Showing posts with label सामाजिक बांधिलकी. Show all posts
Showing posts with label सामाजिक बांधिलकी. Show all posts

Wednesday, October 17, 2012

उबुंटू


विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान माझी ओळख एका सुंदर शब्दाशी झाली. तो शब्द म्हणजे ''उबुंटू''. 



Umuntu Ngumuntu Ngabantu: “A person is a person because of people.” (झुलू म्हण)

उबुंटू या शब्दाला आफ्रिकेत खोसा समाजात, बंटू भाषांमध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे व त्या शब्दाची वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी रूपे आहेत. जसे बोथो, उटू, उन्हू इत्यादी. उबुंटू हे एक प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली म्हणता येईल. त्याचा अर्थ ढोबळपणे, ''मी आहे, कारण आम्ही आहोत,'' असा होतो. त्यानुसार समाजात प्रत्येकाचे स्थान महत्त्वाचे आहे, आणि ''माझं अस्तित्व इतरांच्या अस्तित्वामुळे आहे,'' हा त्यातील मुख्य विचार मानला जातो. त्यानुसार उबुंटू जीवनशैलीला अनुसरणार्‍या माणसाला इतरांमधील गुणांमुळे  किंवा त्यांच्या क्षमतेमुळे कधीच असुरक्षित वाटत नाही. कारण तो स्वतः पूर्णतेचा एक अंश आहे, त्या पूर्णतेचा एक भाग आहे हे त्याला ठाऊक असते. तो स्वतःला इतरांचा एक भाग मानतो. आणि त्यामुळे इतरांची मानहानी ही त्या व्यक्तीचीही मानहानी ठरते. इतरांचे शोषण त्याचे शोषण ठरते. इतरांचे दु:ख त्याचे दु:ख ठरते. तुम्ही माणूस म्हणून एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला इतरांची, माणसांची, समाजाची गरज असते. तुमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. उबुंटू मुळे तुमच्यात उदारता येते. मनाचे मोठेपण येते. आपण एकमेकांशी जोडले गेल्याची भावना येते. अनेकदा आपण स्वतःचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करतो. पण उबुंटू मध्ये तुम्ही व इतर माणसे भिन्न नाहीत. एकाच्या कृतीने बाकीच्यांवरही प्रभाव पडतो. मग तो प्रभाव चांगला असो की वाईट! तुम्ही चांगली कृती केलीत तर त्याचा फायदाही सार्‍या जगाला होतो.

नेल्सन मंडेला उबुंटूचा अर्थ सांगताना म्हणतात : पूर्वीच्या काळी यात्रेकरू प्रवास करताना एखाद्या खेड्यात थांबायचे. तिथे गेल्यावर यात्रेकरूला कोणापाशी अन्न, पाणी मागायची गरज पडत नसे. कारण खेड्यातले सर्व लोक त्याला अन्न, पाणी आणून देत. त्याचे मनोरंजन करत. हा झाला उबुंटूचा एक भाग. याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी स्वतःचा विचारच करायचा नाही! त्याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्या समाजाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही हे करायला तयार आहात का?  



एक प्रकारचे ''कम्युनिटी स्पिरिट'' ज्याला म्हणता येईल असे हे तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगातही बरेच प्रसिद्ध पावले असे म्हणता येईल. २००४ सालच्या ''इन माय कंट्री'' चित्रपटात उबुंटू ही मुख्य विचारधारा असल्याचे सांगितले जाते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही त्यांच्या भाषणात समाजाचे महत्त्व सांगताना उबुंटूचा उल्लेख केला आहे.



संगणकीय प्रणालीच्या जगातही ''उबुंटू'' हे नाव प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाने उबुंटूचे इंग्रजी भाषांतर असलेले ''आय अ‍ॅम बिकॉझ वुई आर'' हे शीर्षक आपल्या आफ्रिकेतील मलावीच्या एड्स आणि एच आय व्ही ग्रस्त अनाथ मुलांवर तयार केलेल्या माहितीपटासाठी वापरले.



उबुंटू शब्दाशी निगडित एक छोटीशी पण सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली.



