Tuesday, February 16, 2010

कौतुक! कौतुक!! त्रिवार कौतुक!!!


खर्रच कित्ती कित्ती कौतुक करू ह्या मंडळींचं!! रोज वृत्तवाहिन्यांना "बाईटस" पुरवता पुरवता त्यांना बहुधा लोकांना आणि प्रसिद्धिमाध्यमांना खेळवायची सवय झाली आहे! म्हणूनच कोणता तो खान पाकिस्तानचं तोंडभरून कौतुक करतो, कोणते ठाकरे लग्गेच आक्षेप घेत शरसंधान सुरू करतात, मुख्यमंत्री बाकीची कामं सोडून चित्रपटाला आपली 'अस्मिता' बनवतात, गृहमंत्री गुप्तहेर खात्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांना झुगारून राज्याच्या सुरक्षेऐवजी चित्रपटाच्या व चित्रपटगृहांच्या सुरक्षेमागे लागतात, 'जोडे' उचलणारे मंत्री 'जोडीने' चित्रपट दुसऱ्यांदा, जाहिरात करून बघतात, सगळे मान्यवर मंत्रीमहोदय कार्यालयीन कामकाज सोडून चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावतात, समस्त पोलिसयंत्रणा त्यासाठी युद्धपातळीवर राबवली जाते आणि जिथे पोलिसांनी असायला, पहारा द्यायला हवे होते तिथे पोलिस सापडतच नाहीत मुळ्ळी!!! कस्से फसवले त्या दहशतवाद्यांना!!!!! आहे ना गंमत? का s s य डेअरिंग आहे नाही आपल्या सरकारचं? बघा, कशी छाती फुलवून सांगत होते.... टाप झाली का कोणाची त्या खानाच्या नखाला धक्का लावायची!! त्यांना आता ह्या वर्षीचे सर्व पद्म पुरस्कार जाहीर करा, अनुदाने द्या, आदर-सत्कार करा त्यांचे! अहो, लोकांचे प्राण काय, रोजच जात असतात! कधी शेकड्यात, कधी हजारात. कधी आजारात, कधी अपघातात, कधी आत्महत्यांमध्ये नाहीतर कधी घातपातात! त्यात नवल ते कसलं? पण अशा चित्रपटदर्शनाच्या गोष्टी वारंवार होतात का बरं? आणि आता लावली आहे ना 'सिक्युरिटी' त्यांनी जर्मन बेकरी, कोरेगाव पार्क जवळ.... हां, बॉम्बस्फोट होऊन गेला म्हणून काय झालं? दहशतवाद्यांशी संबंधित कोणी तिथं पुन्हा आपल्याला कसं पकडताहेत, किंवा काय काय नुकसान झालं हे बघायला आलं तर? त्यांना लग्गेच अटक करायला नक्को का तिथं पोलिस यंत्रणा? म्हणूनच सर्वांच्या अक्कलहुश्शारीचं कौतुक कित्ती बाई करू? माझ्याकडे शब्दच नाहीत.... आता त्यांना ह्या वर्षीच्या सर्व जागतिक पुरस्कारांसाठी आपण पुढं करु....
--- अरुंधती

4 comments:

 1. Anonymous7:39 PM

  मला वाटते पुढील निवडणुकीत या जोडे उचलणार्‍यांना जनतेने जोडे हाणायला हवेत.
  असले जोडे खरतर यांना कधिच पडायला हवे होते, पण यांनी अक्कल हुशारीने जनतेला कायमच मुर्ख ठेवल आहेना.
  जनता कधि कोणत्या तर कधि कोणत्या प्रश्नात त्रस्त असते आणि हे आपली सत्ता अतिशय शहाणपणाने पुन: पुन: हस्तगत करण्यास तयारच असतात.

  ReplyDelete
 2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 3. आपल्याकडे एक म्हण आहे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं.

  ReplyDelete
 4. हम्म्म, हीच का 'लोकशाही'?
  प्रतिसादाबद्दल धन्यवाद, कांचन!

  ReplyDelete