Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, November 24, 2010

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.

अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच! सध्या पाकिस्तानात असलेल्या तलवंडी गावात माता तृप्ता व पिता मेहता कालू यांच्या पोटी गुरू नानक यांचा इ. स. १४६९ मध्ये कार्तिक महिन्यात जन्म झाला. नुकताच गुरू नानक जयंती सोहळा व प्रकाश पर्वाचा उत्सव देशोदेशीच्या सर्व शीख बांधवांनी साजरा केला. इतिहासाने ज्या ज्या व्यक्तींची द्रष्टे, संतशिरोमणी किंवा ज्ञानी म्हणून नोंद घेतली त्यांमध्ये गुरू नानकांचे स्थान व कार्य वादातीत आहे. एका महान कर्तृत्वशाली, साक्षात्कारी संतमहात्म्याच्या जन्माच्या जशा कहाण्या असतात तशाच त्या गुरू नानकांच्या जन्माचे बाबतीतही आहेत. माता तृप्ताला नानकांचा गर्भ उदरी जोपासताना झालेले भास, तिला दिसलेली स्वप्ने, संकेत इत्यादींचे उल्लेख शीख वाङमयात येतात. तृप्ता मातेबद्दल तपशिलांत फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती स्वभावाने अतिशय सत्शील, कनवाळू व प्रेमळ असल्याचे उल्लेख आढळतात.



अमृता प्रीतमच्या प्रतिभाशाली लेखणीतून, कल्पनेच्या भरारीतून माता तृप्ताने गुरू नानकांच्या वेळी गर्भार अवस्थेत पाहिलेली स्वप्ने ''नौ सपने'' ह्या दीर्घ कवितेतून आपल्या भेटीला येतात. उदरीचा गर्भ तृप्ता मातेला विविध प्रकारे आपल्या अस्तित्वाचे, दिव्यत्वाचे संकेत देत राहतो. नऊ महिन्यांची ही नऊ स्वप्ने. उदरीचा गर्भ जसजसा आकार घेत जातो तसतसा स्वप्नांत आणि माता तृप्ताच्या मनोवस्थेत घडून येणारा बदल अमृताने मोठ्या नजाकतीने वर्णिला आहे. प्रत्येक स्वप्न तृप्ता मातेला पोटातील अंकुराविषयी काही ना काही दृष्टांत देत राहते. संकेत, भास-आभास, स्वप्न व संवाद यांचे हे तलम वस्त्र शब्दांमध्ये गुंफताना कवितेमधून ठायी ठायी अमृतामधील मातृत्वही डोकावताना दिसते. त्या काळातील स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील घटनांचा मोठ्या खुबीने वापर करून अमृता कवितेचे रंगही अधिक गडद-गूढ करत जाते. चंद्र-सूर्य-तारका, नदी-सरोवर, वृक्ष-वने आदींचे रूपक तिने रेखाटलेल्या शब्दचित्राचे सौंदर्य अजूनच खुलविते. तिने कवितेत योजलेले काही शब्द आणि त्यांचा प्रतीत होणारा अर्थ अधिक गहिराईचे संकेत देत मनात रुंजी घालत राहतात.

अमृताच्या आत्मचरित्रात हे काव्य तिला आपल्या आयुष्यातील एका प्रसंगावरुन स्फुरल्याचे ती सांगते. स्वतःचा दूरगावी गेलेला मुलगा जेव्हा आईशी संवाद साधतो तेव्हा त्या आईची होणारी अवस्था अमृतामधील माता आणि कवयित्री ज्या तरलतेने व ताकदीने अनुभवते तीच तरलता तिच्या ''नौ सपने'' कवितेतून रसिकांना खुणावत राहते. एका तेजस्वी गर्भाला उदरी पोसताना माता तृप्ताने नक्की काय अनुभवले असेल? काय स्वप्ने पाहिली असतील? येणार्‍या काळाच्या खुणा तिला जाणवल्या असतील का? त्या गर्भाने तिला काही संकेत दिले असतील का? या सार्‍या प्रश्नांचा वेध घेत अमृताची कविता एक वेगळाच अनुभव देऊन जाते.  



माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्‍या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते.

त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न  :  

नऊ स्वप्नं

भाग १

तृप्ता दचकून जागी झाली
ऊबदार दुलई हळूच सारखी केली
लाल लज्जेसमान पदर
सावरला तिने खांद्यावर

आपल्या धन्याकडे पाहिले
मग शुभ्र बिछान्यावरच्या
चुणीप्रमाणे हलकेच लाजली

आणि म्हणू लागली
आज माघाची रात्र
मी नदीत पाऊल ठेवले

गारठलेल्या थंड रात्री
कोमट पाणी नदीचे पात्री

अलौकिक काही झाले
पाण्याला अंगस्पर्श होताच
नदीचे दूध झाले!

त्या जादुई नदीत
मी दुधात न्हाले

या तलवंडी (गावा)त
ही कोणती नदी?
हे कसलं स्वप्नं?

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला

आणि नदीचं पाणी
माझ्या रक्तात मिसळत गेलं
आणि तो प्रकाश
माझ्या उदरी तरंगत राहिला

-----------------------
भाग २

फाल्गुनाच्या कटोऱ्यात सात रंग मिसळले
पण मुखाने काही ना वदले

ह्या मातीच्या देहाचं सार्थक होतं
जेव्हा कोणी उदरी आश्रयाला येतं

हा कसला जप? हे कसलं तप?

की मातेला ईश्वराचा साक्षात्कार
गर्भाचे ठायी होतो....

---------------------------

भाग ३

कोवळ्या गर्भाची मळमळ
जीव घाबरा झाला केवळ

ताक घुसळायला बसले तर भासले जणू लोणी वर आले
मातीच्या घड्यात हात घातला
तर सूर्याचा वृक्ष निपजला

हा कसला भोग? कसला हा संयोग?

आणि चैत्राचे पुढे सरकणारे दिवस
हे असलं कसलं स्वप्नं?
-----------------------------

भाग ४

माझ्यात आणि गर्भात
हे स्वप्नांचं अंतर

जीव माझा फुलला आणि काळीज घाबरंघुबरं
वैशाखात कापलं जाणारं
हे कोणतं पीक होतं
सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं....

---------------------

भाग ५

आज रात्रीचा हा तरल समय
आणि ज्येष्ठाचा महिना
हा कोणता आवाज होता?

जळीस्थळी
जणू एक नाद उमटे
हे मोह-मायेचे गीत
की ईश्वराच्या कायेचे संगीत?

कोणता दैवी सुगंध होता?
की माझ्या नाभीचा गंध होता?
मी घाबरले
शंका घेत राहिले
आणि त्या आवाजाच्या रोखाने
वनांच्या वाटा धुंडाळत राहिले

हा कोणता आवाज
कोणतं हे स्वप्नं?
कितीसं परकं?
कितीसं आपलं?

मी एक हरिणी
जशी बावरी होत राहिले
आणि माझ्या गर्भाला
कान लावून ऐकत राहिले
--------------------------------

भाग ६

आषाढाचा महिना
तृप्ताला आपोपाप जाग आली
जसे उमलणारे फूल
जसा पुढे सरकणारा दिवस

''हे माझं जीवन
कोणत्या सरोवरांचं पाणी
मी आत्ताच इथे
एका हंसाला बसलेलं पाहिलं

हे कसलं स्वप्नं?
की जाग आल्यावरही वाटतंय
जणू माझ्या गर्भात
त्याचा पंख फडफडतोय..... ""
-------------------------------------

भाग ७

कोणता वृक्ष वा मनुष्य
नाही माझ्या जवळ
तरीही कोणी माझ्या झोळीत
घातला हा नारळ?

मी नारळ वाढविला
तर लोक मलई न्यायला आले
कोवळ्या नारळाचे पाणी
मी कटोऱ्यात ओतले

ना कोणा सांगितले ना कळवले
ना आप-परभाव केला
दाराशी असंख्य लोक आले
पण नारळाची मलई
तरीही संपली नाही

असा कसा हा नारळ?
असे कसे हे स्वप्नं?
आणि स्वप्नाचे धागे किती लांबच लांब?