आफ्रिकेत काम करणार्‍या एका मानववंशशास्त्रज्ञाने तो काम करत असलेल्या खोसा समाजातील लहान मुलांना खेळताना पाहिले. त्याने एका झाडाखाली एक टोपली ठेवली. टोपलीत मधुर चवीची फळे होती. तो या मुलांना म्हणाला, तुमची शर्यत लावूयात. तुमच्यापैकी जो पळत पळत जाऊन त्या टोपलीपाशी पहिला पोचेल त्याला सर्वात जास्त फळे मिळतील. मुलांनी होकार दिला. शास्त्रज्ञाने शर्यत सुरू केल्यावर सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण पळत पळत एकाच वेळी त्या टोपलीपाशी पोचले. अर्थातच फळांचा प्रत्येक मुलाला समान वाटा मिळाला. त्या शास्त्रज्ञाला मुलांच्या त्या वागण्याचे फार कुतूहल वाटले. त्याने विचारले, ''तुम्ही अशा प्रकारे का पळालात? तुमच्यापैकी एक कोणीतरी शर्यत जिंकू शकला असता!'' त्यावर मुलांनी फळांवर ताव मारत उत्तर दिले, ''उबुंटू, जर बाकीचे दु:खी असतील तर आमच्यापैकी कोणी एक कसा काय बरे आनंदी होऊ शकेल?'' :-)

(उबुंटूबद्दल आणखी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy) येथे उपलब्ध आहे. चित्र आंतरजालावरून साभार)

Friday, May 04, 2012

'हा भारत माझा' चित्रपट प्रीमियर वृत्तांत

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा. 






''हा भारत माझा'' चित्रपटाच्या मायबोलीकरांसाठी खास आयोजित केलेल्या खेळाला मला काही कारणाने जायला जमले नव्हते, पण चित्रपट बघायची इच्छा मात्र होती. काल सायंकाळी ३ मे रोजी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रीमियरला मायबोली तर्फे जायला मिळते आहे याचाही आनंद मनात होताच! तिथे पोचल्यावर अगोदर अरभाटाला फोन लावला. अन्य कोण मायबोलीकर खेळाला उपस्थित राहणार आहेत त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी आजूबाजूला उभ्या बर्‍याच लोकांकडे बघत 'हा कोणता आयडी असेल?' असा विचार करत अल्पसा टाईमपास केला. थोड्याच वेळात अरभाटाला भेटून व प्रवेशिका हाती घेऊन मी अन्य काही प्रेक्षकांसमवेत स्क्रीन क्रमांक ४ कडे कूच केले.


दारातच एका गोबर्‍या गालाच्या छोट्या मुलाने आमचे एक सुंदर बुकमार्क देऊन स्वागत केले. नंतर कळले की तो चित्रपट अभिनेत्री रेणुका दफ़्तरदार यांचा सुपुत्र होता. त्या बुकमार्कवर एका बाजूला कबीराचा चित्रपटात झळकलेला दोहा व दुसर्‍या बाजूला 'हा भारत माझा' चित्रपटाच्या कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींचे नामनिर्देश होते. कबीराचा तो दोहा वाचताच मन प्रसन्न झाले.


प्रेक्षक व निमंत्रितांमध्ये काही चंदेरी पडद्यावरचे ओळखीचे चेहरे तर काही सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे चेहरे दिसत होते. लवकरच चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली. ह्या 'झीरो बजेट' चित्रपटाची कल्पना अण्णा हजारेंच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशी स्फुरली, काय निमित्त झाले, मान्यवर कलाकारांनी - तंत्रज्ञांनी कशा तारखा दिल्या, मदतीचे पुढे झालेले हात, नंतरची जुळवाजुळव यांबद्दल सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, कथालेखिका, पटकथाकार व संवादलेखिका सुमित्राताई भावे यांसह चित्रपटातील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ तसेच किर्लोस्कर कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवर बोलावून त्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांचे खस अत्तराची भेट देऊन स्वागत केले गेले. कलाकारांपैकी उत्तरा बावकर, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, मदन देवधर यांसह चित्रपटात इतर छोट्यामोठ्या भूमिका केलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मायबोली.कॉमचा व मायबोलीतर्फे केल्या गेलेल्या मदतीचाही विशेष उल्लेख सुनील सुकथनकरांनी आवर्जून केला.


