Saturday, October 29, 2011

बंड्याची दिवाळी


आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.

किंचित सुटलेलं पोट ढगळ टी-शर्ट व जीन्सच्या आड लपवत 'शर्मा स्वीट्स'च्या बाहेर उभा असलेला बंड्या पाहून मी त्याला जोरदार हाळी दिली, ''काय बंड्या, काय म्हणतोस? '' (दचकू नका, मला अशी सवय आहे रस्त्यात जोरदार हाळी द्यायची!! ) बंड्याने हातातली सिगरेट घाईघाईने चपलेखाली चुरडली आणि ओळखीचे हसत माझ्या समोर आला, ''कायऽऽ मग!! आज बर्‍याच दिवसांनी!!''
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी  झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्‍याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान,  पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.

''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )

पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''

''आँ?? .... म्हणजे रे काय? ''

''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''

''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''

''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''

''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''

''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्‍या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''

''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''



''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''

''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''

''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.

''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''

''आणि बाकीचा दिवस?''

''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''



''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''

''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''

''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''

''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अ‍ॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''

''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''

''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्‍या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''

''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''

''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''

बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....

बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.

एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?

बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....

मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?

कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ?  त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?  

कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''

काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्‍हास'' होतो? आणि र्‍हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्‍या व मनःपटलावर आदळणार्‍या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!

मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्‍यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....

इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?

बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!

-- अरुंधती

Friday, October 21, 2011

श्रुतिकेची गोष्ट



''चला चला, लवकर आटपा बरं जेवणं.... आज श्रुतिका आहे नं?'' आजीने वेगळी आठवण करून दिली नाही तरी दर मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे रेडियोवरच्या श्रुतिकेचे वार हे समीकरण कितीतरी वर्षे माझ्या मनात पक्के घर करून होते.

ही गोष्ट आहे साधारण १९८२ ते १९९० च्या काळातील. कदाचित त्याही अगोदर पासून नभोवाणीवर श्रुतिका अस्तित्वात असाव्यात. परंतु १९८२ मध्ये आमचा जुना, खटारा, धूळ खात पडलेला व फेंदर्‍या मिशांच्या झुरळांचे वसाहतस्थान बनलेल्या लाकडी अंगकाठीचा रेडियो एकदाचा निकालात निघाला व त्याजागी जुना ट्रान्झिस्टर आला. या नव्या काळ्या चौकोनी डब्यातून कर्कश खरखरीऐवजी सुमधुर आवाजातील गाणी आम्हाला पहिल्यांदाच ऐकू येऊ लागली. सकाळी उठल्यावर चिंतन मालिका आणि अभंगवाणी ऐकायची जशी सवय झाली तशीच मंगळवार व शुक्रवारच्या श्रुतिकेचीही चटक आपोआप लागली.


आजीला ही श्रुतिका स्वरूपातील मराठी नभोनाट्ये विशेष आवडायची. श्रुतिका ऐकायची म्हणून सायंकाळचे बाकीचे सारे कार्यक्रम ती लवकर उरकून घ्यायची. सायंकाळचा बाहेरचा फेरफटका, स्तोत्रवाचन, देवाला उदबत्ती - निरांजन आणि जेवण हे त्या दिवशी लवकर होईल या बेताने तिचे काम चालू असायचे. जेवणे झाली की थोड्या शतपावल्या घालायच्या आणि मग रेडियोवर आकाशवाणी केंद्राचे प्रक्षेपण लावून ठेवायचे. त्याच दरम्यान घाईघाईने अंथरुणेही घातली जायची. गाद्यांवर घातलेल्या चादरींना जराही सुरकुती पडली की इतर वेळेला आजीच्या कपाळालाही चुण्या पडायच्या. चादरीला चारही टोकांनी ओढून ठीकठाक खोचल्याशिवाय गादी प्रकरणातून आमची सुटका नसे. परंतु मंगळवार, शुक्रवारच्या मुहूर्ताला त्या काटेकोरपणातून आम्हाला सवलत मिळत असे. मग सुर्रकन चादरी घातल्या जात, त्यांवर दणादण उशा आदळत, पांघरुणांची घडी विस्कटण्याची पर्वा न करता ती नेम धरून गादीच्या पायथ्याच्या दिशेने हवेत उड्डाण करत. आमचे माकडचाळे आजी त्या दिवशी शांतपणे सहन करत असे. श्रुतिका सुरू झाल्यावर कोणी मधूनच उठवायला नको यासाठी आमची सारी धडपड असे. मोठी माणसेही त्यात सामील असत. आयत्या वेळी रेडियो स्टेशनचे प्रक्षेपण नीट ऐकू येण्यात काही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून श्रुतिकेअगोदरच दहा-पंधरा मिनिटे त्याला सुस्थानी प्रस्थापित करून श्रुतिकेअगोदर लागणार्‍या जाहिराती, बातम्या इत्यादींना भक्तिभावाने ऐकले जाई. आणि एरवी त्याच कार्यक्रमांचा त्रास होणारी आजी तेव्हा श्रुतिकेच्या प्रतीक्षेत ते सारे 'व्यत्यय' निमूट सहन करायची.

एकदा श्रुतिका सुरू झाली की रेडियोचा आवाज मोठा व्हायचा. त्या नाट्यातील शब्द अन् शब्द कळावा यासाठी कानांत अगदी प्राण आणून कथानक ऐकले जायचे. आजीच्या पुढ्यात कोणतीतरी भाजी निवडायला असायची किंवा तिने शनिवारी करायच्या बिरड्या सोलायला घेतलेल्या असायच्या. हातातून सटकणार्‍या व खोलीत चहूदिशांना उड्डाण करणार्‍या बुळबुळीत सालीच्या बिरड्यांनाही ती त्यावेळी गोळा करायला जायची नाही. एकीकडे हात झपाझप चालू तर दुसरीकडे सारे लक्ष त्या श्रुतिकेतून उलगडणार्‍या नाट्याकडे! एखादा अवघड, दु:खी किंवा नाट्यमय प्रसंग असला की आजीच्या सोबत आमचेही श्वास रोखले जात. एखादा गूढ, रहस्यमय प्रसंग असेल तर आमच्या हृदयाचे ठोकेही वाढलेले असत.

