Sunday, November 11, 2012

माणूस की पशू?


उषःकालीन आरक्त आकाशापासून ते सायंकालीन आरक्तवर्णी आकाशाच्या प्रवासात नंतर टप्पा येतो तो रात्रकालीन कृष्णवर्णीय आकाशाचा! ज्या सहजतेने रात्रीच्या त्या कृष्णवर्णाला आपण स्वीकारतो तितक्या सहजतेने आपल्या आयुष्यात आपण कृष्णवर्णाला स्वीकारतो का? काळ्या सावल्या, काळा प्रहर, काळे पाणी, काळे विचार .... आपल्या संकल्पनांमध्येही काळ्या रंगाचं व भय, संकट, दुष्टता, निराशा, हीनता यांचं एक नातं बनलेलं दिसतं. आणि माणसाच्या कातडीचा कृष्ण वर्ण? तिथेही काळ्या वर्णाचा पूर्वग्रह आड येताना दिसतो. तीच गोष्ट खुजेपणाच्या बाबतीत. बुटकेपणाभोवती कुचेष्टा, व्यंगात्मक दृष्टीकोन, दोष यांचं तयार केलेलं वलय तर दिसतंच; शिवाय बुटक्या लोकांना एखाद्या पशूप्रमाणे वागविण्याचे प्रकारही कमी नाहीत.

आफ्रिकेतील पिग्मी लोकांना आपल्या कृष्णवर्णामुळे व बुटकेपणामुळे व त्या जोडीला त्यांच्या वन्य  जीवनशैलीमुळे आजवर अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातले अतिशय मानहानीकारक असे सत्र म्हणून ज्याला संबोधिता येईल ते म्हणजे त्यांचे पाश्चात्य जगात एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे केले गेलेले प्रदर्शन! 'पशू व मानव यांमधील आतापर्यंत अज्ञात असलेला दुवा! पशूची मनुष्यावस्थेत उत्क्रांती होत असतानाची आदिम अवस्था!' अशा प्रकारे त्यांची जाहिरात करून त्यांचे ''वैज्ञानिक'' प्रदर्शनात मांडले जाणे व लोकांनी सर्कशीतल्या जनावरांप्रमाणे त्यांच्याशी केलेले वर्तन यांतून मानवी स्वभावाचे विचित्र पैलू समोर येत जातात.

हा काळ होता वसाहतवाद्यांनी नवनव्या भूमी पादाक्रांत करून तेथील स्थानिक लोकांना आपले गुलाम करून घेण्याचा! त्यांच्या जमीनी, नैसर्गिक स्रोत, धन लुटून त्यांच्यावर राज्य करण्याचा, आणि त्यांना आपल्याच भूमीत आश्रित बनविण्याचा. याच काळात घडते ओटा बेंगाची कथा.  


वनातील, निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारे, पशुपक्ष्यांच्या मुक्त सान्निध्यातील स्वतंत्र आयुष्य गुलामीसोबत बरखास्त झाल्यावर गुलामीत जीवन कंठायचे, गुलामीतल्या अत्याचारांपोटी हालअपेष्टा सोसत प्राण गमवायचे की निर्जीव इमारतींच्या जाळ्यात वेढलेल्या व मनुष्यांच्या दयेवर जगणार्‍या संग्रहालयातील पशूंसोबतचे बंदिस्त आयुष्य कंठायचे? प्रगत म्हणवून घेणार्‍या माणसाचे जंगली रूप अनुभवायचे? दोन्ही प्रकारांमध्ये आत्मसन्मानाची होणारी होरपळ, शोषण, निर्बंध, चिरडले जाणे हे तनामनांवर कायमचे ओरखडे ओढणारे....!! आफ्रिकेतील कांगो खोर्‍यातल्या एका वन्य जमातीचा भाग असणार्‍या ओटा बेंगा या पिग्मी तरुणासमोर जेव्हा आपल्या देशात राहून गुलामगिरीत आयुष्य काढायचे की देशाबाहेर जाऊन वेगळे आयुष्य शोधायचे हे पर्याय उभे ठाकले तेव्हा त्याला आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही नसेल! शिकारीसाठी आपल्या टोळीपासून लांब गेलेला ओटा बेंगा जेव्हा शिकारीहून परतला तेव्हा त्याला आपल्या कुटुंबातील सर्व लोक तेव्हा कांगो खोर्‍यावर राज्य करणार्‍या बेल्जियमच्या किंग लिओपल्डच्या सैन्याकरवी मारले गेलेत असे कळले. पुढे त्याला गुलाम म्हणून पकडण्यात व विकण्यात आले.

