Friday, October 25, 2013

ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता

''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''

''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''

अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्‍या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.

सध्याचा जमाना प्रसारमाध्यमांचा व सोशल मीडियाचा आहे. टीव्ही, आंतरजाल, वृत्तपत्रे इत्यादींच्या माध्यमातून आपण वर्षाकाठी हजारो जाहिरातींच्या संपर्कात येत असतो. या जाहिराती आपल्यावर अगदी बेगुमान आदळत असतात. त्यांचा अभ्यास करू जाता, गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातदार आपली उत्पादने किंवा सुविधा कशा प्रकारे पर्यावरणपूरक आहेत, पर्यावरणाला पोषक आहेत अथवा ''ग्रीन'' आहेत हे अहमहमिकेने सांगताना, मांडताना दिसतात. त्या प्रकारच्या लेबल्सने त्यांचे उत्पादन नटलेले असते. 'इको-फ्रेंडली', 'बायो-डीग्रेडेबल', 'ग्रीन', 'री-सायकल्ड', 'डॉल्फिन-फ्रेंडली', 'पर्जन्यवनांना धोका न पोचविणारे', 'नैसर्गिक', 'एनर्जी-एफिशियंट', 'फॉस्फेट-फ्री', 'अ‍ॅनिमल-फ्रेंडली', पर्यावरणपूरक उत्पादन अशी अनेक प्रकारची, तर्‍हेची लेबल्स - त्यांवरील लोगो - त्यांमागील संदेश - हे खरोखर तुम्हा-आम्हाला ती जाहिरात बघताना किंवा खरेदी करताना कळते का हो? जाहिरातीनुसार खरोखर ते उत्पादन तसे आहे की जाहिरातदार आपली दिशाभूल करत आहे हे त्यावरून कळते का?

'ग्रीनवॉशिंग' म्हणजे ढोबळपणे आपले उत्पादन प्रत्यक्षात जेवढे व जितके पर्यावरणपूरक आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त असल्याचे भासविणे असे म्हणता येईल. प्रत्यक्ष उत्पादनावर, कंपनीच्या संकेतस्थळ / माहितीपुस्तिकेत किंवा जाहिरातींमध्ये असे प्रतिपादन केलेले असते. 'ग्रीनवॉशिंग'ची ही संज्ञा व अशा प्रकारे दिशाभूल करणे हे काही नवीन नाही. ही दिशाभूल मुख्यतः जाहिराती व लेबल्सद्वारे केली जाते. जोवर ही दिशाभूल फक्त मार्केटिंग तंत्राचा एक भाग एवढ्यापुरतीच मर्यादित होती तोपर्यंत त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष केले गेले. परंतु ही दिशाभूल ग्राहकांच्या आरोग्यास व पर्यायाने सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरू शकते हे लक्षात आल्यावर ग्राहक संघटना, वेगवेगळ्या एन.जी.ओ. व स्थानिक प्रशासकीय व्यवस्था त्यांबद्दल जागरूक होऊ लागल्या. इ.स. २००९ च्या टेराचॉईस एनव्हायर्नमेन्टल मार्केटिंग कंपनीच्या अहवालानुसार अमेरिकेत २२१९ उत्पादनांनी 'ग्रीन' असल्याचा दावा केला. त्यातील ९८% उत्पादने 'ग्रीनवॉशिंग' केलेली होती!!

एअरबस ए ३८० - अ बेटर एन्व्हायर्नमेन्ट इनसाईड अ‍ॅन्ड आऊट अशी जाहिरात


तुम्ही जेव्हा एखादे उत्पादन खरेदी करता तेव्हा त्यावर असणारी सर्व प्रकारची लेबल्स पाहून - वाचून तुम्ही ते खरेदी करता का? त्या लेबल्सचा अर्थ तुम्हाला माहीत असतो का? वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची लेबल्स जेव्हा आपले उत्पादन हे 'ग्रीन' आहे हे दर्शविण्यासाठी लावतात तेव्हा त्यांच्या विभिन्नतेमुळे तुमचा गोंधळ उडतो का? उदा. एखादे उत्पादन 'ऑर्गॅनिक' (सेंद्रीय) किंवा 'अ‍ॅनिमल फ्रेंडली' आहे हे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या लेबल्सद्वारे दाखवतात. त्यावरील लोगो भिन्न असू शकतात, चित्र भिन्न असू शकते. तसेच त्या लेबलमागे कोणती अधिकृत संस्था आहे का, हेही स्पष्ट नसते. ग्राहकांचा गोंधळ हा कित्येकदा ह्यामुळे होतो. जरा विचार करा, त्या उत्पादनावर जर अशा तर्‍हेचे लेबल असेल किंवा 'आमचे उत्पादन हे पर्यावरणपूरक आहे' असे निराळे व ठळक छपाईत लिहिलेले असेल तर त्यामुळे ते उत्पादन विकत घेणे किंवा न घेणे ह्याबद्दल तुमच्या निर्णयावर काही प्रभाव, फरक पडतो का?



अनेक कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्यांची उत्पादने 'इको-फ्रेंडली' असल्याचे दावे केलेले आढळतात. परंतु नक्की कोणत्या प्रकारे ते उत्पादन इको-फ्रेंडली आहे, त्याचा पुरावा किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती यांबद्दल तिथे जास्त काही लिहिलेले नसते. काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे किंवा आपली कंपनी करत असलेल्या कामासंबंधीचे पर्यावरण अहवाल दिलेले असतात. रकानेच्या रकाने भरून माहिती असते. परंतु नक्की कोणत्या ठिकाणाची माहिती आहे, किती क्षेत्रफळातील जमीन/स्रोत/उद्योगाची माहिती आहे, इतर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, किती प्रमाणात त्या राबविल्या आहेत, कधीपासून व कशा प्रकारे राबविल्या आहेत - या सर्व तपशिलांची बर्‍याचवेळा वानवा असते. कंपनीचे कारखाने अनेक ठिकाणी असतील आणि त्यातील एखाद्या ठिकाणचा अहवालच जर सादर केला असेल तर मग त्या अहवालानुसार कंपनीच्या प्रॅक्टिसेस पर्यावरणपूरक म्हणता येतात का? हे अहवाल कित्येकदा कंपनीनेच प्रायोजित केलेले असतात. म्हणजे कोणा तटस्थ किंवा त्रयस्थ, मान्यताप्राप्त, अधिकृत संस्थेद्वारा ही तपासणी झालेलीच नसते. कंपनीने नेमलेल्या एखाद्या सल्लागार संस्थेने दिलेला अहवाल असतो तो! मग असा अहवाल कितपत ग्राह्य धरायचा?

भारतासकट बर्‍याच देशांमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंवा सुविधेच्या पर्यावरणावर होणार्‍या परिणामांसंबंधी दिशाभूल करणार्‍या जाहिरातींची रेलचेल दिसून येते. भारतातले एक उदाहरण म्हणजे व्हर्लपूल क्विक चिल रेफ्रिजरेटरची जुनी जाहिरात! ह्या जाहिरातीत कंपनीने म्हटले होते की अन्य कंपन्यांच्या सर्वसामान्य रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जाणारा पर्यावरणास धोकादायक गॅस न वापरता या उत्पादनात पर्यावरणपूरक गॅस वापरला गेला आहे. ही जाहिरात ठिकठिकाणी झळकली. प्रत्यक्षात तो गॅस पर्यावरणास पूरक नसून हानी पोहोचविणाराच होता. परंतु कंपनीने बिनबोभाटपणे अशी जाहिरात करून ग्राहकांची दिशाभूल केली. नंतर त्यांना ती जाहिरात योग्य कारवाईमुळे मागे घ्यावी लागली. हे एक उदाहरण... पण अशी कैक उदाहरणे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक देतात. या उदाहरणांमध्ये फक्त खासगी संस्थाच नव्हे तर कित्येकदा सरकारी किंवा निम्न सरकारी कंपन्याही दिशाभूल करणार्‍या जाहिराती, लेबल्सद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्यास हातभार लावत असतात.

ग्रीनवॉशिंगची ७ पातके!

[द सेव्हन सिन्स ऑफ ग्रीनवॉशिंग]

१. उत्पादनामुळे होणारी हानी लपविण्याचे पातक

एखादे उत्पादन 'ग्रीन' आहे हे महत्त्वाच्या पर्यावरणासंबंधी निकषांकडे दुर्लक्ष करून अतिशय त्रोटक किंवा मर्यादित बाबींवरून ठरविणे. (उदा. पर्यावरणपूरक अशा (शाश्वत / सस्टेनेबल) जंगलातील वृक्षांपासून बनविलेला कागद : हा कागद बनविताना निर्माण झालेले प्रदूषण किंवा खर्च झालेली अतिरिक्त ऊर्जा यांबद्दल सांगण्याची टाळाटाळ व ते उत्पादन 'ग्रीन' आहे अशी जाहिरात.)

२. पुरावा नसण्याचे पातक

आपले उत्पादन 'ग्रीन' असण्याचा दावा त्यासंबंधी कोणताही पुरावा न देता करणे. तशी माहिती किंवा त्रयस्थ, तटस्थ संस्थेचे तसे प्रशस्तिपत्रक सादर न करणे.

३. मोघमपणाचे पातक

उत्पादनाची जाहिरात करताना मोघम शब्द वापरणे. त्या संज्ञेचा अभिप्रेत अर्थ विशद न करणे. जसे, 'ऑल नॅचरल'. आता ऑल नॅचरल या संज्ञेचा कंपनीला अभिप्रेत असणारा अर्थ व ग्राहकाला अभिप्रेत असणारा अर्थ यांच्यात तफावत असते व असू शकते. त्या तफावतीचा गैरफायदा घेऊन आपल्या उत्पादनाबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणे.

४. अप्रासंगिक किंवा संबंध नसलेली जाहिरात करण्याचे पातक

येथे कंपनीने उत्पादनावर किंवा जाहिरातीत केलेला दावा जरी बरोबर असला तरी त्याचा पर्यावरणाविषयी जागरूक ग्राहकांना काही उपयोग नसतो. [उदा. एखादे उत्पादन विकत घेऊन तुम्ही डॉल्फिन्सचे संरक्षण / जतन करण्यास हातभार लावत आहात असा दावा करणे. त्या निकषावर ते उत्पादन पर्यावरणपूरक आहे असे भासविणे.]

५. धोकादायक बाबींपेक्षा कमी धोका असणार्‍या बाबींची जाहिरात करण्याचे पातक

'लेसर ऑफ द टू एव्हिल्स' असे ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारे एखाद्या उत्पादनापासून जर पर्यावरण किंवा आरोग्याला जो धोका सर्वात मोठ्या प्रमाणात असेल त्याबद्दल न बोलता त्या उत्पादनामुळे आरोग्याला / पर्यावरणाला कमी धोका असणार्‍या बाबीसंबंधी बोलणे व ग्राहकाची दिशाभूल करणे. [उदा. ऑर्गॅनिक सिगारेट्स, किंवा पॅकबंद पाण्याची 'नैसर्गिक स्रोतांतून / हिमनगातून आलेले शुद्ध पाणी' अशी जाहिरात.]

