Monday, May 07, 2012

दोन बहिणी


फोन खणखणला तशी मी सावरून बसले व रिसीव्हर कानाला लावला.
''हॅलो, मी खुशी बोलतेय. तुझ्याकडे अर्जंट काम आहे जरा. घरी येतेस का? '' पलीकडून खुशीचा चिंतित स्वर ऐकून मला काळजी वाटू लागली.
''का गं? काही सीरियस आहे का? ''
''हो गं, पिंकीबद्दल आहे, म्हणूनच म्हटलं ये... असं करतेस का? रात्रीची राहायलाच येतेस का.... म्हणजे निवांत बोलता येईल. ''
''ठीक आहे. मी संध्याकाळपर्यंत पोचतेच तुझ्याकडे. आणि फार काळजी करू नकोस. जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण मिळून सोडवू. तू जास्त टेन्शन नको घेऊस. चल, बाय, आता संध्याकाळी भेटूच! ''
मी रिसीव्हर जाग्यावर ठेवून दिला आणि संध्याकाळी बाहेर जाण्याच्या दृष्टीने भराभर आवरू लागले.

खुशी माझी कॉलेजातली मैत्रीण. सहाध्यायी. अतिशय हुशार, नेमस्त, मेहनती म्हणून वर्गात आणि प्राध्यापकांत ख्याती असलेली. तशी ती सर्वांशीच मिळून मिसळून वागायची, पण त्याच बरोबर त्यांना दोन हात लांबच ठेवायची. त्याचेही कारण होते. गेली दोन - अडीच वर्षे ती व तिची धाकटी बहीण पिंकी जास्त कोणाशी ओळख नसलेल्या या शहरात एकट्याच राहत होत्या. त्यामुळे कोणाशी जवळीकही करायची नाही आणि कोणाला फार दूरही लोटायचे नाही असे खुशीचे धोरण होते.

सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान मला खुशीच्या घराच्या दिशेने जाणारी बस मिळाली. शहराच्या एका टोकाला असलेल्या उपनगरातील गृहसंकुलात खुशी राहत असलेली सदनिका होती. प्रशस्त अशी चार खोल्यांची सदनिका, हवेशीर, अद्ययावत सजावट असलेली. आखाती देशात भरपूर कमाईच्या नोकऱ्या करणाऱ्या आईवडीलांमुळे आर्थिक दृष्ट्या खुशीला कसलीच ददात नव्हती, ना कसली  चिंता. परंतु भारतातील एका मोठ्या शहरात आपल्या धाकट्या व शिंगे फुटलेल्या बहिणीसोबत आपापल्या जबाबदारीवर स्वतंत्र सदनिकेत एकटे राहायचे हे काही सोपे काम नव्हते. खरे तर त्यांचे अनेक पंजाबी जातभाईं, नातेवाईक ह्या शहरात होते. पण या मुलींची राहणी, वागणूक वगैरेंवर त्यांचे परदेशात संगोपन, शिक्षण झाले असल्याचा खूपच प्रभाव होता. आणि त्यामुळे त्यांचे आपल्या स्थानिक व काहीशा कर्मठ नातेवाईकांशी पटणे अवघडच होते. कदाचित त्यामुळेच असेल, पण खुशी माझ्यासारख्या तिच्या काही मैत्रिणींच्या सल्ल्याच्या, आधाराच्या भरवशावर जास्त विसंबून असायची. आईवडीलांना सर्वच घडामोडी सांगता यायच्या नाहीत. कारण त्यांनाही आपापले व्याप, नोकऱ्या, खुशीच्या लहान भावाचे संगोपन यांनी वेढले होते. शिवाय आपल्या मुली आता पुरेशा मोठ्या आहेत व त्या आपले प्रश्न स्वतः सोडवू शकतात हा त्यांचा विश्वास होता.

आजही असाच कोणता तरी प्रश्न समोर आला असणार असा विचार करत मी खुशी राहत असलेल्या गृहसंकुलात पोहोचले.

इथे सगळी कॉस्मॉपॉलिटन वसाहत होती. पंजाबी, शीख, मराठी, कोंकणी, सिंधी, मुस्लिम, ख्रिश्चन, गुजराती असे अनेक परिवार या संकुलात गुण्यागोविंदाने नांदत होते. मी खुशीच्या इमारतीपाशी पोचले तर खाली पार्किंगमध्ये क्रिकेट खेळत असणाऱ्या अब्रारने लगेच ओळखीचे हसून हात केला, ''खुशी दीदी है घरमें, '' त्याने आपण कोणती तरी महत्त्वाची बातमी देत असल्याच्या थाटात सुनावले.

''थँक्स अब्रार!'' त्याला हात करत खुशीच्या घरापर्यंतचे तीन जिने एका दमात चढून मी तिच्या दारावरची बेल दाबली. चिमण्यांच्या चिवचिवीचे पडसाद घरभर उमटत गेले. काही सेकंदांनी पिंकीने दार उघडले. मला दारात पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आत शिरल्या शिरल्या ती अगोदर गळ्यातच पडली, मग माझे स्वागत करून झाल्यावर तिने मला खुशीच्या खोलीत जायला सांगितले.

