"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं.
माझी मुंडी तिसर्यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली.
वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्या, गुणगुणणार्या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या. पण आज माझे ह्या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष नव्हते. कोर्टरूममध्ये आज पक्षकारांची जास्त गर्दी नव्हती. तरीही आतील मोकळी बाकडी मला जरा वेळ टेकण्यासाठी खुणावत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते.
आज आमच्या मॅडमची, म्हणजे वकील बाईंची एका खास केसची तारीख होती. आणि थोड्याच वेळात वकील बाई त्यांच्या भारताच्या राजकारणातील विख्यात पक्षकाराच्या तितक्याच जगद्विख्यात मातोश्रींबरोबर कोर्टरूममध्ये हजर होणार होत्या. माझी नेमणूक आत कोर्टरूममध्ये त्यांच्या येण्याची वर्दी देण्याच्या कामी झाली होती. त्यामुळे मी आपली कोर्टरूमच्या बाहेरच्या पॅसेजामध्ये एका पायावरून दुसर्या पायावर करत त्यांची अधीरपणे वाट बघत होते.
ह्या आज येणाऱ्या पक्षकार मला आतापर्यंत टी. व्ही., वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींतून माहिती व छायाचित्रांच्या रूपात भेटलेल्या. राजघराण्याची परंपरा, एकेकाळचे बलाढ्य संस्थान, शेकडो वर्षांचा शौर्याचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळात उचललेली प्रगतीची व विकासाची पावले आणि त्या जोडीला असलेले कर्तृत्ववान, तेजस्वी व्यक्तिमत्त्व! शिवाय भारताच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका निभावणार्या ह्या राजस्त्री प्रत्यक्षात कशा दिसत असतील, बोलत असतील ह्याबद्दल नकळत माझ्या मनात खूप उत्सुकता दाटली होती. खरे सांगायचे तर मी त्यांना प्रत्यक्षात भेटणार आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. पण वास्तवातील जगात कधी कधी असे योगही जुळून येऊ शकतात! आम्ही विद्यार्थीदशेत करायच्या सक्तीच्या इंटर्नशिपसाठी आमच्या वकील मॅडमकडे चार-सहा महिन्यांसाठी रुजू होतो काय, ह्याच दरम्यान त्यांच्या अखत्यारीत असलेल्या ह्या ''हाय-प्रोफाइल''केसची सुनावणीची तारीख पडते काय, आणि आमच्या वकील मॅडम आम्हा दोघी मैत्रिणींना त्या केसच्या सुनावणीस हजर राहण्याची परवानगी देतात काय.... सगळेच गमतीशीर! पण आयुष्यात असेही योगायोग येऊ शकतात यावर विश्वास ठेवायला लावणाराच तो दिवस होता!
''आल्या का गं मॅडम?'' मैत्रिणीने पुन्हा एकदा तिच्या आतल्या पोझिशनवरून विचारले. मी पॅसेजच्या दिशेने नजर टाकली तर खरेच आमच्या वकील मॅडम एका देखण्या, वृद्ध बाईंबरोबर येताना दिसल्या. मी लगेच आत वर्दी दिली आणि त्यांना रिसीव्ह करायला सज्ज झाले. त्या बाईंच्या मागोमाग थोडे अंतर राखून अजून दोन तीन सुटाबुटातील माणसे चालत होती. बहुधा त्यांचे सेक्रेटरी व शरीररक्षक असावेत. त्या समोर आल्यावर मी थोडे हसून आमच्या मॅडमच्या 'सर्व व्यवस्थित?'