कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र.
मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात. पेठी वातावरणातून एकदम ''आंतरराष्ट्रीय'' वातावरणात आल्यावर पचवायचे सर्व धक्के मी हळूहळू पचवत होते. रोजच काहीतरी नवीन. ह्या कॉलेजमधली लोकांची वागण्याची - बोलण्याची पद्धत, वेष, राहणीमान, जीवनशैली.. सगळेच माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांपेक्षा वेगळे होते. छोट्या तळ्यात पोहायची सवय असावी आणि कोणीतरी अचानक समुद्रात भिरकावून द्यावं अशी काहीशी होती माझी अवस्था. तसे आजूबाजूला मराठी चेहरे होते मनाला आधार द्यायला... पण तेही माझ्यासारखेच चाचपडत होते. पहिल्यांदाच आम्ही आशियाई, आफ्रिकन, मध्य-पूर्वेकडच्या संस्कृती व व्यक्तींना एका ठिकाणी बघत होतो. इराणी, आफ्रिकन, अरेबिक, ऑस्ट्रेलियन, भारतीय लोकांची आमच्या वर्गात खिचडी होती नुसती!
आमच्या वर्गात कृष्णवर्णीयांचा तर एक मोठाच्या मोठा ग्रुपच होता. प्रथमच मी कृष्णवर्णीय मुलामुलींना एवढ्या जवळून पाहत होते. त्यांची भली थोरली धिप्पाड शरीरयष्टी, काळा - तुकतुकीत शिसवी वर्ण, त्या पार्श्वभूमीवर चमकणारे दात व डोळे, कुरळे केस (मुलींच्या त्या बारीक वेण्या व त्यात गुंफलेले रंगीबेरंगी मणी), उंच देहकाठी, त्यांच्या अवतीभवती दरवळणारा, नाकाला झिणझिण्या आणणारा परफ्यूम व त्यांचा स्वतःचा एक शरीरगंध..... शेजारच्या बाकावर कोणी कृष्णवर्णीय बसला असला की सुरुवातीला जरा भीतीच वाटायची... पण मग हळूहळू लक्षात आले, की हेदेखील आपल्याच सारखे आहेत. भले त्यांची भाषा, उच्चार, राहणी, संस्कृती सगळं भिन्न असेल... पण तेही नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. भीड थोडी थोडी चेपू लागली. वर्गात एकमेकांना हलकेच 'हाय', 'हॅलो' करण्यापर्यंत, कॉलेजच्या आवारात दिसल्यास स्मिताची देवाण-घेवाण करण्यापर्यंत मजल गेली. त्यांच्यापैकी कोणी तासाला आपल्या शेजारी बसले की तासभर टेन्शनमध्ये काढणेही संपले. उलट नोटस घेताना एखादे वाक्य, मुद्दा गळला तर एकमेकांच्या वह्यांत डोकावून पाहिले जाई.
आमच्या कॉलेजच्या आवाराचे, इमारतींचे एक वैशिष्ट्य होते. आवाराचा आकार एवढा लहान होता, की दिवसातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला अनेकदा सामोरे जायचा. वर्ग, कॉरिडॉर्स, लायब्ररी, कॅन्टिन, ऑफिस .... कोठे ना कोठेतरी तुम्ही त्या व्यक्तीला भेटणारच! त्यामुळे आम्हाला आमच्या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये शिकणारे इतर शाखांचे विद्यार्थीही ओळखीचे झाले होते. कॉलेजमध्ये सर्व संस्कृतींच्या विद्यार्थ्यांना आपलेसे वाटावे म्हणून वेगवेगळ्या संस्कृतींचे विद्यार्थी आपापली नृत्ये, वेषभूषा, खाद्यप्रकार, गीते ह्यांमधून आमची त्यांच्या संस्कृतीशी ओळख करून देत. आफ्रिकन वंशाच्या मुलांनी सादर केलेल्या अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याचे स्मरत आहे. तरीही भिन्नता ही होतीच!
