परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! ''
''नको नको, ताई! '' तिच्या स्वरात अजिजी होती, '' पुन्हा कधीतरी येईन ना मी! आज इथंच बोलू की! '
'
'
रत्ना. आमच्याकडे ती पहिल्यांदा कामावर रुजू झाली तेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन आणि ती कॉलेजच्या पहिल्या वर्षाला! किरकोळ शरीरयष्टी, सावळा वर्ण, लांबसडक केस आणि चेहर्यावर हसू असलेली तिची ती ठेंगणी मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी येते. कॉलेजची फी भरायला तिच्या आई आणि भावाने नकार दिला म्हणून ताठ मानेने, मिळालेल्या पगारातून पुढे शिकायचे ह्या जिद्दीने ती आमच्या घरी माझ्या नोकरी करणार्या आईला वरकामात मदत करायला आली आणि जणू आमच्या घरचीच होऊन गेली. भल्या पहाटे उठून घरात पडेल ते काम करायचे, भावाला व आईला व्यवसायात मदत करायची, कॉलेजच्या वेळा सांभाळायच्या, आमच्या घरचे काम आणि इतर दोन घरची कामे असे सर्व उरकून उरलेल्या वेळेत अभ्यास करणारी रत्ना. मला शाळेत सोडायला - आणायला येणारी, मी तिच्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त केल्यावरही राग न मानणारी हसतमुख रत्ना. कामाला वाघ असणारी, शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची स्वप्ने उरी बाळगणारी अल्लड रत्ना. दिसायला काळीसावळी आणि तिच्या पायात जन्मजात व्यंग होते म्हणून तिच्या घरचे सुरुवातीपासून तिचा राग राग करायचे. मोठ्या दोन बहिणींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या आणि व्यंगामुळे रत्नाला नीट स्थळेही चालून येईनात. रत्नाची त्यांच्या जातीबाहेर लग्न करायची तयारी होती, पण तिच्या भावाला व आईला ते मान्य नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे तिचे वडील अकाली निवर्तल्यानंतर ती घरात एकटीच पडत गेली. तरीही तिने घरच्यांच्या लग्न करण्याच्या आग्रहाला बळी न पडता नेटाने आपले शिक्षण सुरू ठेवले होते. आमच्या घरी सर्वांना तिच्या ह्या जिद्दीचे खूप कौतुक वाटे. त्यामुळे तिला अभ्यासात, पुस्तके मिळवण्यात किंवा फी भरायला काही अडचण आली तर ती हक्काने आमच्याकडे मदत मागायला येत असे.
कालांतराने, मजल दरमजल करीत रत्ना एकदाची बी. ए. झाली. तिच्या घरी कोणालाच त्याचे फारसे कौतुक नव्हते. ना त्यामुळे भावाला कपड्यांना इस्त्री करून देण्याच्या त्याच्या व्यवसायात मदत होणार होती, ना आईच्या फुलांच्या व्यवसायात बरकत येणार होती! पण रत्ना आपल्या निकालावर खूप खूश होती. त्या खुशीतच ती मला एकदा त्यांच्या घरी घेऊन गेली. तिचे ते चंद्रमौळी घर, त्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत सहा माणसांचा रेटलेला संसार पाहिल्यावर मला तेव्हा एवढ्या छोट्या जागेत इतकी माणसे मावतात तरी कशी ह्याचेच नवल वाटले होते. त्या घरात रत्नाकडे होणारे दुर्लक्ष पाहिल्यावर माझी आई तिला सारखी आमच्याकडे पोळीभाजी खाऊन घ्यायचा आग्रह का करते ते जाणवू लागले होते. पण रत्नाला जणू आता ह्या वातावरणाची, वागणुकीची सवयच झालेली! गेली अनेक वर्षे तिने एकच स्वप्न उराशी बाळगले होते. तिला शिक्षिका होऊन शाळेत नोकरी करायची होती. आणि त्यासाठी तिचे पुढचे ध्येय होते बी. एड. पूर्ण करणे!
पण पुन्हा समोर दोन समस्या उभ्या ठाकल्या. पहिली समस्या म्हणजे बी. एड. प्रवेशाच्या फीसाठी लागणारा पैसा आणि दुसरी म्हणजे फायनलला तिला मिळालेला काठावरचा सेकंड क्लास. शेवटी तिने बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायचे ठरवले. मुलांमध्ये काम करायची तिला जबरदस्त हौस होती. त्यांना शिकवावे, घडवावे, त्यांच्यात रमून जावे असे तिला मनापासून वाटायचे. मग काय! बालवाडी प्रशिक्षणासाठी तिने तिचे सोन्याचे कानातले विकून पैसे उभे केले. पुढचे शिक्षण चालू ठेवायचे तर तिला अर्थार्जन करणे भागच होते. शहरातील सुप्रतिष्ठित समाजकारणी व राजकारणी अप्पाजी आमच्या परिचयातील होते. त्यांच्यापाशी रत्नाला चांगली नोकरी लावून देण्याविषयी शब्द टाकल्यावर त्यांनी तिला चिठ्ठी व तिची प्रमाणपत्रे घेऊन एक दिवस भेटायला बोलावले. तिथेच तिची ओळख सुभानरावाशी, अप्पाजींच्या धाकट्या लेकाशी झाली.
अप्पाजींच्या ओळखीने रत्नाला बर्यापैकी नोकरी तर मिळाली, पण सुभानरावाच्या आणि तिच्या भेटीगाठीही वाढू लागल्या. एक दिवस अप्पाजी आमच्याकडे 'सहज'च भेटायला म्हणून आले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर त्यांनी थेट रत्नाची चौकशी करायला सुरुवात केली. त्यांना कारण विचारले तेव्हा त्यांनी नापसंतीने सांगितले की सध्या रत्ना आणि सुभान्या एकत्र भटकत असतात म्हणून! अप्पाजींना ही जवळीक अजिबात मान्य नव्हती. त्यांना रत्ना जातीने आणि परिस्थिती, पैसा, मान इत्यादींच्या निकषावर कोणत्याच बाबतीत आपल्या लाडक्या सुभानरावासाठी लायक वाटत नव्हती. शिवाय तिच्या पायातील व्यंगही होतेच! रागावलेल्या अप्पाजींची कशीबशी समजूत घातल्यावर ते एकदाचे घरी गेले, पण ''त्या रत्नाला समजावा, ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, '' अशी धमकी देऊनच!
दोनच दिवसांनी रत्नाला सांगावा देऊन आमच्या घरी सुभानरावाविषयी विचारणा करण्यासाठी बोलावून घेतले गेले. रत्ना आपल्या निवडीवर व निर्णयावर ठाम होती. ''सुभानराव आणि मी लग्न करायचं ठरवलंय. त्यांनी तसं वचन दिलंय मला. मी अप्पाजींच्या धमक्यांना घाबरणार नाही! सांगा त्यांना तसं! '' खरं तर सुभानरावाची कथा वेगळीच होती. सुप्रतिष्ठित, सधन घरातील वाया जाऊ पाहत असलेला तो लाडावलेला मुलगा होता. घरच्या दुधाच्या धंद्याकडे, शेतीकडे बघायचा तसा थोडाफार! पण त्याचा जास्त वेळ बाईक उडवण्यात, चकाट्या पिटत नाक्यावर बसून टवाळक्या करण्यात आणि पैसे लावून जुगार खेळण्यात जायचा. शिक्षणही जेमतेम दहावीपर्यंत झालेलं. हां, मात्र दिसायला तसा रुबाबदार होता आणि राहायचाही झोकात. गळ्यात सोन्याचा रुंद गोफ, हातात कडं, कायम कडक इस्त्रीचे आधुनिक ढंगाचे कपडे, परफ्यूम.... रत्ना पूर्ण गुरफटून गेली होती त्याच्यात. सुभानरावात काही दोष आहेत, तो दिसतो तितका साधासुधा नाही, सरतेशेवटी तो आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, सध्या तो वडिलांनी त्याचे पंख जरा कातरलेत म्हणून बिथरलाय आणि त्यांना उचकवायला अशा हरकती करत आहे हे मानायची तिची तयारीच नव्हती! तो जे सांगेल ते ती आनंदाने करत होती. इतके, की तिचा कोर्सही अर्धवट सोडला होता तिने! अप्पाजींच्या नाकावर टिच्चून दोघंही बरोबर भटकायची! तिला समजावायला गेल्यावर तर तिने आमच्याकडे येणेच बंद करून टाकले! रस्त्यात दिसली तरी ओळख देईनाशी झाली.
आणि एक दिवस अचानक रत्ना अस्ताव्यस्त, विस्कटलेल्या अवतारात आमच्या दारात येऊन उभी राहिली. डोळे रडून रडून सुजलेले, चेहर्यावर वेडसरपणाची झाक.... तिची अशी अवस्था पाहून आम्हाला धक्काच बसला! सुभानरावाने तिला फसवून त्याच्या जातीतल्या, श्रीमंत घरातल्या दुसर्याच पोरीशी लग्न केले होते.
''मला पार लुटलं हो त्यानं! पार फशिवलंन! माझी इज्जत गेली, आब्रू गेली.... आता मी काय तोंड दाखवू? कशी घरी जाऊ? '' तिचा तो घायाळ टाहो काळीज चिरून जात होता. आईने तिला कसंबसं सावरलं. ह्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं आश्वासन दिल्यावर मग ती जरा शांत झाली. उध्वस्त अवस्थेतच तिच्या घरी परतली. एकदा रॉकेल अंगावर ओतून घेतले असेच निराशेच्या भरात! पण तिची भाचरे येऊन बिलगली तिला तसा तिचा बांध फुटला. काही महिन्यांनी परिस्थितीतून जरा सावरल्यानंतर सुभानरावावर फसवणुकीचा दावा ठोकता येईल का, ह्यासाठी ती आमच्या ओळखीच्या एका वकिलांना भेटून आली. पण त्यांनी तिला स्पष्ट शब्दात अशा दाव्यांमध्ये खर्च होणारा पैसा, वेळ व मनस्ताप -बदनामीची कल्पना दिल्यावर तिने सुभानरावावर दावा करण्याचा विचार रहित केला. शिवाय अप्पाजींचा राजकीय प्रभाव बघता अशी केस कोर्टात उभी राहील की नाही ह्याबद्दलही शंका होती.
''आता काय करणार आहेस? '' माझ्या आईने तिला विचारले.
''काय करणार वैनी! अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करीन म्हणते. बघूयात देवाच्या मनात तरी माझ्यासाठी काय आहे ते! '' रत्नाच्या स्वरात कडवटपणा ठासून भरला होता.
एका अनामिक जिद्दीने भारलेल्या कडवटपणाने रत्नाने तो कोर्स पूर्ण केला खरा, पण मधल्या वर्षा-दोन वर्षांच्या काळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून तिने स्वतःची पार वाताहत करून घेतली. रोज कसलेतरी उपास करायची. खाण्यापिण्याकडे लक्षच द्यायची नाही. आधीच तिची किरकोळ शरीरयष्टी! आता तर ती अजूनच कृश दिसू लागली. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. माझ्या आईला तिची जास्तच काळजी वाटू लागली. डॉक्टरांकडे जबरदस्तीने घेऊन गेल्यावर आणि त्यांनी तिला भले मोठे लेक्चर दिल्यावर मग कोठे ती जरा ताळ्यावर येऊन वागू लागली.
आताशा तिची आमच्याकडे पूर्वीसारखी ये-जा राहिली नव्हती. बघता बघता तिचा अल्लडपणा ओसरून चेहर्यावर, वागण्यात एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. जणू मोकळेपणाने हसायचे ती विसरूनच गेली होती. अशीच एके दिवशी ती अवचित संध्याकाळी भेटायला म्हणून घरी आली. बोलता बोलता दोन गोष्टी अगदी सहज बोलल्यासारख्या सांगितल्या तिने. पहिली गोष्ट म्हणजे सुभानराव तिला भेटायला आला होता. खास तिची माफी मागायला. त्याच्या लहान बाळाला कसलासा असाध्य आजार झाला होता म्हणे! आणि सुभानरावाला वाटत होते की त्याने रत्नाला जे फसवले त्याचेच हे प्रायश्चित्त आहे! त्यामुळे तो तिची माफी मागायला आला होता.
''मग? तू काय म्हणालीस? '' आईने तिला विचारले.
तशी खांदे उडवीत रत्ना उद्गारली, ''मी काय म्हणणार वैनी!! मी काही एवढी वाईट नाही त्याच्या संसाराला शाप द्यायला. तिथंच माफ करून टाकलं मी त्याला, आणि सांगितलं, पुन्हा चेहरा दाखवू नको म्हणून, नाहीतर पायताणानं हाणून काढेन! '' तिचे ते बोल ऐकल्यावर माझ्या आईच्या तोंडावर हसू फुटल्याविना राहवले नाही.
त्या दिवशी अगदी निघायची वेळ आली तशी रत्ना हळूच म्हणाली, '' मी माझं लगीन ठरीवलंय. ''
त्या खुळ्या पोरीने सुभानराव भेटून माफी मागून गेल्यावर तिरिमिरीत एका बिजवराशी लग्न करायचे ठरविले होते. एके काळी तिचे कोणाशीही लग्न लावायला तयार असणारे तिचे आई-भाऊ ह्या लग्नाविषयी जरा साशंक होते. पण रत्नाचा निर्णय एकदा झाला की तो झालाच! त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तिने त्या माणसाशी आळंदीला जाऊन लग्न केले. लग्नानंतर एकदा आम्हाला ती घरी भेटायला आली तेव्हा तिच्या चेहर्यावर पुन्हा ते सुपरिचित हसू खेळत होते. आईने तिची कौतुकाने खणानारळाने, नवी साडी देऊन ओटी भरली आणि ''एका मोठ्या अरिष्टातून पोरगी सुटली म्हणायची! '' असा सुटकेचा नि:श्वासही टाकला.
पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. लग्नानंतर आठ-दहा महिन्यांतच रत्ना नवर्याच्या जाचाला, मारहाणीला आणि व्यसनाला कंटाळून पुन्हा माघारी आली. घरी समजूत काढायला ह्या खेपेला तिची आईही नव्हती. लेकीच्या लग्नानंतर दोनच महिन्यात ती परलोकवासी झालेली. भावाच्या घरात, त्याच्या संसारात आपला अडथळा होऊ नये असा आटोकाट प्रयत्न करत, स्वतःला आक्रसून घेत पुन्हा एकदा रत्ना एका बालवाडीत ''ताई'' म्हणून रुजू झाली.
अवचितपणे तिला रस्त्यात भेटल्यावर ह्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मधल्या वर्षांमध्ये बरेच काही घडून गेले होते. त्या घटनांच्या अंगखुणा वागवत रत्ना माझ्यासमोर आज उभी होती.
''काय करतेस सध्या तू? '' ह्या माझ्या प्रश्नावर मंदसे हसत रत्ना उत्तरली, ''काय करणार ताई! तीच ती शाळेतली नोकरी. आणि बी. एड. पूर्ण करते आहे! ''
''आँ?!!! '' आता आश्चर्यचकित होण्याची माझी खेप होती.
'' तुम्हाला नवल वाटलं असेल ना ताई? आता ह्या वयात मी काय शिकणार म्हणून! पण मला सारखं वाटायचं, आपण बी. एड. करायचं स्वप्न अर्धवट सोडलं ते चांगलं नाही केलं. आता मी ते स्वप्न पूर्ण करत आहे. ''
''आणि घरी? भाऊ काय म्हणतो? '' मी हलकेच विचारले.
''भाऊ? तो काय म्हणणार? त्याची पोरं मोठी झाली आता. ती आपल्या आत्याची बाजू घेतात. त्याला म्हणतात, बाबा, तुम्ही न्हाई शिकलात तर न्हाय, पण आत्याला तर शिकू देत! ''
''वा! गुणी आहेत गं तुझी भाचरं! '' माझ्या तोंडून नकळत कौतुकाची दाद दिली गेली.
''ताई, आईगत माया केली आहे मी त्यांच्यावर! आता तीच माझी लेकरं! '' रत्नाचा स्वर पुरता कौतुकात भिजला होता.
''खरंच, चलतेस का गं घरी? '' मी पुन्हा एकदा न राहवून तिला विचारलं, ''आईला खूप बरं वाटेल तुला भेटून! ''
रत्नाचे डोळे क्षणभर पाणावले. पण मग लगेच तिने स्वतःला सावरले आणि उद्गारली, ''वैनींना माझे नमस्कार सांगा. त्यांना म्हणावं आता ही रत्ना बी. एड. झाल्याचे पेढे घेऊनच तुम्हाला भेटायला येईल! ''
तिला आमचा नवा पत्ता, फोन नंबर देऊन झाल्यावर काही क्षण दोघी तशाच उभ्या होतो. शांत, निःशब्द! मग ती पुन्हा हसली, ''निघते आता ताई! घरी उशीर होईल. '' त्या हास्यात मी उगाचच काहीतरी शोधत राहिले. माझा निरोप घेऊन ती पुन्हा पाय ओढत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या पाठमोर्या मूर्तीकडे मी कितीतरी क्षण तशीच बघत उभी होते. मनात कोठेतरी तिच्यावरच्या अन्यायाविषयीची खंतही होती आणि त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत, सन्मानाने जगू पहाणार्या तिच्या संघर्षाविषयी, तिच्या जिद्दीविषयी कौतुकाची सायही होती. प्रतिकूल परिस्थितीतही आशेचा चंद्रकिरण शोधणार्या, हार न मानणार्या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला आणि मार्गस्थ झाले.
-- अरुंधती
(सत्यकथेवर आधारित)
>हार न मानणार्या तिच्या त्या वृत्तीला मी मनोमन सलाम केला
ReplyDeleteमाझा देखील सलाम !!
Raj Jain यांच्याशी सहमत. काही लोकं अतिशय जिद्दी व जबरदस्त इच्छाशक्ती बाळगून असतात.
ReplyDeletethis is the spirit and life of GARIBI
ReplyDeleteधन्यवाद राज, एनोनीमस आणि भानस! :-)
ReplyDelete