Monday, April 19, 2010

कॉफी शॉप सेशन


''रेखे, पोचलीस का गं कॉफी शॉपमधे?'' सुमाचा आवाज ऐकून रेखाने आपला मोबाईल स्पीकर मोडवर ऑन केला.
''तुला काय वाटतंय? तूच ऐक आता... '' रेखाचे वाक्य संपते न संपते तोच मधू व साक्षी दोघींनीही ''सुमे, कुठं अडकली आहेस? अगं कित्ती उशीर लावशील? पोटात कावळे कोकलताहेत, लवकर ये... फाजीलपणा करू नको फार!!! '' अशा आवाजात एकच गजर केला. हसत हसतच कॉल संपवून त्यांनी रेखाकडे पाहिले. रेखा हसत होती खरी, पण त्यात नेहमीचा मोकळेपणा नव्हता. जणू सुमा यायचीच वाट की रेखाच्या मनात कोंडलेली वाफ बाहेर पडायच्या तयारीत होती.

सुमा, रेखा, मधू व साक्षी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी! आज तीन दशके उलटून गेली तरी आपली मैत्री लग्न, नोकऱ्या, मुलं, आजारपणं, रोजची दगदग, अडचणी ह्यांच्या धबडग्यात टिकवून ठेवणाऱ्या. वयाच्या पन्नाशीनंतरही आपल्या कॉलेजच्या जीवाभावाच्या मैत्रिणींबरोबर आपली सुख दुःखे वाटण्यात, अडचणीच्या वेळेला सल्ले मागण्यात कसलाही संकोच न बाळगणाऱ्या. आजची त्यांची मीटिंग अशीच ''अर्जंट मीटिंग'' होती. पण रिकाम्या पोटी कधी अशी मीटिंग होते का? आणि कोणाच्या घरी नको म्हणून मग कॉफी शॉपचे लाडके स्थळ. इथे वेटरपासून मॅनेजरपर्यंत सर्व स्टाफला कॉफी शॉपमध्ये ह्या चौघीजणी एकत्र आल्या की त्यांना डिस्टर्ब करायचे नाही, त्यांच्या ऑर्डरी घेत राहायच्या आणि भरपूर बिल व उदार टीपांबद्दल मनात खात्री बाळगायची हे सवयीने माहीत होते. 
सुमा कॉफी शॉपमध्ये शिरताच मधूने तिला हात केला. छोट्याशा रुमालाने कपाळावर डवरलेला घाम टिपत टिपतच सुमा आपल्या सीटवर विराजमान झाली. पुढचा काही काळ भराभर ऑर्डरी देणे वगैरेत गेला. पदार्थ येईपर्यंत अजून वेळ होता. मग सुरू झाली चौकशी.

''हं, रेखे, सांग बरं एवढी अर्जंट मीटिंग का बोलावली आहेस ते? '' सुमाने रोकडा सवाल केला.
रेखाने जरा घसा खाकरला, थोडे पाणी प्यायली. तिच्या चेहऱ्यावर घालमेल स्पष्ट दिसत होती. मग अवसान आणून तिने बोलायला सुरुवात केली. ''तुम्हाला माहीत आहे ना, गेल्या महिन्यात मी मुलाकडे जर्मनीला गेले होते ते? ''
''हो गं... जायच्या आधी ते लग्नासाठीच्या मुलींचे, म्हणजे स्थळांचे फोटोजपण नेले होतेस ना? मग?? काय म्हणाला लेक? पसंत पडली की नाही कोणी? '' साक्षीचा चेष्टेचा सूर.
''कसली पसंत पडायला कोणी? त्याने ते फोटोज पाहिले तर ना पुढे काही करणार! ''
रेखाच्या उद्विग्न स्वरावर सुमाला काहीतरी संशय आला.... ''म्हणजे रेखे, त्यानं तिथली गोरी  पोरगी गटवली बिटवली की काय? '' तिच्या सवालावर होकारार्थी मान डोलवताना रेखाचे डोळे एकदम भरून आले. एरवी तडफदारपणे निर्णय घेणारी रेखा असे मूकपणे अश्रू गाळताना पाहून बाकीजणींचे कंठही दाटून आले. तिला काही मिनिटे सावरायला देऊन सुमाने विचारले, ''अगं मग चांगलीच आहे की बातमी! आधी तो लग्न करत नाही म्हणून तुला काळजी होती.... आता त्याने तिथली जर्मन पोरगी गटवली म्हणतेस....असेना का... तुला कुठं तिला इथं भारतात नांदवायची आहे??!! त्यांना म्हणावं द्या लग्नाचा बार उडवून तिथंच.... '' सुमाच्या ह्या वाक्यासरशी रेखाला आता अजूनच रडू यायला लागलं.  हुंदक्यांनी खांदे गदगदा हालू लागले. सगळ्यांच्या लक्षात आले की मन मोकळे करून रडल्याशिवाय हिला काही बरे वाटणार नाही. साक्षी रेखाला हातावर थोपटत सांत्वना देत होती. एवढा वेळ गप्प असणारी मधूदेखील रेखाला मुकाट्याने पर्समधील टिशूज पुरवत होती. थोड्या वेळाने रेखाचा आवेग ओसरला. जरा शांत झाल्यावर ती म्हणाली, 'ए सॉरी हं.... पण आता जरा बरं वाटतंय, तुमच्यापाशी मन मोकळं झाल्यावर! ''
मधूने हलकेच विचारले, ''आता तरी सांगशील का, नक्की काय प्रकार आहे ते? ''
रेखा कसनुसं हसली. ''गेल्या महिन्यात मी अखिलकडे, माझ्या लेकाकडे गेले जर्मनीला तेव्हा तो त्याचं अपार्टमेंट कोणाबरोबर तरी शेअर करतोय असं म्हणाला होता, त्यानं नावपण सांगितलं होतं.... मलाच मेलीला लक्षात नाही... तिथं गेले तर कळलं की त्याच्याबरोबर राहते ती गोरी जर्मन बया आहे!! अस्सल जर्मन, त्याच्यापेक्षा चांगली सात-आठ वर्षांनी मोठीच आहे... त्याच्याबरोबरच काम करते. गेले आठ - दहा महिने बरोबर राहत आहेत दोघं. म्हटलं.. असेल अडचण म्हणून राहत असतील दोघे बरोबर.... पण रात्री ती चक्क लेकाच्या बेडरूममध्ये..... आणि लेकही निर्लज्जपणाने गेला तिच्यासोबत. दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं फैलावर घेतलं त्याला... पण म्हणतो कसा, तो आमच्या आयुष्याचा निर्णय आहे. त्यात तुला मध्ये पडायची गरज नाही. इतका राग आला होता त्याचा, वाटलं होतं फाडकन मुस्कटात ठेवून द्यावी त्याच्या... इथं मी त्याच्यासाठी स्थळं शोधत आहे, त्याच्या बाबाचे टोमणे ऐकून घेत आहे, आणि हा शहाणा निवांत त्या पोरीबरोबर बिनलग्नाचा राहतोय.... ''
रेखाच्या स्वरातला कडवटपणा लपत नव्हता. सुमाने मध्येच रेखाला सुचवलं... ''अगं, मग त्या पोरीशी तरी बोललीस की नाही? '' सुमाच्या प्रश्नासरशी  रेखा खिन्न हसली. ''केला ना प्रयत्न तिच्याशी बोलायचा.... खरं तर तिचा आणि अखिलचा खूप राग आला होता मला! पण करते काय, आता त्यानं तिच्याबरोबर राहायचं जर ठरवलंच आहे तर म्हटलं विचारावं तिला तिच्या मनात काय आहे त्याबद्दल ! ''
''मग? '' इति मधू.
''तिच्याशी बोलायचं कसं ही पण पंचाईत! मला जर्मन भाषेचा गंध नाही आणि त्या बयेचं इंग्रजी अगदीच सुमार! दोनदा तीनदा तिला हटकलं, विचारलं, बाई गं, तुझ्या मनात काय चाललंय, सांग तरी मला! पण ती हातवारे करून जे काय बोलायची ते मला तर काहीही कळायचे नाही. मग शेवटी अखीललाच विचारलं, अरे बाबा, तुमचा काही लग्नाबिग्नाचा विचार आहे का.... तर त्याने खांदे उडवले आणि म्हणाला, काही घाई नाही, विचार केला नाही!!!! ''
रेखाच्या बोलण्यासरशी बाकीच्या तिघी आता चांगल्याच गंभीर झाल्या होत्या. तेवढ्यात त्यांनी दिलेल्या पदार्थांची ऑर्डर आली. पदार्थांची मांडामांड होऊन थोडावेळ शांततेने खाण्यात गेला.
''अखिलनं असं वागायला नको होतं, '' साक्षी मध्येच उसळून उद्गारली.
''हो गं, आपण पोरं कष्टानं वाढवायची, त्यांना सर्वात उत्तम शिक्षण कसं मिळेल म्हणून धडपडायचं, त्यांना परदेशात चांगला चान्स आला तर हृदयावर दगड ठेवून त्यांना इतक्या लांब पाठवायचं.... आणि त्यांनी ह्या सर्वाची परतफेड असं वागून करायची! लाजा कशा वाटत नाहीत मेल्यांना!! '' इति मधू.
''मधू, गप्प गं... ए रेखे, मधूच्या बोलण्याकडं फार लक्ष देऊ नको हं... तिला तुझी काळजी वाटते म्हणून बोलत आहे ती असं, '' सुमाने चुचकारले. पण मग तिने न राहवून विचारलेच, ''तुझा नवरा काय म्हणाला गं त्याला हे सर्व कळल्यावर? ''
रेखाने खांदे उडवले. ''काय म्हणणार? खूप संतापला सुरुवातीला, अखिलचा भरपूर उद्धार करून झाला, जर्मनीलाच जातो म्हणाला, त्याचा कान पकडून त्याला फरफटत भारतात आणतो... त्याला चांगलं सुनावतो, वगैरे वगैरे. पण मग त्याच्याही लक्षात आलं की आपण आता काहीही करू शकत नाही!!! अखिलला बोलला तसा तो, पण त्यात काही दम नव्हता. आणि अखिलनं त्याला ठणकावून सांगितलं... फार अकांडतांडव केलात तर फोन-ईमेल सुद्धा बंद करेल तो म्हणून.... ''
''हम्म्म्म.... आखिर बात यहां तक पहुंच गयी है... ठीक आहे, बरं मला सांग, इतर कोणी सांगितलं समजावून अखिलला तर तो ऐकेल का.... '' साक्षीचा हलकाच प्रश्न.
''तोही प्रयत्न करून पाहिला गं... त्याचा लाडका प्रदीपमामा फोनवर चक्क तीन-चार तास बोलला त्याच्याशी! पण अखिलनं त्याला सांगितलं की तो कोणत्याही परिस्थितीत तो गॅबी - गॅब्रिएलाला सोडणार नाही, त्याचं प्रेम आहे तिच्यावर. आणि लग्न करणं वगैरे गॅबीला पसंत नाही. तिचा लग्नसंस्थेवरच विश्वास नाही!!!''
रेखाचे बोलणे संपल्यावर कोणीच काही बोलेना. फक्त काटे-चमचे व क्रोकरीचे आणि कॉफी शॉपमधील इतर लोकांच्या संभाषणाचे आवाज येत राहिले. बाकी सगळ्याजणी विचारात गढलेल्या दिसत होत्या. सुमा शांतपणे आपली कॉफी पीत होती. इतर सख्यांना मात्र तिची ही शांत मुद्रा फसवी असल्याचे माहीत होते. सुमा स्वभावाने धोरणी आणि लांबचा विचार करणारी म्हणून त्यांच्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध होती. त्यानुसार ती अतिशय व्यावहारिक सल्ला देणार ह्याबद्दल शंकाच नव्हती! 
इतर सख्यांचे चेहरे न्याहाळत हातातला कॉफीचा कप सुमाने हलकेच खाली ठेवला आणि घसा खाकरून रेखाला म्हणाली, ''यू नो रेखे, मला वाटतं तू हे सगळं प्रकरण विसरावंस! तू आणि भावजी मस्तपैकी कोठेतरी लांबच्या प्रवासाला जा. मस्त रिलॅक्स व्हा. तुमच्या दिवट्या लेकाचा आणि त्या गॅबीचा विचारही करू नका. मला माहीत आहे, असं करणं तुम्हा दोघांना जड जाईल बहुतेक... पण तुम्हाला दुसरा पर्याय नाहीए असं मला तरी वाटतं.... तुम्ही इथे दुःख करण्याने, अश्रू गाळण्याने अखिलच्या भूमिकेत किंवा परिस्थितीत काहीच फरक घडून येणार नाहीए... मग दुःख करण्याचा काय उपयोग? त्यापेक्षा जरा रिलॅक्स व्हा, दुसरीकडे मन गुंतवा....अखिलच्या आयुष्याचा गुंता त्याचा त्यालाच सोडवू देत! '' 
सुमाचे नेहमीसारखे संयत बोल ऐकून बाकी सख्यांनी रुकारार्थी मान हालवली. पण रेखा अजूनही अस्वस्थ होती. हाताने रिकाम्या प्लेटमधल्या काटा-चमच्याशी उगाचच खेळत बसली होती. अजूनही तिच्या मनात काहीतरी शिल्लक होते.
''रेखे, ते चमच्याशी खेळणं थांबव आणि आम्हाला सांग, तुला अजून काय सतावतंय? '' साक्षीने रेखाच्या हाताच्या अस्वस्थ हालचाली थांबवीत विचारले.
''हो गं, अजून तुम्हाला सगळं सांगितलंच नाहीए मी....'' रेखा सांगू लागली. '' परवा अखिलचा अचानक फोन आला. माझ्याशी बऱ्याच दिवसांनी जरा धड बोलला. मला वाटलं, त्याला नक्कीच आतून अपराधी वाटत असणार! पण नंतर हळूच म्हणाला, ममा, गॅबीला दिवस गेलेत. तू आजी होणार आहेस! आता मला सांगा... अशी बातमी इतक्या कॅज्युअली कसा देऊ शकतो हा? इतका कसा बदलला हा? मी त्याला म्हटलं, अरे आता त्या येणाऱ्या बाळासाठी तरी लग्नाचा विचार करा. तर म्हणाला, तो विषय कधीच संपला आहे. गॅबी लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयापासून जाम मागे हटायला तयार नाही. उलट फार दबाव आणला तर अखिलला सोडून जाईल म्हणाली! तेव्हा मंडळी, माझं अभिनंदन करा, मी आजी होणार आहे म्हणून! अर्थात ही गोष्ट मी कोणालाही उघडपणे, उजळ माथ्याने सांगू नाही शकत! नातेवाईकांना गॅबीविषयी थोडी कुणकूण लागली आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत! आता हे नातवंडाचे सांगितले की झालेच! आम्हाला चारचौघात जायची चोरी होईल! '' रेखा जडावलेल्या आवाजात उसासली.
तिचे बाकीच्या सख्यांनी ओझरते अभिनंदन केले खरे, पण त्यात दम नव्हता. एकंदरीतच सर्व प्रकार सल्लामसलती करून सोडवण्याच्या पलीकडचा होता. अखेर रेखाची अजून जरा समजूत काढून, थोडे हास्य-विनोद करत सगळ्या उठल्या व आपापल्या घरी जायला निघाल्या.
निघताना रेखाच्या चेहऱ्यावरचा ताण जरा हलका झालेला दिसत होता. इतरांच्या विनोदांना ती थोडी हसलीपण होती. अर्थात ती घरी पोचल्यावरही बाकी मैत्रिणी तिला फोन करून तिची ख्यालीखुशाली विचारणार हे नक्की होते. त्यांच्या मैत्रीतला अलिखित नियमच होता तो!

