Tuesday, April 27, 2010

तू माने या ना माने दिलदारा


बाबा बुल्लेशाह 
गेले दोन दिवस मला सूफी गाण्यांनी घेरलंय! असाच कधी अवचित येतो मूड आणि सुरू होते एक अद्भुत स्वरमयी भक्तीयात्रा!
ही गाणी अवीट गोडीची, गूढ अर्थांची, आत्मा - परमात्म्याशी संवाद साधणारी तर आहेतच; शिवाय कधी मनुष्याच्या मूर्खतेला शाब्दिक चपराक देणारी तर कधी लडिवाळपणे प्रियतमाचे आर्जव करणारी आहेत.
सशक्त, समर्पक शब्दरचना आणि अपार भक्तिभावाने कृतकृत्य करणारे मधुर, हृदयाला हात घालणारे संगीत....
... त्या जोडीला तेवढाच कसदार गायकी गळा त्या संगीतरचनेला लाभला तर मग सोने पे सुहागा!!
सध्या माझ्या मनात अहोरात्र पिंगा घालणारे गाणे म्हणजे वडाळी बंधूंनी गायलेली बाबा बुल्लेशाह यांची अपरिमित माधुर्य व उत्कट प्रेमभावाने ओतप्रोत रचना ''तू माने या ना माने दिलदारा असां ते तैनू रब मनिया''.....
बाबा बुल्लेशाह (मीर बुल्ले शाह कादिरी शतारी) या इ.स. १६८० च्या दरम्यान पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्मलेल्या सूफी पंजाबी संत कवींच्या अनेक रचना पंजाबी लोकपरम्परेचा व साहित्याचा एक अविभाज्य भाग आहेत. बाबा बुल्ले शाह हे प्रख्यात पंजाबी सूफी कवी. हिंसेचे उत्तर हिंसा होऊच शकत नाही ह्या त्यांच्या विचाराशी ते इतरांचा रोष पत्करूनही कायम ठाम राहिले. त्यांच्या काव्यरचना ईस्लामच्या कट्टरतेला आव्हान देणार्‍या व त्यावर टीका करणार्‍या आहेत. बुल्ले शाह यांनी आपल्या काव्यांतून कायम मानवतेचा, प्रेमाचा, सौहार्दाचा पुरस्कार केला. सामाजिक प्रश्नांवर टीकाटिप्पणी केली. आणि गूढ आध्यात्मिक प्रवासाला त्यांनी शब्दस्वरूप आकार देऊन एक वेगळेच मूर्त स्वरूप दिले.
त्यातीलच ही एक रचना....
साधे, थेट हृदयाला भिडणारे पारदर्शी शब्द आणि त्यातून परमात्म्याला घातलेले साकडे, केलेले आर्जव नकळत मन हेलावून टाकते.
प्रेमाच्या सर्वात उत्कट भावाला ही रचना शब्दबद्ध करते.
यू ट्यूबवर हे गाणे अवश्य ऐका : पैगाम - ए -इश्क ह्या ध्वनिमुद्रिकेतील हे गाणे आहे.
वडाळी बंधूंची सूफी गायकी जगद्विख्यात आहे. पद्मश्री पुरस्कार सन्मानित पूरणचंद व प्यारेलाल वडाळी पंजाबमधील अमृतसरच्या गुरु की वडाली भागात राहाणारे त्यांच्या घराण्यातील गायकांच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी. पूर्वापार सूफी संतांच्या रचनांची गायकी घराण्यात चालत आलेली. निसर्गदत्त पहाडी, कमावलेला आवाज आणि त्यावर भक्तीचे लेणे! सूफी परंपरेवर त्यांचा गाढ विश्वास आणि आपल्या गायकीतून ईश्वराला आर्जवाने पुकारण्याची, आवाहन करण्याची अफाट ताकद!
पंडीत दुर्गादास आणि उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेले, अतिशय साध्या जीवनशैलीने जगणारे हे दमदार, खड्या आवाजाचे गायक आपल्या लवचिक अदाकारीतून सूफी रचनांच्या शब्दांमध्ये विलक्षण रसपूर्णता आणतात. त्यांच्या गळ्यातून उमटणार्‍या प्रत्येक शब्दासरशी रोम रोम पुलकित होतात. त्यांची बरसणारी, भक्तीवर्षावात चिंब करणारी गायकी आणि बुल्लेशाह यांचे मार्मिक शब्द...... भक्तीच्या डोहात डुंबायला अजून काय पाहिजे?
गाण्याचे शब्द व त्यांचा स्वैर अनुवाद :
तू माने या ना माने दिलदारा असां ते तैनु रब मनिया
प्रियतमा, तुला आवडो अगर न आवडो, मी तुला माझा ईश्वर म्हणून आपलंसं केलंय....
दस होर केडा रब दा दवारा असां ते तैनु रब मनिया
आता तूच मला सांग की मी अजून कोणता दरवाजा ठोठावू... तूच आता माझा ईश्वर आहेस!
कोई काशी कोई मक्के जांदा कोई कुंभ विच दा धक्के खांदा
कोणी आपल्या पापांचे परिमार्जन करायला काशीला जातात, तर कोणी मक्केला जातात. तर कोणी कुंभमेळ्यात जाऊन आपली पापे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.
पाया जग मै तुझ विच सारा असां ते तैनु रब मनिया
पण मला तर तुझ्या चरणांशीच सारे विश्व गवसले आहे, तूच आता माझा ईश्वर आहेस!
अपने तनकी खाक उडायी तब ये ईश्क की मंजिल पायी
ह्या शरीरातील विकार जेव्हा भस्मसात झाले तेव्हा तुझ्या दिव्य प्रेमाचा साक्षात्कार झाला...
मेरी सांसोका बोले इकतारा असां ते तैनु रब मनिया
माझ्या श्वासांची एकतारी तेच गीत तर प्रत्येक श्वासागणिक गात आहे....
तुझ बिन जीना भी क्या जीना तेरी चौखट मेरा मदीना
तुझ्याशिवाय ह्या माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? तुझ्या दारात मला माझे तीर्थ गवसले आहे
कहीं और ना सझदा गंवारा असां ते तैनु रब मनिया
आता हे मस्तक अन्यत्र कोठे झुकवणे मला सहन होत नाही कारण तूच तर माझा ईश्वर आहेस!
हंसते हंसते हर गम सहना राजी तेरी रजा में रहना
आता हसत हसत मी अडचणी व संकटांचा सामना करेन. जर माझे दु:ख ही तुझी मर्जी असेल तर तेही मला मान्य आहे. तुझी सावली हेच माझं घर.
तूने मुझको सिखाया है यारा असां ते तैनु रब मनिया
तूच तर शिकवलंस हे सारं मला......
ईश्वराला इतक्या मधुर शब्दांत आळवणारी, त्यावर प्रेमाचा हक्क सांगणारी ही अभूतपूर्व रचना.....आणि त्यावर कळस चढवणारा वडाळी बंधूंचा दिलखेचक स्वर!
अप्रतिम शब्दांना आत्म्याला साद घालणाऱ्या समृद्ध गायकीचं कोंदण लाभल्यावर कधी ऐकणारा रसिक भक्त बनतो, डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळतात, कंठ रुद्ध होतो आणि मन त्या भक्तीलहरींत डुंबू लागते हेच कळत नाही. चक्षूंसमोर उभा राहतो एक फकीर. अल्लाला, परमात्म्याला जीवाच्या आर्ततेने साद घालणारा, त्याच्या प्रेमात वेडावलेला, दिवाणा झालेला, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याच परमात्म्याला पाहणारा.... गाणे संपते तेव्हा आपणही दीवाने झालेलो असतो. त्या खुळेपणाला, त्या वेडाला माझा सलाम!
(माझ्या अतिशय अल्प हिंदी/पंजाबी ज्ञानाच्या आधारावर हा अनुवाद व गाण्याचे शब्द मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी चु. भू. दे. घे. फेरफार/ सुधारणा असल्यास अवश्य कळवणे.)
-- अरुंधती