काहीशा चिंतित मनाने मी खुशीच्या खोलीच्या दारावर टकटक करून तिचे दार उघडले. आत खुशी टेबलाशी डोके धरून बसली होती. मला पाहिल्यावर म्लान हसली व खुणेनेच तिने मला जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितले.
''क्या हुआ खुशी.... क्या बात है, क्या प्रॉब्लेम है... ''
माझ्या प्रश्नासरशी खुशीचे डोळे एकदम भरूनच आले. जवळच्या टिशूने तिने डोळे टिपले आणि घसा खाकरत म्हणाली,
''क्या बताऊं अब... बहोत बडा झमेला है... '' तिने उठून आधी तिच्या खोलीचे दार बंद केले. मग खुर्चीवर बसत एक खोल श्वास घेऊन म्हणाली, ''तुला खालच्या मजल्यावरची झीनत माहिती आहे ना? पिंकी सध्या झीनतच्या मोठ्या भावाबरोबर, जावेदबरोबर हिंडते आहे. तिचं म्हणणं आहे की तिला जावेद खूप आवडतो. मला मान्य आहे की तो दिसायला हँडसम आहे, त्याची बाईक आहे, पॉश राहतो, सध्याच्या भाषेत 'कूल' आहे तो. पण आता तूच सांग, जावेदच्या घरी पिंकी त्याची गर्लफ्रेंड आहे हे जरा जरी कळलं तरी किती गहजब होईल ते! तुला माहिती आहे की ते लोक किती जुन्या विचारांचे आहेत. शिवाय जावेद काही वेगळा स्वतंत्र कमावत नाही गं! त्यांच्याच एका दुकानात नोकरी करतो तो. पिंकीला सध्या फक्त सगळीकडे जावेद आणि जावेदच दिसतोय... तिला सांगितलं तरी कळत नाहीए की, अगं, जावेद मित्र म्हणून असणं वेगळं, बॉयफ्रेंड म्हणून असणं वेगळं आणि त्याच्याशी लग्न करायची स्वप्नं बघणं वेगळं... '' खुशीने एक खोल सुस्कारा सोडला. आता मला तिच्या फोनमागच्या तातडीचे कारण उमगत होते.''ओह... असा मामला आहे का? आणि जावेदचं काय म्हणणं आहे? '' मला अजून परिस्थितीचा पुरेसा अंदाज येत नसल्याने मी विचारले.

खुशी वैतागाने उद्गारली, ''त्याचं काय म्हणणं असणार आहे? सध्या त्याला पिंकीसारख्या छान, चिकण्या मुलीबरोबर बिनबोभाट रात्रंदिवस भटकता येतंय, मजा करता येतीए, ना तिला कसली वचनं दिली आहेत, ना कोणती बंधनं आहेत. दोघेही बघावं तेव्हा एकमेकांना चिकटलेले असतात. परस्पर तिच्या कॉलेज किंवा क्लास बाहेर भेटतात आणि शहरातल्या पब्ज किंवा डिस्कोथेकमध्ये पडीक असतात. बरं,  मी करून करून त्यांना किती विरोध करणार? मी काय पिंकीची आई नाही की तिची पालक नाही! पिंकी अठरा वर्षांची झालीए गेल्याच महिन्यात... तिचे निर्णय ती स्वतंत्रपणे घेऊ शकते असं तिनेच सुनावलंय मला काल! अगं, पण अठरा वर्षांची झाली म्हणून काय जगाची अक्कल आली का या पोरीला? आजही अंधाराला घाबरते ती... रात्री झोपताना हॉट चॉकलेट पिते... मम्मीपप्पांचा कॉल वेळेत आला नाही की नर्व्हस होते... मम्मीकडे माझ्या लहानसहान चुगल्या करत असते... आणि ही मुलगी तिच्या आयुष्याचा निर्णय असा कसा घेऊ शकते? ''

''हम्म्म, आणि जावेदच्या घरी अजून कोणाला कसं काय कळलं नाही? '' मी विचारले.

''तेच तर... पिंकी काय आणि जावेद काय... खूपच चलाख आहेत त्या बाबतीत! इथे जवळपास भेटतच नाहीत ते... लांब कुठेतरी भेटतात. त्याच्या घरी काय, तो काहीही थापा हाणतो. किंवा काही सांगतही नसेल. पण त्याला कोणी विचारायला जाणार नाही. झीनतला घरात संध्याकाळी सातच्या आत यायची सक्ती असते, तिच्या दिवसभराच्या हालचालीवर तिच्या इतर भावांचे, घरच्यांचे बारीक लक्ष असते. जावेदचे तसे नाहीए ना... तो काय करतो, कुठे जातो, कोणावर किती पैसे खर्च करतो याबद्दल त्याला कोणीच विचारत नाही. आणि विचारले तरी तो उडवाउडवीची उत्तरे कशी देतो ते मी स्वतः पाहिलंय... ''
खुशी आणखी काही सांगणार होती तेवढ्यात दारावर टकटक झाली. दारात पिंकी उभी होती, ''खुशी, मैं जा रहीं हूं, लॅच खींच रहीं हूं, मेरी राह मत देखना...बाऽय!! ''
खुशीने लगबगीने उठून दार सताड उघडले. पिंकी काळ्या फिगरटाईट जीन्स, काळा टॉप, कानात लोंबणारे पिसाचे डँगलर्स, हातात मोठे रंगीबेरंगी लाकडी कडे, चेहऱ्यावर हेवी मेक-अप आणि सोबत परफ्यूमचा दरवळ अशा अवतारात समोर उभी होती.
''पैसे आहेत ना तुझ्याजवळ?  आणि जॅकेट घेऊन जा बरोबर, '' खुशीच्या सूचनेसरशी तिने होकारार्थी मान डोलवली व गर्रकन वळून आपल्या उंच टाचांचे बूट खाड खाड वाजवत ती घराबाहेर जाणार एवढ्यात खुशी ओरडली, ''रात्री उशीर करू नकोस गं फार! ''
अर्थातच त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. लॅच लागल्याचा आवाज तेवढा रिकाम्या घरात घुमला.

''ओ गॉऽड!! मी काय करू म्हणजे या मुलीच्या डोक्यात प्रकाश पडेल? '' आपले केस मुठींत गच्च धरून खुशी धप्पकन खुर्चीत बसली.
''मला परवा काय म्हणाली ती माहितेय? म्हणाली, यू आर जेलस!! मी, आणि जेलस?? हाऊ डेअर शी? तिचं धार्ष्ट्य होतंच कसं मला असं बोलायचं? मी कशाला तिचा हेवा करू? आज ठरवलं तर मलाही चुटकीसरशी बॉयफ्रेंड मिळेल...इतकं कठीण नाहीए ते... मलाही तिच्यासारखं बेजबाबदारपणे दिवसरात्र गावगन्ना भटकता येईल... पण मी असं करते का? नो वे! मला माझ्यावरच्या जबाबदारीची जाणीव आहे. उद्या काही बरंवाईट झालं तर माझे आईवडील आधी माझ्याकडे बघतील... मला विचारतील... की तू मोठी आहेस ना, मग तुझं लक्ष कुठे होतं? तू का नाही आम्हाला कळवलंस? पिंकी अजून नादान आहे... तिला काय माहीत बाहेरचं जग कसं आहे ते... किती क्रूर निर्दयी आहे ते... तिच्या हातून काही  चूक झाली तर त्याचे परिणाम तिला भोगायला लागतील... जावेदला नव्हेत! पण तिला हे समजावायचं कसं हाच प्रश्न आहे! ''
बराच वेळ त्यावर आमची उलटसुलट चर्चा करून झाली तरी मार्ग सुचेना. मग आम्ही दोघी सायंकाळच्या संधिप्रकाशात किती तरी वेळ तशाच विचार करत बसलो होतो.

शेवटी खुशीच उठली, घरातले दिवे लावले, हात-पाय धुवून नानक गुरुंच्या तसबिरीसमोर दिवा अगरबत्ती केली. मला म्हणाली, ''मसाला चहा घेशील? मस्त आलं वेलदोडा घालून करते चहा. '' आम्ही दोघी तिच्या किचनमध्ये एकमेकींशी न बोलताच काम करत होतो.
''खुशी, मला वाटतंय की इथं जरा घाई होतीए, '' मी बाजूच्या शेल्फमधून चहासाठी दोन मोठे मग ओट्यावर ठेवत म्हणाले. खुशी एका प्लेटमध्ये बिस्किटे आणि दुसऱ्यात मठरी काढत होती.
''घाई म्हणजे? ''
''अगं, तूच बघ, सध्या ते दोघं एकमेकांबरोबर हिंडत आहेत, मान्य आहे मला की तुला काळजी वाटणं साहजिक आहे. पण त्यांनी पुढचे कुठले प्लॅन्स तर केले नाहीएत! अजून पिंकीचं शिक्षण पूर्ण व्हायचंय, त्याचं बस्तान नीट बसायचंय. त्याचे अब्बू एवढ्यात तर त्यांचं दुकान त्याच्या ताब्यात सोपवणार नाहीत! तोवर त्याला घरच्यांच्या मर्जीने वागण्याखेरीज पर्याय नाही. मग कशाला करतेस काळजी? ''
खुशीने उकळलेला चहा गाळायला सुरुवात केली. वाफाळत्या चहाचे मग घेऊन तिने ते डायनिंग टेबलावर ठेवले व मला बसायची खूण केली.
दोघी गरमागरम चहाचे घोट घेत काही काळ तशाच बसलो. खुशीने सुस्कारत, मान हलवत चहाचा मग दूर केला.
''तुला काय वाटतंय? मी हे सगळं मम्मीपप्पांना सांगावं का? मला वाटतंय, त्यांना सांगून मोकळं व्हावं... पण सांगितलं तरी पंचाईत आणि नाही सांगितलं तरी पंचाईत. ते फोन करतात तेव्हा नेमकी पिंकी त्याच्याबरोबर बाहेर भटकत असते. आणखी किती दिवस मी त्यांना थापा मारू शकणार आहे? आज ते आमची इतकी काळजी करतात की त्यांना आणखी काळजी करायला लावणं मला तरी बरोबर वाटत नाही. पण त्याचबरोबर त्यांच्याशी खोटं बोलायला लागतंय याचाही जाम ताण येतोय गं! मला त्यांना सारं काही साफ साफ सांगून टाकायचंय. पिंकी त्यांना आपण होऊन सांगेलसं वाटत नाही. आणि तिने सांगेस्तोवर उशीर होऊ नये म्हणजे मिळवली!! खरंच, काय वाटतं तुला, मी सांगू त्यांना की नको? ''
खुशी कळकळीने विचारत होती आणि आता मीही विचारात पडले होते.

''खुशी, मला वाटतं, तू त्यांना खरं काय ते सांगूनच टाक... पण ते पिंकीच्या समोर सांग. तिलाही त्यांच्याशी बोलू देत. तू आणि ती दोघीही बोला त्यांच्याशी. मला वाटतं की पिंकीलाही माहितेय की या रिलेशनशिपमध्ये काही दम नाहीए. पण तिला जावेद आवडतोय, त्याला ती आवडतेय, आणि हे तिचं बंडखोरीचं वय आहे... त्यामुळे हिंडत आहेत दोघे. त्यांनी लाँग टर्म रिलेशनशिपचा विचारही केला नसेल बघ. एकमेकांबरोबर फक्त हिंडायचं असेल त्यांना. 'जोडी' म्हणून मिरवायचं असेल. याचा तू विचार केला आहेस का? केवळ फिजिकल लेव्हलवर त्यांचं आकर्षण असू शकतं ना? ''

