Sunday, September 30, 2012

सुसरबाईची मोडली खोड, हत्तीच्या नाकाची झाली सोंड!


प्रत्येक आदिम संस्कृतीत सृजनाच्या, जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कथा ऐकायला, वाचायला मिळतात. आफ्रिकेच्या जंगलांत नांदणार्‍या अनेक आदिवासी जमातींमध्ये अशा विविध कथा प्रचलित आहेत. या लोककथांमध्ये त्या त्या प्रांतांतील निसर्ग, प्राणी, प्रथा यांचे प्रतिबिंब दिसून येते. एका कथेनुसार सृष्टी-निर्मात्याने आफ्रिकेत आढळणार्‍या महाकाय, विशाल अशा बाओबाब वृक्षाच्या मुळांतून प्राणी, पक्षी, किड्यांना जगात आणले. त्यातील बरेचसे प्राणी तेव्हा जसे दिसायचे तसेच आताही दिसतात. पण काही प्राण्यांचे रूप व रचना काळाच्या ओघात बदलली. अशाच एका शक्तीशाली, आकाराने मोठ्या प्राण्याच्या, हत्तीच्या बदललेल्या रूपाची ही लोकप्रिय कथा! बाळगोपाळांना ही कथा नक्कीच आवडेल! आणि म्हणूनच त्या कथेचे हे खास त्यांच्यासाठी केलेले रूपांतर!

*********************************************************************************

सुसरबाईची मोडली खोड, हत्तीच्या नाकाची झाली सोंड!

खूप खूप वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलांत हत्तींचे कळप राहायचे. हवं ते खायचे, प्यायचे, मस्ती करायचे. या हत्तींना तेव्हा आतासारखी सोंड नव्हती बरं का! त्यांचं नाक डुकराच्या नाकासारखं दिसायचं. त्यांना आपल्या नाकाचा खूप अभिमान वाटायचा. पण हत्तींचं तोंड होतं लहान आणि शरीर भलं मोठ्ठं... त्यामुळे व्हायचं काय, त्यांना खूप भूक लागायची, पण छोट्याशा तोंडामुळे त्यांचं पोटच भरायचं नाही. मग त्यांना दिवसभर फिरत खा खा खायला लागायचं. पाणी प्यायला तर जास्तच अडचण! एवढा अगडबंब देह घेऊन तळ्याचं पाणी प्यायला हत्ती खाली वाकले की काही पिल्लू हत्तींचा तोलच जायचा आणि ते बुदुक्कन पाण्यात पडायचे! झाडांवरची माकडं त्यांना पाहून फिदीफिदी हसायची. हत्तींना राग यायचा, पण करणार काय?



