Sunday, March 21, 2010

अर्ध्या तासाचा फरक


साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद भवन, कुतुबमिनार, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती! आणि जरा उसंत मिळाली की बरोबरच्या मुली आमच्या वर्गमित्रांना बरोबर घेऊन करोलबाग नाहीतर पालिकाबझारवर धाडी घालत. सायंकाळी हॉस्टेलावर दिवसभरात केलेल्या शॉपिंगचा प्रदर्शनाचा कार्यक्रम असे.
मला दोन दिवस फीर फीर फिरून जाम कंटाळा आला होता. पाय तर काय दुखत होते विचारू नका. कोठेतरी शांतपणे, आरामात, ए‌‌. सी. च्या थंडगार झुळका खात अतिशीतपेयांचा आस्वाद घ्यावा, सोबत मंद संगीत असावे, निवांत गप्पांचा फड जमवावा अशा दिवास्वप्नांत मी गर्क होते. हीच अवस्था माझ्या अन्य दोन अमराठी मैत्रिणींची होती. बाकी कळपातील शिस्त व अनुशासनाला (? ) न जुमानता कामचुकार म्हशींप्रमाणे आम्ही कधी आमच्या ग्रुपला चकवा देऊन ह्या 'स्थल-दर्शनातून' निसटतो असे आम्हाला झालेले!
अखेर ती घटिका आली! एकामागून एक स्थळांचे डोळे भिरभिरवणारे दर्शन घेतल्यावर आमचे प्राध्यापक आम्हाला प्रगती मैदानावर घेऊन आले. तिथे कोणतातरी मेळा भरला होता. त्यांची अपेक्षा होती की आम्ही दुखऱ्या पायांनी ते मैदान पालथे घालत त्या मेळ्याचा आनंद घ्यावा! ह्यॅ!!!!
बाकी सर्व ग्रुप मैदानात शिरल्यावर आम्ही तिघी मैत्रिणींनी सर्वांची नजर चुकवून तिथून कल्टी मारली. आदल्या दिवशी कॅनॉट प्लेस मध्ये ''निरुलाज''च्या जवळचे ''द होस्ट'' नावाचे एक मस्त तारांकित हॉटेल आम्ही हेरून ठेवले होते. आदल्या दिवशी तिथे थोडा अल्पोपाहारही केला होता. जुन्या युरोपियन धाटणीचे वातावरण, आल्हाददायक ए. सी. आणि चकाट्या पिटायला अतिशय उत्तम! आता तिथेच जायचे, मस्त हाणम्या जेवायचे आणि तेथील ए. सी. चा मनोरम आनंद घेत फुल्ल्टू टाईमपास करायचा.... मग सायंकाळी बाकी ग्रुपला थेट हॉस्टेलावर गाठायचे... वाट चुकलो वगैरे सांगून वेळ मारून न्यायची, असा प्लॅन ठरला.
एका रिक्षात आम्ही तिघींनी स्वतःचे देह कोंबले व कॅनॉट प्लेसच्या दिशेने प्रवास सुरू केला.
आमचा आनंद एव्हाना 'कशी हूल दिली' ह्या कल्पनेने व दोन-तीन दिवसांनी धड आरामात बसून जेवायला मिळण्याच्या संधीप्राप्तीने गगनात मावत नव्हता. चाणक्यपुरीत विदेशी वकिलाती व त्यांच्या टोलेजंग इमारती, कचेऱ्या, बंगले, हॉटेल्स, रस्ते, चौक सगळेच चकचकीत होते... पण हॉटेल्स पंच-सप्त तारांकित असल्यामुळे आमच्या खिशाच्या बाहेर! हॉस्टेलाचे अन्न सुमार होते आणि त्यात तिथे एक पंजाब - हरियाणाची हॉकी टीम राहायला आलेली.... त्यांच्या अफाट खाण्यामुळे हॉस्टेल कॅन्टिनमधले बहुतेक पदार्थ संपलेले असत. त्यामुळे गेले तीन दिवस आम्ही कोणत्यातरी चायनीजच्या गाडीसमोर उभे राहून, नाहीतर हॉस्टेलाजवळच्या रस्त्यावरच्या धाब्यावर अक्षरशः खाली पदपथावर फतकल मारून जेवत होतो.
आज मात्र आमचे खाद्य भाग्य उजाडले होते!
हॉटेलपाशी पोहोचेपर्यंत दुपारचे अडीच झालेले. बाहेर टळटळीत ऊन असताना आपण कसा ए. सी. हॉटेलात बसून यथेच्छ जेवण चापायचा निर्णय घेतला ह्याबद्दल स्वतःच्या अक्कलहुशारीचे कौतुक करतच आम्ही हॉटेलबाहेर दाखल झालो. तिथे आम्हाला आमच्यासारखीच दोन चुकार मांजरे उर्फ आमचे वर्गमित्र दिसले. म्हणजे काल ह्यांनीदेखील हे हॉटेल हेरून ठेवले होते म्हणायचे!! एकमेकांना 'कसे इतरांना गंडवले'च्या टाळ्या देऊन झाल्यावर आम्ही सुहास्यवदनाने हॉटेलात प्रवेश केला. एका छानशा टेबलला मोकळे पाहून तिथेच बसायचे ठरवले. 'लंच क्राऊड' ओसरत आल्यामुळे जागा मिळायला काहीच प्रॉब्लेम आला नाही.
