Thursday, June 03, 2010

गारांचा पाऊस
गार गार गारा.... (छायाचित्र स्रोत : विकिमिडीया)

परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन! त्या घोंघावणाऱ्या वाऱ्याला, कडकडाट करून कानठळ्या बसविणाऱ्या विद्युल्लतेला व आभाळात दाटून आलेल्या कृष्णमेघांच्या गर्दीला घाबरून परिसरातील पक्षीगणही चिडीचूप... गायब झाले होते. कोणी चुकार, उशीरा जागे झालेले पक्षी जोरजोरात पंख फडकवून येणाऱ्या पावसाच्या चाहुलीने आसरा शोधत हिंडत होते.


मग पुन्हा एकदा ढगांचा एकच गडगडाट झाला. विजेने आकाशात वेगवेगळ्या नृत्यमुद्रा धारण करणे सुरू केले. वाळ्याच्या पडद्याला बांधलेल्या दोऱ्याची गाठ पक्की करण्यासाठी म्हणून मी हात खिडकीबाहेर काढले आणि तोच आभाळातून गारांचा वर्षाव सुरू झाला. काय त्यांचा तो वेग, काय विलक्षण मारा.... आभाळातून जणू कोणी मशीन-गनमधून गोळ्या झाडल्यागत गारा झाडत होते! क्षणभर मला स्वतःच्याच विचाराचे हसू आले. तोवर बघता बघता गारांच्या माऱ्याने बराच वेग घेतला होता. उघड्या खिडकीतून आता त्या घरातही येऊ लागल्या होत्या. त्यांच्या त्या वर्षावात आगळेच रौद्र सौंदर्य होते. न राहवून मी ड्रेसच्या ओच्यात गारा गोळा करू लागले. प्रत्येक गार अगदी पत्री-खडीसाखरेच्या दाण्याहूनही टपोरी.... त्यांना चपळाईने वेचून खाता खाता मन हळूच बालपणात डोकावून आले....

लहान असताना माझ्या आजूबाजूला अंगण होते, अंगणात झाडे होती. सिमेंट काँक्रीटचे रस्ते अजूनही घराला लगोलग चिकटले नव्हते. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल देत जेव्हा जेव्हा असा गारांचा पाऊस पडे तेव्हा सर्व बच्चे कंपनी अंगणात धाव घेत असे. ओल्या मातीच्या गंधाने वेडे होत, आभाळाकडे तोंड करत आ वासून आधी गारा थेट तोंडातच पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला जाई. पण त्या प्रयत्नांत समोर न बघितल्याने एकमेकांशी टक्करच जास्त होई! कधी तर कपाळमोक्ष व टेंगळे! मग आम्हां मैत्रिणींची फ्रॉकचा ओचा पुढ्यात पसरून त्यात गारा पकडायची चढाओढ लागे. जमिनीवर पडलेल्या गाराही धूळ, मातीची पर्वा न करता उचलून घेत बिनदिक्कत खाल्ल्या जात. त्या गार गार बर्फाळ गारांना कडाड कुडूम खाताना येणारा आवाज आणि नंतर बधिर होणारे तोंड यांतही वेगळीच मजा असे. चेहऱ्यावर, उघड्या हाता-पायांवर गारांचा सपासप मार बसत असे. पण एरवी आईने हलकी चापट जरी दिली तरी गळा काढणारे अस्मादिक गारांचा हा मार हसत-खेळत सहन करत असू!

पावसात मनसोक्त भिजून झाले की मग नखशिखांत भिजलेल्या अंगाने, कुडकुडत, पावलागणिक पाण्याचे ओहोळ तयार करत समस्त ओले वीर/ वीरांगना आपापल्या घरी परतत असत. घरी आई किंवा आजी हातात टॉवेल घेऊन सज्जच असे! सर्वात आधी आमची चुकार डोकी टॉवेलच्या घेरात पकडून खसाखसा पुसली जात. अगदी घोड्याला खरारा केल्यागत! कित्येकदा त्यात आमचे चेहरेही खरवडून निघत.... पण त्याला इलाज नसे! मग आमची पिटाळणी स्नानगृहात होई. तिथे ओले कपडे बदलणे, अंग पुसणे, माती-चिखलाचे हात पाय धुऊन कोरडे करणे वगैरे सोपस्कार केले की मगच स्नानगृहाच्या बाहेर येता येई. बाहेर आल्यावर पावसात भिजल्याची खूण म्हणून दोन-चार शिंका सटासट दिल्या की मलाही समाधान मिळे. त्यानंतर ऊबदार स्वयंपाकघरात मऊ जाजमावर मांडी ठोकून समोर आलेल्या उकळत्या हळद-आलेयुक्त दुधाचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.... पाऊस ओसरला की जुन्या वह्यांचे कागद फाडून त्यांच्या होड्या बनवून त्यांना गटाराच्या वाहत्या पाण्यात सोडायचे....

अनेकदा पावसाच्या स्वागतार्थ घरी भजी तळली जायची.... शेजारच्या उपाहारगृहातील भटारखान्यात दिलेली झणझणीत लसणाची खमंग फोडणी आणि तिचा घमघमाट (माझ्या आजोबांच्या भाषेत 'खकाणा') थेट मस्तकात जायचा.... कधी कोठेतरी कोणी मिश्रीसाठी तंबाखू भाजायला घ्यायचे.... नाकपुड्या हुळहुळायच्या.... पुन्हा दोन-चार शिंका!! उरलेला पाऊस मग बाल्कनीत बसून बघायचा. रस्त्यातील पाण्याच्या डबक्यांमधील तवंगांमुळे निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्यी छटा न्याहाळत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही.