सर्व कृष्णवर्णीय विद्यार्थी तसे आपापल्या कळपातच असायचे. त्यांना एक तर इंग्रजी बोलायलाही नीट जमायचे नाही, आणि ते इंग्रजीतून बोलले तरी त्यांचे उच्चार आम्हाला झेपायचे नाहीत. त्यामुळे जरी मैत्रीचे वातावरण असले तरी एक अदृश्य रेषा असायची आमच्यामध्ये. आणि ती रेषा न ओलांडण्याचा अलिखित नियमच होता म्हणा ना!
कॅलेब मात्र ह्या सर्वाला अपवाद होता. जात्याच गमती, बोलघेवडा, थोडा आगाऊ आणि तरतरीत. दिसायला इतर कृष्णवर्णीय मुलांसारखाच असला तरी अंगकाठीने सडसडीत, हुशार व चपळ होता. इतर मुले-मुली इथियोपिया, सुदान येथील होती, तर कॅलेब आपण केनियातून आलोत असे सांगायचा. कडक राहायचा. ते चट्टेरी-पट्टेरी, रंगीबेरंगी शर्टस घालून मी त्याला कधीच पाहिले नाही. बहुतेक वेळा पांढरा शुभ्र शर्ट व कडक इस्त्रीची पांढरी पँट. वर्गात शिक्षकांना सारखे प्रश्न उपस्थित करायचा, शंका विचारायचा. मोकळ्या तासाला किंवा दोन तासांच्या मधल्या मोकळ्या वेळात आमच्या शेजारी बसून आमची ओळख करून घेणे, स्वतःविषयी सांगणे हा तर त्याचा आवडता टाईमपास! सुरुवातीलाच त्याने हिंदीत बोलून आम्हाला थक्क केले होते. ''मेरा नाम कॅलेब है, मै केनियासे आया हूं, क्या तुम मुझसे दोस्ती करोगी? '' माझ्या सर्व मैत्रिणी चाट पडायच्याच काय ते शिल्लक! अर्थात तो हे सर्व संवाद वर्गातील प्रत्येक मुलीला गाठून पोपटाप्रमाणे म्हणायचा! आम्हालाही त्याच्या ह्या धार्ष्ट्याची मजा वाटू लागली होती. त्याला स्वतःत एवढा आत्मविश्वास होता की समोरची पोरगी आपल्याला नाकारणे शक्यच नाही अशीच त्याची समजूत होती. मग काय! कॅलेब कधीही येणार, तुम्ही इतरांशी गप्पा मारत असलात तरी तुमच्या ग्रुपमध्ये येऊन बिनधास्त बसणार, स्वतःची चार मते सुनावणार, इतर मुलींशी दोस्ती करण्याचा प्रयत्न (उगाचच) करणार हे ठरून गेले होते. पोरींनाही त्याच्या ह्या 'फ्लर्टिंग'ची इतकी सवय झाली होती की आपला चेहरा कसाबसा कोरा ठेवून त्या कॅलेबची सर्व मुक्ताफळे शांतपणे ऐकून घेत आणि मग नंतर खो खो हसत असत. मजा यायची.
एक दिवस कॅलेब भेटला तेव्हा खूप आनंदात दिसत होता. उत्तेजित होऊन जवळपास उड्याच मारायचे ते काय शिल्लक होता म्हणा ना! त्याचे हिंदी आम्हाला आणि आमचे हिंदी त्याला एव्हाना व्यवस्थित कळू लागले होते. ''कॅलेब, क्या बात है यार? बहुत खुश दिख रहा है! '' त्यावर तो उद्गारला, ''मुझे पिक्चरमें काम करनेका मौका मिला है।'' आम्हाला तर सुरुवातीला खरेच वाटले नाही. विचार आला, कशावरून हा नेहमीप्रमाणे लंबे लंबे छोडत नसेल! तसा तो किती बाताड्या होता हे आम्हाला चांगले ठाऊक होते. तरी आम्ही विचारलेच, ''कौनसा पिक्चर रे कॅलेब? ''
त्यावर त्याने दिलेले उत्तर खरोखरच आश्चर्यात टाकणारे होते. गेले वर्षभर तो ज्यांच्याकडे हिंदीच्या शिकवणीला जात होता त्यांच्याकडे एका मूव्ही युनिटची माणसे मराठी बोलू शकत असणाऱ्या आफ्रिकन मुलाच्या शोधात आली होती आणि त्यांना कॅलेब गवसला होता.