च्या खुणेला नजरेनेच प्रतिसाद दिला आणि त्या दोघींबरोबर आत शिरले. थोड्या वेळातच त्या बाई साक्षीदाराच्या कठड्यात उभ्या राहिल्या. त्यांना तत्परतेने कोणीतरी बसायला खुर्ची आणून दिली. पण त्या उभ्याच होत्या. अंगावर तलम पांढरी शुभ्र कशीदाकाम केलेली उंची साडी, दोन्ही खांद्यांवरून व डोक्यावरून ओझरता पदर, कानात व हातात लखलखणारे हिरे, गळ्यात मोत्याचा सर आणि पायात मॅचिंग उंच टाचांच्या चपला! त्यांची पर्स त्यांचा असिस्टंट सांभाळत होता. वृद्धत्वातही आपले गोरे गुलाबी सौंदर्य, मृदू तेजस्वी कांती आणि चेहर्यावरचे सात्त्विक परंतु राजबिंडे भाव सांभाळणार्या त्या स्त्रीकडे मी मोठ्या कुतूहलाने बघत होते. त्या मंद हास्यामागे काय विचार चालले असतील, कोणत्या चिंता दडलेल्या असतील यांचा अदमास घेत होते. इस्टेट, प्रॉपर्टीसंबंधीच्या आणि कौटुंबिक कलहाचे - मतभेदांचे प्रतिबिंब दाखवणार्या कोर्ट केसेसमध्ये अनेकदा आढळून येणार्या टेन्शनचा लवलेशही त्यांच्या चेहर्यावर दिसत नव्हता. सौम्य शब्दांमध्ये, हळू आवाजात त्यांनी वकिलांनी व कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आमच्या वकील मॅडमने त्यांची साक्ष - उलटतपासणी घेतली आणि थोड्याच वेळात त्यांचे तेथील काम संपले. कोर्टरूममधून निघताना मॅडमने त्यांची आम्हा दोघी ज्युनिअर्सशी ओळख करून दिली. त्यांनी मान हालवून आमच्याकडे बघत हसून आमचे अभिवादन स्वीकारले आणि आपल्या असिस्टंटसोबत आमच्या मॅडमशी बोलत बाहेर जाऊ लागल्या. अर्थात आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी नव्हती! ज्युनिअरशिपचे काही संकेत पाळावेच लागतात ना! शिवाय आत कोर्टरूममध्ये लिपिकाचे डोके खाण्याची जबाबदारी आमच्यावरच असल्याने आम्ही मुकाट तिथेच थांबलो, पण जरा चुटपुटतच!
----------------------------------------------------------------------------------------
''परवा मॅडम कसल्या कडक दिसत होत्या, नै? एकदम टॉप टू टो मॅचिंग!!'' माझ्या मैत्रिणीच्या उद्गारांसरशी मी हातातल्या कागदांच्या चळतीतून डोके वर काढले. आम्ही वकील मॅडमच्या घरातील ऑफिसमध्ये खाली कार्पेटवर फतकल मारून बसलो होतो. मॅडम रात्री साडेसात-आठ वाजताच वरती त्यांच्या फ्लॅटमध्ये निघून गेल्या होत्या. आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये नऊ वाजेपर्यंत बसायची परवानगी देऊन! हो, कारण गेले दोन दिवस आम्ही त्यांना ''आम्हाला 'त्या' केसची कागदपत्रे दाखवा ना मॅडम!! '' म्हणून पुरते छळले होते.... त्याचा परिणाम म्हणून की काय, त्यांनी शेवटी कंटाळून कागदपत्रांची एक मोठीच्या मोठी चळत पाहण्याची परवानगी आम्हाला देऊ केली होती. अर्थातच त्या हाय प्रोफाइल केसचे महत्त्वाचे तपशील त्यात नव्हते! परंतु ज्या प्रॉपर्टीज, इस्टेटीवरून ती केस कोर्टात दाखल झाली होती त्या प्रॉपर्टीज व त्या राजघराण्याच्या भारतात असलेल्या विविध जमिनी, महाल, इमारती, जडजवाहीर इत्यादींची भली मोठी जंत्री त्या कागदपत्रांमध्ये होती. मग काय, जणू खजिनाच हाती लागल्याच्या थाटात आम्ही तेव्हा बऱ्यापैकी गोपनीय असलेली ती माहिती अधाश्यासारखी वाचून काढत होतो.
''मला त्या बाईंचे कानातले हिऱ्याचे टॉप्स फार आवडले! कसले लखलखत होते!!'' इति मी. हो, खोटं कशाला बोलू, त्या रात्री स्वप्नात मला ते लखलखणारे तेजस्वी हिरेच दिसत होते!
''हो, परवापासून बघते आहे, तू सारखी त्या बाईंच्या पेहरावाचीच स्तुती करते आहेस! आपल्या मॅडमदेखील त्या दिवशी कित्ती मस्त मॅचिंग करून आल्या होत्या हे मी चौथ्यांदा बोलते आहे... पण तुझं लक्षच नसतं! '' मैत्रीण फणकारली.