ओटा बेंगा

इ.स. १९०४ मध्ये सॅम्युएल वर्नर नावाचा एक मिशनरी व व्यवसायाने व्यापारी असलेल्या माणसाची ओटा बेंगाशी गाठ पडली. वर्नरची नियुक्ती सेंट लुईस वर्ल्ड फेअर या अमेरिकेतील प्रदर्शनात पाश्चात्य जगापुढे पिग्मी लोकांचे नमुने मांडता यावेत म्हणून त्यांना गोळा करून आणण्यात झाली होती. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील टप्प्यांमध्ये जगातून गोळा केलेल्या विविध प्रांतांतील एस्किमो, अमेरिकन इंडियन्स, फिलिपिनो यांसारख्या आदिम जमातींच्या लोकांसोबत पिग्मींचेही प्रदर्शन करता यावे हा त्यामागील उद्देश होता. वर्नरने कपड्यांचा एक तागा व एक पौंड मीठाच्या बदल्यात ओटा बेंगाला गुलामांच्या बाजारातून खरेदी केले. वर्नरसोबत प्रवास करत आपल्या गावी पोचेपर्यंत ओटा बेंगाला वर्नरच्या चांगुलपणाची खात्री पटली होती. कारण वर्नरने त्याला गुलामगिरीच्या खाईतून, मृत्यूच्या शक्यतेपासून वाचवले होते. ओटाच्या गावातल्या आणखी काही तरुणांना ''प्रदर्शनात'' सहभागी होण्यासाठी वर्नरने व ओटा बेंगाने राजी केल्यावर ते सगळे अमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुईस वर्ल्ड फेअरसाठी रवाना झाले.

बांबुटी नामक आदिवासी जमातीतील ओटा बेंगाच्या या कहाणीत असं विशेष काय आहे? असं काय खास होतं त्या तरुणात ज्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत, आधुनिक देशाने त्याची दखल घ्यावी? तर ते होतं त्याचं ''आदिम'' असणं! डार्विनच्या सिद्धांतानुसार मनुष्य हे माकडाचं उत्क्रांत स्वरूप! मग माणूस आणि माकड यांच्यादरम्यानची जी अवस्था होती ती कशी असेल याचं उत्तरच जणू तेव्हाच्या काही मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना ओटा बेंगाच्या स्वरूपात मिळालं! तो काळ होता 'सोशल डार्विनिझम'चा! विसाव्या शतकात पदार्पण केलेल्या व स्वतःला  बुद्धीवादी, विज्ञाननिष्ठ व प्रगत समजणार्‍या समाजाने विज्ञानाचा डंका पिटत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा! आपला वंश किंवा आपली जमात जगातील इतर वंशांच्या तुलनेत कशी सर्वश्रेष्ठ आहे, सभ्य - सुसंस्कृत आहे हे दाखवून देण्याचा! त्यासाठी पाश्चात्य जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खुली 'वैज्ञानिक' प्रदर्शने भरवली जात. त्यांमधून जगाच्या कानाकोपर्‍यांतून पकडून आणलेल्या, गुलामीत विकल्या गेलेल्या ''आदिम'' जमातींतील माणसांचे प्रदर्शन भरवत असत. या आदिवासी लोकांना त्यांच्या पारंपारिक वेशभूषा घालायला लावून त्यांचे युरोपियन किंवा आधुनिक वेशातील स्त्री-पुरुषांसोबत प्रदर्शन असे. यात पद्धतशीरपणे हे आदिम लोक कसे अप्रगत आहेत, रानटी आहेत, पशुतुल्य आहेत, अनीतिवान आहेत, हीन आहेत, अस्वच्छ आहेत हे प्रेक्षकांच्या मनावर ठसवले जात असे. आणि त्यातूनच ''आपण यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत, वरचढ आहोत'' हा दुरभिमान आपोआप लोकांच्या मनात जागृत होत असे!