छातीतला हा पाऊस,
मी छातीला हात लावला
तर ते नारळाचं पाणी
दुधासारखं ठिबकू लागलं

-------------------------------

भाग ८

हा कसला भाद्रपद?
ही कसली जादू?

सगळ्याच गोष्टी न्याऱ्या
ह्या गर्भीच्या बाळाचं अंगडं-टोपडं
शिवणार तरी कोण?

ही कसली सूत्रकाठी?
हे कसले माप?
जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते...

आश्विनाच्या महिन्यात
तृप्ता होती जागी आणि विरागी

''हे माझ्या जीवना!
तू कोणासाठी काततो आहेस हा मोहाचा धागा!

मोहाच्या तारेत आकाश गुंडाळता येत नाही
सूर्य बांधता येत नाही
सत्यासारखी एक जी गोष्ट
त्याचं अंगडं-टोपडं ना बेतता येतं ना शिवता येतं... ''

आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

------------------------

भाग ९

माझ्या कार्तिक धर्मी,
माझं जीवन सुकर्मी
माझ्या गर्भाची धुनी
कातते पुढचा धागा जीवनी

देहाचा दीप उजळला
प्रकाशाचा किरण स्पर्शिला
धरतीच्या दाईला बोलावा
माझा प्रसवकाळ आला...

(पूर्ण)

**********************************************************************************************************************

मूळ काव्य येथे वाचा. 


--- अरुंधती 


(छायाचित्रे सिखविकीवरून साभार)

Saturday, November 20, 2010

म्हातारपणीची प्रार्थना

काल ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए. त्या प्रार्थनेचा मी केलेला स्वैर भावानुवाद येथे देत आहे :

देवा तुला माहीत आहे
माझं वय वाढत आहे...

वायफळ बडबड करण्यातून
प्रत्येक विषयावर माझे मत नोंदविण्याच्या
घोर निष्फळ अट्टहासातून
वाचव रे आता मला बाबा!

प्रत्येकाचे आयुष्य सुधारण्यापासून
इतर लोकांच्या भानगडी निस्तरण्याच्या मोहातून
मला वाचव रे बाबा!

लांबलचक तपशीलवार गोष्टींचे
पाल्हाळ लावण्याच्या सवयीतून
माझं रक्षण कर रे बाबा!

फाफटपसारा न मांडता
थेट मुद्द्याचंच बोलायचं
बळ दे रे मला बाबा!

माझ्या तोंडून
माझ्या अनंत शरीर वेदना आणि दु:खांचं
अव्याहत रडगाणं सुरू झालं की...
माझे ओठ शिवून टाकायची व्यवस्था कर रे बाबा!

वर्षं उलटत आहेत तसतशी त्या वेदनांची व्याप्ती
आणि माझी त्यांच्याबद्दल बोलण्याची हौस....
दोन्हीही वाढतच चाललं आहे!
आणि माझं त्यांच्याविषयीचं प्रेमदेखील....

मलाही शिकव धडा
की कधी कधी...
माझंही चुकू शकतं!

मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस.
परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस.

माझ्याकडील शहाणपणाची आणि अनुभवांची महाकाय पोतडी
वापरता न येणे म्हणजे कित्ती कित्ती वाईट!

पण काय करू रे देवा....

शेवटापर्यंत हवेत ना मलाही
कोणी तरी हक्काचे सखे साथी!


-- अरुंधती

मूळ प्रार्थना वाचायची असल्यास येथे वाचा. 

Thursday, June 17, 2010

वारिस शाह नूं -- अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद


(पिंजर चित्रपटात ह्या काव्याचा समर्पक उपयोग)
(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया)

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे! आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.
ते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......
भारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल! अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे!
हे वारिस शाह!
आज मी करते आवाहन वारिस शहाला
आपल्या कबरीतून तू बोल
आणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू
एक नवीन पान खोल

पंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर
तू भले मोठे काव्य लिहिलेस
आज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत
हे वारिस शाह, तुला विनवत आहेत

हे दुःखितांच्या सख्या
बघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं

आणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय
आपल्या शेतांत, जमिनीत भिनून
तेच जिकडे तिकडे अंकुरतंय...