६. खोटे दावे करण्याचे पातक

आपल्या उत्पादनाबद्दल पर्यावरणासंबंधी खोटे दावे करणे. [उदा. प्रत्यक्षात आपले उत्पादन 'एनर्जी एफिशियन्ट' इ. नसताना जाहिरातीत किंवा उत्पादनावर तसे, तत्सम शब्द वापरणे.]

७. खोट्या शिक्क्यांचे पातक

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनावर ते उत्पादन 'ग्रीन' असण्याचे खोटे शिक्के / लेबल्स लावणे. [उदा. 'इको-प्रेफर्ड' उत्पादनाचा दावा करून खोटे शिक्के/लेबल्स लावून ते उत्पादन पर्यावरणपूरक असल्याचे भासविणे.]

उत्पादनांवर छापले जाणारे शिक्के किंवा लेबल्स नक्की काय सांगतात, काय दर्शवितात, त्यांच्या मागे कोणती / कोणत्या अधिकृत संस्था आहेत, त्या संस्था मान्यताप्राप्त व तटस्थ - खात्रीलायक आहेत का, हे सर्व ग्राहकांना समजणे व त्यांनी त्याबद्दल जागरूक राहणे हे आवश्यक आहे. अन्यथा अशी लेबल्स ग्राहकांची दिशाभूल करतात किंवा त्यांना गोंधळात टाकतात.

त्यासाठी कोणत्याही उत्पादनावरील 'इको-लेबल्स' असतात त्यांची खात्री करून घेणे हे ग्राहकास शक्य असणे जरुरीचे आहे. त्यासाठी आवश्यक माहिती, चित्रे इत्यादी हे पर्यावरणपूरक उत्पादनासंबंधी संकेतस्थळांवर, पुस्तिकांद्वारा प्रकाशित होणे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच ज्या संस्थांद्वारे अशी लेबल्स मान्य केली जातात त्या संस्थांची व त्यांच्या कार्याची पारदर्शकता ग्राहकांपुढे येणे आवश्यक आहे. त्या संस्थांना किंवा संस्थाचालकांना कोणत्याही उत्पादनाच्या विक्रीतून निधी मिळतो, किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा फायदा होतो, असे असता कामा नये. तसेच ग्राहकांना, पर्यावरण-संरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना, उद्योगांना व समाजधुरीणांना विचारून, त्यांची मते व प्रतिसाद विचारात घेऊन पर्यावरणासंबंधी प्रशस्तिपत्रके बनविली जाणे आवश्यक आहे.
सर्व ग्रीन लेबल्स चे प्रमाणीकरण होणे, त्यांच्यात एकवाक्यता येणे, त्यांबद्दल सार्वत्रिक जागरूकता वाढणे हेही महत्त्वाचे आहे.

भारतात अ‍ॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया सारख्या संस्था कार्यरत आहेत व त्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर नजर ठेवून असतात, तसेच चुकीच्या जाहिरातींवर यथायोग्य कारवाई होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु कित्येकदा संपूर्ण कारवाई पार पडेस्तोवर हजारो, लाखो ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. तसेच संबंधित कंपन्या आपली दिशाभूल करणारी जाहिरात फक्त मागे घेतात व त्या ऐवजी दुसरी जाहिरात दाखवितात. परंतु आपण अगोदर दिशाभूल करणारी जाहिरात केली हे त्या कंपन्या ग्राहकांसमोर मान्य करत नाहीत.

अनेकदा अशा तर्‍हेचे ग्रीनवॉशिंग करणार्‍या कंपन्यांमुळे फक्त ग्राहकांना व पर्यावरणालाच फटका बसत नाही, तर ज्या कंपन्या खरोखरी पर्यावरणपूरक उत्पादने किंवा सुविधा देतात त्यांच्याकडेही संशयाने बघितले जाते. प्रगत देशांमधील ग्राहकांमध्ये 'ग्रीन' उत्पादनांबद्दल वाढता अविश्वास, ज्याला 'ग्रीन फटीग(थकवा)' म्हणून संबोधिले जाते, रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन करताना तज्ज्ञांनी काही गोष्टी मांडल्या. त्यात ग्राहक व जाहिरात करणार्‍या एजन्सीज, मार्केटिंग करणार्‍या एजन्सीज यांच्यात पर्यावरणपूरकता म्हणजे नक्की काय याबद्दल साक्षरता / जागरूकता निर्माण करणे हा एक उपाय होता.

पर्यावरणपूरक उत्पादने ही स्थलकालसापेक्ष असतात. उदा. एखाद्या ठिकाणी पाण्याची मुबलकता असेल तर तिथे 'धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे बाळांचे कापडी लंगोट' हे पर्यावरणाला आव्हान देत नाहीत. पण जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल तिथे पाण्याची मागणी वाढविणार्‍या, पाण्याच्या स्रोतांवर ताण आणणार्‍या लंगोटांची जाहिरात करणे हे पर्यावरणदृष्ट्या जबाबदारीचे ठरणार नाही.

एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे किंवा नाही हे ठरविणे जसे मान्यताप्राप्त अधिकृत संस्थांचे काम आहे तसेच आपल्या उत्पादनाबद्दल खरी व तपशीलवार माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे त्या उत्पादन करणाऱ्या कंपनीचे काम आहे. त्यात ते उत्पादन/ वस्तू बनविताना खर्च होणारे नैसर्गिक स्रोत, ऊर्जा, त्या उत्पादनाची प्रक्रिया, वापरले जाणारे घटक, कचर्‍याची विल्हेवाट, औद्योगिक कचर्‍याचे निर्मूलन, त्या उत्पादनाची चाचणी घेताना ती कशी घेतली गेली, उत्पादनाची वाहतूक, आवरण, ज्या ठिकाणी उत्पादन बनविले जाते त्या ठिकाणच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या जतनाची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व माहिती ग्राहकांची दिशाभूल करणारी नसावी, खरीखुरी असावी. तसेच मान्यताप्राप्त त्रयस्थ, अधिकृत संस्थेने नियमाने तपासणी करून ही माहिती खरी असल्याचे मान्य केलेले असावे. तसेच ठराविक काळाने उत्पादनांची व अन्य बाबींची पर्यावरणपूरकतेच्या बदलत्या निकषांनुसार पुनर्तपासणी होणेही आवश्यक आहे.

आपण कोणतेही उत्पादन 'ग्रीन' असल्याच्या निकषावर जेव्हा खरेदी करतो तेव्हा एक ग्राहक म्हणून त्या उत्पादनाच्या पर्यावरणपूरकतेची खात्री करून घेणे ही आपलीही एक महत्त्वाची जबाबदारी ठरते.

* वरील लेख हा फक्त माहिती मिळावी व जागरूकता निर्माण व्हावी - वाढावी ह्या उद्देशातून लिहिलेला आहे.

संदर्भ :

१] सेंटर फॉर सस्टेनेबल प्रॉडक्शन अ‍ॅन्ड कन्झम्प्शन चे संकेतस्थळ : http://www.cuts-international.org/

२] इको-लेबल्स

३] रिचर्ड दाल यांचा 'एनव्हायर्नमेन्टल हेल्थ पर्स्पेक्टीव्ह' अंकातील ग्रीनवॉशिंग संदर्भातील जून २०१० मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. http://ehp.niehs.nih.gov/118-a246/

* छायाचित्र विकीपीडियावरून साभार

Sunday, October 20, 2013

संहिता - मनात दडलेली!

प्रत्येकाच्या मनात एक संहिता दडलेली असते. आपल्या आयुष्याची संहिता, आपले विचार, अनुभव आणि आपल्या दृष्टिकोनांची संहिता. खरं तर एकच काय ते आयुष्य! पण वेगवेगळ्या चष्म्यांमधून पाहिले तर त्याचे विविध कंगोरे, चढ-उतार, मर्यादा आणि परिसीमा नव्याने जाणवतात, दिसतात, दिसू शकतात. ही जाणीवच मुळात साक्षात्कारी आहे. आणि अशा जाणिवांची लड उलगडताना दरवेळी त्याच त्या परिघांमध्ये फिरणारे कथानक आपल्या सीमा ओलांडून त्यात वेगवेगळ्या वर्तुळांना जसजसे समाविष्ट करत जाते तसतशी त्यातून येणारी अनुभूतीही बदलत जाते. ही अनुभूती म्हणजे संहिता. 



मायबोली.कॉमच्या माध्यमातून संहिता चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहता येणे हा माझ्यासाठी खरोखरी एक सुखद व अविस्मरणीय अनुभव होता. संहिता चित्रपटाची पोस्टर्स पाहिल्यापासून ह्या चित्रपटाबद्दल मनात अतीव उत्सुकता तर होतीच, शिवाय सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांची जोडी असल्यामुळे उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन, नेत्रसुखद चित्रांकन आणि दर्जेदार अभिनय पुन्हा एकदा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार याचीही खात्री होती. इतक्या सुंदर अनुभवाची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मायबोली व माध्यम प्रायोजकांचे खास खास आभार! :)

पुण्यात प्रीमियरच्या ठिकाणी सिटीप्राईड कोथरूड येथे गुरुवारी सायंकाळी मी पोचले तेव्हा मिलिंद सोमण, देविका दप्तरदार, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर तिथे अगोदरच आलेले दिसले. नंतर मोहन आगाशे, दीपा श्रीराम, अमोल पालेकर, चंद्रकांत काळे, शेखर कुलकर्णी हेही दिसले. मायबोलीचा लोगो असलेले मोठे बॅनर प्रवेशाच्या जवळच पाहायला मिळाल्यावर छान वाटले. मायबोलीचा लोगो चांगला ठसठशीत उठून दिसत होता. (नंतर स्क्रीनवरही माबोचा लोगो जेव्हा झळकला तेव्हा असाच आनंद झाला!) आपल्या मायबोलीकरांचीही ह्या खेळाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. :)

सर्वात अगोदर झाले ते मायबोलीकरांचे कलावंतांबरोबरचे फोटोसेशन! हर्पेनच्या कॅमेर्‍याचा चांगलाच क्लिकक्लिकाट झाला! :) चित्रपटाच्या टीमबरोबर वेगवेगळे व ग्रुप फोटोज काढण्यात आले. देविका व मिलिंद सोमण यांच्याबरोबरही मायबोलीकरांनी भरपूर फोटो काढले. दोघेही अगदी सहजपणे फोटोंसाठी पोझ देत होते. मजा आली. 'से चीज' म्हणत हसताना गाल दुखले! 

आरती ताई अंकलीकरांनी या चित्रपटात आपल्या आर्त, मधुर गाण्याने जान ओतली आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांनी गायलेल्या सुरांनी जे उत्कट भावविश्व उभे केले आहे त्याला तोड नाही! प्रीमियरच्या निमित्ताने आरतीताईंशीही छान भेट झाली.

सुरुवातीस सुनील सुकथनकर यांच्यासोबत निर्मात्या टीमने सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, संपूर्ण टीम व चित्रपटास हातभार लावणार्‍या अनेक हितचिंतकांचे आभार मानले आणि 'संहिते' च्या खेळाचा प्रारंभ झाला. मुंबईच्या आलिशान वातावरणातील एका रंगात आलेल्या पार्टीच्या पहिल्याच सीनपासून संहितेने जे मन काबीज केले ते चित्रपट संपला तरी त्यातली प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम मनात तरळत राहिली. आधुनिक मुंबईच्या वातावरणातून आणि अगदी आताच्या जमान्यातल्या रेवती-रणवीर-शिरीन-तारा-हेमांगिनी-दर्शन यांच्या ओझरत्या, वास्तवदर्शी कथेपासून ही कहाणी कधी संस्थानिकांच्या काळात पोचते, त्या कहाणीतली पात्रे कशी जिवंत होत जातात, त्यांचे कथानक कसे उलगडत जाते -- हा सारा प्रवास अतिशय लक्षवेधी आणि समरसून टाकणारा आहे. प्रेक्षक त्या कहाणीत कसा आणि कधी गुंतत जातो हे त्याचे त्यालाच कळत नाही! कथेतले प्रत्येक पात्र सुरेख उमटले आहे. कलावंतांच्या सौष्ठवपूर्ण अभिनयाची जोड आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची समर्थ हाताळणी, त्यातले बारकावे ह्या चित्रपटाला सर्वसाधारण प्रेमकथांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. संस्थानिकांच्या काळातील, त्यांच्या महालांमधील राजेशाही, खानदानी व कधी विलासी वातावरण, त्यांचा विहार, मानसिकता, स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यांत घडून (किंवा न घडून) येणारे बदल हे कथेच्या ओघात खूप सुरेख पद्धतीने व्यक्त होत जातात. कथेतील आधुनिक दांपत्याचा आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करतानाचा जो संघर्ष दाखवलाय तो अगदी सहज पटणारा आहे. आणि त्याच जोडीला संस्थानिक राजा, त्याची राणी आणि त्याची प्रेमिका यांच्यातील परस्पर-नाते कोठेही ओढून ताणून वाटत नाही, ना त्यांचे संघर्ष! त्यांचे विश्व जसजसे उलगडत जाते तसतसे हे संघर्ष व बंध अधिक गहिरे होत जातात. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. आणि त्यांचे हे प्रामाणिकपण सर्वाधिक भावते. त्यात कोण बरोबर, कोण चूक, कोण उचित असे प्रश्नच येत नाहीत. आणि माझ्या मते कोणताही ग्रह न ठेवता, नॉन-जजमेंटल पद्धतीने ह्या सर्व माणसांची, त्यांच्या नात्याची आणि त्या नात्यातून विकसित झालेल्या प्रगल्भ अनुभवांची कथा सांगण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. 

राजेश्वरी सचदेव हेमांगिनी व भैरवीच्या भूमिकेत नजाकत आणते. एक यशस्वी अभिनेत्री, एक उदयोन्मुख - कसदार गायिका आणि समर्पित प्रेमिका या तिन्ही भूमिका ती सार्थपणे तोलते. मिलिंद सोमणने साकारलेला रांगडा रणवीर हा त्याने साकारलेल्या सत्यशील राजापेक्षा जास्त भावतो. राजा प्रेमात विकल आहे. आपल्या वर्तनाने इतर आयुष्यांमध्ये झालेल्या उलथापालथीची त्याला जाणीव आहे, पुरुषी अहंकार तर ठासून भरलेला आहे, पण त्याचबरोबर तो आपल्या भावना व कर्तव्य यांसमोर हतबलही आहे. तर रणवीरचे पात्र हे स्वतःच्या मर्यादांची जाणीव असून त्यापुढे जायचा प्रयत्न करणारे, मार्ग शोधणारे आहे. देविकाचा रेवतीच्या भूमिकेतील अभिनय अतिशय सहजपणे उतरला आहे. अगदी गर्ल नेक्स्ट डोअर वाटावे असे हे पात्र. आणि संस्थानिकांच्या पारंपरिक घरात स्वतंत्र विचारांचे पंख लावून कल्पनेच्या विश्वात विहरणारी, अपेक्षित असणार्‍या भूमिकेपेक्षा वेगळ्या तर्‍हेने आयुष्य जगू इच्छिणारी, राज्ञीपदाचा, बुद्धिमत्तेचा व स्वतःच्या आधुनिकतेचा तोरा बाळगणारी राणीही तिने प्रगल्भपणे साकारली आहे. उत्तरा बावकर, ज्योती सुभाष यांच्या अभिनयाबद्दल काय लिहिणार!! दुधात जशी साखर मिसळावी तितक्या सहजतेने सर्व चित्रपटभर त्यांचा वावर आहे! दोघी इतक्या सहज भावातून व परिपक्वतेने आपली पात्रे साकारतात... त्या अभिनय करत आहेत असे कोणत्याच अँगलमधून वाटत नाही! चित्रपटात सर्वच स्त्री पात्रांच्या भूमिका ह्या स्ट्राँग - सशक्त स्त्रियांच्या आहेत. आयुष्यात जाणीवपूर्वक केलेल्या तडजोडींची किंमत त्यांनी मोजली आहे. त्यांची बलस्थाने, आयुष्यातील शोध विभिन्न आहेत. आणि तरीही त्या एका अदृश्य धाग्याने बांधल्या गेल्या आहेत. कोणता धागा असेल हा?

संहिता चित्रपट हा दर्जेदार, कलापूर्ण मराठी चित्रपटांच्या यादीतील एक अग्रगण्य चित्रपट ठरेल ह्यात शंका नाही. राजा-राणी- दरबारी गायिका असणार्‍या प्रेमिकेच्या सर्वसाधारण प्रेमत्रिकोणात्मक कहाणीला कथेतील पात्रांच्या त्या कथेकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि त्या कथेची आजच्या काळाशी वैचारिक व अनुभवात्मक पातळीवर सांगड घालायचे कौशल्य ह्या चित्रपटाने साधले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक समृद्ध, सकस विचार मिळतो. तो विचार आपल्याला स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहायलाही प्रवृत्त करतो. आपल्या आयुष्याकडे नेहमीच्या साच्याबाहेर जाऊन बघताना जे काही मिळते तिथेच आपलीही एक संहिता आकाराला येत असते.  

महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात मांडलेल्या कथानकाशी प्रेक्षक रिलेट करू शकतो. त्यातली आधुनिक काळातली पात्रे तर आपल्या आजूबाजूला वावरणारी वाटतात. त्यांच्या कथा त्यामुळे तितक्याच जिव्हाळ्याच्या वाटतात. सुनील सुकथनकरांनी रचलेली गीते, शैलेन्द्र बर्वेंची संगीतयोजना आणि आरतीताईंच्या गळ्यातून थेट मनात खोल आतवर कोठेतरी भिडणारे सूर... क्या कहना!

सर्वांनी आवर्जून हा चित्रपट स्वतः तर पाहावाच आणि आपल्यासोबत इतरांनाही इतका सुंदर अनुभव मोठ्या पडद्यावर पाहण्यास उद्युक्त करावे. चित्रपटातील संवाद व गाण्यांची इंग्रजी सबटायटल्स समर्पक आहेत. मला खास 'वाचत वाचत' हा चित्रपट पुन्हा एकदा बघायचा आहे! :)

Saturday, March 09, 2013

पडद्याआडचे संगीत


कितीतरी वर्षे समाजात संगीत हे फक्त पुरुषांची मक्तेदारी होते. स्त्रियांना घरगुती, कौटुंबिक किंवा विशेष प्रसंगांना गाण्याची परवानगी असे. परंतु सामाजिक पातळीवर गाण्याचा व्यवसाय किंवा गायनाचे कार्यक्रम करताना स्त्रिया क्वचितच दिसत. व्यावसायिक पातळीवर गायन करण्याचे काम असे गणिका व नट्यांचे! सर्वसामान्य घरांमधील स्त्रियांना पोटापाण्यासाठी गायन करण्यास बंदी होती असेच म्हणावे लागेल.

युरोपमध्येही फार काही वेगळे चित्र नव्हते. सोळाव्या व सतराव्या शतकांत येथे ज्या ज्या गायिका होऊन गेल्या त्या गणिका, नट्या, राजदरबारातील कलावंत किंवा नन्स असायच्या. मध्ययुगातील नन्स ह्या चर्चमध्ये लोकांच्या नजरेआड पडद्यामागून आपले गायन सादर करायच्या. या नन्स मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय घरांमधून आलेल्या असत. त्यांना कॉन्व्हेन्ट मध्ये ठेवणे हा त्यांचे लग्न करून देण्यापेक्षा स्वस्त असा पर्याय, म्हणून अनेक कुटुंबे हा पर्याय निवडत असत. या स्त्रियांच्या सांगीतिक प्रवासावर डेबोरा रॉबर्ट आणि लॉरी स्ट्रास या दोघी गेली २० वर्षे संशोधन करत आहेत. त्यांच्या गाण्यातील मतितार्थ, रचनांचा अभ्यास करत आहेत. इ.स. २००२ मध्ये त्यांनी स्त्रियांचा 'सेलेस्टियल सायरेन्स' (Celestial Sirens) नामक समूह-गानवृंद स्थापन केला असून या स्त्रिया मध्ययुगीन आधुनिक स्त्रियांची आठवण म्हणून नन्सचा पोशाख करून आपला कार्यक्रम सादर करतात.

गंमत म्हणजे याच काळात राजदरबारातील स्त्री गायिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत होती. काही वेळा राजे-सरदार या गायिकांचे गाणे फक्त खासगी कार्यक्रमात निवडक श्रोत्यांसाठीच ठेवत असल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. त्याचे कारण आपल्याकडील स्त्री कलावंतांची कीर्ती बाहेर जाऊ नये म्हणून! परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित यश आल्याचेही इतिहास सांगतो व त्याचा परिणाम म्हणून कालांतराने स्त्री गायिकांच्या संख्येत भर पडत गेली असेही नोंदवितो.  



म्युझिका सेक्रेटा चे संकेतस्थळ - http://musicasecreta.com/

संदर्भ व आभार - बेरुम्बाऊड्रम.ऑर्ग

Sunday, November 11, 2012

माणूस की पशू?


उषःकालीन आरक्त आकाशापासून ते सायंकालीन आरक्तवर्णी आकाशाच्या प्रवासात नंतर टप्पा येतो तो रात्रकालीन कृष्णवर्णीय आकाशाचा! ज्या सहजतेने रात्रीच्या त्या कृष्णवर्णाला आपण स्वीकारतो तितक्या सहजतेने आपल्या आयुष्यात आपण कृष्णवर्णाला स्वीकारतो का? काळ्या सावल्या, काळा प्रहर, काळे पाणी, काळे विचार .... आपल्या संकल्पनांमध्येही काळ्या रंगाचं व भय, संकट, दुष्टता, निराशा, हीनता यांचं एक नातं बनलेलं दिसतं. आणि माणसाच्या कातडीचा कृष्ण वर्ण? तिथेही काळ्या वर्णाचा पूर्वग्रह आड येताना दिसतो. तीच गोष्ट खुजेपणाच्या बाबतीत. बुटकेपणाभोवती कुचेष्टा, व्यंगात्मक दृष्टीकोन, दोष यांचं तयार केलेलं वलय तर दिसतंच; शिवाय बुटक्या लोकांना एखाद्या पशूप्रमाणे वागविण्याचे प्रकारही कमी नाहीत.

आफ्रिकेतील पिग्मी लोकांना आपल्या कृष्णवर्णामुळे व बुटकेपणामुळे व त्या जोडीला त्यांच्या वन्य  जीवनशैलीमुळे आजवर अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातले अतिशय मानहानीकारक असे सत्र म्हणून ज्याला संबोधिता येईल ते म्हणजे त्यांचे पाश्चात्य जगात एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे केले गेलेले प्रदर्शन! 'पशू व मानव यांमधील आतापर्यंत अज्ञात असलेला दुवा! पशूची मनुष्यावस्थेत उत्क्रांती होत असतानाची आदिम अवस्था!' अशा प्रकारे त्यांची जाहिरात करून त्यांचे ''वैज्ञानिक'' प्रदर्शनात मांडले जाणे व लोकांनी सर्कशीतल्या जनावरांप्रमाणे त्यांच्याशी केलेले वर्तन यांतून मानवी स्वभावाचे विचित्र पैलू समोर येत जातात.

हा काळ होता वसाहतवाद्यांनी नवनव्या भूमी पादाक्रांत करून तेथील स्थानिक लोकांना आपले गुलाम करून घेण्याचा! त्यांच्या जमीनी, नैसर्गिक स्रोत, धन लुटून त्यांच्यावर राज्य करण्याचा, आणि त्यांना आपल्याच भूमीत आश्रित बनविण्याचा. याच काळात घडते ओटा बेंगाची कथा.  


वनातील, निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारे, पशुपक्ष्यांच्या मुक्त सान्निध्यातील स्वतंत्र आयुष्य गुलामीसोबत बरखास्त झाल्यावर गुलामीत जीवन कंठायचे, गुलामीतल्या अत्याचारांपोटी हालअपेष्टा सोसत प्राण गमवायचे की निर्जीव इमारतींच्या जाळ्यात वेढलेल्या व मनुष्यांच्या दयेवर जगणार्‍या संग्रहालयातील पशूंसोबतचे बंदिस्त आयुष्य कंठायचे? प्रगत म्हणवून घेणार्‍या माणसाचे जंगली रूप अनुभवायचे? दोन्ही प्रकारांमध्ये आत्मसन्मानाची होणारी होरपळ, शोषण, निर्बंध, चिरडले जाणे हे तनामनांवर कायमचे ओरखडे ओढणारे....!! आफ्रिकेतील कांगो खोर्‍यातल्या एका वन्य जमातीचा भाग असणार्‍या ओटा बेंगा या पिग्मी तरुणासमोर जेव्हा आपल्या देशात राहून गुलामगिरीत आयुष्य काढायचे की देशाबाहेर जाऊन वेगळे आयुष्य शोधायचे हे पर्याय उभे ठाकले तेव्हा त्याला आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही नसेल! शिकारीसाठी आपल्या टोळीपासून लांब गेलेला ओटा बेंगा जेव्हा शिकारीहून परतला तेव्हा त्याला आपल्या कुटुंबातील सर्व लोक तेव्हा कांगो खोर्‍यावर राज्य करणार्‍या बेल्जियमच्या किंग लिओपल्डच्या सैन्याकरवी मारले गेलेत असे कळले. पुढे त्याला गुलाम म्हणून पकडण्यात व विकण्यात आले.

ओटा बेंगा

इ.स. १९०४ मध्ये सॅम्युएल वर्नर नावाचा एक मिशनरी व व्यवसायाने व्यापारी असलेल्या माणसाची ओटा बेंगाशी गाठ पडली. वर्नरची नियुक्ती सेंट लुईस वर्ल्ड फेअर या अमेरिकेतील प्रदर्शनात पाश्चात्य जगापुढे पिग्मी लोकांचे नमुने मांडता यावेत म्हणून त्यांना गोळा करून आणण्यात झाली होती. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील टप्प्यांमध्ये जगातून गोळा केलेल्या विविध प्रांतांतील एस्किमो, अमेरिकन इंडियन्स, फिलिपिनो यांसारख्या आदिम जमातींच्या लोकांसोबत पिग्मींचेही प्रदर्शन करता यावे हा त्यामागील उद्देश होता. वर्नरने कपड्यांचा एक तागा व एक पौंड मीठाच्या बदल्यात ओटा बेंगाला गुलामांच्या बाजारातून खरेदी केले. वर्नरसोबत प्रवास करत आपल्या गावी पोचेपर्यंत ओटा बेंगाला वर्नरच्या चांगुलपणाची खात्री पटली होती. कारण वर्नरने त्याला गुलामगिरीच्या खाईतून, मृत्यूच्या शक्यतेपासून वाचवले होते. ओटाच्या गावातल्या आणखी काही तरुणांना ''प्रदर्शनात'' सहभागी होण्यासाठी वर्नरने व ओटा बेंगाने राजी केल्यावर ते सगळे अमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुईस वर्ल्ड फेअरसाठी रवाना झाले.

बांबुटी नामक आदिवासी जमातीतील ओटा बेंगाच्या या कहाणीत असं विशेष काय आहे? असं काय खास होतं त्या तरुणात ज्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत, आधुनिक देशाने त्याची दखल घ्यावी? तर ते होतं त्याचं ''आदिम'' असणं! डार्विनच्या सिद्धांतानुसार मनुष्य हे माकडाचं उत्क्रांत स्वरूप! मग माणूस आणि माकड यांच्यादरम्यानची जी अवस्था होती ती कशी असेल याचं उत्तरच जणू तेव्हाच्या काही मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना ओटा बेंगाच्या स्वरूपात मिळालं! तो काळ होता 'सोशल डार्विनिझम'चा! विसाव्या शतकात पदार्पण केलेल्या व स्वतःला  बुद्धीवादी, विज्ञाननिष्ठ व प्रगत समजणार्‍या समाजाने विज्ञानाचा डंका पिटत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा! आपला वंश किंवा आपली जमात जगातील इतर वंशांच्या तुलनेत कशी सर्वश्रेष्ठ आहे, सभ्य - सुसंस्कृत आहे हे दाखवून देण्याचा! त्यासाठी पाश्चात्य जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खुली 'वैज्ञानिक' प्रदर्शने भरवली जात. त्यांमधून जगाच्या कानाकोपर्‍यांतून पकडून आणलेल्या, गुलामीत विकल्या गेलेल्या ''आदिम'' जमातींतील माणसांचे प्रदर्शन भरवत असत. या आदिवासी लोकांना त्यांच्या पारंपारिक वेशभूषा घालायला लावून त्यांचे युरोपियन किंवा आधुनिक वेशातील स्त्री-पुरुषांसोबत प्रदर्शन असे. यात पद्धतशीरपणे हे आदिम लोक कसे अप्रगत आहेत, रानटी आहेत, पशुतुल्य आहेत, अनीतिवान आहेत, हीन आहेत, अस्वच्छ आहेत हे प्रेक्षकांच्या मनावर ठसवले जात असे. आणि त्यातूनच ''आपण यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत, वरचढ आहोत'' हा दुरभिमान आपोआप लोकांच्या मनात जागृत होत असे!


आदिम लोकांच्या बसण्या-उठण्याच्या पद्धती, आचार हे किती अप्रगत आहेत, त्यातून त्यांना आपल्यापेक्षा कमी बुद्धी असल्याचे कसे सिद्ध होते हे ठळक केले जाई. ही प्रदर्शने मोठ्या प्रमाणांवर आयोजित होत. अगदी मोठमोठ्या संग्रहालयांतून, शहरांतून, जत्रांमधून! त्या प्रदर्शनाच्या मालकांना किंवा आयोजकांना लोकांनी भरलेल्या वर्गणीतून उत्पन्न तर मिळेच, शिवाय मानवजातीला आपल्या संशोधनामुळे व उपक्रमामुळे किती फायदा होत आहे याचे महान समाधान त्यांना प्राप्त होत असे! या कार्यक्रमांना लोकांची प्रचंड गर्दी उसळत असे. कित्येकदा गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी खास सुरक्षा तैनात करायचा प्रसंग येई अशी गर्दी या कार्यक्रमांना उसळत असे. आणि त्यात प्रदर्शन केल्या जाणार्‍या आदिम लोकांना सर्कशीतील जनावरांप्रमाणे बघ्या लोकांच्या नजरा सहन करायला लागणे, त्यांनी हात लावून चाचपून बघणे, हेटाळणी, कोणी अंगावर थुंकणे, कुचेष्टा, चिखलफेक यासारख्या अवमानजनक गोष्टींना सामोरे जावे लागे. एखाद्या धनिकाने स्वतःचे पदरी जगातील वेगवेगळ्या प्राण्यांचा संग्रह करावा तसे काही मोजके धनिक या गुलामांचा संग्रह करून त्यांचे प्रदर्शन भरवत असत, त्यातून प्रसिद्धी मिळवत असत व विज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करायला आपण कसे तत्पर आहोत याबद्दलचा मानमरातब मिळवण्यातही ते कमी नसत.

स्टुटगार्ट येथील ''पीपल्स शो'' ची जाहिरात 
डार्विनच्या सिद्धांतातील मोजक्या वाक्यांना उचलून व त्या वाक्यांचा विपरीत अर्थ लावून आपले सामाजिक व वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याची अहमहमिका तेव्हाच्या पाश्चात्य जगात लागली असल्याचे दिसून येते. पुढे याच वांशिक वर्चस्वाच्या संकल्पनेतून नाझीवादाचा उदय झालेला दिसतो. (संदर्भ : ब्राँक्स पशुसंग्रहालयाचे संस्थापक व वर्णद्वेषी असणार्‍या मॅडिसन ग्रँट यांना त्यांनी लिहिलेले पुस्तक आपले ''बायबल'' असण्याचे सांगणार्‍या व त्यांच्या कार्याची प्रशंसा करणार्‍या, खाली 'अ‍ॅडॉल्फ हिटलर' अशी सही असलेल्या पत्राची सॅम्युएल वर्नर यांचा नातू फिलिप्स ब्रॅडफोर्ड याने सांगितलेली आठवण)

 




आदिम लोकांची मानवी ''वैज्ञानिक'' प्रदर्शने

ओटा बेंगाच्या अगोदरही आफ्रिकेतून आणलेल्या गुलाम तरुण, तरुणींना प्रदर्शनांत मांडले जाई. प्रदर्शनात त्यांना पाहायला येणारे पाश्चात्य लोक त्यांच्या अंगाला हात लावून त्यांची चाचपणी करत. सारा बार्टमन उर्फ हॉट्टेन्टॉट व्हीनस या आफ्रिकन गुलाम तरुणीला अशा तर्‍हेच्या अत्यंत अवमानजनक प्रदर्शनांमधून जावे लागल्याची नोंद आढळते. प्रदर्शनाला येणार्‍या 'सभ्य' बायका तिचा स्कर्ट उचलून तिच्या अवयवांची पडताळणी करत असल्याचीही नोंद आढळते.

