Friday, September 30, 2011

असाही एक प्रवास!!


''सॉऽऽरी अम्माऽऽ...आपलं...सॉरी अप्पा!!'' मी कच्चकन जीभ चावली आणि तोंडात येणारे माफीनाम्याचे शब्द एका कोरड्या आवंढ्यासरशी गप्पकन् गिळले. ठिकाण होते केरळातील त्रिचूरचे रेल्वे स्टेशन. वेळ सायंकाळचे पाच वाजून दहा मिनिटे. फलाटावर टेकल्या टेकल्या लगेच गचके घेत निघणार्‍या त्रिचूर-बेंगळुरू पॅसेंजरमधील जनरल डब्ब्याच्या दारातून मुसंडी मारून इंचभर आत घुसल्यावर आपल्या बुटांखाली जे मऊ मऊ लागतंय तो रेल्वेच्या डब्याचा तळभाग नसून कोणा मल्लूभाऊ वा मल्लिकेची पावले आहेत ह्या दु:खद व कष्टप्रद जाणिवेला मनोमन चिरडत मी पुन्हा एकदा आजूबाजूच्या घर्मतैलचंदनगंधाने पुनीत झालेल्या हवेचा श्वास नाकात ओढून घेतला व नव्या बळाने रेटा देत मुंगीच्या गतीने पुढे सरकायला सुरुवात केली.
മൂവ് മൂവ്... माझ्या मागे असलेल्या मुंडुवेष्टीने मला जोरात ढकलले. पुन्हा एकवार मी बहिणीला रजा न देणार्‍या तिच्या बॉसला मनातल्या मनात दूषणे दिली. त्याच्या त्या रजा नाकारण्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला आरक्षण नसताना साध्या तिकिटावर बारा-तेरा तासांचा प्रवास जनरल डब्यातून करायची वेळ आली होती! त्यात आमच्या बहिणाबाई व आमच्याबरोबर असलेला एक मित्र हे दोघेही अतिशय प्रामाणिक! नियमांना धरून वागणार्‍या समूहाचे नेतृत्व करणारे.... ''आरक्षित डब्यात चढून टी.सी कडून आपले तिकिट अपग्रेड करू,'' (थोडक्यात, बसण्या/झोपण्यासाठी तरी थोडी जागा मिळवू) अशा अर्थाची माझी सूचना त्यांनी पार ''नाऽहीऽऽ!!'' म्हणत धुडकावून लावली होती. परिणामतः आम्ही दोघी जनरल डब्याच्या मागच्या दारातून व मित्रवर्य पुढच्या दारातून त्या महासमुदायाच्या खतखत्याने ओसंडून वाहत असलेल्या डब्यात सूर मारण्यात यशस्वी झालो होतो.

आता खरी समस्या ही आत घुसल्यावर दृष्टोत्पत्तीस आलेल्या अफाट जनसमूहातून मार्गक्रमणा करत आसनव्यवस्थेच्या जवळपास पोहोचण्यात होती. वाटेत अगम्य (मल्याळी) भाषेत मचाव मचाव करणारे असंख्य लोक. अगदी कमरेला पिवळट पांढरी लुंगी गुंडाळलेल्या व शुभ्र बत्तिशीने चकाकणार्‍या कभिन्न तेलकट अण्णा अप्पांपासून मत्स्यगंधा, योजनगंधा नाव सार्थ करणार्‍या व कचाकचा बोलणार्‍या / भांडणार्‍या ललनांपर्यंत सर्वांचेच लक्ष्य मिळेल ती जागा पादाक्रांत / सामानाक्रांत करणे हेच होते. गार्डची शिट्टी होऊन रेल्वे हालली तरी आमच्या डब्याच्या आतील व बाहेरील गर्दी तसूभरही कमी झाली नव्हती. हाय रे रामा! का म्हणून मला ऐन लग्नाच्या मोसमात परतीचे आरक्षण अनिश्चित असताना मैत्रिणीच्या लग्नाला फाफलत त्रिचूरला जायची बुद्धी सुचली? त्यात बहीण व मित्र, दोघांनाही रजा नसल्यामुळे गुर्वायूर मंदिरात त्या मैत्रिणीचे लग्न लागल्यावर स्वादिष्ट भोजनाचा निवांत ताव घ्यायचे सोडून आम्ही घाईघाईत पोटात चार घास ढकलले होते व सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर थडकलो होतो. स्टेशनवर आमच्यासारखेच अनेक आरक्षण नसलेले प्रवासी व दर सप्ताहान्ताला बंगलोर-त्रिचूर प्रवास करून घरी येणारे व आता परतीला निघालेले नोकरदार व विद्यार्थी....


''ताई, तू थोडी तिरपी उभी राहतेस का, म्हणजे मला पाऊल ठेवायला जागा मिळेल?'' एवढा वेळ बकध्यान करत एका पायावर तोल सांभाळत असलेली मम भगिनी माझ्या कानाशी ओरडली. (पुटपुटली असती तरी ऐकू आले नसते अशा कोलाहलात!) मी उदार मनाने माझ्या देहाची वजनदार तनुलता जरा वक्र केली....तेवढ्यात मागचा एक लुंगीवाला जोरात किंचाळला. अय्यो रामा!! त्याच्या पायावरच उभी राह्यले की वो मी! पुन्हा एकदा मी 'सॉऽरी' ची पुडी सोडली.
कुळकुळीत डोक्यांच्या त्या चिपकट, तेलकट घनगर्भ गर्दीत मला हळूहळू स्वतःचे अस्तित्व नाहीसे होणे, गर्दीत एक होणे, समुदायाचा एक भाग होणे इत्यादी शब्दप्रयोगांचा वास्तविक अर्थ उमजू लागला होता. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त मानवी शरीरे, मस्तके, केस, वस्त्रप्रावरणे.... नाकांत शिरून हुळहूळ माजवणारे कोणाचे कृष्णकुंतल... त्यांच्या आडून क्वचित दिसले तर आमच्या डब्याच्या खिडकीचे अवकाश.... आणि दूरच दूर भासणारे आसन-व्यवस्थेचे क्षितिज....पायांवर, पायांत आणि पायाखाली गाठोडी, बोचकी, बचकी, पिशव्या, टोपल्या, करंड्या, खोकी, बॅगा इत्यादी सामानरूपी भौतिकतेचे मणांमणांचे ओझे....!!
मध्येच माझा नाकाचा शेंडा खाजू लागला. ''ए माझं नाक खाजतंय....'' माझ्या पाठीशी उभ्या बहिणीला ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजात मी ओरडले. नशीब एवढंच की आजूबाजूला मराठी कळणारं कोणीही नव्हतं. ''मला माझा हातच मिळत नाहीए गं!'' मी पुन्हा कळवळले. हो, माझाच श्वास शेअर करणार्‍या तीन-चारजणांमुळे गेल्या अर्ध्या तासात मला माझ्या हाताचे दर्शनच झाले नव्हते. ''माझं नाक खाजव ना!'' मी अगतिकतेने बहिणीला विनवले. एवढ्या गंभीर क्षणालाही ती दुष्ट नारी आसुरी आनंदाने फिस्सकन हसली. जन्मल्यापासून मोठ्या बहिणीने केलेल्या ताईगिरीचा वचपा काढायची तिला ही नेमकी संधी गवसली होती!
''मी खाजवेन नाक तुझे.... पण.... त्याबद्दल मला काय देशील?''
माझ्या ओठांवर आलेले 'धम्मकलाडू' हे शब्द मी मोठ्या प्रयत्नांती गिळले आणि तिच्या ''पुढचे आठ दिवस मी कशीही वागले तरी मला रागावायचे नाही, माझ्यामागे भुणभूण करायची नाही,'' या मागणीचा बिनशर्त स्वीकार करून सर्व जनसमुदायाच्या साक्षीने तिला माझे नाक माकडागत खाजविण्याची संधी दिली. खेटलेल्या दोघी तिघी पोरी भाषा वगैरे न कळतानाही फिदीफिदी हसल्या. बाप्यांनीही दात काढले.
चला, त्या निमित्ताने इतका वेळ आमच्याकडे परप्रांतीयांच्या तुटकपणाने पाहणार्‍या व अगम्य भाषेत बडबडणार्‍या मल्लू सहप्रवाशांत आमच्यामुळे सौम्य खसखस पिकली होती.
अजूनही आमची दोघींची प्रगती डब्याचे दार ते आसनव्यवस्था यांच्या दरम्यान असलेला पॅसेज एवढीच होती. उपलब्ध प्रत्येक सेंटिमीटरवर माणसे उभी, बसलेली, तोललेली होती. सामान ठेवायच्या लोखंडी जाळीदार रॅकवर देखील काही लोक चढून बसले होते. चार माणसांच्या आसनावर सहा ते आठ माणसे कोंबलेली होती. त्यांच्या पायाशी असलेल्या जागेत वर्तमानपत्रांचे कागद पसरून आणखी काहीजण दाटीवाटीने बसलेले होते. मधल्या वाटेवर, दोन आसनांच्या मधोमध.... सगळीकडे वेगवेगळ्या स्थितीत बसलेली/ उभी जनता.... एकमेकांच्या मांड्यांवर बसलेली डबल डेकर अवस्थेतील तरुण पोरं-पोरी.....भारताच्या फसलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमाचं हे मिनी व्हर्शन!
पुढचे बारा तास व थोडक्यात संबंध रात्र ह्याच गर्दीत अशा अधांतरी ताटकळलेल्या अवस्थेत इतरांना दत्तक जात काढायची ही कल्पनाच भयंकर होती. आपल्याच हातापायांचे दर्शन दुर्लभ झाले होते. त्रिभंगावस्थेत उभे राहून पाठीची वाट लागली होती. मस्तकात शब्द-गंध-ध्वनीचा उग्र कोलाहल माजला होता. इंग्रजीचे ठराविक 'एक्स्क्यूज मी', 'प्लीज', 'सॉरी' वगैरे शिष्टाचारयुक्त शब्द, हृदयद्रावक दु:खोद्गार आणि माझे कारुण्यरसाने थबथबून वाहत असलेले कटाक्ष यांचा उपस्थित गर्दीच्या काळजावर ढिम्म परिणाम होत नव्हता. शेवटी सारी अस्त्रे म्यान करून मी मुंडी मुरगाळून भवितव्याच्या कल्पनेने डोळे घट्ट मिटून व्यथित अंतःकरणाने उभी राहिलेली असताना बहिणीच्या मोबाईलची रिंग वाजली....
आता गळ्यातला मोबाईल कानापर्यंत न्यायचीही जिथे मारामार तिथे ती तो कॉल काय आणि कसा घेणार! पण बराच वेळ ती रिंग अथकपणे वाजत राहिल्यावर बहिणीच्या समोरच्या बाईने कीव येऊन तिला तसूभर सरकून कॉल घेण्यापुरती जागा करून दिली. पलीकडून आमच्याबरोबर प्रवास करणारा, डब्याच्या दुसर्‍या टोकाला असलेला मित्र बोलत होता. त्या तुटक्या संभाषणातून बहिणीला एवढाच अर्थबोध झाला की त्याला बसायला व्यवस्थित जागा मिळाली आहे आणि आम्ही जर त्याच्या सीटपर्यंत पोहोचू शकलो तर आमचीही बसायची सोय होऊ शकेल!!!
हुर्रे!!!! क्षण-दोन क्षण त्या गोडगोजिर्‍या बातमीने मला बुटातल्या बुटात नाच करावासा वाटू लागला! पण ते शक्य नसल्यामुळे फक्त भुवया व मुंडी वर-खाली करून माझा आनंद साजरा करू जाता शेजारची जनता संशयाने माझ्याकडे बघू लागली.... शेवटी आवरते घेतलेच एकदाचे! पण विचार मात्र सुंई-सुस्साट, बुंई बुंगाट सुटलेच होते! हे मुंबईकर लोक काय जादू करतात इतर लोकांवर कोण जाणे! आणि त्यात आमचा हा मित्र गोडबोल्या गुज्जूभाई आणि कसलेला मुंबईकर! लोकलच्या प्रवासाचा सराव व गर्दीची सवय असलेला! आता त्याच्या कृपेने बधिर, व्यथित, पीडित शरीराला घटका-दोन घटका बूड टेकवायला जागा मिळणार ही कल्पनाच सद्गदित करणारी होती.
असो. मित्राच्या त्या कॉलसरशी माझ्या हतोत्साही शरीरात व मनात एक नवे चैतन्य संचारले. पुढच्या स्टेशनला आमच्या बाजूच्या दरवाज्यातून खाली उतरून डब्याच्या पुढच्या दरवाज्यातून आत घुसायचे असा प्लॅन ठरला. त्याप्रमाणे जिलब्यांनी नटलेल्या पिवळ्या फलकाचे व फलाटाचे दूरून दर्शन झाल्या झाल्या मी व भगिनीने जीव खाऊन दाराच्या दिशेने हालचाल सुरू केली. परंतु हाय रे दैवा! बाहेरून माणसांचा एक भला थोरला लोंढा आमच्या दिशेने घोंघावत आला आणि आम्ही होतो त्यापेक्षाही मागे ढकलल्या गेलो!