तो काळ कृष्णधवल दूरदर्शनचा होता. आमच्याकडे नुकताच टी. व्ही. संच खरेदी झाला असला तरी रेडियोची सर तेव्हाच्या टी.व्ही. ला येणे शक्यच नव्हते! रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत साथसोबत करणारा रेडियो कोठे आणि सकाळ- संध्याकाळी मर्यादित प्रक्षेपण असणारा टी.व्ही. कोठे! विविधभारतीवरील 'बेला के फूल', 'छायागीत', 'आप की फर्माइश' कार्यक्रम जितके जिव्हाळ्याने ऐकले जायचे तितका स्नेह, जिव्हाळा टी.व्ही. बद्दल उत्पन्न होणे अजून बाकी होते. बाहेर नाट्यगृहांत जाऊन तिकिटाचे पैसे भरून नाटके पाहावीत असे वातावरण घरी नव्हते. शाळेला सुट्टी लागली की मगच आमचे पालक आम्हाला सिनेमा, सर्कस आणि बालनाट्य दाखवत असत. त्यामुळे नभोनाट्य किंवा श्रुतिका हा रेडियोवर आठवड्यातून दोनदा सादर केला जाणारा कार्यक्रम आमच्यासाठी मनोरंजनाची पर्वणी असे.  

किती तरी सुंदर सुंदर श्रुतिका या काळात आम्ही अगदी तन्मयतेने ऐकल्या. एकच कलाकार तरुण, मध्यमवयीन व म्हातार्‍या व्यक्तीचे आयुष्याच्या विविध टप्प्यांमधील संवाद म्हणतो हे तेव्हा आम्हाला कोणी सांगितले असते तरी ते आमच्या मनांना पटले नसते. श्रुतिका ऐकताना आम्ही कथानकात रंगून तर जातच असू. पण मग त्याच वेळी बरेच प्रश्नही पडायचे. एका वेळी रेकॉर्डिंग स्टुडियोत एवढे सगळे लोक कसे काय मावत असतील? ते पार्श्वसंगीत वाजवणारे कलाकार पण त्यांच्या शेजारीच बसले असतील का? या लोकांना कार्यक्रम करून घरी जायला कित्ती उशीर होत असेल, नाही का? वगैरे वगैरे. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण अगोदर केलेले असू शकते यासारख्या गोष्टी तेव्हा आमच्या ध्यानी-मनीही नसत. हो, आणि त्याच बरोबर बालसुलभ शंकाही असायच्या जोडीला. 'त्यांना मध्येच शिंक आली किंवा ढेकर आली तर ते काय बरं करत असतील?', 'मध्येच वीज गेली तर मग त्यांचा कार्यक्रम बंद पडेल का?' अशा शंकांनी मने आशंकित झाली तरी श्रुतिकेत व्यत्यय येऊ नये म्हणून गप्प बसत असू. कलाकारांची नावे श्रुतिकेत सर्वात शेवटी सांगत असत. ती नावे जाहीर झाली की, ''हां, मला वाटलंच होतं हं, अमक्यातमक्याची भूमिका तेच करत असणार म्हणून! काय सुरेख म्हणतात ना ते संवाद!'' वगैरे डायलॉग्जही चालायचे.

माझ्या आजोबांना खरे तर श्रुतिका ऐकायला आवडत असावे. परंतु वरकरणी मात्र ते तसे दाखवत नसत. जणू काही आपला त्या श्रुतिकेशी संबंधच नाही अशा थाटात त्यांच्या आवडत्या खुर्चीत ते नजरेसमोर वर्तमान-पत्र धरून बसलेले असत. पण रेडियोच्या आवाजाची पातळी जरा कमी झाली की त्यांची, 'जरा आवाज वाढव गं!' ची सूचना आजी गालातल्या गालात हसत अमलात आणत असे. त्या काळात चुकून त्यावेळी जर कोणी पाहुणे घरी आले तर स्वाभाविकपणे आम्ही रेडियोचा आवाज कमी किंवा बंद करत असू. पण मग रात्रभर आणि दुसर्‍याही दिवशी श्रुतिकेतील नाट्यात नंतर काय घडले असेल याची चुटपूट लागून राहायची. अनेकदा त्या नाट्यांचे विषय प्रौढांसाठीचे, धीरगंभीर असत. आम्हाला बालवयाच्या श्रोत्यांना ते झेपत नसत. मग श्रुतिका संपली रे संपली की आमची आजीच्या डोक्याशी भुणभूण सुरू होई.... ''आजी, अमक्या शब्दाचा अर्थ काय गं?'' ''आजी, तो बुवा असं का म्हणत होता गं?'' ''ए आजी, ती बाई अशी विचित्र का रडत होती गं?'' एक ना दोन.

आजी आपली कशीबशी आमच्या प्रश्नांना तिला जमेल तशी उत्तरे द्यायची, आणि फारच निरुत्तर झाली की, ''चला, झोपा आता! फार प्रश्न विचारत बसता!'' म्हणून रागावायची. कधी तिने तिच्या आवाक्यातील उत्तर दिले तरी आमच्या मनाचे समाधान व्हायचे नाही. मग झोपाळलेल्या डोळ्यांनी अंथरुणावर पडल्या पडल्या त्याबद्दल विचार करताना कधी तरी झोप लागायची.

