Tuesday, March 16, 2010

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सववसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात.
पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र! रूप व सौंदर्याचा साक्षात आविष्कार असलेल्या कामदेवाच्या घरी पुत्रजन्म झाल्यावर सारा निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्याच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात, पुष्प-कुसुमे त्याचेसाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात, शीतल-सुगंधित वारा त्याला झोका देतो आणि कोकिळ पक्षी आपल्या सुमधुर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो. असा हा सृजनोत्सव! म्हणूनच बहुधा वसंताला ऋतुराज म्हणत असावेत! त्याच्यावर आधारित संगीत राग 'बसंत बहार' ह्या नवचैतन्याचीच प्रचीती देतो.
प्राचीन साहित्यात वसंत ऋतूमध्ये 'वनविहार', 'डोलोत्सव', 'पुष्पशृंगार' व 'मदनोत्सव' मोठ्या प्रमाणावर नागरजनांमध्ये साजरा केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.संस्कृत साहित्यात माघ शुक्ल पंचमीला मदनोत्सव साजरा केला जात असल्याची सुरेख वर्णने आहेत. सुगंधित केशर व कुंकवाच्या सड्यांनी सर्व नगर, रस्ते सुगंधित केले जात असत. त्या पीत-आरक्त वर्णाने सारे नगर जणू सुवर्णमयी भासत असे. सर्व जाती, लिंग, वय, श्रेणीचे लोक आपापसातले भेद विसरून ह्या वसंतोत्सवात सामील होत असत. नृत्य, गायन, वाद्यसंगीत, नाट्य इत्यादींचा आस्वाद घेत असत. केसांमध्ये फुले माळून हळद, कुंकू व तांदळाचे चूर्ण विखरून रंगांचा खेळ खेळत असत. वसंत विहारात स्त्रिया फुले, पाने गोळा करत; त्यांच्या आकर्षक माळा गुंफत; आम्रमंजिरी तोडत, केशर-कुंकुमाचे तिलक लावून कधी आपल्या प्रियतमाच्या कानावर फूल खोचून त्याला दृढालिंगन देत. उद्यानयात्रांत, वन-विहारांत स्त्री-पुरुष एकत्रितपणे मद्यपान करीत असत. सर्व स्तरांचे नागरिक वसंतोत्सवात सामील होत असत. रमणी, सुंदर स्त्रियांनी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करून त्याला 'फुलविण्या'चाही खास सोहळा असे. हिंदोळ्यांवर झुलणे हा ही वसंत ऋतूतील एक अविभाज्य भाग! त्यावेळी म्हणे 'हिंदोल' राग गायला जाई.
वसंतात व ग्रीष्मात पाण्यात वाळा, नागरमोथा, सुगंधी पुष्पे घालून तसे सुगंधित पाणी प्यायले जात असे. दुपारीही सर्वांगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रे लेऊन, पंख्याचा वारा घेत रमणी विश्राम करीत असत. एका वर्णनात वसंत ऋतूतील सायंकाळी अभिजन आपला वेळ कसा व्यतीत करत ह्याचे फार मनोहर चित्र रंगविले आहे. सायंकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढर्‍या शुभ्र बैठकी मांडल्या जात. तिथे किंवा नगराबाहेरच्या उपवनांत, आम्रवाटिकेत सर्व अभिजन गायन, नृत्य, वादन, काव्य-श्रवण इत्यादी कलांचा आस्वाद घेत, मधुर फळांचे थंड रस अथवा सुरा नक्षीदार रजतपात्रांमधून प्राशन करत असत. त्याअगोदर सायंकाळी शीतल, सुगंधित पाण्याने स्नान करून, तलम मलमलीची वस्त्रे परिधान करून, गळ्यात मोगरा - जाई-जुई सारख्या शीतलता प्रदान करणार्‍या पुष्पांच्या माळा घालून, अंगाला चंदन-केशराची उटी, तिलक लावून ते ह्या सायंकालीन कार्यक्रमास सज्ज होत. मनोरंजन, तांबूलसेवन, शुकसारिका यांद्वारे रंजन अशा विविध मार्गांनी वसंत ऋतूमधील सायंकाळी व्यतीत होत असत.
आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशी वर्णने वाचूनही मन उल्हसित होते. मदनोत्सव, दोलोत्सव, रंगोत्सव एवढ्या रसिकतेने साजरे करणारे हे लोक आपल्यापेक्षा एका परीने विचारांनी व आचरणाने प्रगत व अभिरुचीसंपन्नच म्हणावे लागतील ह्यात शंकाच नाही!
-- अरुंधती

4 comments:

 1. छान वर्णन आहे. नूतन वर्षाभिनंदन !! हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

  ReplyDelete
 2. धन्यवाद हेरंब! हे नववर्ष आपणां सर्वांनाही सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच सदिच्छा! :-)

  ReplyDelete
 3. tai,
  tumhi agadi swargalokichi safar ghadavun analit!

  ReplyDelete
 4. हा हा हा! विद्याधर, हा लेख फारच सेन्सॉरड आहे.... संस्कृत व प्राकृत साहित्यात ह्या विषयावर अतिशय शृंगारिक व प्रासादिक वर्णने आढळतात. पण सर्वांनाच ती 'झेपत' नाहीत. आपण अभ्यासाच्या दृष्टीने पाहणे वेगळे आणि आपल्या संस्कृतीचा एक भाग म्हणून पाहणे वेगळे! असो. स्वर्गलोकीची सफर आवडली ना? अशीच अधून मधून संस्कृत व प्राकृत मधील लालित्यपूर्ण माहितीची सफर घडवून आणीन! प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

  ReplyDelete