Saturday, July 30, 2011

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत


वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)


कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.
कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.
कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?
१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)
२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.
३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.
४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!
५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.
६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.
७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.
८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.
९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.
१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)
आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.
त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी
काय करावे?
१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.
२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.
३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.
४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.
५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.
६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.
७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.
८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.
९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.
१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.
काय करू नये?
१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.
२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.
३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.
४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.
५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.
६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.
७. परदेशांत लग्न करणे टाळा.
८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.
९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.
१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.
११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.
१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.
१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.
१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.
परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :
http://moia.gov.in/writereaddata/pdf/list_indian_women.pdf

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :
तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?
१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.
२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.
३. कारवाई
अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.
आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.
इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.
तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :
क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.
संपर्क तपशील :
Contact for NRI Marriages Case
Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002
Telephone Numbers :             +91 - 11 - 23234918      
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

धन्यवाद!
-- अरुंधती
माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx
(छायाचित्र विकीवरून साभार)

Friday, June 24, 2011

अक्का महादेवी

अक्का महादेवी! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्रीमुक्तिवादी संत! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे. ईश्वराला - शिवाला तिने आपला पती मानले होते. [पुढे १६ व्या शतकात मीराबाईनेही कृष्णाला आपला पती मानल्याची कथा सर्वज्ञात आहे! ]
अक्का महादेवींची वचने फार मार्मिक आहेत. तिच्या ४३० वचनांमध्ये (कन्नड भक्ती काव्य) ती आपल्या ह्या पतिदेवाशी संवाद तर साधतेच, शिवाय समाजात असलेल्या अनेक अज्ञानमूलक, जाचक बंधनांवर शब्दांचा आसूड उगारते!

कर्नाटकात बाराव्या शतकात शिमोगा तालुक्यात जन्म झालेली ही स्त्री आजही कर्नाटकात घरोघरी तिच्या वचनांच्या रूपात जिवंत आहे. कलह, राजकीय अराजकाच्या अनिश्चित कालात तिने एक अशी चळवळ सुरू केली ज्यामुळे तिला स्त्री सबलीकरण व साक्षात्कारासाठी तळमळीने कार्य करणारी पुरोगामी स्त्री असा सन्मान द्यायला काहीच हरकत नाही. महिला-कल्याणाच्या बाबतीत तिची मते, दृष्टिकोन व कार्य हे आजही स्फूर्तिदायक आहे. त्यामुळे तिला त्या काळातील महिलांच्या उद्धारासाठी झटणारी, गूढदृष्टी असणारी स्त्री संत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कूडल संगम ह्या कर्नाटकातील लिंगायतांच्या तीर्थक्षेत्री होणाऱ्या अनेक अनुभवमंडपातील विद्वज्जनांच्या सभांमध्ये ती तत्त्वज्ञान व मोक्षप्राप्ती (अरिवु) विषयीच्या चर्चा, वादविवादांमध्ये हिरीरीने भाग घेत असे. आपल्या अमरप्रेमाच्या शोधात तिने प्राणी, पक्षी, फळे, फुले, वनस्पती, झाडे, निसर्ग ह्यांनाच आपले सखे-सोबती मानले. घराचा, कुटुंबाचा त्याग करून बाहेर पडली. त्या काळात वर्णाश्रमाच्या कठोर आगीत शूद्र व स्त्रिया होरपळून निघत होत्या. अशा काळात तिने हे बंड पुकारले. तिने फक्त महिलांच्या उद्धारासाठीच काम केले नाही तर अतिशय सुंदर अर्थाची वचने रचली, जी आजही मोठ्या भक्तीने गायिली जातात.