सुरुवातीलाच राष्ट्रगीताची धून व त्या जोडीला भारताच्या सीमाप्रांतातील लष्करी ध्वजवंदनाच्या चित्रणाने मनात देशाबद्दल व देशसैनिकांबद्दल जे काही उचंबळून आले त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे. नंतर कविता खरवंडीकरांनी गायलेला कबीराचा दोहा जणू पुढे उलगडत जाणार्‍या चित्रांची पूर्वकल्पनाच देतो. चित्रपटाची कथा येथे देत नाही. परंतु अगदी कोणत्याही मध्यम वर्गीय घरात घडू शकेल असे हे कथानक आहे. त्यात तरुण पिढी व जुन्या पिढीच्या समोरील व्यावहारिक व मानसिक आव्हाने आहेत. स्वार्थ मोठा की कोणाला न दुखावता, भ्रष्टाचार न करता साधलेला आनंद मोठा यावर कोणत्याही कुटुंबात घडतील अशा घटनांमधून साकारणारी कथा आहे. एकीकडे अण्णा हजारेंनी छेडलेले भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी अहिंसक आंदोलन, जगात अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उमटलेले त्याचे जगव्यापी पडसाद, प्रसारमाध्यमे - सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून घरांघरांमधून पोचलेले हे आंदोलन, त्यातून झडलेल्या चर्चा, ढवळून निघालेली मने, शहरी लोकांबरोबरच ग्रामीण जनतेचा सहभाग, भ्रष्टाचाराला कंटाळलेली आणि सरावलेली मने व या सर्वांचे टीव्ही फूटेज या सर्व घटनांचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. त्यातूनच चित्रपटाचे कथानक पुढे सरकत राहते. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घडामोडी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर उभे राहिलेले प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यातून निर्माण होणारे मानसिक आंदोलन - द्वंद्व यांचा जो मेळ घातला आहे तो खरोखरीच उत्तमपणे मांडला आहे. विक्रम गोखले व उत्तरा बावकर ज्या सहजतेने वावरतात त्यामुळे त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तीच गोष्ट चित्रपटातील इतरही कलाकारांची म्हणावी लागेल. जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार यांचे अभिनय हे अभिनय न वाटता अतिशय स्वाभाविक वाटतात. कोठेही दे मार मारामारी, अंगावर येणारी गाणी, संवाद, चित्रे न वापरता आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शैलेश बर्वेंनी दिलेले संगीतही चित्रपटात बेमालूमपणे मिसळून जाते. किशोर कदम व दीपा लागूंच्या छोट्याच परंतु प्रभावी भूमिका लक्षात राहणार्‍या आहेत व त्यांनी त्या नेहमीच्याच सफाईने वठविल्या आहेत.


दोन तासांचा हा चित्रपट प्रत्येक भारतवासियाने पाहावा असाच आहे. चित्रपटाला सबटायटल्सही आहेत, त्यामुळे अमराठी लोकांनाही तो सहज समजू शकेल. यातील भाषा आपल्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटात मांडली गेलेली मानसिक आंदोलने, द्वंद्व, प्रश्न, वातावरण आपणही रोजच्या जीवनात कोठे ना कोठे अनुभवत असतो. त्यामुळेच जो संदेश चित्रपटाच्या शेवटच्या भागात कथानकातून समोर येतो तो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करायला लावतो. पर्याय शोधायचा प्रयत्न करायला लावतो. भ्रष्टाचाराचा विरोध हा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातून सुरू केल्याशिवाय पर्याय नाही - तसे केले तरच हा लढा सार्थ होईल - भ्रष्टाचार करणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो सहन करणे हाही एक गुन्हा आहे याची जाणीव ज्या सहज सूक्ष्मतेने चित्रपटातून प्रसारित केली आहे त्याची दाद देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी बघावा व इतरांना दाखवावा.


इतका सुंदर चित्रपट पाहायला व अनुभवायला मिळाल्याबद्दल मायबोलीचे व मायबोलीच्या माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार! :)

Saturday, July 30, 2011

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत


वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)


कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.
कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.
कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?
१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)
२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.
३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.
४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!
५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.
६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.
७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.
८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.
९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.
१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)
आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.
त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी
काय करावे?
१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.
२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.
३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.
४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.
५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.
६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.
७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.
८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.
९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.
१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.
काय करू नये?
१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.
२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.
३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.
४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.
५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.
६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.
७. परदेशांत लग्न करणे टाळा.
८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.
९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.
१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.
११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.
१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.
१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.
१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.
परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :
http://moia.gov.in/writereaddata/pdf/list_indian_women.pdf