आदिम लोकांच्या बसण्या-उठण्याच्या पद्धती, आचार हे किती अप्रगत आहेत, त्यातून त्यांना आपल्यापेक्षा कमी बुद्धी असल्याचे कसे सिद्ध होते हे ठळक केले जाई. ही प्रदर्शने मोठ्या प्रमाणांवर आयोजित होत. अगदी मोठमोठ्या संग्रहालयांतून, शहरांतून, जत्रांमधून! त्या प्रदर्शनाच्या मालकांना किंवा आयोजकांना लोकांनी भरलेल्या वर्गणीतून उत्पन्न तर मिळेच, शिवाय मानवजातीला आपल्या संशोधनामुळे व उपक्रमामुळे किती फायदा होत आहे याचे महान समाधान त्यांना प्राप्त होत असे! या कार्यक्रमांना लोकांची प्रचंड गर्दी उसळत असे. कित्येकदा गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी खास सुरक्षा तैनात करायचा प्रसंग येई अशी गर्दी या कार्यक्रमांना उसळत असे. आणि त्यात प्रदर्शन केल्या जाणार्‍या आदिम लोकांना सर्कशीतील जनावरांप्रमाणे बघ्या लोकांच्या नजरा सहन करायला लागणे, त्यांनी हात लावून चाचपून बघणे, हेटाळणी, कोणी अंगावर थुंकणे, कुचेष्टा, चिखलफेक यासारख्या अवमानजनक गोष्टींना सामोरे जावे लागे. एखाद्या धनिकाने स्वतःचे पदरी जगातील वेगवेगळ्या प्राण्यांचा संग्रह करावा तसे काही मोजके धनिक या गुलामांचा संग्रह करून त्यांचे प्रदर्शन भरवत असत, त्यातून प्रसिद्धी मिळवत असत व विज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करायला आपण कसे तत्पर आहोत याबद्दलचा मानमरातब मिळवण्यातही ते कमी नसत.

स्टुटगार्ट येथील ''पीपल्स शो'' ची जाहिरात 
डार्विनच्या सिद्धांतातील मोजक्या वाक्यांना उचलून व त्या वाक्यांचा विपरीत अर्थ लावून आपले सामाजिक व वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याची अहमहमिका तेव्हाच्या पाश्चात्य जगात लागली असल्याचे दिसून येते. पुढे याच वांशिक वर्चस्वाच्या संकल्पनेतून नाझीवादाचा उदय झालेला दिसतो. (संदर्भ : ब्राँक्स पशुसंग्रहालयाचे संस्थापक व वर्णद्वेषी असणार्‍या मॅडिसन ग्रँट यांना त्यांनी लिहिलेले पुस्तक आपले ''बायबल'' असण्याचे सांगणार्‍या व त्यांच्या कार्याची प्रशंसा करणार्‍या, खाली 'अ‍ॅडॉल्फ हिटलर' अशी सही असलेल्या पत्राची सॅम्युएल वर्नर यांचा नातू फिलिप्स ब्रॅडफोर्ड याने सांगितलेली आठवण)

 




आदिम लोकांची मानवी ''वैज्ञानिक'' प्रदर्शने

ओटा बेंगाच्या अगोदरही आफ्रिकेतून आणलेल्या गुलाम तरुण, तरुणींना प्रदर्शनांत मांडले जाई. प्रदर्शनात त्यांना पाहायला येणारे पाश्चात्य लोक त्यांच्या अंगाला हात लावून त्यांची चाचपणी करत. सारा बार्टमन उर्फ हॉट्टेन्टॉट व्हीनस या आफ्रिकन गुलाम तरुणीला अशा तर्‍हेच्या अत्यंत अवमानजनक प्रदर्शनांमधून जावे लागल्याची नोंद आढळते. प्रदर्शनाला येणार्‍या 'सभ्य' बायका तिचा स्कर्ट उचलून तिच्या अवयवांची पडताळणी करत असल्याचीही नोंद आढळते.