एखाद्या रात्री श्रुतिकेचा विषय गूढ, रहस्यमय, भय उत्पन्न करणारा असेल तर मग त्या रात्री मला अंधाराचीही भीती वाटायची. ''ए आजी, आज छोटा दिवा तसाच राहू देत ना!'' म्हणून तिला गळ घालण्यापासून ते रात्रीतून बाथरुमला जायचे झाल्यास तिला बिचारीला झोपेतून जागे करून बाथरुमच्या दारापर्यंत सोबत करायला सांगण्यापर्यंत सर्व प्रकार चालायचे. पण दुसर्‍या दिवशी आजीने इतरांसमोर हसत हसत त्याविषयीचा उच्चार केला की नाकाच्या शेंड्यावर भला थोरला राग मात्र यायचा!

आजी-आजोबा वर्षातून दोन-तीनदा आमच्या गावी राहायला जायचे. एकदा तिथे गेले की साधारण महिनाभर मुक्काम असायचा त्यांचा तिथे. जाताना ते सामानात घरातील तो एकुलता एक ट्रान्झिस्टर सोबतीला घालून न्यायचे. ते दोघे घरी नसले की आम्हा लहान मंडळींना मनसोक्त दंगा करता यायचा. पण मग दर मंगळवारी व शुक्रवारी आजीची, रेडियोची व श्रुतिकेची खूप खूप आठवण यायची. आजोबांच्या देहान्तानंतर आजी एकटीच गावी जाऊ लागली. तेव्हाही तिच्या सोबतीला रेडियो असायचा. गावच्या शेणाने सारवलेल्या कौलारू घरात दिवेलागणीनंतर निजेस्तोवर कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याची मंद सुरातील साथ तिला निश्चितच आश्वस्त करत असणार!

पुढे पुढे दूरदर्शनचे प्रस्थ जसजसे वाढले तसतसा माझा श्रुतिका ऐकण्यातील उत्साह कमी होऊ लागला. दूरदर्शनवरील वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आकर्षण वाढू लागले. घरात टी.व्ही.चा आवाज वाढला आणि त्यापुढे रेडियोचा आवाज क्षीण झाला. पण आजीने शेवटपर्यंत रेडियोची साथ सोडली नाही. टी.व्ही.चा आवाज तिला नकोसा झाला की ती रेडियो अगदी कानाशी धरून श्रुतिका ऐकायची. तिला त्रास होत असला तरी ती आम्हाला त्याबद्दल काही बोलायची नाही. पण चपापून मग आम्हीच टी.व्ही.चा आवाज कमी करायचो. कधी तरी ती आदल्या दिवशीची श्रुतिका किती छान होती ते रंगून सांगायची. त्या वेळी आपण तिची श्रुतिका ऐकण्यात साथ-सोबत केली नाही म्हणून उगाचच मनात अपराधी वाटायचे.


आजीनंतर श्रुतिका ऐकणेही इतिहासजमा झाले. परंतु त्या काळात श्रुतिकेच्या रूपाने आम्हाला जे काही मिळाले त्याचे मूल्य अनमोल आहे.


श्रुतिका ऐकता यावी म्हणून एकत्र येऊन चटचट उरकलेली कामे, 'आज काय ऐकायला मिळणार' याविषयी उत्कंठा, एकही शब्द चुकू नये म्हणून कानांत प्राण आणून केलेले श्रवण, श्रुतिकेतील पात्रांच्या संवादांशी एकरूप होणे, सादरकर्त्यांच्या आवाजांवरून त्यांच्या वया-रूपाविषयी मनात बांधलेले अंदाज, समृद्ध कथांना त्या थोडक्या वेळात ताकदीने सादर करण्याचे कलावंतांचे कसब, काही गंभीर कथानकांना ऐकून मनात निर्माण झालेले द्वंद्व, अस्वस्थता, विचारचक्र.... या सर्वाची तुलना आता रिमोटवरच्या बटणासरशी शेकडो चॅनल बदलण्याची सुविधा असलेल्या अद्ययावत टी.व्ही.शी चुकूनही करवत नाही. शिवाय श्रुतिकेशी आमच्या नकळत आमचे बाल्य जोडले गेले. विविध भावबंध जुळले गेले. आता फक्त त्यांच्या रम्य आठवणी मागे उरल्या.      


-- अरुंधती

२०११ - मोगरा फुलला ई-दीपावली अंक: म्हणींच्या राज्यात

२०११ - मोगरा फुलला ई-दीपावली अंक: म्हणींच्या राज्यात

Tuesday, October 11, 2011

कोठे जाशी भोगा...!!


''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा....

''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा... आमच्या इथे लोक त्यांना देव मानतात देव!'' कार चालवत असलेले डॉक्टर पटेल मला सांगत होते. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या मिसेस पटेलने पुष्टी जोडली, ''आमचा हेल्थ क्लब त्यांच्याच मालकीच्या इमारतीत आहे.... उद्घाटनाला आले होते ना ते साहेब! माझा फोटो आहे त्यांच्याबरोबरचा.... आपण कार्यक्रम संपल्यावर घरी जाऊ तेव्हा दाखवेन हं तुम्हाला!''

कार्यक्रम... हो, मुंबईच्या एका टोकाला असलेल्या त्या उपनगरात आज सायंकाळी माझा कार्यक्रम होता. डॉक्टर पटेल व त्यांच्या सौभाग्यवती स्वागत समितीत होते. त्यामुळे माझी खातिरदारी करणे, ने-आण करणे वगैरे जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या भागात नव्यानेच राहायला आलेल्या पटेलांना त्यांच्या 'साहेबां'ची व त्यांच्या बंधूंच्या नानाविध उपक्रमांची जास्त काही माहिती नव्हती, आणि त्यांना ती माहिती करून देण्याची मला इच्छाही नव्हती. आम्ही कार्यक्रम-स्थळाच्या वाटेवर असतानाच मला ते होर्डिंग दिसले काय आणि मनात गतस्मृतींचे मोहोळ माजले.....