पकडून आणलेल्या गुलामांची स्थिती

ज्या ज्या गुलामांना प्रदर्शनासाठी किंवा वैज्ञानिक सिद्धांतांच्या नावाखाली पकडून आणले गेले त्यांची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' अशी होती हे इथे नमूद करणे महत्त्वाचे वाटते. मायदेशी गुलामीत, पकडलेल्या अवस्थेत, अवमानित, बंदिस्त, अतीव कष्टांचं आणि अनिश्चित आयुष्य जगावं की नियतीवर भविष्याचा हवाला ठेवून परक्या देशात, परक्या संस्कृतीत व परक्या माणसांमध्ये तुलनेने कमी कष्टाचं परंतु अवमानित, पशुतुल्य जीणं जगावं?

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा

सॅम्युएल वर्नर मलेरियामुळे आजारी पडल्यावर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना वर्नरशिवायच सेंट लुईस फेअरमध्ये सामील व्हावे लागले. नंतर जेव्हा वर्नर तिथे पोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की या पिग्मी तरुणांना प्रदर्शनातील आदिमतेचा नमुना म्हणून लोकांसमोर येण्याबरोबरच कैद्यासारखे आयुष्य जगण्याची वेळ आली होती. लोकांची गर्दी त्यांना थोडाही वेळ एकटे सोडत नसे. एका अमेरिकन वृत्तपत्राने ओटा बेंगाची प्रसिद्धी ''अमेरिकेतील एकमेव नरभक्षक आफ्रिकन'' अशी तर केलीच, शिवाय आपले मगरीसारखे दात दाखवण्याबद्दल तो लोकांकडून प्रत्येकी पाच सेंट्स घेत असे, ते पुरेपूर वसूल होत असल्याचे वृत्त दिले. तोवर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरचे आफ्रिकन पिग्मी हे रानटी, जंगली पशुतुल्य लोक असल्याची जनसामान्यांची खात्री झाली होती.

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा व साथीदार

सेंट लुईस फेअरवरून ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना न्यू ऑर्लिन्सला नेण्यात आले. तिथून ते आफ्रिकेत परतले. पण आफ्रिकेतील ओटा बेंगाचे कुटुंब नष्ट झाल्यामुळे व तेथील गुलामगिरीमुळे ओटाला आता तिथे थांबण्यात रस नव्हता. आधीच्या आयुष्यात तो रुळू शकत नव्हता. मग तो १९०६ मध्ये सॅम्युएल वर्नर सोबत पुन्हा अमेरिकेत परतला आणि इतिहासातील एका अतिशय शरम आणणार्‍या घटनापर्वाची सुरुवात झाली.

वर्नरने ओटा बेंगाची सोय अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे केली, कारण अन्य कोणी या पिग्मी तरुणाला ठेवून घेण्यात उत्सुक नव्हते. सॅम्युएल वर्नर स्वतः आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो तिथून दुसर्‍या ठिकाणी स्वतःच्या पोटापाण्याची सोय बघायला निघून गेला. म्युझियममध्ये ओटाला करण्यासारखे काहीच नव्हते. तिथे येणार्‍या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापलीकडे त्याला काहीच उद्योग नव्हता. लोक त्याला त्याचे दात दाखवायला सांगत. तोही अत्यल्प पैशांच्या बदल्यात त्यांना आपले दात दाखवत असे. पण लवकरच तो त्या जिण्याला कंटाळला व विचित्र तर्‍हेने वागू लागला. त्याने तिथे त्याला बघायला आलेल्या एका महिलेच्या रोखाने खुर्ची फेकल्याचे सांगण्यात येते. तिथून त्याची हकालपट्टी झाली. मग तिथून ओटा बेंगाची रवानगी न्यू यॉर्क येथील ब्राँक्स पशूसंग्रहालयात करण्यात आली.

ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगा 

ब्राँक्स पशुसंग्रहालयाने केलेल्या जाहिरातीतील ओटा बेंगाचे छायाचित्र


''द आफ्रिकन पिग्मी 'ओटा बेंगा',
वय २३ वर्षे, उंची ४ फूट ११ इंच
वजन १०३ पौंड्स,
दक्षिण मध्य आफ्रिकेच्या कांगो राज्यातून कसाई नदीच्या भागातून डॉ. सॅम्युएल पी. वर्नर यांचेद्वारा आणला गेला आहे.''

ब्राँक्स पशुसंग्रहालयातील प्रदर्शनात ओटा बेंगाच्या पिंजर्‍यापुढे लावलेली ही पाटी. आफ्रिकेच्या जंगलातून आलेल्या या कृष्णवर्णाच्या, बुटक्या, मगरीसारखे दात असलेल्या तरुणाची जाहिरात माणूस व माकडाच्या उत्क्रांतीमधील दुवा म्हणून अगोदरच झाली होती. पशूसंग्रहालयात ओटाच्या कडेवर कधी मुद्दाम एक ओरांगउटान माकड दिलेले असे. माकडासोबतचे खेळतानाचे, कुस्ती करतानाचे त्याचे फोटो तत्कालीन वृत्तपत्रांनी मोठ्या चढाओढीने प्रसिद्ध केले होते. ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगाला ज्या पिंजर्‍यात ठेवले होते तिथे जंगलाचा 'इफेक्ट' येण्यासाठी माकडासोबत एका पोपटाला देखील ठेवले होते. त्याच जोडीला आजूबाजूला हाडे विखरून ठेवण्यात आली होती. अनवाणी पायांनी वावरणार्‍या ओटाला जेव्हा पायात घालण्यासाठी बूट देण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे एकटक बघणार्‍या ओटाला पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उसळल्याचे सांगण्यात येते. त्याच्याकडे बोट दाखवून मोठमोठ्याने हसत ते ओटाच्या 'जंगली' वागण्याची चर्चा करत. त्यात ओटा कधी चित्रविचित्र भावमुद्रा घेऊन त्यांचे मनोरंजन करत असे. आफ्रिकेच्या जंगलात वाढलेला ओटा बेंगा धनुष्यबाणाने लक्ष्याचा वेध घेण्यात पटाईत होता. जंगली वेलींच्या सहाय्याने विणकाम करण्यातही तो प्रवीण होता. त्याच्या जमातीतील इतर लोकांप्रमाणे त्याने आपल्या दातांना मगरीच्या दातांप्रमाणे कोरून घेतले होते. या सर्वाची प्रेक्षकांना खूप नवलाई वाटत होती. मनोरंजनाबरोबरच आफ्रिकेतून आणलेल्या या 'पशुवत्' माणसाच्या जंगलीपणाविषयी व अप्रगतपणाविषयी त्यांच्या मनात खात्री होत होती.

परंतु लवकरच अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्च मिशनर्‍यांच्या निषेधामुळे ओटा बेंगाच्या या प्रदर्शनाला टाळे लागले. मिशनर्‍यांचा निषेध हा एका आफ्रिकन कृष्णवर्णीय माणसाला माकड आणि मनुष्य यांच्यामधील दुवा म्हणून त्याचे अवमानजनक प्रदर्शन करण्याबद्दल तर होताच, शिवाय त्यामागे आणखी एक कारण होते. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनुसार डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध होता. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे असे जाहीर प्रदर्शन ख्रिश्चन धर्माच्या विरोधात मानले गेले.

या आणि काही नागरिकांकडून झालेल्या निषेधाची दखल घेऊन ओटा बेंगाचे जाहीर प्रदर्शन जरी थांबविले गेले तरी तो राहायला अद्याप ब्राँक्स पशूसंग्रहालयातच होता. तोवर त्याचे नाव घरोघरी झाले होते. लोक त्याला पाहायला पशूसंग्रहालयात मोठ्या संख्येने गर्दी करत होते. एका दिवशी ४०,००० लोकांनी ओटा बेंगाला बघण्यासाठी पशुसंग्रहालयाला भेट दिल्याची नोंद टाईम्स वृत्तपत्राने केली. तसेच हे लोक बेंगाची खुलेआम टवाळी करत होते, त्याला ढकलत होते, पाडत होते, त्याची कुचेष्टा करून त्याला अवमानजनक शब्दांनी पुकारत होते ह्या घटनेची नोंदही टाईम्सने केली आहे.

नंतर ओटा बेंगाची रवानगी एका अनाथालयात झाली. कालांतराने तिथूनही त्याला हलवले व लिंचबर्ग येथे स्थलांतरित केले. या नव्या ठिकाणी ओटाने रुळायचा जिकीरीचा प्रयत्न केला. तो तोडकी-मोडकी इंग्रजी भाषा शिकला. त्याने आपल्या मगरीच्या दातांप्रमाणे कोरलेल्या दातांना कॅप्स घालून घेतल्या, आपले नाव 'ओटो बिंगो' असे बदलून घेतले, तो तंबाखूच्या कारखान्यात काम करू लागला. जवळच्या जंगलात तो आपले धनुष्य-बाण घेऊन शिकारीसाठी जात असे, जंगलातून औषधी वनस्पती शोधून आणत असे. पण त्याचे मन आता या देशात रमत नव्हते. इथे त्याने ज्या प्रकारची माणसे पाहिली, जशा प्रकारचे वर्तन अनुभवले त्यानंतर त्याला आपल्या मायदेशी परत जायचे होते. त्याला आपल्या लोकांची आठवण येत होती. पण त्याच वेळी १९१४ मध्ये पहिले जागतिक महायुद्ध उभे ठाकले. आता ओटाकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. नव्याची नवलाई बर्‍यापैकी ओसरली होती. ब्राँक्स पशूसंग्रहालयाच्या झालेल्या बदनामीमुळे अनेकांचे हात काही प्रमाणात पोळले होतेच! त्यामुळे ओटा बेंगाकडे पाहायला किंवा त्याच्या भवितव्याची चिंता करायला कोणीच उरले नव्हते. ओटाला स्वतःला मायदेशी जायचे असले तरी त्याच्यापाशी परत जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते व आवश्यक मदतीचे स्रोतही नव्हते. त्याने 'सभ्य' माणसाच्या जीवनशैलीला हळूहळू का होईना, जरी स्वीकारले, तरी तो सभ्य माणूस त्याला स्वीकारायला तयार नव्हता. त्यांच्या लेखी ओटा बेंगा हा जंगलातून आलेला आदिम प्राणीच होता. हळूहळू ओटा बेंगा नैराश्याने पुरता ग्रस्त झाला. शेवटी त्या नैराश्याच्या भरात त्याने आपल्या दातांच्या कॅप्स उखडून फेकून दिल्या आणि चोरलेल्या पिस्तुलाने स्वतःच्या छातीत गोळी झाडून प्राण त्यागले.    