Monday, April 19, 2010

कॉफी शॉप सेशन


''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला.
''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात कावळे कोकलताहेत, लवकर ये... फाजीलपणा करू नको फार!!! '' अशा आवाजात एकच गजर केला. हसत हसतच कॉल संपवून त्यांनी रेखाकडे पाहिले. रेखा हसत होती खरी, पण त्यात नेहमीचा मोकळेपणा नव्हता. जणू सुमा यायचीच वाट की रेखाच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडायच्या तयारीत होती.

सुमा, रेखा, मधू व साक्षी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी! आज तीन दशके उलटून गेली तरी आपली मैत्री लग्न, नोकऱ्या, मुलं, आजारपणं, रोजची दगदग, अडचणी ह्यांच्या धबडग्यात टिकवून ठेवणाऱ्या. वयाच्या पन्नाशीनंतरही आपल्या कॉलेजच्या जीवाभावाच्या मैत्रिणींबरोबर आपली सुख दुःखे वाटण्यात, अडचणीच्या वेळेला सल्ले मागण्यात कसलाही संकोच न बाळगणाऱ्या. आजची त्यांची मीटिंग अशीच ''अर्जंट मीटिंग'' होती. पण रिकाम्या पोटी कधी अशी मीटिंग होते का? आणि कोणाच्या घरी नको म्हणून मग कॉफी शॉपचे लाडके स्थळ. इथे वेटरपासून मॅनेजरपर्यंत सर्व स्टाफला कॉफी शॉपमध्ये ह्या चौघीजणी एकत्र आल्या की त्यांना डिस्टर्ब करायचे नाही, त्यांच्या ऑर्डरी घेत राहायच्या आणि भरपूर बिल व उदार टीपांबद्दल मनात खात्री बाळगायची हे सवयीने माहीत होते. 
सुमा कॉफी शॉपमध्ये शिरताच मधूने तिला हात केला. छोट्याशा रुमालाने कपाळावर डवरलेला घाम टिपत टिपतच सुमा आपल्या सीटवर विराजमान झाली. पुढचा काही काळ भराभर ऑर्डरी देणे वगैरेत गेला. पदार्थ येईपर्यंत अजून वेळ होता. मग सुरू झाली चौकशी.

