मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे.
खरे तर ती काठी आजोबांची गरज होती. तरुण वयात घरच्या बेताच्या परिस्थितीपोटी शिक्षणाचा खर्च निघण्यासाठी त्यांना संस्थानाच्या महाराजांच्या घरी खांद्यावरून रोज अनेक कळश्या पाणी भरायला लागे. त्याची निशाणी म्हणजे प्रौढत्वातच त्यांच्या पाठीला आलेला बाक! म्हातारपणात शरीर वाकल्यावर त्यांना त्या काठीच्या आधारानेच चालता येत असे. पण त्यांची गरज असलेली ती काठी आम्हा पोरांना खेळायचीच वस्तू न वाटल्यास नवल! त्यांची नजर चुकवून ती काठी लंपास करण्यात आम्हाला कोण तो आनंद मिळत असे. एकदा काठी हाती आली की तिचा घोडा घोडा कर, तिला गळ्यात अडकवून जल्लोषात मिरवणूक काढ, तिला आडवे करून तिचे वल्हे कर अशा अनंत प्रकारांनी आम्ही तिच्याशी खेळत असू. मग आजोबांची करड्या आवाजातील हाक आली की काठी तिथेच टाकून धूम ठोकत असू.
घरात आजोबा आहेत की नाही हे आम्हा मुलांना त्यांच्या काठीवरून लगेच कळत असे. दारातून आत शिरले की एक खुंटी होती. आजोबांची काठी आणि टोपी त्या खुंटीवर शानदारपणे विराजमान झालेली असायची. ते कधी गावाला गेले की ती खुंटी आम्हाला ओकीबोकी वाटायची. दारातून आत शिरताना त्यांच्या काठीला पाहिले की आम्ही शहाण्या मुलांसारखे शिस्तीत आत यायचो, हात-पाय धुवून शाळेच्या अभ्यासाच्या पुस्तकांत डोके खुपसून बसायचो. पण, तेच, जर आजोबांची काठी जागेवर नसली तर त्याचा अर्थ आजोबा बाहेर गेले आहेत हे ताडून घरात शिरल्या शिरल्या आमचा दंगा सुरू होत असे.
एकदा आजोबा आमच्या घराशेजारी असलेल्या खोपट्यात राहत असलेल्या आजारी दगडूची चौकशी करायला गेले होते. अर्थातच आम्हा पोरांना ह्याचा थांगपत्ताच नव्हता. आम्हाला वाटले, आजोबा नेहमीसारखे बाहेर फिरायला किंवा कामाला गेलेत. घरी आल्यावर आम्ही त्यांची काठी जागेवर नसल्याचे पाहून घर दंगा करून अक्षरशः डोक्यावर घेतले. थोड्याच वेळात आजोबा घरी परतले. पण आम्हाला आमच्या आरड्याओरड्यात ते समजलेच नाही. मग त्यांच्या त्याच काठीचा अल्प अल्प प्रसाद सर्वांनाच मिळाला.
आजोबा त्या काठीला हर तऱ्हेने वापरत असत. रस्ता ओलांडताना वाहनांना इशारा करायला, पायात लुडबुड करत असलेल्या कुत्र्याला हाकलायला, बसमध्ये गर्दीत त्यांची सीट अडवून ठेवायला, जादाच्या ओझ्याच्या पिशव्या लटकवून ठेवायला.... अनेक प्रकारांनी ते त्यांच्या काठीवर विसंबून होते. कधी असेच आरामखुर्चीत बसले की हळूच तिच्यावरून मायेचा हात फिरवत असत. त्यांना काठीला असे आंजारताना गोंजारताना पाहिले की आम्ही मुले तोंड दाबून हसत असू आणि घरातल्या बायका खुसुखुसू हसत पदरात आपले तोंड लपवत असत. पण आजोबा जणू दुसऱ्याच दुनियेत हरवलेले असत. त्यांना असे हरवलेले पाहायला सुद्धा आम्हाला आवडत नसे. मग कसले तरी आवाज काढून आम्ही त्यांची तंद्री भंग करत असू.
आजोबांची काठी तशी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. तिची वैशिष्ट्यपूर्ण मूठ आणि आजोबांचे तिच्यावर असलेले विलक्षण प्रेम ही आजूबाजूच्या दुकानदारांत, रहिवाशांत कायमच कौतुकाची व कुतूहलाची बाब होती. ते घराखेरीज इतर कोठेही त्यांची काठी ठेवायला तयार नसत. त्यांनी जर आपल्या काठीला कोणाला तात्पुरते सांभाळायला दिले तर त्याचा अर्थ त्यांचा त्या व्यक्तीवर खूप विश्वास आहे असेच अनुमान लोक काढत असत.