एकदा ऐन उन्हाळ्यात हत्तींचा एक कळप जंगलात पाणी शोधत हिंडत होता. सूर्याच्या आगीमुळे जमीनीतून वाफा निघत होत्या. पाण्याची तळी आटली होती. हत्ती खूप प्रवास करून थकले होते. शेवटी त्या भुकेल्या, तहानलेल्या हत्तींना पाण्याचं एक तळं दिसलं. तळ्याकाठी एक सुसर सुस्तपणे आराम करत बसली होती. म्हातार्‍या सुसरीला बरेच दिवसांत कोणी खायला मिळालं नव्हतं. हत्तींचा कळप तळ्याच्या दिशेने येताना पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं! तिची भूक चांगलीच खवळली. आता तिची चंगळच होती! जराही आवाज न करता ती हळूच पाण्यात शिरली. तिचे डोळे आणि नाक तेवढे पाण्याबाहेर दिसत होते. तिच्या गुपचूप हालचालींचा कोणालाच पत्ता लागला नाही. आपल्या जागेवरून ती हत्तींच्या हालचालींवर पाळत ठेवून दबा धरून बसली होती. हत्ती पाणी प्यायला तळ्यात उतरले. तोवर सुसर सुळकन् पोहत पोहत तिथे पोचली होती. हत्ती अंग दुमडून, वाकून तळ्यातील पाणी पिऊ लागले आणि सुसरीने मोका साधला! तिने आपली शेपटी पाण्यावर जोरात आपटली आणि जवळच्या एका हत्तीच्या पिल्लावर वेगात हल्ला चढवला. सुसरीच्या त्या हल्ल्याने सारे हत्ती घाबरले आणि कसेबसे धडपडत, चित्कारत, तोल सावरत उठले. सुसरीच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी अंग घुमवून ते उलट दिशेने पळू लागले. पण ते छोटं पिल्लू तळ्यातच अडकलं होतं! सुसरीने त्याचं नाक आपल्या अक्राळविक्राळ जबड्यात पकडून ठेवलं होतं ना! इतर हत्तींनी मग पिल्लाला मागं ओढलं. पण सुसरीची पकड अजिबात ढिली होत नव्हती. बरीच खेचाखेची झाली, तरी सुसर माघार घेत नव्हती. पिल्लाचं नाक आपल्या जबड्यातून सोडत नव्हती. बाकीचे हत्ती कंटाळले, दमून गेले, पण सुसर दमली नाही. हत्तीचं पिल्लूही लहान होतं. पण त्याच्या अंगात भरपूर ताकद होती. सुसरीनं त्याचं नाक जोरजोरात खेचलं तरी त्यानं हार मानली नाही. असे अनेक तास गेले. दोघंही एकमेकांशी लढत होते. सुसरीनं नाक खेचल्यावर पिल्लूही आपली ताकद पणाला लावून उलट दिशेनं ओढायचं. या सर्व ओढाताणीत पिल्लाचं नाक लांबच लांब होऊ लागलं. बरेच तास हे युद्ध चाललं. शेवटी सुसर दमली. कंटाळून तिनं हत्तीच्या पिल्लाचं नाक आपल्या जबड्यातून सोडवलं आणि ती तळ्यातल्या खोल पाण्यात दिसेनाशी झाली.

इकडे सुसरीच्या तावडीतून अचानक सुटका झालेलं ते पिल्लू धपाक्कन् तळ्याकाठच्या चिखलात पडलं आणि जोरजोरात धापा टाकू लागलं. खेचाखेचीत ते खूप थकलं होतं. बाकीचे हत्ती त्याच्या भोवती गोळा झाले. पिल्लाला फार काही लागलं नव्हतं. पण सुसरीच्या धारदार दातांमुळे त्याच्या नाकाला जखमा झाल्या होत्या. आणि हो, आता त्याचं नाक इतर हत्तींपेक्षा लांबच लांब झालं होतं. कळपातले हत्ती त्याच्या नाकाकडे बघून हसू लागले. पिल्लाला त्यांचा खूप राग आला. त्याचं नाक लांबुळकं होऊन पार जमीनीपर्यंत लोंबकळत होतं. त्यानं पाण्यात आपलं प्रतिबिंब बघितलं. पाण्यात ते लांबच लांब नाक पाहून ते पिल्लू खूपच खट्टू झालं. त्याचं नाक हुळहुळं झालं होतं, ठणकत होतं. आणि बाकीचे हत्ती त्याला हसत होते!! पिल्लू रुसून लपून बसलं. त्याला आपल्या नाकाची लाज वाटत होती.



पुढं अनेक दिवस पिल्लानं आपलं नाक पूर्वीसारखं व्हावं म्हणून बरीच खटपट केली. पण नाक जैसे थे! त्याच्या जखमा काही दिवसांनी भरून आल्या. हळूहळू त्याला आपल्या नाकाची सवय होऊ लागली. इतर हत्तींच्या हसण्याचा राग यायचंही बंद झालं. मग एक गंमतच झाली! पिल्लाला आपल्या लांबच लांब नाकाचे फायदे कळू लागले! आता त्याला झाडांची पानं, गवत, फळं आपल्या नाकाच्या मदतीने पटकन तोडता व खाता येऊ लागली. पाणी पिणंही सोपं झालं. उन्हात अंग गरम झालं की नदीकाठी जाऊन या नाकाच्या मदतीनं त्याला अंगावर चिखल थापता येऊ लागला. नदीचं पाणी कितीही खोल असलं तरी पिल्लू नाक उंच हवेत धरून श्वास घ्यायचं आणि मजेत नदी पार करायचं. लांब नाकामुळे इतरांच्या अगोदर त्याला हवेतले बदल जाणवायचे किंवा धोका कळायचा. पाठीला खाज सुटली की या नाकाच्या विळख्यात झाडाची फांदी पकडून त्याला आपली पाठ खाजवता यायची!