''हं, रेखे, सांग बरं एवढी अर्जंट मीटिंग का बोलावली आहेस ते? '' सुमाने रोकडा सवाल केला.
रेखाने जरा घसा खाकरला, थोडे पाणी प्यायली. तिच्या चेहऱ्यावर घालमेल स्पष्ट दिसत होती. मग अवसान आणून तिने बोलायला सुरुवात केली. ''तुम्हाला माहीत आहे ना, गेल्या महिन्यात मी मुलाकडे जर्मनीला गेले होते ते? ''
''हो गं... जायच्या आधी ते लग्नासाठीच्या मुलींचे, म्हणजे स्थळांचे फोटोजपण नेले होतेस ना? मग?? काय म्हणाला लेक? पसंत पडली की नाही कोणी? '' साक्षीचा चेष्टेचा सूर.
''कसली पसंत पडायला कोणी? त्याने ते फोटोज पाहिले तर ना पुढे काही करणार! ''
रेखाच्या उद्विग्न स्वरावर सुमाला काहीतरी संशय आला.... ''म्हणजे रेखे, त्यानं तिथली गोरी  पोरगी गटवली बिटवली की काय? '' तिच्या सवालावर होकारार्थी मान डोलवताना रेखाचे डोळे एकदम भरून आले. एरवी तडफदारपणे निर्णय घेणारी रेखा असे मूकपणे अश्रू गाळताना पाहून बाकीजणींचे कंठही दाटून आले. तिला काही मिनिटे सावरायला देऊन सुमाने विचारले, ''अगं मग चांगलीच आहे की बातमी! आधी तो लग्न करत नाही म्हणून तुला काळजी होती.... आता त्याने तिथली जर्मन पोरगी गटवली म्हणतेस....असेना का... तुला कुठं तिला इथं भारतात नांदवायची आहे??!! त्यांना म्हणावं द्या लग्नाचा बार उडवून तिथंच.... '' सुमाच्या ह्या वाक्यासरशी रेखाला आता अजूनच रडू यायला लागलं.  हुंदक्यांनी खांदे गदगदा हालू लागले. सगळ्यांच्या लक्षात आले की मन मोकळे करून रडल्याशिवाय हिला काही बरे वाटणार नाही. साक्षी रेखाला हातावर थोपटत सांत्वना देत होती. एवढा वेळ गप्प असणारी मधूदेखील रेखाला मुकाट्याने पर्समधील टिशूज पुरवत होती. थोड्या वेळाने रेखाचा आवेग ओसरला. जरा शांत झाल्यावर ती म्हणाली, 'ए सॉरी हं.... पण आता जरा बरं वाटतंय, तुमच्यापाशी मन मोकळं झाल्यावर! ''
मधूने हलकेच विचारले, ''आता तरी सांगशील का, नक्की काय प्रकार आहे ते? ''
रेखा कसनुसं हसली. ''गेल्या महिन्यात मी अखिलकडे, माझ्या लेकाकडे गेले जर्मनीला तेव्हा तो त्याचं अपार्टमेंट कोणाबरोबर तरी शेअर करतोय असं म्हणाला होता, त्यानं नावपण सांगितलं होतं.... मलाच मेलीला लक्षात नाही... तिथं गेले तर कळलं की त्याच्याबरोबर राहते ती गोरी जर्मन बया आहे!! अस्सल जर्मन, त्याच्यापेक्षा चांगली सात-आठ वर्षांनी मोठीच आहे... त्याच्याबरोबरच काम करते. गेले आठ - दहा महिने बरोबर राहत आहेत दोघं. म्हटलं.. असेल अडचण म्हणून राहत असतील दोघे बरोबर.... पण रात्री ती चक्क लेकाच्या बेडरूममध्ये..... आणि लेकही निर्लज्जपणाने गेला तिच्यासोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं फैलावर घेतलं त्याला... पण म्हणतो कसा, तो आमच्या आयुष्याचा निर्णय आहे. त्यात तुला मध्ये पडायची गरज नाही. इतका राग आला होता त्याचा, वाटलं होतं फाडकन मुस्कटात ठेवून द्यावी त्याच्या... इथं मी त्याच्यासाठी स्थळं शोधत आहे, त्याच्या बाबाचे टोमणे ऐकून घेत आहे, आणि हा शहाणा निवांत त्या पोरीबरोबर बिनलग्नाचा राहतोय.... ''
रेखाच्या स्वरातला कडवटपणा लपत नव्हता. सुमाने मध्येच रेखाला सुचवलं... ''अगं, मग त्या पोरीशी तरी बोललीस की नाही? '' सुमाच्या प्रश्नासरशी  रेखा खिन्न हसली. ''केला ना प्रयत्न तिच्याशी बोलायचा.... खरं तर तिचा आणि अखिलचा खूप राग आला होता मला! पण करते काय, आता त्यानं तिच्याबरोबर राहायचं जर ठरवलंच आहे तर म्हटलं विचारावं तिला तिच्या मनात काय आहे त्याबद्दल ! ''
''मग? '' इति मधू.
''तिच्याशी बोलायचं कसं ही पण पंचाईत! मला जर्मन भाषेचा गंध नाही आणि त्या बयेचं इंग्रजी अगदीच सुमार! दोनदा तीनदा तिला हटकलं, विचारलं, बाई गं, तुझ्या मनात काय चाललंय, सांग तरी मला! पण ती हातवारे करून जे काय बोलायची ते मला तर काहीही कळायचे नाही. मग शेवटी अखीललाच विचारलं, अरे बाबा, तुमचा काही लग्नाबिग्नाचा विचार आहे का.... तर त्याने खांदे उडवले आणि म्हणाला, काही घाई नाही, विचार केला नाही!!!! ''
रेखाच्या बोलण्यासरशी बाकीच्या तिघी आता चांगल्याच गंभीर झाल्या होत्या. तेवढ्यात त्यांनी दिलेल्या पदार्थांची ऑर्डर आली. पदार्थांची मांडामांड होऊन थोडावेळ शांततेने खाण्यात गेला.
''अखिलनं असं वागायला नको होतं, '' साक्षी मध्येच उसळून उद्गारली.
''हो गं, आपण पोरं कष्टानं वाढवायची, त्यांना सर्वात उत्तम शिक्षण कसं मिळेल म्हणून धडपडायचं, त्यांना परदेशात चांगला चान्स आला तर हृदयावर दगड ठेवून त्यांना इतक्या लांब पाठवायचं.... आणि त्यांनी ह्या सर्वाची परतफेड असं वागून करायची! लाजा कशा वाटत नाहीत मेल्यांना!! '' इति मधू.
