Monday, October 29, 2012

सिद्दी संगीत

गुलामगिरी, दास्यत्व, पराधीनता यांतून येणारी हतबलता तर काही ठिकाणी हतबलतेतून अंगच्या मूळ ताकदीतून येणारी लढाऊ वृत्ती यांचा अर्थ पुरेपूर जाणणारी व मूळ आफ्रिकन वंशाची जमात गेली अनेक शतके भारतात वास्तव्य करून आहे. आज तुम्ही व आम्ही जेवढे भारतीय आहोत तेवढीच ही जमातही भारतीय आहे. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी, रूपरचना, मूळ आफ्रिकन प्रथा व संगीत यांमुळे आजही भारतीय प्रजेमध्ये हे लोक वेगळे कळून येतात. त्यांना 'सिद्दी' किंवा 'हबशी' म्हणून संबोधिले जाते. आज भारतात त्यांची संख्या पन्नास ते साठ हजार यांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकांनी त्यांच्या पूर्वापार सांगीतिक परंपरा किती जरी जपल्या तरी स्थानिक भारतीय संगीत, भाषा व प्रथांशी त्यांचा कालपरत्वे मेळ झाला आहे. सिद्दी लोकांच्या परंपरा, भाषा, राहणी, समजुती व संगीताचा अभ्यास करू जाता संस्कृती कशा प्रकारे मूळ धरते, प्रवाहित होते, विकसित होते किंवा दिशा बदलते याचे जणू एक चित्रच समोर उभे राहते.
सिद्दी स्त्री व मुलगी
असे सांगितले जाते की भारतात सिद्दी लोकांनी इ.स. ६२८ मध्ये भडोच बंदरात पहिले पाऊल टाकले. पुढे इस्लामी अरब टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्येही अनेक सिद्दी फौजेचा भाग म्हणून भारतभूमीत आले. परंतु सैन्याचा भाग म्हणून आलेल्या सिद्दींपेक्षाही गुलाम, नोकर, खलाशी व व्यापारी म्हणून आलेल्या सिद्दींचे प्रमाण जास्त धरले जाते. हे सर्वजण पूर्व आफ्रिकेतून इ.स. १२०० ते १९०० या कालखंडात भारतात येत राहिले व इथेच स्थायिक झाले. १७ व्या शतकात पोर्तुगीज व्यापार्‍यांनी सिद्दींना भारतातील अनेक राज्यकर्त्यांना, संस्थानांना व राजांना गुलाम म्हणून विकल्याची नोंद आढळते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सिद्दी लोकांची गुलाम म्हणून विक्री झाली.

भारताच्या पश्चिम भागात, खास करून गुजरातेत सिद्दी लोकांना आपल्या अंगभूत ताकदीमुळे व इमानदारीमुळे स्थानिक राजांच्या पदरी मारेकरी म्हणून नेमण्यात आले. काहींना शेतमजूर, नोकर म्हणून पाळण्यात आले. ज्या सिद्दींना असे आयुष्य नको होते त्यांनी घनदाट जंगलांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. त्यातील काहींनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जंजिर्‍यावर व जाफराबाद येथे आपली सत्ताकेंद्रेही उभी केली. दिल्लीवर मुघलांची सत्ता येण्याअगोदरच्या काळात (इ.स. १२०५ ते १२४०) रजिया सुलतानाचे पदरी असलेला जमालुद्दीन याकूत हा प्रसिद्ध सरदार सिद्दी जमातीपैकीच एक होता असे सांगण्यात येते. गुलामी ते सरदारकी असा त्याचा प्रवास होता.

सत्तासंघर्षामध्ये सिद्दी जमातीने कायम मराठ्यांपेक्षा मुघलांचीच जास्त करून साथ दिली. परंतु सिद्दी लोकांमधील मलिक अंबर या इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने आपल्या मर्दुमकीने मुघलांना जेरीस तर आणलेच, परंतु मराठ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या गनिमी काव्याच्या लढ्याची सुरूवात मलिक अंबरने महाराष्ट्रात केली. इथियोपियाहून आईबापांनी गुलामगिरीत विकलेल्या व जागोजागच्या गुलाम बाजारांमधून विक्री होत भारतात पोचलेल्या मलिक अंबरने अहमदनगरच्या निझामाच्या पदरी चाकरी केली व त्याचा बाकीचा इतिहास, पराक्रम, त्याने बांधलेल्या कलापूर्ण वास्तू व औरंगाबाद येथे त्याने तेव्हा विकसित केलेली 'नेहर' जलव्यवस्था यांबद्दल इतिहासकार कौतुक व्यक्त करतात.

भारतातील अनेक सिद्दी लोक हे टांझानिया व मोझांबिक येथील लोकांचे वंशज असून त्यांच्या पूर्वजांना पोर्तुगीजांनी भारतात आणले. यातील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून फारच कमी लोक हिंदू धर्म लावतात. त्याचे मुख्य कारण पारंपारिक हिंदू वर्ण व्यवस्थेत त्यांना कोठेच स्थान नसणे!

भारतातील तीन प्रांतांमध्ये प्रामुख्याने सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. गुजरात, कर्नाटक व हैद्राबाद हे ते प्रमुख प्रांत होत. गुजरातेत गीर जंगलाच्या आजूबाजूला सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. त्यांचे पूर्वज हे जुनागढच्या नवाबाच्या पदरी गुलाम होते. पोर्तुगीजांनी त्यांना गुलाम म्हणून जुनागढच्या नवाबाला विकले होते.