''तेच तर ना! '' खुशी उसळून म्हणाली, ''त्यांना काय हवंय ते मला काय कळत नाही का? पण उद्या काही कमीजास्त झालं तर त्याचे परिणाम पिंकीलाच भोगायचेत ना? जावेद काय, हात झटकून नामानिराळा होईल.... मी पाहिलंय गं या अगोदर असं होताना माझ्या काही मित्र मैत्रिणींबद्दल.... फार फार वाईट अनुभव असतो तो! आणि सगळेजण दोष देताना मुलीलाच देतात, तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवतात! ''

''कम ऑन, खुशी! बी रियल... तुझं काय म्हणणं आहे, लोकांना एवढं कळत नाही की टाळी दोन हातांनी वाजते म्हणून? ''

''एक्झॅक्टली!! त्यांचं म्हणणं असं की मुलीने जर स्कोपच दिला नाही तर पुढची समस्या येणारच नाही! ''

''माय गॉड! प्लीज मला सांग की तू ज्या लोकांबद्दल बोलते आहेस ते आताच्याच युगात जगतात म्हणून!! ''

''हो, ऐकायला विचित्र वाटतं ना? पण हे आताच्याच युगातले, बाहेर आधुनिक वेषांत हिंडणारे, आम्ही आधुनिक विचारांचे म्हणवणारे असे लोक आहेत! त्यांच्यापेक्षा 'आमचे विचार-आचार जुने आहेत, ' असं ठामठोक सांगणारे लोक परवडले! मुलीची जात म्हटली की या आधुनिक लोकांचे सगळे सो कॉल्ड आधुनिक विचार अबाउट टर्न घेतात बघ! तिथे त्यांना ती मुलगी चारित्र्यवानच पाहिजे. आणि त्यातून कोणी एखादीचा भूतकाळ वगैरे दुर्लक्षून तिच्याशी रिलेशन्स ठेवले, पुढे शादी वगैरे केली तरी असे नवरे कमालीचे संशयी असतात हे पण सांगते! बायकोच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारे... माझ्याच नात्यात आहेत अशी उदाहरणे! ''

''असं म्हणतेस? माझा तर विश्वासच बसत नाहीए... पण मग एक काम करशील का? आज रात्री पिंकी आली की, किंवा उद्या सकाळी तिच्याशी बोल जरा. तिला स्पष्ट सांग की तू तिच्या आणि जावेदच्या रिलेशनबद्दल तुझ्या मम्मीपप्पांना काय ते साफ साफ सांगणार आहेस. चॉईस दे तिला त्यांना आपण होऊन सांगायचा किंवा तू सांगितल्यावर त्यांनी तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा. मला वाटतं ती असं सांगितल्यावर चिडेल, रुसेल, वैतागेल वगैरे.... पण जर तुला तिच्या आणि जावेदच्या रिलेशनबद्दल शंका आहेत तर तुम्ही तुमच्या मम्मीपप्पांशी बोलणंच बरं! जेवढ्या लवकर बोलाल तितकं चांगलं!'' मी गार झालेल्या चहाचा शेवटचा घोट घेऊन मग बाजूला ठेवला.

खुशी जाग्यावरून उठली व आमचे उष्टे मग गोळा करून ओट्याजवळच्या सिंकपाशी नेऊन विसळू लागली.
''हुश्श!! तुला कल्पना नाहीए, तुझं मत सांगून तू माझ्या मनावरचं ओझं किती हलकं केलं आहेस ते! यू नो, मम्मीपप्पा आमचा खर्च करतात म्हटल्यावर तशाही आम्ही दोघी त्यांना सगळा वृत्तांत द्यायला बांधील आहोत. पण पिंकीला ते पटतच नाही. तिचं व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे तिचा खर्च, शिक्षण कोणीतरी दुसऱ्याने करायचं आणि तिने मुक्तपणे बागडायचं. कोणालाही कसलंही स्पष्टीकरण न देता. असं कसं चालेल? फक्त परीक्षेत उत्तम मार्क्स मिळाले की झालं का? आणि तिला तर तेही मिळत नाहीत. मला म्हणते, मी काही तुझ्यासारखी हुश्शार नाहीए. पण अगं, तू मेहनतच घेतली नाहीस, तुझं लक्ष अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये असेल तर कसे मिळतील तुला मार्क्स? आणि मार्क्स नाहीत म्हणून मग मम्मीपप्पांना गळ घालत असते महागड्या कोर्सेसना डोनेशन सीटमधून तिच्यासाठी अ‍ॅडमिशन घ्यायला. आता तूच सांग, हे तरी बरोबर आहे का? मम्मीपप्पांना काय फक्त तिचाच खर्च आहे का? अजून माझ्या धाकट्या भावाचं शिक्षण व्हायचंय, त्यांचे दोघांचे रिटायरमेंट प्लॅन्स आहेत, आमचे खर्च आहेत. मग आपण आपल्या हुशारीवर अ‍ॅडमिशन मिळवायची की त्यांना जास्त खर्च करायला भरीला पाडायचं? '' खुशी तळमळीने बोलत होती. मलाही तिचे सर्व मुद्दे पटत होते. तरी मी जास्त काही न बोलायचे ठरविले.