---------------------------------------------------------------------------

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील ती एक मेंगळट दुपार होती. आमच्या सीनियर वकील मॅडम मुंबईला गेल्याचे निमित्त करून मी व माझी मैत्रीण आवारातच एका बाजूला गप्पा टाकत उभ्या होतो. दुपारचा एखादा पिक्चर टाकावा की आमची बसंती गाडी उडवत कोरेगाव पार्कमधून चक्कर मारावी यावर गहन खल करत असतानाच अचानक आवारातील पोलिसांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचे दोघींच्या लक्षात आले. आजूबाजूला पक्षकार, वकील वगैरे मंडळींची नेहमीसारखीच कोंदट वर्दळ होती. पण खाकी वेषातील एवढ्या संख्येतील पोलिसमामा आता अचानक इथे या गर्दीत काय करत आहेत याबद्दलचे कुतूहल आम्हाला जाणवू लागले. कोणाला तरी विचारावे का, वगैरेवर मंथन करत असतानाच अचानक मैत्रिणीने माझ्या बाहीला खेचून मला एका बाजूला ओढले. दुसर्‍या सेकंदाला साध्या व खाकी वेषातील पोलिसांचा ताफा माझ्या अंगाला अगदी चाटून पुढे गेला. त्यांच्या खाड् खाड् बुटांच्या तालात त्या घोळक्याच्या बरोबर मधून चार-पाच व्यक्ती चालल्या होत्या त्यांनी आमचे लक्ष वेधले....



त्यातील एक व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. मोठमोठ्या केसेसमध्ये आपल्या बुद्धिचातुर्याच्या व युक्तिवादाच्या जोरावर आरोपींना निर्दोष सिद्ध करण्यात त्यांचा हातखंडा. गेली अनेक वर्षे त्यांनी हाताळलेल्या वेगवेगळ्या नामी केसेसमुळे त्यांचे मोठे नाव होते. पण आज तेही त्यांच्या शेजारून चालणार्‍या व्यक्तीशी काहीशा अदबीने हसत व बोलत होते. कोण होती ती व्यक्ती? सर्वसाधारण उंची व मध्यम बांधा... सावळा वर्ण.... पांढरे शुभ्र परिटघडीचे कपडे... गळ्यात रुळणारा सोन्याचा जाडसर गोफ.... चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर, बेदरकार भाव....चेहरा काहीसा ओळखीचा वाटत होता... तेवढ्यात आमच्या समोरून जाणार्‍या त्या घोळक्यात कशावरून तरी खसखस पिकली.... सोबतचे पोलिसही त्या हास्यात सामील झाले. पोलिस, वकील, आरोपी व आरोपीबरोबरचे त्याच्यासारख्याच शुभ्र सफेद कडक वेषातील साथीदार....!! माय गॉड! मला व मैत्रिणीला एकाच क्षणाला तो 'अहोऽसाक्षात्कार' झाला.......!!

''अगं, आजच पेपरात फोटो आलाय ना पहिल्या पानावर या माणसाचा...''
''ओह नोऽऽ.... यू मीन... टाडा... गँगवॉर???''
''येस, येस... टाडा कोर्टात केसची सुनावणी चालू आहे अशी न्यूज आली आहे पेपरात...''
''जायचं आपण?''
''काय वेड-बिड लागलं का? ते घेतील तरी का आपल्याला आत?''
''प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि आपण पण वकील आहोत.... आय मीन... होणार आहोत! आपण थोडीच त्यांना डिस्टर्ब करणार आहोत? चल, जाऊन बघूयात तरी....!!!''

चार लोकांचे रस्त्यावर भांडण चालू असले की त्यांच्या आजूबाजूला ज्या उत्सुकतेने बघ्यांचा गराडा पडतो अगदी त्याच सवंग उत्सुकतेने मी व मैत्रीण टाडा कोर्टाच्या दिशेने झेपावलो. जिन्यापाशी पावले पुन्हा एकदा थबकली. जावं की न जावं? सोडतील का आत? ओळखपत्र वगैरे विचारलं तर सरळ कॉलेजचं ओळखपत्र पुढं करायचं असं ठरलं आणि मग उसना धीर गोळा करत आम्ही दोघी टाडा कोर्टासाठी जी खोली राखून ठेवण्यात आली होती तिच्या दिशेने वळलो. खालच्या गर्दीचा कोलाहल इथे अजिबात जाणवत नव्हता. दगडी बांधकामाच्या पॅसेजमधील गारवा आज अंगावर शिरशिरी उमटवून जात होता....

खोलीच्या दाराशी दोन सशस्त्र पोलिस उभे होते. आम्ही त्यांच्याकडे न बघताच दडपून आत शिरलो आणि तिथेच खुळचटासारख्या उभ्या राहिलो.

खोलीतल्या मागच्या व मधल्या भागातील बहुतेक सर्व खुर्च्या आणि बाकडी भरलेली होती.... आरोपीच्या माणसांनी!! म्हणजे त्यांच्या बाजूला काही तशा पाट्या नव्हत्या लावलेल्या.... पण एकंदरीत वेषावरून ही माणसे नेहमीची वाटत नव्हती. आरोपीचे वकील व सरकारी वकील आपापल्या फायली, कागदपत्रे व सहकारी मदतनिसांशी बातचीत यांत गुंतले होते. त्यांच्या मागे दोन-तीन खुर्च्या रिकाम्या होत्या, पण तिथे बसायची तर आम्हाला बिलकुल इच्छा नव्हती. धडधडत्या छातीने त्या उग्र गर्दीकडे बघत असतानाच बेलिफाने न्यायाधीशांच्या आगमनाची वर्दी दिली. ते यायच्या आत आम्हाला जागा पकडायच्या होत्या.... कुठं बसायचं.... भिरभिरत्या नजरेनं सारी खोली न्याहाळताना आमच्या मागच्या बाजूने आवाज आला... ''आईये जी, यहाँ आकर बैठिये |'' बायकी आवाज? चमकून त्या दिशेने पाहिले तर खरोखरी एक चाळीशी ओलांडलेल्या बाई आम्हाला खुणेने बोलावत होत्या. पहिल्याच रांगेतील बाकड्यावर बसल्या होत्या त्या! त्यांच्या शेजारील व मागच्या बाकड्यावरची जागा रिकामी होती. हुश्श!!! आम्ही काहीही विचार न करता मुकाट त्या बाईंशेजारी जाऊन बसलो. अजून छाती धडधडत होती. जणू शर्यतीत पळाल्याप्रमाणे श्वास फुलला होता. तेवढ्यात न्यायाधीश महोदय आले... त्यांना अभिवादन करून पुन्हा खाली बसेपर्यंत मी व मैत्रिणीने डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्या बाईंना न्याहाळून घेतले.