येथील सिद्दींनी स्थानिक गुजरातेतील चालीरीती, संगीत, भाषा इत्यादी जरी आत्मसात केले असले तरी त्यांच्या काही काही प्रथा, समजुती, संगीत व नृत्य या त्यांच्या मूळ संस्कृतीतून आलेल्या आहेत व त्यांनी त्या प्रयत्नपूर्वक जपल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांचे 'गोमा संगीत'. किंवा गोमा नृत्य! ह्याचे मूळ पूर्व आफ्रिकेतील बंटू लोकांच्या आवडत्या एन्गोमा ड्रमिंग व नृत्यामध्ये असल्याचे सांगतात. या लोकांसाठी गोमा नृत्य हे फक्त मनोरंजन किंवा विरंगुळ्याचे साधनच नाही, तर ते त्यांच्या मूळ धार्मिक किंवा आध्यात्मिक समजुतींनुसार महत्त्वाचे आहे. नृत्याच्या परमक्षणांना नर्तकांच्या अंगात त्यांचे पूर्वज संत-आत्मे प्रवेश करतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

गुजरातेतील सिद्दी लोकांचे हे गोमा नृत्य :कर्नाटकात सिद्दींची संख्या सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येते. उत्तर कर्नाटकाच्या यल्लापूर, हलियाल, अंकोला, जोयडा, मुंडगोड, सिरसी तालुक्यांत, बेळगावच्या खानापूर तालुक्यात आणि धारवाडच्या कालघाटगी या ठिकाणी प्रामुख्याने सिद्दींची वस्ती आढळते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक सिद्दींनी पाकिस्तानात जाणे पसंत केले व ते कराचीत स्थायिक झाले. कर्नाटकातील सिद्दी हे प्रामुख्याने पोर्तुगीज, अरब व ब्रिटिश व्यापार्‍यांनी १६ ते १९ व्या शतकाच्या काळात गोव्याला गुलाम म्हणून आणलेल्या मूळच्या इथियोपिया व मोझांबिक येथील आफ्रिकन लोकांचे वंशज आहेत. त्यातील काहींना गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले तर काहींनी पळून स्वतःची सुटका करून घेतली व जंगलांचा आश्रय घेतला.
यल्लापूरच्या सिद्दींमध्ये, त्यांच्या नाच-गाण्यांमध्ये व श्रद्धा समजुतींमध्ये त्यांच्या पूर्वजांचा वारसा पुढे चालविलेला दिसून येतो. एम टी व्ही साऊंड ट्रिपिन् कार्यक्रमात यल्लापुरातील सिद्दी लोकांवर झालेला हा कार्यक्रम : https://www.youtube.com/watch?v=JT-ODZ7YX30

त्यांच्यावरचा हा एक व्हिडियो :हैद्राबादचे सिद्दी हे त्या भागात १८ व्या शतकात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. हे सिद्दी निझामाच्या पदरी घोडदळात काम करत असत. त्यांचे संगीत हे 'हैद्राबादी मर्फा संगीत' (ज्याला 'तीन मार' म्हणूनही संबोधिले जाते) म्हणून विशेष प्रसिद्ध आहे व हैद्राबादेत ते खास सिद्दींच्या लग्नसमारंभांत किंवा अन्य प्रसंगी वाजविले जाते. ढोलक, स्टीलची कळशी व लहान 'मर्फा' ढोल यांसोबत लाकडी 'थापी' असा मर्फा वाद्यवृंदाचा संच असतो. मर्फातही तीन उपप्रकार आहेत. काही फक्त पुरुषांसाठी आहेत तर काही प्रकार पुरुष व स्त्रिया दोघांसाठी आहेत. यातील नृत्यप्रकारात तलवार व काठ्यांचा वापर करण्यात येतो. मात्र या कलाप्रकाराला ओहोटी लागल्याचे सांगण्यात येते.

केनियातील वृत्तवाहिनीने प्रसारित केलेले सिद्दी लोकांविषयीचे हे वार्तांकन :आजच्या काळात बहुसंख्य सिद्दींची आर्थिक व सामाजिक स्थिती ही निम्न स्तराची आहे असे सांगतात. शिक्षणाचा अभाव, गरीबी, पिढ्यानुपिढ्या लादलेली गुलामगिरीची मानसिकता यांमुळे या लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागतो आहे. तसेच त्यांची सामाजिक परिस्थितीही फार चांगली नाही. भारतीय भाषा, आचार, वेशभूषा व संस्कृतीशी बर्‍याच प्रमाणात आदानप्रदान केले तरी सिद्दींना मुख्य लोकधारेने फारसे सामावून घेतलेले दिसत नाही. नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळले असल्यामुळे मेहनतीच्या जोडीला शिक्षणाचा मेळ घालून ते आयुष्यात पुढे येण्याच्या खटपटीत दिसतात.

(* चित्रे व माहिती आधार : विकिपीडिया, हिंदू वृत्तपत्रातील बातमी, The African Dispersal in the Deccan: From Medieval to Modern Times By Shanti Sadiq Ali, बी बी सी इन पिक्चर्स : इंडियाज आफ्रिकन कम्युनिटीज)

1 comment: