काबाडकष्टांच्या आयुष्यात, संघर्ष - गरिबीचे जीवन जगत असताना त्याला जर संगीताची किनार लाभली तर सार्या आयुष्यात सर्व तर्हेच्या प्रसंगात ते संगीत साथ देते हे खरेच आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील कष्टकरी जमाती आपल्या श्रमांचा भार हलका करण्यासाठी, मनाला विरंगुळा देण्यासाठी संगीताचा आधार घेताना दिसतात. त्या संगीतातून त्यांच्या भावना, आयुष्यातील चढउतार, गमतीच्या गोष्टी, लोककथा, दंतकथा इथपासून ते केवळ यमक जुळवण्यापुरती केलेली मजेशीर रचना असे सर्व प्रकार दिसतात.
ब्राझीलमधील जेक्विटिनहोन्हा खोर्यातील धोबिणींनी आपल्या कष्टाच्या, एकसुरी आयुष्यातून विरंगुळा, रंजनाचे चार क्षण शोधले आणि त्याची परिणिती त्या बायकांचा एक सुरेखसा गानवृंद तयार होण्यात झाली!
ब्राझीलच्या मिनास जेराइस राज्यात वसलेल्या उत्तर पूर्व भागातील या बायका म्हणजे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या गाण्यांचे चालते-बोलते भांडार आहेत! मूळ आफ्रिकेतून त्यांच्या पूर्वजांनी या देशात आणलेले पिढ्यानुपिढ्या समृद्ध करणारे आफ्रिकन धर्तीचे संगीत, सांबा, फ्रेवोस, ड्रमिंग, अफोक्सेस, लोकसंगीत यांचा व्यवसायाने धोबिणी असणार्या या स्त्रियांकडे मोठा संचयच आहे म्हणा ना!
आयुष्यात या स्त्रियांनी काय नाही पाहिलेय? त्यांचे पूर्वज ब्राझीलमध्ये गुलाम म्हणून आले. इ.स. १५३० ते १८५० या काळात ब्राझीलमध्ये चाळीस लाख गुलामांची आयात झाली. पुरुषांची शारीरिक ताकद जास्त म्हणून स्त्रियांपेक्षा पुरुष गुलाम जास्त आणले जायचे. पुरुषांना उसाच्या शेतांमध्ये राबविले जायचे तर बायका घरमालकांच्या व मालकिणींच्या हाताखाली राबायच्या, त्यांची मुले सांभाळायच्या, स्वैपाकी म्हणून काम करायच्या, मालकाच्या घरात कष्टाची कामे करायच्या. शिवाय रस्त्यावर खाद्यपदार्थही विकायच्या. पुरुष गुलामांपेक्षा त्यांची गुलामगिरीतून लवकर मुक्तता व्हायची. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या आपल्या मालक-मालकिणीच्या जास्त जवळच्या संपर्कात असायच्या. गुलामगिरीतून मुक्त झाल्या की मग या स्त्रिया धोबीण, स्वैपाकी, आया, नोकराणी म्हणून काम करायच्या. एकोणिसाव्या शतकात त्यांच्या वाटची गरिबी, कष्ट, मोलमजुरी चुकले नाहीत. शिवाय त्या समाजात अतिशय निम्न स्तराचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते. परंतु जसजशा उच्चवर्गातील स्त्रिया मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झटू लागल्या तसतशा या कृष्णवर्णीय स्त्रिया आपल्या सामाजिक व राजकीय हक्कांसाठी झगडू लागल्या. इ.स. १९३२ मध्ये त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांना मतदानाचे हक्क नाकारण्यात आले. इ.स. १९४० च्या दरम्यान त्यांनी आपले संघटन करण्यास सुरुवात केली. ज्या जमिनीवर त्यांची घरे होती ती जमीन सरकार हिरावून घेऊ लागल्यावर या बायकांनी आपल्या हक्कांसाठी त्वेषाने लढा दिला. परिणामी त्यांना समाजात व त्यांच्या धर्मात प्रबळ स्थान मिळाले.
कँडोंब्ले हा त्यांनी आफ्रिकेतून आपल्याबरोबर आणलेला खास धर्म! पश्चिम आफ्रिकेच्या योरुबा परंपरेच्या व कॅथलिक धर्माच्या संगमातून निपजलेला हा धर्म. या धर्मात येथील स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान आहे. त्याचे एक कारण सांगितले जाते की गुलामगिरीच्या काळात गुलाम स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत जास्त मोकळीक असल्याने त्या त्यांच्या धार्मिक परंपरा जतन करू शकल्या व गुलामीव्यतिरिक्त केलेल्या कामाच्या पैशांतून धार्मिक समारंभांसाठी निधी गोळा करू शकल्या. आपल्या धर्माच्या चर्चमध्ये त्या ''हाय प्रिस्टेस'' किंवा उच्च पुजारिणीची भूमिका बजावत होत्या. शिवाय सुरुवातीपासून त्या स्वतःचे स्वतः कमावत होत्या. आर्थिक स्वावलंबन व धर्मातील प्रबळ स्थान यांमुळे या स्त्रियांचे त्यांच्या समाजातील स्थानही पुढचे राहिले.
मात्र त्या तुलनेत त्यांची आर्थिक स्थिती फार काही सुधारलेली दिसत नाही. आजही या स्त्रिया समाजातील धनवान लोकांकडे नोकर, मदतनीस, आया, स्वैपाकी म्हणून काम करताना दिसतात. त्यांचे कष्ट सुटलेले नाहीत. पण त्यांच्या समाजात व धर्मात त्यांचे स्थान निर्विवादपणे सशक्त आहे.