आपल्या नाकाचे फायदे लक्षात आल्यावर पिल्लू खुश झालं. इतर हत्तींनाही पिल्लाच्या त्या लांब नाकाचा हेवा वाटू लागला. मग काय! एकेक करत सारे हत्ती त्या तळ्यापाशी जायचे आणि सुसरीनं आपलं नाक जबड्यात धरून ओढावं म्हणून आपलं तोंड पाण्यात घालून बसायचे. सुसरीनं अशा अनेक हत्तींचं नाक ओढून त्यांना पाण्यात खेचायचा प्रयत्न केला, पण दर वेळी हत्तीच जिंकले. आणि प्रत्येक जिंकणार्‍या हत्तीचं नाक त्या खेचाखेचीत लांबच लांब होत गेलं. या सार्‍या दमवणार्‍या लढाईचा सुसरीनं काय विचार केला असेल ते कोणालाच ठाऊक नाही! पण एक गोष्ट मात्र नक्की! सुसरबाई तशाच राहिल्या उपाशी! हत्तींवर हल्ला करून काऽऽही उपयोग नाही हे तिला चांगलंच कळलं! सुसरबाईंची मोडली मस्तच खोड.... हत्तीच्या नाकाची झाली सोंड!!

(आफ्रिकन लोककथेवर आधारित)
(मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी केलेले लेखन. चित्र आंतरजालीय मुक्तस्रोतांमधून साभार)


-- अरुंधती कुलकर्णी

Wednesday, September 19, 2012

ढोलताशा व ओलोडम!!


गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर एका नव्या क्षितिजाला स्पर्श करू जाता खूप आनंद होत आहे! संगीताच्या क्षेत्रातील हे नवे पाऊल माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. जागतिक संगीत किंवा विश्वसंगीत असे ज्याचे वर्णन करता येईल अशा ''वर्ल्ड म्युझिक'' बद्दल माझे अनुभव, निरीक्षणे, माहिती, महती व या सर्वातून मिळणारा आनंद लेखणीतून व्यक्त करता यावा अशी त्या श्री गणेशाचे चरणी प्रार्थना!

इ.स. १९४६ मधील गणपतीची मिरवणूक


''वर्ल्ड म्युझिक'' म्हणजे नक्की काय? मुळात संगीतात अशी वर्गवारी कधीपासून निर्माण झाली? त्या अगोदर हे संगीत अस्तित्वात होते का?

तर वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, समाजातील लोकांच्या त्या त्या भागातील खास संगीताचे अस्तित्व हे शेकडो, हजारो वर्षांपासून होते व आहे. परंतु १९९० सालापर्यंत हे संगीत वेगवेगळ्या नावांनी व प्रकाराखाली लोकांना ऐकण्यासाठी बाजारात उपलब्ध होते. मग कधी ते 'आयलंड म्युझिक' च्या नावाने असायचे तर कधी 'लोक संगीत' नावाने! परंतु इ. स. १९६० मध्ये रॉबर्ट ब्राऊन यांनी कनेटिकट विद्यापीठात आफ्रिका व आशिया खंडातील अनेक गायक, वादक, संगीतज्ञ बोलावून त्यांच्या सादरीकरणाद्वारे वर्ल्ड म्युझिक कन्सर्ट मालिका सुरू केली व या विषयातील अंडरग्रॅज्युएट ते डॉक्टरेट अशा अभ्यासक्रमास प्रारंभ केला. पुढे १९९० च्या दशकात मार्केटिंगसाठी सोपे जावे या दृष्टिकोनातून प्रसारमाध्यमे व संगीत उद्योगांनी ''वर्ल्ड म्युझिक'' शब्दाला उचलून धरले व पाश्चात्त्य नसलेल्या संगीतासाठी ही श्रेणी वापरली जाऊ लागली. ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स व बिलबोर्ड व यांच्यासारख्या जगभरातील अनेक माध्यमांनी ही श्रेणी लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा उचलला. याद्वारे आतापर्यंत कधी न ऐकलेले, अनुभवलेले संगीत लोकांपुढे येऊ लागले. गायन वादनाच्या विविध पद्धती, वाद्ये, ताल, नाद यांची ओळख होऊ लागली. पाश्चात्त्य संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंतांसोबत जगाच्या कानाकोपर्‍यातील गायक, वादकांचा मेळ घालून त्यातून निर्माण होणारे मिश्र-संगीतही लोकांना आवडू लागले. यात प्रसार-माध्यमांचा वाटा तर मोठा होताच! शिवाय जसे रोज रोज पोळी-भाजी खाऊन कंटाळलेल्या जिभेला काही वेगळ्या चवीचे, चमचमीत खायला मिळाले की मन खुलते त्याप्रमाणे त्याच त्याच पठडीतील संगीत ऐकल्यावर वेगळ्या प्रकारच्या संगीताचा आनंद श्रवणेंद्रियांना सुखावू लागला. त्यातही पाश्चात्त्य संगीतातील काही ओळखीचे सूर, पद्धती व जगातील निरनिराळ्या संस्कृतींमधील अनोळखी सूर यांचा मिलाफ संगीत रसिकांच्या पसंतीस उतरला.