त्यांचे वय नक्की कळत नव्हते. पण स्थूल शरीर, मेंदीचा कलप लावून तांबडे झालेले केस, अंगावर साधा परंतु किंमती, सुळसुळीत पंजाबी सूट, त्याच्यावरची लेसच्या कडांची नाजूक ओढणी, उंची पर्स, हाताच्या बोटांतील जाडजूड सोन्याच्या अंगठ्या... हे प्रकरण आमच्यासारख्या 'बघ्या'च्या वर्गातलं नव्हतं याची जाणीव होत असतानाच वकिलांनी बोलायला सुरुवात केली....

आमच्या मागच्या खुर्च्या व बाकड्यांवर दोन मुख्य आरोपी व त्यांचे साथीदार बसलेले होते. अगदी मोकळे ढाकळे. हातात बेड्या नाहीत, पायांत साखळदंड नाहीत, अंगावर जेलचे कपडे नाहीत.... पण त्यांच्या थंड थंड नजरा, चेहर्‍यावर कितीही उग्र बेपर्वाई असली तरी सावध देहबोली, मुख्य आरोपींचे अस्वस्थ चाळे, या सर्वांवर अलगद नजर ठेवून असलेले सफारी सुटामधील पोलिस, संथ लयीत चालणारे कोर्टाचे कामकाज, टंकलेखकांच्या टाईपरायटरमधून येणारा आवाज, डोक्यावरचे उंचच उंच छत व एका लयीत घरघरणारे पंखे, खिडकीतून येणारी गार वार्‍याची झुळूक....

कोणत्या तरी कारणामुळे त्या दिवशी काही मिनिटांसाठी कोर्टाचे कामकाज थांबले. न्यायाधीश त्यांच्या कक्षात गेल्यावर शेजारी बसलेल्या बाईंनी पर्समधून पाण्याची बाटली काढली व आम्हाला पाणी हवंय का विचारले. खरं तर तोंडाला कोरड पडली होती, पण का कोण जाणे, त्यांना नकोच म्हटले. मग त्यांनी आमची चौकशी करायला सुरुवात केली. पहिल्या पाच मिनिटांतच आमची नावे, कॉलेजचे कोणते वर्ष, कोर्टात काय करता वगैरे माहिती काढून झाल्यावर त्या बाईंनी पहिला बाँबगोळा टाकला....

''मैं तो यहाँ भाईसाब के लिए आयी हूँ | उनके लिए टिफिन जो लाना था....येरवडासे यह जगह मेरे लिए बहोत दूर है... हमारा फ्लॅट है ना वहाँ... लेकिन क्या करें... आना तो था ही... तो जी शोफर को गड्डी चलानेको बोला .... नहीं तो इस ट्राफिक में गड्डी चलानेका मुझे तो बाबा बहोत टेन्शन होता है....'' असं म्हणून बाईंनी आपल्या पर्समधून सुगंध फवारलेला टिचकीभर हातरुमाल काढून त्याने आपला चेहरा अलगद टिपला. आता या ''भाऊगर्दी''तील तिचा भाऊ नक्की कोण या धास्तीने बिचकलेल्या आम्ही... तेवढ्यात तिने मागे वळून आपल्या हातरुमाल धरलेल्या हाताने कोणाला तरी हलकेच अभिवादन केले. आम्ही टकमका त्या दिशेने पाहू लागलो! मेलो!!!! आमची नजरानजर गँगवॉर किंवा टोळीयुद्धाच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या मुख्य आरोपी क्रमांक दोन यांच्याशी झाली होती!!

टेन्शन, टेन्शन.... घोर टेन्शन!!!! बाई तर आमच्याशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारख्या गप्पा मारतच सुटल्या होत्या. आमच्या मागे बसलेल्या अनेक थंड खुनशी नजरा आमचा हा 'वार्तालाप' टिपत होत्या याचे भान मला व मैत्रिणीला ''आता कोठे लपावे,'' या विचाराप्रत नेत होते. पण मग न्यायाधीश परत आल्यासरशी आम्ही सरसावून बसलो. आखिर डर डर के क्या जीना? आम्ही तर कोणताच अपराध केला नव्हता. तो फिर क्यों डरे?? अचानक आम्हाला स्वतःतील कायद्याच्या विद्यार्थ्याची आठवण झाली. मग आणखी ताठ मान काढून आम्ही पुढची सुनावणी ऐकत राहिलो.


त्या दिवसाचे कोर्टाचे काम संपल्यावर आम्ही त्या बाईंना एक घाईघाईतील ''बाऽय'' ठोकला व जणू वाघ मागे लागल्याच्या थाटात कोर्टाच्या आवारातून ज्या सटकलो ते पार जंगली महाराज रोडला आलो तरी आमचे हात-पाय थरथरत होते. आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना, याची चार-चारदा खात्री करून घेतली. त्या रात्री मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने आमच्या दोघींची भरपूर शाब्दिक धुलाई केली.