आजोबा आजारी पडले आणि त्यांच्या काठीला घराच्या एका कोपऱ्यात चुपचाप बसून राहायचे दिवस आले. अशक्तपणामुळे त्यांचे हिंडणे-फिरणे कमी झाले. काठीचा दिमाख उगाचच कमी झाल्याचे आम्हाला भासू लागले. पण त्या दिवसांत देखील आजोबा काठीला विसरले नाहीत. घरातल्या घरात काठी घेऊन त्यांना हिंडताना पाहिल्याचे मला चांगलेच स्मरते आहे.
शेवटच्या काही दिवसांत ते घरातील कोणाला तरी बरोबर घेऊन मोठ्या कष्टाने काठी टेकवत टेकवत बाजारात त्यांच्या लाडक्या दुकानदारांचा, परिचित-स्नेहीजनांचा निरोप घेण्यास जात असत. त्यांचे इहलोकातून जाणे सर्वांना अपेक्षितच होते. परंतु तरीही त्याने दु:ख का कमी होते? ते गेले आणि घरावरील त्यांची आश्वासक सावली हरपली. आम्हा मुलांना त्यांचा पलंग, आवडती आरामखुर्ची पाहिली की तिथे त्यांचाच भास होत असे. कधीही त्यांची करड्या आवाजातील हाक ऐकू येईल आणि सारे घर दणाणून सोडेल असेच वाटत असे. पण तसे घडले नाही. घराचे कोपरे त्यांच्या आवाजाशिवाय सुने सुनेच राहिले.
आजोबांचे दिवस-वार पार पडले. आता ते परत येणार नाहीत ह्याची आमच्या बालमनांना खात्री पटली होती. घरातील मोठी मंडळीही गप्प गप्पच होती. अकस्मात एके सकाळी आमच्या दारात एक मळक्या कपड्यातील, दाढीचे खुंट वाढलेला फाटका माणूस आला. आजोबा गेल्याचे कळताच दारातच बसकण ठोकून ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला घरच्यांनी पाणी देऊन कसेबसे शांत केले. पण त्याचे अश्रू थांबत नव्हते. अचानक त्याची नजर आजोबांच्या काठीवर पडली. आणि झाले! तो थेट 'ती काठी मला त्यांची आठवण म्हणून द्या' म्हणून गयावयाच करायला लागला. वडीलधारी मंडळी ऐकेनात तशी तो त्यांच्या पायाच पडू लागला. शेवटी घरातल्यांचाही नाईलाज झाला. त्या माणसाकडून तो आजोबांच्या काठीची नीट काळजी घेईल अशी हजार आश्वासने घेऊन घरच्यांनी ती काठी त्याच्या सुपूर्द केली. एवढा वेळ रडत असलेला तो इसम मोठ्या आनंदाने काठी उराशी धरून निघून गेला.
तो माणूस निघून गेला तरी घरच्यांचा अस्वस्थपणा तर काही जात नव्हता. तो कोण कुठला हे धड कोणालाच माहीत नव्हते. त्याला आजोबांची इतकी प्रिय गोष्ट देऊन आपण चूक तर केली नाही ना, असा विचार मनाला शिवून जात होता. पण एकदा दिलेली वस्तू परत तरी कशी मागणार? सगळेच गप्प बसले.
काही महिन्यांनी आमच्या नात्यातील एकांकडे त्यांच्या माहितीतील एक गृहस्थ आले. त्यांच्या हातात माझ्या आजोबांची काठी होती. आमच्या नातेवाईकांनी काठी लगेच ओळखली, पण चेहऱ्यावर तसे भासू न देता त्यांनी सहजच काठीची चौकशी केली. त्या गृहस्थांनी ती काठी जुन्या बाजारातून खरेदी केली होती!!!
आम्हाला जेव्हा हे कळले तेव्हा त्या योगायोगावर आश्चर्य करण्याखेरीज व हळहळण्यापलीकडे आमच्या हातांत काहीच उरले नव्हते. पण नंतर कळले की आमच्या आजोबांसारखीच ती काठी त्या गृहस्थांचीपण विलक्षण लाडकी होती. जिथे जिथे ते जात तिथे तिथे ती काठी त्यांची सोबत करत असे. हे ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली. कदाचित आजोबांचीच इच्छा असावी की त्यांच्या काठीला त्यांच्याइतकाच तिच्यावर प्रेम करणारा नवा मालक मिळावा. त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली. आजोबांची काठी तिच्या नव्या घरी, नव्या मालकाला आपला प्रेमाचा, विश्वासाचा आधार देत राहिली.
-- अरुंधती
(काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)
खूपच आवडलं! विशेषत: शेवट! मला माझेच आजोबा दिसत होते.आठवण तर ग्रेट आहेच.तुमचं लिखाणही! :)
ReplyDeleteधन्यवाद विनायक! त्या पिढीतील माणसांबद्दल काही लिहिताना, वाचताना असाच भाव मनात दाटून येतो. :-)
ReplyDelete