प्रत्येक स्टेशनला आमच्या आशा पल्लवित होत व तेवढ्याच घणाघातीपणे त्या उखडल्या जात. उरत ते फक्त सुन्न शरीरांचे भग्न नि:श्वास! बघता बघता बाहेर काळोख पसरला.... डब्यात दिवे लागले... एवढा वेळ जागेसाठी आणि देव जाणे आणखी कोणकोणत्या कारणांसाठी भांडणारी मंडळी जरा दमून भागून थोडी निवांत झाली. मी व बहिणीने आता डब्याच्या आतूनच वाट काढत पलीकडच्या टोकाला पोचायचा निर्णय घेतला असल्यामुळे तासागणिक पाच-सहा इंच अशा गतीने आम्ही पुढे सरकत होतो. पहिल्या कंपार्टमेंटच्या अगदी नजीक पोहोचलो होतो. त्या कंपार्टमेंटमध्ये सगळी कॉलेजची मुलं-मुली ठासून भरली होती. सगळे निवांत झाले म्हटल्यावर त्यांनी मल्याळम् गाण्यांच्या भेंड्या सुरू केल्या. जोरजोरात, जोषात गाडीच्या टपावर व भिंतींवर ताल धरून नजरेचे इशारे करत गाणी म्हणणारी पोरे आणि त्यांच्या इशार्‍यांना मुरकत दाद देणार्‍या पोरी....!! आजूबाजूचे प्रवासी कौतुकाने ह्या जथ्याची गाणी ऐकत होते, मध्येच त्यांना सामील होत होते. एवढ्या गर्दीत, उकाड्यात व गलक्यात आपल्याच मस्तीत राहून, चेमटलेल्या अवस्थेत आनंदीपणे गाणार्‍या त्या सर्वांचा मला क्षण-दोन क्षण हेवा वाटला. एरवी रेल्वेच्या ए.सी. डब्याशिवाय व गुबगुबीत गिरद्यांशिवाय प्रवासाची कल्पना साहू न शकणारी मी त्यांच्या त्या साध्या सरळ आनंदाकडे आसुसून अविश्वासाने पाहत होते. हे लोक परग्रहवासी तर नाहीत ना, अशी शंकाही मनास काही सेकंद चाटून गेली.
माझ्या त्या मनोस्थितीचा भंग एका उग्र, खमंग, रसदार, तेलकट अशा तीव्र वासाने केला. एरवी त्या वासाचा पदार्थ खाण्याची कल्पनाही मी करू शकणार नाही... परंतु माझ्या भुकेलेल्या पोटाला ते माहीत नसावे. त्याने गुरकावून सकाळपासूनच्या धावाधावीत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याची क्षीण गर्जना केली. साइड सीट्सवर बसलेल्या एका मध्यमवयीन जोडप्याने आपला टिफिन उघडून त्यातून तर्रीदार सांबार-भात-भाजी खायला सुरुवात काय केली, आणि सिग्नल मिळाल्याप्रमाणे आजूबाजूच्या लोकांनीही पटापट आपापले डबे उघडून सायंकालीन भोजनास आरंभ केला.

