरगिटलेली धुळाक्षरेही चांगलीच आठवतात. त्या दोघांमुळे चांगल्या अक्षराचे संस्कार बालवयापासून मनावर झाले.
आई - वडिलांचे अक्षरही देखणे, गोमटे होते. नकळत आपले अक्षरही त्यांच्याइतकेच चांगले झाले पाहिजे हा विचार मनात पक्का होत गेला. जेव्हा जेव्हा नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या सुंदर अक्षराची वाखाणणी करीत तेव्हा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आम्हां मुलांना त्या अक्षराचा वारसा पुढे नेण्याची आठवण करून देत. मग आमची काय बिशाद खराब अक्षर काढण्याची? पाटीवर, फळ्यावर आणि कोणी पाहत नसताना घरातील दारांवर, भिंतींवरही आम्ही सुलेखनाचे धडे गिरवत असू! वेळप्रसंगी एखादा धपाटा मिळे, पण घरातील भिंतींच्या जमीनीलगतच्या भागावर जाणीवपूर्वक आमच्या लेखन-सहाय्यासाठी ऑईलपेन्ट देण्यात येई. सरावासाठी गुंडाळी फळा आणून त्याला भिंतीवर मानाचे स्थान दिले जाई. त्यातही एक प्रकारचे सुप्त कौतुक असे. कधी कधी घरी आलेल्या पाहुण्यांना हळूच आमचे वह्या, फळे, भिंतींवरचे हस्तकौशल्य दाखविले जाई.

शाळेत हस्ताक्षर - सुलेखनाचा तास सक्तीचा असायचा. अक्षर-लेखनासाठी वेगळ्या वह्या पुस्तके असायची. त्या वहीला आम्ही पुस्ती म्हणत असू. आमच्या शिक्षिकाही तळमळीने, जीव ओतून शिकवायच्या, प्रोत्साहन द्यायच्या. सुलेखन-पुस्तिकेबरोबरच बोरूनेही लिखाणाचा सराव घेतला जायचा. बोरूला तासायचे, टोक करायचे, शाईच्या दौतीत बुडवून वळणदार अक्षर काढायचे - त्यातल्या त्यात काना, मात्रा, वेलांट्या, आकार, उकार सुबक देखणे कसे आकारतील याकडे श्वास रोधून लक्ष दिले जायचे. या सर्वांत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. अक्षरलिखाणात गुंग झाल्यावर कधी हळूच जिभलीचे टोक बाहेर येऊन नाकाच्या अग्राला स्पर्श करायचे तेही कळायचे नाही.
प्रत्येक वही मोत्यासारख्या अक्षरांनी सजलेली पाहताना मनात गुदगुल्या व्हायच्या. आपलीच पाठ आपण थोपटावी असे वाटून जायचे. त्याला अपवाद मात्र गणिताच्या वह्या! इथे तेवढी आकड्यांची खाडाखोड, फुल्या, उलट्या-सुलट्या बाणांची रांगोळी असायची.
चांगल्या हस्ताक्षराचा फायदा असायचा तसाच तोटाही! शाळेत निबंध, भाषेच्या विषयांत उत्तम हस्ताक्षराबद्दल हटकून अधिक गुण मिळायचे, त्याचबरोबर गणित-शास्त्र-भूगोलांच्या उत्तरपत्रिकेत थापाथापी केली असेल तर लीलया पकडली जायची. मैत्रिणीची गृहपाठाची वही आपली म्हणून पुढे करता यायची नाही आणि मैत्रिणीलाही बिकट प्रसंगात आपली वही तिची म्हणून पुढे करणे दुरापास्त होऊन बसायचे! वरच्या वर्गांतील उत्तम हस्ताक्षराच्या, चांगल्या गुणांच्या वह्या पिढीजात वारशाप्रमाणे आमच्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श बाळगून आम्ही आपापले लिखाण सुधारावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात असे.