पुढे नाझी भस्मासुराच्या आगीत वांशिक वर्चस्वाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाल्यावर वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याच्या हेतूने भरवली जाणारी मनुष्यांची ही ''वैज्ञानिक'' प्रदर्शने मागे पडली.
 

सध्याच्या काळातील ''ह्यूमन झू''

थायलंडमध्ये उत्तरेला, ब्रह्मदेशाजवळच्या सीमाप्रांतात एक ब्रह्मदेशातील निर्वासितांची जमात थायलंड सरकारच्या आश्रयाने निवास करून आहे. कारेन नामक पर्वतप्रांतात राहणार्‍या आदिवासी जमातीतील या लोकांमध्ये स्त्रियांची लांब मान हे त्यांच्या सौंदर्याचे प्रतीक मानण्यात येते. त्यासाठी अगदी लहान वयातच मुलींच्या मानेभोवती पितळी रिंगांची वेटोळी वळी घातलेली दिसून येतात. मुलींचे वय वाढत जाते तसतशी वळ्यांची वेटोळीही वाढविण्यात येतात. मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये या मानेभोवतीच्या पितळी रिंगचे वजन १० किलोंचे असते. वस्तुतः त्यात मुलींची मान लांब न होता त्यांच्या गळपट्टीच्या हाडामध्ये व्यंग निर्माण होते. या लोकांना आश्रय देऊन त्या बदल्यात थायलंड सरकारने त्यांचे ह्यूमन झू बनविले असल्याचा आरोप थायलंड सरकारवर केला जातो. कारण या लोकांचा तेथील पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. त्यांना पाहण्यासाठी व त्यांच्या वस्तीला भेट देण्यासाठी, गळ्यात रिंग्ज घातलेल्या मुलींना निरखण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.






एखाद्या प्रदर्शनात मांडावे तसे त्या मुली-स्त्रियांचे प्रदर्शन या वस्तीतून मांडलेले असते. त्यासाठी प्रत्येक पर्यटकाला दहा डॉलर्सचे शुल्क भरावे लागते. त्यांच्या वस्तीत गेल्यावर या आदिवासी लोकांनी बनविलेल्या कलावस्तूंना खरेदी करण्यासाठीही पर्यटकांचा पाठपुरावा केला जातो. या निर्वासितांना तात्पुरत्या व्हिसावर येथे राहायची परवानगी आहे. मात्र त्यांचा व्हिसा त्यांच्या ''शो'' च्या मालकाने काढून घेतला आहे, त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय ते कोठेही जाऊ शकत नाहीत. या लोकांचे पुनर्स्थापन करण्याची तयारी न्यू झीलंड सारख्या देशांनी दाखवली. परंतु थायलंड सरकार त्यांना सोडायला तयार नाही. तसेच त्यांना यापेक्षा जास्त चांगले जीवन कुठे मिळू शकणार आहे, असाही एक दावा केला जातो. ब्रह्मदेशातील सशस्त्र बंडखोर गटांनी या लोकांना त्यांच्या मूळ प्रदेशात नेऊन तिथे त्यांचे पर्यटकांसाठी प्रदर्शन मांडण्यात रस दाखवल्याचे सांगितले जाते. थायलंड सरकारने या लोकांचे कोणतेही पुनर्वसन अद्याप केलेले नाही. या लोकांना अतिशय तुटपुंज्या उत्पन्नावर जगावे लागते. त्यांच्या आयुष्यात कोणतेही स्थैर्य नाही. त्यांच्या जमातीतील मुली गळ्यात रिंग घालायची ही प्रथा इच्छा असली तरी मोडू शकत नाहीत, कारण त्यांनी ती प्रथा पाळण्यावर तेथील पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे. शेवटी तेथील असुरक्षित आयुष्याला कंटाळून, निषेध म्हणून या जमातीतील तरुणी व मुलींनी २००६ सालापासून आपल्या गळ्यातील रिंग्ज काढून ठेवायला सुरुवात केली. जानेवारी २००८ मध्ये जागतिक राष्ट्रसंघाच्या हाय कमिशनरांनीही या लोकांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली.

पॅरिसमध्ये आता इ.स. १८०० ते १९५८ पर्यंतच्या काळात भरवल्या गेलेल्या वेगवेगळ्या ह्यूमन झूं विषयीची माहिती एकत्रित स्वरूपात पाहावयास मिळते. त्या काळातील ह्यूमन झूंसंबंधित वेगवेगळी चित्रे, शिल्पे, जाहिराती, चित्रपट, पोशाख, पोस्टर्स यांचे हे एकत्रित प्रदर्शन सुन्न करणारे, गोठवून टाकणारे असल्याचा अनुभव अनेक मंडळी सांगतात. शोषणाच्या या अगणित कथांमधून त्या काळात अशा प्रकारे प्रदर्शन केल्या गेलेल्या ३५,००० लोकांच्या आयुष्याचा आलेख पाहावयास मिळतो. विज्ञानाच्या मुखवट्याआड दडलेल्या क्रौर्याचे व विकृत कुतूहलाचे नमुने पाहावयास मिळतात. माणसांनी माणसांचे मांडलेले हे प्रदर्शन ''माणूस'' या प्राण्याविषयी आणखी काय काय सांगते हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

संदर्भ :

* वॉशिंग्टन पोस्ट मधील अ‍ॅन हॉर्नडे यांचा ३ जानेवारी २००९ रोजीचा लेख : द क्रिटिकल कनेक्शन टू द क्युरियस केस ऑफ ओटा बेंगा

* द गार्डियन २९ नोव्हेंबर २०११ मधील अँजेलिक ख्रिसाफिस यांचा 'पॅरिस शो अनव्हेल्स लाईफ इन ह्यूमन झू' लेख.

* ओटा बेंगा वरील विकीपीडियातील लेख

* सारा बार्टमन बद्दल विकीपीडियातील लेख

* ह्यूमन झू बद्दल विकीपीडियातील लेख
 
* द ह्यूमन झू : सायन्सेस डर्टी लिटल सिक्रेट, २००९ माहितीपट.

* प्रो. सूझन विल्यम्स यांचे ग्रँड रॅपिड्स कम्यूनिटी कॉलेज, मिशिगन येथील रेस अँड एथ्निसिटी कॉन्फरन्स २०११  मधील लेक्चर.

(छायाचित्रे विकीपीडिया व आंतरजालीय स्रोतांमधून साभार)

Monday, October 29, 2012

सिद्दी संगीत

गुलामगिरी, दास्यत्व, पराधीनता यांतून येणारी हतबलता तर काही ठिकाणी हतबलतेतून अंगच्या मूळ ताकदीतून येणारी लढाऊ वृत्ती यांचा अर्थ पुरेपूर जाणणारी व मूळ आफ्रिकन वंशाची जमात गेली अनेक शतके भारतात वास्तव्य करून आहे. आज तुम्ही व आम्ही जेवढे भारतीय आहोत तेवढीच ही जमातही भारतीय आहे. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी, रूपरचना, मूळ आफ्रिकन प्रथा व संगीत यांमुळे आजही भारतीय प्रजेमध्ये हे लोक वेगळे कळून येतात. त्यांना 'सिद्दी' किंवा 'हबशी' म्हणून संबोधिले जाते. आज भारतात त्यांची संख्या पन्नास ते साठ हजार यांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकांनी त्यांच्या पूर्वापार सांगीतिक परंपरा किती जरी जपल्या तरी स्थानिक भारतीय संगीत, भाषा व प्रथांशी त्यांचा कालपरत्वे मेळ झाला आहे. सिद्दी लोकांच्या परंपरा, भाषा, राहणी, समजुती व संगीताचा अभ्यास करू जाता संस्कृती कशा प्रकारे मूळ धरते, प्रवाहित होते, विकसित होते किंवा दिशा बदलते याचे जणू एक चित्रच समोर उभे राहते.
सिद्दी स्त्री व मुलगी
असे सांगितले जाते की भारतात सिद्दी लोकांनी इ.स. ६२८ मध्ये भडोच बंदरात पहिले पाऊल टाकले. पुढे इस्लामी अरब टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्येही अनेक सिद्दी फौजेचा भाग म्हणून भारतभूमीत आले. परंतु सैन्याचा भाग म्हणून आलेल्या सिद्दींपेक्षाही गुलाम, नोकर, खलाशी व व्यापारी म्हणून आलेल्या सिद्दींचे प्रमाण जास्त धरले जाते. हे सर्वजण पूर्व आफ्रिकेतून इ.स. १२०० ते १९०० या कालखंडात भारतात येत राहिले व इथेच स्थायिक झाले. १७ व्या शतकात पोर्तुगीज व्यापार्‍यांनी सिद्दींना भारतातील अनेक राज्यकर्त्यांना, संस्थानांना व राजांना गुलाम म्हणून विकल्याची नोंद आढळते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सिद्दी लोकांची गुलाम म्हणून विक्री झाली.

भारताच्या पश्चिम भागात, खास करून गुजरातेत सिद्दी लोकांना आपल्या अंगभूत ताकदीमुळे व इमानदारीमुळे स्थानिक राजांच्या पदरी मारेकरी म्हणून नेमण्यात आले. काहींना शेतमजूर, नोकर म्हणून पाळण्यात आले. ज्या सिद्दींना असे आयुष्य नको होते त्यांनी घनदाट जंगलांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. त्यातील काहींनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जंजिर्‍यावर व जाफराबाद येथे आपली सत्ताकेंद्रेही उभी केली. दिल्लीवर मुघलांची सत्ता येण्याअगोदरच्या काळात (इ.स. १२०५ ते १२४०) रजिया सुलतानाचे पदरी असलेला जमालुद्दीन याकूत हा प्रसिद्ध सरदार सिद्दी जमातीपैकीच एक होता असे सांगण्यात येते. गुलामी ते सरदारकी असा त्याचा प्रवास होता.

सत्तासंघर्षामध्ये सिद्दी जमातीने कायम मराठ्यांपेक्षा मुघलांचीच जास्त करून साथ दिली. परंतु सिद्दी लोकांमधील मलिक अंबर या इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने आपल्या मर्दुमकीने मुघलांना जेरीस तर आणलेच, परंतु मराठ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या गनिमी काव्याच्या लढ्याची सुरूवात मलिक अंबरने महाराष्ट्रात केली. इथियोपियाहून आईबापांनी गुलामगिरीत विकलेल्या व जागोजागच्या गुलाम बाजारांमधून विक्री होत भारतात पोचलेल्या मलिक अंबरने अहमदनगरच्या निझामाच्या पदरी चाकरी केली व त्याचा बाकीचा इतिहास, पराक्रम, त्याने बांधलेल्या कलापूर्ण वास्तू व औरंगाबाद येथे त्याने तेव्हा विकसित केलेली 'नेहर' जलव्यवस्था यांबद्दल इतिहासकार कौतुक व्यक्त करतात.

भारतातील अनेक सिद्दी लोक हे टांझानिया व मोझांबिक येथील लोकांचे वंशज असून त्यांच्या पूर्वजांना पोर्तुगीजांनी भारतात आणले. यातील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून फारच कमी लोक हिंदू धर्म लावतात. त्याचे मुख्य कारण पारंपारिक हिंदू वर्ण व्यवस्थेत त्यांना कोठेच स्थान नसणे!