ते आकाशही आता रक्तरंजित झालंय
आणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत

वनातला वाराही आता विषारी झालाय
त्याच्या फूत्कारांनी जहरील्या
वेळूच्या बासरीचाही नाग झालाय

नागाने ओठांना डंख केले
आणि ते डंख पसरत, वाढतच गेले
बघता बघता पंजाबाचे
सारे अंगच काळेनिळे पडले

गळ्यांमधील गाणी भंगून गेली
सुटले तुटले धागे चरख्यांचे
मैत्रिणींची कायमची ताटातूट
चरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली

नावाड्यांनी साऱ्या नावा
वाहवल्या आमच्या सेजेसोबत
पिंपळावरचे आमचे झोके
कोसळून पडले फांद्यांसमवेत

जिथे प्रेमाचे तराणे घुमायचे
ती बासरी न जाणे कोठे हरवली
आणि रांझाचे सारे बंधुभाई
बासरी वाजवायचेच विसरून गेले

जमिनीवर रक्ताचा पाऊस
कबरींना न्हाऊ घालून गेला
आणि प्रेमाच्या राजकुमारी
त्यांवर अश्रू गाळत बसल्या

आज बनलेत सगळे कैदो*
प्रेम अन सौंदर्याचे चोर
आता मी कोठून शोधून आणू
अजून एक वारिस शाह....

(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो! )
अनुवादक - अरुंधती 
कवयित्री अमृता प्रीतम (छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)  
मूळ काव्य :
(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )
वारिस शाह नूं
आज्ज आखां वारिस शाह नूं
कित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा
कोई अगला वर्का फोल
इक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण
आज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण
उठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब
आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव
किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला
ते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला
इस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर
गिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर
उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा
उहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना
नागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,
पल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,
गलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,
त्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद
सने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,
सने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,
जित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,
रांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च
धरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,
प्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,
आज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर
आज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर
--- अमृता प्रीतम

यू ट्यूब वर अमृताच्या स्वत:च्या आवाजात हे गाणे ऐका : 

"> 

Sunday, May 23, 2010

चांदण्याचे ओठ तुझे


[ बरेच वर्षांपूर्वी केलेली कविता ]

Friday, February 26, 2010

" मानसपूजा "



श्रीमत्‌ शंकराचार्यकृत ‘मानसपूजे' चा कवी विनायककृत अनुवाद


चराचरी तू, आवाहन ये काय तुझ्या कामी ?
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती
अर्घ्यपाद्य वाया,
कर वाहेना, आचमन तुला शुद्धाला द्याया ॥१॥

घालू कैसे, तुला निर्मला देवा!स्नानाते?
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते ?।
निरालंब तू,उपवीताचे महत्त्व तुज नाही,
नसे वासना, फुले सुवासिक निष्फल त्या ठायी ॥२॥

गंधाची थोरवी, कोणती नसे लेप ज्याला,
स्वता रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला।
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणे,
विभो! तुष्ट तुज, कसे करावे म्या तांबूलाने ? ॥३॥

नसे अनंता, प्रदक्षिणेचे बल माझ्या ठायी,
अभिन्न तू मी, मग कवणाच्या लागावे पायी?।
तुजला स्तविता, हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी, तेथे वाणी मग बापुडवाणी ? ॥४॥

स्वयंप्रकाशी, काय त्यापुढे नीरांजनज्योती ?
विसर्जन तुला कोठे ? विश्वे नांदविसी पोटी ॥५॥

कळून सारे, सजलो देवा! तुझ्या पूजनासी,
भय न लेकरा, वाटे जाया निजजनकापाशी
चुकले मुकले, शब्द मुलाचे गोडच जनकाते
बालिश लीला, बघून त्याच्या मनी हर्ष दाटे ॥६॥

अजाण मी लेकरू, तुजकडे जनकाचे नाते,
तव सेवेचा, देवा! ओढा असे मात्र माते।
येईल तैशी, करतो सेवा गोड करूनि घ्यावी,
पुण्यपदाची जोड, वत्सला! विनायका द्यावी ॥७॥


आद्य शंकराचार्य यांनी संस्कृतमध्ये केलेल्या ‘मानसपूजा‘ या स्तोत्राचा कवी विनायक यांनी अनुवाद केला.

