Saturday, September 11, 2010

कान्ह्याची बासुरी






पावसाच्या आठवांत 
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला

तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली

सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले

असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....

--- अरुंधती 

(छायाचित्र साभार : विकिपिडिया) 

Thursday, September 02, 2010

दंगल - ए- खास

''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....''
माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता.



गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची! नाहीतरी आमच्या घरी गणपती नसतात, त्यामुळे सुट्टीतील ही मनसोक्त भटकंती आमच्या खास पसंतीची होती. माझ्या वडिलांची प्रवास करतानाची खासियत म्हणजे कोणतीही आगाऊ आरक्षणे न करता सरकारी लाल डब्यातून प्रवास करणे! त्यांच्या मते त्यामुळे जास्त सुटसुटीतपणे आणि आरामात प्रवास करता येतो! कर्नाटकात तेथील सरकारी बसेसमधून प्रवास करत करत आम्ही आता बेळगावात, माझ्या लाडक्या गावात पोचलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे लवकरात लवकर मुक्कामाला आमच्या नेहमीच्या पै लॉजला जायचे, फ्रेश होऊन, खाऊन-पिऊन मस्तपैकी तण्णावून द्यायची आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा पुण्याला परतीच्या प्रवासाला निघायचे असा साधारण बेत होता.

पहिली माशी शिंकली ते पै हॉटेलच्या आवारातच! तेथील मॅनेजरने नम्रपणे सांगितले की हॉटेलच्या सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे तिथे राहण्यास जागा उपलब्ध नव्हती. आता आली का पंचाईत! एवढ्या वर्षांच्या बेळगावाच्या सफरींमध्ये आम्ही पै एके पै करत राहायचो. इतर कोणती चांगली हॉटेल्स, लॉज वगैरेही ठाऊक नव्हती. गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे असेल कदाचित, पण इतर दोन-तीन ठिकाणीही चौकशी केल्यावर सर्व रूम्स फुल असल्याचे कळाले.

मी व बहीण एव्हाना दमून कुरकुरायला लागलो होतो. विना- आरक्षणाच्या प्रवासाचा शीण तर होताच, शिवाय कडकडून भूकही लागली होती. शेवटी आमची अवस्था बघून तेथील बस स्टॅन्डपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका गल्लीतील जुनाट लॉजमध्ये जागा उपलब्ध आहे असे कळल्यावर वडिलांनी त्या रात्रीचा मुक्काम तिथेच करायचे निश्चित केले. शेवटी एका रात्रीचा तर प्रश्न होता! मुक्कामी पोचून अंघोळी वगैरे उरकेपर्यंतच मी व बहीण जाम पेंगुळलो होतो. जुन्या पध्दतीच्या वाड्याचेच लॉजमध्ये रूपांतर केले असल्यामुळे स्वच्छता, सोयी इत्यादींबाबत सगळाच आनंदीआनंद होता. पण इथे भूक आणि झोप ह्यांपलीकडे पर्वा होती कोणाला? कसेबसे पुढ्यात आलेले अन्न खाल्ले आणि थकलेले देह बिछान्यावर लोटून दिले.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठायला जरा उशीरच झाला! प्रवासाचा शीण चांगलाच बोलत होता! शेवटी पोटात कोकलणार्‍या कावळ्यांच्या जाणीवेने जाग आली. आठ वाजत आले होते. आदल्या दिवशी केलेल्या चौकशीनुसार सकाळी साडेनवाला पुण्याला जाणारी एक एस. टी. बेळगाव स्टॅन्डवरून सुटते असे कळले होते. बस पकडायच्या उद्देशाने घाईघाईतच आवरले आणि सामान बांधून तयार झालो. खालच्या स्वागतकक्षात आमच्या बॅगा, पिशव्या इत्यादी आणून वडिलांनी तिथेच काउंटरजवळ झोपलेल्या मुलाला उठवून चेक- आऊट केले. आम्हाला तिथेच थांबण्याची सूचना करून ते रिक्षा बघण्यासाठी बाहेर गेले.