भारतातील तीन प्रांतांमध्ये प्रामुख्याने सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. गुजरात, कर्नाटक व हैद्राबाद हे ते प्रमुख प्रांत होत. गुजरातेत गीर जंगलाच्या आजूबाजूला सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. त्यांचे पूर्वज हे जुनागढच्या नवाबाच्या पदरी गुलाम होते. पोर्तुगीजांनी त्यांना गुलाम म्हणून जुनागढच्या नवाबाला विकले होते.


येथील सिद्दींनी स्थानिक गुजरातेतील चालीरीती, संगीत, भाषा इत्यादी जरी आत्मसात केले असले तरी त्यांच्या काही काही प्रथा, समजुती, संगीत व नृत्य या त्यांच्या मूळ संस्कृतीतून आलेल्या आहेत व त्यांनी त्या प्रयत्नपूर्वक जपल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांचे 'गोमा संगीत'. किंवा गोमा नृत्य! ह्याचे मूळ पूर्व आफ्रिकेतील बंटू लोकांच्या आवडत्या एन्गोमा ड्रमिंग व नृत्यामध्ये असल्याचे सांगतात. या लोकांसाठी गोमा नृत्य हे फक्त मनोरंजन किंवा विरंगुळ्याचे साधनच नाही, तर ते त्यांच्या मूळ धार्मिक किंवा आध्यात्मिक समजुतींनुसार महत्त्वाचे आहे. नृत्याच्या परमक्षणांना नर्तकांच्या अंगात त्यांचे पूर्वज संत-आत्मे प्रवेश करतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

गुजरातेतील सिद्दी लोकांचे हे गोमा नृत्य :



कर्नाटकात सिद्दींची संख्या सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येते. उत्तर कर्नाटकाच्या यल्लापूर, हलियाल, अंकोला, जोयडा, मुंडगोड, सिरसी तालुक्यांत, बेळगावच्या खानापूर तालुक्यात आणि धारवाडच्या कालघाटगी या ठिकाणी प्रामुख्याने सिद्दींची वस्ती आढळते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक सिद्दींनी पाकिस्तानात जाणे पसंत केले व ते कराचीत स्थायिक झाले. कर्नाटकातील सिद्दी हे प्रामुख्याने पोर्तुगीज, अरब व ब्रिटिश व्यापार्‍यांनी १६ ते १९ व्या शतकाच्या काळात गोव्याला गुलाम म्हणून आणलेल्या मूळच्या इथियोपिया व मोझांबिक येथील आफ्रिकन लोकांचे वंशज आहेत. त्यातील काहींना गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले तर काहींनी पळून स्वतःची सुटका करून घेतली व जंगलांचा आश्रय घेतला.
यल्लापूरच्या सिद्दींमध्ये, त्यांच्या नाच-गाण्यांमध्ये व श्रद्धा समजुतींमध्ये त्यांच्या पूर्वजांचा वारसा पुढे चालविलेला दिसून येतो. एम टी व्ही साऊंड ट्रिपिन् कार्यक्रमात यल्लापुरातील सिद्दी लोकांवर झालेला हा कार्यक्रम : https://www.youtube.com/watch?v=JT-ODZ7YX30

त्यांच्यावरचा हा एक व्हिडियो :



हैद्राबादचे सिद्दी हे त्या भागात १८ व्या शतकात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. हे सिद्दी निझामाच्या पदरी घोडदळात काम करत असत. त्यांचे संगीत हे 'हैद्राबादी मर्फा संगीत' (ज्याला 'तीन मार' म्हणूनही संबोधिले जाते) म्हणून विशेष प्रसिद्ध आहे व हैद्राबादेत ते खास सिद्दींच्या लग्नसमारंभांत किंवा अन्य प्रसंगी वाजविले जाते. ढोलक, स्टीलची कळशी व लहान 'मर्फा' ढोल यांसोबत लाकडी 'थापी' असा मर्फा वाद्यवृंदाचा संच असतो. मर्फातही तीन उपप्रकार आहेत. काही फक्त पुरुषांसाठी आहेत तर काही प्रकार पुरुष व स्त्रिया दोघांसाठी आहेत. यातील नृत्यप्रकारात तलवार व काठ्यांचा वापर करण्यात येतो. मात्र या कलाप्रकाराला ओहोटी लागल्याचे सांगण्यात येते.

केनियातील वृत्तवाहिनीने प्रसारित केलेले सिद्दी लोकांविषयीचे हे वार्तांकन :



आजच्या काळात बहुसंख्य सिद्दींची आर्थिक व सामाजिक स्थिती ही निम्न स्तराची आहे असे सांगतात. शिक्षणाचा अभाव, गरीबी, पिढ्यानुपिढ्या लादलेली गुलामगिरीची मानसिकता यांमुळे या लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागतो आहे. तसेच त्यांची सामाजिक परिस्थितीही फार चांगली नाही. भारतीय भाषा, आचार, वेशभूषा व संस्कृतीशी बर्‍याच प्रमाणात आदानप्रदान केले तरी सिद्दींना मुख्य लोकधारेने फारसे सामावून घेतलेले दिसत नाही. नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळले असल्यामुळे मेहनतीच्या जोडीला शिक्षणाचा मेळ घालून ते आयुष्यात पुढे येण्याच्या खटपटीत दिसतात.

(* चित्रे व माहिती आधार : विकिपीडिया, हिंदू वृत्तपत्रातील बातमी, The African Dispersal in the Deccan: From Medieval to Modern Times By Shanti Sadiq Ali, बी बी सी इन पिक्चर्स : इंडियाज आफ्रिकन कम्युनिटीज)

Wednesday, October 17, 2012

उबुंटू


विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान माझी ओळख एका सुंदर शब्दाशी झाली. तो शब्द म्हणजे ''उबुंटू''. 



Umuntu Ngumuntu Ngabantu: “A person is a person because of people.” (झुलू म्हण)

उबुंटू या शब्दाला आफ्रिकेत खोसा समाजात, बंटू भाषांमध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे व त्या शब्दाची वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी रूपे आहेत. जसे बोथो, उटू, उन्हू इत्यादी. उबुंटू हे एक प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली म्हणता येईल. त्याचा अर्थ ढोबळपणे, ''मी आहे, कारण आम्ही आहोत,'' असा होतो. त्यानुसार समाजात प्रत्येकाचे स्थान महत्त्वाचे आहे, आणि ''माझं अस्तित्व इतरांच्या अस्तित्वामुळे आहे,'' हा त्यातील मुख्य विचार मानला जातो. त्यानुसार उबुंटू जीवनशैलीला अनुसरणार्‍या माणसाला इतरांमधील गुणांमुळे  किंवा त्यांच्या क्षमतेमुळे कधीच असुरक्षित वाटत नाही. कारण तो स्वतः पूर्णतेचा एक अंश आहे, त्या पूर्णतेचा एक भाग आहे हे त्याला ठाऊक असते. तो स्वतःला इतरांचा एक भाग मानतो. आणि त्यामुळे इतरांची मानहानी ही त्या व्यक्तीचीही मानहानी ठरते. इतरांचे शोषण त्याचे शोषण ठरते. इतरांचे दु:ख त्याचे दु:ख ठरते. तुम्ही माणूस म्हणून एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला इतरांची, माणसांची, समाजाची गरज असते. तुमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. उबुंटू मुळे तुमच्यात उदारता येते. मनाचे मोठेपण येते. आपण एकमेकांशी जोडले गेल्याची भावना येते. अनेकदा आपण स्वतःचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करतो. पण उबुंटू मध्ये तुम्ही व इतर माणसे भिन्न नाहीत. एकाच्या कृतीने बाकीच्यांवरही प्रभाव पडतो. मग तो प्रभाव चांगला असो की वाईट! तुम्ही चांगली कृती केलीत तर त्याचा फायदाही सार्‍या जगाला होतो.

नेल्सन मंडेला उबुंटूचा अर्थ सांगताना म्हणतात : पूर्वीच्या काळी यात्रेकरू प्रवास करताना एखाद्या खेड्यात थांबायचे. तिथे गेल्यावर यात्रेकरूला कोणापाशी अन्न, पाणी मागायची गरज पडत नसे. कारण खेड्यातले सर्व लोक त्याला अन्न, पाणी आणून देत. त्याचे मनोरंजन करत. हा झाला उबुंटूचा एक भाग. याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी स्वतःचा विचारच करायचा नाही! त्याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्या समाजाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही हे करायला तयार आहात का?  



एक प्रकारचे ''कम्युनिटी स्पिरिट'' ज्याला म्हणता येईल असे हे तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगातही बरेच प्रसिद्ध पावले असे म्हणता येईल. २००४ सालच्या ''इन माय कंट्री'' चित्रपटात उबुंटू ही मुख्य विचारधारा असल्याचे सांगितले जाते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही त्यांच्या भाषणात समाजाचे महत्त्व सांगताना उबुंटूचा उल्लेख केला आहे.



संगणकीय प्रणालीच्या जगातही ''उबुंटू'' हे नाव प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाने उबुंटूचे इंग्रजी भाषांतर असलेले ''आय अ‍ॅम बिकॉझ वुई आर'' हे शीर्षक आपल्या आफ्रिकेतील मलावीच्या एड्स आणि एच आय व्ही ग्रस्त अनाथ मुलांवर तयार केलेल्या माहितीपटासाठी वापरले.



उबुंटू शब्दाशी निगडित एक छोटीशी पण सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली.



आफ्रिकेत काम करणार्‍या एका मानववंशशास्त्रज्ञाने तो काम करत असलेल्या खोसा समाजातील लहान मुलांना खेळताना पाहिले. त्याने एका झाडाखाली एक टोपली ठेवली. टोपलीत मधुर चवीची फळे होती. तो या मुलांना म्हणाला, तुमची शर्यत लावूयात. तुमच्यापैकी जो पळत पळत जाऊन त्या टोपलीपाशी पहिला पोचेल त्याला सर्वात जास्त फळे मिळतील. मुलांनी होकार दिला. शास्त्रज्ञाने शर्यत सुरू केल्यावर सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण पळत पळत एकाच वेळी त्या टोपलीपाशी पोचले. अर्थातच फळांचा प्रत्येक मुलाला समान वाटा मिळाला. त्या शास्त्रज्ञाला मुलांच्या त्या वागण्याचे फार कुतूहल वाटले. त्याने विचारले, ''तुम्ही अशा प्रकारे का पळालात? तुमच्यापैकी एक कोणीतरी शर्यत जिंकू शकला असता!'' त्यावर मुलांनी फळांवर ताव मारत उत्तर दिले, ''उबुंटू, जर बाकीचे दु:खी असतील तर आमच्यापैकी कोणी एक कसा काय बरे आनंदी होऊ शकेल?'' :-)

(उबुंटूबद्दल आणखी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy) येथे उपलब्ध आहे. चित्र आंतरजालावरून साभार)

Monday, October 08, 2012

धोबिणींचा गानवृंद!