'विनायकांची कविता' या चित्रशाळेने १९५५ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात ती आहे. संपादन प्रा. भ. श्री पंडित यांचे आहे.

माझ्या आजी-आजोबांना ही मानसपूजा अतिशय प्रिय होती. ते स्वत: तर म्हणायचेच आणि आम्हां मुलांकडूनही म्हणून घ्यायचे. त्यांच्या आवाजात ऐकल्यामुळे व ह्या काव्यातील उपजत माधुर्यामुळे ही मानसपूजा सदैव स्मरणात राहील.

Friday, February 05, 2010

ती डोळ्यांतुन खुदकन हसते


ती डोळ्यांतुन खुदकन हसते अन गिरक्या लगबग घेते | 

ओठांच्या शिंपलीवरती इंद्रधनु सुंदर अवतरते ||

त्या नाजूक गालांवरती फुलपाखरे किती भिरभिरती | 

सायीच्या हातांमधुनी प्रेमामृत नित पाझरते ||

मखमाल तिच्या स्मरणाने जीव हलका फुलका होतो | 

ममतेचे रेशीम धागे ती असेच गुंफुनी जाते ||
-- अरुंधती

Monday, February 01, 2010

जलवर्षा


मृद्गंधाचे अत्तर उधळित कोसळती जलधारा

हिरव्या पात्यांतुनि लवलवतो सुसाट भिजरा वारा |

मखमलि सजली धुंद नव्हाळी यौवनसुंदर धरा

पक्षि विसावत अंग घुसळुनी चोचि घासती परां |

आमोदे अति प्रसन्न गातो खळखळणारा झरा

तप्त सृष्टिला तृप्त करुनिया जीवन दे अंकुरा |

आनंदाचे तोरण सजले अवनीच्या मंदिरा

जलवर्षेचे पांग फेडण्या जन्म पडे का पुरा?
-- अरुंधती

Friday, November 20, 2009

पावसात चिंब व्हावे



पावसात चिंब व्हावे 
वेध नभीचे लागावे 
अनंताच्या पसार्‍यात 
देवा तुझे गीत गावे ||

हिरव्याची नवलाई 
पर्णसंभारी फुलोनी 
उमलत्या कलिकांनी 
तुझ्या श्वासे बहरावे ||

माझ्या केतकी मनाला 
तुझे सुगंधाचे दान 
त्याच्या रोमांरोमांतून 
देवा घडो तुझे ध्यान ||

असा वर्षाव जो व्हावा 
देह आभाळीच ल्यावा 
माती मातींत सुगंधे 
त्याचा मुक्त शिडकावा ||
-- अरुंधती

Sunday, November 15, 2009

निळामिठी



कृष्णमेघ घननीळ दिगंतर 
चांदेरी किरणांची प्रभावळ |
गहिर्‍या कोमल मंतरल्या क्षणी 
तुझ्या मंद हास्याची चाहुल ||

  पिऊन टाकिले गगन अंतरी 
नेत्री सावळे स्वप्निल काजळ |
तृषार्त मीही तरीही का रे 
तुझ्या ओढीने कातर पाऊल ||

  पुष्करिणींचे सलिल सुगंधी 
वृक्षजटांचे हिरवे जावळ |
तुझ्याचसाठी कुसुमकळांनी 
मऊ रेशमी भरीली ओंजळ ||

  गभिर घना तू धावत ये रे 
निळामिठीने अथांग व्याकुळ |
अनंतब्रह्मा द्वैत मिटवुनी 
पुन्हा बरसू दे सगुण तीर्थजल ||
--- अरुंधती