पकडून आणलेल्या गुलामांची स्थिती

ज्या ज्या गुलामांना प्रदर्शनासाठी किंवा वैज्ञानिक सिद्धांतांच्या नावाखाली पकडून आणले गेले त्यांची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' अशी होती हे इथे नमूद करणे महत्त्वाचे वाटते. मायदेशी गुलामीत, पकडलेल्या अवस्थेत, अवमानित, बंदिस्त, अतीव कष्टांचं आणि अनिश्चित आयुष्य जगावं की नियतीवर भविष्याचा हवाला ठेवून परक्या देशात, परक्या संस्कृतीत व परक्या माणसांमध्ये तुलनेने कमी कष्टाचं परंतु अवमानित, पशुतुल्य जीणं जगावं?

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा

सॅम्युएल वर्नर मलेरियामुळे आजारी पडल्यावर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना वर्नरशिवायच सेंट लुईस फेअरमध्ये सामील व्हावे लागले. नंतर जेव्हा वर्नर तिथे पोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की या पिग्मी तरुणांना प्रदर्शनातील आदिमतेचा नमुना म्हणून लोकांसमोर येण्याबरोबरच कैद्यासारखे आयुष्य जगण्याची वेळ आली होती. लोकांची गर्दी त्यांना थोडाही वेळ एकटे सोडत नसे. एका अमेरिकन वृत्तपत्राने ओटा बेंगाची प्रसिद्धी ''अमेरिकेतील एकमेव नरभक्षक आफ्रिकन'' अशी तर केलीच, शिवाय आपले मगरीसारखे दात दाखवण्याबद्दल तो लोकांकडून प्रत्येकी पाच सेंट्स घेत असे, ते पुरेपूर वसूल होत असल्याचे वृत्त दिले. तोवर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरचे आफ्रिकन पिग्मी हे रानटी, जंगली पशुतुल्य लोक असल्याची जनसामान्यांची खात्री झाली होती.

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा व साथीदार

सेंट लुईस फेअरवरून ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना न्यू ऑर्लिन्सला नेण्यात आले. तिथून ते आफ्रिकेत परतले. पण आफ्रिकेतील ओटा बेंगाचे कुटुंब नष्ट झाल्यामुळे व तेथील गुलामगिरीमुळे ओटाला आता तिथे थांबण्यात रस नव्हता. आधीच्या आयुष्यात तो रुळू शकत नव्हता. मग तो १९०६ मध्ये सॅम्युएल वर्नर सोबत पुन्हा अमेरिकेत परतला आणि इतिहासातील एका अतिशय शरम आणणार्‍या घटनापर्वाची सुरुवात झाली.

वर्नरने ओटा बेंगाची सोय अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे केली, कारण अन्य कोणी या पिग्मी तरुणाला ठेवून घेण्यात उत्सुक नव्हते. सॅम्युएल वर्नर स्वतः आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो तिथून दुसर्‍या ठिकाणी स्वतःच्या पोटापाण्याची सोय बघायला निघून गेला. म्युझियममध्ये ओटाला करण्यासारखे काहीच नव्हते. तिथे येणार्‍या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापलीकडे त्याला काहीच उद्योग नव्हता. लोक त्याला त्याचे दात दाखवायला सांगत. तोही अत्यल्प पैशांच्या बदल्यात त्यांना आपले दात दाखवत असे. पण लवकरच तो त्या जिण्याला कंटाळला व विचित्र तर्‍हेने वागू लागला. त्याने तिथे त्याला बघायला आलेल्या एका महिलेच्या रोखाने खुर्ची फेकल्याचे सांगण्यात येते. तिथून त्याची हकालपट्टी झाली. मग तिथून ओटा बेंगाची रवानगी न्यू यॉर्क येथील ब्राँक्स पशूसंग्रहालयात करण्यात आली.

ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगा 

ब्राँक्स पशुसंग्रहालयाने केलेल्या जाहिरातीतील ओटा बेंगाचे छायाचित्र


''द आफ्रिकन पिग्मी 'ओटा बेंगा',
वय २३ वर्षे, उंची ४ फूट ११ इंच
वजन १०३ पौंड्स,
दक्षिण मध्य आफ्रिकेच्या कांगो राज्यातून कसाई नदीच्या भागातून डॉ. सॅम्युएल पी. वर्नर यांचेद्वारा आणला गेला आहे.''

