Sunday, April 01, 2012

कृतार्थ''मोतीबाबू आहेत का?'' सुरेशबाबूंनी बाहेरूनच विचारले. आश्रमातील बंगल्याच्या व्हरांड्यात पायाशी शेगडी ठेवून, वेताच्या खुर्चीत आरामात वर्तमानपत्र वाचत बसलेल्या जयंतीबेन त्यांना पाहून जरा दचकल्याच!
''या, या सुरेशबाबू.... आज आमच्या बंगल्याची पायधूळ कशी काय झाडलीत? या ना, बसा, बसा. मोतीबाबू आत जप करत आहेत. येतीलच पाच-दहा मिनिटांत. काही काम होतं का?'' जयंतीबेन हातातील वर्तमानपत्र बाजूला सारत उद्गारल्या.

जयंतीबेन व मोतीबाबूंना या आश्रमात राहायला येऊन जवळपास अडीच-तीन महिने झाले तरी सुरेशबाबूंनी त्यांच्या बंगल्याला दिलेली ही पहिलीच भेट होती. आश्रमाचे सहायक व्यवस्थापक म्हणून काम बघणारे सुरेशबाबू सतत व्यस्त असायचे. कधीही पाहा, घाईतच दिसायचे. त्यांचे मोतीबाबूंकडे अचानक कोणते महत्त्वाचे काम निपजले असेल याविषयी जयंतीबेन विचार करत असतानाच बंगल्याच्या अंतर्भागातून मोतीबाबू प्रसन्न चेहर्‍याने बाहेर आले. रुंद कपाळावर रेखलेले केशरी गंध, अंगात स्वच्छ पांढराशुभ्र सुती सदरा-पायजमा-शाल आणि हातात चष्म्याची पेटी अशा वेषात सत्तरीच्या घरातील मोतीबाबू कधी नव्हे ते उत्तम मनस्थितीत दिसत होते. बाहेर आल्या आल्या त्यांनी सुरेशबाबूंना पाहून, ''मग चलायचे ना?'' असे विचारले.
''अहो, सुरेशबाबूंनी चहा-दूध वगैरे काही घेतलं नाही अजून..!!'' असे जयंतीबेनने म्हणेपर्यंत मोतीबाबूंनी पायात जोडेही सरकवले होते. ''पुन्हा कधीतरी येईन भाभीजी, आता जरा घाईत आहोत,'' सुरेशबाबूंनी जयंतीबेनना हात जोडून नमस्कार केला व ते निघाले. तोवर मोतीबाबू तरातरा चालत बंगल्याच्या बाहेरही पडले होते!

-----

''हं, सगळेजण जमलेत का इथे?'' सुरेशबाबूंनी आश्रमाच्या कचेरीबाहेरील व्हरांड्यात जमलेल्या दहा-पंधरा लोकांवरून नजर फिरवली. जमलेली डोकी त्यांच्या अंदाजापेक्षा संख्येने जरा कमीच होती. थंडीच्या मोसमात आश्रमात यात्रेकरू आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती नगण्य असे. हिमालयाच्या पायथ्याशी, मणिकूट पर्वताच्या तळाशी वसलेल्या ऋषिकेशमधील हिवाळा अनेकांना न सोसविणारा! आणि या वर्षी तर कडाक्याच्या, गोठविणार्‍या थंडीची जबरदस्त लाट आल्यावर पर्वतरांगांच्या कुशीत उंचावर वसलेल्या या आश्रमात देखील फार कमी माणसे मुक्कामाला होती.गेल्या दोन-तीन दिवसांत हृषिकेशच्या परिसरात रस्त्यावर राहणार्‍या, भीक मागून किंवा लोकदयेवर गुजराण करणार्‍या काही वृद्ध, आजारी माणसांचे थंडीपायी गारठून मृत्यू झाल्याच्या बातम्या आश्रमात वादळी वेगाने येऊन थडकल्या होत्या. अस्वस्थ झालेल्या आश्रम प्रशासनाने तातडीची मीटिंग बोलावून अशा गरजू लोकांना तात्पुरत्या स्वरूपात आश्रमात निवारा देण्याचा प्रस्ताव विश्वस्तांकडे मांडला होता. परंतु या आजारी लोकांची देखभाल करण्यासाठी आवश्यक यंत्रणा आश्रमात तयार नव्हती. शेवटी त्या गरजू लोकांना थंडीपासून बचावासाठी कांबळी वाटण्यावर सर्वांचे एकमत झाले होते व मर्यादित संख्येत गरजूंना आश्रमात आसरा मिळणार होता. खरोखरीच गरज असणार्‍या लोकांनाच कांबळी मिळावीत ह्यासाठी हे काम रात्रीच गुपचूप, गाजावाजा न करता पार पाडायचे ठरले होते. त्या कामासाठी इच्छुक स्वयंसेवकांची ही पहिली मीटिंग भरली होती.

