Thursday, June 17, 2010

वारिस शाह नूं -- अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद


(पिंजर चित्रपटात ह्या काव्याचा समर्पक उपयोग)
(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया)

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे! आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.
ते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......
भारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल! अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे!
हे वारिस शाह!
आज मी करते आवाहन वारिस शहाला
आपल्या कबरीतून तू बोल
आणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू
एक नवीन पान खोल

पंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर
तू भले मोठे काव्य लिहिलेस
आज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत
हे वारिस शाह, तुला विनवत आहेत

हे दुःखितांच्या सख्या
बघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं

आणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय
आपल्या शेतांत, जमिनीत भिनून
तेच जिकडे तिकडे अंकुरतंय...

ते आकाशही आता रक्तरंजित झालंय
आणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत

वनातला वाराही आता विषारी झालाय
त्याच्या फूत्कारांनी जहरील्या
वेळूच्या बासरीचाही नाग झालाय

नागाने ओठांना डंख केले
आणि ते डंख पसरत, वाढतच गेले
बघता बघता पंजाबाचे
सारे अंगच काळेनिळे पडले

गळ्यांमधील गाणी भंगून गेली
सुटले तुटले धागे चरख्यांचे
मैत्रिणींची कायमची ताटातूट
चरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली

नावाड्यांनी साऱ्या नावा
वाहवल्या आमच्या सेजेसोबत
पिंपळावरचे आमचे झोके
कोसळून पडले फांद्यांसमवेत

जिथे प्रेमाचे तराणे घुमायचे
ती बासरी न जाणे कोठे हरवली
आणि रांझाचे सारे बंधुभाई
बासरी वाजवायचेच विसरून गेले

जमिनीवर रक्ताचा पाऊस
कबरींना न्हाऊ घालून गेला
आणि प्रेमाच्या राजकुमारी
त्यांवर अश्रू गाळत बसल्या

आज बनलेत सगळे कैदो*
प्रेम अन सौंदर्याचे चोर
आता मी कोठून शोधून आणू
अजून एक वारिस शाह....

(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो! )
अनुवादक - अरुंधती 
कवयित्री अमृता प्रीतम (छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)  
मूळ काव्य :
(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )
वारिस शाह नूं
आज्ज आखां वारिस शाह नूं
कित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा
कोई अगला वर्का फोल
इक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण
आज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण
उठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब
आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव
किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला
ते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला
इस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर
गिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर
उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा
उहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना
नागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,
पल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,
गलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,
त्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद
सने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,
सने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,
जित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,
रांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च
धरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,
प्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,
आज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर
आज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर
--- अमृता प्रीतम

यू ट्यूब वर अमृताच्या स्वत:च्या आवाजात हे गाणे ऐका : 

"> 

9 comments:

 1. Anonymous7:59 PM

  Namo Namah! Apratim Bhashantar kele ahes. Tula kharokharach Saraswati prasanna ahe.

  Kavayitri Anuvadika Lekhika Arundhati,
  dhanya zalo amhi aplya Pratibhevarati!

  ReplyDelete
 2. अरुंधती, मूळ काव्य कळलं नाही पण अनुवाद प्रचंड आवडला. काटा आला अंगावर. भयंकर... !!

  सच्चिदानंद शेवडे यांच्या 'रक्तलांच्छन' ची आठवण आली.

  ReplyDelete
 3. अ‍ॅनॉनिमस, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

  ReplyDelete
 4. हेरम्ब, अरे मूळ काव्य पंजाबीतले असल्यामुळे मलाही फार कळाले नव्हते सुरुवातीला.... पण प्रयत्न, शोधाशोध केल्यावर जमले हळूहळू.... तरीही अजून पूर्ण कळाले की नाही, काय माहीत!! :-) प्रतिसादाबद्दल धन्स!

  ReplyDelete
 5. अप्रतिम सुंदर! पिंजर हा चित्रपट मागे खूप वर्षांपूर्वी पहिला होता. तेंव्हा हे गाणं मनात घर करून गेलं होतं. तेंव्हा सगळे शब्द नीट समजले नाहीत कारण खूप वेळ स्वत:चे हुंदके ऐकण्यात गेला.

  काही कविता, वचने, काव्यं, स्वगतं काही चित्रपटांमध्ये चपखल वापरलेली दिसतात. हे त्यातलंच एक उत्तम उदाहरण! असेच लिहित राहा.

  ReplyDelete
 6. अरुंधतीजी,
  आपले हे हीर मिपावर वाचले व ल्ब्लॉगवाणी वरून आपल्या ब्लॉगवर चिकटलो.असो.
  तडप और जुदाई का अनोखा संगम।
  पंजाबी भाषेची रग व धाकडपन मराठीला नाही.
  तरीही आपल्या शब्दांनी खंजिराची बोच व रक्र्ताची लाली चढून आक्रोश
  ओघळतो. तीच हीरची यशस्विता.

  ReplyDelete
 7. संपदा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद गं! पिंजर चित्रपट बघताना तर मी बहुतेक सर्व वेळ रडतच होते.... आणि तरीही त्यातील गाणी कोठेतरी आरपार काळीज चिरत गेली....माझा आपला हा अनुवादाचा लुटूपुटीचा पण कळकळीचा प्रयत्न आहे! :-)

  ReplyDelete
 8. शशिकांत जी ब्लॉगवर आपले स्वागत! फाळणीच्या वेळी उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या अजूनही अनेक मनांमध्ये घर करून आहेत. आया-बहिणींच्या संहाराच्या, लाजेलाही शरम येईल अश्या घायाळ स्मृती बाळगून अनेक वृध्द आजही तोच वारसा पुढे देत आहेत. किती काळ चालणार हे सारे? त्यांची ती अगतिकता पाहवत नाही आणि साहवतही नाही..... असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

  ReplyDelete
 9. atishay chan blog post aahe.

  Add it to marathisuchi http://www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator.

  Once your website is added to marathisuchi then your posts will be automatically published on marathisuchi.com

  ReplyDelete