शाळा सुटली, आयुष्य पुढे सरकले, मोरपिशी दिवस सुरू झाले. आता जेव्हा गारांचा पाऊस पडायचा तेव्हाही त्या वेचायला, पावसात मनसोक्त भिजायला मजा यायची. पण त्याचबरोबर मनात कोठेतरी एक चोरटा भावही असायचा. इतरांच्या नजरांची जाणीव असायची. अन तरीही त्या चिंब पावसात गारा लुटताना पुन्हा एकदा मन बाल होऊन जायचे... पावसाच्या माऱ्यासरशी आरडत-ओरडत, गारांना हातात झेलायचा प्रयत्न करत वर्षातालावर केलेले उत्स्फूर्त नृत्य.... गारठ्याने कुडकुडत असतानाही पावसाच्या पाण्याच्या डबक्यांत उड्या मारत एकमेकांच्या अंगावर उडवलेले पाणी... आमच्या इमारतीच्या गच्चीवर आभाळाकडे बघत, पावसाला थेट तोंडावर झेलत, हात पसरून गरागरा घेतलेल्या गिरक्या....

आजही ते सारे आठवले. वयाने कितीही मोठे झालो तरी मनाचे वय वाढत नाही हेच खरं! कारण आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते. मग घरातच मी एक छोटीशी गिरकी घेतली. तडतडाडतड नृत्य करणाऱ्या गारा ओंजळीत पकडून भरभरून खाल्ल्या. माझे मन भरले तरी गारांचा मारा अजून चालूच होता. बघता बघता समोरच्या नुकतीच खडी घातलेल्या काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्यावर पांढऱ्या शुभ्र गारांची खडी पसरली. तो शुभ्र गालिचा इतका सुंदर दिसत होता म्हणून सांगू!  घनदाट काळ्या केशकलापात माळलेले स्फटिकमणीच जणू..... समोरच्या आंब्याच्या झाडाला तर वाऱ्याच्या बेभान तालावर अंग घुसळवत डोलण्याचा, नाच करण्याचा मुक्त परवानाच मिळाला होता! त्याची उन्हाळ्यात धुळकटलेली पाने पावसाच्या वर्षावात हिरवीगार चिंब धुतली गेलेली.... नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... फक्त ती पालवी झाडाच्या माथ्यावरच होती ही गोष्ट अलाहिदा! आंब्याच्या झाडाला लगटून असलेला मधुमालतीचा वेलही वाऱ्याच्या झोक्यांसरशी गदगदा हालत होता. 

पावसाने गारव्याची अशी काही बरसात केली की सारी सृष्टीच नव्हे तर मनही त्या सरींमध्ये न्हाऊन निघाले! उन्हाळ्याच्या बेहद्द गर्मीनंतर असा पाऊस म्हणजे चंदनाची उटीच जणू! त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारीही आनंदात दिसत होते. खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्याचे फवारे वाहनांच्यामुळे अंगावर उडत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले पावसाचे कौतुक कायम होते. दुकानदार दुकानातील थंडावलेल्या वर्दळीची पर्वा न करता बाहेर येऊन पावसाचा आनंद लुटत होते. छोट्या मुलांचे पावसात भिजतानाचे आनंदी चीत्कार, आरडा-ओरडा, किलकाऱ्या यांनी वातावरणात अजूनच रंग भरले जात होते. 

पाऊस ओसरला, थांबला आणि मग आभाळात पुन्हा पक्ष्यांची गर्दी दिसू लागली. समोरच्या इमारतीच्या टेरेसवर, तारांवर, झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांनी आपापले पंख झटकून 'अंग वाळवणे' अभियान सुरु केले. मावळत्या सूर्याच्या काही चोरट्या किरणांनी परिसराला काही वेळ एका वेगळ्याच छटेत उजळवून टाकले. निसर्गाचा लाईव्ह लेसर शो समाप्त झाला होता. थंड वाऱ्याच्या झुळुकींबरोबर आता एक नवाच चिरपरिचित गंध नाकाला खुणावू लागला होता... कोपऱ्यावरच्या वडेवाल्याने समयोचित ताज्या, गरमागरम बटाटेवड्यांचा घाणा तळायला घेतला होता :-)              

-- अरुंधती 

6 comments:

 1. Priyamvada9:07 PM

  This article has to be read while it is raining, with a warm cup of ginger-cardamom tea and fresh, hot pakodas and bhaji..
  Or it can be read just to re-live the moments and to add to the celebration, I will love bhaji n chai...!

  ReplyDelete
 2. हे वाचताना इथेही पाऊस सुरु आहे...(तसा तो आठवडाभर मुक्कामालाच आहे) पण तरी या लेखातला गारांचा पाऊस आणि आठवणी जास्त भावला...पुन्हा एकदा जाणवलं की काही झालं तरी पावसाळा माझा जास्त लाडका आहे...:)

  ReplyDelete
 3. खुपच सुरेख लेख. लेखीकेने केलेले वर्णन आणि त्याचबरोबर मी कोकणातील कोसळणार्‍या पावसात घालवलेले बालपण डोळ्यासमोर उभे राहीले

  अनिकेत

  ReplyDelete
 4. प्रियंवदा, अनिकेत, अपर्णा....

  प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

  ReplyDelete
 5. पावसाळा...तसा जिव्हाळ्याचाच विषय....मस्त वर्णन केलंय एकदम...
  आता मुंबापुरीत पाऊस कधी येतोय असं झालंय!

  ReplyDelete
 6. विद्याधर, पाऊस पडून गेल्यावर आता इथेही उकाडा पुन्हा सुरु झालाय. आता लवकर पर्जन्य देवता खुश होऊ देत हीच इच्छा! :-)

  ReplyDelete