''मधू, गप्प गं... ए रेखे, मधूच्या बोलण्याकडं फार लक्ष देऊ नको हं... तिला तुझी काळजी वाटते म्हणून बोलत आहे ती असं, '' सुमाने चुचकारले. पण मग तिने न राहवून विचारलेच, ''तुझा नवरा काय म्हणाला गं त्याला हे सर्व कळल्यावर? ''
रेखाने खांदे उडवले. ''काय म्हणणार? खूप संतापला सुरुवातीला, अखिलचा भरपूर उद्धार करून झाला, जर्मनीलाच जातो म्हणाला, त्याचा कान पकडून त्याला फरफटत भारतात आणतो... त्याला चांगलं सुनावतो, वगैरे वगैरे. पण मग त्याच्याही लक्षात आलं की आपण आता काहीही करू शकत नाही!!! अखिलला बोलला तसा तो, पण त्यात काही दम नव्हता. आणि अखिलनं त्याला ठणकावून सांगितलं... फार अकांडतांडव केलात तर फोन-ईमेल सुद्धा बंद करेल तो म्हणून.... ''
''हम्म्म्म.... आखिर बात यहां तक पहुंच गयी है... ठीक आहे, बरं मला सांग, इतर कोणी सांगितलं समजावून अखिलला तर तो ऐकेल का.... '' साक्षीचा हलकाच प्रश्न.
''तोही प्रयत्न करून पाहिला गं... त्याचा लाडका प्रदीपमामा फोनवर चक्क तीन-चार तास बोलला त्याच्याशी! पण अखिलनं त्याला सांगितलं की तो कोणत्याही परिस्थितीत तो गॅबी - गॅब्रिएलाला सोडणार नाही, त्याचं प्रेम आहे तिच्यावर. आणि लग्न करणं वगैरे गॅबीला पसंत नाही. तिचा लग्नसंस्थेवरच विश्वास नाही!!!''
रेखाचे बोलणे संपल्यावर कोणीच काही बोलेना. फक्त काटे-चमचे व क्रोकरीचे आणि कॉफी शॉपमधील इतर लोकांच्या संभाषणाचे आवाज येत राहिले. बाकी सगळ्याजणी विचारात गढलेल्या दिसत होत्या. सुमा शांतपणे आपली कॉफी पीत होती. इतर सख्यांना मात्र तिची ही शांत मुद्रा फसवी असल्याचे माहीत होते. सुमा स्वभावाने धोरणी आणि लांबचा विचार करणारी म्हणून त्यांच्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध होती. त्यानुसार ती अतिशय व्यावहारिक सल्ला देणार ह्याबद्दल शंकाच नव्हती! 
इतर सख्यांचे चेहरे न्याहाळत हातातला कॉफीचा कप सुमाने हलकेच खाली ठेवला आणि घसा खाकरून रेखाला म्हणाली, ''यू नो रेखे, मला वाटतं तू हे सगळं प्रकरण विसरावंस! तू आणि भावजी मस्तपैकी कोठेतरी लांबच्या प्रवासाला जा. मस्त रिलॅक्स व्हा. तुमच्या दिवट्या लेकाचा आणि त्या गॅबीचा विचारही करू नका. मला माहीत आहे, असं करणं तुम्हा दोघांना जड जाईल बहुतेक... पण तुम्हाला दुसरा पर्याय नाहीए असं मला तरी वाटतं.... तुम्ही इथे दुःख करण्याने, अश्रू गाळण्याने अखिलच्या भूमिकेत किंवा परिस्थितीत काहीच फरक घडून येणार नाहीए... मग दुःख करण्याचा काय उपयोग? त्यापेक्षा जरा रिलॅक्स व्हा, दुसरीकडे मन गुंतवा....अखिलच्या आयुष्याचा गुंता त्याचा त्यालाच सोडवू देत! '' 
सुमाचे नेहमीसारखे संयत बोल ऐकून बाकी सख्यांनी रुकारार्थी मान हालवली. पण रेखा अजूनही अस्वस्थ होती. हाताने रिकाम्या प्लेटमधल्या काटा-चमच्याशी उगाचच खेळत बसली होती. अजूनही तिच्या मनात काहीतरी शिल्लक होते.
''रेखे, ते चमच्याशी खेळणं थांबव आणि आम्हाला सांग, तुला अजून काय सतावतंय? '' साक्षीने रेखाच्या हाताच्या अस्वस्थ हालचाली थांबवीत विचारले.
''हो गं, अजून तुम्हाला सगळं सांगितलंच नाहीए मी....'' रेखा सांगू लागली. '' परवा अखिलचा अचानक फोन आला. माझ्याशी बऱ्याच दिवसांनी जरा धड बोलला. मला वाटलं, त्याला नक्कीच आतून अपराधी वाटत असणार! पण नंतर हळूच म्हणाला, ममा, गॅबीला दिवस गेलेत. तू आजी होणार आहेस! आता मला सांगा... अशी बातमी इतक्या कॅज्युअली कसा देऊ शकतो हा? इतका कसा बदलला हा? मी त्याला म्हटलं, अरे आता त्या येणाऱ्या बाळासाठी तरी लग्नाचा विचार करा. तर म्हणाला, तो विषय कधीच संपला आहे. गॅबी लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयापासून जाम मागे हटायला तयार नाही. उलट फार दबाव आणला तर अखिलला सोडून जाईल म्हणाली! तेव्हा मंडळी, माझं अभिनंदन करा, मी आजी होणार आहे म्हणून! अर्थात ही गोष्ट मी कोणालाही उघडपणे, उजळ माथ्याने सांगू नाही शकत! नातेवाईकांना गॅबीविषयी थोडी कुणकूण लागली आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत! आता हे नातवंडाचे सांगितले की झालेच! आम्हाला चारचौघात जायची चोरी होईल! '' रेखा जडावलेल्या आवाजात उसासली.
तिचे बाकीच्या सख्यांनी ओझरते अभिनंदन केले खरे, पण त्यात दम नव्हता. एकंदरीतच सर्व प्रकार सल्लामसलती करून सोडवण्याच्या पलीकडचा होता. अखेर रेखाची अजून जरा समजूत काढून, थोडे हास्य-विनोद करत सगळ्या उठल्या व आपापल्या घरी जायला निघाल्या.
निघताना रेखाच्या चेहऱ्यावरचा ताण जरा हलका झालेला दिसत होता. इतरांच्या विनोदांना ती थोडी हसलीपण होती. अर्थात ती घरी पोचल्यावरही बाकी मैत्रिणी तिला फोन करून तिची ख्यालीखुशाली विचारणार हे नक्की होते. त्यांच्या मैत्रीतला अलिखित नियमच होता तो!

