Friday, March 05, 2010

माठाय तस्मै नमः |


होळी जळाली, थंडी पळाली की उन्हाचा प्रखर ताप जाणवू लागतो. हिवाळ्यात मऊसूत वाटणारे ऊन अंगाची कल्हई करू लागते. आणि पावले मग आपोआपच कुंभारवाड्याकडे वळतात. तऱ्हेतऱ्हेच्या आकाराचे, घाटाचे, मातीचे माठ तिथे तुमच्या प्रतीक्षेतच असतात. अगदी छोट्याशा मडक्या, सुगडांपासून ते गरगरीत डेऱ्यांपर्यंत आणि नळाच्या तोट्या असलेल्या सुबक घड्यांपासून ते उभट रांजणांपर्यंत वैविध्याने नटलेली ही मृत्तिकापात्रे तुमची तहान भागविण्यासाठी सज्ज असतात. तुम्हाला हव्या त्या माठापाशी बसकण ठोकायची, माठ उभा - आडवा - तिरपा करून सर्व कोनांतून चौफेर पडताळून झाला की त्यावर बोटे वाजवून येणारा नाद तपासायचा, पुन्हा त्याला उलटा-पालटा करून न्याहाळायचा.... अशा सूक्ष्म तपासणीनंतर तोंडाने 'हम्म... ' असे काहीसे आवाज काढत आपल्या घासाघिशीच्या ठेवणीतल्या आवाजात विक्रेत्याला साद घालायची....

पुढची पाच-दहा मिनिटे सुखेनैव घासाघीस - भाव करण्यात घालवल्यावर मनासारखी किंमत मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर तसूभरही दिसू न देता आक्रसलेल्या कपाळाने पैसे देऊन माठ ताब्यात घ्यायचा, वर 'गळका निघाला ना तर आहे तस्सा परत करीन, ' अशी सज्जड धमकीवजा सूचना करून पाय घराकडे वळवायचे. [एवढे ओझे घेऊन कोण शहाणा/णी इकडे-तिकडे उंडारेल? ] मग रस्त्याने 'घट डोईवर, घट कमरेवर' असले कसलेसे गाणे गुणगुणत, माठाला मिरवत ठुमकत ठुमकत विजयी मुद्रेने जायचे.....

... पण कायमच अशी परिस्थिती नसते बरं का! ह्या माठाने मला काय काय दिवस दाखवले आहेत, काय सांगू!

एके वर्षी कुंभारवाड्यात जायला जमले नाही म्हणून घराजवळ आलेल्या हातगाडीवरून माठ आणला. दोन दिवस त्याला चांगला पाझरवला. तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रेमाने त्याच्यात पाणी भरले. वाळ्याची जुडी आत सोडली. वरून जुन्या बनियनचे ओले केलेले फडके लपेटले. आज दुपारी भर उन्हात आपल्याला गारेग्गार वाळ्याचे पाणी प्यायला मिळणार ह्याची सुखस्वप्ने रंगविते तोच...... स्वयंपाकघरात घोर हाहाःकार माजला! पाण्याने भरून ठेवलेला माठ कोणतीही पूर्वसूचना न देता अलगद मधोमध दुभंगला होता. त्याच्या भग्नावशेषांत वाळ्याची जुडी पोरकेपणाने तरंगत होती. ओटा, फरशी डोळे गाळीत होते. माझ्याही घशात दुःखातिरेकाने हुंदका दाटून आला. त्या दुर्दैवी माठाचे और्ध्वदेहिक उरकल्यावर दोन दिवस तसेच सुतकात गेले. पण तिसऱ्या दिवशी प्रखर उन्हाचे चटके स्वस्थ बसू देईनात.

एव्हाना आमची शोकगाथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना कळली होती. [आमचीच टकळी! दुसरे काय?!!] दुःखी चेहऱ्यावरचा आपला कुत्सित आनंद कसाबसा लपवत सख्या शेजारणी सांत्वनपर चौकशी करत, माठ कसा - कोठून -किती रुपयांपर्यंत खरेदी करावा, ह्याबद्दल अनाहूत सल्ले देत कलकलाट करून गेल्या.

मनाचा हिय्या करून मी शिफारस केल्या गेलेल्या जवळच्या विक्रेत्याकडून दुसरा माठ खरेदी करून घेऊन आले. आधीचा उत्साह, आनंद यांची जागा नव्या माठाच्या भवितव्याच्या चिंतेने घेतली होती. ''ह्या खेपेस माठ नीट नाही मिळाला तर सगळ्या मेल्या शेजारणी मलाच फिदीफिदी हसतील! म्हणतील, ''काय बावळट बाई आहे! हिला साधा माठही खरेदी करता येत नाही!! '' इति मी.

ह्याही खेपेस मोठ्या वात्सल्याने पहिले दोन दिवस मी माठाला न्हाऊ-माखू घातले, उन्हात शेकले, पाण्यात घालून - पाणी ठेवून 'बुड बुड गंगे' केले. मग सप्तनद्यांचे, गोमातेचे व कुळदैवताचे मनोभावे स्मरण करून त्या माठाची ओट्यावर प्रतिष्ठापना केली. धडधडत्या अंतःकरणाने त्यामध्ये पाणी ओतले, झाकण ठेवले व निकालाची वाट पाहत बसून राहिले.

दुपारी दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात डोकावले -- माठ भरपूर पाझरत होता, पण अद्याप अभंग होता. माझा आनंद गगनात मावेना. ताबडतोब ही बातमी जिने माठवाल्याची शिफारस केली त्या शेजारणीला तिच्या वामकुक्षीचे पुरेपूर खोबरे कसे होईल ह्याची काळजी घेत ऐकवण्यात आली. आप्तसुहृदांना ''आमच्याकडच्या माठाचं थंडगार पाणी प्यायला यायचं हं! " असे साग्रसंगीत निमंत्रण देऊन झाले. मोठ्या खुशीत ''आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी'' च्या ओळी गुणगुणतच मी त्या गारगार माठातले गारगार पाणी प्यायला स्वयंपाकघरात प्रविष्ट झाले. माठाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत त्यातले पाणी घेण्यासाठी झाकणी बाजूला केली, हातातले ओगराळे आतल्या पाण्यात बुडवल्यावर त्याचा जो 'डुच्चदिशी' आवाज झाला तो ह्या कर्णरंध्रांत साठवून घेतला आणि पाण्याने आटोकाट भरलेले ओगराळे बाहेर काढणार तोच..... ह्या माझ्या चक्षूंसमोर तो अगस्तीमुनींचा तात - माझा माठ - भंगोनी गेला.... माझ्या हातात फक्त ओगराळेच उरले!!

घरात पुढचे काही दिवस सामसूमच होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कोणीही आपापली रसवंती पाजळली नाही. शेजारणीदेखील दूर दूर फटकूनच राहू लागल्या. न जाणो माझी नजर त्यांच्या घरांतील माठांवर पडली तर!

एक दिवस ओळखीचे एक मामा आकाराने जरा लहान, पण बरा दिसणारा माठ अंगापोटावर वागवत घरी घेऊन आले. त्यांच्याच शुभहस्ते त्याला स्वयंपाकघरात बसविले. ते म्हणे आपल्या स्वतःच्या घरी त्या माठाची दोन दिवस 'ट्रायल' घेऊन आले होते. माठात पाणी भरून, त्याला ओल्या फडक्यात थापटून थोपटून, माझ्या हातचा चहा पिऊन, ''आता काळजी नको, '' असे बजावत मामांनी निरोप घेतला. मी मनातल्या शंका - कुशंकांना मोठ्या मुश्किलीने दाबत असताना कामवाली बाई पचकलीच, "आजा झाला, बिजा झाला, आता तिजा न्हाय झाला म्हंजे मिळवलं रे बाप्पा! "

त्या बाप्पाने बहुधा तिची व आमची लाज राखायचे ठरवले असावे. झिरपून झिरपून पाणी गाळत का होईना, तो माठ त्या उन्हाळ्यात आमचा त्राता ठरला. ह्यापुढे कोणतीही माठ-खरेदी कुंभारवाड्यात जाऊनच करायची हे मी एव्हाना मनाशी पक्के केले होते.

आता मी जेव्हा कुंभारवाड्यात जाते तेव्हा तेथील विक्रेत्यांशी विशेष ममत्वाने बोलते. फारशी घासाघीस करत नाही. फार चिकित्सा करत बसत नाही. आणि हो, येताना त्या माठाला नेहमीसारखा मिरवत न आणता ओढणीखाली लपवून आणण्याची दक्षता मात्र जरूर घेते. हसणारे हसतात. हसेनात का! त्यांना काय माहीत, एक माठ सलामत, तो उन्हाळा पचास!


-- अरुंधती 

19 comments:

  1. Anonymous8:34 PM

    :P zakaas lihilayes. mi anlela math pan asach undarachya dhakyane kalandun futala hota! ;)

    ReplyDelete
  2. mast tai,
    tumhi agadi sadhya sadhya prasanganna khumasdar banavata!
    "Duchchdishi" honara aawaz he aavadala!

    ReplyDelete
  3. Anonymous8:58 PM

    मी आधि कसे नाही वाचले तुझे(तुमचे) लेख??? असो...

    मस्त गारेगार आहे लेख.... आमची आजी माठात वाळा आणि मोगऱ्याचे फुल आलटून पालटून टाकायची!!! खरंय त्याची सर नाही कशाला... आजीकडे एक खोजा नावाचा वाघाचे तोंड असलेला माठ असायचा, तो ही असाच मस्त.....
    Tanvi

    ReplyDelete
  4. @ Anonymous : हा हा हा, उंदराने माठ फोडला.... बिचारा उंदीर! पळता भुई थोडी झाली असणार त्याची.... माठ फुटण्याला अजूनही आपल्याकडे, अगदी शहरांमध्येही अपशकुन मानले जाते. वस्तुत: माठासारखी भांडी ही फुटायलाच जन्माला येतात. असो. प्रतिसादाबद्दल आभार! :-)

    ReplyDelete
  5. @ विद्याधर (प्रोफेट) : सध्या कल्पनाशक्ती उसळ्या मारत आहे त्याचेच हे परिणाम बरं! ;-) मला माठातून पाणी काढताना होणारा तो 'डुच्चदिशी' आवाज खूप आवडतो. त्यामुळे लेखात त्याला घालायचा मोह आवरला नाही!! :-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  6. तन्वी, ब्लॉग वर तुझं स्वागत! मीसुध्दा आजच तुझा ब्लॉग बऱ्याच दिवसांनी पुन्हा पाहिला ... आवडला :-)! आणि हो, तू म्हणतेस तशी माझी आजीही माठात वाळा, मोगरा घालायची. तिने माठ गार ठेवायला पुडाच्या दोऱ्यापासून एक वस्त्र विणले होते क्रोशावर! त्याला ओले करून माठाभोवती गुंडाळले की पाणी अजूनच गार व्हायचे! माठाच्या पाण्याने उन्हाळ्यात जी तहान भागते ती फ्रीज च्या पाण्याने नाही भागत! :-) असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  7. Aga kiti sundar lihila aahes!
    Wah maza aali wachayla khoop diwsanantar.