ब्राँक्स पशुसंग्रहालयातील प्रदर्शनात ओटा बेंगाच्या पिंजर्‍यापुढे लावलेली ही पाटी. आफ्रिकेच्या जंगलातून आलेल्या या कृष्णवर्णाच्या, बुटक्या, मगरीसारखे दात असलेल्या तरुणाची जाहिरात माणूस व माकडाच्या उत्क्रांतीमधील दुवा म्हणून अगोदरच झाली होती. पशूसंग्रहालयात ओटाच्या कडेवर कधी मुद्दाम एक ओरांगउटान माकड दिलेले असे. माकडासोबतचे खेळतानाचे, कुस्ती करतानाचे त्याचे फोटो तत्कालीन वृत्तपत्रांनी मोठ्या चढाओढीने प्रसिद्ध केले होते. ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगाला ज्या पिंजर्‍यात ठेवले होते तिथे जंगलाचा 'इफेक्ट' येण्यासाठी माकडासोबत एका पोपटाला देखील ठेवले होते. त्याच जोडीला आजूबाजूला हाडे विखरून ठेवण्यात आली होती. अनवाणी पायांनी वावरणार्‍या ओटाला जेव्हा पायात घालण्यासाठी बूट देण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे एकटक बघणार्‍या ओटाला पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उसळल्याचे सांगण्यात येते. त्याच्याकडे बोट दाखवून मोठमोठ्याने हसत ते ओटाच्या 'जंगली' वागण्याची चर्चा करत. त्यात ओटा कधी चित्रविचित्र भावमुद्रा घेऊन त्यांचे मनोरंजन करत असे. आफ्रिकेच्या जंगलात वाढलेला ओटा बेंगा धनुष्यबाणाने लक्ष्याचा वेध घेण्यात पटाईत होता. जंगली वेलींच्या सहाय्याने विणकाम करण्यातही तो प्रवीण होता. त्याच्या जमातीतील इतर लोकांप्रमाणे त्याने आपल्या दातांना मगरीच्या दातांप्रमाणे कोरून घेतले होते. या सर्वाची प्रेक्षकांना खूप नवलाई वाटत होती. मनोरंजनाबरोबरच आफ्रिकेतून आणलेल्या या 'पशुवत्' माणसाच्या जंगलीपणाविषयी व अप्रगतपणाविषयी त्यांच्या मनात खात्री होत होती.

परंतु लवकरच अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्च मिशनर्‍यांच्या निषेधामुळे ओटा बेंगाच्या या प्रदर्शनाला टाळे लागले. मिशनर्‍यांचा निषेध हा एका आफ्रिकन कृष्णवर्णीय माणसाला माकड आणि मनुष्य यांच्यामधील दुवा म्हणून त्याचे अवमानजनक प्रदर्शन करण्याबद्दल तर होताच, शिवाय त्यामागे आणखी एक कारण होते. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनुसार डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध होता. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे असे जाहीर प्रदर्शन ख्रिश्चन धर्माच्या विरोधात मानले गेले.

या आणि काही नागरिकांकडून झालेल्या निषेधाची दखल घेऊन ओटा बेंगाचे जाहीर प्रदर्शन जरी थांबविले गेले तरी तो राहायला अद्याप ब्राँक्स पशूसंग्रहालयातच होता. तोवर त्याचे नाव घरोघरी झाले होते. लोक त्याला पाहायला पशूसंग्रहालयात मोठ्या संख्येने गर्दी करत होते. एका दिवशी ४०,००० लोकांनी ओटा बेंगाला बघण्यासाठी पशुसंग्रहालयाला भेट दिल्याची नोंद टाईम्स वृत्तपत्राने केली. तसेच हे लोक बेंगाची खुलेआम टवाळी करत होते, त्याला ढकलत होते, पाडत होते, त्याची कुचेष्टा करून त्याला अवमानजनक शब्दांनी पुकारत होते ह्या घटनेची नोंदही टाईम्सने केली आहे.