आमच्यापाशी ना टिफिन होते, ना स्टेशनवर बाहेर जाऊन काही विकत घेण्याचा मार्ग! तरी मी धीर करून खिडकीजवळ बसलेल्या एका माणसाला पैसे देऊन पुढच्या स्टेशनावर किमान बिस्किटाचा पुडा घेण्यास खुणेने विनविले. पण आमचा डबा फलाटावरील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, दुकानांपासून बर्‍याच लांबवर असल्यामुळे तेही शक्य झाले नाही. आज बहुतेक उपास करायला लागणार हे सत्य उमगेपर्यंत बाजूच्या लोकांची खाणीपिणी आटपली होती आणि आता मिळेल त्या स्क्वेअर इंचात लुंग्या, पातळे आरामासाठी विसावली होती. बहिणीने मित्राला मोबाईल लावला तेव्हा त्याने तेथील बाकड्यावर झोपण्यापुरती जागा मिळाली असून तो आडवा झाला असल्याची सुवार्ता सुनावली.
खाली बसलेल्या (म्हणजे शब्दशः रेल्वेच्या फ्लोअरवर स्थानापन्न), पेंगुळलेल्या व डुलक्या काढणार्‍या मंडळींना तुडवत, लाथा मारत डब्याच्या दुसर्‍या टोकाला पोचायची कल्पनाच असह्य होती. त्याक्षणी मला जर टारझन ट्रेनिंग मिळाले असते तर मी सामानाच्या रॅक्सना धरून लोंबकळत ''याऽऽहूऽऽ'' करत किंचाळत हां हां म्हणता डब्याच्या दुसर्‍या टोकाला पोचले असते असे तीव्रतेने वाटून गेले व पुन्हा एकदा आपल्या शिक्षण व्यवस्थेतील न्यूनस्थळे मजला भेडसावून, वेडावून गेली!
खिन्न मनाने मग मीही आमच्या बॅगच्या एका टोकावर वाईच टेकले. दुसर्‍या टोकावर बहीण! अहाहा.... अंतरीचे सुख वगैरे वगैरे काय जे असते ते मला त्या दोन क्षणांत उमगले! चार तास अतिशय क्लिष्ट अवस्थेत, लटकत, लोंबकळत ठेचकाळत व स्वतःच्या शरीराचे भजे करत काढल्यावर उत्तमांगाला जेव्हा तात्पुरता आधार मिळाला तेव्हा सर्वांगातून सुटकेची एक अबोल तान लहरत गेली. शरीर तर श्रमले होतेच, पण परिस्थितीशी झगडून मनही श्रमले थकले होते. बहिणाबाईंची तर बसता क्षणीच विकेट पडली होती. गाडीच्या हेलकाव्यांच्या अंगाईने ती जागचीच डोलत होती. माझ्या मनातून अद्याप डब्याच्या दुसर्‍या टोकाला कसे जाता येईल याचे विचार गेले नव्हते. जणू काही त्या टोकाला पोचल्यावर मला पंचतारांकित आसन व शयन व्यवस्था प्राप्त होणार होती!!
जनरल डब्यात रात्रीचे वेळी तितकेसे सुरक्षित वातावरण नसते ह्याची जाण ठेवून ती सारी रात्र मी जागून काढली. मध्येच भगिनीला ढोसायचे, बसल्या जागी घोरणार्‍या सुखी निद्रिस्त जीवांकडे बघत उसासे टाकायचे, बिडी-दारू-धूर-गर्दीचे संमिश्र वास, आजूबाजूच्या लोकांचे संथ नि:श्वास....