धोबिणी
श्रीमंत, धनाढ्य लोकांचे कपडे हाताने धुऊन त्यांना कोळशाच्या इस्त्रीने कडक इस्त्री करायच्या व्यवसायात असणार्या धोबिणींना अनेकदा स्वतःचे अंग झाकायला पुरेसे कपडे नसत. तासन् तास नदीच्या पाण्यात कपडे धुवायचे, ते वाळवायचे व त्यांना सुरेखशी इस्त्री करायची, या एकसुरी कामात त्यांना आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळची गाणी! आपल्या मोकळ्या किंवा किनर्या आवाजात ही गाणी गात कपडे धुताना त्यांचा कष्टाचा भारही जरासा हलका होत असे. त्यांच्यापाशी जी गाणी होती ती पोर्तुगीज, आफ्रिकन, कृष्णवर्णीय, भारतीय परंपरांचा मेळ असणारी!
अल्मेनाराच्या धोबिणी |
Ah! Washerwoman of the river!
Many sheets to wash
One more skirt to go
When the soap runs out
But she runs to the water's edge
And sees the surf shine
She hears the wild racket
Of the waves that beat the shore
Ah, oh, the wind blew
Ah, oh, the leaf fell...
'Beating Clothes, Singing Life'
गानवृंदातील स्त्रिया |
अल्मेनाराच्या सेंट पीटर भागात इ.स. १९९१ मध्ये कम्युनिटी लाँड्री बांधली गेल्यावर या बायका प्रसिद्ध संगीतकार, संशोधक व गायक कार्लोस फरीयास याच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आल्या व आपल्या गाण्यांचे समूहगायन करू लागल्या. त्यांनी अल्मेनाराच्या धोबिणींची सामाजिक संघटना स्थापन केली. त्यात पन्नासापेक्षा जास्त बायकांचा सहभाग होता. त्यांच्या गानवृंदाचे जसजसे नाव होऊ लागले तसतशा ब्राझीलच्या निरनिराळ्या शहरांतून त्यांना कार्यक्रमांसाठी, उत्सवांसाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यांनी ब्राझीलच्या भागांबरोबरच पोर्तुगाल, पेरू, युरोपचे दौरेही केले. ''बाटुकिम ब्राझिलेरो'' (२००२) व अॅक्वा (२००५) या त्यांच्या संगीत अल्बम व पुस्तकांतून त्यांनी आपल्या समृद्ध वारशाला लोकांसमोर आणले. संगीताद्वारे समाजात सामावले जाण्याचा त्यांचा 'Beating Clothes, Singing Life' हा कार्यक्रम स्थानिकांनी व परदेशातील संगीत रसिकांनी उचलून धरला.
या धोबिणींच्या वेगवेगळ्या गाण्यांचे अल्बम्स रेकॉर्ड झाले, त्यावर पुस्तके निघाली. कार्यशाळा होऊ लागल्या. आपल्या कार्यक्रमांतून त्या फक्त आपल्या परंपरागत गाण्यांची झलकच दाखवतात असे नव्हे; तर त्या आपल्या आयुष्याची, संघर्षाची, कष्टांची कथाही सांगतात. नदीकाठच्या कथा ऐकवून लोकांचे मनोरंजन करतात. आपल्या खुमासदार संवादांनी कार्यक्रमात रंगत आणतात. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांच्या लोकांशी संवाद साधतात. त्यांना आवाहन करतात. ड्रम्स, गिटार्स, फ्लूट्स च्या साथीने या बायकांचे भरदार आवाज श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेची सफर घडवून आणतात. आज कम्युनिटी लाँड्रीद्वारे चाळीस बायका या धोबीकामाद्वारे आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. त्यातील बारा ते पंधरा बायका धोबिणींच्या गानवृंदात गातात. आपली सुख-दु:खे लोकांबरोबर वाटतात.
कार्यक्रमाच्या शेवटी पाण्याला आशीर्वाद देण्याचा विशेष सोहळा असतो. या सोहळ्यात गानवृंदातील सर्व स्त्रिया रस्त्यांतून गाणी गात, वाद्ये वाजवत एक चैतन्यपूर्ण मिरवणूक काढतात. ही मिरवणूक त्या त्या ठिकाणच्या नदी, तळी, कारंजी, जलाशयांपर्यंत वाजत-गाजत जाते व तिथे या स्त्रिया फुलांची उधळण करतात.
या कार्यक्रमाला ब्राझील सरकारच्या सांस्कृतिक खात्याने विशेष मान्यता दिली असून त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले आहे. आयुष्यभर इतरांची धुणी धुऊन जीवनाचे गाणे गाणार्या बायकांची ही आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, त्यांची कला आणि ताकद ही नक्कीच कौतुकास्पद आहे.
*********************************************
माझी सहाध्यायी मिशेल ब्रूकचे पुन्हा एकदा ब्राझीलच्या या चिरतरुण गानवृंदाची ओळख करून दिल्याबद्दल विशेष आभार!
(* पोर्तुगीज भाषेतील शब्दांचे उच्चार दिल्यापेक्षा थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे.)
(चित्रे अल्मेनाराच्या सांस्कृतिक संकेतस्थळावरून साभार)
Enjoyed reading the post.
ReplyDeleteHere is a beautiful Dhobi song from the 1930s magnum opus Pukaar (dhoye mahobe ghaaT) : http://www.youtube.com/watch?v=eUKofRXezQ8
(The music is Mir Sahib's)
- Naniwadekar
रोचक! आणि पूर्ण नवी माहिती आहे माझ्यासाठी. लेख आवडला.
ReplyDelete