एक अशीही कथा आहे की अक्कामहादेवीचा विवाह कौशिक नामक स्थानिक जैन राजाशी झाला होता. परंतु तिच्या वचनांमधून स्पष्ट कळून येते की ती फक्त 'चेन्नमल्लिकार्जुन' ह्या आपल्या इष्टलिंगालाच - शिवालाच बालपणापासून आपला पती मानत होती. तिच्या काव्यांतून ती भौतिक पातळीवरचे नाशवंत, मर्त्य प्रेम धुत्कारताना व त्या ऐवजी अमर असणारे, ईश्वराचे ''अनैतिक'' अक्षय प्रेम किंवा ''बाहेरख्याली'' प्रेम जवळ करताना दिसते. आणि ह्या मार्गातच ती स्वतःची उन्नती करून घेताना दिसते!

ती तिच्या वचनांत म्हणते,आयुष्यातील सर्व सुख-सोयींना, संपत्तीला लाथाडून अक्कामहादेवीने आयुष्यभर भटकी वृत्ती स्वीकारली व एक कवयित्री-संत म्हणून जीवन व्यतीत केले. ती गावोगावी हिंडत असे व शिवाची स्तुती गात असे. आत्मोद्धारासाठी तिने प्रचंड भ्रमण केले व शेवटी संन्यासिनी झाली व बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे उर्वरित आयुष्य जगली. तिच्या जनरीतीला धुत्कारून आचरणाच्या पद्धतीने तिच्याबद्दल सनातन समाजात बरेच वादंग उठले. त्यामुळे अनुभवमंडपातील सभांना तिला प्रवेश मिळवून देणे हेही तिचे गुरू अल्लम्माप्रभू यांना एकेकाळी कठीण झाले होते. खरीखुरी संन्यासिनी असलेली अक्का महादेवी अंगावर वस्त्रेही घालत नसे असे सांगितले जाते. त्या काळी पुरुष संन्यासी निर्वस्त्र राहणे ही सर्वसामान्य बाब होती परंतु एका स्त्री संन्यासिनीने असे राहणे समाजाला रुचणारे नव्हते. पण त्यांच्या विरोधाला न बधता ती तिचे आयुष्य मुक्तपणे जगत राहिली.

ह्याच काळात अनुभवमंडपाच्या सर्व विद्वान, ज्ञानी दिग्गजांनी तिला ''अक्का'' म्हणून (मोठी बहीण) संबोधायला प्रारंभ केल्याचे दिसते. कल्याण सोडताना ती हे वचन म्हणते, ''षड्रीपुंवर विजय मिळवून व शरीर-विचार -वाणी ह्या त्रयीचा अंत करून द्वैतात; आणि आता 'मी व परमात्मा' ह्या द्वैताचा अंत करून अद्वैतात मी केवळ आपल्या सर्वांच्या कृपेमुळे जाऊ शकले. मी येथे बसलेल्या सर्व विद्वज्जनांना, बसवण्णांना व अलम्माप्रभू-माझ्या गुरुंना प्रणिपात करते. आणि आता मी माझ्या चेन्नमल्लिकार्जुनाशी एकरूप व्हावे म्हणून आपण सारे मला आशीर्वाद द्या.'' ही होती अक्कामहादेवीच्या आयुष्यातील तिसऱ्या पर्वाची सुरुवात! पहिल्या पर्वात तिने भौतिक जगतातील वस्तूंचा व आकर्षणांचा त्याग केलेला... दुसऱ्या पर्वात तिने जगाचे रीतिरिवाज, नियम धुत्कारले व तिसऱ्या पर्वात ती श्रीशैलक्षेत्राच्या शिवमंदिराकडे आपला प्रवास सुरू करते - जिथे तिच्या अमरप्रेमाचा - चेन्नमल्लिकार्जुनाचा वास आहे. हे क्षेत्र १२व्या शतकाच्याही आधीपासून पवित्र स्थान म्हणून ख्यात आहे. श्रीशैलच्या निबिड अरण्यातील कदली ह्या स्थानी अक्का आपले शरीर त्यागते.