ती सायंकाळ आम्ही नंतर अशाच सटर फटर गप्पा, बाहेर एक फेरफटका, त्या दरम्यान गृहसंकुलाबाहेरच्या दुकानांतून खुशीने केलेला थोडासा बाजारहाट, घरी आल्यावर रात्रीच्या जेवणाची तयारी वगैरेत घालवली. साडेआठ वाजून गेले तरी अब्रार व त्याची दोस्त कंपनी खाली खेळतच होती. शेवटी झीनत बाहेर येऊन त्याला दटावून आत घेऊन गेली तेव्हा कोठे क्रिकेट टीमची पांगापांग झाली.
''बघते आहेस ना? झीनतच्या घरात मुलांना एक नियम आहे आणि मुलींना वेगळा. अब्रार, जावेद कितीही वेळ बाहेर राहिले, त्यांनी काहीही केलं तरी त्यांच्या घरच्यांना चालतंय... पण हेच जर झीनत करायला लागली तर?? अं हं... अजिबात नाही चालणार! पिंकी अशा घरात दहा मिनिटं सुद्धा टिकणार नाही! आणि मला नाही वाटत जावेदमध्ये घरच्यांचा विरोध पत्करून, वेगळा व्यवसाय किंवा नोकरी करायचे गट्स् आहेत म्हणून! त्याला त्याच्या घरच्यासारखा आराम, लाड-प्यार बाहेर कोण देणार आहे? आज तो दुकानात कोणत्याही वेळी जातो, कधीही निघतो. त्याचे अब्बू तो 'लहान' आहे म्हणून सोडून देतात. पण उद्या त्यांना कळलं की हा मुलगा आपल्या धर्माबाहेरच्या पोरीबरोबर भटकतोय तर त्याची खैर नाही. त्याला उचलून फेकून देतील ते! किंवा त्याला पिंकीला भेटायची पूर्ण बंदी घालतील. आणि मग पिंकीचं काय होईल? तिनं स्वतःचं काही बरंवाईट केलं म्हणजे?? '' खुशीच्या डोळ्यांत बोलता बोलता पाणी आले होते.

''कूल डाऊन खुशी! उगाच टेन्शन नको गं घेऊस.... अजून काहीच झालं नाहीए. तू बोलणार आहेस ना पिंकीशी? मग झालं तर! '' मी तिला धीर द्यायचा प्रयत्न केला.

त्या रात्री आमची जेवणे झाली तरी पिंकीचा पत्ता नव्हता. रात्री कधीतरी उशीरा ती उगवली. आम्ही दोघी लिविंग रूममध्ये टी. व्ही. वर कोणता तरी लेट नाईट शो बघत होतो.
''हाऽऽय... तुम्ही अजून जाग्या? मला वाटलं झोपला असाल... '' पर्सच्या बंदाशी खेळत पिंकी आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली.
''पिंकी, तुझ्याशी बोलायचंय थोडं... '' खुशीने सुरुवात केली.
''ऊप्स, मी जरा फ्रेश होते, कपडे बदलते, मग बोलू, ओके? बाय फॉर नाऊ! '' पिंकीच्या खोलीचे दार बंद झाले.

''पाहिलंस ना? अगदी अश्शीच वागते ही... '' खुशी पुढे बोलणार तेवढ्यात मी तिला गप्प बसायची खूण केली. कारण मला खिडकीतून खाली जावेदसारखा मुलगा घुटमळताना दिसत होता. आम्ही दोघी खिडकीपाशी जाऊन पडद्याआड उभ्या राहिलो. जावेदचे आमच्याकडे लक्ष नव्हते. तो पिंकीच्या खोलीच्या खिडकीखाली उभा राहून खिडकीच्या दिशेने बघत होता.
''ओह, दॅट रास्कल... '' खुशीच्या मुठी संतापाने वळत होत्या. मी झटकन तिचा हात 'गप्प बस' या अर्थी दाबला.
आमचे श्वास रोखून आम्ही काय घडते आहे ते पाहत होतो. पिंकीच्या खिडकीचे दार हळूच उघडले गेले. आतून पिंकीने त्याला हात केला. मग खुदखुदत हळूच एक पांढरट कपडा खिडकीतून त्याच्या दिशेने भिरकावला आणि त्याने तो अलगद झेलला. तो कपडा हातात उलगडून त्याने त्याचा नाकाशी धरून दीर्घ श्वास घेतला. ''माय गॉड, पिंकीची स्लीप... हाऊ कॅन शी?  आय वुइल टेल हर नाऊ... '' खुशी पिंकीच्या खोलीकडे वळणार इतक्यात मी तिला थांबविले. ''तुला पेशन्सने वागायला लागेल डियर. तिचं वय वेडं आहे. आता तिला काही बोलू नकोस त्याबद्दल. नाहीतर ती तुझं बाकीचं पण ऐकणार नाही. ''
खुशीचा चेहरा रागाने लालेलाल झाला होता. पण मग तिला माझे म्हणणे पटले असावे.
''ओ के. यू आर राईट. मीच संयम दाखवायला हवाय. असं कर, ती बाहेर आली की जरा वेळ तूच तिच्याशी गप्पा मार, तोवर मी जरा माझ्या खोलीत जाऊन डोकं गार करायचा प्रयत्न करते. ती बाहेर आली की थोड्या वेळानं मला हाक मार, ओके? '' खुशी तरातरा चालत आपल्या खोलीत गेली व तिने धाडदिशी दार लावून घेतले.

बाहेरच्या खोलीत मी शांतपणे पिंकीची वाट बघत बसले होते. मनात एक खात्री होती की पिंकी अजून वयाने खूप लहान आहे, मन लवचिक आहे तिचं...  त्यामुळे कोणत्याही धक्क्यातून ती लवकर सावरेल. खरे सांगायचे तर मला जबाबदारीने वागणाऱ्या, काळजी करणाऱ्या खुशीचीच जास्त काळजी वाटत होती. कारण काहीही झाले तरी ती स्वतःलाच बोल लावणार, अपराधी मानणार हे तर उघड दिसत होते.

