Friday, September 30, 2011

असाही एक प्रवास!!


''सॉऽऽरी अम्माऽऽ...आपलं...सॉरी अप्पा!!'' मी कच्चकन जीभ चावली आणि तोंडात येणारे माफीनाम्याचे शब्द एका कोरड्या आवंढ्यासरशी गप्पकन् गिळले. ठिकाण होते केरळातील त्रिचूरचे रेल्वे स्टेशन. वेळ सायंकाळचे पाच वाजून दहा मिनिटे. फलाटावर टेकल्या टेकल्या लगेच गचके घेत निघणार्‍या त्रिचूर-बेंगळुरू पॅसेंजरमधील जनरल डब्ब्याच्या दारातून मुसंडी मारून इंचभर आत घुसल्यावर आपल्या बुटांखाली जे मऊ मऊ लागतंय तो रेल्वेच्या डब्याचा तळभाग नसून कोणा मल्लूभाऊ वा मल्लिकेची पावले आहेत ह्या दु:खद व कष्टप्रद जाणिवेला मनोमन चिरडत मी पुन्हा एकदा आजूबाजूच्या घर्मतैलचंदनगंधाने पुनीत झालेल्या हवेचा श्वास नाकात ओढून घेतला व नव्या बळाने रेटा देत मुंगीच्या गतीने पुढे सरकायला सुरुवात केली.
മൂവ് മൂവ്... माझ्या मागे असलेल्या मुंडुवेष्टीने मला जोरात ढकलले. पुन्हा एकवार मी बहिणीला रजा न देणार्‍या तिच्या बॉसला मनातल्या मनात दूषणे दिली. त्याच्या त्या रजा नाकारण्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला आरक्षण नसताना साध्या तिकिटावर बारा-तेरा तासांचा प्रवास जनरल डब्यातून करायची वेळ आली होती! त्यात आमच्या बहिणाबाई व आमच्याबरोबर असलेला एक मित्र हे दोघेही अतिशय प्रामाणिक! नियमांना धरून वागणार्‍या समूहाचे नेतृत्व करणारे.... ''आरक्षित डब्यात चढून टी.सी कडून आपले तिकिट अपग्रेड करू,'' (थोडक्यात, बसण्या/झोपण्यासाठी तरी थोडी जागा मिळवू) अशा अर्थाची माझी सूचना त्यांनी पार ''नाऽहीऽऽ!!'' म्हणत धुडकावून लावली होती. परिणामतः आम्ही दोघी जनरल डब्याच्या मागच्या दारातून व मित्रवर्य पुढच्या दारातून त्या महासमुदायाच्या खतखत्याने ओसंडून वाहत असलेल्या डब्यात सूर मारण्यात यशस्वी झालो होतो.

आता खरी समस्या ही आत घुसल्यावर दृष्टोत्पत्तीस आलेल्या अफाट जनसमूहातून मार्गक्रमणा करत आसनव्यवस्थेच्या जवळपास पोहोचण्यात होती. वाटेत अगम्य (मल्याळी) भाषेत मचाव मचाव करणारे असंख्य लोक. अगदी कमरेला पिवळट पांढरी लुंगी गुंडाळलेल्या व शुभ्र बत्तिशीने चकाकणार्‍या कभिन्न तेलकट अण्णा अप्पांपासून मत्स्यगंधा, योजनगंधा नाव सार्थ करणार्‍या व कचाकचा बोलणार्‍या / भांडणार्‍या ललनांपर्यंत सर्वांचेच लक्ष्य मिळेल ती जागा पादाक्रांत / सामानाक्रांत करणे हेच होते. गार्डची शिट्टी होऊन रेल्वे हालली तरी आमच्या डब्याच्या आतील व बाहेरील गर्दी तसूभरही कमी झाली नव्हती. हाय रे रामा! का म्हणून मला ऐन लग्नाच्या मोसमात परतीचे आरक्षण अनिश्चित असताना मैत्रिणीच्या लग्नाला फाफलत त्रिचूरला जायची बुद्धी सुचली? त्यात बहीण व मित्र, दोघांनाही रजा नसल्यामुळे गुर्वायूर मंदिरात त्या मैत्रिणीचे लग्न लागल्यावर स्वादिष्ट भोजनाचा निवांत ताव घ्यायचे सोडून आम्ही घाईघाईत पोटात चार घास ढकलले होते व सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर थडकलो होतो. स्टेशनवर आमच्यासारखेच अनेक आरक्षण नसलेले प्रवासी व दर सप्ताहान्ताला बंगलोर-त्रिचूर प्रवास करून घरी येणारे व आता परतीला निघालेले नोकरदार व विद्यार्थी....


''ताई, तू थोडी तिरपी उभी राहतेस का, म्हणजे मला पाऊल ठेवायला जागा मिळेल?'' एवढा वेळ बकध्यान करत एका पायावर तोल सांभाळत असलेली मम भगिनी माझ्या कानाशी ओरडली. (पुटपुटली असती तरी ऐकू आले नसते अशा कोलाहलात!) मी उदार मनाने माझ्या देहाची वजनदार तनुलता जरा वक्र केली....तेवढ्यात मागचा एक लुंगीवाला जोरात किंचाळला. अय्यो रामा!! त्याच्या पायावरच उभी राह्यले की वो मी! पुन्हा एकदा मी 'सॉऽरी' ची पुडी सोडली.
कुळकुळीत डोक्यांच्या त्या चिपकट, तेलकट घनगर्भ गर्दीत मला हळूहळू स्वतःचे अस्तित्व नाहीसे होणे, गर्दीत एक होणे, समुदायाचा एक भाग होणे इत्यादी शब्दप्रयोगांचा वास्तविक अर्थ उमजू लागला होता. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त मानवी शरीरे, मस्तके, केस, वस्त्रप्रावरणे.... नाकांत शिरून हुळहूळ माजवणारे कोणाचे कृष्णकुंतल... त्यांच्या आडून क्वचित दिसले तर आमच्या डब्याच्या खिडकीचे अवकाश.... आणि दूरच दूर भासणारे आसन-व्यवस्थेचे क्षितिज....पायांवर, पायांत आणि पायाखाली गाठोडी, बोचकी, बचकी, पिशव्या, टोपल्या, करंड्या, खोकी, बॅगा इत्यादी सामानरूपी भौतिकतेचे मणांमणांचे ओझे....!!