अगदी पहाटे कधीतरी माझाही डोळा लागला. जाग आली तीच कचाकचा आवाजाने. ज्याच्या पायथ्याशी आम्ही सारी रात्र काढली त्या माणसाने आपले प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधील सामान आवरायला सुरुवात केली होती. मी तारवटल्या डोळ्यांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले... ''बेंगळुऽरूऽ इन हाऽफ आवर!'' तो गुरकावला. ताबडतोब मी बहिणीला ढोसायला सुरुवात केली. दोघी जाग्या तर झालो, पण तोंडावर साधे पाणी मारायचे तरी कसे, हाही प्रश्नच होता. शेवटी पर्समधील वाईप्स काढून त्यानेच चेहरे खसाखसा पुसले. बाकीच्या गर्दीला तोंड धुणे वगैरे गोष्टींशी घेणेदेणे नव्हते. त्यांच्या जगात ते मस्त होते. अंगाभोवती गुंडाळलेल्या शालीला आवरून कसेबसे बॅगेत कोंबत असताना मित्राचा कॉल आला.
''प्लॅटफॉर्मपे मिलते है यार!'' तो टवटवीत आवाजात उद्गारला.
त्याच्या त्या सक्काळ सक्काळच्या तरतरीतपणामुळे माझ्या मस्तकात मात्र तिरिमिरीच गेली. इथे सारी रात्र मी चोरचिलटांच्या, गुंडांच्या धास्तीने आणि अशक्य अवघडल्या अवस्थेत बसून जागून काढली... आणि हा शहाणा रात्रभर सुखकी नींद, चैन की सांसे घेऊन कसा बोलतोय बघा!
बहिणीला कडक शब्दांत फर्मान सोडले, ''बॅग उचल!''
''आँ??''
''म्हणतीये ना, बॅग उचल लवकर.... आपल्याला डब्याच्या त्या टोकाला जायचंय!''
बहिणीच्या झोपाळलेल्या डोळ्यांत 'हिला नक्की वेड लागलंय' चे भाव! पण मी आता मागे हटणार नव्हते.
दात-ओठ चावत, जीव खाऊन मी जोरजोरात ''हटो, हटो, मूव्ह, मूव्ह...'' चा नारा देत डब्याच्या त्या टोकाच्या दिशेने देह लोटून दिला. वाटेत येणार्‍या लोकांपुढे आता माझ्या वजनाखाली चिरडले जाणे किंवा बाजूला होणे हेच पर्याय होते. (शिवाय साखरझोपेतून उठल्यावर त्यांची जी अवस्था होती ती माझ्यासाठी फायद्याची होती!) समस्त असुर-राक्षसांना पृथ्वीवर दणदणा चालत, वाटेतील जीवांना पायदळी तुडवत, विकट हास्य-गर्जना करत जाताना कित्ती कित्ती आनंद मिळत असेल ते आता कोठे माझ्या ध्यानात आले. बहीण हूं की चू न करता मुकाट माझ्या मागोमाग येत होती. अशा वेळी मूग गिळून गप्प बसण्याला पर्याय नसतो हे तिला अनुभवाने पुरते कळून चुकले आहे. मजल दरमजल लढवत आम्ही ज्या ठिकाणी आमचा मित्र सकाळचा वारा खात उभा होता तिथपर्यंत जाऊन थडकलो.
'ये ल्लो, आ गये हम | अब साथमें उतरेंगे|'' मी विजयोन्मादाची तुंबळ गर्जना केली.
मित्र खूळ लागल्यागत आम्हा दोघींकडे टकमका बघतच राहिला!!
बंगलोर स्टेशन येताक्षणी आम्ही तिघांनी दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. मोकळ्या हवेत, मोकळ्या जमिनीवर पाऊल ठेवले. अडथळ्यांच्या शर्यतीने ग्रस्त झालेले रक्ताभिसरण पूर्ववत होण्यासाठी आठ-दहा येरझार्‍या घातल्या. माझी पावले टम्म सुजली होती. शरीरात सुया, पिना टोचल्यासारखी जाणीव होत होती. डोळे लाल झाले होते. आणि थकव्याचे तर विचारूच नका राव! त्या दिवशी बहिणीच्या घरी पोचल्यावर अगोदर अंघोळी केल्या व जे देह लोटून दिले ते थेट सायंकाळी सहा वाजता जाग आली. पिझ्झा ऑर्डर केला. दोघींनी समोरासमोर बसून पिझ्झ्याचा फन्ना उडविताना आयुष्यभरासाठी पाळण्याची प्रतिज्ञा घेतली,
''गांधीबाबांनी केला तर केला.... ह्यापुढे कध्धी कध्धी रेल्वेच्या जनरल डब्याने प्रवास करणार नाही!''
--- अरुंधती
[ मायबोली गणेशोत्सव २०११ स्पर्धेसाठी दिलेला लेख]


