Wednesday, November 24, 2010

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.

अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच! सध्या पाकिस्तानात असलेल्या तलवंडी गावात माता तृप्ता व पिता मेहता कालू यांच्या पोटी गुरू नानक यांचा इ. स. १४६९ मध्ये कार्तिक महिन्यात जन्म झाला. नुकताच गुरू नानक जयंती सोहळा व प्रकाश पर्वाचा उत्सव देशोदेशीच्या सर्व शीख बांधवांनी साजरा केला. इतिहासाने ज्या ज्या व्यक्तींची द्रष्टे, संतशिरोमणी किंवा ज्ञानी म्हणून नोंद घेतली त्यांमध्ये गुरू नानकांचे स्थान व कार्य वादातीत आहे. एका महान कर्तृत्वशाली, साक्षात्कारी संतमहात्म्याच्या जन्माच्या जशा कहाण्या असतात तशाच त्या गुरू नानकांच्या जन्माचे बाबतीतही आहेत. माता तृप्ताला नानकांचा गर्भ उदरी जोपासताना झालेले भास, तिला दिसलेली स्वप्ने, संकेत इत्यादींचे उल्लेख शीख वाङमयात येतात. तृप्ता मातेबद्दल तपशिलांत फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती स्वभावाने अतिशय सत्शील, कनवाळू व प्रेमळ असल्याचे उल्लेख आढळतात.अमृता प्रीतमच्या प्रतिभाशाली लेखणीतून, कल्पनेच्या भरारीतून माता तृप्ताने गुरू नानकांच्या वेळी गर्भार अवस्थेत पाहिलेली स्वप्ने ''नौ सपने'' ह्या दीर्घ कवितेतून आपल्या भेटीला येतात. उदरीचा गर्भ तृप्ता मातेला विविध प्रकारे आपल्या अस्तित्वाचे, दिव्यत्वाचे संकेत देत राहतो. नऊ महिन्यांची ही नऊ स्वप्ने. उदरीचा गर्भ जसजसा आकार घेत जातो तसतसा स्वप्नांत आणि माता तृप्ताच्या मनोवस्थेत घडून येणारा बदल अमृताने मोठ्या नजाकतीने वर्णिला आहे. प्रत्येक स्वप्न तृप्ता मातेला पोटातील अंकुराविषयी काही ना काही दृष्टांत देत राहते. संकेत, भास-आभास, स्वप्न व संवाद यांचे हे तलम वस्त्र शब्दांमध्ये गुंफताना कवितेमधून ठायी ठायी अमृतामधील मातृत्वही डोकावताना दिसते. त्या काळातील स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील घटनांचा मोठ्या खुबीने वापर करून अमृता कवितेचे रंगही अधिक गडद-गूढ करत जाते. चंद्र-सूर्य-तारका, नदी-सरोवर, वृक्ष-वने आदींचे रूपक तिने रेखाटलेल्या शब्दचित्राचे सौंदर्य अजूनच खुलविते. तिने कवितेत योजलेले काही शब्द आणि त्यांचा प्रतीत होणारा अर्थ अधिक गहिराईचे संकेत देत मनात रुंजी घालत राहतात.

अमृताच्या आत्मचरित्रात हे काव्य तिला आपल्या आयुष्यातील एका प्रसंगावरुन स्फुरल्याचे ती सांगते. स्वतःचा दूरगावी गेलेला मुलगा जेव्हा आईशी संवाद साधतो तेव्हा त्या आईची होणारी अवस्था अमृतामधील माता आणि कवयित्री ज्या तरलतेने व ताकदीने अनुभवते तीच तरलता तिच्या ''नौ सपने'' कवितेतून रसिकांना खुणावत राहते. एका तेजस्वी गर्भाला उदरी पोसताना माता तृप्ताने नक्की काय अनुभवले असेल? काय स्वप्ने पाहिली असतील? येणार्‍या काळाच्या खुणा तिला जाणवल्या असतील का? त्या गर्भाने तिला काही संकेत दिले असतील का? या सार्‍या प्रश्नांचा वेध घेत अमृताची कविता एक वेगळाच अनुभव देऊन जाते.  माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्‍या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते.

