(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्यांवर लटकणार्या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त! आणि त्याच दिवशी एका कैदी स्त्रीने आवारातील दुरुस्ती-कामासाठी आणलेली बांबूची शिडी वापरून जेलच्या भिंतीवरून उडी टाकून पळून जायचा असफल प्रयत्न केला होता - त्यामुळे चालू असणारा गदारोळ होता तिथे. शिवाय त्या बाकी कैद्यांच्या निर्विकार नजरा.
स्थळ होते पुण्याच्या येरवड्याच्या महिला तुरुंगाचे. वेळोवेळी काही प्रसिद्ध तर काही कुख्यात व्यक्तींमुळे येरवडा तुरुंग कायमच चर्चेत राहिला. पुणे शहराकडून येरवड्याला जाताना रस्त्याच्या एका बाजूला दिसणारी त्याची काळीकभिन्न, छाती दडपविणारी उंच तट-भिंतच मी आतापर्यंत पाहत राहिले. पण कधी आतही डोकावेन असे स्वप्नात वाटले नव्हते.
एका आंतरराष्ट्रीय महिला क्लबच्या पुणे शाखेने मला एका समाजसेवी संस्थेमार्फ़त येरवड्याच्या महिला तुरुंगात तेथील कैद्यांसमवेत सत्संग करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. जवळपास दोन-तीन वर्षांपूर्वीची, म्हणजे महिलांसाठी ''खुल्या कारागृहाची'' सुविधा उपलब्ध होण्याअगोदरची ही घटना. माझ्याबरोबर इतर गायक कलाकार, वाद्यवृंद व संस्थेचे दोन-तीन स्वयंसेवक होते.
त्या दिवशी भर दुपारी गाडीतून तुरुंगाच्या आवारात, रणरणत्या उन्हात पाऊल टाकल्यावर काही क्षण आम्ही अक्षरशः भाजून निघालो. हवेत विलक्षण उकाडा. पण तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी लेडीज क्लबच्या हसऱ्या सदस्या आमच्या स्वागताला सज्ज असलेल्या पाहून छान वाटले. ह्या सदस्या गेले अनेक महिने महिला कैद्यांसाठी तुरुंगात उपक्रम राबवित असल्याने तेथील वातावरणाला सरावल्या होत्या. स्त्री कैद्यांसाठी सतत काही ना काही चांगले करण्याच्या त्यांच्या धडपडीचे खरेच कौतुक करावेसे वाटत होते. सुरुवातीची काही मिनिटे आम्ही तेथील सुरक्षा कर्मचारी, तुरुंगात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भेटीदाखल येणाऱ्या समाजसेवा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व सेवाकार्यासाठी नेहमी येणाऱ्या महिला क्लबच्या सदस्या यांच्याशी बोलून कैद्यांविषयी माहिती घेण्यात घालवला.
येथील बऱ्याचशा महिला ह्या 'अंडरट्रायल' आहेत हे समजले. म्हणजे त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत व त्यांच्यावरचे दावे कोर्टात चालू आहेत. त्यामुळे त्या कैद्यांच्या संख्येत रोजच भर किंवा घट होत असते. काहीजणींना जामीन मिळतो, काहीजणींना जामीन मिळूनही त्याचे पैसे भरता न आल्याने पुन्हा तुरुंगातच राहावे लागते. बऱ्याचजणी विवाहितेचा छळ, मारामारी,चोऱ्या -दरोडे आणि अन्य किरकोळ गुन्ह्यांमध्ये अडकून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. खुनाच्या किंवा गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेल्या महिला खूपच कमी आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणार्या महिलांचे पुनर्वसन हीदेखील मोठी समस्या असल्याचे कळले. घरचे, नातेवाईक, गावातले लोक त्यांना अनेकदा स्वीकारत नाहीत. मादक पदार्थ बाळगणे - सेवन करणे इ. इ. आरोपांवरून काही परदेशी महिलाही आत आहेत. अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले. तसेच दुसऱ्याच कोणी गुन्हा करून हकनाक गुन्ह्यात गोवलेल्या महिलाही येथे बऱ्याच आहेत. खूपशा महिला ग्रामीण भागातील असून त्यांचे फारसे शिक्षणही झालेले नाही. बाळंत झालेल्या किंवा ज्यांची मुले अगदी लहान आहेत त्या महिलांना येथे आपल्यासोबत आपली मुले ठेवण्याची मुभा असते. त्या मुलांच्या राहण्या-खाण्या-कपड्यालत्त्याचा, औषधाचा व शिक्षणाचा खर्च सरकार करते.