मध्येच माझा नाकाचा शेंडा खाजू लागला. ''ए माझं नाक खाजतंय....'' माझ्या पाठीशी उभ्या बहिणीला ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजात मी ओरडले. नशीब एवढंच की आजूबाजूला मराठी कळणारं कोणीही नव्हतं. ''मला माझा हातच मिळत नाहीए गं!'' मी पुन्हा कळवळले. हो, माझाच श्वास शेअर करणार्‍या तीन-चारजणांमुळे गेल्या अर्ध्या तासात मला माझ्या हाताचे दर्शनच झाले नव्हते. ''माझं नाक खाजव ना!'' मी अगतिकतेने बहिणीला विनवले. एवढ्या गंभीर क्षणालाही ती दुष्ट नारी आसुरी आनंदाने फिस्सकन हसली. जन्मल्यापासून मोठ्या बहिणीने केलेल्या ताईगिरीचा वचपा काढायची तिला ही नेमकी संधी गवसली होती!
''मी खाजवेन नाक तुझे.... पण.... त्याबद्दल मला काय देशील?''
माझ्या ओठांवर आलेले 'धम्मकलाडू' हे शब्द मी मोठ्या प्रयत्नांती गिळले आणि तिच्या ''पुढचे आठ दिवस मी कशीही वागले तरी मला रागावायचे नाही, माझ्यामागे भुणभूण करायची नाही,'' या मागणीचा बिनशर्त स्वीकार करून सर्व जनसमुदायाच्या साक्षीने तिला माझे नाक माकडागत खाजविण्याची संधी दिली. खेटलेल्या दोघी तिघी पोरी भाषा वगैरे न कळतानाही फिदीफिदी हसल्या. बाप्यांनीही दात काढले.
चला, त्या निमित्ताने इतका वेळ आमच्याकडे परप्रांतीयांच्या तुटकपणाने पाहणार्‍या व अगम्य भाषेत बडबडणार्‍या मल्लू सहप्रवाशांत आमच्यामुळे सौम्य खसखस पिकली होती.
अजूनही आमची दोघींची प्रगती डब्याचे दार ते आसनव्यवस्था यांच्या दरम्यान असलेला पॅसेज एवढीच होती. उपलब्ध प्रत्येक सेंटिमीटरवर माणसे उभी, बसलेली, तोललेली होती. सामान ठेवायच्या लोखंडी जाळीदार रॅकवर देखील काही लोक चढून बसले होते. चार माणसांच्या आसनावर सहा ते आठ माणसे कोंबलेली होती. त्यांच्या पायाशी असलेल्या जागेत वर्तमानपत्रांचे कागद पसरून आणखी काहीजण दाटीवाटीने बसलेले होते. मधल्या वाटेवर, दोन आसनांच्या मधोमध.... सगळीकडे वेगवेगळ्या स्थितीत बसलेली/ उभी जनता.... एकमेकांच्या मांड्यांवर बसलेली डबल डेकर अवस्थेतील तरुण पोरं-पोरी.....भारताच्या फसलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमाचं हे मिनी व्हर्शन!
पुढचे बारा तास व थोडक्यात संबंध रात्र ह्याच गर्दीत अशा अधांतरी ताटकळलेल्या अवस्थेत इतरांना दत्तक जात काढायची ही कल्पनाच भयंकर होती. आपल्याच हातापायांचे दर्शन दुर्लभ झाले होते. त्रिभंगावस्थेत उभे राहून पाठीची वाट लागली होती. मस्तकात शब्द-गंध-ध्वनीचा उग्र कोलाहल माजला होता. इंग्रजीचे ठराविक 'एक्स्क्यूज मी', 'प्लीज', 'सॉरी' वगैरे शिष्टाचारयुक्त शब्द, हृदयद्रावक दु:खोद्गार आणि माझे कारुण्यरसाने थबथबून वाहत असलेले कटाक्ष यांचा उपस्थित गर्दीच्या काळजावर ढिम्म परिणाम होत नव्हता. शेवटी सारी अस्त्रे म्यान करून मी मुंडी मुरगाळून भवितव्याच्या कल्पनेने डोळे घट्ट मिटून व्यथित अंतःकरणाने उभी राहिलेली असताना बहिणीच्या मोबाईलची रिंग वाजली....
आता गळ्यातला मोबाईल कानापर्यंत न्यायचीही जिथे मारामार तिथे ती तो कॉल काय आणि कसा घेणार! पण बराच वेळ ती रिंग अथकपणे वाजत राहिल्यावर बहिणीच्या समोरच्या बाईने कीव येऊन तिला तसूभर सरकून कॉल घेण्यापुरती जागा करून दिली. पलीकडून आमच्याबरोबर प्रवास करणारा, डब्याच्या दुसर्‍या टोकाला असलेला मित्र बोलत होता. त्या तुटक्या संभाषणातून बहिणीला एवढाच अर्थबोध झाला की त्याला बसायला व्यवस्थित जागा मिळाली आहे आणि आम्ही जर त्याच्या सीटपर्यंत पोहोचू शकलो तर आमचीही बसायची सोय होऊ शकेल!!!
हुर्रे!!!! क्षण-दोन क्षण त्या गोडगोजिर्‍या बातमीने मला बुटातल्या बुटात नाच करावासा वाटू लागला! पण ते शक्य नसल्यामुळे फक्त भुवया व मुंडी वर-खाली करून माझा आनंद साजरा करू जाता शेजारची जनता संशयाने माझ्याकडे बघू लागली.... शेवटी आवरते घेतलेच एकदाचे! पण विचार मात्र सुंई-सुस्साट, बुंई बुंगाट सुटलेच होते! हे मुंबईकर लोक काय जादू करतात इतर लोकांवर कोण जाणे! आणि त्यात आमचा हा मित्र गोडबोल्या गुज्जूभाई आणि कसलेला मुंबईकर! लोकलच्या प्रवासाचा सराव व गर्दीची सवय असलेला! आता त्याच्या कृपेने बधिर, व्यथित, पीडित शरीराला घटका-दोन घटका बूड टेकवायला जागा मिळणार ही कल्पनाच सद्गदित करणारी होती.