''सुरेशबाबू, मी सर्वांची नावे लिहून घेतली आहेत,'' मोतीबाबू हातातील वहीकडे चष्म्यातून एक नजर टाकत उद्गारले, '' कपाटातील सर्व कांबळी मोजून ठेवली आहेत. आपल्याला सेवकांच्या जास्तीत जास्त सात ते आठ जोड्या करता येतील. प्रत्येक जोडीला पंधरा कांबळी वाटायला दिली तर एकूण एकशेवीस कांबळी लागतील. सध्या आपल्याकडे एकशे अठरा कांबळी आहेत. आणखी काही कांबळी मी बाजारातून संध्याकाळपर्यंत घेऊन येतो,'' मोतीबाबूंच्या आवाजातील उत्साह लपत नव्हता. बर्‍याच दिवसांनी त्यांच्या चर्येवर चैतन्य जाणवत होते. सुरेशबाबूंनी मान डोलवून संमती दिली व उपस्थितांना ते कामाचे स्वरूप समजावून देऊ लागले.

-----

''मोतीबाबू, इतक्या थंडीगारठ्यात तुम्ही बाहेर सेवेसाठी जाऊ नये असं मला वाटतंय,'' लोकरी स्वेटरचे एकावर एक थर, मोठा वूलन कोट, शिवाय स्कार्फ, कानटोपी, हातमोजे घातलेल्या मोतीबाबूंना रात्री अकरा वाजता आश्रमाबाहेर जायच्या जय्यत तयारीत पाहून सुरेशबाबू काळजीने उद्गारले. रात्री ऋषिकेशमध्ये हिंडून कांबळी वाटण्याच्या सेवेत नाव दिलेल्या सेवकांना कचेरीत त्यांना भेटून मगच बाहेर जाण्याची सूचना होती. आणि सेवकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कितीही कमी असली तरी वयाच्या सत्तरीत असलेल्या मोतीबाबूंना इतक्या वाईट थंडीत, दाट धुक्यात रात्री बाहेर पाठविणे मोतीबाबूंच्या तब्येतीच्या दृष्टीने धोक्याचेच होते. पण मोतीबाबूंच्या चेहर्‍यावर ठाम निश्चय दिसत होता. दारात उभ्या असणार्‍या हट्ट्या-कट्ट्या कृपालला त्यांनी हाक मारली आणि सुरेशबाबूंकडे वळून म्हणाले, ''माझ्याबरोबर हा कृपाल आला तर चालेल ना तुम्हाला? चांगला हट्टा-कट्टा सरदार आहे, दोघांचे काम एकटा करू शकतो तो! मला नाही जमले तरी तो सारे काम पूर्ण करू शकेल. आणि 'नाही' म्हणू नका हो सुरेशबाबू! आज बर्‍याच दिवसांनी मला काहीतरी सेवेचं काम मिळतंय. मला करू देत ही सेवा. गेले तीन महिने खूप उदास गेले माझे. घरापासून, गावापासून दूर राहायची सवय करून घेत होतो. पण आज काहीतरी चांगले काम करायची संधी मिळते आहे.... प्लीज मला हे काम करू द्या!'' मोतीबाबूंच्या स्वरातील अजिजी लपत नव्हती. शेवटी सुरेशबाबूंनी हताशपणे खांदे उडविले व कृपालला बाजूला घेऊन हलकेच सूचना देऊ लागले.

एव्हाना शाल-कोट-स्वेटर-कानटोप्यांमध्ये गुरफटलेले बाकीचे सेवकही कचेरीत जमू लागले होते. सर्वांच्या ताब्यात कांबळ्यांच्या थैल्या देण्यात आल्या. तेवढ्यात आश्रमात राहत असलेले ब्याण्णव वर्षांचे साधू अवधूत शिवदासजी ह्या सेवा मोहिमेवर निघणार्‍या सर्व सेवकांना भेटायला कचेरीत प्रवेश करते झाले.
''सब शिवमंगल हो! परमेश्वराचे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहेत. कामात कुचराई करू नका. तल्लख राहा. ईश्वर आप सबका भला करे!'' शुभ्र जटाधारी साधूमहाराजांनी आशीर्वचन उच्चारले. आश्रमात व पंचक्रोशीत साधूमहाराजांविषयी सर्वांच्या मनात नितांत आदराची भावना होती. त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर जणू सर्व सेवकांच्या अंगात नवी ताकदच संचारली.
''बोला हर हर गंगे, जय भोलानाथ!'' महाराष्ट्रातून आलेला विकास गरजला. त्याबरोबर बिहारच्या छोटूरामने आणि बंगालच्या देबोशीषनेही ''जय माता गंगे'' च्या आरोळ्या दिल्या. मोतीबाबू व कृपालसिंगची जोडी तर सर्वात पुढे होती. नव्या जोषात सगळेजण हातात कांबळ्यांच्या थैल्या घेऊन आश्रमाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडले. सुरेशबाबूंचा काहीसा चिंतित चेहरा मात्र कोणालाच दिसला नाही.

------

''कृपाल, मला जरा दमायला झालंय गड्या! थोडा वेळ कुठंतरी बसूयात का?'' मोतीबाबूंच्या शिणलेल्या आवाजातूनही त्यांना दम लागल्याचे स्पष्ट कळत होते. गेले दोन तास त्यांची ऋषिकेशच्या अंधार्‍या रस्त्यांतून व गल्लीबोळांमधून अखंड पायपीट चालू होती. ठिकठिकाणी जीवघेण्या थंडीने गारठलेले, पायर्‍या व वळचणींखाली आसरा घेतलेले आणि थंडीपासून पुरेसे संरक्षण नसलेले भटके मनुष्यजीव शोधून त्यांना कांबळी वाटणे म्हणजे सोपे काम नव्हतेच! घनदाट धुक्यात, शरीरातील रक्त थिजवणार्‍या तापमानात सारे पशूपक्षीही निपचित झाले असताना असे काम म्हणजे जीवाशी खेळच होता एक प्रकारचा! त्यात गंगेवरून आणि हिमालयाच्या दिशेने येणारे, झोंबणारे बोचरे वारे अंगाची सालडी ओरबाडून काढण्याइतपत कठोर! एका खांद्यावर कांबळ्यांची थैली लटकवून चालणार्‍या कृपालला खरे तर मोतीबाबू इतका वेळ गारठ्यात टिकू शकले ह्याचेच आश्चर्य वाटत होते.