''काय नडलं होतं का तिथं कडमडायला?''
''अरे पण...''
''हे बघा, ते लोक फार डेंजर आहेत.... उगाच कशाला चान्स घेताय?''
''हो, पण आम्ही काय तिथं त्यांना खुन्नस द्यायला नव्हतो गेलो...''
''पण त्यांनी खुन्नस घेतली तर??''
''अरे, पण आम्ही काय त्यांचं घोडं मारलंय?''
''कम ऑन, त्या माफिया डॉनच्या बहिणीशी तुम्ही गुलुगुलू गप्पा मारल्या.... आणि म्हणताय वर असं? त्याला समजा आवडलं नाही तिनं तुमच्याशी बोललेलं.... तर???....''
''तर तर काय...???''
''झाली ना त त प प?? नक्को ते उद्योग सुचतात तुम्हाला...''
''हे बघ.... लिसन टू मी...''
''नो, यू लिसन टू मी.... नो मोअर टाडा कोर्ट.... ओके? प्लीज! हात जोडतो....''
आणि यासारख्या त्याच्या पन्नास मिनतवाऱ्या ऐकल्यावर....
''ओह....ओके, ओके... नो मोअर.... प्रॉमिस!''

दोन दिवसांनी आमचे पाय पुन्हा टाडा कोर्टाच्या खोलीच्या दिशेने...

आता आम्ही टाडा कोर्टाच्या वातावरणाला सरावलो होतो. आरोपीची बहीण रोज भक्तिभावाने ''भाईसाब''साठी टिफिन घेऊन यायची. आमच्याशी हटकून दोन-चार वाक्ये बोलायची. तिलाही कदाचित त्या सार्‍या पुरुषांमध्ये एकटीला बोअर होत असेल. आणि आमच्याखेरीज तिथे इतर कोणी स्त्रियाही नसायच्या. मग रोज हवा-पाण्याच्या, ट्रॅफिकच्या, कोर्टातील गर्दीच्या, टिफिनमध्ये काय आणलंय आणि भाईसाबना टिफिनमध्ये काय आवडतं याच्या फुटकळ गप्पा चालायच्या. ना आम्हाला कोणी तिथे हटकत होतं, ना प्रश्न करत होतं. पहार्‍यावरचे पोलिस, साध्या वेषातील पोलिस आणि सरकारी वकिलांचे मदतनीस देखील आता आम्हाला ओळख दाखवू लागले होते. मुख्य आरोपी व त्यांच्या हस्तकांच्या दिशेने पाहणे आम्ही मुद्दामच टाळायचो. आणि कोर्टाच्या सुनावणीत त्यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची जंत्री ऐकताना एखादा माणूस एवढे सगळे गुन्हे कसे काय करू शकतो आणि वर टिच्चून ऐटीत निर्लज्जासारखा भर कोर्टात, जमावापुढे कसा काय वावरू शकतो याचेच नवल वाटायचे.

अनेकदा जेवणाच्या सुट्टीनंतर कोर्टात परत येताना आरोपी, त्यांचे हस्तक, पोलिस, आरोपीचे वकील हे सर्व लोक न्यायाधीश येण्याची वर्दी होईपर्यंत बाहेरच्या व्हरांड्यात उभे राहून नर्म हास्य-विनोद करत असत. मी ते सारे टकमका बघतच बसे. अशक्य वाटायचे, पण ते सारे नजरेसमोरच घडत होते. खोलीच्या आत इतक्या गंभीर आरोपांची चर्चा-सुनावणी, खोलीच्या बाहेर हास्य-विनोद??!!!!

आणि मग तो दिवस उजाडला.... त्या दिवशी जेवणाची सुट्टी संपल्या संपल्या मी व माझी मैत्रीण टाडा कोर्टात येऊन आमच्या ठराविक जागेवर, म्हणजेच मॅडमच्या शेजारी स्थानापन्न झालो. न्यायाधीश महोदय यायला अद्याप अवकाश होता. बाहेर व्हरांड्यात आरोपी, वकील, हस्तक, पोलिसांचा घोळका नेहमीप्रमाणेच उभा होता. अचानक आरोपीने काहीतरी खूण केली. ताबडतोब सोबतच्या एका हस्तकाने आरोपी साहेबांना सिगारेट देऊ केली. आता त्यांना माचिस हवी होती. शेजारच्या पोलिस इन्स्पेक्टरने तत्परतेने माचिस पेटवून त्यांच्यासमोर धरली व आरोपी साहेब मोठ्या ऐटीत सिगारेट शिलगावून ''नो स्मोकिंग''च्या पाटीखाली, कोर्टरूमच्या बाहेर आरामात उभे राहून सिगारेटच्या धुराची वलये हवेत सोडू लागले. त्यांचा तो आविर्भाव बघून आमच्याही डोक्यात धूर होऊ लागला. आम्ही दोघींनी एकमेकींशी कुजबुजत सल्लामसलत केली व कोर्टाच्या पुढ्यात बसणार्‍या लेखनिक - टंकलेखक महाशयांकडे जाऊन आमचा निषेध तत्परतेने नोंदविला.
''जज साहेबांना सांगा त्यांना चांगली समज द्यायला.... नो स्मोकिंगच्या पाटीखाली उभं राहून स्मोक करत आहेत ते!''
लेखनिक दादांनी मुंडी हालवली. न्यायाधीश महोदय आल्यावर आमच्या दिशेने अंगुलिनिर्देश करत त्यांना काहीतरी खुसफुसत सांगितले. न्यायाधीशांनी घसा खाकरला, आरोपीच्या वकिलांना जवळ बोलावून काहीतरी सांगितले, आरोपीच्या वकिलांनीही मुंडी हालवली.

आता आम्ही दोघी पुन्हा टेन्शनमध्ये! एकीकडे त्या आरोपीच्या बेदरकार वागण्याला लहानशी का होईना, खीळ बसल्याचा आनंद.... तर दुसरीकडे यावरून तो किंवा त्याचे साथीदार उगाच आपल्याशी खुन्नस तर घेणार नाहीत ना, याचे बाळबोध टेन्शन! त्या दिवसानंतर तिकडे जाणे आम्ही शक्यतो टाळलेच!

पण मग एक दिवस पेपरात बातमी आली... भारतातील ख्यातनाम विधिज्ञ व आघाडीचे फौजदारी वकील आरोपी क्रमांक दोनच्या वतीने टाडा कोर्टात युक्तिवाद करणार म्हणून!! झाले! आमचा टाडा कोर्टाला टाटा करण्याचा निश्चय पुन्हा डळमळला.... क्या करने का? जाने का या नहीं जाने का? शेवटी छापा-काटा केला. उत्तर अर्थातच 'हो' आले. शिवाय त्या विधिज्ञांचा युक्तिवाद म्हणजे कायद्याच्या अभ्यासकांना निव्वळ मेजवानी असते ते ऐकून होतो. वर ते विधिज्ञ आमचे मानद प्राध्यापक असल्यामुळे आमच्या जवळच्या परिचयाचे होते. गेली चार वर्षे त्यांच्या लेक्चरला होणार्‍या गर्दीत मिळेल ती जागा पकडून, कधी खालच्या कार्पेटवर बसून, तर कधी उभे राहून त्यांची भारतीय घटना, दंड विधान संहिता इत्यादींवरची लेक्चर्स कानात प्राण आणून ऐकलेली.... आता त्यांना प्रत्यक्षात ऐन कोर्टरूममध्ये ऐकण्याची संधी आम्ही कशी चुकविणार?

त्या दिवशी नेमकी आमच्या सीनियर मॅडमना आमची तहान लागली होती. शेवटी त्यांनी सांगितलेले काम करून टाडा कोर्टात पोचायला आम्हाला जरा उशीरच झाला. धावत-पळत जिना चढत आम्ही कोर्टरूममध्ये पोचलो तेव्हा सारी खोली तुडुंब भरली होती. भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ व गुन्हेगारी वकिलांचा युक्तिवाद ऐकायला तिथे पत्रकार, आरोपींकडची मंडळी व बरेच सारे वकील उपस्थित होते. आमची नजर सर्व दिशांना भिरभिरली तर बसायलाच काय, उभे राहण्यासाठीही कोठेच रिकामी जागा दिसेना! गर्दी झाली होती नुसती तिथे! शेवटी पहार्‍यावरच्या पोलिसाने आमची दया येऊन पहिल्या बाकाकडे अंगुलिनिर्देश केला. तिथे आमच्याशी रोज गप्पा मारणार्‍या आरोपी क्रमांक दोनच्या भगिनी असणाऱ्या मॅडम आरामात बसल्या होत्या. आम्हाला पाहताच त्यांच्या गुलाबी लिपस्टिकने रंगविलेल्या ओठांवर ओळखीचे हसू आले व त्यांनी लगबगीने बाजूला सरकून आम्हाला बसायला जागा करून दिली. तेवढीच जागा रिकामी होती. आरोपींच्या नातलगांसाठी जणू मुद्दाम राखीव ठेवलेली!! गच्च भरलेल्या कोर्टात आज वेगळेच वातावरण होते. शेजारी बसलेल्या मॅडमही खास जामानिमा करून आलेल्या दिसत होत्या. तेवढ्यात न्यायाधीश महोदय आले व कोर्टाचे कामकाज सुरू झाले....

...ब्रिलियंट, ब्रिलियंट! एक उत्कृष्ट, बुद्धीला स्तिमित करणारा आणि अफलातून युक्तिवाद ऐकल्यावर माणूस ज्या प्रभावाखाली येतो त्याच प्रभावात विहरत आम्ही त्या दिवशी कोर्टरूममधून बाहेर आलो. मेंदू अद्याप त्या युक्तिवादातच गुंतला होता. आणि ज्या उठावदार शैलीत वकिलमहाशयांनी आपले म्हणणे मांडले ती शैली, तो आत्मविश्वास पाहिल्यावर लोक या माणसाला कायद्यातला बाप का म्हणत असतील ह्याची जाणीव होत होती. आतल्या उकाड्यानंतर बाहेरची व्हरांड्यातील मोकळी हवा छातीत भरभरून घेतानाच आमच्या टाडा कोर्टरूममधील शेजारणीने आम्हाला गाठले.

''क्या अर्ग्युमेन्ट किया ना सर ने! मैंने उनको सुबह बोला भी था, आप को तो कोर्ट रूम में सिर्फ एंट्री लेने की जरूरत है... हमारा हौसला बहोत बढाया है उन्होंने.... '' मॅडम भरभरून बोलत होत्या... त्या आमच्याशी बोलत असताना बाकीचे वकील आम्हा तिघींकडे गमतीशीर नजरेने बघत तिथून जात होते. तेवढ्यात सारी कोर्टरूम आपल्या युक्तिवादाने जिंकणारे ते ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या ज्युनियर्स सहित बाहेर आले. केस हाताळणारे नेहमीचे फौजदारी वकील आज त्यांच्या पुढे-मागे झुलत होते. त्यांचा तो सारा घोळका आमच्यासमोरच थांबला. विधिज्ञ साहेबांना ''भाईसाहेबां''च्या बहिणीशी बोलायचे होते... त्यांनी दोन मिनिटे गप्पा मारल्या. त्या वेळात मी व मैत्रीण, दोघी मागे गुपचूप उभ्या होतो. अचानक त्या मॅडमना काहीतरी आठवले आणि त्यांनी आमची ओळख त्या ज्येष्ठ कायदेतज्ञांशी करून दिली. त्याबरोबर ते उद्गारले, ''यह बच्चीयाँ तो हमें पता है... हमारी स्टुडंटस है... है नं?'' आम्ही दोघींनी आवंढा गिळत मुंड्या हालवल्या व धिटाईने पुढे होऊन आमच्या या सरांच्या कोर्टरूममधील युक्तिवादाबद्दल त्यांचे अभिनंदन केले! झाले!! सर भलतेच खूश झाले.... त्यांच्या ज्युनियर्सकडे वळून काहीशा अभिमानाने म्हणाले, ''देखो, ये दोनों मेरी स्टुडंट्स है.... आज मेरा अर्ग्यूमेन्ट सुनने के लिए आयी थी....'' सर्वांच्या नजरा आमच्याकडे.... आणि आम्ही दोघी दूधखुळ्यासारख्या तिथेच अवघडून उभ्या!
तरीही मोठ्या प्रयत्नांनी आम्ही दोघींनी टाळ्याला अडकलेली जीभ उचकटून ''सर, यू वेअर सिंप्ली ब्रिलियन्ट!'' चा उद्घोष केला. सरांनी दोघींच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले आणि, ''सो, सी यू गर्ल्स इन कॉलेज!'' म्हणत आमचा निरोप घेत तिथून रवाना झाले.