प्रत्येक संस्कृतीचे आपले काही विचार असतात, प्रतीके, श्रद्धा, परंपरा असतात. आणि त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या संगीतातही उमटलेले दिसते. तसेच त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग, निसर्गातील प्राणी-पक्षी-झाडे-वेली-नद्या-शिखरे यांमधून उमटणारे संगीत त्यांच्या गाण्यातून किंवा वादनातून व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांची वाद्येही उपलब्ध असलेल्या सामग्रीतून, निसर्गातून व मानवी कल्पकतेतून निर्माण होतात. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आफ्रिकेतील कॅमरूनच्या खोर्‍यातील बाका जमातीचे आदिवासी पपईच्या पोकळ देठांत फुंकर घालून व त्या आवाजाची आपल्या गाण्याशी सांगड घालून खास हिंदेव्हू प्रकारचे ध्वनी संगीत निर्माण करतात, जे हर्बी हॅनकॉक व मॅडोना यांसारख्या प्रसिद्ध गायकांनाही भुरळ घालते! अशी अनेक उदाहरणे आहेत. या अतिविशाल क्षेत्राची व माझी नुकतीच ओळख होत आहे. त्याबद्दल टीकाटिप्पणी करायची माझी नक्कीच पात्रता नाही. परंतु आवडलेल्या संगीताची इतरांशी ओळख करून द्यायचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला मिळालेला आनंद इतरांनाही मिळावा अशी इच्छा आहे. आणि या सार्‍या संगीतातून मिळणारा जो मानवतेचा, समानतेचा, शांतीचा, सौहार्दाचा व बंधुभावाचा जो विश्वव्यापक संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा अशी मनोकामना! हे प्रयत्न गोड मानून घ्यावेत ही विनंती!

आजचे संगीत : ढोलताशा व ओलोडम!! 

गणेशाच्या स्वागतासाठी व निरोपासाठी आपल्याकडे ढोल-ताशाच्या पथकांची परंपरा आहे. अतिशय उत्साहवर्धक, मुग्ध करणार्‍या या नादगर्जनेत मोठ्या आनंदाने बाप्पांचे आपण स्वागत करतो. आणि तितक्याच कृतज्ञ भावनेने त्यांना निरोपही देतो. कानात घुमत राहतात ते ढोल, टिपर्‍या, झांजांचे गगनभेदी स्वर. त्या स्वरांचीही एक झिंग असते, एक मस्ती असते, एक नशा असते. त्या तालांवर पावले कधी थिरकू लागतात ते कळतही नाही. मनात फक्त तो आणि तोच नाद व्यापून उरतो. सर्व विचार, चिंता, विवंचना बाजूला पडतात. शरीराचा विसर पडतो. उरते ते फक्त नादब्रह्म!