रेखाला मधू आपल्या कारमधून ड्रॉप करते म्हटल्यावर साक्षीला सुमाने घरी सोडण्याची तयारी दाखवली. गाडीत बसल्यावर तिला अचानक आठवले, ''अगं साक्षी, तू तुझ्या लेकाच्या लग्नाबद्दल काही बोललीच नाहीस! तो भेटायला घेऊन येणार होता ना तुझ्या होणाऱ्या सुनेला? मग भेटलात की नाही? '' सुमाच्या प्रश्नासरशी साक्षी हसू लागली. ''का गं, अशी हसत्येस काय? मी काही गमतीचं बोलले का? '' सुमाने खोटं खोटं फुरंगटून विचारले. ''नाही गं, तिथं आपला एवढा गंभीर विषय चालला होता.... मला आमच्या घरच्या लग्नाच्या चित्तरकहाण्या, विहिणीचा नखरा, सुनेच्या बहिणीचा तोरा, व्याह्यांचं सारखा खांदा उडवत बोलणं वगैरे गोष्टी चघळणं अशावेळी अप्रशस्त वाटलं.... त्यासाठी आपल्याला एक वेगळा कॉफी शॉप सेशन करायला लागेल! '' साक्षीच्या विधानासरशी सुमाची कळी खुलली. ''ओह, येस्स्स! डन! जरा रेखीची समजूत घालू काही दिवस, आणि मग आपला ''साक्षीच्या घरचे लग्न'' गॉसिप सेशन करुनच टाकूयात. फार दिवस कोणाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढल्या नाहीत... आपला सेशन झाला की कसं मोकळं मोकळं वाटेल!! '' सुमाने डोळा मारत साक्षीला सुनावले आणि मनावरचा ताण हलका करत, हसत-खिदळतच त्या घराच्या दिशेने रवाना झाल्या.  