असो. मित्राच्या त्या कॉलसरशी माझ्या हतोत्साही शरीरात व मनात एक नवे चैतन्य संचारले. पुढच्या स्टेशनला आमच्या बाजूच्या दरवाज्यातून खाली उतरून डब्याच्या पुढच्या दरवाज्यातून आत घुसायचे असा प्लॅन ठरला. त्याप्रमाणे जिलब्यांनी नटलेल्या पिवळ्या फलकाचे व फलाटाचे दूरून दर्शन झाल्या झाल्या मी व भगिनीने जीव खाऊन दाराच्या दिशेने हालचाल सुरू केली. परंतु हाय रे दैवा! बाहेरून माणसांचा एक भला थोरला लोंढा आमच्या दिशेने घोंघावत आला आणि आम्ही होतो त्यापेक्षाही मागे ढकलल्या गेलो!


प्रत्येक स्टेशनला आमच्या आशा पल्लवित होत व तेवढ्याच घणाघातीपणे त्या उखडल्या जात. उरत ते फक्त सुन्न शरीरांचे भग्न नि:श्वास! बघता बघता बाहेर काळोख पसरला.... डब्यात दिवे लागले... एवढा वेळ जागेसाठी आणि देव जाणे आणखी कोणकोणत्या कारणांसाठी भांडणारी मंडळी जरा दमून भागून थोडी निवांत झाली. मी व बहिणीने आता डब्याच्या आतूनच वाट काढत पलीकडच्या टोकाला पोचायचा निर्णय घेतला असल्यामुळे तासागणिक पाच-सहा इंच अशा गतीने आम्ही पुढे सरकत होतो. पहिल्या कंपार्टमेंटच्या अगदी नजीक पोहोचलो होतो. त्या कंपार्टमेंटमध्ये सगळी कॉलेजची मुलं-मुली ठासून भरली होती. सगळे निवांत झाले म्हटल्यावर त्यांनी मल्याळम् गाण्यांच्या भेंड्या सुरू केल्या. जोरजोरात, जोषात गाडीच्या टपावर व भिंतींवर ताल धरून नजरेचे इशारे करत गाणी म्हणणारी पोरे आणि त्यांच्या इशार्‍यांना मुरकत दाद देणार्‍या पोरी....!! आजूबाजूचे प्रवासी कौतुकाने ह्या जथ्याची गाणी ऐकत होते, मध्येच त्यांना सामील होत होते. एवढ्या गर्दीत, उकाड्यात व गलक्यात आपल्याच मस्तीत राहून, चेमटलेल्या अवस्थेत आनंदीपणे गाणार्‍या त्या सर्वांचा मला क्षण-दोन क्षण हेवा वाटला. एरवी रेल्वेच्या ए.सी. डब्याशिवाय व गुबगुबीत गिरद्यांशिवाय प्रवासाची कल्पना साहू न शकणारी मी त्यांच्या त्या साध्या सरळ आनंदाकडे आसुसून अविश्वासाने पाहत होते. हे लोक परग्रहवासी तर नाहीत ना, अशी शंकाही मनास काही सेकंद चाटून गेली.
माझ्या त्या मनोस्थितीचा भंग एका उग्र, खमंग, रसदार, तेलकट अशा तीव्र वासाने केला. एरवी त्या वासाचा पदार्थ खाण्याची कल्पनाही मी करू शकणार नाही... परंतु माझ्या भुकेलेल्या पोटाला ते माहीत नसावे. त्याने गुरकावून सकाळपासूनच्या धावाधावीत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याची क्षीण गर्जना केली. साइड सीट्सवर बसलेल्या एका मध्यमवयीन जोडप्याने आपला टिफिन उघडून त्यातून तर्रीदार सांबार-भात-भाजी खायला सुरुवात काय केली, आणि सिग्नल मिळाल्याप्रमाणे आजूबाजूच्या लोकांनीही पटापट आपापले डबे उघडून सायंकालीन भोजनास आरंभ केला.

आमच्यापाशी ना टिफिन होते, ना स्टेशनवर बाहेर जाऊन काही विकत घेण्याचा मार्ग! तरी मी धीर करून खिडकीजवळ बसलेल्या एका माणसाला पैसे देऊन पुढच्या स्टेशनावर किमान बिस्किटाचा पुडा घेण्यास खुणेने विनविले. पण आमचा डबा फलाटावरील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, दुकानांपासून बर्‍याच लांबवर असल्यामुळे तेही शक्य झाले नाही. आज बहुतेक उपास करायला लागणार हे सत्य उमगेपर्यंत बाजूच्या लोकांची खाणीपिणी आटपली होती आणि आता मिळेल त्या स्क्वेअर इंचात लुंग्या, पातळे आरामासाठी विसावली होती. बहिणीने मित्राला मोबाईल लावला तेव्हा त्याने तेथील बाकड्यावर झोपण्यापुरती जागा मिळाली असून तो आडवा झाला असल्याची सुवार्ता सुनावली.
खाली बसलेल्या (म्हणजे शब्दशः रेल्वेच्या फ्लोअरवर स्थानापन्न), पेंगुळलेल्या व डुलक्या काढणार्‍या मंडळींना तुडवत, लाथा मारत डब्याच्या दुसर्‍या टोकाला पोचायची कल्पनाच असह्य होती. त्याक्षणी मला जर टारझन ट्रेनिंग मिळाले असते तर मी सामानाच्या रॅक्सना धरून लोंबकळत ''याऽऽहूऽऽ'' करत किंचाळत हां हां म्हणता डब्याच्या दुसर्‍या टोकाला पोचले असते असे तीव्रतेने वाटून गेले व पुन्हा एकदा आपल्या शिक्षण व्यवस्थेतील न्यूनस्थळे मजला भेडसावून, वेडावून गेली!
खिन्न मनाने मग मीही आमच्या बॅगच्या एका टोकावर वाईच टेकले. दुसर्‍या टोकावर बहीण! अहाहा.... अंतरीचे सुख वगैरे वगैरे काय जे असते ते मला त्या दोन क्षणांत उमगले! चार तास अतिशय क्लिष्ट अवस्थेत, लटकत, लोंबकळत ठेचकाळत व स्वतःच्या शरीराचे भजे करत काढल्यावर उत्तमांगाला जेव्हा तात्पुरता आधार मिळाला तेव्हा सर्वांगातून सुटकेची एक अबोल तान लहरत गेली. शरीर तर श्रमले होतेच, पण परिस्थितीशी झगडून मनही श्रमले थकले होते. बहिणाबाईंची तर बसता क्षणीच विकेट पडली होती. गाडीच्या हेलकाव्यांच्या अंगाईने ती जागचीच डोलत होती. माझ्या मनातून अद्याप डब्याच्या दुसर्‍या टोकाला कसे जाता येईल याचे विचार गेले नव्हते. जणू काही त्या टोकाला पोचल्यावर मला पंचतारांकित आसन व शयन व्यवस्था प्राप्त होणार होती!!
जनरल डब्यात रात्रीचे वेळी तितकेसे सुरक्षित वातावरण नसते ह्याची जाण ठेवून ती सारी रात्र मी जागून काढली. मध्येच भगिनीला ढोसायचे, बसल्या जागी घोरणार्‍या सुखी निद्रिस्त जीवांकडे बघत उसासे टाकायचे, बिडी-दारू-धूर-गर्दीचे संमिश्र वास, आजूबाजूच्या लोकांचे संथ नि:श्वास....

अगदी पहाटे कधीतरी माझाही डोळा लागला. जाग आली तीच कचाकचा आवाजाने. ज्याच्या पायथ्याशी आम्ही सारी रात्र काढली त्या माणसाने आपले प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधील सामान आवरायला सुरुवात केली होती. मी तारवटल्या डोळ्यांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले... ''बेंगळुऽरूऽ इन हाऽफ आवर!'' तो गुरकावला. ताबडतोब मी बहिणीला ढोसायला सुरुवात केली. दोघी जाग्या तर झालो, पण तोंडावर साधे पाणी मारायचे तरी कसे, हाही प्रश्नच होता. शेवटी पर्समधील वाईप्स काढून त्यानेच चेहरे खसाखसा पुसले. बाकीच्या गर्दीला तोंड धुणे वगैरे गोष्टींशी घेणेदेणे नव्हते. त्यांच्या जगात ते मस्त होते. अंगाभोवती गुंडाळलेल्या शालीला आवरून कसेबसे बॅगेत कोंबत असताना मित्राचा कॉल आला.
''प्लॅटफॉर्मपे मिलते है यार!'' तो टवटवीत आवाजात उद्गारला.
त्याच्या त्या सक्काळ सक्काळच्या तरतरीतपणामुळे माझ्या मस्तकात मात्र तिरिमिरीच गेली. इथे सारी रात्र मी चोरचिलटांच्या, गुंडांच्या धास्तीने आणि अशक्य अवघडल्या अवस्थेत बसून जागून काढली... आणि हा शहाणा रात्रभर सुखकी नींद, चैन की सांसे घेऊन कसा बोलतोय बघा!
बहिणीला कडक शब्दांत फर्मान सोडले, ''बॅग उचल!''
''आँ??''
''म्हणतीये ना, बॅग उचल लवकर.... आपल्याला डब्याच्या त्या टोकाला जायचंय!''
बहिणीच्या झोपाळलेल्या डोळ्यांत 'हिला नक्की वेड लागलंय' चे भाव! पण मी आता मागे हटणार नव्हते.
दात-ओठ चावत, जीव खाऊन मी जोरजोरात ''हटो, हटो, मूव्ह, मूव्ह...'' चा नारा देत डब्याच्या त्या टोकाच्या दिशेने देह लोटून दिला. वाटेत येणार्‍या लोकांपुढे आता माझ्या वजनाखाली चिरडले जाणे किंवा बाजूला होणे हेच पर्याय होते. (शिवाय साखरझोपेतून उठल्यावर त्यांची जी अवस्था होती ती माझ्यासाठी फायद्याची होती!) समस्त असुर-राक्षसांना पृथ्वीवर दणदणा चालत, वाटेतील जीवांना पायदळी तुडवत, विकट हास्य-गर्जना करत जाताना कित्ती कित्ती आनंद मिळत असेल ते आता कोठे माझ्या ध्यानात आले. बहीण हूं की चू न करता मुकाट माझ्या मागोमाग येत होती. अशा वेळी मूग गिळून गप्प बसण्याला पर्याय नसतो हे तिला अनुभवाने पुरते कळून चुकले आहे. मजल दरमजल लढवत आम्ही ज्या ठिकाणी आमचा मित्र सकाळचा वारा खात उभा होता तिथपर्यंत जाऊन थडकलो.
'ये ल्लो, आ गये हम | अब साथमें उतरेंगे|'' मी विजयोन्मादाची तुंबळ गर्जना केली.
मित्र खूळ लागल्यागत आम्हा दोघींकडे टकमका बघतच राहिला!!
बंगलोर स्टेशन येताक्षणी आम्ही तिघांनी दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. मोकळ्या हवेत, मोकळ्या जमिनीवर पाऊल ठेवले. अडथळ्यांच्या शर्यतीने ग्रस्त झालेले रक्ताभिसरण पूर्ववत होण्यासाठी आठ-दहा येरझार्‍या घातल्या. माझी पावले टम्म सुजली होती. शरीरात सुया, पिना टोचल्यासारखी जाणीव होत होती. डोळे लाल झाले होते. आणि थकव्याचे तर विचारूच नका राव! त्या दिवशी बहिणीच्या घरी पोचल्यावर अगोदर अंघोळी केल्या व जे देह लोटून दिले ते थेट सायंकाळी सहा वाजता जाग आली. पिझ्झा ऑर्डर केला. दोघींनी समोरासमोर बसून पिझ्झ्याचा फन्ना उडविताना आयुष्यभरासाठी पाळण्याची प्रतिज्ञा घेतली,
''गांधीबाबांनी केला तर केला.... ह्यापुढे कध्धी कध्धी रेल्वेच्या जनरल डब्याने प्रवास करणार नाही!''
--- अरुंधती
[ मायबोली गणेशोत्सव २०११ स्पर्धेसाठी दिलेला लेख]


Sunday, September 11, 2011

भारतीय लोकगीतांमधील गणेश


ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥
मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे प्रेम, श्रद्धा, भक्ती खरी बहरून येते ती गणेशोत्सवाच्या काळात! जागोजागी गणेशभक्तांचे मेळे, मंडपांत विराजमान गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनार्थ रचलेले सोहाळे, रोषणाई - सजावटी - मंगल आरत्या, पठणांसह घरांघरांतून उत्साह, मांगल्य व आनंदाला आलेले उधाण... खास महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा हा उत्सव! ढोल, ताशे, झांजांच्या गजरात वाजत-गाजत येणार्‍या गणरायांच्या आगमनाची प्रत्येक घरातून सारे वर्ष आतुरतेने वाट पाहिली जाते.

