Thursday, January 28, 2010

दंतविहीनांचे दाताळ अनुभव


आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे? आता एखाद्या छोट्या बाळाचे बोळके निरागस हसू पाहून आपल्याही चेहऱ्यावर जसे नकळत स्मित उमटते त्याच सहजतेने कोणा म्हातारबाबांचे किंवा म्हातारबाईंचे बोळके हसू पाहिले की मलाही हसू फुटल्याशिवाय राहत नाही. कदाचित या हास्याचा संबंध बालस्मृतींशीही असण्याची दाट शक्यता आहे! आमच्या भाड्याच्या जागेच्या मालकीणबाई आमच्याच खालच्या जागेत राहायच्या. त्या व्यवसायाने डेंटिस्ट (दंतशल्यविशारद) होत्या. घरातच त्यांचा ऐसपैस दवाखाना होता. त्यांच्याकडे अनेक लोक कवळ्या बनवून व बसवून घ्यायला येत असत. त्यांच्याकडील पेशंट्स चेहऱ्यावरील करुण भावावरून सहज ओळखता येत असत. येताना व जातानाच्या त्यांच्या चेहऱ्यांत जमीन-अस्मानाचा फरक पडलेला असे. कदाचित म्हणूनच मी व आमच्या कुटुंबीयापैकी कोणीही त्यांच्याकडून आमचे दंतकाम करून घेण्यास कधीच धजावलो नाही. कवळ्या सोडल्या तर त्यांच्याकडे इतर पेशंट्सची फारशी गर्दी नसे. दवाखान्याच्या आतील बाजूस असलेल्या छोटेखानी जागेत त्यांचे हे कवळ्यांचे कारा(गीर)गृह थाटलेले होते. अतिशय जुनाट हत्यारांनी त्यांचे हे कवळीकाम चालत असे. अनेकदा मी व मालकीणबाईंचा माझ्याच वयाचा नातू दवाखान्यावरील पोटमाळ्यात लपून भयचकित व उत्कंठित नजरांनी ह्या कवळ्या आकाराला येताना पाहत असू. नंतर मोठ्यांची नजर चुकवून त्या कवळ्या व त्यांचे साचे हळूच हाताळत असू. वरच्या व खालच्या जबड्याच्या कवळ्या एकमेकांवर आपटण्याचा आविर्भाव करत त्या कवळ्याच जणू बोलत आहेत अशा थाटात घशातून वेगवेगळे आवाज काढण्यात आम्हाला फार मजा वाटे. मालकीणबाईंच्या यजमानांनाही वयोपरत्वे कवळी बसवली होती. तोंड धुताना त्यांनी कवळी काढून बाजूला ठेवली की ती कवळी लंपास करून धावत सुटायचे हा आमचा लाडका उद्योग होता. मग नंतर दोन-चार धपाटे खाल्ले की ती कवळी परत केली जायची. मालकीणबाईंचे यजमान आपली कवळी काचेच्या पेल्यात घालून विसळायचे. प्रत्येक खाण्याजेवणानंतर त्यांना बेसिनवर उभे राहून भांडी घासल्यासारखी त्यांची कवळी घासताना पाहून आमच्या बालमनांमध्ये उगाचच करुणा दाटून यायची.