9 comments:

 1. हाहाहा !! प्रचंड लिहलंय !! पण बापरे ! काय भयानक अवस्था झाली असेल तुमची ! माझा पॅसेंजर/लोकल चा १:३०-२ तासाचाच प्रवास जीव घेतो,मी लांबचा प्रवास करूच शकत नाही. सरळ खासगी बस बुक करतो.

  ReplyDelete
 2. खुप छान लिहिले आहे,
  मनापासुन आवडले.
  "समस्त असुर-राक्षसांना पृथ्वीवर दणदणा चालत, वाटेतील जीवांना पायदळी तुडवत, विकट हास्य-गर्जना करत जाताना कित्ती कित्ती आनंद मिळत असेल ते आता कोठे माझ्या ध्यानात आले." वाचून जाम हसायला आले :D
  खुप छान. :-)
  माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

  ReplyDelete
 3. धन्यवाद प्रशांत आणि संकेत! :)

  ReplyDelete
 4. Well, this post is an outcome of that ... shows that every situation has some advantages :-)

  Joke apart, that is how majority people travel and we need lot of improvement in our public transport system.

  ReplyDelete
 5. हाहाहा .....

  ''गांधीबाबांनी केला तर केला.... ह्यापुढे कध्धी कध्धी रेल्वेच्या जनरल डब्याने प्रवास करणार नाही!''so true...

  ReplyDelete
 6. :) धन्यवाद अपर्णा, आतिवास (सविता)!

  ReplyDelete
 7. हाहा.. अकुताई. लय भारी प्रवास वर्णन..

  ReplyDelete
 8. झकास. लैच भारी प्रवास वर्णन.

  ReplyDelete
 9. धन्यवाद दिलीप, मुक्त कलंदर! :)

  ReplyDelete