मग सुरू झाला आमचा टाईमपास. स्टार्टर्स, मॉकटेल्स, गप्पांचा राऊंड - मग वेटर दोन-तीनदा सूचकपणे ऑर्डर घ्यायला आल्यावर पुढची ऑर्डर असा कार्यक्रम सुरू झाला. तसे आम्ही सगळे पुण्यातही फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, डेक्कन, कॅंप इत्यादी ठिकाणच्या विविध रेस्टॉरंटसमध्ये चकाट्या पिटण्यात माहिर असल्यामुळे येथेही तेच काम कुशलतेने पार पाडण्यात आम्हाला कसलीच अडचण येत नव्हती. बरं, स्टाफदेखील कसलीही खळखळ न करता चुपचाप आमचे हास्यविनोद, लांबवलेल्या ऑर्डरी, आमच्या दोस्तांची कॉमेडीगिरी वगैरे सहन करत होता. शेजारच्या दोन-तीन टेबल्सना काही परदेशी प्रवासी बसले होते, त्यात दोन-चार रुपसुंदऱ्या असल्यामुळे आमच्या मित्रांचे निम्मे लक्ष गप्पांमध्ये, निम्मे 'त्यांच्या'कडे लागले होते. आम्हीही त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन दोघांनाही भरपूर छळून घेतले.
अचानक मित्राची नजर मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. ''ओह, शि* यार! वुई आर ब्ल* लेट फॉर अवर कर्फ्यू टाईम! ''
पाहिले तर सायंकाळचे सात वाजत आलेले. अरेच्या! वेळ कसा आणि कुठे गेला हे कळलेच नव्हते! आणि दिल्लीत पाऊल टाकल्या टाकल्या आमच्या प्राध्यापकांनी समस्त विद्यार्थ्यांना तंबी दिली होती : सर्वांनी सायंकाळी सहाच्या आत हॉस्टेलावर हजर पाहिजे! मुलींना तर साडेपाचापर्यंतच हजर राहण्याच्या सूचना होत्या. कारण साहजिकच चाणक्यपुरी भागातील अतिकडक सुरक्षा, चेकपोस्ट्स, निर्जन रस्ते, गुन्हेगारी आणि अतिरेक्यांकडून घातपाताची भीती ह्याशिवाय आमचे त्या शहरात असलेले नवखेपण हे होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेतलेली ही दक्षता होती. त्या काळात दिल्लीतील, खास करून आम्ही राहात असलेल्या भागातील सुरक्षा अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे बरीच वाढवलेली होती. रस्त्यात सर्वसामान्य माणसे कमी व सुरक्षा कर्मचारी अधिक दिसायचे.
अर्थात आमच्या टाईमपासमध्ये आम्ही ही बाब साफ विसरलो होतो! मग काय! घाईघाईत बिल दिले, टॅक्सी पकडली आणि हॉस्टेलाचा मार्ग धरला. अंधार पडल्यावर एरवी उजेडात ओळखीची वाटणारी दिल्ली परकी परकी, असुरक्षित वाटू लागली होती. रस्त्यावरच्या वाहनांचे वेग वाढले होते. चाणक्यपुरीच्या जवळ तर रस्त्यात माणसेच नव्हती. होत्या त्या फक्त भन्नाट, सुसाट वेगाने धावणाऱ्या परदेशी बनावटीच्या, काळ्या काचांच्या अशक्य चकचकीत गाड्या!! रस्त्यावर दोन-तीनदा आम्हाला सुरक्षारक्षकांनी, पोलिसांनी थांबवले, आमची ओळखपत्रे पाहिली आणि मगच पुढे सोडले. वॉकीटॉकी काय, हेल्मेटस काय... हे सुरक्षा प्रकरण आम्हाला झेपणारे नव्हते!
हॉस्टेलमध्ये पोचलो तेव्हा जवळपास पावणेआठ होत आलेले.
आमच्या उरलेल्या दोन रूममेट्स आम्ही लपत-छपत रूममध्ये प्रवेश केल्यावर अक्षरशः चिडचिडाट करत आमच्या अंगावर धावूनच यायच्या शिल्लक होत्या. ''कहां गये थे रे तुम लोग? पता है क्या, सर दो-दो बार चक्कर लगाके गए सब रूम्सकी। हमने कैसे उन्हे रोका है हमेही पता है... क्या क्या बहाने बनाने पडे तुम लोगके लिए.... अब सरको यदी मालूम पडा और उन्होंने इंटर्नल्स और व्हायवाके मार्क्समेंसे कुछ मार्क्स काटे तुम लोगके, तो हमे मत बताना, हां! '' अरे बापरे! हा तर विचार आमच्या डोक्यातच शिरला नव्हता. आम्ही आवरून घेईपर्यंत सर पुन्हा एकदा 'चेक' करायला आलेच होते. मग हसत हसत, 'हॅलो सर, गुड इव्हिनिंग सर.... ' वगैरे मोघम गप्पा मारून झाल्यावर ते एकदाचे अंतर्धान पावले. हुश्श! इंटर्नल्स आणि व्हायवाचे मार्क्स बचावले!!
त्या रात्री आम्ही तिघी उशीरापर्यंत 'आपण कशी धमाल केली' म्हणून खिदळत होतो. पण का कोण जाणे, कुठेतरी काहीतरी चुकतंय असेच मनात खोलवर वाटत होते.
ते असे का वाटत होते त्याचे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उलगडले.
मी आमच्या रूममध्ये तयार होत होते तेवढ्यात कालच्या आमच्या हॉटेल-स्वारीतील एक मैत्रीण रूममध्ये आली आणि फुसफुसली, ''जल्दी नीचे आ, बाकी सब इंतजार कर रहे है ।'' मला तर काही कळेना! तर माझा हात धरून ती जवळपास मला ओढतच खाली घेऊन गेली. ''अरे, तू बताएगी क्या यह सब क्या चल रहा है? '' इति मी. ''तू देख'' करत तिने मला स्वागतकक्षात नेले. तिथे तिपाईवर दोनचार इंग्रजी वृत्तपत्रे पडली होती. तिने त्यातले एक उचलले व माझ्या हातात कोंबले, ''ले, पढ! '' मी मथळ्यावर नजर फिरवली आणि पायाखालची जमीनच जणू सरकत आहे असे वाटले.
आदल्या सायंकाळी ठीक साडे-सातच्या दरम्यान कॅनॉट प्लेसमधील हॉटेल दिल्ली दरबारजवळ झालेल्या शक्तीशाली बॉंम्ब स्फोटात दोन नागरिक ठार, बावीस जखमी.... माझ्या हातातून वर्तमानपत्र गळून पडायचेच ते काय शिल्लक राहिले! आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ते दिल्ली दरबारपासून थोड्याच म्हणजे तीन-चार मिनिटांच्या रस्त्यावर होते. आदल्या दिवशी ह्याच दिल्ली दरबारच्या बाहेर आम्ही परतीसाठी टॅक्सी शोधत होतो! आणि त्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात तिथे बॉंम्ब ब्लास्ट झाला होता! आपल्याला तिथे अजून उशीर झाला असता तर???!!! कल्पनाही करवत नव्हती.
आपल्या बरोबर, हॉटेलात आजूबाजूला असणार्‍यांपैकी तर कोणी त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सापडले नसतील? नोव्हेंबरच्या सकाळच्या धुकंभरल्या थंडीतही मला घाम फुटला होता. काही सुचत नव्हते!
आमचे ते दोन मित्र व आम्ही तिघीजणी यांची सायलेंट कॉंन्फरन्स झाली. ''पेपर देखा क्या? '' ''हां यार, बाल बाल बचे।'' ''चूप! कोई कुछ नही बोलेगा ।'' ''हां, यह भी सही है, यदी औरोंको पता लगा तो....स्पेशली सर को....।'' ''देखो, अपना चेहरा जरा ठीक करके जाना औरोंके सामने.... नही तो पूछेंगे ।'' ''हां रे.... '' आमची धेडगुजरी कॉन्फ़रन्स संपली. दिल्लीच्या घटनेमुळे बाकी स्थलदर्शनाला गुंडाळून पुढच्या टप्प्याला, म्हणजेच आग्रा - मथुरेला जाण्याचे ठरले. जाताना आमची बस कॅनॉट प्लेसवरून गेली. खिडक्यांच्या काचांतून मुंड्या बाहेर काढायचेच ते काय शिल्लक ठेवून समस्त सहाध्यायींनी बॉंम्ब ब्लास्टच्या जागेचे दर्शन घेतले. ''ए तूने देखा क्या, वह दूकान कितनी जली हुई दिखायी दे रही थी ना? '' एक वर्गमैत्रीण दुसरीला मोठ्यानं विचारत होती. मी मात्र मनातल्या मनात ''देवा, वाचवलंस रे बाबा! आता पुन्हा अशी चूक करणार नाही!! '' हेच पुटपुटत बसले होते!
-- -- अरुंधती
(वरील घटना जरी 'कथा' म्हणून लिहिली असली तरी सत्यघटना आहे.)

10 comments:

 1. Good One Arundhati AKA Iravati...!!!

  ReplyDelete
 2. ताई,
  तुमचा अनुभव वाचून, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि मुंबई बॉम्बस्फोट ह्यावेळी ऐकलेल्या/वाचलेल्या अशाच अनुभवांची आठवण झाली. 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.'

  ReplyDelete
 3. कैल्या, तुमचं ब्लॉग वर स्वागत! तुम्हाला लेख आवडला व तसे कळवलेत ह्याबद्दल मन:पूर्वक आभार!

  ReplyDelete
 4. विद्याधर, परवा जर्मन बेकरीला, कोरेगाव पार्कला जेव्हा बॉम्बस्फोट झाला व अनेक युवा युवती हकनाक आपला जीव गमावून बसले तेव्हा का कोण जाणे, मला आमची ती दिल्ली टूर व ती सायंकाळ आठवली. जराशी विस्मृतीत गेलेली ती सायंकाळ आयुष्यात बरेच काही शिकवून गेली! प्रतिसादाबद्दल आभार! :-)

  ReplyDelete
 5. अर्ध्या तासावार काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणायला हवे गं.... बापरे! मांडणी आवडली.:)

  ReplyDelete
 6. हो गं, अगदी तसेच म्हणावे लागेल! तेव्हा तर जाम घाबरगुंडी उडालेली!!!! असो. प्रतिसादाबद्दल आभार! :-)

  ReplyDelete
 7. हा लेख पूर्ण वाचला नाही अजून. त्यावर प्रतिक्रिया देईनच.

  तत्पूर्वी, ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननिमित्त आयोजित प्रतिभेचा ई-आविष्कार स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळाल्याबद्दल अभिनंदन.

  ReplyDelete
 8. धन्यवाद देवदत्त! :-)

  ReplyDelete
 9. माझी ही पोस्ट वाचायची कशी राहून गेली काय माहित. खूप छान लिहिलं आहेस. बाप रे.. कल्पनाही करवत नाहीये..

  आणि विजेतेपदाबद्दल अभिनंदन. कसली स्पर्धा होती नक्की? सॉरी मला खरंच माहित नाहीये.

  ReplyDelete
 10. हेरंब, सध्या पुण्यात जे ८३वे मराठी साहित्य संमेलन सुरु आहे त्यात ह्यावेळी ई-स्पर्धा ठेवण्यात आली होती... प्रतिभेचा ई-आविष्कार म्हणून! त्यातील 'मित्र मैत्रिणी' ह्यांसाठी उखाणे लिहा स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला! कालच निकाल जाहीर झाले!
  आणि ह्या पोस्ट बद्दल म्हणशील तर 'आपण तिथं असतो तर' ही कल्पनाच फार घाबरवून टाकणारी होती. जे लोक गेले, जखमी झाले त्यांबद्दल तर वाईट वाटत होतेच, शिवाय हे सर्व आपण स्वत:च्या हातांनी स्वत:वर ओढवून घेतले आहे, ही जाणीव अस्वस्थ करणारी होती!

  ReplyDelete