-- अरुंधती 

Friday, April 16, 2010

शोलेची आग


काही दशकांपूर्वी शोले चित्रपटाने सारा भारत गाजवला आणि हिंदी चित्रसृष्टीत एक झंझावात निर्माण केला. काल आंतरजालावर मुशाफिरगिरी करत असताना कोठेतरी ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस!

शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते. त्यामुळे मी व बहीण आईसोबत अगदी आयत्या वेळेस तिकिट काढून गेलो चित्रपट पाहायला! [तेव्हाही तो हाऊसफुल्ल व्हायचा कधी कधी!] बहिणीचे वय होते सात वर्षे आणि माझे दहा वर्षे! आमचा सर्व चित्रपट पाहून झाला, चित्रपटगृहातले दिवे लागले, प्रेक्षक बाहेर पडू लागले. आम्हीही जायला उठलो. पाहिले तर धाकटी बहीण मुसमुसून रडत होती. तिला विचारल्यावर ती काही उत्तरही देईना! वाटले, हिला काही दुखले-खुपले तर नाही ना, बरे वाटत नाही का.... काय झाले काहीच कळेना!

कसेबसे तिला चित्रपटगृहाच्या बाहेरच्या आवारापर्यंत आणले. पण तिथे मात्र तिने जोरात भोकांडच पसरला. मी व आई हतबुद्ध! लोकांच्या कुतूहलाच्या नजरांची जागा नंतर काळजीने घेतली. तिथला रखवालदार ओळखीचा होता. तो विचारू लागला, ''बेबीको क्या हो गया? सब ठीक है ना? पानी लाऊ क्या?'' त्याने बिचार्‍याने पाणीही आणले. पण आमच्या बहिणाबाईंना पाणीही नको होते. तिचा हंबरडा काही केल्या आटोपायचे चिन्ह दिसत नव्हते. आंजारून -गोंजारून झाले, जरबेने विचारून झाले, जवळ घेऊन झाले, सर्व शक्य उपाय चालू होते!
बहिणीने तर जमिनीवर लोळणच घ्यायची शिल्लक ठेवली होती!!!

दहा-पंधरा मिनिटे हे नाटक चालू होते. मग मात्र आईचा संयम सुटला. तिने तिच्या खास ठेवणीतल्या करड्या आवाजात बहिणीला विचारले, ''आता काय झाले ते सांगतेस की नाही? का देऊ एक फटका?''
ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडली.
बहिणीचा टाहो एकदम तार सप्तकातून मध्य, तिथून मंद्र सप्तकावर आला... अश्रू वाळले होते त्यांच्या जागी नवे अश्रू येणे बंद झाले. हंबरड्याची जागा हुंदक्यांनी व मुसमुसण्याने घेतली. तिचा तो ओसरलेला आवेग पाहून आईलाही जरा धीर आला. मग मोठ्या प्रेमाने तिने बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला पुन्हा विचारलं, ''काय झालं माझ्या राजाला, सांगशील का आता तरी?''

बहिणीने डबडबलेल्या डोळ्यांनी, आईच्या पदरात तोंड खुपसून स्फुंदत उत्तर दिलं..... ''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''

क्षण-दोन क्षण आईच्या डोक्यात काहीच प्रकाश पडेना! मग तिला उलगडले.... शोलेमध्ये अमिताभ शेवटी मरताना दाखवला आहे! बहिणीचा अमिताभ अतिशय लाडका होता तेव्हा! तिला चित्रपटातील अमिताभची मारामारीही खरीखुरी वाटायची आणि घरी ती अदृश्य शत्रूंबरोबर तोंडाने ढिश्शुम् ढिश्शुम् आवाज काढत हाणामारी करत असायची! तिच्या लेखी ते सर्व खरे असायचे. आणि आता तिला चित्रपटाचे कथानक इतके सत्य वाटत होते की अमिताभ खरोखर मेला आणि तो आता आपल्याला पुन्हा कध्धी कध्धी दिसणार नाही म्हणून तिला अगदी भडभडून व भरभरून रडायला येत होते!!!!!!!

तिच्या त्या निरागसपणापुढे आणि समजेच्या अभावापुढे आई पार शरणागत झाली! बहिणीला काही केल्या चित्रपटातील गोष्टी खोट्या असतात, त्यातील कलाकार असे चित्रपटात दाखवले म्हणजे खरेखुरे मरत नाहीत हे पटायला जाम तयार नव्हते. दादापुता करून तिला घरी घेऊन आल्यावरही तिचे डोळे वारंवार अमिताभच्या आठवणीने (!!) भरून वाहत होते. आम्हाला मात्र आता हसू दाबणे अवघड जात होते.