१. '' लोक,
स्त्री अथवा पुरुष,
लाजतात जेव्हा त्यांची वस्त्राने झाकलेली शरम,
उघडी पडते

जेव्हा जीवांचा अधिपती,
ह्या जगात बिनचेहऱ्याने वावरतो,
तेव्हा तुम्ही कसली लाज बाळगताय?

जेव्हा सारं जग त्या ईश्वराचेच नेत्र
सर्वदर्शी, सर्वसाक्षी,
तेव्हा तुम्ही काय काय लपवणार?''

तिच्या वचनांतून तिची साधी राहणी, निसर्गप्रेम व चेन्नमल्लिकार्जुनाप्रती भक्ती दिसून येते. ती गाते :

२.'' भुकेच्या निवारणासाठी कटोऱ्यात गावातला तांदूळ आहे,
तहान भागवण्यासाठी नद्या, झरे आणि विहिरी आहेत,
निद्रेसाठी मंदिरांचे भग्नावशेष उत्तम आहेत आणि;
आत्मसुखासाठी हे चेन्नमल्लिकार्जुना, माझ्यापाशी तू आहेस! ''

३. ''तुम्ही हातातील पैसा जप्त करू शकता
पण तुम्ही शरीराचे वैभव जप्त करू शकता का?
किंवा ल्यालेली वस्त्रे तुम्ही फेडू शकता
पण नग्नता, नसलेपण
झाकणारं, आच्छादणारं,
तुम्ही फेडू शकता का?

एका निर्लज्ज मुलीला
जी पद्मपुष्पाप्रमाणे, जुईच्या शुभ्रतेप्रमाणे असणाऱ्या
ईश्वराच्या प्रभातीचा प्रकाश ल्याली आहे;
तिला, हे मूर्खा, कोठे आहे आच्छादनाची किंवा आभूषणांची गरज? ''

श्री शैल मंदिर 


इंग्रजीतील ओळी

१. People,
male and female,
blush when a cloth covering their shame
comes loose
When the lord of lives
lives drowned without a face
in the world, how can you be modest?
When all the world is the eye of the lord,
onlooking everywhere, what can you
cover and conceal?

२. For hunger, there is the village rice in the begging bowl,
For thirst, there are tanks and streams and wells
For sleep temple ruins do well
For the company of the soul I have you, Chenna Mallikarjuna!

३. You can confiscate
money in hand;
can you confiscate
the body's glory?
Or peel away every strip
you wear,
but can you peel
the Nothing, the Nakedness
that covers and veils?
To the shameless girl
wearing the White Jasmine Lord's
light of morning,
you fool,
where's the need for cover and jewel?

[वरील बरीचशी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे तसेच अक्का महादेवीच्या वचनांचे शब्द, अर्थ इ. ही उपलब्ध आहेत. सर्वांना ह्या तेजस्वी स्त्री संतिणीची ओळख करून देणे हाच ह्या लेखामागील उद्देश!]

-- -- अरुंधती

Thursday, June 23, 2011

पनिशमेन्ट


''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती.
''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता.
'' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...''
''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...''
''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!''
आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती.
आर्या आणि हर्षमधील भांडणे तिला काही नवीन नव्हती. दर पंधरा-वीस मिनिटांनी ह्या आते-मामे भावंडांची आपापसात कधी मुद्द्याने तर कधी गुद्द्याने बातचीत चालू असे. आर्या साडेपाच वर्षांची तर हर्ष चार वर्षांचा. आर्या सारखी ताईगिरी करायला जाणार, तर हर्ष थोडा वेळ तिचे ऐकणार आणि मग तिला धुडकावून लावणार हेही ठरलेले. एकमेकांना ढकलणे, केस ओढणे वगैरे प्रकार हाताबाहेर जायच्या आधीच मग आजी तिचा ठेवणीतला दटावणीचा स्वर काढत असे...
''आर्या... हर्ष... माझं लक्ष आहे हां!''
आजीचा तो सूर ऐकता क्षणी दोन्ही भावंडे काही क्षण गप्प बसत. मग थोडा वेळ एकमेकांना वेडावून दाखविणे, त्यावर खदखदून हसणे आणि भांडण विसरून जाणे हेही नेहमीचेच.