गणरायांचे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील स्थान फक्त ह्या उत्सवापुरतेच मर्यादित नाही. विघ्नविनाशक, भक्तांचा कैवारी, दुष्ट शक्तींचा विनाश करणारा, विद्या - समृद्धी - ज्ञानाचे शुभ प्रतीक म्हणून पूजिला जाणारा गणपती बाप्पा समाजातील सर्व स्तरांमध्ये तितक्याच श्रद्धाभावाने आराधिला जातो. जणू ह्याच गोष्टीची साक्ष पिढ्यानुपिढ्या चालत आलेली, नवीन भर पडून आणखी समृद्ध झालेली लोकगीते देत असतात.
महाराष्ट्रात जसे घरी, दारी, व्यापारी, पूजा-हवन प्रसंगी किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशाची आराधना करून त्याला विघ्न दूर करण्यासाठी साकडे घातले जाते तसेच भारताच्या विविध प्रांतांतही गणपतीची तितक्याच प्रेमाने, आर्जवाने आळवणी केलेली दिसून येते.
गणरायाला संकल्प सिद्धीस नेणारा, अडथळे दूर करणारा, उदार, कनवाळू, दयार्द्रव, सकळ कलांचा व विद्यांचा अधिष्ठाता मानले गेले तरी प्रथमतः तो लोकनायक आहे, गणनायक आहे हे विसरून चालणार नाही. आपल्याकडे लोककलेत गणपतीचे स्थान मानाचे आहे. 'पयलं नमन हो करितो वंदन....गणपती आला नाचून गेला' अशा नमनाने पारंपरिक लोककला सादर केली जाते. 'आधी गणाला रणी आणिला', 'महाराज गौरीनंदना अमर वंदना' अशा जोषपूर्ण गीतांनी शाहीर सर्वात अगोदर गणेशाचे आवाहन व वंदन करतात. कधी त्यात 'गण वाकड्या सोंडेचा, गण हत्तीच्या पिंडाचा... शुभ मंगल चरणी गण नाचला' असे वर्णनही आढळते. नांदी, गण गौळणींतून तसेच पोवाडे, आरत्यांमधून बाप्पाचे स्तवन होत असते.
तुम्ही गवरीच्या नंदना
विघ्न कंदना
या नाचत रंगणी जी जी....
घरादारांतूनही गणपतीच्या स्तवनाची, त्याच्या आळवणीची कवने प्रसंगानुसार रचली जात असतात. घरात शुभकार्य काढले की पहिला मान गणपतीचा. आणि लग्नविवाहा सारख्या प्रसंगात तर ठायी ठायी बाप्पाला नमन, त्याची आठवण काढलेली आढळून येते. त्याला घरातील ज्येष्ठाचा मान असतो आणि त्याच्यावर प्रेम मात्र घरातील लहान मुलावर करतात तसं भरभरून केलेलं आढळतं.
सहसा असे दिसून येते की समाजात स्त्रिया आपल्या लोकगीतांचा मोठा ठेवा जपतात, पुढे नेतात, अनेक पिढ्या जतन करतात, त्यांत भर घालतात. अनेक प्रचलित लोकगीते नीट काळजीपूर्वक अभ्यासली तर त्यांच्या रचयित्या ह्या स्त्रिया असाव्यात असा कयास बांधता येतो. मात्र त्यास कोणता ठोस आधार नाही. परंतु लोकगीतांतून आलेले दाखले, उदाहरणे पाहू जाता ती स्त्रियांनी रचली असावीत असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे. त्यातील सूक्ष्म विनोदही वाखाणण्यासारखा आहे. मग त्यातून बाप्पाही सुटत नाहीत.
लग्ना अगोदर घाणा भरताना घरातील आयाबाया गणपती बाप्पाची आठवण अशी काढतात.
घाणा भरीला । सवाखंडी सुपारी
मांडवी व्यापारी । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी गहू
नवर्‍या मुलीला गोत बहू । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी भाताचा
नवरा मुलगा गोताचा । गणराज
मांडवाच्या दारी । उभा गणपती
नवर्‍या मुलाला गोत किती । गणराया
मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण
नवर्‍या मुलाला केळवण । गणरायाला
मांडवाच्या दारी । रोविल्या गं मेढी
मूळ गं वर्‍हाडी । अंबाबाई
मांडवाच्या दारी । कोण उभ्यानं घास घेतो
चहूकडे चित्त देतो । गणराज
मांडवाच्या दारी । इथं तिथं रोवा
लोडाला जागा ठेवा । माणसांच्या
घाणा भरीला । सवा खंडी कणीक
मांडवी माणिक । अंबाबाई
आणि आयाबाया जमल्या की 'फू बाई फू' करत फुगडीचा खेळही झिम्माड रंगतो. त्यातही गणपती बाप्पा हळूच डोकावतो. फुगडीच्या गाण्यात एक ललना दुसरीला म्हणते,
गणपतीच्या मागे उंदराची पिल्लं
सगुणा म्हणते तींच माझी मुलं....
या ओळी म्हटल्यानंतर नक्कीच ललना-समूहांत हशा उसळत असणार! नेमक्या ठिकाणी सौम्य विनोद करत हलक्या-फुलक्या वातावरणाला आणखी रंगत आणताना तिथेही बाप्पा आठवतो.
भोंडल्याची सुरुवात गणेशाचे वंदन करून होते -
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारवे घुमती बुरजावरी
गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका....
किंवा
आधी नमूया श्री गणराया
मंगलमूर्ती विघ्न हराया
मंगलमूर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा (चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणूया, तांदूळ त्याचे कांडूया
मोदक-लाडू बनवूया
गणरायाला अर्पूया....
स्त्रियांच्या विश्वात सहज सापडणार्‍या उदाहरणांनी सजलेल्या या गाण्यांमधून बाप्पाचे केलेले नमन व त्या आडच्या समृद्ध आशय व भावना हा लोकगीताचा प्रमुख ठेवा आहे.