काही वेळा आयुष्यात गोष्टी इतक्या वेगाने घडत जातात की मेंदू पार बधिर होऊन जातो. त्या दिवशी आमचेही असेच झालेले... अनपेक्षितपणे सरांशी झालेला तो वार्तालाप, त्या अगोदरचा मेंदूचा कीस काढणारा त्यांचा युक्तिवाद... त्या नशेतच आम्ही आमच्या सीनियर मॅडमच्या चेंबरमध्ये घुसलो. त्यांना भेटायला आलेले एक सहकारी वकील जाता जाता, ''काय बाबा! तुम्ही लोक मोठी माणसं.... थोरामोठ्यांच्या ओळखीची...!!'' असा टोमणा सर्वांदेखत मारायला विसरले नाहीत. त्या नंतर अनेक दिवस कोर्टातील ओळखीचे शिपाई आणि कॅन्टिनची पोरंही, ''क्काय मॅडम... तुमची पार हाय कमांड पर्यंत वळख हाय की!'' सारख्या उद्गारांनी जाताऱ्येता आम्हाला डिवचत होती तर ओळखीचे काही वकील, ''मानलं पाहिजे बुवा तुम्हाला! पार त्या माफिया डॉनच्या घरच्यांशीच ओळख काढलीत की! '' करत यथेच्छ थट्टा-मस्करी करत होते.

लवकरच परीक्षा जवळ आल्यामुळे आमचे कोर्टात जाणे बंद झाले. टाडा कोर्टाची आठवण स्मृतीच्या एका कोपर्‍यात बंदिस्त झाली. टोळीयुद्ध करून, खून-दरोडे करून बिनबोभाट वावरणारे, जेलमध्येही पंचतारांकित कारावास भोगणारे, नंतर निवडणुकीत जिंकून येणारे ते राजकारणी-गुन्हेगार माझ्या भूतकाळातील एका जमान्याच्या आठवणीचा भाग झाले. नंतर त्यांचे काय झाले वगैरे मागोवा घ्यायच्या भानगडीत मी पडले नाही. वकिली न करण्याचा निर्णय घेतल्यावर तर ते जग जणू माझ्यासाठी परकेच झाले.

------------------------------------------------------------------------------

आज कितीतरी वर्षांनी तो एकेकाळचा परिचित चेहरा आठवला होता... त्यांच्या बंधूंचा तसाच दिसणारा चेहरा भल्या मोठ्या होर्डिंगवर झळकत असण्याचे निमित्त! ती थंड, बेदरकार नजर आठवून भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या होत्या. ''बाहेर पडले त्या जगातून, ते बरंच झालं!'' असा विचार मनाशी करत करतच मी कार्यक्रमाचे ठिकाणी पोचले.

त्या उपनगरातील साईबाबांच्या स्थानिक मंदिराचा जीर्णोद्धार केल्याप्रीत्यर्थ आयोजित केलेला सोहळा होता तो! माझ्या एका परिचितांमार्फत मला कार्यक्रमाचे आमंत्रण आले असल्यामुळे मीही फार चौकशी न करता परस्पर होकार दिला होता. कार्यक्रम छान झाला, संपला, सरतेशेवटी नारळ-शाल-पुष्पगुच्छ सत्कार वगैरे झाले. नेहमीप्रमाणे मला आलेला पुष्पगुच्छ मी तेथील दोन लहान मुलींकडे सोपविला. पण नारळ कसा नेणार? शाल कुठं ठेवणार? ताबडतोब एका संयोजकांनी माझ्यासमोर सुती पिशवी धरली. पिशवीचा पांढरट पिवळा रंग, त्यावर लाल ठसठशीत शाईत गौरवाने छापलेले तेच ते परिचित नाव.... ओळखा बघू कोणाचे असेल????? ''कोठे जाशी भोगा... तुझ्यापुढे उभा!!'' बरोब्बर!! त्या गावातील थोर राजकारणी - समाजकारणी - लोकांचे पालनहार - अशा त्या साहेबांच्या बंधूंचे पिशवीवर छापलेले ते नाव मला चांगलेच परिचयाचे होते. अर्थात त्या गावात बहुतेक ठिकाणी त्यांचे नाव असतेच म्हणे... अन् येतेच.... अखेर तेच तर त्यांचे ''कर्म''स्थळ आहे...!!! भले कायदा काहीही म्हणो, पोलिस कळवळून काहीही म्हणोत, वर्तमानपत्रे ठणाणून काहीही सांगोत.... ते त्या भागाचे अनभिषिक्त राजे आहेत हेच खरे!! लोकशाहीत लोकांच्या मनावर ''राज्य'' करणारे... मग ते भले दहशतीच्या जोरावर असो, की लोकांवर केलेल्या उपकारांच्या 'दबावापोटी' असो!

निघताना मी डॉक्टर पटेल व त्यांच्या पत्नीस त्यांच्या घरी मुक्कामासाठी न जाता मला परतीच्या गाडीला सोडायची विनंती केली. तेही अगोदर जरा हिरमुसले, पण नंतर काहीसे नाईलाजाने तयार झाले. नारळ व शाल असलेली पिशवी का कशी कोण जाणे, पण त्यांच्या गाडीच्या डिकीतच राहिली!! :-)

--- अरुंधती