काबाडकष्टांच्या आयुष्यात, संघर्ष - गरिबीचे जीवन जगत असताना त्याला जर संगीताची किनार लाभली तर सार्‍या आयुष्यात सर्व तर्‍हेच्या प्रसंगात ते संगीत साथ देते हे खरेच आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील कष्टकरी जमाती आपल्या श्रमांचा भार हलका करण्यासाठी, मनाला विरंगुळा देण्यासाठी संगीताचा आधार घेताना दिसतात. त्या संगीतातून त्यांच्या भावना, आयुष्यातील चढउतार, गमतीच्या गोष्टी, लोककथा, दंतकथा इथपासून ते केवळ यमक जुळवण्यापुरती केलेली मजेशीर रचना असे सर्व प्रकार दिसतात.

ब्राझीलमधील जेक्विटिनहोन्हा खोर्‍यातील धोबिणींनी आपल्या कष्टाच्या, एकसुरी आयुष्यातून विरंगुळा, रंजनाचे चार क्षण शोधले आणि त्याची परिणिती त्या बायकांचा एक सुरेखसा गानवृंद तयार होण्यात झाली!
ब्राझीलच्या मिनास जेराइस राज्यात वसलेल्या उत्तर पूर्व भागातील या बायका म्हणजे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या गाण्यांचे चालते-बोलते भांडार आहेत! मूळ आफ्रिकेतून त्यांच्या पूर्वजांनी या देशात आणलेले पिढ्यानुपिढ्या समृद्ध करणारे आफ्रिकन धर्तीचे संगीत, सांबा, फ्रेवोस, ड्रमिंग, अफोक्सेस, लोकसंगीत यांचा व्यवसायाने धोबिणी असणार्‍या या स्त्रियांकडे मोठा संचयच आहे म्हणा ना!




आयुष्यात या स्त्रियांनी काय नाही पाहिलेय? त्यांचे पूर्वज ब्राझीलमध्ये गुलाम म्हणून आले. इ.स. १५३० ते १८५० या काळात ब्राझीलमध्ये चाळीस लाख गुलामांची आयात झाली. पुरुषांची शारीरिक ताकद जास्त म्हणून स्त्रियांपेक्षा पुरुष गुलाम जास्त आणले जायचे. पुरुषांना उसाच्या शेतांमध्ये राबविले जायचे तर बायका घरमालकांच्या व मालकिणींच्या हाताखाली राबायच्या, त्यांची मुले सांभाळायच्या, स्वैपाकी म्हणून काम करायच्या, मालकाच्या घरात कष्टाची कामे करायच्या. शिवाय रस्त्यावर खाद्यपदार्थही विकायच्या. पुरुष गुलामांपेक्षा त्यांची गुलामगिरीतून लवकर मुक्तता व्हायची. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या आपल्या मालक-मालकिणीच्या जास्त जवळच्या संपर्कात असायच्या. गुलामगिरीतून मुक्त झाल्या की मग या स्त्रिया धोबीण, स्वैपाकी, आया, नोकराणी म्हणून काम करायच्या. एकोणिसाव्या शतकात त्यांच्या वाटची गरिबी, कष्ट, मोलमजुरी चुकले नाहीत. शिवाय त्या समाजात अतिशय निम्न स्तराचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते. परंतु जसजशा उच्चवर्गातील स्त्रिया मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झटू लागल्या तसतशा या कृष्णवर्णीय स्त्रिया आपल्या सामाजिक व राजकीय हक्कांसाठी झगडू लागल्या. इ.स. १९३२ मध्ये त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांना मतदानाचे हक्क नाकारण्यात आले. इ.स. १९४० च्या दरम्यान त्यांनी आपले संघटन करण्यास सुरुवात केली. ज्या जमिनीवर त्यांची घरे होती ती जमीन सरकार हिरावून घेऊ लागल्यावर या बायकांनी आपल्या हक्कांसाठी त्वेषाने लढा दिला. परिणामी त्यांना समाजात व त्यांच्या धर्मात प्रबळ स्थान मिळाले.

कँडोंब्ले हा त्यांनी आफ्रिकेतून आपल्याबरोबर आणलेला खास धर्म! पश्चिम आफ्रिकेच्या योरुबा परंपरेच्या व कॅथलिक धर्माच्या संगमातून निपजलेला हा धर्म. या धर्मात येथील स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान आहे. त्याचे एक कारण सांगितले जाते की गुलामगिरीच्या काळात गुलाम स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत जास्त मोकळीक असल्याने त्या त्यांच्या धार्मिक परंपरा जतन करू शकल्या व गुलामीव्यतिरिक्त केलेल्या कामाच्या पैशांतून धार्मिक समारंभांसाठी निधी गोळा करू शकल्या. आपल्या धर्माच्या चर्चमध्ये त्या ''हाय प्रिस्टेस'' किंवा उच्च पुजारिणीची भूमिका बजावत होत्या. शिवाय सुरुवातीपासून त्या स्वतःचे स्वतः कमावत होत्या. आर्थिक स्वावलंबन व धर्मातील प्रबळ स्थान यांमुळे या स्त्रियांचे त्यांच्या समाजातील स्थानही पुढचे राहिले.

मात्र त्या तुलनेत त्यांची आर्थिक स्थिती फार काही सुधारलेली दिसत नाही. आजही या स्त्रिया समाजातील धनवान लोकांकडे नोकर, मदतनीस, आया, स्वैपाकी म्हणून काम करताना दिसतात. त्यांचे कष्ट सुटलेले नाहीत. पण त्यांच्या समाजात व धर्मात त्यांचे स्थान निर्विवादपणे सशक्त आहे.

धोबिणी

श्रीमंत, धनाढ्य लोकांचे कपडे हाताने धुऊन त्यांना कोळशाच्या इस्त्रीने कडक इस्त्री करायच्या व्यवसायात असणार्‍या धोबिणींना अनेकदा स्वतःचे अंग झाकायला पुरेसे कपडे नसत. तासन् तास नदीच्या पाण्यात कपडे धुवायचे, ते वाळवायचे व त्यांना सुरेखशी इस्त्री करायची, या एकसुरी कामात त्यांना आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळची गाणी! आपल्या मोकळ्या किंवा किनर्‍या आवाजात ही गाणी गात कपडे धुताना त्यांचा कष्टाचा भारही जरासा हलका होत असे. त्यांच्यापाशी जी गाणी होती ती पोर्तुगीज, आफ्रिकन, कृष्णवर्णीय, भारतीय परंपरांचा मेळ असणारी!

अल्मेनाराच्या धोबिणी

प्रसिद्ध संगीतकार लेननच्या ''Lavadeira Do Rio'' (नदीकाठच्या धोबिणी) या गाण्यातील काही ओळींचा अनुवाद किती समर्पक आहे!

Ah! Washerwoman of the river!
Many sheets to wash
One more skirt to go
When the soap runs out
But she runs to the water's edge
And sees the surf shine
She hears the wild racket
Of the waves that beat the shore
Ah, oh, the wind blew
Ah, oh, the leaf fell...


'Beating Clothes, Singing Life'

गानवृंदातील स्त्रिया

अल्मेनाराच्या सेंट पीटर भागात इ.स. १९९१ मध्ये कम्युनिटी लाँड्री बांधली गेल्यावर या बायका प्रसिद्ध संगीतकार, संशोधक व गायक कार्लोस फरीयास याच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आल्या व आपल्या गाण्यांचे समूहगायन करू लागल्या. त्यांनी अल्मेनाराच्या धोबिणींची सामाजिक संघटना स्थापन केली. त्यात पन्नासापेक्षा जास्त बायकांचा सहभाग होता. त्यांच्या गानवृंदाचे जसजसे नाव होऊ लागले तसतशा ब्राझीलच्या निरनिराळ्या शहरांतून त्यांना कार्यक्रमांसाठी, उत्सवांसाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यांनी ब्राझीलच्या भागांबरोबरच पोर्तुगाल, पेरू, युरोपचे दौरेही केले. ''बाटुकिम ब्राझिलेरो'' (२००२) व अ‍ॅक्वा (२००५) या त्यांच्या संगीत अल्बम व पुस्तकांतून त्यांनी आपल्या समृद्ध वारशाला लोकांसमोर आणले. संगीताद्वारे समाजात सामावले जाण्याचा त्यांचा 'Beating Clothes, Singing Life' हा कार्यक्रम स्थानिकांनी व परदेशातील संगीत रसिकांनी उचलून धरला. 




या धोबिणींच्या वेगवेगळ्या गाण्यांचे अल्बम्स रेकॉर्ड झाले, त्यावर पुस्तके निघाली. कार्यशाळा होऊ लागल्या.  आपल्या कार्यक्रमांतून त्या फक्त आपल्या परंपरागत गाण्यांची झलकच दाखवतात असे नव्हे; तर त्या आपल्या आयुष्याची, संघर्षाची, कष्टांची कथाही सांगतात. नदीकाठच्या कथा ऐकवून लोकांचे मनोरंजन करतात. आपल्या खुमासदार संवादांनी कार्यक्रमात रंगत आणतात. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांच्या लोकांशी संवाद साधतात. त्यांना आवाहन करतात. ड्रम्स, गिटार्स, फ्लूट्स च्या साथीने या बायकांचे भरदार आवाज श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेची सफर घडवून आणतात. आज कम्युनिटी लाँड्रीद्वारे चाळीस बायका या धोबीकामाद्वारे आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. त्यातील बारा ते पंधरा बायका धोबिणींच्या गानवृंदात गातात. आपली सुख-दु:खे लोकांबरोबर वाटतात.



कार्यक्रमाच्या शेवटी पाण्याला आशीर्वाद देण्याचा विशेष सोहळा असतो. या सोहळ्यात गानवृंदातील सर्व स्त्रिया रस्त्यांतून गाणी गात, वाद्ये वाजवत एक चैतन्यपूर्ण मिरवणूक काढतात. ही मिरवणूक त्या त्या ठिकाणच्या नदी, तळी, कारंजी, जलाशयांपर्यंत वाजत-गाजत जाते व तिथे या स्त्रिया फुलांची उधळण करतात.

या कार्यक्रमाला ब्राझील सरकारच्या सांस्कृतिक खात्याने विशेष मान्यता दिली असून त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले आहे. आयुष्यभर इतरांची धुणी धुऊन जीवनाचे गाणे गाणार्‍या बायकांची ही आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, त्यांची कला आणि ताकद ही नक्कीच कौतुकास्पद आहे.  

*********************************************

माझी सहाध्यायी मिशेल ब्रूकचे पुन्हा एकदा ब्राझीलच्या या चिरतरुण गानवृंदाची ओळख करून दिल्याबद्दल विशेष आभार!

(* पोर्तुगीज भाषेतील शब्दांचे उच्चार दिल्यापेक्षा थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे.)
(चित्रे अल्मेनाराच्या सांस्कृतिक संकेतस्थळावरून साभार)