ठरल्याप्रमाणे पिंकी बाहेर आल्यावर तिच्याशी आलतू फालतू गप्पा मारून पुरेसा वेळ गेल्यावर मी खुशीला हाक मारली. खुशीने तोवरच्या वेळात शॉवर घेऊन नाईटड्रेस परिधान केला होता. बाहेर आल्यावर तिने एका दमात पिंकीला सांगून टाकले, ''मी मम्मीपप्पांना तुझ्या आणि जावेदविषयी सांगायचं ठरवलंय. ''
''व्हॉट???? ओह... नो, नो, नो, नो!! '' डोळे विस्फारत धक्का बसल्याप्रमाणे मान हलवणाऱ्या पिंकीची ही प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच होती.
''येस माय डियर! काय आहे ना, की मी तुमच्या रिलेशनशिपबद्दल मम्मीपप्पांशी आता यापुढे खोटं नाही बोलू शकणार! किती दिवस त्यांना अंधारात ठेवायचं? मला ते पटत नाही. खूप अपराधी वाटतं मनात. तू बाहेर असतेस तेव्हा त्यांना थापा मारायला लागतात फोनवर. तुझे बाहेरचे खर्च अ‍ॅडजस्ट करून त्यांना हिशेब पाठवायला लागतो महिना-अखेरीस. गेल्या महिन्यात तू कपड्यांचं भरमसाठ शॉपिंग केलंस, जावेदसाठी काय काय गिफ्ट्स घेतल्यास त्याचे हिशेब दडवावे लागले मला. पम्मी अंकलने तुला आणि जावेदला एका पबच्या बाहेर पाहिले आणि मला सांगितले तेव्हा त्यांनाही थाप मारायला लागली मला. तूच सांग, हे असं किती दिवस चालायचं? मला आता जास्त नाही सहन होत. आणि म्हणूनच मी ठरवलंय की मम्मीपप्पांना उद्या फोनवर काय खरं खरं ते सांगून टाकायचं. '' बोलताना खुशीचा गळा भरून आला होता.

पिंकी बराच वेळ धक्का बसल्यासारखी खुशीकडे टक लावून बघत होती. मग एकदम उसळून किंचाळली, ''मला माहितेय तू असं का वागते आहेस ते! तुला माझं सुख बघवत नाहीए... जळतेस तू माझ्यावर! तुला स्वतःला बॉयफ्रेंड नाहीए ना... त्याचा राग तू असा काढतेस माझ्यावर? सांग ना, मी तुझं काय वाईट केलंय? अगं माझी सख्खी बहीण आहेस ना तू? मग का अशी वागतेस माझ्याशी? इतका तिरस्कार करतेस का माझा? ओ गॉऽऽड... व्हाय? व्हाय??? '' पिंकीला रागारागाने असे हात-पाय आपटत किंचाळताना बघणे हे माझ्यासाठी नवीनच होते. क्षणभर मीही दचकले पण मग उसने अवसान गोळा करून जोरात ओरडले, ''स्टॉप इट! बोथ ऑफ यू.... शांत व्हा आधी. नो हिस्टेरिया प्लीज! शांत... शांत!! ''दोघी एकमेकींकडे काही क्षण संतप्त अवस्थेत बघत होत्या. मग पिंकीचे अवसान गळून पडले. खांदे पाडून, चेहरा ओंजळीत लपवून ती हुंदके देऊन रडू लागली. जरा वेळ तिला तसेच रडू दिले. तिचे हुंदके जरा कमी झाल्यावर मी मुकाटपणे तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. मनाशी धाकधूक होतीच की आता ही तो ग्लासपण भिरकावून देते की काय! पण सुदैवाने तसे काही झाले नाही. पाणी पिऊन ती जरा आणखी शांत झाल्यावर मी जरा घसा खाकरला आणि बोलू लागले,
''पिंकी, माझं ऐकशील जरा? खुशीची मैत्रीण म्हणून नव्हे, तर एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून? खुशी तुला जे काही सांगते आहे त्यात तथ्य आहे. अशी किती ओळखतेस तू जावेदला? त्याच्या घरच्या मंडळींना? उद्या त्यांना कोणाकडून तुमच्याविषयी कळलं तर काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला? तुम्ही दोघी इथे एकट्या राहता. ए क ट्या. कोणत्याही सुरक्षेशिवाय. तुमचे मम्मीपप्पाही तुमच्या बरोबर नाहीत. तुमच्या नातेवाईकांशी तुमचे पटत नाही. उद्या तुम्हाला मदत लागली तर कुठे जाणार आहात? काय करणार आहात? त्याच्या घरचे काही वाईट नाहीत. पण भावनांच्या भरात माणसं कशीही वागतात गं. उद्या त्यांनी तुमच्या दाराशी येऊन तमाशे केले तर काय करणार आहात तुम्ही? विचार केला आहेस का तू? आणि त्यांचं सोड. तुझ्या मम्मीपप्पांनी तुम्हाला दोघींना इथे एका परक्या शहरात एकट्याने राहायची परवानगी कशाच्या बळावर दिली आहे? की त्यांचा तुम्हा दोघींवर विश्वास आहे, तुम्ही त्यांच्यापासून काही लपवणार नाही याची खात्री आहे त्यांना म्हणूनच ना? मग त्यांच्या विश्वासाशी असं खेळणं तुला पटतंय का सांग.... हे बघ, तुझ्यावर कोणी कसलीही बंधनं लादायला जात नाहीए. पण तू तुमचं जे काही चाललंय, ते खरं खरं त्यांना सांगावंस असं खुशीनं म्हटलं तर त्यात तिचं काय चुकलं? तुला तुझ्या मम्मीपप्पांची खात्री आहे ना? ते तुला समजून घेतील हे मान्य आहे ना? मग ही लपवाछपवी कशासाठी? काय असेल ते सांगून टाक ना त्यांना! बघ तुला पटतंय का? '' मी तिच्या खांद्यावर थोपटले व जागची उठले. मला जे काय सांगायचे होते ते सांगून झाले होते. आता पुढचा निर्णय पिंकी व खुशीने मिळून घ्यायचा होता. येणारी जांभई दडपत मी दोघींना 'गुड नाईट' म्हणून झोपायला निघून गेले. त्या रात्री दोघी बहिणी नंतर एकमेकींशी काय बोलल्या, कधी झोपल्या कोणास ठाऊक!