गोठलेली शरीरे ओढत ओढत ते दोघे एका अरुंद गल्लीच्या टोकाशी असलेल्या आडोशाला थोडावेळ विसावले. मोतीबाबूंचा श्वास फुलला होता. पायांतील संवेदना कधीच्याच गारठल्या होत्या. कृपालने खिशातून कसलीशी गोळी काढली व मोतीबाबूंना चघळायला दिली. त्याच्या आडदांड धिप्पाड देहामुळे व तरुण वयामुळे त्याला मोतीबाबूंएवढा त्रास होत नसला तरी या हवेत तोही काहीसा शिणला होता.

हात-पाय झटकत अंगात ऊब आणायचा प्रयत्न करत असलेल्या कृपालकडे पाहून मोतीबाबू अचानक उद्गारले,
''दैवाचा काय योग आहे पहा... तू दूरचा पंजाबातला कृपाल....कृपालसिंग...एक सच्चा सरदार... पोटापाण्यासाठी दिल्लीला आलास.... यात्रा-कंपनीत काम करताना ऋषिकेशला स्थिरावलास.... आणि मी... गुजरातच्या एका छोट्या गावातील व्यापारी माणूस... आयुष्यभर आपण बरे आणि आपले काम बरे म्हणत जगणारा... जवळच्या नातेवाईकांनी व्यवहारात सपशेल फसवलं, धुवून काढलं म्हणून उध्वस्त मनाने इथे आश्रमात येऊन ईश्वराच्या भक्तीत दिलासा शोधणारा.... ना मी तुला ओळखत, ना तू मला! पण आपण दोघे आश्रमात एकमेकांना भेटतो काय, सेवेसाठी एकत्र निघतो काय.... बरोबरीने ऋषिकेशच्या वाटा हिंडतो काय.... सारेच अद्भुत!'' दोघेही मूकपणे काही क्षण ते स्वप्नासमान भासणारे वास्तव अनुभवत राहिले.जरा उसंत घेऊन मोतीबाबू अचानक बरसले, ''हे बघ कृपाल, मला काही होऊ लागले तर तू सरळ मला तिथेच सोडून पुढे जा. माझ्यासाठी आपलं काम थांबवू नकोस. मी शोधेन जवळपास आसरा. एका रात्रीचा तर प्रश्न आहे! तू काम अर्धवट सोडू नकोस काहीही झाले तरी!'' दमलेल्या मोतीबाबूंना हे शब्द बोलतानाही धाप लागत होती. एवढा वेळ त्यांचे बोलणे शांतपणे ऐकणार्‍या कृपालने त्यांच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत त्यांना थोपटल्यासारखे केले. ''मोतीबाबू, तुम्ही मला वडिलांसारखे आहात. मी तुम्हाला असा कसा सोडून जाईन? शिवाय आता पाच-सहा कांबळीच उरली आहेत. बघता बघता तीही संपतील. जेमतेम तासाभराचा प्रश्न आहे. काळजी करू नका. आपण काम पूर्ण करूनच परत फिरणार आहोत. वाहेगुरूंवर सगळा हवाला आहे!'' कृपालचा निर्धार ठाम होता.

त्याच्या शब्दांनी मोतीबाबूंनाही जरा धीर आला असावा, कारण त्यांचा व्यथित चेहरा काहीसा सैलावला. कृपालला इशारा करून ते जागचे उठले व ''चल, चल, आपल्याला अजून बराच टप्पा गाठायचाय,'' म्हणत हातातील विजेरीच्या झोतात पांढर्‍याशुभ्र धुक्यांत वेढलेला रस्ता न्याहाळत चालू लागले.

--------

''शेवटचं एकच कांबळं उरलंय आता फक्त. धीर धरा मोतीबाबू, आपला छोटुवा आहे ना... आश्रमात येतो कधी कधी... त्याचं घर जवळच आहे... तुम्ही छोटुवाच्या घरी बसा जरा. आराम करा. मी हे कांबळं देऊन झालं की तुम्हाला आणायला येतोच परत. बस्स, जरा आणखी दहा पावलं जायचंय आपल्याला.... धीर धरा...'' कृपाल मोतीबाबूंच्या थरथरत्या देहाला आधार देत त्यांना रस्त्याने जवळपास ढकलत, ओढतच चालला होता. मोतीबाबूंच्या गालांवरून अतिश्रमांनी ओघळणारे कढत अश्रूही काही सेकंदांत थिजत होते. दम खाण्यासाठी मध्येच कोठेतरी थांबणे म्हणजे आता संकटाला निमंत्रण देण्यासारखेच होते. मोतीबाबूंचा चेहरा शिणवट्याने व थंडीने निळसर पडला होता. त्वचेची संवेदना तर कधीच नष्ट झाली होती. पाय थरथरत होते. जवळपास भेलकांडत, कृपालच्या खांद्याचा आधार घेत ते प्रत्येक पाऊल मोठ्या कष्टाने उचलत होते. अखेर कृपाल एका छोट्याश्या झोपडीवजा घराच्या दारासमोर थांबला व त्याने जोरात दार ठोठावले. जणू त्यांचीच वाट पाहत असल्यासारखा त्या घरात लगेच दिवा लागला व काहीच सेकंदांत दार उघडले गेले.

''छोटुवा, जरा पाणी गरम करत ठेव आणि तुझ्याकडच्या रजया, गोधड्या ह्या मोतीबाबूंच्या अंगावर पांघरण्यासाठी आण!'' कृपालने दरवाजा बंद करणार्‍या छोटुवाकडे न बघताच फर्मान सोडले व मोतीबाबूंना जवळच्या बाजेवर अलगद बसविले. डोळे चोळून झोप घालवत गरम कपड्यांमध्ये गुरफटलेल्या छोटुवाने लगेच कोपर्‍यातली गरम निखार्‍यांची शेगडी बाजेजवळ आणून ठेवली. दुसर्‍या एका मोठ्या शेगडीतील निखारे फुलवून त्यावर त्याने एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले. भिंतीजवळच्या बाजेवरील दोन-तीन रजया उचलून त्यांना कृपालच्या पुढ्यात ठेवले आणि आतल्या छोट्याश्या खोलीत जाऊन तो कोणाला तरी जागे करू लागला. कृपालने भराभर मोतीबाबूंचे दमट ओले, भिजलेले कपडे काढायला सुरुवात केली. त्यांना कोरड्या, मऊ, ऊबदार दुलयांमध्ये नखशिखान्त गुंडाळल्यावर मग कोठे त्याने जराशी उसंत घेतली. बाहेरच्या थंडीतून आतल्या उबदार वातावरणात आल्यावर मोतीबाबूंचा रंग काहीसा पूर्ववत आला होता. चेहर्‍याची निळसर झाक कमी झाली होती.

छोटुवा पुन्हा बाहेर आला, सोबत त्याची झोपेतून उठलेली बायको होती. तिने न बोलता शेगडीवर चहाचे आधण ठेवले. काही मिनिटांतच त्यांच्यासमोर गरम चहाचे कप हजर होते. घशात ते गरम द्रव गेल्यावर मोतीबाबूंना आणखी तरतरी वाटू लागली. ''कृपाल, ते शेवटचं कांबळं....'' त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले.
''मोतीबाबू, मी व छोटुवा दोघे जातोय.... तुम्ही काळजी करू नका. बस्स, आराम करा. भाभीजी आहेत तुमची देखभाल करायला. काही वाटलं, लागलं तर मोकळेपणाने भाभींना सांगा... आत छोटुवाचा मुलगा राजू झोपलाय, त्या राजूला उठवतील काही लागलं तर.... '' कृपाल स्वतःच्या आवाजातील काळजी लपवायचा प्रयत्न करत होता.
मोतीबाबूंनी चहाचा कप जमिनीवर ठेवला व थकल्या-शिणल्या अवस्थेत ते आडवे झाले. छोटुवाने एव्हाना अंगात जास्तीचे गरम कपडे चढवले होते. निघताना कृपालने बाजेवर दुलयांमध्ये गुरफटलेल्या मोतीबाबूंकडे एक चिंतेचा कटाक्ष टाकला व ''येतो भाभीजी! सत् श्री अकाल!'' म्हणत आपल्यामागे दार लोटून घेतले.

