Monday, February 01, 2010

जलवर्षा


मृद्गंधाचे अत्तर उधळित कोसळती जलधारा

हिरव्या पात्यांतुनि लवलवतो सुसाट भिजरा वारा |

मखमलि सजली धुंद नव्हाळी यौवनसुंदर धरा

पक्षि विसावत अंग घुसळुनी चोचि घासती परां |

आमोदे अति प्रसन्न गातो खळखळणारा झरा

तप्त सृष्टिला तृप्त करुनिया जीवन दे अंकुरा |

आनंदाचे तोरण सजले अवनीच्या मंदिरा

जलवर्षेचे पांग फेडण्या जन्म पडे का पुरा?
-- अरुंधती

6 comments:

  1. पहिल्या दोन ओळी साकी वृत्तात (८-८-८-४ मात्रा) आहेत. आणि शेवटच्या ६ ओळी सूर्यकांत (८-८-८-३ मात्रा) आहेत. पण तसा या दोन वृत्तांत फरक असा नाहीच, म्हणून ही भेसळ मला चालेल. तरी ती भेसळ नसती तर जास्त मजा आली असती.

    र्‍हस्वदीर्घाच्या चुका मात्र खटकल्या. 'उधळीत', 'पात्यांतुनी', 'मखमली', 'पक्षी', 'चोंची', 'अती', 'सृष्टीला' या सगळ्या शब्दांची व्याकरणशुद्‌ध रुपे या कवितेत अशुद्‌ध ठरतात. ते शब्द 'उधळित', 'पात्यांतुनि', 'मखमलि', 'पक्षि' किंवा हे अशुद्‌ध रूप खटकल्यास 'विहग', 'चोंचि' किंवा 'चोंच', 'अति' आणि 'सृष्टिला' असे हवेत. कविता लिहिल्यावर ती निदान स्वत:शी म्हणून पहा; लगेच या चुका तुमच्या लक्षात येतील.

    कविता खूप म्हणजे खूपच छान आहे. अगदी कुसुमाग्रजांची वाटते. सूर्यकान्त हे त्यांचं आवडतं वृत्त होतंच. पण बाकी घाटही एकदम कुसुमाग्रजी आहे.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  2. आपल्या प्रतिसादाबद्दल व चुका लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! आपण सुचविलेले र्‍हस्वदीर्घाचे बदल केले आहेत. कवितेच्या भावतरंगांत ह्या चुका ध्यानी आल्या नव्हत्या. आवर्जून लक्षात आणून दिल्याबद्दल आभार! :-)
    आ. न.
    अरुंधती

    ReplyDelete
  3. केवळ सुंदर, छानच

    ReplyDelete
  4. नरेंद्रजी, धन्यवाद! :-)

    ReplyDelete
  5. "पक्षि विसावत अंग घुसळुनी चोचि घासती परां"
    सुंदर .... यथार्थ वर्णन ........ स्वभावोक्ती अलंकार
    (अलंकार ओळखण्यात चूक झाली असेल तर क्षमस्व)

    "जलवर्षेचे पांग फेडण्या जन्म पडे का पुरा?"
    .......... fantastic

    ReplyDelete
  6. नमस्ते उल्हास जी, आपले ब्लॉग वर स्वागत! शब्दालंकार वगैरे माझे फारसे ज्ञान नाही. उत्स्फूर्त ओळी सुचल्या व कागद,पेन शोधताना माझीच भंबेरी उडाली! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

    ReplyDelete