दर रविवारी त्यांच्याकडे त्यांचा समवयस्क मित्रमैत्रिणींचा रमीचा नाहीतर ब्रिजचा अड्डा जमायचा. करड्या-पांढऱ्या केसांचे बॉब्ज केलेल्या, स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेल्या, ओठांना लिपस्टिक फासलेल्या मालकीणबाईंच्या मैत्रिणींना खाण्या-पिण्याची राउंड झाल्यावर हळूच बेसिनवर आपली कवळी काढून साफ करताना पाहून आम्हा बालकांना हसू न आले तरच नवल! त्यामुळे कवळी व बोळके यांचे दर्शन झाले की आजही माझ्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते. मध्यंतरी माझे वडील व दोन्ही काका एका कार्याच्या निमित्ताने एके गावी गेले होते. तेथील लोकांनी त्यांना हौसेने खाऊ म्हणून बॉम्बे हलवा दिला. आता ज्यांनी हा हलवा खाल्ला किंवा पाहिला आहे त्यांना कल्पना असेल की तो किती चिकट व चिवट असतो ते! परतीच्या प्रवासात अपरात्री भूक लागली म्हणून त्यांनी हा हलवा खायला घेतला अन... काकांची कवळीच हलव्यात रुतून बसली व ती निघता निघेना! इतर दोन्ही बंधू भावाला साहाय्य करण्याचे सोडून खदखदा हसत भावाची फजिती पाहत बसले. मग वडिलांनी हलवा खायला घेतला. त्यांची अपेक्षा की आपल्या तोंडात एकच दात शिल्लक असल्यामुळे हा हलवा आपल्याला त्रास देणार नाही. परंतु त्यांची ही आशा अतिशय फोल ठरली. त्या हलव्याने त्यांच्या एकुलत्या एक दाताला व हिरड्यांना असे काही घोर आलिंगन दिले की ते रात्रभर कळवळत होते. दुसऱ्या काकांनी सुज्ञतेने हलवा न खाता भुकेले राहणे पसंत केले. हा किस्सा मी मोठ्या चवीने हसत हसत चुलतभावाला ऐकवत होते तर तो म्हणाला, काळजी करू नकोस! त्याचे बाबा (माझे काका) काशी-प्रयागाला गेले होते तेव्हा त्यांनी गंगेत डुबकी लगावली आणि त्यांची कवळीच गंगेच्या प्रवाहात वाहून जायला लागली!! ('हर हर गंगे' म्हणताना त्यांचे तोंड त्यांनी जरा जास्तच उघडले असावे! ) आणि कवळीच्या मागे ते 'माझी कवळी, माझी कवळी' करत जाऊ लागले, आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे दोस्त आपला मित्र असा कोठे चालला म्हणून त्यांना सावरायला त्यांच्या मागे मागे!!! कोणालाच नक्की काय गोंधळ चाललाय ते लक्षात येईना! शेवटी कसेबसे गंगेच्या वेगवान प्रवाहाच्या दिशेने कवळीच्या मागे जाणाऱ्या माझ्या काकांना लोकांनी आवरले व त्यांना त्यांच्या कवळीसकट काठावर आणून सोडले. एक दिवस माझी थोरली मावशी आमच्याकडे आली. आईने तिला काहीतरी खाण्याचा खूप आग्रह केला. पण ही आपली काहीच खायला तयार होईना. फार बोलत पण नव्हती. खूप खोदून विचारल्यावर तिने हळूच सांगितले, अगं, आज कवळी घरीच विसरले! ती घाईघाईत कवळी घालायचे विसरून आली होती. अशीच एकदा प्रवासाला गेले असताना सोबत एक वृद्ध बाई होत्या. सकाळी त्या तोंड वगैरे धुवून आल्या व त्यांच्या हँडबॅगेत काहीतरी धुंडाळू लागल्या. त्या शोधत असलेली वस्तू त्यांना काही केल्या सापडेना. अगदी हैराण झाल्या होत्या. न राहवून मी त्यांना मदत करू का, म्हणून विचारले. तशी त्यांनी त्यांची हॅंडबॅगच माझ्या पुढ्यात ठेवली व लाल रंगाची नक्षीकामाची डबी त्यातून धुंडाळायला सांगितले. आतील सामानाची बरीच उलथापालथ केल्यावर मला एकदा का ती डबी सापडली. वाटले, काहीतरी दागिना असेल म्हणून त्या एवढ्या कासावीसपणे शोधत असतील. पण छे! आत त्यांची आदल्या रात्री काढून ठेवलेली कवळी होती!! परवा सकाळी न्याहारी करताना अचानक आईचा समोरचा दात तिच्या हातात आला. गेल्या वर्षभरात अनेक दातांनी तिचा निरोप घेतला आहे. आता समोरचा, दर्शनी भागातील दात असा दगाबाजाप्रमाणे कोणतीही पूर्वकल्पना न देता गारद व्हावा म्हटल्यावर ती दुःखी झाली. तिच्या गेलेल्या दाताचा ती असा शोक करीत असताना मला मात्र तिच्या मुखातील दर्शनी भागातील खिंडार पाहून कमालीचे हसू येत होते. शेवटी ते दाबलेले हसू बाहेर पडलेच! एकदा का मी हसू लागले आणि ते आवरताच येईना! त्याच दिवशी दुपारी माझ्या दाढेचा एक तुकडा अलगद हातात आला. आईने माझ्याकडे फक्त विजयी मुद्रेने पाहिले. मलाही आता कल्पनेत माझी बोळकी मूर्ती दिसू लागली होती!!
-- अरुंधती

No comments:

Post a Comment