प्रत्येक आदिम संस्कृतीत सृजनाच्या, जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कथा ऐकायला, वाचायला मिळतात. आफ्रिकेच्या जंगलांत नांदणार्या अनेक आदिवासी जमातींमध्ये अशा विविध कथा प्रचलित आहेत. या लोककथांमध्ये त्या त्या प्रांतांतील निसर्ग, प्राणी, प्रथा यांचे प्रतिबिंब दिसून येते. एका कथेनुसार सृष्टी-निर्मात्याने आफ्रिकेत आढळणार्या महाकाय, विशाल अशा बाओबाब वृक्षाच्या मुळांतून प्राणी, पक्षी, किड्यांना जगात आणले. त्यातील बरेचसे प्राणी तेव्हा जसे दिसायचे तसेच आताही दिसतात. पण काही प्राण्यांचे रूप व रचना काळाच्या ओघात बदलली. अशाच एका शक्तीशाली, आकाराने मोठ्या प्राण्याच्या, हत्तीच्या बदललेल्या रूपाची ही लोकप्रिय कथा! बाळगोपाळांना ही कथा नक्कीच आवडेल! आणि म्हणूनच त्या कथेचे हे खास त्यांच्यासाठी केलेले रूपांतर!
*********************************************************************************
सुसरबाईची मोडली खोड, हत्तीच्या नाकाची झाली सोंड!
एकदा ऐन उन्हाळ्यात हत्तींचा एक कळप जंगलात पाणी शोधत हिंडत होता. सूर्याच्या आगीमुळे जमीनीतून वाफा निघत होत्या. पाण्याची तळी आटली होती. हत्ती खूप प्रवास करून थकले होते. शेवटी त्या भुकेल्या, तहानलेल्या हत्तींना पाण्याचं एक तळं दिसलं. तळ्याकाठी एक सुसर सुस्तपणे आराम करत बसली होती. म्हातार्या सुसरीला बरेच दिवसांत कोणी खायला मिळालं नव्हतं. हत्तींचा कळप तळ्याच्या दिशेने येताना पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं! तिची भूक चांगलीच खवळली. आता तिची चंगळच होती! जराही आवाज न करता ती हळूच पाण्यात शिरली. तिचे डोळे आणि नाक तेवढे पाण्याबाहेर दिसत होते. तिच्या गुपचूप हालचालींचा कोणालाच पत्ता लागला नाही. आपल्या जागेवरून ती हत्तींच्या हालचालींवर पाळत ठेवून दबा धरून बसली होती. हत्ती पाणी प्यायला तळ्यात उतरले. तोवर सुसर सुळकन् पोहत पोहत तिथे पोचली होती. हत्ती अंग दुमडून, वाकून तळ्यातील पाणी पिऊ लागले आणि सुसरीने मोका साधला! तिने आपली शेपटी पाण्यावर जोरात आपटली आणि जवळच्या एका हत्तीच्या पिल्लावर वेगात हल्ला चढवला. सुसरीच्या त्या हल्ल्याने सारे हत्ती घाबरले आणि कसेबसे धडपडत, चित्कारत, तोल सावरत उठले. सुसरीच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी अंग घुमवून ते उलट दिशेने पळू लागले. पण ते छोटं पिल्लू तळ्यातच अडकलं होतं! सुसरीने त्याचं नाक आपल्या अक्राळविक्राळ जबड्यात पकडून ठेवलं होतं ना! इतर हत्तींनी मग पिल्लाला मागं ओढलं. पण सुसरीची पकड अजिबात ढिली होत नव्हती. बरीच खेचाखेची झाली, तरी सुसर माघार घेत नव्हती. पिल्लाचं नाक आपल्या जबड्यातून सोडत नव्हती. बाकीचे हत्ती कंटाळले, दमून गेले, पण सुसर दमली नाही. हत्तीचं पिल्लूही लहान होतं. पण त्याच्या अंगात भरपूर ताकद होती. सुसरीनं त्याचं नाक जोरजोरात खेचलं तरी त्यानं हार मानली नाही. असे अनेक तास गेले. दोघंही एकमेकांशी लढत होते. सुसरीनं नाक खेचल्यावर पिल्लूही आपली ताकद पणाला लावून उलट दिशेनं ओढायचं. या सर्व ओढाताणीत पिल्लाचं नाक लांबच लांब होऊ लागलं. बरेच तास हे युद्ध चाललं. शेवटी सुसर दमली. कंटाळून तिनं हत्तीच्या पिल्लाचं नाक आपल्या जबड्यातून सोडवलं आणि ती तळ्यातल्या खोल पाण्यात दिसेनाशी झाली.
इकडे सुसरीच्या तावडीतून अचानक सुटका झालेलं ते पिल्लू धपाक्कन् तळ्याकाठच्या चिखलात पडलं आणि जोरजोरात धापा टाकू लागलं. खेचाखेचीत ते खूप थकलं होतं. बाकीचे हत्ती त्याच्या भोवती गोळा झाले. पिल्लाला फार काही लागलं नव्हतं. पण सुसरीच्या धारदार दातांमुळे त्याच्या नाकाला जखमा झाल्या होत्या. आणि हो, आता त्याचं नाक इतर हत्तींपेक्षा लांबच लांब झालं होतं. कळपातले हत्ती त्याच्या नाकाकडे बघून हसू लागले. पिल्लाला त्यांचा खूप राग आला. त्याचं नाक लांबुळकं होऊन पार जमीनीपर्यंत लोंबकळत होतं. त्यानं पाण्यात आपलं प्रतिबिंब बघितलं. पाण्यात ते लांबच लांब नाक पाहून ते पिल्लू खूपच खट्टू झालं. त्याचं नाक हुळहुळं झालं होतं, ठणकत होतं. आणि बाकीचे हत्ती त्याला हसत होते!! पिल्लू रुसून लपून बसलं. त्याला आपल्या नाकाची लाज वाटत होती.
पुढं अनेक दिवस पिल्लानं आपलं नाक पूर्वीसारखं व्हावं म्हणून बरीच खटपट केली. पण नाक जैसे थे! त्याच्या जखमा काही दिवसांनी भरून आल्या. हळूहळू त्याला आपल्या नाकाची सवय होऊ लागली. इतर हत्तींच्या हसण्याचा राग यायचंही बंद झालं. मग एक गंमतच झाली! पिल्लाला आपल्या लांबच लांब नाकाचे फायदे कळू लागले! आता त्याला झाडांची पानं, गवत, फळं आपल्या नाकाच्या मदतीने पटकन तोडता व खाता येऊ लागली. पाणी पिणंही सोपं झालं. उन्हात अंग गरम झालं की नदीकाठी जाऊन या नाकाच्या मदतीनं त्याला अंगावर चिखल थापता येऊ लागला. नदीचं पाणी कितीही खोल असलं तरी पिल्लू नाक उंच हवेत धरून श्वास घ्यायचं आणि मजेत नदी पार करायचं. लांब नाकामुळे इतरांच्या अगोदर त्याला हवेतले बदल जाणवायचे किंवा धोका कळायचा. पाठीला खाज सुटली की या नाकाच्या विळख्यात झाडाची फांदी पकडून त्याला आपली पाठ खाजवता यायची!
आपल्या नाकाचे फायदे लक्षात आल्यावर पिल्लू खुश झालं. इतर हत्तींनाही पिल्लाच्या त्या लांब नाकाचा हेवा वाटू लागला. मग काय! एकेक करत सारे हत्ती त्या तळ्यापाशी जायचे आणि सुसरीनं आपलं नाक जबड्यात धरून ओढावं म्हणून आपलं तोंड पाण्यात घालून बसायचे. सुसरीनं अशा अनेक हत्तींचं नाक ओढून त्यांना पाण्यात खेचायचा प्रयत्न केला, पण दर वेळी हत्तीच जिंकले. आणि प्रत्येक जिंकणार्या हत्तीचं नाक त्या खेचाखेचीत लांबच लांब होत गेलं. या सार्या दमवणार्या लढाईचा सुसरीनं काय विचार केला असेल ते कोणालाच ठाऊक नाही! पण एक गोष्ट मात्र नक्की! सुसरबाई तशाच राहिल्या उपाशी! हत्तींवर हल्ला करून काऽऽही उपयोग नाही हे तिला चांगलंच कळलं! सुसरबाईंची मोडली मस्तच खोड.... हत्तीच्या नाकाची झाली सोंड!!
(आफ्रिकन लोककथेवर आधारित)
(मायबोली गणेशोत्सव २०१२ साठी केलेले लेखन. चित्र आंतरजालीय मुक्तस्रोतांमधून साभार)
-- अरुंधती कुलकर्णी
मजेदार आहे कथा.
ReplyDelete