शेवटी दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा शोले बघितला. त्यात अमिताभला जिवंत पाहून तिला एकदाचे हायसे वाटले! ह्या खेपेस तो मेला तेव्हा ती एवढी रडली नाही!
तिच्या बालमनाला समजेल पण ते दुखावले जाणार नाही अशा रीतीने तिला समजावता समजावता घरच्यांच्या नाकी नऊ आले! पण मग हळूहळू तिला उमजू लागले की चित्रपटातील कथानक सत्य नसते, मारामारी - ढिश्शुम् ढिश्शुम् वगैरे सगळे खोटे असते.... पुढे आम्ही अनेक मारधाड चित्रपट खदखदा हसत पाहिले. पण शोलेचा तो अनुभव अविस्मरणीय होता!!

आजही कधी कधी आम्ही तिला शोलेची आठवण काढून चिडवतो! :-)

--- अरुंधती 


Monday, April 12, 2010

अक्कामहादेवी - एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री
अक्कामहादेवी! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्रीमुक्तिवादी संत! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे. ईश्वराला - शिवाला तिने आपला पती मानले होते. [पुढे १६ व्या शतकात मीराबाईनेही कृष्णाला आपला पती मानल्याची कथा सर्वज्ञात आहे! ]
अक्कामहादेवींची वचने फार मार्मिक आहेत. तिच्या ४३० वचनांमध्ये (कन्नड भक्ती काव्य) ती आपल्या ह्या पतिदेवाशी संवाद तर साधतेच, शिवाय समाजात असलेल्या अनेक अज्ञानमूलक, जाचक बंधनांवर शब्दांचा आसूड उगारते!

कर्नाटकात बाराव्या शतकात शिमोगा तालुक्यात जन्म झालेली ही स्त्री आजही कर्नाटकात घरोघरी तिच्या वचनांच्या रूपात जिवंत आहे. कलह, राजकीय अराजकाच्या अनिश्चित कालात तिने एक अशी चळवळ सुरू केली ज्यामुळे तिला स्त्री सबलीकरण व साक्षात्कारासाठी तळमळीने कार्य करणारी पुरोगामी स्त्री असा सन्मान द्यायला काहीच हरकत नाही. महिला-कल्याणाच्या बाबतीत तिची मते, दृष्टिकोन व कार्य हे आजही स्फूर्तिदायक आहे. त्यामुळे तिला त्या काळातील महिलांच्या उद्धारासाठी झटणारी, गूढदृष्टी असणारी स्त्री संत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कूडल संगम ह्या कर्नाटकातील लिंगायतांच्या तीर्थक्षेत्री होणाऱ्या अनेक अनुभवमंडपातील विद्वज्जनांच्या सभांमध्ये ती तत्त्वज्ञान व मोक्षप्राप्ती (अरिवु) विषयीच्या चर्चा, वादविवादांमध्ये हिरीरीने भाग घेत असे. आपल्या अमरप्रेमाच्या शोधात तिने प्राणी, पक्षी, फळे, फुले, वनस्पती, झाडे, निसर्ग ह्यांनाच आपले सखे-सोबती मानले. घराचा, कुटुंबाचा त्याग करून बाहेर पडली. त्या काळात वर्णाश्रमाच्या कठोर आगीत शूद्र व स्त्रिया होरपळून निघत होत्या. अशा काळात तिने हे बंड पुकारले. तिने फक्त महिलांच्या उद्धारासाठीच काम केले नाही तर अतिशय सुंदर अर्थाची वचने रचली, जी आजही मोठ्या भक्तीने गायिली जातात.
एक अशीही कथा आहे की अक्कामहादेवीचा विवाह कौशिक नामक स्थानिक जैन राजाशी झाला होता. परंतु तिच्या वचनांमधून स्पष्ट कळून येते की ती फक्त 'चेन्नमल्लिकार्जुन' ह्या आपल्या इष्टलिंगालाच - शिवालाच बालपणापासून आपला पती मानत होती. तिच्या काव्यांतून ती भौतिक पातळीवरचे नाशवंत, मर्त्य प्रेम धुत्कारताना व त्या ऐवजी अमर असणारे, ईश्वराचे ''अनैतिक'' अक्षय प्रेम किंवा ''बाहेरख्याली'' प्रेम जवळ करताना दिसते. आणि ह्या मार्गातच ती स्वतःची उन्नती करून घेताना दिसते!
ती तिच्या वचनांत म्हणते,आयुष्यातील सर्व सुख-सोयींना, संपत्तीला लाथाडून अक्कामहादेवीने आयुष्यभर भटकी वृत्ती स्वीकारली व एक कवयित्री-संत म्हणून जीवन व्यतीत केले. ती गावोगावी हिंडत असे व शिवाची स्तुती गात असे. आत्मोद्धारासाठी तिने प्रचंड भ्रमण केले व शेवटी संन्यासिनी झाली व बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे उर्वरित आयुष्य जगली. तिच्या जनरीतीला धुत्कारून आचरणाच्या पद्धतीने तिच्याबद्दल सनातन समाजात बरेच वादंग उठले. त्यामुळे अनुभवमंडपातील सभांना तिला प्रवेश मिळवून देणे हेही तिचे गुरू अल्लम्माप्रभू यांना एकेकाळी कठीण झाले होते. खरीखुरी संन्यासिनी असलेली अक्का महादेवी अंगावर वस्त्रेही घालत नसे असे सांगितले जाते. त्या काळी पुरुष संन्यासी निर्वस्त्र राहणे ही सर्वसामान्य बाब होती परंतु एका स्त्री संन्यासिनीने असे राहणे समाजाला रुचणारे नव्हते. पण त्यांच्या विरोधाला न बधता ती तिचे आयुष्य मुक्तपणे जगत राहिली.
ह्याच काळात अनुभवमंडपाच्या सर्व विद्वान, ज्ञानी दिग्गजांनी तिला ''अक्का'' म्हणून (मोठी बहीण) संबोधायला प्रारंभ केल्याचे दिसते. कल्याण सोडताना ती हे वचन म्हणते, ''षड्रीपुंवर विजय मिळवून व शरीर-विचार -वाणी ह्या त्रयीचा अंत करून द्वैतात; आणि आता 'मी व परमात्मा' ह्या द्वैताचा अंत करून अद्वैतात मी केवळ आपल्या सर्वांच्या कृपेमुळे जाऊ शकले. मी येथे बसलेल्या सर्व विद्वज्जनांना, बसवण्णांना व अलम्माप्रभू-माझ्या गुरुंना प्रणिपात करते. आणि आता मी माझ्या चेन्नमल्लिकार्जुनाशी एकरूप व्हावे म्हणून आपण सारे मला आशीर्वाद द्या.'' ही होती अक्कामहादेवीच्या आयुष्यातील तिसऱ्या पर्वाची सुरुवात! पहिल्या पर्वात तिने भौतिक जगतातील वस्तूंचा व आकर्षणांचा त्याग केलेला... दुसऱ्या पर्वात तिने जगाचे रीतिरिवाज, नियम धुत्कारले व तिसऱ्या पर्वात ती श्रीशैलक्षेत्राच्या शिवमंदिराकडे आपला प्रवास सुरू करते - जिथे तिच्या अमरप्रेमाचा - चेन्नमल्लिकार्जुनाचा वास आहे. हे क्षेत्र १२व्या शतकाच्याही आधीपासून पवित्र स्थान म्हणून ख्यात आहे. श्रीशैलच्या निबिड अरण्यातील कदली ह्या स्थानी अक्का आपले शरीर त्यागते.