भारतातील विविध प्रांतांमध्येही गणपती बाप्पाची अशाच तर्‍हेने विविध प्रसंगी सकल मनोरथ संपन्न होण्यासाठी, रोग-इडा-पीडा-दुष्काळ-आपत्ती निवारणासाठी, विद्या-संपत्ती-समृद्धी फलप्राप्तीसाठी, कार्य तडीस नेण्यासाठी आराधना होत असते. त्याचा शुभकार्यात पहिला मान असतो. बह्माणी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, इंद्राणी, वाराही व चामुंडा या सप्तमातृकांसमवेत व कुबेर भैरवासमवेत विराजमान गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून कार्यसिध्दीनंतर त्यांचे विसर्जन करण्याची परंपरा भारताच्या अनेकविध प्रांतांमध्ये दिसून येते. ह्या मातृका व भैरव गणेशाला विघ्नरूपी असुरांचे निर्दालन करण्यासाठी शक्ती प्रदान करतात असा समज आहे. त्यामुळे विवाहादि प्रसंगांत त्यांचे महत्त्व गणपतीच्या जोडीने अनन्यसाधारण दिसून येते.
राजस्थानात रणथंभौर जवळील सवाई माधोपूर येथील विघ्नविनाशक गणेश हा 'रणतभँवर देव' नावाने विशेष प्रसिद्ध आहे. येथील लोकगीतांमध्ये अनेक ठिकाणी ह्या देवाचा उल्लेख आढळून येतो. विवाहकार्याच्या अगोदर तयारीसाठी गणेशाला ज्योतिषी, सोनार, कासार, कोष्टी, हलवाई इत्यादींच्या बाजारपेठेत चलण्याची प्रार्थना केली जाते, जेणे करून लग्नाची सारी खरेदी निर्विघ्न पार पडावी! त्या गीतांत म्हटले जाते,
'रणतभँवर देवा आप पधारो, रिधि सिधि चँवर डुलावणा।'
ह्या प्रांतांतील गणपतीचे स्तवन, नमन, आवाहन करणारी ही गीते विनायक-गीते म्हणून प्रसिद्ध आहेत.
गंमत म्हणजे, येथेही गणपतीच्या गोलमटोल पोटाची, वाकड्या सोंडेची, एकाच दाताची, लाडूंवरच्या प्रेमाची किंवा सुपाएवढ्या कानांची काहीशी मजेशीर वर्णने आढळून येतात. आता हेच गाणे बघा ना!
अर्जी दरबार में, करता सरकार में |
श्री गणेश, काटो कलेश, नित्य हमेश, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में, मनावा थाने, विनती करा दरबार में ||
सूंड सुन्डाला, दुंद दुन्दाला | मोटा मुंड, लांबी सूंड, फड़के तुंद, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
पुष्पं माला, नयन विशाला | चढ़े सिन्दूर, बरसे नूर, दुश्मन दूर, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
रिद्ध - सिद्ध नारी, लागे पियारी |
रिद्ध - सिद्ध नार, भरो भंडार, करो उद्धार, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
दास "मोतीसिंह ", थारा गुण गावे |
गुरु चरणा में शीश नवावे |
माँगू दान, द्यो वरदान, दयानिधान, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
तर काही विनायक-गीतांमध्ये गजाननाची आर्त आळवणी केलेली आढळते. 'हे गजानना, तू सत्वर ये. तुझे सारे प्रिय तुझ्या चरणांवर अर्पण केले आहे, सारे भक्तगण तुझी आतुरतेने वाट बघत आहेत, तुझे स्तवन करत आहेत. देवा गजानना, आता आणखी वाट बघायला लावू नकोस. रिध्दी - सिध्दीला संगतीला घेऊन तू लवकर ये.'
गजानन्द सरकार पधारो,कीर्तन की सब तैयारी है,
आओ आओ,बेगा आओ,चाव दरश को बारी है ॥
थे आवो जद काम बणेला,थां पर सारी बाजी है,
रणत भंवरगढ वाला सुनल्यो,चिन्ता म्हारी लागी है,
देर करो मत,ना तरसाओ,चरण अर्जी हमारी है॥
गजानन्द सरकार पधारो ॥१॥
रिद्धि सिद्धी संग ले आओ विनायक,दयो दर्शन थारे भंक्तां ने।
भोग लगावा,धोक लगावां पुष्प चढावा चरणां में
गजानन्द थारे हाथां में,अब तो लाज हमारी है।
गजानन्द सरकार पधारो ॥२॥
भक्तां की तो विनी सुणली,शिव सुत प्यारो आयो है,
जय-जयकार करो गणपती की आकर मन हरषायो है।
बरसैलो रस अब भजनां में,’महेन्द्र’ महिमा न्यारी है।
गजानन्द सरकार पधारो ॥
कोणी भक्त विनायकाकडे आपल्या ठप्प पडलेल्या कामाबद्दल, अडचणीबद्दल गार्‍हाणे मांडतो. अगोदर तो विनायकाची, 'गजानन्दा'ची स्तुती करतो, आणि मग हलकेच आपली पीडाही सांगतो,
म्हारा प्यारा गजानन्द आईयो,
रिद्धि-सिद्धी ने संग लाइयो जी । । म्हारा प्यारा...
थाने सब से पहलां मनावां,
लडुवल को भोग लगावां,
थे मूंसे चढकर आइयो जी । । म्हारा प्यारा...
माँ पार्वती का प्यारा,
शिव शकंर का लाल दुलारा,
थे बाँध पागडी आइयो जी । । म्हारा प्यारा...
थे रिद्धि-सिद्धि का दातारि,
थानै ध्यावै दुनिया सारी,
म्यारा अटक्या काज बणईयो जी । । म्हारा प्यारा...
थारा सगला भगत यश गावै,
थारे चरणां शीश नवावै,
म्हारी नैया पार लगाइयों जी । । म्हारा प्यारा...
येथील गणपती हा 'पगडी' बांधणारा, राजस्थानी थाटाचा गणपती आहे बरं का!