आजीला एरवी त्यांना शिक्षा द्यायची वेळच येत नसे. पण काल दुपारी त्यांनी केलेले उपद्व्याप पाहिल्यावर मात्र कायम नातवंडांचे लाड करणार्‍या आजीने कधी नव्हे तो शिक्षेचे फर्मान सोडले होते! दोन्ही मुलांनी कारभारच तसा केला होता. आजी दुपारी डोकं दुखत असल्यामुळे गोळी घेऊन झोपली होती. आजोबांनाही बैठकीच्या खोलीत डुलकी लागली होती. हाती आलेल्या संधीचा नामी फायदा घेत दोन्ही मुलांनी ''फार उकडतंय.... आपण पाण्यात खेळू,'' म्हणत स्वतः भिजत बेडरूम आणि बाल्कनीतही पाणी ओतून ठेवले होते. बेडरूममधील गालिचा, कोपर्‍यातील सामान, बाल्कनीतील सामान त्यांच्या ह्या खेळात पार भिजून गेले होते.
आजीने झोपेतून उठल्यावर नातवंडांचा हा उद्योग पाहिला आणि कधी नव्हे तो तिचाही पारा चढला.
''आज तुम्हाला दोघांना पनिशमेन्ट! बेडरूम आणि बाल्कनी ही काय पाण्यात खेळायची जागा आहे का? बघा, हे सामान खराब झालं ना आता... ते सुकवायचं म्हणजे मलाच दुप्पट काम पडणार आहे!! ते काही नाही, आता तुम्ही बाथरुममध्येच बसायचं... चुपचाप... दार उघडं ठेवायचंय... तो घड्याळातला मोठा काटा सहावर येईपर्यंत बाथरुममध्येच थांबायचं.... हाताची घडी-तोंडावर बोट!'' आजीने कडक शब्दांत फर्मान सोडलं होतं. आजोबाही आजीचा चढलेला पारा बघून काही बोलले नव्हते.
तशी जास्त वेळाची शिक्षा नव्हती ती! जेमतेम अर्धा तास दोन खोडकर मुलांना बाथरुममध्ये वेळ काढायला लागणार होता. पण आर्या - हर्षसाठी आजीचे असे रागावणे आणि पनिशमेन्ट देणेच विरळे होते.
बाथरुममध्ये आर्या तिचं लहान स्टूल घेऊन आली. त्यावर आळीपाळीने बसत दोघेही घड्याळाचा मोठा काटा सहावर कधी येतोय ह्याची वाट बघत बसले होते. त्या अर्ध्या तासात त्यांना दोनदा तहान लागली, एकदा आजोबांनी आणि दोनदा शेजारील इमारतीतील मुलांनी हाक मारल्यासारखे वाटले ती गोष्ट वेगळीच! पण अर्ध्या तासाच्या 'पनिशमेन्ट' नंतर आजीने बाहेर यायला सांगितल्यावर दोघांनाही खूप 'हुश्श' वाटले होते. नंतर आजीच्या पदरात तोंड खुपसून तिच्या हाताला लोंबकळताना, आपण खोडी काढली, चुकीचे वागलो की आजी 'पनिशमेन्ट' देते हेही कळले होते.
संध्याकाळी मग आजीने साजूक तुपातला मऊ मऊ शिरा करून नातवंडांना खायला घातला. मुलांचे आईवडील घरी आल्यावर ''मी मुलांना अगोदरच पनिशमेन्ट दिली आहे, आता तुम्ही त्यांना वेगळे रागावू नका,'' म्हणून बजावून सांगितले. दिवसभर दंगा करकरून थकून गेलेली मुले रात्री बघता बघता पेंगुळली व झटकन झोपूनही गेली.
आजीने 'पनिशमेन्ट' दिल्यापासून आर्याला शिक्षेची 'पॉवर' कळली होती. आज हर्षने तिचा हेअरबॅन्ड मोडल्यावर तिला ही पॉवर अजमावण्याची हुकुमी संधी चालून आली होती.
''मी आता तुला पनिशमेन्ट करणार आहे! तू माझा टू हंड्रेड रुपीज चा हेअरबॅन्ड मोडलास!'' हेअरबॅन्डचे तुकडे एकमेकांवर आपटून त्यांचा नाद निर्माण करायच्या प्रयत्नांत असलेल्या हर्षला आर्याने ठणकावले.
(आर्याने परवाच शेजारच्या कॉलेजवयीन स्नेहाताईच्या तोंडी 'टू हंड्रेड रुपीज' ही रक्कम ऐकल्यापासून तिला ह्या शब्दाचे व आकड्याचे कमालीचे आकर्षण वाटू लागले होते. जी जी वस्तू छान असेल ती ती 'टू हंड्रेड रुपीज' ची आहे हे तिचे मत!)
''ह्यँ... तो हेअरबॅन्ड टू हन्ड्रेड रुपीजचा नव्हताच मुळी! तो फोर हंड्रेडचा होता. फोर, फोर!'' (हे हर्षचे आपल्या दोन्ही हातांची चार बोटे आर्यासमोर नाचवत काढलेले उद्गार!)