सुरक्षा तपासणी वगैरे उरकून, सोबतच्या चीजवस्तू पहाऱ्याकडे सोपवून, रजिस्टरवर सह्या ठोकून आम्ही त्या अरुंद (बरोबर! अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशा) छोट्या दरवाज्यातून आपापली डोकी सांभाळत आत शिरलो. सोबत महिला सुरक्षा कर्मचारी होत्याच, त्यांच्या हातात मस्त दंडुकेही होते. आवारात ह्या खेपेस कोणी महिला कैदी दिसत नव्हत्या. बहुतेक सगळ्याजणी सत्संगाच्या ठिकाणी जमल्या असाव्यात किंवा आपापल्या केसेससाठी कोर्टात गेल्या असाव्यात.
जाता जाता आम्हाला एकांत कोठड्यांचेही दर्शन झाले. तिन्ही बाजूंनी भिंती, कोणतीही प्रायव्हसी नसलेल्या, एक बाजू पूर्ण जाळी व गजांनी आच्छादित बंदिस्त अशा स्वरूपाच्या त्या अरुंद, चौकोनी, अंधाऱ्या खोल्या बघताना उगाचच अंगावर शहारा आला. आवारातल्या झाडाझुडुपांच्या मधून काढलेल्या पायवाटेने जात आम्ही सत्संगाच्या ठिकाणी पोचलो. पत्र्याचे छत असलेली ही एक लांबलचक खोली. खिडक्यांना भरभक्कम गज. आत शिरायला एकच दरवाजा आणि तोही छोटासा. गेल्या खेपेस आले होते तेव्हा ही फक्त पत्र्याची शेड होती. आता तिथे पक्के काम करून महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्याची सोय केलेली दिसत होती. खोलीच्या एका कोपऱ्यात सरकावून ठेवलेली शिवण- विणकाम यंत्रे, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्यांवरचे दीनवाणे कपडे बरेच काही सांगून जात होते. समोर साधारण दीडशे-दोनशे महिला कैदी शिस्तीत सतरंज्यांवर आमची वाट बघत बसलेल्या. ''साऊंड''वाल्याची सर्व सेटिंग्ज पूर्ण होईपर्यंत तेथील स्टेजवर आम्ही वाद्यांची जुळवाजुळव केली. एका स्वयंसेवकाने लिलीच्या फुलांचा भरघोस, टवटवीत हार आणला होता. तो तेथील वेदीवरील सर्वधर्मीय ईश्वर प्रतिमांना एकत्रितपणे घातल्यावर त्या काहीशा कोंदट, घामेजल्या हवेत चैतन्याचा दरवळ पसरला.
ध्वनिक्षेपक सुरू होताच मी सर्वांना सत्संगात सामील होण्याचे आवाहन केले. समोरून ढिम्म प्रतिसाद. अर्थात ते अपेक्षित होतेच! सर्व बायका कोऱ्या, उखडलेल्या चेहऱ्यांनी बसलेल्या. एक डोळा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर व एक आमच्यावर. साहजिकच होते म्हणा.... त्या सगळ्याजणी दाटीवाटीने भर उकाड्यात आमची वाट पाहत बसलेल्या. त्यातून वॉर्डनचा व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा टरका डोळा आणि दुसरीकडे मनातली धुसफूस... त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे होते.