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :
तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?
१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.
२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.
३. कारवाई
अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.
आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.
इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.
तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :
क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.
संपर्क तपशील :
Contact for NRI Marriages Case
Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002
Telephone Numbers :             +91 - 11 - 23234918      
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

धन्यवाद!
-- अरुंधती
माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx
(छायाचित्र विकीवरून साभार)

Monday, May 24, 2010

महिला कारागृहात काही तास

(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)

आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या  बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त! आणि त्याच दिवशी एका कैदी स्त्रीने आवारातील दुरुस्ती-कामासाठी आणलेली बांबूची शिडी वापरून जेलच्या भिंतीवरून उडी टाकून पळून जायचा असफल प्रयत्न केला होता - त्यामुळे चालू असणारा गदारोळ होता तिथे. शिवाय त्या बाकी कैद्यांच्या निर्विकार नजरा. 

स्थळ होते पुण्याच्या येरवड्याच्या महिला तुरुंगाचे. वेळोवेळी काही प्रसिद्ध तर काही कुख्यात व्यक्तींमुळे येरवडा तुरुंग कायमच चर्चेत राहिला. पुणे शहराकडून येरवड्याला जाताना रस्त्याच्या एका बाजूला दिसणारी त्याची काळीकभिन्न, छाती दडपविणारी उंच तट-भिंतच मी आतापर्यंत पाहत राहिले. पण कधी आतही डोकावेन असे स्वप्नात वाटले नव्हते.

एका आंतरराष्ट्रीय महिला क्लबच्या पुणे शाखेने मला एका समाजसेवी संस्थेमार्फ़त येरवड्याच्या महिला तुरुंगात तेथील कैद्यांसमवेत सत्संग करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. जवळपास दोन-तीन वर्षांपूर्वीची, म्हणजे महिलांसाठी ''खुल्या कारागृहाची'' सुविधा उपलब्ध होण्याअगोदरची ही घटना. माझ्याबरोबर इतर गायक कलाकार, वाद्यवृंद व संस्थेचे दोन-तीन स्वयंसेवक होते. 

त्या दिवशी भर दुपारी गाडीतून तुरुंगाच्या आवारात, रणरणत्या उन्हात पाऊल टाकल्यावर काही क्षण आम्ही अक्षरशः भाजून निघालो. हवेत विलक्षण उकाडा. पण तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी लेडीज क्लबच्या हसऱ्या सदस्या आमच्या स्वागताला सज्ज असलेल्या पाहून छान वाटले. ह्या सदस्या गेले अनेक महिने महिला कैद्यांसाठी तुरुंगात उपक्रम राबवित असल्याने तेथील वातावरणाला सरावल्या होत्या. स्त्री कैद्यांसाठी सतत काही ना काही चांगले करण्याच्या त्यांच्या धडपडीचे खरेच कौतुक करावेसे वाटत होते. सुरुवातीची काही मिनिटे आम्ही तेथील सुरक्षा कर्मचारी, तुरुंगात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भेटीदाखल येणाऱ्या समाजसेवा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व सेवाकार्यासाठी नेहमी येणाऱ्या महिला क्लबच्या सदस्या यांच्याशी बोलून कैद्यांविषयी माहिती घेण्यात घालवला. 

येथील बऱ्याचशा महिला ह्या 'अंडरट्रायल' आहेत हे समजले. म्हणजे त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत व त्यांच्यावरचे दावे कोर्टात चालू आहेत.  त्यामुळे त्या कैद्यांच्या संख्येत रोजच भर किंवा घट होत असते. काहीजणींना जामीन मिळतो,  काहीजणींना जामीन मिळूनही त्याचे पैसे भरता न आल्याने पुन्हा तुरुंगातच राहावे लागते. बऱ्याचजणी विवाहितेचा छळ, मारामारी,चोऱ्या -दरोडे आणि अन्य किरकोळ गुन्ह्यांमध्ये अडकून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. खुनाच्या किंवा गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेल्या महिला खूपच कमी आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणार्‍या महिलांचे पुनर्वसन हीदेखील मोठी समस्या असल्याचे कळले. घरचे, नातेवाईक, गावातले लोक त्यांना अनेकदा स्वीकारत नाहीत. मादक पदार्थ बाळगणे - सेवन करणे इ. इ. आरोपांवरून काही परदेशी महिलाही आत आहेत. अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले.  तसेच दुसऱ्याच कोणी गुन्हा करून हकनाक गुन्ह्यात गोवलेल्या महिलाही येथे बऱ्याच आहेत. खूपशा महिला ग्रामीण भागातील असून त्यांचे फारसे शिक्षणही झालेले नाही. बाळंत झालेल्या किंवा ज्यांची मुले अगदी लहान आहेत त्या महिलांना येथे आपल्यासोबत आपली मुले ठेवण्याची मुभा असते. त्या मुलांच्या राहण्या-खाण्या-कपड्यालत्त्याचा, औषधाचा व शिक्षणाचा खर्च सरकार करते.  