''अगं हो गं, कळलं मला! ए, तू त्या पॅलेसचं वर्णन वाचलंस का गं? समुद्राच्या किनाऱ्यावर असा पॅलेस.... कसलं सहही वाटत असेल ना तिथे? मी काही वर्षांपूर्वी त्या पॅलेसचे एका मासिकात फोटो पाहिले होते. काय सॉल्लिड आहे ना? '' मी अजून पॅलेसेस, महाल, प्रासादांच्याच दुनियेत होते.
''हो तर, आणि ही बघ, माझ्या हातातली ही यादी.... सोन्याचे, हिरे-पाचू-माणिक-पोवळ्याच्या दागिन्यांची वर्णनं वाच जरा.... डोळे फिरताहेत नुसती वर्णनं वाचून.... प्रत्यक्षात काय दिसत असतील!!! '' मैत्रिणीने हातातली कागदांची चळत पुढे केली.
पुढची काही मिनिटे आम्ही अशाच हातातली कागदपत्रे चाळण्यात मग्न होतो. त्या यादीत त्यांच्या घराण्यातील पारंपारिक जुन्या दागदागिन्यांचीही तपशीलवार वर्णने होती. ती भावनाशून्य, तंत्रशुद्ध, निर्विकार वर्णने वाचतानाही माझ्या नजरेसमोर त्या वस्तू प्रत्यक्षात कशा दिसत असतील याच्या विविध शक्यता तरळत होत्या.
''ए, तू खरं त्या बाईंशी थोडं बोलायला हवं होतंस....'' माझी तंद्री भंग करत मैत्रिणीने मला ढोसले. ''ती तू मला एकदा सांगितलेली त्यांच्या घराण्यातील सासूबाईंची आणि तुझ्या पणजोबांची गोष्ट त्या बाईंच्या कानावर घालायला हवी होतीस!'' मैत्रिणीच्या ह्या उद्गारांसरशी मी तिच्याकडे ''वेड लागलं नाही ना तुला? '' अशा आविर्भावात पाहिल्यावर ती थोडा वेळ शांत बसली. मग पुन्हा फुसफुसली, ''सांग ना ती गोष्ट परत! ''
''हं, '' मी निःश्वास सोडला. ''त्यांना माहीतच असेल गं ती गोष्ट! मी काय वेगळं सांगणार? हां, त्या पणजोबांची मी पणती आहे एवढं तरी सांगता आलं असतं.... पण तितका वेळ मिळायला तर पाहिजे ना त्यांच्याशी बोलायला! इथे आपल्याला त्यांच्याशी एक वाक्य बोलायचीही चोरी होती!! '' मैत्रिणीने माझ्याकडे ''यह नही सुधरेगी,'' सदृश भाव चेहऱ्यांवर आणून खेदाने पाहिले! तिच्या मते अशी संधी मागून मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. ''गोष्ट सांगते आहेस ना? '' तिने पुन्हा एकदा ढोसले.
''हं, ऐक. माझ्या पणजोबांनी, म्हणजे आजीच्या वडीलांनी एकदा कोंकणात एका चिमुरड्या परकरी मुलीला पायात आपट्याच्या पानांचे तोडे घालून खेळताना पाहिलं. माझे पणजोबा आपले कोंकणातले साधेसुधे भिक्षुकी करणारे कुडमुडे ज्योतिषी! थोडीफार शेती, भिक्षुकी आणि ज्योतिषाच्या आधारावर ते स्वतःचे घर चालवायचे. तर असेच एक दिवस ही मुलगी त्यांना खेळताना दिसली. त्यांनी त्या मुलीची लक्षणे पाहून तिच्या घरच्यांना सांगितले की भविष्यात ही मुलगी राज्ञीपद भूषवेल. त्या लोकांचा विश्वास बसला की नाही कोणास ठाऊक! पण खरोखरीच पुढे काही वर्षांनी त्या मुलीला राजघराण्यातून मागणी आली आणि ती राणी झाली. मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही.... '' मी बोलण्यात जरा उसंत घेतली.
''मग, पुढे? '' मैत्रिणीचा उत्सुक स्वर.
''पुढे काय, माझ्या पणजोबांना आपण असे कोण्या मुलीचे भविष्य सांगितले होते ह्याचाही विसर पडला होता. परंतु त्या मुलीच्या घरचे लोक ही गोष्ट लक्षात ठेवून होते. तिचे राजघराण्यात लग्न ठरल्याबरोबर माझ्या पणजोबांना त्या लग्नकार्याला उपस्थित राहण्याचे पद्धतशीर सन्मानपूर्वक आमंत्रण करण्यात आले. एवढेच नव्हे तर कोंकणातल्या त्यांच्या गावापासून त्या संस्थानाच्या राजधानीपर्यंतच्या लांबच्या प्रवासाची सर्व व्यवस्थाही राजघराण्यातर्फे करण्यात आली. पणजोबांना तिथे लग्नाचे सर्व विधी, उत्सव पार पडेपर्यंत आठ दिवस मोठ्या आदरातिथ्याने ठेवले गेले. माझे पणजोबा पडले अगदी साधे, बेताच्या परिस्थितीतले गृहस्थ! त्यांच्याकडे तिकडच्या थंडीसाठी आवश्यक गरम कपडेही नव्हते! मग त्यांच्यासाठी तिथे खास शिंपी बोलावून त्यांच्या मापाच्या गरम कपड्यांची सोय केली गेली, त्यांना पांघरायला मऊ, उबदार रजया दिल्या गेल्या. अगदी परत निघताना त्यांना मानाने लोटा भरून सुवर्णमोहोरा देऊ केल्या गेल्या. पण पणजोबा स्वभावाने अगदी निरिच्छ, साधेसुधे होते. त्यांना विलक्षण संकोच वाटला. ब्राह्मणाला काय करायचंय एवढं सोनं? असा सवाल करून शेवटी त्यातील मूठभर मोहोरा त्यांनी राजघराण्याच्या आग्रहाचा मान राखायचा म्हणून घेतल्या. रजया मात्र आपण नक्की घेऊन जाणार, फार उपयोगी पडतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि त्या रजया व सुवर्णमोहोरा घेऊन ते परत आपल्या कोंकणातील घरी परतले. पुढे त्यांच्या अकाली देहावसानानंतर परिस्थितीवश त्यातील अनेक मोहोरा उदरनिर्वाहास्तव खर्च झाल्या. परंतु काही मोहोरा माझ्या आजीला वाटणीत मिळाल्या, तर काही आजीच्या मोठ्या बंधूंना. त्या बंधूंच्या सुनेने सोन्याच्या त्या जाड मोहोरेला वळे जोडून त्याची अंगठीच बनवून घेतली. आमच्याकडच्या सुवर्णमोहोरा आजीने १९६१ च्या पानशेतच्या पुरात सर्व संसार-घरदार नष्ट झाल्यावर मोडल्या आणि त्यातून पुढचे विश्व उभे करण्यास हातभार लावला. अशा प्रकारे आमची सुवर्णमोहोरांची कहाणी सुफळ संपूर्ण झाली!! हं, टाका आता दक्षिणा!'' मी मैत्रिणीला चिडवले.
''हम्म्म! पण तुझ्या पणजोबांनी ते सगळे सोने घेतले असते तर गं??? '' माझी मैत्रीण स्वप्नाळू आवाजात उद्गारली.
''तर? तर आज त्या राजकारणी मायलेकांमध्ये जशी इस्टेटीवरून भांडणे, कोर्टकज्जे चाललेत ना, तसेच आमच्याकडेही झाले असते! एक लक्षात ठेव! ह्या लोकांना असा आयता, पिढीजात, बिनकष्टाचा पैसा पचत असेल, पण आपल्याला नाही पचत! आणि अशा पैशाला वाटा फुटतातच.... बघच तू! ''
''होsss की! म्हणूनच की गं बाई हे गर्भश्रीमंत लोक इतके ऐषोआरामात राहतात, सगळीकडे विमानाने नाहीतर महागड्या गाड्यांमधून प्रवास करतात, पॅलेसमध्ये राहतात.... कसेबसे हिऱ्यापाचूंचे दागिने घालतात! काय बाई, किती ते कष्ट!'' मैत्रिणीने वेडावून दाखवले.
''ए गप्प गं, त्यांना काय कमी टेन्शन्स असतात का! त्यांना या सगळ्या सुखांची किंमतही तेवढीच मोजावी लागते बरं! मी गॅरंटीने सांगते, रात्री झोप यायला गोळी घ्यायला लागत असणार ह्यांना! आता आपल्याकडच्या या केसचेच बघ ना! कसला वैताग येत असेल ना.... '' माझी मुक्ताफळे.
''ह्यँ! तसलं काही नसतं! त्यांना सवय असते अशा टेन्शन्सची! आपली ही भिक्कार प्रवृत्तीच आपल्याला नडते.... कायम कष्टाच्या, घामाच्या पैशाला नको एवढे महत्त्व देऊन, त्याच्या बाता करून करून ना आपल्या वाडवडिलांनी पार वाट लावली आहे आपली! अरे, आयता पैसा मिळाला तो लेने का, क्यूं - काय को वगैरा नही पूंछने का! पैसा काळा आहे का पांढरा, कोणाला काय पडलंय त्याचं.... मस्त राहायचं, ऐष करायची.... '' मैत्रिणीचे नेहमीचे डायलॉग्ज सुरू झाले होते. त्यांना थांबवायचा एकच उपाय होता.
''मला खूप भूक लागली आहे, '' मी घड्याळात डोकावत कुरकुरले. रात्रीचे नऊ कधीच वाजून गेले होते. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. मॅडमचे घर शहराच्या शांत, झाडीझुडुपांच्या रस्त्यावर असल्याने इथे त्या पावसातही रातकिड्यांची किरकिर व्यवस्थित ऐकू येत होती.
''ए, आज मस्त चायनीज खायचं का? मला मस्त गरमागरम सूप प्यायचंय! '' मैत्रिणीचे डोळे उत्साहाने लकाकले. हुश्श! सध्यापुरता तरी आयता/काळा पैसा आणि घामाचा पैसा यावरून आमचा होणारा नित्य प्रेमळ संवाद टळला होता.
''चालेल, पण पैसे आहेत का तेवढे? माझ्याकडे शंभराची नोट निघेल, '' इति मी.
''अरे, काळजी नही करने का! कालच बाबांच्या खिशातून मी शंभर ढापलेत.... आणि माझ्या पर्समध्ये असतील अजून साठ-सत्तर रुपये. आजचं आपलं चायनीज खाणं नक्की बसेल त्यात.''
ऑफिसमधील सर्व दिवे, पंखे मालवून, ऑफिस बंद करून आम्ही त्याची चावी मॅडमच्या घरी पोचवली आणि पॅलेसच्या गर्भश्रीमंत स्वप्नांमधून कष्टाने बाहेर पडत पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी आमच्या नेहमीच्या चायनीज रेस्टॉरंटकडे मोर्चा वळवला.
--- अरुंधती
खूपच मस्त लिहिलंय ताई.
ReplyDeleteसगळ्या सुखांची किंमत बरेचदा तेव्हढीच मोजावी लागते, हे एकदम खरं!
धन्यवाद विद्याधर! अनेक श्रीमंत घरांमधील दु:खे आपल्याला कधी कळत नाहीत म्हणून! दिवसभर ऐषोआरामात राहून रात्री झोपेसाठी तळमळणारे सुखी म्हणायचे की अर्धपोटी राहूनही रात्री बिनघोर झोपणारे सुखी, हाच प्रश्न पडतो!
ReplyDeleteअकु,
ReplyDeleteलेख मस्त जमलाय.
एक विचारायचं होतं. तुमचं ते यु ट्य़ुबवरच (आध्यात्मिक) गाण(?), माबोवरच्या पाट्या, प्रोफेशन वकिली, आणि ते खट्याळ लिखान, काहिसं फिलोसॉफिकल टच आणि आध्यात्मिक अवतार.
हे सगळे एक मेकाच्या जवळपासही न भटकणारे पैलु एकाच व्यक्तित बघुन नवलच वाटतं ब्वा.
मी, बेफिकिर व केदार नंतर तुमचं लिखान न चुकता वाचतो(माबोवर). आता ईकडेहि फेर फटका मारत जाईन.
मधुकर, धन्यवाद इथे आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल! :-)
ReplyDeleteमला अनेक गोष्टींमध्ये रस आहे, म्हणून तो जिव्हाळा लेखनातही उतरत असेल बहुतेक! एकच आयुष्य दिलंय देवानं, त्यात बरंच काही करायचंय! :-) असो. आपल्यापेक्षा खूप प्रगल्भ, बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची माणसं बघण्यात असली, संपर्कात असली की कायम तुम्हाला त्यांच्याकडून स्फूर्ती मिळत रहाते. मी भाग्यवान आहे की माझ्या आजूबाजूला अशी माणसं आहेत.... त्यांच्याकडे पाहिल्यावर जाणवतं, अजून बराच पल्ला गाठायचा आहे! :-)