दुसऱ्या दिवशी सकाळची बस पकडून मी माझ्या घराकडे रवाना झाले. खुशी व पिंकीसंदर्भातील माझी भूमिका संपल्यासारखे मला वाटत होते. आता पुढची लढाई त्यांना दोघींना मिळून लढायची होती.

पुढचे काही दिवस असेच शांततेत गेले. मग एक दिवस मी व खुशी लायब्ररीत बसलो असताना तिने मला बाहेर चलायची खूण केली. वह्या-पुस्तकांचा पसारा आवरून त्यांना पाठीच्या सॅकमध्ये ढकलत आम्ही बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात आलो.
''कॅन्टिन? '' खुशीने विचारले. ''हं... चलो.'' कॅन्टिनबाहेरच्या पायऱ्यांवर जवळची बोचकी ठेवून दोघींनी कटिंग चहाची ऑर्डर दिली. सोबत सँडविचेस ऑर्डर केले.

''मी काल मम्मीपप्पांना काय ते खरंखरं सांगून टाकलं, '' खुशीने बोलायला सुरुवात केली. ''एवढे दिवस मी पिंकीला मुदत दिली होती, आपण होऊन त्यांना खरं काय ते सांगायची. पण तिची तयारीच होत नव्हती. दर वेळेस माघार घ्यायची ती.  शेवटी काल रात्री ती घरी असताना तिकडे फोन लावला मम्मीपप्पांना. ते नुकतेच कामावरून घरी परत येत होते. पण इलाज नव्हता माझा. त्यांनाही गेले काही दिवस आमचं कायतरी बिनसलं आहे याचा अंदाज आला असावा. कारण ते फार डिस्टर्ब झालेत असं वाटलं नाही. किंवा... त्यांनी तसं जाणवू दिलं नसेल! काय माहीत? एनी वे, ते अगोदर माझ्याशी बोलले, माझं सगळं ऐकून घेतलं. मग पिंकीशी बोलले ते. पिंकी त्यांच्याशी बोलताना खूप रडली. मला वाटतं, तिलाही गेले काही दिवस खूप टेन्शन आलं असावं. त्यांना सगळं सांगितल्यावर खूप हलकं वाटलं आम्हाला दोघींना. एकदम शांत. काल खूप दिवसांनी आम्ही शांतपणे एकत्र जेवलो. सख्ख्या बहिणींसारख्या एकमेकींबरोबर बोललो. न भांडता, आदळ आपट न करता.  नंतर पिंकी माझ्याही गळ्यात पडली, यू नो! '' खुशीच्या चेहऱ्यावर मंद स्मित फुलले होते. ''आता जो काय प्रॉब्लेम आहे तो आमचा सगळ्यांचा आहे. मला एकटीला त्यात चाचपडायची, निर्णय घ्यायची गरज नाही. पिंकीच्या सार्‍या आयुष्याचा प्रश्न आहे हा! आज तिची एक चूक झाली तर उद्या ती आयुष्यभरासाठी महागात जाऊ नये म्हणजे झालं! पण तिलाही आता पटलंय की मला तिचा मत्सर नाही, तर काळजी वाटतेय. मनावरचं मोठ्ठं ओझं हलकं झालंय बघ!''
त्या दिवशी आम्ही कितीदा कटिंग चहा प्यायलो आणि किती वेळ तशाच पायऱ्यांवर बसून गप्पा मारल्या ते आठवत नाही. खूप काही बोलायचे होते. सांगायचे होते. पण काय बोललो, काय गप्पा मारल्या तेही आठवत नाही. आठवते आहे ते आजूबाजूला पडलेले लख्ख ऊन. तो नितळ सूर्यप्रकाश आणि एका तणावपूर्ण काळातून गेल्यावर घेतलेला मोकळा स्वच्छ श्वास!!!


* अन्यत्र पूर्वप्रकाशित

Friday, May 04, 2012

'हा भारत माझा' चित्रपट प्रीमियर वृत्तांत

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा. 


''हा भारत माझा'' चित्रपटाच्या मायबोलीकरांसाठी खास आयोजित केलेल्या खेळाला मला काही कारणाने जायला जमले नव्हते, पण चित्रपट बघायची इच्छा मात्र होती. काल सायंकाळी ३ मे रोजी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रीमियरला मायबोली तर्फे जायला मिळते आहे याचाही आनंद मनात होताच! तिथे पोचल्यावर अगोदर अरभाटाला फोन लावला. अन्य कोण मायबोलीकर खेळाला उपस्थित राहणार आहेत त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी आजूबाजूला उभ्या बर्‍याच लोकांकडे बघत 'हा कोणता आयडी असेल?' असा विचार करत अल्पसा टाईमपास केला. थोड्याच वेळात अरभाटाला भेटून व प्रवेशिका हाती घेऊन मी अन्य काही प्रेक्षकांसमवेत स्क्रीन क्रमांक ४ कडे कूच केले.