------

किती वेळ गेला कोण जाणे! पण मोतीबाबूंचा जरा डोळा लागतो न लागतो तोवर कृपाल व छोटुवा परत आले होते. त्यांच्या सोबत दोन फाटक्या वेषातील थंडीने अर्धमेले झालेले वृद्ध होते. मोतीबाबूंनी कृपालकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्या वृद्धांभोवती एकेक रजई लपेटत कृपाल खांदे उडवत उत्तरला, ''चौराहेपर मिले ये दोनो....थैलीतील कांबळी तर संपली होती. आणि त्यांना तसंच थंडीत मरायला सोडून परत फिरणं मला बरोबर वाटलं नाही. मग एकाला छोटुवाने आधार दिला आणि दुसर्‍याला मी... आलो घेऊन त्यांना इथे!''
छोटुवाच्या बायकोने पुन्हा एकदा न कंटाळता सर्वांसाठी चहा केला, भुकेलेल्या व थंडीने अर्धमेल्या वृद्ध अतिथींसाठी लापशी केली, त्यांचे हवे-नको पाहिले व मगच ती माउली आत झोपायला निघून गेली.
कृपाल, मोतीबाबू व नव्याने आलेले ते दोन वृद्ध सारी रात्र तिथेच छोटुवाच्या झोपडीत राहिले. रात्रीतून छोटुवा व कृपाल आळीपाळीने तिन्ही वृद्धांवर नजर ठेवून होते.

सकाळी परत निघताना मोतीबाबूंनी अगदी सहजपणे आपल्या वूलन कोटाच्या खिशात हात घालून पाकिटातील शंभराच्या पाच नोटा काढल्या व छोटुवाच्या हातात कोंबल्या.
''बेटा, ना मत कहना! तुम्ही दोघा नवरा-बायकोने प्राण वाचवलेत माझे. तुमचे आभार तरी कसे मानू? माझी तुमच्याशी ना ओळख, ना पाळख. तरी मला तुम्ही तुमच्या घरात घेतलेत, पाहुणचार केलात, मला रात्रभर तुमच्याकडे आराम करू दिलात, वर तू तर माझ्या वाटचे कामही करून आलास.... शिवाय या दोन म्हातार्‍यांनाही थारा दिलात. तुमचा हा विश्वास पाहून मी थक्क झालोय. तुमच्या आदरातिथ्याने गहिवरलोय. कालच्या रात्री मी जे काही अनुभवलंय त्याचं वर्णन करणं अवघड आहे. पण मला जीवन-दान दिलेत तुम्ही... आणि माझा माणुसकीवरचा विश्वास परत आणलात. आता ह्या पैशांना नाही म्हणू नकोस. मुलांसाठी खाऊ आण. माझ्या या लेकीसाठी - तुझ्या बायकोसाठी साडी-चोळी घे. आणि तुमच्या या घराचे दार असेच खुले राहू देत. असेच लोकांना मदत करत राहा. सुखी राहा.''

कृपालने एव्हाना दोन सायकल-रिक्शावाल्यांना छोटुवाच्या झोपडीपर्यंत येण्यासाठी पटवले होते. त्या उबदार झोपडीतून बाहेर पडत कृपाल व मोतीबाबूंनी एकेका वृद्धाचा ताबा घेतला व त्यांना सायकल-रिक्शात आपल्या सोबत बसवून आश्रमाकडे प्रयाण केले.