नंतर ओटा बेंगाची रवानगी एका अनाथालयात झाली. कालांतराने तिथूनही त्याला हलवले व लिंचबर्ग येथे स्थलांतरित केले. या नव्या ठिकाणी ओटाने रुळायचा जिकीरीचा प्रयत्न केला. तो तोडकी-मोडकी इंग्रजी भाषा शिकला. त्याने आपल्या मगरीच्या दातांप्रमाणे कोरलेल्या दातांना कॅप्स घालून घेतल्या, आपले नाव 'ओटो बिंगो' असे बदलून घेतले, तो तंबाखूच्या कारखान्यात काम करू लागला. जवळच्या जंगलात तो आपले धनुष्य-बाण घेऊन शिकारीसाठी जात असे, जंगलातून औषधी वनस्पती शोधून आणत असे. पण त्याचे मन आता या देशात रमत नव्हते. इथे त्याने ज्या प्रकारची माणसे पाहिली, जशा प्रकारचे वर्तन अनुभवले त्यानंतर त्याला आपल्या मायदेशी परत जायचे होते. त्याला आपल्या लोकांची आठवण येत होती. पण त्याच वेळी १९१४ मध्ये पहिले जागतिक महायुद्ध उभे ठाकले. आता ओटाकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. नव्याची नवलाई बर्‍यापैकी ओसरली होती. ब्राँक्स पशूसंग्रहालयाच्या झालेल्या बदनामीमुळे अनेकांचे हात काही प्रमाणात पोळले होतेच! त्यामुळे ओटा बेंगाकडे पाहायला किंवा त्याच्या भवितव्याची चिंता करायला कोणीच उरले नव्हते. ओटाला स्वतःला मायदेशी जायचे असले तरी त्याच्यापाशी परत जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते व आवश्यक मदतीचे स्रोतही नव्हते. त्याने 'सभ्य' माणसाच्या जीवनशैलीला हळूहळू का होईना, जरी स्वीकारले, तरी तो सभ्य माणूस त्याला स्वीकारायला तयार नव्हता. त्यांच्या लेखी ओटा बेंगा हा जंगलातून आलेला आदिम प्राणीच होता. हळूहळू ओटा बेंगा नैराश्याने पुरता ग्रस्त झाला. शेवटी त्या नैराश्याच्या भरात त्याने आपल्या दातांच्या कॅप्स उखडून फेकून दिल्या आणि चोरलेल्या पिस्तुलाने स्वतःच्या छातीत गोळी झाडून प्राण त्यागले.    

पुढे नाझी भस्मासुराच्या आगीत वांशिक वर्चस्वाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाल्यावर वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याच्या हेतूने भरवली जाणारी मनुष्यांची ही ''वैज्ञानिक'' प्रदर्शने मागे पडली.
 

सध्याच्या काळातील ''ह्यूमन झू''

थायलंडमध्ये उत्तरेला, ब्रह्मदेशाजवळच्या सीमाप्रांतात एक ब्रह्मदेशातील निर्वासितांची जमात थायलंड सरकारच्या आश्रयाने निवास करून आहे. कारेन नामक पर्वतप्रांतात राहणार्‍या आदिवासी जमातीतील या लोकांमध्ये स्त्रियांची लांब मान हे त्यांच्या सौंदर्याचे प्रतीक मानण्यात येते. त्यासाठी अगदी लहान वयातच मुलींच्या मानेभोवती पितळी रिंगांची वेटोळी वळी घातलेली दिसून येतात. मुलींचे वय वाढत जाते तसतशी वळ्यांची वेटोळीही वाढविण्यात येतात. मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये या मानेभोवतीच्या पितळी रिंगचे वजन १० किलोंचे असते. वस्तुतः त्यात मुलींची मान लांब न होता त्यांच्या गळपट्टीच्या हाडामध्ये व्यंग निर्माण होते. या लोकांना आश्रय देऊन त्या बदल्यात थायलंड सरकारने त्यांचे ह्यूमन झू बनविले असल्याचा आरोप थायलंड सरकारवर केला जातो. कारण या लोकांचा तेथील पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. त्यांना पाहण्यासाठी व त्यांच्या वस्तीला भेट देण्यासाठी, गळ्यात रिंग्ज घातलेल्या मुलींना निरखण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.