दारातच एका गोबर्‍या गालाच्या छोट्या मुलाने आमचे एक सुंदर बुकमार्क देऊन स्वागत केले. नंतर कळले की तो चित्रपट अभिनेत्री रेणुका दफ़्तरदार यांचा सुपुत्र होता. त्या बुकमार्कवर एका बाजूला कबीराचा चित्रपटात झळकलेला दोहा व दुसर्‍या बाजूला 'हा भारत माझा' चित्रपटाच्या कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींचे नामनिर्देश होते. कबीराचा तो दोहा वाचताच मन प्रसन्न झाले.


प्रेक्षक व निमंत्रितांमध्ये काही चंदेरी पडद्यावरचे ओळखीचे चेहरे तर काही सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे चेहरे दिसत होते. लवकरच चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली. ह्या 'झीरो बजेट' चित्रपटाची कल्पना अण्णा हजारेंच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशी स्फुरली, काय निमित्त झाले, मान्यवर कलाकारांनी - तंत्रज्ञांनी कशा तारखा दिल्या, मदतीचे पुढे झालेले हात, नंतरची जुळवाजुळव यांबद्दल सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, कथालेखिका, पटकथाकार व संवादलेखिका सुमित्राताई भावे यांसह चित्रपटातील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ तसेच किर्लोस्कर कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवर बोलावून त्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांचे खस अत्तराची भेट देऊन स्वागत केले गेले. कलाकारांपैकी उत्तरा बावकर, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, मदन देवधर यांसह चित्रपटात इतर छोट्यामोठ्या भूमिका केलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मायबोली.कॉमचा व मायबोलीतर्फे केल्या गेलेल्या मदतीचाही विशेष उल्लेख सुनील सुकथनकरांनी आवर्जून केला.


सुरुवातीलाच राष्ट्रगीताची धून व त्या जोडीला भारताच्या सीमाप्रांतातील लष्करी ध्वजवंदनाच्या चित्रणाने मनात देशाबद्दल व देशसैनिकांबद्दल जे काही उचंबळून आले त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे. नंतर कविता खरवंडीकरांनी गायलेला कबीराचा दोहा जणू पुढे उलगडत जाणार्‍या चित्रांची पूर्वकल्पनाच देतो. चित्रपटाची कथा येथे देत नाही. परंतु अगदी कोणत्याही मध्यम वर्गीय घरात घडू शकेल असे हे कथानक आहे. त्यात तरुण पिढी व जुन्या पिढीच्या समोरील व्यावहारिक व मानसिक आव्हाने आहेत. स्वार्थ मोठा की कोणाला न दुखावता, भ्रष्टाचार न करता साधलेला आनंद मोठा यावर कोणत्याही कुटुंबात घडतील अशा घटनांमधून साकारणारी कथा आहे. एकीकडे अण्णा हजारेंनी छेडलेले भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी अहिंसक आंदोलन, जगात अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उमटलेले त्याचे जगव्यापी पडसाद, प्रसारमाध्यमे - सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून घरांघरांमधून पोचलेले हे आंदोलन, त्यातून झडलेल्या चर्चा, ढवळून निघालेली मने, शहरी लोकांबरोबरच ग्रामीण जनतेचा सहभाग, भ्रष्टाचाराला कंटाळलेली आणि सरावलेली मने व या सर्वांचे टीव्ही फूटेज या सर्व घटनांचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. त्यातूनच चित्रपटाचे कथानक पुढे सरकत राहते. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घडामोडी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर उभे राहिलेले प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यातून निर्माण होणारे मानसिक आंदोलन - द्वंद्व यांचा जो मेळ घातला आहे तो खरोखरीच उत्तमपणे मांडला आहे. विक्रम गोखले व उत्तरा बावकर ज्या सहजतेने वावरतात त्यामुळे त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तीच गोष्ट चित्रपटातील इतरही कलाकारांची म्हणावी लागेल. जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार यांचे अभिनय हे अभिनय न वाटता अतिशय स्वाभाविक वाटतात. कोठेही दे मार मारामारी, अंगावर येणारी गाणी, संवाद, चित्रे न वापरता आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शैलेश बर्वेंनी दिलेले संगीतही चित्रपटात बेमालूमपणे मिसळून जाते. किशोर कदम व दीपा लागूंच्या छोट्याच परंतु प्रभावी भूमिका लक्षात राहणार्‍या आहेत व त्यांनी त्या नेहमीच्याच सफाईने वठविल्या आहेत.


दोन तासांचा हा चित्रपट प्रत्येक भारतवासियाने पाहावा असाच आहे. चित्रपटाला सबटायटल्सही आहेत, त्यामुळे अमराठी लोकांनाही तो सहज समजू शकेल. यातील भाषा आपल्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटात मांडली गेलेली मानसिक आंदोलने, द्वंद्व, प्रश्न, वातावरण आपणही रोजच्या जीवनात कोठे ना कोठे अनुभवत असतो. त्यामुळेच जो संदेश चित्रपटाच्या शेवटच्या भागात कथानकातून समोर येतो तो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करायला लावतो. पर्याय शोधायचा प्रयत्न करायला लावतो. भ्रष्टाचाराचा विरोध हा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातून सुरू केल्याशिवाय पर्याय नाही - तसे केले तरच हा लढा सार्थ होईल - भ्रष्टाचार करणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो सहन करणे हाही एक गुन्हा आहे याची जाणीव ज्या सहज सूक्ष्मतेने चित्रपटातून प्रसारित केली आहे त्याची दाद देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी बघावा व इतरांना दाखवावा.


इतका सुंदर चित्रपट पाहायला व अनुभवायला मिळाल्याबद्दल मायबोलीचे व मायबोलीच्या माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार! :)