''ठीक आहे, मग तू पनिशमेन्टला तयार हो. आज तू घड्याळाचा मोठा काटा सहावर येईपर्यंत बाल्कनीतच थांबायचंस!'' आर्याने मोठ्या बहिणीच्या थाटात हर्षला ठासून सांगितले.
खरं तर आजीला आर्याचा आविर्भाव पाहून जाम हसू येत होते. जवळपास आजीच्या बोलण्याचीच हुबेहूब नक्कल करत होती ती! आजीने पुढे काय घडतंय ते पाहायचं ठरवलं आणि वर्तमानपत्राच्या आडून हळूच नातवंडांकडे लक्ष देत राहिली.
ठरल्याप्रमाणे हर्ष बाल्कनीत जाऊन उभा राहिला. समोर गुलमोहर, आंबा आणि जांभळाची मस्त डेरेदार झाडे होती. झाडांच्या काही फांद्या बाल्कनीला अगदी खेटून वार्‍याच्या झोक्यासरशी डोलत होत्या. फांद्यांवर येणारे पक्षी, बाल्कनीतून दिसणारे समोरचे पटांगण बघत हर्षचा वेळ तर मस्त मजेत चालला होता.
इकडे घरात आर्याचा जीव काही समोर पसरलेल्या खेळण्यांमध्ये लागत नव्हता.
मुकाट उठून ती आपले छोटेसे स्टूल बाल्कनीत घेऊन गेली.
''हर्ष, तुझे पाय दुखू लागले तर तू ह्या स्टूलवर बस हांऽ!'' हर्षने मान डोलवली. तो बाल्कनीच्या कठड्यावर सरपटणार्‍या अळीकडे बघण्यात गुंगला होता.
जरा वेळ झाल्यावर आर्याने घड्याळाकडे बघितले. अजून मोठा काटा सहावर आला नव्हता.
''आजी, हर्षला बाल्कनीत तहान लागेल नं?" आजीच्या उत्तराची वाट न बघता आर्याने पाण्याने भरलेले फुलपात्र थोडे हिंदकळत बाल्कनीत नेऊन ठेवले.
''हर्ष, तहान लागली तर हे पाणी ठेवलंय हं तुझ्यासाठी!''
हर्षचा फक्त मान डोलवून होकार.
थोड्या वेळाने आर्याने पुन्हा घड्याळ पाहिले.
''आजी, मोठा काटा सहावर यायला किती वेळ आहे गं?''
आर्याला आता हर्षशिवाय करमत नव्हते. आजीने ''वीस मिनिटे'' असे उत्तर दिल्यावर ती उठून किचनमध्ये गेली. प्लॅस्टिकच्या एका छोट्या बरणीत बिस्किटे ठेवली होती, ती बरणी उचलून हर्षला बाल्कनीत ''भूक लागली तर खा हं!'' म्हणून देऊन आली.
आर्याची ती निरागस घालमेल पाहून आजीला आता तर फारच हसू येत होते. तरीही ती काही न बोलता हळूच नातवंडांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती.
अशीच काही मिनिटे गेली. आर्याने गुपचूप बेडरूमच्या कोपर्‍यात गुंडाळलेली चटई आणि आवडती पिसांची उशी उचलली व ते सारे फरपटत बाल्कनीत घेऊन गेली. ''हर्ष, तुला झोप आली तर मी इथं चटई पसरून ठेवतेय हं!'' असे म्हणत तिने बाल्कनीत चटई अंथरली व त्यावर आपली उशी ठेवून दिली. हर्ष तोंडातून ट्रकचे ''ड्रर्रर्र डुर्रर्र'' आवाज काढत बाल्कनीच्या कठड्याला लोंबकळत होता.
आर्याचा पाय खरे तर बाल्कनीतून निघत नव्हता. पण घड्याळाकडे तिच्याखेरीज कोण लक्ष देणार?!!
घरात येऊन तिने मग घड्याळासमोरच मुक्काम ठोकला. बार्बीचे केस विंचरून झाले, खेळण्यातील पोनीच्या झुबकेदार शेपटीची वेणी घालून झाली, पसरलेली कलर बुक्स नीट ठेवून झाली....
''आज्जीऽऽ...'' आर्याचा कंटाळलेला स्वर.
''झाली बरं का वेळ आर्या... घड्याळाचा काटा आलाय सहावर आता!''
आर्याला कोण तो आनंद झाला! तिने हर्षला दिलेली 'पनिशमेन्ट' पूर्ण झाली होती. उड्या मारत मारतच ती बाल्कनीत पोचली. हर्ष तिच्या स्टूलवर आरामात बसला होता. आर्याने त्याला थोडेसे ढकलून स्वतःला बसायला स्टूलवर जागा करून घेतली. मग हर्षच्या गळ्यात हात टाकून उद्गारली, ''पनिशमेन्ट संपलीऽऽऽ!!! चल ना हर्ष, आता काय खेळायचं?''
-- अरुंधती