रेखाला मधू आपल्या कारमधून ड्रॉप करते म्हटल्यावर साक्षीला सुमाने घरी सोडण्याची तयारी दाखवली. गाडीत बसल्यावर तिला अचानक आठवले, ''अगं साक्षी, तू तुझ्या लेकाच्या लग्नाबद्दल काही बोललीच नाहीस! तो भेटायला घेऊन येणार होता ना तुझ्या होणाऱ्या सुनेला? मग भेटलात की नाही? '' सुमाच्या प्रश्नासरशी साक्षी हसू लागली. ''का गं, अशी हसत्येस काय? मी काही गमतीचं बोलले का? '' सुमाने खोटं खोटं फुरंगटून विचारले. ''नाही गं, तिथं आपला एवढा गंभीर विषय चालला होता.... मला आमच्या घरच्या लग्नाच्या चित्तरकहाण्या, विहिणीचा नखरा, सुनेच्या बहिणीचा तोरा, व्याह्यांचं सारखा खांदा उडवत बोलणं वगैरे गोष्टी चघळणं अशावेळी अप्रशस्त वाटलं.... त्यासाठी आपल्याला एक वेगळा कॉफी शॉप सेशन करायला लागेल! '' साक्षीच्या विधानासरशी सुमाची कळी खुलली. ''ओह, येस्स्स! डन! जरा रेखीची समजूत घालू काही दिवस, आणि मग आपला ''साक्षीच्या घरचे लग्न'' गॉसिप सेशन करुनच टाकूयात. फार दिवस कोणाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढल्या नाहीत... आपला सेशन झाला की कसं मोकळं मोकळं वाटेल!! '' सुमाने डोळा मारत साक्षीला सुनावले आणि मनावरचा ताण हलका करत, हसत-खिदळतच त्या घराच्या दिशेने रवाना झाल्या.  

-- अरुंधती 

6 comments:

 1. लघुकथा आवडली...

  ReplyDelete
 2. मस्त जमलाय सेशन ताई. आणि हो ताई, मला अरे-तुरेच करा.

  ReplyDelete
 3. धन्यवाद आनंद! प्रतिसादाबद्दल आभार! :-)

  ReplyDelete
 4. थांकू विद्याधर! :-)

  ReplyDelete
 5. मस्तच गं...अश्या मैत्रीणी आपल्यालाही हव्यात असे वाटले क्षणभरं!!!

  ReplyDelete
 6. प्रतिसादाबद्दल धन्स गं तन्वी! खरंय तुझं म्हणणं... अशा मैत्रिणी असल्यावर मन त्यांच्याकडे हक्काने मोकळे करता येते! :-)

  ReplyDelete