कधी शाळेच्या बाहेरील किंवा दर्शनी भागांतील फळ्यांवर लिखाण करायला मिळत असे. त्या निमित्ताने कोणता तरी नावडता तास बुडविता आल्याचा आनंदच अधिक असे! प्रगतीपुस्तकावरील 'सुन्दर अक्षर' हा शेरा कॉलर ताठ करत असे, आणि वर्गाच्या हस्तलिखितासाठी पानेच्या पाने सुवाच्य, एकसारख्या अक्षरात लिहायला लागल्याने हाताची बोटे दुखून येत असत. परंतु तेच हस्तलिखित शाळेच्या वार्षिक प्रदर्शनात जेव्हा मानाचे स्थान पटकावत असे व सगळेजण त्यातील हस्ताक्षराचे भरभरून कौतुक करत तेव्हा सारे श्रम सार्थकी लागल्याचा आनंद मिळत असे. चवथी व सातवीची स्कॉलरशिपची वर्षे वगळता उरलेल्या सर्व वर्षांमध्ये हे अक्षर चांगले राहिले. त्या वर्षांमध्ये मात्र भराभरा लिहिण्याच्या नादात 'अक्षराची पार वाट लावली आहे पोरीने' हे ऐकणेही अनुभवले.
शालेय वर्षांमध्ये शाईचे फाऊन्टन पेन वापरणे सक्तीचे असल्याने अक्षर आपोआप चांगले येई. पण कॉलेजमध्ये गेल्यावर बॉलपेन हाती आले आणि हस्ताक्षराचे मूळचे सौंदर्य कमी झाले. शिवाय आता अक्षरापेक्षा लिखित मजकुराला जास्त महत्त्व होते. तरीही अगदी बिघडून बिघडूनसुध्दा अक्षराचा घोटीवपणा, सुवाच्यता अबाधित राहिली.
कॉलेज संपल्यावर रोजच्या नियमित लिखाणाची सवयही संपुष्टात आली. गरजेप्रमाणे हातात पेन घेतले जात असे. मग संगणकाचे आगमन झाले. आता त्याच्यावरही लिखाण (टंकलेखन) करता येऊ लागले. पाहता पाहता वह्या-पेनांचा जमाना मागे पडला. आता तर कागदावर लिखाण करणे कमीच झाले आहे. शिवाय कागदनिर्मितीसाठी किती झाडे खर्ची पडतात हे वाचल्यावर पूर्वीसारखे कागदांचा फडशा पाडणे होत नाही. पूर्वी घरी रीमच्या रीम फूलस्केप कागद आणले तरी ते आठवड्यात संपायचे.... कारण घरातील सगळेच माना खाली घालून कुरूकुरू लिहिण्यात पटाईत! पण आता असे होणे नाही.... त्या ऐवजी आम्ही नित्यनियमाने, प्रामाणिकपणे संगणकाच्या कळफलकाला वेठीला धरत असतो.
तरीही आज कोणी हस्ताक्षराची स्तुती केली की नकळत मन सुखावते. शुभेच्छापत्रांत, गिफ्टवरील लेबलवर मजकूर लिहिताना आपोआप डौलदार अक्षरांची माला आकार घेते. चुकूनमाकून कोणाला पत्र पाठवायचे झाल्यास आपल्याच हातातून कागदावर उमटलेल्या अक्षरांची दृष्ट काढावीशी वाटते!
परवा इमारतीतून खाली उतरत असताना देशमुख काकू त्यांच्या चार वर्षांच्या नातवावर कडाडताना दिसल्या. विचारले तर म्हणाल्या, "अहो, दोन महिनेपण झाले नाहीत नवा रंग देऊन! आणि ह्याने पहा भिंतींवर काय काय लिहून, गिरगिटून ठेवलंय माझं लक्ष नसताना...." मला क्षणभर भिंतींवरील आमच्या उभ्या-आडव्या-तिरप्या रेघांच्या गिरगिटीला, रेखाटनांना कणभरही नावे न ठेवता त्यांचे कौतुक करणारे, आम्हाला समजावून फळ्यावर लिहिण्यास प्रवृत्त करणारे आजी-आजोबा, आई-बाबा आठवले आणि मीदेखील हसून देशमुख काकूंना म्हणाले, "जाऊ द्या ना काकू, त्याला आजच एक मस्त फळा आणि खडू द्या आणून.... आणि बघा, तुमच्याकडे एक नवा अक्षरवीर जन्माला येईल."
--- अरुंधती