सुरक्षा तपासणी वगैरे उरकून, सोबतच्या चीजवस्तू पहाऱ्याकडे सोपवून, रजिस्टरवर सह्या ठोकून आम्ही त्या अरुंद (बरोबर! अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशा) छोट्या दरवाज्यातून आपापली डोकी सांभाळत आत शिरलो. सोबत महिला सुरक्षा कर्मचारी होत्याच, त्यांच्या हातात मस्त दंडुकेही होते. आवारात ह्या खेपेस कोणी महिला कैदी दिसत नव्हत्या. बहुतेक सगळ्याजणी सत्संगाच्या ठिकाणी जमल्या असाव्यात किंवा आपापल्या केसेससाठी कोर्टात गेल्या असाव्यात.

जाता जाता आम्हाला एकांत कोठड्यांचेही दर्शन झाले. तिन्ही बाजूंनी भिंती, कोणतीही प्रायव्हसी नसलेल्या, एक बाजू पूर्ण जाळी व गजांनी आच्छादित बंदिस्त अशा स्वरूपाच्या त्या अरुंद, चौकोनी, अंधाऱ्या खोल्या बघताना उगाचच अंगावर शहारा आला. आवारातल्या झाडाझुडुपांच्या मधून काढलेल्या पायवाटेने जात आम्ही सत्संगाच्या ठिकाणी पोचलो. पत्र्याचे छत असलेली ही एक लांबलचक खोली. खिडक्यांना भरभक्कम गज. आत शिरायला एकच दरवाजा आणि तोही छोटासा. गेल्या खेपेस आले होते तेव्हा ही फक्त पत्र्याची शेड होती. आता तिथे पक्के काम करून महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्याची सोय केलेली दिसत होती. खोलीच्या एका कोपऱ्यात सरकावून ठेवलेली शिवण- विणकाम यंत्रे, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्यांवरचे दीनवाणे कपडे बरेच काही सांगून जात होते.  समोर साधारण दीडशे-दोनशे महिला कैदी शिस्तीत सतरंज्यांवर आमची वाट बघत बसलेल्या. ''साऊंड''वाल्याची सर्व सेटिंग्ज पूर्ण होईपर्यंत तेथील स्टेजवर आम्ही वाद्यांची जुळवाजुळव केली. एका स्वयंसेवकाने लिलीच्या फुलांचा भरघोस, टवटवीत हार आणला होता. तो तेथील वेदीवरील सर्वधर्मीय ईश्वर प्रतिमांना एकत्रितपणे घातल्यावर त्या काहीशा कोंदट, घामेजल्या हवेत चैतन्याचा दरवळ पसरला.

ध्वनिक्षेपक सुरू होताच मी सर्वांना सत्संगात सामील होण्याचे आवाहन केले. समोरून ढिम्म प्रतिसाद. अर्थात ते अपेक्षित होतेच! सर्व बायका कोऱ्या, उखडलेल्या चेहऱ्यांनी बसलेल्या. एक डोळा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर व एक आमच्यावर. साहजिकच होते म्हणा.... त्या सगळ्याजणी दाटीवाटीने भर उकाड्यात आमची वाट पाहत बसलेल्या. त्यातून वॉर्डनचा व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा टरका डोळा आणि दुसरीकडे मनातली धुसफूस... त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे होते.