मी काही क्षण डोळे मिटले, मनातले सर्व विचार समर्पित केले आणि शांत मनाने सत्संगाची सुरुवात नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या गणेशवंदनेने केली. तबला, गिटार, सहगायकाचे व टाळाचे स्वर एकमेकांमध्ये मिसळून वातावरणात उत्साहाची पेरणी करत होते. पण अजून समोरून थंड प्रतिसाद होता. नाही म्हणायला बऱ्याच बायका हात जोडून बसल्या होत्या किंवा तालावर टाळ्या वाजवत होत्या. पण चेहरे व देहबोली अजून तशीच होती... आखडलेली, आक्रसलेली. त्या गणेश भजनाचा समारोप केल्यावर मी पुन्हा एकदा सर्व महिलांना माझ्या बरोबर, चुकत माकत का होईना, गाण्याचे आवाहन केले. संगीताच्या सुरांमधील मन हलके करण्याची जादू त्यांनी अनुभवावी, काही क्षण साऱ्या चिंता बाजूला ठेवून गाण्यात स्वतःला मुक्तपणे झोकून द्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटत होते.
येथे सर्व धर्मांच्या स्त्रिया होत्या. म्हणूनच नंतरचे भजन सर्व-धर्म-समावेशक घेतले. अल्लाहचे नाव आल्यावर पुढे बसलेल्या तिघी-चौघींच्या कळ्या खुलल्या आणि त्या जरा मोकळेपणाने टाळ्या वाजवू लागल्या. बुद्धाचे नाव येताक्षणी अजून काही चेहरे उजळले. विठ्ठलाचे नाव आल्याबरोबर नऊवारी, पाचवारीतल्या, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक महिला कैदी जोषाने टाळ्या वाजवू लागल्या. जीझसचा पुकारा करताक्षणी सहाव्या-सातव्या ओळीत बसलेल्या तीन-चार आंग्ल युवती डोलू लागल्या. थोडक्यात काय, समोरच्या श्रोत्यांमध्ये आता थोडा उत्साह दिसू लागला होता. काहीजणींच्या चर्येवर अस्फुटसे स्मितही उमटले होते. त्यांच्या त्या स्मितानेच मला अजून ऊर्जा मिळत होती.
मग पुढेही आम्ही म्हणायला सोपी, वेगवान, नादपूर्ण भजने गाऊ लागलो. सुरुवातीला गाताना संकोच करणाऱ्या बायका हळूहळू भीड चेपली जाऊन खुलेपणाने गाऊ लागल्या होत्या. मध्येच दोन-तीन बायका खोलीच्या मागच्या बाजूला उभ्या राहून भजनाच्या तालावर डोलू-नाचू लागल्या. विठ्ठलाचे भजन सुरू झाल्यावर तर चित्रच पालटले. डोळे मिटून, तालावर पावले टाकणाऱ्या महिलांना अजून काहीजणी सामील झाल्या. त्यांचा नाच फेर धरून जसजसा रंगात येऊ लागला तसतशा त्या आंग्ल युवतीही उठून त्यांच्या परीने ठेका धरत नाचू लागल्या. आता माझ्या समोर बसलेल्या बायकांनाही हुरूप आला. आपापल्या साड्या झटकत, पदर खोचून त्यातील काहीजणी फुगडी, काहीजणी झिम्मा खेळू लागल्या. एका वेळी दोन-दोन, तीन-तीन जोड्या फुगड्या खेळत होत्या. कोणाचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने वातावरण खेळकर बनले. झिम्मा खेळताना त्यांचे चेहरे फुलून आले होते. चुरशीच्या फुगडीत त्यांना शरीर झोकून मस्त रममाण होताना पाहून त्याच का त्या मगाच्या निर्विकार-कोऱ्या चेहऱ्यांच्या, सुन्न बसलेल्या किंवा खुन्नस देऊन पाहणाऱ्या बायका, असा प्रश्न कोणालाही पडला असता. बघता बघता काही तुरळक कैद्यांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व बायका नाचू, गाऊ लागल्या होत्या. चेहर्यावरच्या रागाची, नैराश्याची, असमाधानाची जागा आता प्रफुल्लित खेळकरपणाने घेतली होती. काहीजणी डोळे मिटून तल्लीन होऊन एकट्याच नाचत होत्या. गतिमान गाण्यांसोबत त्यांची पावलेही थिरकत होती.