    -Shantanu

    ReplyDelete
  8. माठातलं पाणी ते माठातलं पाणी. त्याची बरोबरी बिसलेरी नी फ्रिजच्या पाण्याशी होऊच शकत नाही. काय मस्त वाटलं तुमचा लेख वाचल्यावर. काळया माठात पाणी अधिक गार होतं असं माझी आई सांगायची, तेव्हापासून माठ म्हणजे लाला माठ नाही, काळाच असं मनाशी ठरवून टाकलं.

    ReplyDelete
  9. Ujjwala12:46 AM

    faarach mast lihila aahes...vachtana khup maja aali :)

    ReplyDelete
  10. शंतनू, ब्लॉग वर स्वागत! मलाही ही 'माठ कथा' लिहिताना खूप मजा आली. पुन्हा एकदा ते सारे प्रसंग अनुभवले. लिहिण्याची हीच मजा असते, नाही? :-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  11. कांचन, अगं उन्हाळ्यात माठामधलं पाणी पिऊन जी तृप्ती येते ना, त्यापुढे आपले फ्रीज वगैरे तुच्छ वाटतात गं! आणि हो, काळ्या माठात पाणी जास्त गार होतं हे खरंय! आणि त्या पाण्याची चवही किती मधुर! :-) असो. ये भेटायला अन गप्पा मारायला अशीच ब्लॉग वर!:-)

    ReplyDelete
  12. उज्जू, अगं इथं पाहता पाहता उन्हाळा वाढलाय....मग माठाची जोरदार आठवण झाली! :-) आता रोज वाळा घातलेलं गार पाणी प्यायची सुसंधी! :-) प्रतिसादाबद्दल धन्स! :-)

    ReplyDelete
  13. Anonymous8:28 AM

    Tumhi AOL cha Iravati Kulkarni aahat ka? -Ashwini

    ReplyDelete
  14. स्वत: मध्ये अजिबात पाणी जिरू न देता,
    दुसर्‍याची जिरवणारे हे माठ,
    भलतेच हुषार आहेत ....'माठ' नाहीत.

    छान लेख आहे ... आवडला

    ReplyDelete
  15. हा हा हा, उल्हास जी, आजच मी विचार करत होते.... 'माठ', 'मोठ्ठा', 'मठ्ठा', 'मठ्ठ' वगैरे शब्दांचा परस्परांशी संबंध असेल काय, आणि तो असला तर कसा? ;-) प्रतिसादाबद्दल आभार!

    ReplyDelete
  16. अरे मी कशी राहुन गेले माठपुराण वाचायची??? मस्तच झालाय लेख..इथे एक-दोन आठवड्याचा सणसणीत उन्हाळा असतो पण मागच्या वर्षी जरा जास्त आठवड्याचा होता तेव्हा खरं सांगते सॉलिड आठवण आली होती माठाच्या पाण्याची आणि for some reason मला फ़्रिजमधलं थंड पाणी पिववत नाही....

    ReplyDelete
  17. अपर्णा, आता इथं उन्हाळा चांगलाच जाणवायला लागलाय, त्यामुळे माठाला पर्याय नाही! तू म्हणतेस ते खरंय, फ्रीजचे पाणी अगदीच नाईलाज असला तर प्यायचे....जी तृप्ती, समाधान माठाचे पाणी पिऊन मिळते त्याची तुलना कशाशीच नाही!! प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

    ReplyDelete
  18. Anonymous12:13 PM

    मस्त जमलाय लेख! माठाबद्दल एक गंमत सांगते.कुठे बाहेरगावी जायचे की मी इतके सामान सोबत घेते की बहुधा 'फक्त माठच सोबत घ्यायचा शिल्लक ठेवलायस' अशी आमच्या अहोंची प्रतिक्रिया असते.

    ReplyDelete
  19. श्रेया, हा हा हा, फारच 'बोलकी' प्रतिक्रिया आहे तुझ्या अहोंची! तुला लेख आवडला व आवर्जून कळवलेस त्या बद्दल धन्यवाद आणि तुझं ब्लॉगवर मनापासून स्वागत! :-)

    ReplyDelete