एखाद्या प्रदर्शनात मांडावे तसे त्या मुली-स्त्रियांचे प्रदर्शन या वस्तीतून मांडलेले असते. त्यासाठी प्रत्येक पर्यटकाला दहा डॉलर्सचे शुल्क भरावे लागते. त्यांच्या वस्तीत गेल्यावर या आदिवासी लोकांनी बनविलेल्या कलावस्तूंना खरेदी करण्यासाठीही पर्यटकांचा पाठपुरावा केला जातो. या निर्वासितांना तात्पुरत्या व्हिसावर येथे राहायची परवानगी आहे. मात्र त्यांचा व्हिसा त्यांच्या ''शो'' च्या मालकाने काढून घेतला आहे, त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय ते कोठेही जाऊ शकत नाहीत. या लोकांचे पुनर्स्थापन करण्याची तयारी न्यू झीलंड सारख्या देशांनी दाखवली. परंतु थायलंड सरकार त्यांना सोडायला तयार नाही. तसेच त्यांना यापेक्षा जास्त चांगले जीवन कुठे मिळू शकणार आहे, असाही एक दावा केला जातो. ब्रह्मदेशातील सशस्त्र बंडखोर गटांनी या लोकांना त्यांच्या मूळ प्रदेशात नेऊन तिथे त्यांचे पर्यटकांसाठी प्रदर्शन मांडण्यात रस दाखवल्याचे सांगितले जाते. थायलंड सरकारने या लोकांचे कोणतेही पुनर्वसन अद्याप केलेले नाही. या लोकांना अतिशय तुटपुंज्या उत्पन्नावर जगावे लागते. त्यांच्या आयुष्यात कोणतेही स्थैर्य नाही. त्यांच्या जमातीतील मुली गळ्यात रिंग घालायची ही प्रथा इच्छा असली तरी मोडू शकत नाहीत, कारण त्यांनी ती प्रथा पाळण्यावर तेथील पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे. शेवटी तेथील असुरक्षित आयुष्याला कंटाळून, निषेध म्हणून या जमातीतील तरुणी व मुलींनी २००६ सालापासून आपल्या गळ्यातील रिंग्ज काढून ठेवायला सुरुवात केली. जानेवारी २००८ मध्ये जागतिक राष्ट्रसंघाच्या हाय कमिशनरांनीही या लोकांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली.

पॅरिसमध्ये आता इ.स. १८०० ते १९५८ पर्यंतच्या काळात भरवल्या गेलेल्या वेगवेगळ्या ह्यूमन झूं विषयीची माहिती एकत्रित स्वरूपात पाहावयास मिळते. त्या काळातील ह्यूमन झूंसंबंधित वेगवेगळी चित्रे, शिल्पे, जाहिराती, चित्रपट, पोशाख, पोस्टर्स यांचे हे एकत्रित प्रदर्शन सुन्न करणारे, गोठवून टाकणारे असल्याचा अनुभव अनेक मंडळी सांगतात. शोषणाच्या या अगणित कथांमधून त्या काळात अशा प्रकारे प्रदर्शन केल्या गेलेल्या ३५,००० लोकांच्या आयुष्याचा आलेख पाहावयास मिळतो. विज्ञानाच्या मुखवट्याआड दडलेल्या क्रौर्याचे व विकृत कुतूहलाचे नमुने पाहावयास मिळतात. माणसांनी माणसांचे मांडलेले हे प्रदर्शन ''माणूस'' या प्राण्याविषयी आणखी काय काय सांगते हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

संदर्भ :

* वॉशिंग्टन पोस्ट मधील अ‍ॅन हॉर्नडे यांचा ३ जानेवारी २००९ रोजीचा लेख : द क्रिटिकल कनेक्शन टू द क्युरियस केस ऑफ ओटा बेंगा

* द गार्डियन २९ नोव्हेंबर २०११ मधील अँजेलिक ख्रिसाफिस यांचा 'पॅरिस शो अनव्हेल्स लाईफ इन ह्यूमन झू' लेख.

* ओटा बेंगा वरील विकीपीडियातील लेख

* सारा बार्टमन बद्दल विकीपीडियातील लेख

* ह्यूमन झू बद्दल विकीपीडियातील लेख
 
* द ह्यूमन झू : सायन्सेस डर्टी लिटल सिक्रेट, २००९ माहितीपट.

* प्रो. सूझन विल्यम्स यांचे ग्रँड रॅपिड्स कम्यूनिटी कॉलेज, मिशिगन येथील रेस अँड एथ्निसिटी कॉन्फरन्स २०११  मधील लेक्चर.

(छायाचित्रे विकीपीडिया व आंतरजालीय स्रोतांमधून साभार)