वेळ संपत आली तशी हळूहळू गाण्यांची गती मंदावत आम्ही भजने थांबविली. सर्वांना डोळे मिटून शांत बसायला सांगितले. धपापत्या उरांनी, घामाने डवरलेल्या चेहऱ्याने स्थानापन्न होत सर्व बायकांनी आज्ञाधारकपणे डोळे मिटले आणि आपला श्वास सावरायची वाट पाहू लागल्या. काही बायका अजूनही टक्क, साशंक डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होत्या. डोळे बंद करायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. मी सर्वांना आपल्या श्वासाकडे लक्ष घेऊन जायला सांगितले. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा अनुभवायला सांगितली. त्यांचे एक छोटेसे, मन शांत करणारे ध्यान घेतल्यावर त्यांना जेव्हा डोळे उघडायला सांगितले तेव्हा कित्येकींच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा उमटल्या होत्या. जणू त्या काही मिनिटांमध्ये निर्व्याज समाधानाचा सुगंधी दरवळ त्यांनी अनुभवला होता!
..... पण वास्तवही वेगळे असते! सत्संग संपल्याचे सूचित केल्यावर महिला क्लबच्या सदस्यांनी माईकचा ताबा घेतला. तेथील स्त्री कैद्यांच्या छोट्या मुलांसाठी त्यांनी नव्या कोऱ्या, फुगे - झिरमिळ्या लावलेल्या तीन-चाकी सायकली आणल्या होत्या. सायकली पाहिल्यावर एवढा वेळ बाहेर दंगा करणारी ती छोटुकली मुले हरखून गेली. कोण सायकलवर पुढे बसणार, कोण मागे ह्यावर त्यांच्यात चढाओढच सुरू झाली. एव्हाना सुरक्षा कर्मचारी पुढे सरसावल्या होत्याच... तरीही त्या कैद्यांपैकी आठ-दहाजणी लाजत, एकमेकींना ढकलत पुढे येऊन कार्यक्रम आवडल्याचे सांगून गेल्या. आंग्ल युवतींमधील एकजण धिटाईने पुढे आली आणि ती भायखळा तुरुंगात असताना, मनातली आशा पूर्ण तुटत चालली असताना तिथे झालेल्या अशाच सत्संगाने तिला कसा मानसिक आधार दिला होता ते व आजचा सत्संग आवडल्याचे सांगून गेली. आमच्याकडे येणाऱ्या महिलांची गर्दी वाढल्यावर सुरक्षा कर्मचारी दंडुके परजत पुढे आले. मग लगेच पांगापांग! आमच्यात व महिला कैद्यांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक फळीच उभी राहिली. आता कटायची वेळ आली होती. संयोजक व वॉर्डनसकट इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अनौपचारिक आभार मानून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर मुलांचा नव्या सायकली पादडण्याचा व आनंदाने चित्कारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. त्यांना ह्या तुरुंगाबाहेरचे जग माहीत होते की नाही, कोणास ठाऊक!
तुरुंगाच्या बाहेर पडलो तसे एवढा वेळ संपर्क तुटलेले बाकीचे सामान्य जग पुन्हा पुकारू लागले. निघण्यासाठी गाडीत मी बसते न बसते तोच मोबाईल खणखणला. ''किती वेळा ट्राय केला तुझा मोबाईल, पण कॉल लागतच नव्हता! '' पलीकडून माझी मैत्रीण ठो ठो करत होती, ''कुठे आहेस? काय करत होतीस? '' गाडीतल्या माझ्या सहकारी मित्रांकडे एक मिष्किल कटाक्ष टाकून मी सहज उत्तरले, ''काही नाही गं, येरवडा जेलमध्ये होते जरा... पण पोचते आहे घरी अर्ध्या-पाऊण तासात, तेव्हा बोलू! '' तिला पुढे काही बोलू न देता मी फोन बंद केला आणि बाकीच्यांच्या हास्यात सामील झाले! मनात समाधानही होते आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचा आनंदही..... आज काही काळासाठी का होईना, त्या कैद भोगत असलेल्या स्त्रिया आपले सर्व राग, लोभ, मत्सर, चिंता, नैराश्य विसरून संगीत-नृत्यात आनंदाने तल्लीन झाल्या होत्या. त्यांना मोकळेपणाने हसताना, खेळताना आणि आपल्या मुलांच्या आनंदाने हरखून जाताना पाहूनच मन भरून आले होते. ईश्वराकडे त्यांना आयुष्यात योग्य मार्ग सापडून त्यांची घडी पुन्हा एकवार बसावी आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.
-- अरुंधती