त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न  :  

नऊ स्वप्नं

भाग १

तृप्ता दचकून जागी झाली
ऊबदार दुलई हळूच सारखी केली
लाल लज्जेसमान पदर
सावरला तिने खांद्यावर

आपल्या धन्याकडे पाहिले
मग शुभ्र बिछान्यावरच्या
चुणीप्रमाणे हलकेच लाजली

आणि म्हणू लागली
आज माघाची रात्र
मी नदीत पाऊल ठेवले

गारठलेल्या थंड रात्री
कोमट पाणी नदीचे पात्री

अलौकिक काही झाले
पाण्याला अंगस्पर्श होताच
नदीचे दूध झाले!

त्या जादुई नदीत
मी दुधात न्हाले

या तलवंडी (गावा)त
ही कोणती नदी?
हे कसलं स्वप्नं?

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला

आणि नदीचं पाणी
माझ्या रक्तात मिसळत गेलं
आणि तो प्रकाश
माझ्या उदरी तरंगत राहिला

-----------------------
भाग २

फाल्गुनाच्या कटोऱ्यात सात रंग मिसळले
पण मुखाने काही ना वदले

ह्या मातीच्या देहाचं सार्थक होतं
जेव्हा कोणी उदरी आश्रयाला येतं

हा कसला जप? हे कसलं तप?

की मातेला ईश्वराचा साक्षात्कार
गर्भाचे ठायी होतो....

---------------------------

भाग ३

कोवळ्या गर्भाची मळमळ
जीव घाबरा झाला केवळ

ताक घुसळायला बसले तर भासले जणू लोणी वर आले
मातीच्या घड्यात हात घातला
तर सूर्याचा वृक्ष निपजला

हा कसला भोग? कसला हा संयोग?

आणि चैत्राचे पुढे सरकणारे दिवस
हे असलं कसलं स्वप्नं?
-----------------------------

भाग ४

माझ्यात आणि गर्भात
हे स्वप्नांचं अंतर

जीव माझा फुलला आणि काळीज घाबरंघुबरं
वैशाखात कापलं जाणारं
हे कोणतं पीक होतं
सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं....

---------------------

भाग ५

आज रात्रीचा हा तरल समय
आणि ज्येष्ठाचा महिना
हा कोणता आवाज होता?

जळीस्थळी
जणू एक नाद उमटे
हे मोह-मायेचे गीत
की ईश्वराच्या कायेचे संगीत?

कोणता दैवी सुगंध होता?
की माझ्या नाभीचा गंध होता?
मी घाबरले
शंका घेत राहिले
आणि त्या आवाजाच्या रोखाने
वनांच्या वाटा धुंडाळत राहिले

हा कोणता आवाज
कोणतं हे स्वप्नं?
कितीसं परकं?
कितीसं आपलं?

मी एक हरिणी
जशी बावरी होत राहिले
आणि माझ्या गर्भाला
कान लावून ऐकत राहिले
--------------------------------

भाग ६

आषाढाचा महिना
तृप्ताला आपोपाप जाग आली
जसे उमलणारे फूल
जसा पुढे सरकणारा दिवस

''हे माझं जीवन
कोणत्या सरोवरांचं पाणी
मी आत्ताच इथे
एका हंसाला बसलेलं पाहिलं

हे कसलं स्वप्नं?
की जाग आल्यावरही वाटतंय
जणू माझ्या गर्भात
त्याचा पंख फडफडतोय..... ""
-------------------------------------

भाग ७

कोणता वृक्ष वा मनुष्य
नाही माझ्या जवळ
तरीही कोणी माझ्या झोळीत
घातला हा नारळ?

मी नारळ वाढविला
तर लोक मलई न्यायला आले
कोवळ्या नारळाचे पाणी
मी कटोऱ्यात ओतले

ना कोणा सांगितले ना कळवले
ना आप-परभाव केला
दाराशी असंख्य लोक आले
पण नारळाची मलई
तरीही संपली नाही

असा कसा हा नारळ?
असे कसे हे स्वप्नं?
आणि स्वप्नाचे धागे किती लांबच लांब?

छातीतला हा पाऊस,
मी छातीला हात लावला
तर ते नारळाचं पाणी
दुधासारखं ठिबकू लागलं

-------------------------------

भाग ८

हा कसला भाद्रपद?
ही कसली जादू?

सगळ्याच गोष्टी न्याऱ्या
ह्या गर्भीच्या बाळाचं अंगडं-टोपडं
शिवणार तरी कोण?

