Thursday, March 04, 2010

माझे संत्रापुराण

परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते.
काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते! ना त्या संत्र्याला तो चिरपरिचित सुवास, ना साल काढताना अंगावर - डोळ्यांत हमखास उडणारा व चुरचुरणारा रस....आणि एरवी पटकन सोलून होणारे संत्रे सालीला अंगाभोवती घट्टमुट्ट लपेटून बसलेले. एका झटक्यात साहेबजादे सोलले जाण्याचे नावच घेत नव्हते!
कशीबशी दात ओठ खाऊन ती संत्री सोलण्यात मी यशस्वी झाले मात्र, पण खरी कसोटी तर आता पुढेच होती. एरवी संत्रे सोलले की त्याच्या पाकळ्या आपोआप विलग होत. इथेही त्यांनी असहकार धोरण स्वीकारलेले. पुन्हा एकदा शक्ती देवतेला पाचारण करून मी त्या पाकळ्यांची फारकत केली.
एका बशीत त्या ओढाताणीत रुसलेल्या संत्र्याच्या पाकळ्या रचल्या....एक पाकळी अलगद तोंडात टाकली....आणि माझा चेहरा खरेच प्रेक्षणीय झाला.....
कोणीतरी माझी घोर म्हणजे घोर चेष्टा केली होती. मी जे संत्रे म्हणून खात होते ते संत्रे नव्हतेच मुळी! त्याला ना धड संत्र्याची चव होती, ना मोसंब्याची! ना ते माधुर्य, तजेला, आंबटगोड स्वाद, ना तोंडात रेंगाळणारा ताजेपणा.... हे कसले तरी संत्र्याच्या नावाखाली खपवलेले बेचव फळ होते.
म्हणायला बिया कमी म्हणजे अगदीच क्षुल्लक होत्या आणि आंबटपणा नावालाही नव्हता. प्रत्येक फळाची खास अशी चव ठरलेली असते. संत्रे म्हटले की ते आंबटगोड हे ठरलेले! पण अहो, त्याचा आंबटपणा अपेक्षितच असतो हो! ही तर संत्रे नावाखाली केलेली शुद्ध बेचव फसवणूक होती.
आज सकाळी बाजारात मला नेहमीचा फळ विक्रेता दिसल्यावर मी मुद्दाम मोर्चा तिकडेच वळवला.
"ही स्टिकर्स वाली संत्री म्हणजे काय भानगड आहे रे भाऊ?" माझा सवाल.
समोर हारीने रंग, रूपाने गोमटी दिसणारी स्टिकर्सवाली संत्री मांडून ठेवली होती.
"घ्या ना, ताई, एकदम मस्त, नवा माल आहे. जरा महाग आहे, पण चवीची ग्यारंटी! एकपण संत्रं आंबट निघालं तर पैसे परत!"
अर्थात कालच्या अनुभवाने शहाणी झालेली मी त्याच्या भुरळथापांना बळी पडणारी नव्हते.
"काय रे, खूप खपत असेल नै हा माल?" माझा निरागस प्रश्न.
"कसचं काय ताई, तुमच्यासारखी लोकं घेऊन जात्याती ह्ये असलं फळ. बाकी लोक आपला देशी, गावरान मालच पसंत करतात. परवडत न्हाय ना त्यास्नी! "
" आमच्यासारखी??"
"म्हन्जे गाड्यांमधून फिरनारी हो ताई! तेच लोक अशी स्टिकरवाली फळं नेतात. गरीबांना परवडत न्हाय असला माल. त्यांना देशी फळपण बघा, गोड लागतंय!"
"बरं बरं, मला त्या देशी संत्र्यातली अर्धा डझन चांगली संत्री दे निवडून लवकर! बघ, आंबट निघता कामा नयेत," माझी दमदाटी.
एव्हाना फळ विक्रेता माझ्याकडे "ह्या बाईला काय येड बिड लागलंय की काय" अशा मुद्रेने पाहत असलेला. एवढा वेळ त्याने स्टिकरयुक्त फळांची केलेली भलावण फुकट जाताना बघून त्यालाही कष्ट होणारच की हो! पण 'ग्राहक देवो भव' उक्तीला जागून त्याने मुंडी हालवत, फारसे सवाल न करता मी निवडून दिलेली संत्री एका कागदी पिशवीत कोंबली आणि पैसे खिशात घालून तो इतर ग्राहकांकडे लक्ष देऊ लागला.
मीही हातातल्या पिशव्या सांभाळत, समाधानी मनाने घराचा मार्ग धरला.
कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!
--- अरुंधती

8 comments:

  1. अरुधंती, एकदम पटले. आपली देशी संत्रीच मस्त. अग सोलायला लागलो की मधूनच नेम धरून मारल्यासारखी उडणारी सूक्ष्म फवारे,सालाची अकृत्रिम तकाकी, अलगद विलग होणा~या कळ्या... तोंडाला अगदी पाणी सुटले बघ. नाहितर हे संत्रे.... नुसताच दिमाख... संत्रापुराण सहीच.:)

    ReplyDelete
  2. भाग्यश्री, लेख लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर आपली नेहमीची रसरशीत संत्रीच तरळत होती! त्यांचा तो हवाहवासा वाटणारा वास, 'डोळे मारायला' लावणारा आंबटगोडपणा आणि बाह्य रूप कसेही असो, आतला रसनेची तृप्ती करणारा लुसलुशीत गाभा.... सारंच अप्रतिम! प्रतिसादाबद्दल धन्स :-)!

    ReplyDelete
  3. संत्र्यांचा पंखा नसूनही लेख जाम आवडला :)

    ReplyDelete
  4. ब्लॉगवर आपले स्वागत, हेरंब ! एरवी मीसुध्दा संत्री फारशी खात नाही. पण उन्हाळ्याची चाहूल लागली की त्याच संत्र्याला अमृताची चव येते!
    :-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  5. "केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री" म्हणजे कीनू संत्री. ही पंजाबात होतात. तुम्ही जी देशी संत्री म्हणत आहात ती नागपुरी संत्री असावीत.

    तुमचा ब्लॉग छान आहे.

    ReplyDelete
  6. एक मनोगती, तुमचं ब्लॉग वर स्वागत! ओह्ह, त्यांना किनू संत्री म्हणतात होय? मला माहीतच नव्हतं!सध्या मी देशी संत्र्यांची पूर्णवेळ पुरस्कर्ती झालेली असून रोज त्यांचा फन्ना उडवण्यात पटाईत झाले आहे!! धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि ब्लॉगच्या कौतुकाबद्दल! :-)

    ReplyDelete
  7. शिंचा मी पण त्या श्टिकरवाल्या च्यकाच्यक्‌ संत्र्यांना एकदा फसलोय! :-(

    पण ती संत्री असतात तरी कोणती? चायनीज संत्री?

    ReplyDelete
  8. ती जी केशरी आहेत ती संत्री नाहीत. त्याला कीनू म्हणतात. पंजाबात खूप पिकतात ती.

    ReplyDelete