''अब तुम्हें मेरी मराठी रोज सुननी पडेगी, और सुधरनीभी पडेगी ।'' त्याने थाटात आम्हां मराठी पोरींना आज्ञावजा सूचना केली. आम्ही ''जी हुजूर, '' म्हणून त्याला लवून कुर्निसात करायचेच ते काय बाकी ठेवले.
कॅलेबची ही 'न्यूज' कॉलेजमध्ये पसरायला फारसा वेळ लागला नाही. पण बहुसांस्कृतिकत्व मिरवणाऱ्या कॉलेजमध्ये मराठी चित्रपटाला कोण विचारणार? कदाचित बॉलिवुडचा चित्रपट असता तर गोष्ट वेगळी असती. पण इथे मराठीचा गंधही नसलेली प्रजावळ! त्यामुळे कॅलेबची न्यूज 'हिट' न ठरता तसा फुसका बार ठरली. अगदी तो जब्बार पटेल ह्यांसारख्या कसलेल्या, नामवंत दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहे हे कळले तरी!
कॅलेब जरासा हिरमुसलेला दिसला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे ह्याबाबतीत फारसे कौतुक झाले नव्हते. पण तरी त्याचा मराठी शिकण्याचा उत्साह तसूभरही कमी नव्हता. कधीही रिकामा वेळ मिळाला की तो आमच्या जथ्यात येऊन त्याच्या मराठीचे प्रयोग आमच्यावर करत असे. मग सर्व पोरी त्याचे उच्चार दुरुस्त करण्याची खटपट करत. तेवढीच घटकाभर करमणूक!
कॅलेबचा चित्रपट आला आणि गेला. मी अनेकदा ठरवले, ''पाहायचाच, '' म्हणून! पण तेव्हा काही जमले नाही. चित्रीकरणाच्या दरम्यान कॅलेब कॉलेजमध्ये गैरहजर असल्याने त्याच्या अनुपस्थितीचीही सवय झाली. तो आमच्या कॉलेजचा एक अलिखित नियमच होता म्हणा ना... दृष्टीआड सृष्टी.... त्या वर्षीचे निकाल लागले. मला डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे व विद्यापीठात गुणवत्ता यादीत आल्यामुळे मी हवेत होते. एक दिवस अचानक रस्त्यात कॅलेब भेटला. ''तुला किती मार्क्स मिळाले? '' मी विजेत्याच्या बेफिकिरीत विचारले. कॅलेबच्या चेहऱ्यावर क्षणिक विषाद चमकून गेला. ''माझे काही विषय राहिलेत, '' त्याने इंग्रजीत उत्तर दिले. जरा वेळ शांतता होती, मग तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलने खांदे उडवून म्हणाला, ''बट लाईफ गोज ऑन, राईट? '' आणि एक रिकामे हसू माझ्या दिशेने फेकून लांबच लांब ढांगा टाकत दिसेनासा झाला.
एकदा आम्ही तिघी-चौघी मैत्रिणी कॅन्टिनला चकाट्या पिटत असताना आपल्या नेहमीच्या आवेशात कॅलेबने ग्रुपमध्ये एंट्री घेतली. नेहमीसारख्याच लंब्याचवड्या बाता! तेव्हा आमचा बोलण्याचा विषय चालला होता की कोणाला कोणकोणत्या भाषा येतात. माझी एक अरेबियन देशात वाढलेली मैत्रीण सांगत होती की तिला अमहारिक ही इथियोपियन भाषा एका इथियोपियन मैत्रिणीमुळे थोडी थोडी येते. लगेच कॅलेबने कान टवकारले व तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली. कॅलेबलाही ती भाषा चांगली येत होती. मैत्रिणीने शेवटी त्याला कंटाळून सांगितले, ''हे बघ, मला त्या भाषेतलं जास्त काही कळत नाही व बोलताही येत नाही. मला फक्त त्यात ''आय लव्ह यू'' कसं म्हणायचं हे माझ्या मैत्रिणीनं शिकवलंय.... '' सभोवताली हास्याचा एकच फवारा उडला. पण कॅलेब मात्र गंभीर होता. ''सांग काय म्हणतात आय लव्ह यू ला अमहारिक भाषेत! '' त्याच्याबरोबर इतर मैत्रिणीही माझ्या अरेबिक मैत्रिणीला गळ घालत होत्या. तसे तिने थोडेसे लाजत मुरकत ''या हबीबी, आना बेहिबाक'' असा काहीसा अस्फुट उच्चार केला व तेथून पळून गेली. आम्ही हसत हसत ते शब्द घोकले (म्हणूनच लक्षात राहिले! ).... न जाणो कधी उपयोगी पडतील!
कॅलेब मात्र आमच्या हसण्या-खिदळण्यात सामील नव्हता. त्याला काय झाले होते कोणास ठाऊक! आजकाल असाच गप्प गप्प असायचा. पण ह्या रावजीला त्याची जरा जास्त विचारपूस केली की काहीतरी भलतेच वाटायचे! त्यामुळे आम्ही पोरींनी कळत असूनही त्याच्या मूडची फार दखल घेतली नाही. एकदा विद्यापीठात मी व माझी अरेबिक मैत्रीण कामासाठी गेलो होतो तिथे हा भाऊ अचानक टपकला. मैत्रिणीला म्हणाला, ''तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. '' मैत्रीण सॉलिड टेन्शनमध्ये. कारण गेले एक-दोन आठवडे हा सारखा तिच्या मागे-पुढे करत असायचा. ''काय झालं? '' मी तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारले. ''नंतर बोलू... आधी ह्याला कटवू, '' ती फुसफुसली. दोघींनीही मग गोड गोड चेहऱ्याने त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याला तिने ''नंतर बोलू, '' म्हणून कटवले. मग वैतागून मला म्हणाली, ''त्या दिवशी मी ते अमहारिकमध्ये बडबडायला नको होतं यार! तेव्हापासून हा पोरगा विचित्र वागतोय माझ्याशी... जिथे जाते तिथे हा हजर असतो. सारखं बोलायचा प्रयत्न करतो. बळेच पिक्चरला जाऊ, फिरायला जाऊ असे म्हणतो. कॅन्टिनमध्ये माझे बिल परस्पर देऊन टाकतो. तुला काय सांगू?!!!! '' त्यापुढे आम्ही कॅलेबला टाळणे ह्या कलेत निपुणता मिळवली. खूप कष्ट पडले त्यासाठी. पण झाले शक्य!
परवा ''मुक्ता'' पिक्चर पाहताना अचानक कॅलेबचा चेहरा पडद्यावर झळकला आणि हे सर्व आठवले. पिक्चरमध्ये त्याने मन लावून काम केल्याचे कळत होते. उच्चार त्याला नाही जमले तेवढे नीट. पण त्याचा हा पहिलावहिला प्रयत्न तर वाखाणण्यासारखा होता. पुढे त्याला बॉलीवूडमध्ये त्याच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे प्रवेश मिळाला नसावा कारण त्या चित्रपटानंतर तो अन्यत्र कोठेच झळकलेला दिसला नाही. आज तो कोठे आहे हेही माहीत नाही. पण अजून लक्षात आहे त्याचे ते मनमोकळे हास्य, स्वतःवर अफाट विश्वास, दुनियेची ऐसी की तैसी अशा वृत्तीची चालायची ढब, त्याचे हिंदी - मराठी बोलण्याचे अथक प्रयत्न आणि जगण्याची मस्ती! कॅलेब, तू जिथे कोठे आहेस, तुला खूप शुभेच्छा!
-- अरुंधती
सुपर्ब!! मस्त झालाय लेख. कॅलेब अगदी डॊळ्यासमोर उभा केलाय. ओघवती भाषा असल्याने कुठेही न अडखळता पुर्ण वाचून काढला हा लेख..