ही कसली सूत्रकाठी?
हे कसले माप?
जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते...

आश्विनाच्या महिन्यात
तृप्ता होती जागी आणि विरागी

''हे माझ्या जीवना!
तू कोणासाठी काततो आहेस हा मोहाचा धागा!

मोहाच्या तारेत आकाश गुंडाळता येत नाही
सूर्य बांधता येत नाही
सत्यासारखी एक जी गोष्ट
त्याचं अंगडं-टोपडं ना बेतता येतं ना शिवता येतं... ''

आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

------------------------

भाग ९

माझ्या कार्तिक धर्मी,
माझं जीवन सुकर्मी
माझ्या गर्भाची धुनी
कातते पुढचा धागा जीवनी

देहाचा दीप उजळला
प्रकाशाचा किरण स्पर्शिला
धरतीच्या दाईला बोलावा
माझा प्रसवकाळ आला...

(पूर्ण)

**********************************************************************************************************************

मूळ काव्य येथे वाचा. 


--- अरुंधती 


(छायाचित्रे सिखविकीवरून साभार)

Saturday, November 20, 2010

म्हातारपणीची प्रार्थना

काल ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए. त्या प्रार्थनेचा मी केलेला स्वैर भावानुवाद येथे देत आहे :

देवा तुला माहीत आहे
माझं वय वाढत आहे...

वायफळ बडबड करण्यातून
प्रत्येक विषयावर माझे मत नोंदविण्याच्या
घोर निष्फळ अट्टहासातून
वाचव रे आता मला बाबा!

प्रत्येकाचे आयुष्य सुधारण्यापासून
इतर लोकांच्या भानगडी निस्तरण्याच्या मोहातून
मला वाचव रे बाबा!

लांबलचक तपशीलवार गोष्टींचे
पाल्हाळ लावण्याच्या सवयीतून
माझं रक्षण कर रे बाबा!

फाफटपसारा न मांडता
थेट मुद्द्याचंच बोलायचं
बळ दे रे मला बाबा!

माझ्या तोंडून
माझ्या अनंत शरीर वेदना आणि दु:खांचं
अव्याहत रडगाणं सुरू झालं की...
माझे ओठ शिवून टाकायची व्यवस्था कर रे बाबा!

वर्षं उलटत आहेत तसतशी त्या वेदनांची व्याप्ती
आणि माझी त्यांच्याबद्दल बोलण्याची हौस....
दोन्हीही वाढतच चाललं आहे!
आणि माझं त्यांच्याविषयीचं प्रेमदेखील....

मलाही शिकव धडा
की कधी कधी...
माझंही चुकू शकतं!

मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस.
परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस.

माझ्याकडील शहाणपणाची आणि अनुभवांची महाकाय पोतडी
वापरता न येणे म्हणजे कित्ती कित्ती वाईट!

पण काय करू रे देवा....

शेवटापर्यंत हवेत ना मलाही
कोणी तरी हक्काचे सखे साथी!


-- अरुंधती

मूळ प्रार्थना वाचायची असल्यास येथे वाचा. 