मी काही क्षण डोळे मिटले, मनातले सर्व विचार समर्पित केले आणि शांत मनाने सत्संगाची सुरुवात नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या गणेशवंदनेने केली. तबला, गिटार, सहगायकाचे व टाळाचे स्वर एकमेकांमध्ये मिसळून वातावरणात उत्साहाची पेरणी करत होते. पण अजून समोरून थंड प्रतिसाद होता. नाही म्हणायला बऱ्याच बायका हात जोडून बसल्या होत्या किंवा तालावर टाळ्या वाजवत होत्या. पण चेहरे व देहबोली अजून तशीच होती... आखडलेली, आक्रसलेली. त्या गणेश भजनाचा समारोप केल्यावर मी पुन्हा एकदा सर्व महिलांना माझ्या बरोबर, चुकत माकत का होईना, गाण्याचे आवाहन केले. संगीताच्या सुरांमधील मन हलके करण्याची जादू त्यांनी अनुभवावी, काही क्षण साऱ्या चिंता बाजूला ठेवून गाण्यात स्वतःला मुक्तपणे झोकून द्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटत होते.  

येथे सर्व धर्मांच्या स्त्रिया होत्या. म्हणूनच नंतरचे भजन सर्व-धर्म-समावेशक घेतले. अल्लाहचे नाव आल्यावर पुढे बसलेल्या तिघी-चौघींच्या कळ्या खुलल्या आणि त्या जरा मोकळेपणाने टाळ्या वाजवू लागल्या. बुद्धाचे नाव येताक्षणी अजून काही चेहरे उजळले. विठ्ठलाचे नाव आल्याबरोबर नऊवारी, पाचवारीतल्या, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक  महिला कैदी जोषाने टाळ्या वाजवू लागल्या. जीझसचा पुकारा करताक्षणी सहाव्या-सातव्या ओळीत बसलेल्या तीन-चार आंग्ल युवती डोलू लागल्या. थोडक्यात काय, समोरच्या श्रोत्यांमध्ये आता थोडा उत्साह दिसू लागला होता. काहीजणींच्या चर्येवर अस्फुटसे स्मितही उमटले होते. त्यांच्या त्या स्मितानेच मला अजून ऊर्जा मिळत होती.

मग पुढेही आम्ही म्हणायला सोपी, वेगवान, नादपूर्ण भजने गाऊ लागलो. सुरुवातीला गाताना संकोच करणाऱ्या बायका हळूहळू भीड चेपली जाऊन खुलेपणाने गाऊ लागल्या होत्या. मध्येच दोन-तीन बायका खोलीच्या मागच्या बाजूला उभ्या राहून भजनाच्या तालावर डोलू-नाचू लागल्या. विठ्ठलाचे भजन सुरू झाल्यावर तर चित्रच पालटले. डोळे मिटून, तालावर पावले टाकणाऱ्या महिलांना अजून काहीजणी सामील झाल्या. त्यांचा नाच फेर धरून  जसजसा रंगात येऊ लागला तसतशा त्या आंग्ल युवतीही उठून त्यांच्या परीने ठेका धरत नाचू लागल्या. आता माझ्या समोर बसलेल्या बायकांनाही हुरूप आला. आपापल्या साड्या झटकत, पदर खोचून त्यातील काहीजणी फुगडी, काहीजणी झिम्मा खेळू लागल्या. एका वेळी दोन-दोन, तीन-तीन जोड्या फुगड्या खेळत होत्या. कोणाचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने वातावरण खेळकर बनले. झिम्मा खेळताना त्यांचे चेहरे फुलून आले होते. चुरशीच्या फुगडीत त्यांना शरीर झोकून मस्त रममाण होताना पाहून त्याच का त्या मगाच्या निर्विकार-कोऱ्या चेहऱ्यांच्या, सुन्न बसलेल्या किंवा खुन्नस देऊन पाहणाऱ्या बायका, असा प्रश्न कोणालाही पडला असता. बघता बघता काही तुरळक कैद्यांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व बायका नाचू, गाऊ लागल्या होत्या. चेहर्‍यावरच्या रागाची, नैराश्याची, असमाधानाची जागा आता प्रफुल्लित खेळकरपणाने घेतली होती. काहीजणी डोळे मिटून तल्लीन होऊन एकट्याच नाचत होत्या. गतिमान गाण्यांसोबत त्यांची पावलेही थिरकत होती. 