गणपतीची स्तुती करताना येथील समाजाप्रमाणेच त्या स्तुतीतील अगत्य, प्रेम, दिलदारपणा खास असतो. गणपती बाप्पा तर इतका जवळचा, इतका आपला, प्रिय की त्याची स्तुती करताना घरच्या एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणे त्याची किंचित थट्टाही केली जाते,
चिंता हरो चिन्तामन गणेश थां बिन घड़ी ना सरे
तमारा शीस मोटा रे गणेश, सवा मन सिन्दूर चढ़े ।
तमारा कान मोटा रे गणेश, पीपल पान झूके ।
तमारी आखँ मोटी रे गणेश, झबरक दिवलो बले ।
तमारी सून्ड मोटी रे गणेश, बासक नाग बनी ।
तमारा दाँत मोटा रे गणेश, सगागन चूड़लो पेरे ।
तमारा हाथ मोटा रे गणेश, चम्पारी डाल झूकी ।
तमारी पीठ मोटी रे गणेश, अम्बा बाड़ी पर चँवर डूले ।
तमारा पाँव मोटा रे गणेश, देवल खम्ब बने ।
तमतो रूग रूग चालो रे गणेश ककुंरा पगलिया बने ।
तमतो गद गद हँसो रे गणेश, पेपरा झूल झूरे ।
आणि आता हे माळवा प्रांतातील विवाहांमध्ये गायले जाणारे गीत देखील बघा ना! किती चिडवलंय गणपती बाप्पाला, पण अतिशय निरागसपणे! आणि सरतेशेवटी प्रत्येक कडव्यात आवाहन करून त्याची प्रार्थनाही केली आहे!!
म्हारा घर रुकमनी जी रो ब्याव, गजानन आवे काज सरेगा
म्हारा घर रुकमनी जी रो ब्याव, गजानन आवे काज सरेगा |
शीश तमारो देवा , मोटेरो कहिये
तेल सिन्दूर चडेगा, गजानन आवे काज सरेगा |
आंख तमारी देवा, छोटेरी कहिये
झबलक दिव्लो बलेगा, गजानन आवे काज सरेगा |
सोंड तमारी देवा , मोटेरी कहिये
वासुगनाग रमेगा,गजानन आवे काज सरेगा |
दांत तमारा देवा,मोटेरा कहिये
सुवागन चुडलो पेरेगा,गजानन आवे काज सरेगा |
दोंद तमारी देवा, मोटेरी कहिये
सवा मन मोदक चडेगा,गजानन आवे काज सरेगा |
पांय तमारा देवा,मोटेरा कहिये
केलारा खंब नमेगा,गजानन आवे काज सरेगा |
मारवाडातील विवाह-गीतांमधील गणपतीचे स्तवन हे काहीसे अशा गीतांमधून केले जाते :
गढ़ रणक भवंर सु आवो विनायक करो रे अणचीती वीरदडी
यां थे तो फीरता तो गीरता नगर ढण्डोल्यो
साटे ने बाबो साघर कीसो येतो फीरता तो
गीरता नगर ढण्ढोल्यो साने काकोसांरोघर
कीसो ये तो ऊंची जी मेडी ने बारे बीजूडा
केव झबल के वारे बारणे ये तो पेलो जी वासो
शीवाजी बसीयो शीवा में भर्‍या रे दीवाल्या एक
दूजो जी वासो सरवर बसोयो सरवल भरीयो ठंडा
नीर सू पाणी तणी पीणी हारण बोलो बोली ओ
शब्द सवासणा एक दुगणीयो जी वासो बागा
जी बसोयो बागा में वन फल छाबियाँ एक आवे
सुगन्धी वासो दीनायक चम्पो चम्पेली मखो
मोगरो एक चोथो जी वासो चोबटे जी बसीयो
चोबटा में भरीया रे चोरासियाँ एक काका ने
बाई भई रे भतीजा अवल लाडलडा मामोसा
एक पांचमो जी बासो तोरण बसीयो तोरण
छाई कडी चीडकली एक अदन बदन दोय
चीडकली बोली बोली ओ शब्द सुवासणा
वाळवंटांत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती असते हे सर्वज्ञात आहे. जीवापेक्षा अनमोल असे हे पाणी, आणि त्या पाण्यापेक्षाही पवित्र असे ते गंगाजल. गणपती बाप्पाचे स्वागत, आदरातिथ्य करताना ह्या लोकगीताचा रचनाकार त्याला आचमन करण्यास गंगाजल देतो.... बुंदेली लोकगीतातील ही फाग गणेश वंदना....
अरे हाँ देवा सेवा तुम्हारी ना जानों-
गन्नेसा गरीब निवाज
अरे हाँ काहे के गनपति करो,
कहाँ देऊं पौढ़ाय-
अरे हाँ गोवर के गनपति करों,
पटा देऊ पौढ़ाय-
अरे हाँ देवा काहे के भोजन करों,
कहो देऊ अचवाय
अरे हाँ देवा दूध-भात भोजन करो,
गंगाजल अचवाय
गणपती बाप्पा, आम्ही इतके घोर अज्ञानी आणि गरीब आहोत की आमच्याकडून तुमचे काय आदरातिथ्य होणार? कशापासून गणपती बनवणार? त्यांची स्थापना कोठे करणार?
तर गोमयापासून, शेणापासून गणेशाची मूर्ती बनवून आम्ही तिची एका आसनावर स्थापना करू.
गणपती बाप्पाला काय नैवेद्य दाखवणार? त्यांना काय प्यायला देणार? तर गणेशजींना आम्ही दूध-भाताचा नैवेद्य दाखवू आणि आचमनासाठी गंगाजल देऊ.
गणपतीला प्रिय असलेल्या दूर्वेचे मनोगत एका भोजपुरी लोकगीतात व्यक्त होते : कधी आम्हाला पायदळी तुडवता, कधी आमच्यावर खुरपे, कुदळी चालवता, कधी आम्हाला पेटवता, कधी गणेशजींच्या कपाळी चढवता, कधी नव्या वधू-वरांचे स्वागत करताना आमचा मान असतो, भाद्रपदाच्या शुक्लाष्टमीला सवाष्णींनी आमची पूजा केल्यावर आम्ही त्यांना आशीर्वाद देतो... (दुबिया = दूर्वा)
दुबिया कहे हम जमबे करब
ओहो दुबिया कहे हम जमबे करब
कबो लातो तर परब कबो जूतों तर परब
सिरि गणेश जी के सर पर हम चढ्बो करब
दुबिया कहे ............................
कतो खुरपी चले कतो कुदाली चले
दुई धार के हसुआ से हम कट्बो करब
दुई यौवन के पेटवा हम भर्बो करब
दुबिया कहे ........................
नवकि दुल्हनिया के खोइचा हम भरबे करब
हर सुहागिन के आसीस हम देबे करब
दुबिया कहे हम .................
निमाडी लोकगीतांत विवाहाच्या वेळी गणपतीला विविध स्थानी प्रस्थान करून सर्व विघ्ने दूर करण्यास व कार्य सिद्धीस नेण्यास असे विनविले जाते :
गढ़ हो गुंडी उप्पर नौबत वाज
नौब्त वाज इंदर गढ़ गाज
तो झीनी झीनी झांझर वाज हो गजानन |
जंव हो गजानन जोसी घर जाजो ,
तों अच्छा अच्छा लगीं निकालो हो गजानन | गढ़ हो .....
जंव हो गजानन बजाजी घर जाजो ,
तों अच्छा अच्छा कपडा ईसावो हो गजानन |
जंव हो गजानन सोनी घर जाजो ,
तों अच्छा अच्छा गयना ईसावो हो गजानन | गढ़ हो.....
जंव हो गजानन पटवा घर जाजो ,
तों अच्छा अच्छा मौड़ ईसावो हो गजानन | गढ़ हो......
जंव हो गजानन साजन घर जाजो ,
तों अच्छी अच्छी बंधीब्याहों हो गजानन |
गढ़ ही गुंडी उप्पर नौब्त वाज ,
नौब्त वाज इन्द्र गढ़ गाज ,
तों झीनी झीनी झांझर वाज हो गजानन |
वेगवेगळ्या सण-उत्सवांमध्येही गणेशाचे पूजन सर्वात प्रथम होत असते.
छत्तीसगढच्या लोकगीतांमध्ये होळीच्या वेळी होलिका पूजनाचे समयी राम-लक्ष्मण-हनुमानासमवेत गणपतीचे असे आवाहन केले जाते :
प्रथम चरन गणपति को, प्रथम चरन गणपति को
गणपति को मनाव , गणपति को मनाव,
प्रथम चरन गणपति को ।
काकर पुत्र गणपति भयो, काकर हनुमान, काकर हनुमान
काकर पुत्र भैरो, भैरो, भैरो, भैरो ।
काकर लक्षमण-राम, काकर लक्षमण-राम ,
प्रथम चरन गणपति को
गणपति को मनाव , गणपति को मनाव,
प्रथम चरन गणपति को ।
होली है ........
गौरी के पुत्र गणपति भयो, अंजनी के हनुमान, अंजनी के हनुमान
कालका के पुत्र भैरो, भैरो, भैरो, भैरो ।
कौशिल्या के राम, कौशिल्या के राम ,
प्रथम चरन गणपति को
गणपति को मनाव , गणपति को मनाव,
प्रथम चरन गणपति को ।
होली है ........
भारताच्या पर्वतीय प्रांतांमधील चाली-रीती ह्या अनेकदा रूढ चाली-रीतींपेक्षा वेगळ्या असतात, त्यांच्या देवी-देवताही वेगळ्या असतात. पण तिथेही गणेशजींना अग्रपूजेचा मान मिळतो. आता कुमाऊं प्रांतातील विवाहाचे हे निमंत्रणच पहा ना!
ब्रम्हा विष्णु न्युतुं मैं काज सुं, गणपति न्युतुं मैं काज सुं
ब्राह्मण न्युतुं मैं काज सुं ,जोशिया न्युतुं मैं काज सुं , ब्रह्मा न्युतुं मैं काज सुं,
विष्णु श्रृष्टि रचाय, गणपति सिद्धि ले आय,
ब्राह्मण वेद पढाए, जोशिया लगन ले आय ,
कामिनी दियो जलाय, सुहागिनी मंगल गाय ,
मालिनी फूल ले आय, जुरिया दूबो ले आय,
शिम्पिया चोया ले आय I
दिन दिन होवेंगे काज सब दिन दिन होवेंगे काज,
समायो बधाये न्युतिये, आज बधाये न्युतिये I
नववधूला शंख - घंटांच्या नादात, कलशाची पूजा करून दिलेल्या काव्यमय आशीर्वादाच्या ह्या कुमाऊं प्रांतातील लोकगीतात गणेशजी असे प्रकटतात :
शकूनादे शकूनादे काजये,
आती नीका शकूना बोल्यां देईना ,
बाजन शंख शब्द ,
देणी तीर भरियो कलश,
यातिनिका, सोरंगीलो,
पाटल आन्च्ली कमले को फूल सोही फूल मोलावंत गणेश,
रामिचंद्र लछीमन जीवा जनम आद्या अमरो होय,
सोही पाटो पैरी रैना ,
सिद्धि बुद्धि सीता देही
बहुरानी आई वान्ती पुत्र वान्ती होय
या सर्व गीतांमधील भाषा, तिची शैली, आलेली उदाहरणे, व्यक्त केलेल्या भावना ह्या अतिशय खुबीदार आहेत. त्या जनमानसाचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले तर ते धार्ष्ट्याचे ठरू नये. भाषा, शैली, प्रांत, माणसे बदलली तरी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील ही लोकगीते व त्यांचा आशय यांतून सर्वसामान्य माणसांच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे अढळ स्थान प्रकट होते. गाण्यातील शब्द, त्यांची सोपी चाल, सहज ठेके, गेयता ही लोकगीतांची खासियत असते. गणपती बाप्पाचे स्तवन करणार्‍या लोकगीतांमधून त्याचे ठायी असणारी अतीव श्रद्धा, प्रेम व भोळा भाव व्यक्त होतात. भौगोलिक स्थानानुसार ठिकठिकाणी गणपतीचे रूप काहीसे बदलते, वेषभूषा बदलते, वाहन-आयुध-प्रिय गोष्टीही बदलू शकतात, त्याची उगम गाथा बदलते, त्याचे संबंध स्थानिक देवी-देवतांशी जुळविले जातात, पण त्याचे मंगलदायी, अतिसुखदायी, भाग्यविधाता, दु:खहर्ता, सुखकर्त्याचे स्थान काही बदलत नाही.
त्याचबरोबर हे देखील जाणवते की लोकगीतांचा आशय एक वेळ रांगडा असेल, पण त्यातून प्रकट होणारी भावना मात्र सच्ची असते. संपन्न असते. या भावनेच्या समृद्ध अवकाशात अनेक पिढ्या सरतात, नव्या रचना घडतात, जुन्या रचना जतन करून पुढच्या पिढीकडे सोपविल्या जातात. काळाचे चक्र चालू राहते. गणपती बाप्पा अशा तर्‍हेने जनमानसांत चेतनामयी होऊन राहतो. एक जिवंत श्रद्धास्थान बनतो.
|| जय मंगलमूर्ती || जय श्री गणेश ||
- अरुंधती 
** मायबोली गणेशोत्सव २०११ उपक्रमात समाविष्ट लेख.