१. '' लोक,
स्त्री अथवा पुरुष,
लाजतात जेव्हा त्यांची वस्त्राने झाकलेली शरम,
उघडी पडते

जेव्हा जीवांचा अधिपती,
ह्या जगात बिनचेहऱ्याने वावरतो,
तेव्हा तुम्ही कसली लाज बाळगताय?

जेव्हा सारं जग त्या ईश्वराचेच नेत्र
सर्वदर्शी, सर्वसाक्षी,
तेव्हा तुम्ही काय काय लपवणार?''

तिच्या वचनांतून तिची साधी राहणी, निसर्गप्रेम व चेन्नमल्लिकार्जुनाप्रती भक्ती दिसून येते. ती गाते :

२.'' भुकेच्या निवारणासाठी कटोऱ्यात गावातला तांदूळ आहे,
तहान भागवण्यासाठी नद्या, झरे आणि विहिरी आहेत,
निद्रेसाठी मंदिरांचे भग्नावशेष उत्तम आहेत आणि;
आत्मसुखासाठी हे चेन्नमल्लिकार्जुना, माझ्यापाशी तू आहेस! ''

३. ''तुम्ही हातातील पैसा जप्त करू शकता
पण तुम्ही शरीराचे वैभव जप्त करू शकता का?
किंवा ल्यालेली वस्त्रे तुम्ही फेडू शकता
पण नग्नता, नसलेपण
झाकणारं, आच्छादणारं,
तुम्ही फेडू शकता का?

एका निर्लज्ज मुलीला
जी पद्मपुष्पाप्रमाणे, जुईच्या शुभ्रतेप्रमाणे असणाऱ्या
ईश्वराच्या प्रभातीचा प्रकाश ल्याली आहे;
तिला, हे मूर्खा, कोठे आहे आच्छादनाची किंवा आभूषणांची गरज? ''

श्री शैल मंदिर 

 इंग्रजीतील ओळी 

१. People,
male and female,
blush when a cloth covering their shame
comes loose
When the lord of lives
lives drowned without a face
in the world, how can you be modest?
When all the world is the eye of the lord,
onlooking everywhere, what can you
cover and conceal?
२. For hunger, there is the village rice in the begging bowl,
For thirst, there are tanks and streams and wells
For sleep temple ruins do well
For the company of the soul I have you, Chenna Mallikarjuna!
३. You can confiscate
money in hand;
can you confiscate
the body's glory?
Or peel away every strip
you wear,
but can you peel
the Nothing, the Nakedness
that covers and veils?
To the shameless girl
wearing the White Jasmine Lord's
light of morning,
you fool,
where's the need for cover and jewel?

[वरील बरीचशी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे तसेच अक्का महादेवीच्या वचनांचे शब्द, अर्थ इ. ही उपलब्ध आहेत. सर्वांना ह्या तेजस्वी स्त्री संतिणीची ओळख करून देणे हाच ह्या लेखामागील उद्देश!]
-- -- अरुंधती