वस्तुतः एस्. टी. स्टॅन्डच्या जवळची जागा म्हणजे रिक्षांचा सुळसुळाट हवा. पण त्या सकाळी ना रस्त्याने रिक्षा फिरत होत्या, ना नेहमीची वर्दळ होती. लॉजच्या तिरसट मॅनेजरला विचारल्यावर त्याने कन्नडमध्ये काहीतरी अगम्य बडबड केली, जी आम्हाला काहीही झेपली नाही. वडिलांना बाहेर जाऊन दहा मिनिटे कधीच होऊन गेली होती. काहीशा अर्धवट झोपेत, अस्वस्थपणे आम्ही त्यांची स्वागतकक्षातील बाकड्यावर बसून वाट बघत असतानाच बाहेरून घोषणांचे आवाज येऊ लागले. माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना! चुळबुळत, ऊठ-बस करत शेवटी मी आईच्या तीक्ष्ण नजरेतून हळूच सटकले आणि बाहेर रस्त्यावर डोकावले. 
लाल झेंडे घेतलेली बरीच माणसे संचलनात जातो तशी समोरच्या रस्त्यावरून ओळीने घोषणा देत चालत होती. गळ्यात कसल्यातरी पट्ट्या, मळकट कळकट वेष, हातात फलक....  त्यांच्या घोषणा कानडीत असल्यामुळे माझ्या डोक्यावरून जात होत्या. पण हा काही साधासुधा मोर्चा नव्हता, एवढे मात्र त्या लोकांच्या त्वेषावरून कळत होते. तेवढ्यात त्या लॉजच्या मॅनेजरने मला हटकले आणि माझी रवानगी आत झाली.

मी आत येऊन आईला घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच्या प्रसंगाचे वर्णन करत होते तोच माझे वडील धापा टाकत आत आले.

''रिक्षा मिळाली?'' आईने विचारले. त्यावर वडिलांनी नकारार्थी मान हालवली व धपापत्या स्वरात म्हणाले, ''रिक्षा चालू नाहीएत आज! लवकर चला, आपल्याला एस्. टी. स्टॅन्ड्ला चालत जावं लागणार आहे!'' त्यांच्या स्वरातली काळजी मला तेव्हा उमगली नाही. 

आमच्याकडे दोन सूटकेसेस आणि तीन शोल्डर बॅग्ज होत्या. सामानाने ठासून भरलेल्या. वडिलांनी दोन सूटकेसेस दोन्ही हातात घेतल्या, आईने जड असणारी शोल्डर बॅग घेतली आणि आम्हा दोघी बहिणींकडे वजनाने तशा हलक्या, पण सामानाने भरलेल्या शोल्डर बॅग्ज सांभाळायला दिल्या. आता दहा मिनिटे लेफ्ट राईट करत हा अवजड डोलारा सांभाळत जायला लागणार होते!! त्याला इलाज नव्हता!  

आम्ही लॉजच्या बाहेर पडतो न् पडतो तोच एकदम जोरात आरडाओरडा झाला..... बघतो तो काय, गल्लीच्या एका टोकाला अजून एक लाल झेंडेधारी लोकांचा घोळका जोरजोरात घोषणा देत, हातात दगडधोंडे आणि अजून काय काय घेऊन आमच्याच दिशेने पळत येत होता. आम्ही घाबरून लॉजच्या दिशेने पाहिले तर लॉजचा मॅनेजर दारावरची पत्र्याची शटर्स खाली ओढत होता. आजूबाजूची दुकाने धडाधड बंद होत होती. संकटाचा वास आल्यागत गल्लीतील कुत्रीदेखील माणसांबरोबरच लपायला जागा शोधत होती. काही सेकंदांचाच खेळ, पण बघता बघता दगड भिरभिरू लागले. ''पळा......'' वडील जोरात ओरडले! आमच्या हातातल्या अवजड बॅगा पेलत आम्ही बस स्टॅन्डच्या दिशेने पळू लागलो. आम्ही पुढे, मागे आक्रमक जमाव असा तो सीन होता. दगड भिरभिरत होते, माझे काळीज सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गतीने धडधडत होते, डोक्यात काहीच शिरत नव्हते, फक्त जीव वाचवून पळायचे आहे एवढेच कळत होते!! पळता पळता बॅगेच्या बंदात पाय अडकून माझी बहीण थोडी धडपडली. तिला सावरून पुन्हा पळायला लागेस्तोवर तो चिडलेला जमाव अजूनच जवळ आला होता. एक दगड तर बॅगेला चाटूनही गेला. खाकी गणवेशातील, हेल्मेट घातलेले पोलिसही आता त्या जमावाच्या पाठीमागे हातातले दंडुके परजत पळत येत होते. 
माझे वडील पुन्हा एकदा गरजले, ''पळा सांगतोय ना, जोरात पळा!!''

अंगाला घामाच्या धारा लागलेल्या..... कानशिले गरम झाली होती.... छाती थाडथाड उडत होती.... पायात गोळे येत होते.....चपला घासून पायाचे तळवे जळत होते.... अंतर संपता संपत नव्हते.... डोळ्यांना समोरचे नीट दिसतही नव्हते! पण आता पळालो नाही तर आपली धडगत नाही ह्याचीही खात्री होती! आमच्या पुढ्यात आमच्यासारखीच काही सैरावैरा धावणारी माणसे होती. बस स्टॅन्डकडे जाणारा तो एकमेव रस्ता असल्यामुळे बाजूच्या गल्लीत वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता!
पळत असतानाच समोर एक टोकदार शिंगे असलेली, जमावामुळे बिथरलेली म्हैस आली! तिला चुकवता चुकवता पुन्हा एकदा दगडफेक करणारी माणसे आमच्यापासून काही पावलांच्या अंतरावर....



असे म्हणतात की संतप्त जमावाला माणुसकी नसते! त्यांना फक्त राग, सूड, हिंसा कळते. त्याचे मूर्तिमंत प्रत्यंतर ह्या जमावाकडे बघून येत होते. मागच्या पोलिसांनी लाठीमार चालू केल्यामुळे ते अजूनच बिथरले होते. त्यांच्यापासून दूर पळतानाही मला मागे वळून ते किती अंतरावर आहेत हे बघण्याचा मोह आवरत नव्हता.... तर, मला मागे वळून बघत वेळ व्यर्थ घालवताना पाहून वडील चिडून ''पुढे बघ,'' असे ओरडत होते! सगळा कोलाहल नुसता!!

एस. टी. स्टॅन्ड नजरेच्या टप्प्यात आला मात्र, आणि थकलेल्या पायांची गती आपसूक वाढली. अजून काही पावले, आणि आमची दगडफेकीतून तात्पुरती का होईना, सुटका होणार होती! हातातले सामान कसेबसे सावरत, ठेचकाळत, धडपडत आम्ही एकदाचे एस टी स्टॅन्डच्या आत घुसलो तेव्हा दगडफेक करणारा जमाव बर्‍यापैकी मागे पडला होता. आता पुढची काही मिनिटे तरी धोका नव्हता. काही क्षण त्या सुटकेच्या भावनेत सुन्न मनाने उभे असतानाच वडील पुन्हा एकदा ओरडले, ''तिसऱ्या नंबरची बस..... धावा!! ''
आगारात समोरच उभी असलेली ती बस आटोकाट भरून ड्रायव्हरच्या प्रतीक्षेत उभी होती. टपावर सामानाची आणि बसमध्ये प्रवाशांची एकच गर्दी होती! पण ती बस व्हाया पुणे जाणारी होती. अधेमधे एखादा-दुसरा थांबा, आरक्षण नसल्यामुळे उभ्याने करायला लागणारा गर्दीतला प्रवास ह्या कशाकशाचा विचार न करता आम्ही तिरासारखे गाडीत घुसलो! मिळेल त्या जागेवर बॅगा ठेवल्या आणि धापा टाकत, श्वास सावरत, घाम पुसत बस सुरू व्हायची वाट पाहू लागलो. दोनच मिनिटांत बसचालक आला आणि प्रवाशांनी दुथडी भरून वाहत असलेली ती  बस डचमळत एकदाची रस्त्याला लागली. 

पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते! 

दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो.     

-- अरुंधती