Friday, May 06, 2011

आजोबांची काठी


मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे.

खरे तर ती काठी आजोबांची गरज होती. तरुण वयात घरच्या बेताच्या परिस्थितीपोटी शिक्षणाचा खर्च निघण्यासाठी त्यांना संस्थानाच्या महाराजांच्या घरी खांद्यावरून रोज अनेक कळश्या पाणी भरायला लागे. त्याची निशाणी म्हणजे प्रौढत्वातच त्यांच्या पाठीला आलेला बाक! म्हातारपणात शरीर वाकल्यावर त्यांना त्या काठीच्या आधारानेच चालता येत असे. पण त्यांची गरज असलेली ती काठी आम्हा पोरांना खेळायचीच वस्तू न वाटल्यास नवल! त्यांची नजर चुकवून ती काठी लंपास करण्यात आम्हाला कोण तो आनंद मिळत असे. एकदा काठी हाती आली की तिचा घोडा घोडा कर, तिला गळ्यात अडकवून जल्लोषात मिरवणूक काढ, तिला आडवे करून तिचे वल्हे कर अशा अनंत प्रकारांनी आम्ही तिच्याशी खेळत असू. मग आजोबांची करड्या आवाजातील हाक आली की काठी तिथेच टाकून धूम ठोकत असू.