या ढोलताशाच्या उन्मादाची एक झलक इथे पाहा व अनुभवा : http://www.youtube.com/watch?v=-N0RHeY3LY4 (ज्ञान प्रबोधिनीचे ढोल पथक)

किंवा



ब्राझील मधील साल्वाडोर येथे ओलोडम नावाचा एक सांस्कृतिक गट आहे. त्यांचे ड्रम्स वाजविणे, त्या तालांवरील नृत्य पाहिले की आपल्या गणेशोत्सवातील ढोल-पथकेच आठवतात! या ड्रमर्सच्या ड्रम्समधून उमटणारे नाद, त्यांचा आवेश, वाजवायची पद्धत यांत व आपल्या ढोलपथकांत कमालीचे साम्य दिसून येते! ह्या सांस्कृतिक गटाचा मुख्य उद्देश वंशभेदाचे निर्मूलन करण्यात हातभार आणि ब्राझीलच्या तरुणाईच्या सृजनशक्तीला, कलात्मकतेला वाव देणे हे आहे. ब्राझीलमध्ये राहणार्‍या मूळच्या आफ्रिकन वंशाच्या लोकांनी तेथील वंशभेदाचे दाहक चटके सोसले आहेत. अर्थातच त्या सर्वाचा त्यांच्या मानसिकतेवर, स्व-प्रतिमेवर परिणाम झाला आहे. या संगीताद्वारे त्यांना आपली स्व-प्रतिमा सशक्त करण्याची संधी मिळावी म्हणून नेगिलो सांबा या ड्रमरने १९७९ मध्ये या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपद्वारे ब्राझीलच्या लोकांना आपले नागरिकी हक्क व अधिकार मिळवण्यासाठी प्रेरणा देण्यात येते, त्यांच्या हक्कांच्या  लढ्यात ओलोडम ग्रुप त्यांची साथ देतो.



या ग्रुपच्या संगीत वादन शैलीला ''सांबा रेग्गे'' असे संबोधिले जाते. पारंपारिक ब्राझिलियन सांबा सोबत इतर संस्कृतींमधील साल्सा, रेग्गे, मेरांग प्रकारच्या तालांचा मेळ त्यांच्या वादनात दिसून येतो. या ग्रुपने पॉप गायक पॉल सायमन व मायकेल जॅक्सन यांचेबरोबर काम केले आहे. पॉल सायमन बरोबर http://www.paulsimon.com/us/music/rhythm-saintsर्‍हिदम ऑफ द सेन्ट्स या अल्बममध्ये तर मायकेल जॅक्सन बरोबर 'दे डोन्ट केअर अबाऊट अस' या गाण्यात त्यांच्या ग्रुपचे वादन आहे.


कार्निवलच्या काळात ओलोडम ग्रूप परेडमध्ये किंवा शोभायात्रेत भाग घेतो. त्यात त्यांचे साधारण दोनशेहून अधिक ड्रमर्स, गायक असतात आणि खास वेशभूषा केलेले हजारो लोक त्यात सहभाग घेतात. पण फक्त कार्निवलपुरतेच यांचे कार्य मर्यादित नाही. वर्षभर अनेक सेमिनार्स, भाषणे, परिसंवादांतून ओलोडमची हजेरी असते. अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आधारित परिसंवादांत ते भाग घेतात. दर महिन्याला त्यांचे बंटू नागो नावाचे वार्तापत्रक प्रकाशित होते. त्यांची स्वतःची एक फॅक्टरीही आहे. तिथे ते ड्रम्स, खास वेशभूषेचे कपडे आणि इतर काही वस्तू बनवितात व लोकांना विकतात. ओलोडम तर्फे साल्वाडोरच्या मागास व उपेक्षित मुलांसाठी दाट वस्तीच्या अंतर्भागात शाळाही चालविली जाते. तिथे या मुलांना शालेय शिक्षणासोबत कलाप्रशिक्षण दिले जाते व त्यांची स्वप्रतिमा सशक्त होण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. तरुणांच्या आर्थिक प्रगतीसाठीही ओलोडमतर्फे खास प्रयत्न केले जातात.  

या ग्रुपचा संस्थापक नेगिलो सांबा व मुख्य गायक - गीतलेखक जर्मानो मेनेघेल दोघेही आता जगात नाहीत. पण त्यांनी सुरू केलेली ही सांगीतिक चळवळ पुढेही चालूच राहील यात शंकाच नाही!

* माझी सहाध्यायी व ब्राझीलची नागरिक असलेल्या मिशेल ब्रूकचे तिने ओलोडमची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!