ReplyDeleteमस्त झालाय लेख..... खरयं महेंद्रजींचे कॅलेब अगदी डोळ्यासमोर उभा रहातोय..
ReplyDelete’मुक्ता’ सिनेमा पाहिलेला असल्यामुळेही असेल पण लेख अगदी भावला....
धन्यवाद महेंद्रजी! एकदा लिहायला (टंकायला) लागल्यावर त्या विषयानेच हा लेख माझ्याकडून लिहून घेतला. मला फक्त लेख सुरु केल्याचे आणि संपविल्याचे आठवते आहे! :-)
ReplyDeleteतन्वी, तू पाहिला आहेस हा चित्रपट? ग्रेट! आता मला वाटते की आपण तेव्हाच तो चित्रपट पाहून त्याचे कौतुक करायला हवे होते! बघू...कोणास ठाऊक! पुन्हा भेटला कधी तर नक्की आवर्जून कौतुक करणार आहे मी त्याचे! :-) प्रतिसादाबद्दल धन्स! :-)
ReplyDeleteव्यक्ती तितक्या प्रकृती...
ReplyDeleteमी अजून पहिला नाहीये सिनेमा, पाहीन आता. उत्सुकता वाटतेय!
मी पहिल्यांदा जेव्हा "मुक्ता' पाहिला तेव्हापासून कॅलेबच्या व्यक्तीमत्वाविषयी उत्सुकता होती. कधीतरी कोणत्यातरी लेखात कॅलेब पुण्यातीलच कोणत्यातरी कॉलेजात असल्याचेही वाचले होते; मात्र आज खऱ्या अर्थाने तो भेटला. खूपच छान पोस्ट झाली आहे. एकदम ओघवती. स्टार्ट टू फिनीश तोन ऑब्स्टॅकल्स. मस्तच...
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteविद्याधर, आता पहाच सिनेमा आणि सांगा! :-)
ReplyDeleteप्राजक्ता, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! खूप लोकांना त्याच्याविषयी उत्सुकता होती हेही मला आत्ताच कळते आहे. असो. ह्या पोस्ट च्या निमित्ताने तो सर्वांना भेटला हेही नसे थोडके! :-)
ReplyDeleteआज पहिल्यांदा या ब्लॉगवर येतोय... त्याचे कारण म्हणजे मुक्ता आणि कॅलेबचा उल्लेख... :)
ReplyDeleteमाझ्या अतिशय आवडणाऱ्या चित्रपटापैकी हा एक. कॅलेब तुमचा वर्ग मित्र होता हे ऐकून तर अजुनच आनंद झाला. त्याचे उच्चार तितके उत्तम झालेले नसले तरी गिटार घेतलेला डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर भाषा समजत नसतानाही केलेला प्रत्येक क्षण मला भावला.
आजही तो डोळ्यासमोर आहे.... आता बहुदा हा चित्रपट लवकरच बघावा लागणार... :)
ब्लॉगवर स्वागत रोहन! आता नक्की बघा मुक्ता परत आणि सांगा ह्यावेळी कसा वाटला ते! प्रतिसादाबद्दल धन्स! :-)
ReplyDeleteछान लिहीलय, बरेच प्रस्सन्ग तर वाचकान्वर, ते त्या भुमिकेत अस्ते तर कसे वागले अस्ते असा विचार करायला लावणारे, वाचकान्वर सोडलेले! :)
ReplyDeleteआपला
LT
धन्स लिंबू! :-) त्या त्या वयात, वेळी जसं सुचेल तसं वागतो आपण आणि मग त्याची चिकित्सा! :-)
ReplyDeleteखुपच ओघवत लिहील आहे..सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे केले आहेत...काकांशी सहमत...
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत, सागर! जसजसं आठवत गेलं तसतसं लिहित गेले....म्हणूनच कदाचित त्या स्मृतींप्रमाणे लिखाणही ओघवते झाले!! :-) प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
ReplyDelete