घरात आजोबा आहेत की नाही हे आम्हा मुलांना त्यांच्या काठीवरून लगेच कळत असे. दारातून आत शिरले की एक खुंटी होती. आजोबांची काठी आणि टोपी त्या खुंटीवर शानदारपणे विराजमान झालेली असायची. ते कधी गावाला गेले की ती खुंटी आम्हाला ओकीबोकी वाटायची. दारातून आत शिरताना त्यांच्या काठीला पाहिले की आम्ही शहाण्या मुलांसारखे शिस्तीत आत यायचो, हात-पाय धुवून शाळेच्या अभ्यासाच्या पुस्तकांत डोके खुपसून बसायचो. पण, तेच, जर आजोबांची काठी जागेवर नसली तर त्याचा अर्थ आजोबा बाहेर गेले आहेत हे ताडून घरात शिरल्या शिरल्या आमचा दंगा सुरू होत असे.

एकदा आजोबा आमच्या घराशेजारी असलेल्या खोपट्यात राहत असलेल्या आजारी दगडूची चौकशी करायला गेले होते. अर्थातच आम्हा पोरांना ह्याचा थांगपत्ताच नव्हता. आम्हाला वाटले, आजोबा नेहमीसारखे बाहेर फिरायला किंवा कामाला गेलेत. घरी आल्यावर आम्ही त्यांची काठी जागेवर नसल्याचे पाहून घर दंगा करून अक्षरशः डोक्यावर घेतले. थोड्याच वेळात आजोबा घरी परतले. पण आम्हाला आमच्या आरड्याओरड्यात ते समजलेच नाही. मग त्यांच्या त्याच काठीचा अल्प अल्प प्रसाद सर्वांनाच मिळाला.

आजोबा त्या काठीला हर तऱ्हेने वापरत असत. रस्ता ओलांडताना वाहनांना इशारा करायला, पायात लुडबुड करत असलेल्या कुत्र्याला हाकलायला, बसमध्ये गर्दीत त्यांची सीट अडवून ठेवायला, जादाच्या ओझ्याच्या पिशव्या लटकवून ठेवायला.... अनेक प्रकारांनी ते त्यांच्या काठीवर विसंबून होते. कधी असेच आरामखुर्चीत बसले की हळूच तिच्यावरून मायेचा हात फिरवत असत. त्यांना काठीला असे आंजारताना गोंजारताना पाहिले की आम्ही मुले तोंड दाबून हसत असू आणि घरातल्या बायका खुसुखुसू हसत पदरात आपले तोंड लपवत असत. पण आजोबा जणू दुसऱ्याच दुनियेत हरवलेले असत. त्यांना असे हरवलेले पाहायला सुद्धा आम्हाला आवडत नसे. मग कसले तरी आवाज काढून आम्ही त्यांची तंद्री भंग करत असू.

आजोबांची काठी तशी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. तिची वैशिष्ट्यपूर्ण मूठ आणि आजोबांचे तिच्यावर असलेले विलक्षण प्रेम ही आजूबाजूच्या दुकानदारांत, रहिवाशांत कायमच कौतुकाची व कुतूहलाची बाब होती. ते घराखेरीज इतर कोठेही त्यांची काठी ठेवायला तयार नसत. त्यांनी जर आपल्या काठीला कोणाला तात्पुरते सांभाळायला दिले तर त्याचा अर्थ त्यांचा त्या व्यक्तीवर खूप विश्वास आहे असेच अनुमान लोक काढत असत.

आजोबा आजारी पडले आणि त्यांच्या काठीला घराच्या एका कोपऱ्यात चुपचाप बसून राहायचे दिवस आले. अशक्तपणामुळे त्यांचे हिंडणे-फिरणे कमी झाले. काठीचा दिमाख उगाचच कमी झाल्याचे आम्हाला भासू लागले. पण त्या दिवसांत देखील आजोबा काठीला विसरले नाहीत. घरातल्या घरात काठी घेऊन त्यांना हिंडताना पाहिल्याचे मला चांगलेच स्मरते आहे.