Monday, November 15, 2010

शिक्षणाची किंमत

''ए, कँटिनमधून चहा आणा रे कोणी तरी! '' दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते! एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो! समोर कॉलेजची नवी इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिच्या जागी असणाऱ्या आधीच्या जुन्या खुणा पार बुजून गेलेल्या. बघावे तिथे बांधकाम, पायवाटा भासावेत इतपत चिंचोळे रस्ते आणि गर्द हिरव्या झावळ्यांच्या शोभेच्या झाडांनी व्यापलेला परिसर. कधी काळी धूळ, माती आणि विटांचा ढिगारा उरापोटावर बाळगणारे पार्किंग गायब झाले होते. नव्या पाट्या, नवे बांधकाम आणि शिकणारी नवी पिढी....
"'माहितेय का? आजकाल तीन लाख मोजावे लागतात आपल्या कॉलेजातून आपल्यासारखी डिग्री घ्यायला.... '' सुशा पचकला.
''क्कॉय? '' काहीजणांच्या चेहऱ्यावर धक्कामिश्रित आश्चर्य होते. पण तीन-चार जण ''त्यात काय?!! सगळ्याच शिक्षणाचा खर्च वाढलाय! '' अशा आविर्भावात खांदे उडवत होते.
''आपल्या वेळेला वर्षाला आपण दोन हजार भरायचो. पाच वर्षांमध्ये जास्तीत जास्त दहा-बारा हजार भरले. आणि आता तेवढा खर्च फक्त दोन महिन्यांच्या शिक्षणाला येतो.... माय गॉड! टू मच.... '' एवढा वेळ गप्प बसलेला परेरा उद्गारला. मग कोणीतरी आपल्या लेकाच्या ट्यूशन फीचा विषय काढला.... गप्पांची गाडी मुलांच्या शाळांचा खर्च, क्लास फी इत्यादीवर वळली.
सर्वच जण उत्तम कमावणारे, संपन्न घरातील असल्यामुळे त्यांच्या चर्चा सर्वसामान्य शाळा, साधारण विद्यार्थ्यासंदर्भात नव्हत्याच मुळी.... आपल्या मुलाच्या शाळेत कोणत्या अत्याधुनिक सोयी आहेत, वर्गात किती मुले आहेत, कोणत्या बोर्डाचे शिक्षण आहे, शाळेचा कॅफेटेरिया किती मस्त आहे वगैरे विषयांभोवती त्यांच्या गप्पा घोळत होत्या.
मला मात्र राहून राहून परवाच भेट झालेल्या एका दूरच्या आप्तांनी सांगितलेली आठवण अस्वस्थ करत होती.

आता अतिशय समृद्ध, सुखसंपन्न आयुष्य जगत असणाऱ्या ह्या गृहस्थांचे बालपण व तारुण्य एका लहानशा खेडेगावात गेले. अंगभूत हुशारी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी शाळेत कायम उत्कृष्ट गुण मिळवले. ज्ञानलालसा तर होतीच... पण त्या खेड्यात शाळा कॉलेजाची, वाचनालयाची सोय नव्हती. रोज तालुक्याच्या गावी शाळेत जायचे म्हणजे तासा-दोन तासांची पायपीट. तरीही मोठ्या नेटाने शालांत परीक्षा ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता त्यांना शहरात जाऊन पुढचे शिक्षण घेणे शक्य होणार होते. पण राहायचे कोठे? खायचे काय? रस्त्यावर तर राहणे शक्य नव्हते. डोक्यावर छत आणि किमान एका वेळचे अन्न एवढी जरी सोय झाली तरी त्यांच्या शिक्षणाचा पुढचा मार्ग खुला होणार होता. शेवटी एका नातेवाईकांच्या छोट्याशा घरात रात्रीच्या जेवणाची व अंथरुणाची सोय तरी झाली. दिवसभर ते घराबाहेर राहून कॉलेज करायचे, वाचनालयात किंवा अभ्यासिकेत उशीरापर्यंत बसून पुढील नोटस काढायच्या आणि रात्री मुक्काम गाठायचा असे ते आयुष्य. कष्ट तर पाचवीलाच पुजलेले. पुढे एका जुनाट वाड्याच्या कोपऱ्यातील अंधाऱ्या खोलीत एका शिक्षकांनी त्यांची राहायची फुकट सोय करून दिली. त्याबदल्यात मालकांच्या मुलाची शिकवणी घ्यायची. ते कामही त्यांनी आनंदाने केले. सकाळी मालकांच्या मुलीला शिकवले की फीम्हणून प्यायला धारोष्ण दूध मिळायचे. तेवढाच दिवसभरासाठी पोटाला आधार. त्या वाड्यात वीज नव्हती. मग रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचा.... असे करत करत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. कायम आपली उत्कृष्ट श्रेणी राखली. पुढे परदेशात जाऊन उत्तम नाव केले. खोऱ्याने पैसा कमावला. पण कोठेतरी बालपणीच्या शिक्षणाची ती कसरत, ती आबाळ, करावी लागलेली पायपीट त्यांना त्या समृद्ध आयुष्यातही अस्वस्थ करत होती.
कालांतराने त्यांनी आपल्या गावाच्या रहिवाशांशी आपल्या गावी शाळा सुरू करण्याबद्दल बोलायला सुरुवात केली.
गावात तोपर्यंत तसा विचार कोणीच केलेला नव्हता. हा मुलगा म्हणजे खरे तर गावातील पहिलाच, जो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि तिथे स्थायिक झाला. बाकीच्या ग्रामस्थांचे शिक्षण म्हणजे ते जेमतेम दहावी किंवा बारावी पास झाले तरी डोक्यावरून पाणी! बहुतेकांनी सातवी - आठवीतच शिक्षणाला रामराम ठोकून पोटापाण्याची वाट धरलेली. अशा वातावरणात शाळा काढायचा उत्साह तसा यथा तथाच होता. परंतु हार न मानता त्या गृहस्थांनी आपले प्रयत्न नेटाने चालू ठेवले. शेवटी गावातील एकाने पुढाकार घेऊन मालकीच्या जमिनीत दोन खोल्या बांधून दिल्या आणि शाळेची सुरुवात झाली.

आज त्या सद्गृहस्थांच्या भक्कम आर्थिक आधारामुळे त्या ठिकाणी शाळेची इमारत उभी आहे. मुलांना दुसऱ्या गावी न जाता आपल्याच गावात शिकायला मिळत आहे. गरीब, कष्टकरी, मजूर कुटुंबांमधील मुलेही तिथे येऊन ज्ञान संपादन करत आहेत.
एखादा माणूस असता तर एवढे करून झाल्यावर शांत बसला असता! पण ह्या गृहस्थांचे तसे नाही.... आपल्याला जे हाल सोसायला लागले, जे कष्ट सहन करायला लागले तसे पुढच्या पिढीला करायला लागू नयेत म्हणून ते आजही त्या शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे त्या शाळेतील मुलांचा उत्कर्ष कसा होईल ह्यासाठी कार्यरत आहेत. तसेच इतर काही शाळांच्या मुलांसाठीही त्यांचे प्रयत्न चालूच असतात.
एका सुजाण माणसाने आपल्याला मिळालेल्या शिक्षणाची किंमत जाणली. वाचवलेल्या प्रत्येक रुपयातून एक भव्य स्वप्न बघितले. आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाल उज्ज्वल व्हावा, त्यांना आपल्यासारख्या अडीअडचणी, वाईट परिस्थितींचा सामना करावा लागू नये ह्यासाठी आपल्या कष्टाच्या, घामाच्या पैशाला त्यांनी माणसांमध्ये, ज्ञानात गुंतविले. आज त्या गुंतवणुकीची गोड फळे अनेक गरीब कुटुंबांमधील विद्यार्थी चाखत आहेत.

इकडे आमच्या ग्रुपच्या गप्पा रंगात आल्या होत्या.
''आपण सगळेजण कसले सॉल्लिड क्लासेस बुडवायचो, नाही? लेक्चर बुडवून कँटिनमध्ये चकाट्या पिटायच्या मस्त.... '' ग्रुपमध्ये कोणीतरी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत होते.

मला क्षणभर स्वतःची शरम वाटली. आपल्या आईवडीलांनी कष्टाने मिळवलेल्या पैशाने आपल्या शाळा-कॉलेजांचे खर्च भागले. ते करत असताना त्यांनीही कोठेतरी झळा सोसल्या, कोठेतरी काटकसर केली, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केले. आपल्याला कधीही कोणत्या शैक्षणिक खर्चासाठी ''नाही'' म्हटले नाही. उलट आपण होऊन वह्या-पुस्तके-शैक्षणिक साहित्याचा वर्षाव केला आपल्यावर! आणि हे सर्व स्वखुशीने, आनंदाने केले त्यांनी! आपल्या मुलांनी उत्तम शिकावे, भरपूर ज्ञान मिळवावे, आयुष्यात यशस्वी व्हावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. पण आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करत राहिलो. ज्ञान संपादन वगैरे बरीच लांबची गोष्ट.... आपल्याला त्या ज्ञानाची किंमतच कधी कळली नाही....अगोदरच्या पिढ्यांनी शिक्षण मिळवण्यासाठी जे हाल सोसले, जे परिश्रम घेतले त्यापैकी आपण काडीनेही सहन केले नाहीत. आज त्यांच्या त्या कष्टांमुळे आपण सुंदर दिवस बघत आहोत. नाहीतर बसलो असतो असेच कोठेतरी अंधारात चाचपडत.... त्यांच्या त्या श्रमांचे ऋण आहे आपल्यावर.... जे फेडायचा आपण यथाशक्ति प्रयत्न करायलाच हवा.... एकवेळ स्वतःसाठी नाही तर त्या उगवत्या ताऱ्यांसाठी. मनात असे अनेक विचार झोके घेत होते.

''गेल्या वर्षी माझ्या मुलीचा वाढदिवस मी एका अनाथाश्रमात साजरा केला. खूप छान वाटलं गं... आणि तेव्हापासून ठरवलं, की आपण दर वर्षी किमान दोन गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची! तू पण करून बघ.... खूप छान वाटतं गं.... '' माझी एक मैत्रीण दुसरीला सांगत होती. माझेही कान त्या संभाषणाच्या दिशेने टवकारले गेले. ती सांगत होती, सुरुवातीची काही वर्षे तिच्या मुलीसाठी तिने वाढदिवसाच्या मोठमोठ्या पार्ट्या दिल्या. पण हळूहळू लक्षात येऊ लागले की हे लोण संपणारे नाही. हौसेला मोल नसते. आणि कितीही करायला गेले तरी ते अपुरेच वाटते. त्यात समाधान नाही. आणि त्या पार्ट्यांतही एक प्रकारचा रटाळपणा येऊ लागला होता. नवीन काही करावे ह्या विचारात असतानाच तिचा एका अनाथाश्रमाशी संबंधित व्यक्तीशी परिचय झाला. त्यांच्या सांगण्यावरून ती एकदा त्या आश्रमाला भेट देऊन आली आणि तेथील मुलांच्या निरागस डोळ्यांमध्ये तिचे हृदय हरवून बसली. पुढे आपल्या लेकीलाही तिथे घेऊन गेल्यावर तिच्या लेकीनेच आपला वाढदिवस तिथे साजरा करायची इच्छा बोलून दाखवली. आणि एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली....
कट्ट्यावर शेजारी बसलेल्या आणि हे संभाषण लक्ष देऊन ऐकत असलेल्या एका मित्राने कुतूहलाने ह्या मैत्रिणीकडे इतर तपशिलाची चौकशी करायला सुरुवात केली. बघता बघता सगळेच ऐकू लागले. त्या मैत्रिणीच्या अनुभवाला ऐकल्यावर बाकीच्या लोकांनीही असेच उपक्रम करण्याची इच्छा असल्याचे आवर्जून सांगितले. प्रत्येकालाच आत कोठेतरी ते जाणवत होते. वेगवेगळ्या गावांमध्ये, राज्यांमध्ये विखुरलेल्या व आपापल्या उद्योग-व्यवसायांमध्ये यशाच्या नव्या पायऱ्या चढणाऱ्या आमच्या सहाध्यायींच्या डोक्यात आता आपल्या गावी जाऊन कोणा गरजू विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च करायची योजना सुरू झाली होती.


कॉलेजात लेक्चर्सना अभावानेच आपली हजेरी लावणारे, उंडारण्यात पटाईत असणारे एकेकाळचे उनाड पण आता जबाबदार असणारे विद्यार्थी ज्ञानाचा हा प्रवाह खेळता ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित झाले होते.
लवकरच निरोप घ्यायची वेळ झाली. एकमेकांचे फोन नंबर्स, ईमेल्स इत्यादी टिपून सगळेजण परत निघाले.
निघताना माझ्या मनात विचार होते, आम्हाला कॉलेजात असताना आमच्या शिक्षणाची किंमत कळली नसेल कदाचित. पण आता ती नक्कीच जाणवू लागली आहे. हरकत नाही! झालाय थोडा उशीर... पण अजून करण्यासारखे खूप काही आहे. ही तर सुरुवात आहे.... आपल्याला मिळालेली शिक्षणाची संधी आपण जितक्या जणांना उपलब्ध करून देऊ शकू तितका ज्ञानाचा हा प्रवाह अनेक अंधाऱ्या खोपट्यांमध्ये, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये पोहोचेल आणि त्या घरातील मुलाबाळांचे आयुष्य बदलू शकेल. आपल्यापासून इतरजण स्फूर्ती घेतील आणि ही मालिका चालू ठेवण्यात त्यांचे योगदान देतील. मिळालेल्या ज्ञानाची किंमत तशी कधीच मोजता येणार नाही.... पण कोणाच्या तरी शिक्षणाची किंमत मोजून त्या ज्ञानाचे नक्कीच उतराई होता येईल.

--- अरुंधती

(हाच लेख तुम्ही http://mfdiwaliank.blogspot.com/2010/10/shikshanachi-kimmat.html येथेही वाचू शकता.)