वेळ संपत आली तशी हळूहळू गाण्यांची गती मंदावत आम्ही भजने थांबविली. सर्वांना डोळे मिटून शांत बसायला सांगितले. धपापत्या उरांनी, घामाने डवरलेल्या चेहऱ्याने स्थानापन्न होत सर्व बायकांनी आज्ञाधारकपणे डोळे मिटले आणि आपला श्वास सावरायची वाट पाहू लागल्या. काही बायका अजूनही टक्क, साशंक डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होत्या. डोळे बंद करायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. मी सर्वांना आपल्या श्वासाकडे लक्ष घेऊन जायला सांगितले. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा अनुभवायला सांगितली. त्यांचे एक छोटेसे, मन शांत करणारे ध्यान घेतल्यावर त्यांना जेव्हा डोळे उघडायला सांगितले तेव्हा कित्येकींच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा उमटल्या होत्या. जणू त्या काही मिनिटांमध्ये निर्व्याज समाधानाचा सुगंधी दरवळ त्यांनी अनुभवला होता! 

.....  पण वास्तवही वेगळे असते! सत्संग संपल्याचे सूचित केल्यावर महिला क्लबच्या सदस्यांनी माईकचा ताबा घेतला. तेथील स्त्री कैद्यांच्या छोट्या मुलांसाठी त्यांनी नव्या कोऱ्या, फुगे - झिरमिळ्या लावलेल्या तीन-चाकी सायकली आणल्या होत्या. सायकली पाहिल्यावर एवढा वेळ बाहेर दंगा करणारी ती छोटुकली मुले हरखून गेली. कोण सायकलवर पुढे बसणार, कोण मागे ह्यावर त्यांच्यात चढाओढच सुरू झाली. एव्हाना सुरक्षा कर्मचारी पुढे सरसावल्या  होत्याच... तरीही त्या कैद्यांपैकी आठ-दहाजणी लाजत, एकमेकींना ढकलत पुढे येऊन कार्यक्रम आवडल्याचे सांगून गेल्या. आंग्ल युवतींमधील एकजण धिटाईने पुढे आली आणि ती भायखळा तुरुंगात असताना, मनातली आशा पूर्ण तुटत चालली असताना तिथे झालेल्या अशाच सत्संगाने तिला कसा मानसिक आधार दिला होता ते व आजचा सत्संग आवडल्याचे सांगून गेली. आमच्याकडे येणाऱ्या महिलांची गर्दी वाढल्यावर सुरक्षा कर्मचारी दंडुके परजत पुढे आले. मग लगेच पांगापांग! आमच्यात व महिला कैद्यांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक फळीच उभी राहिली. आता कटायची वेळ आली होती. संयोजक व वॉर्डनसकट इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अनौपचारिक आभार मानून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर मुलांचा नव्या सायकली पादडण्याचा व आनंदाने चित्कारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. त्यांना ह्या तुरुंगाबाहेरचे जग माहीत होते की नाही, कोणास ठाऊक!  

तुरुंगाच्या बाहेर पडलो तसे एवढा वेळ संपर्क तुटलेले बाकीचे सामान्य जग पुन्हा पुकारू लागले. निघण्यासाठी गाडीत मी बसते न बसते तोच मोबाईल खणखणला. ''किती वेळा ट्राय केला तुझा मोबाईल, पण कॉल लागतच नव्हता! '' पलीकडून माझी मैत्रीण ठो ठो करत होती, ''कुठे आहेस? काय करत होतीस? '' गाडीतल्या माझ्या सहकारी मित्रांकडे एक मिष्किल कटाक्ष टाकून मी सहज उत्तरले, ''काही नाही गं, येरवडा जेलमध्ये होते जरा... पण पोचते आहे घरी अर्ध्या-पाऊण तासात, तेव्हा बोलू! '' तिला पुढे काही बोलू न देता मी फोन बंद केला आणि बाकीच्यांच्या हास्यात सामील झाले! मनात समाधानही होते आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचा आनंदही..... आज काही काळासाठी का होईना, त्या कैद भोगत असलेल्या स्त्रिया आपले सर्व राग, लोभ, मत्सर, चिंता, नैराश्य विसरून संगीत-नृत्यात आनंदाने तल्लीन झाल्या होत्या. त्यांना मोकळेपणाने हसताना, खेळताना आणि आपल्या मुलांच्या आनंदाने हरखून जाताना पाहूनच मन भरून आले होते. ईश्वराकडे त्यांना आयुष्यात योग्य मार्ग सापडून त्यांची घडी पुन्हा एकवार बसावी आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.

-- अरुंधती