शेवटच्या काही दिवसांत ते घरातील कोणाला तरी बरोबर घेऊन मोठ्या कष्टाने काठी टेकवत टेकवत बाजारात त्यांच्या लाडक्या दुकानदारांचा, परिचित-स्नेहीजनांचा निरोप घेण्यास जात असत. त्यांचे इहलोकातून जाणे सर्वांना अपेक्षितच होते. परंतु तरीही त्याने दु:ख का कमी होते? ते गेले आणि घरावरील त्यांची आश्वासक सावली हरपली. आम्हा मुलांना त्यांचा पलंग, आवडती आरामखुर्ची पाहिली की तिथे त्यांचाच भास होत असे. कधीही त्यांची करड्या आवाजातील हाक ऐकू येईल आणि सारे घर दणाणून सोडेल असेच वाटत असे. पण तसे घडले नाही. घराचे कोपरे त्यांच्या आवाजाशिवाय सुने सुनेच राहिले.

आजोबांचे दिवस-वार पार पडले. आता ते परत येणार नाहीत ह्याची आमच्या बालमनांना खात्री पटली होती. घरातील मोठी मंडळीही गप्प गप्पच होती. अकस्मात एके सकाळी आमच्या दारात एक मळक्या कपड्यातील, दाढीचे खुंट वाढलेला फाटका माणूस आला. आजोबा गेल्याचे कळताच दारातच बसकण ठोकून ओक्साबोक्शी रडू लागला. त्याला घरच्यांनी पाणी देऊन कसेबसे शांत केले. पण त्याचे अश्रू थांबत नव्हते. अचानक त्याची नजर आजोबांच्या काठीवर पडली. आणि झाले! तो थेट 'ती काठी मला त्यांची आठवण म्हणून द्या' म्हणून गयावयाच करायला लागला. वडीलधारी मंडळी ऐकेनात तशी तो त्यांच्या पायाच पडू लागला. शेवटी घरातल्यांचाही नाईलाज झाला. त्या माणसाकडून तो आजोबांच्या काठीची नीट काळजी घेईल अशी हजार आश्वासने घेऊन घरच्यांनी ती काठी त्याच्या सुपूर्द केली. एवढा वेळ रडत असलेला तो इसम मोठ्या आनंदाने काठी उराशी धरून निघून गेला.

तो माणूस निघून गेला तरी घरच्यांचा अस्वस्थपणा तर काही जात नव्हता. तो कोण कुठला हे धड कोणालाच माहीत नव्हते. त्याला आजोबांची इतकी प्रिय गोष्ट देऊन आपण चूक तर केली नाही ना, असा विचार मनाला शिवून जात होता. पण एकदा दिलेली वस्तू परत तरी कशी मागणार? सगळेच गप्प बसले.

काही महिन्यांनी आमच्या नात्यातील एकांकडे त्यांच्या माहितीतील एक गृहस्थ आले. त्यांच्या हातात माझ्या आजोबांची काठी होती. आमच्या नातेवाईकांनी काठी लगेच ओळखली, पण चेहऱ्यावर तसे भासू न देता त्यांनी सहजच काठीची चौकशी केली. त्या गृहस्थांनी ती काठी जुन्या बाजारातून खरेदी केली होती!!!

आम्हाला जेव्हा हे कळले तेव्हा त्या योगायोगावर आश्चर्य करण्याखेरीज व हळहळण्यापलीकडे आमच्या हातांत काहीच उरले नव्हते. पण नंतर कळले की आमच्या आजोबांसारखीच ती काठी त्या गृहस्थांचीपण विलक्षण लाडकी होती. जिथे जिथे ते जात तिथे तिथे ती काठी त्यांची सोबत करत असे. हे ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली. कदाचित आजोबांचीच इच्छा असावी की त्यांच्या काठीला त्यांच्याइतकाच तिच्यावर प्रेम करणारा नवा मालक मिळावा. त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली. आजोबांची काठी तिच्या नव्या घरी, नव्या मालकाला आपला प्रेमाचा, विश्वासाचा आधार देत राहिली.

-- अरुंधती

(काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)