------

''काय मोतीबाबू, कंटाळलात इतक्यात आश्रमाला?'' आपल्या गावी निघण्याअगोदर साधूमहाराजांचा निरोप घ्यायला आलेल्या मोतीबाबू व जयंतीबेनना पाहून साधूमहाराज हसून उद्गारले.

ती रात्र उलटून आज बरोबर दोन आठवडे होत आले होते. मधल्या काळात थंडीची लाट बर्‍यापैकी ओसरली होती. त्या रात्रीनंतर सुरेशबाबूंनी मोतीबाबूंना जयंतीबेनच्या देखरेखीखाली पूर्ण आराम करण्याची सक्ती केली होती. परंतु दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मोतीबाबूंनी आश्रमाच्या वेगवेगळ्या विभागांच्या कामांत स्वतःला पुरते झोकून दिले होते.

आज मोतीबाबूंचा तरतरीत, प्रसन्न चेहरा पाहून साधूमहाराजांना झालेला आनंद उघड दिसत होता.
मोतीबाबूंनी लवून अगोदर साधूमहाशयांना अभिवादन केले व कृतज्ञ चर्येने म्हणाले, ''स्वामीजी, मी इथे एक निराश, हताश व्यक्ती बनून आलो होतो. आणि परत जाताना मनात पुन्हा उत्साह, उमंग, आशा घेऊन चाललोय. आल्यापासून मी इथे रोजची सेवा-साधना करत होतो. पण चित्त थार्‍यावर नव्हते. घरच्या माणसांनी व्यवहारात दिलेल्या दग्यामुळे मी पार खंतावून - कोलमडून गेलो होतो. माझी पुरती फसगत झाली होती. आपल्याच रक्ताची माणसं आपल्याला इतका धोका देऊ शकतात हे अनुभवल्यावर माझा माणुसकीवरचा विश्वासच उडला होता..... पण... पण त्या रात्री ऋषिकेशमधून कांबळी वाटत हिंडताना मला ती माणुसकी रस्त्यावर पुन्हा नव्याने गवसली. कधी न पाहिलेली ती माणसं... ना कोणी नात्याचं, ना गोत्याचं.... पण त्या रात्री एका ठिकाणी जमलेल्या भिकारी लोकांनी आम्हाला शेकोटीची ऊब देऊ केली, कोणी आम्हाला रस्ता दाखवायला आले, कोणी मला थंडीपासून आसरा दिला.... अगदी निरपेक्षपणे! त्यांच्या त्या माणुसकीने मी भरून पावलो. जणू माझा पुनर्जन्म झाला. मी खरे तर त्यांची सेवा करायला गेलो होतो. पण सेवेचा खरा अर्थ त्यांनीच मला शिकवला! आता माझ्या गावी जाऊन गावातल्या गोरगरीबांप्रती अशा निरपेक्ष सेवेचा कित्ता गिरवायचा माझा मनसुबा आहे. आमच्या गावच्या गोरगरीब मुलांसाठी एक शिक्षण मंदिर सुरू करायचा विचार आहे. देवदयेने आमच्यावर लक्ष्मीची कृपा आहे. आता तीच लक्ष्मी कामी लावून इतरांसाठी काही करता येते का हे बघायचे आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय.''

मोतीबाबूंच्या चेहर्‍यावरचे कृतज्ञता व उत्साहाचे भाव निरखत साधूमहाराज मनापासून हसले.
''वा, वा, वा!! ईश्वराने तुमची सेवा रुजू केली म्हणायची! जा, जा, यशस्वी व्हा! ईश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत! सेवा करा आणि मेवा लुटा!!''

बाहेर बर्‍याच दिवसांनी आज लख्ख ऊन पडले होते. त्या उन्हात कृतार्थभावाचा मेवा लुटण्यासाठी सज्ज झालेल्या मोतीबाबूंची सावली हळूहळू मोठी होऊ पाहत होती.

[वरील कथा मी मराठी संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित]