वेळ : सकाळी ७:०० वाजता
स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप
वार : रविवार
काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!
मी कोपर्यातील माझ्या जागेवरून आमच्या विस्कळीत घोळक्याचा अंदाज घेत बसले आहे.
स्मिता, साना आणि श्वेता नेहमीप्रमाणे एकमेकींशीच बोलण्यात मग्न आहेत. त्यांच्या चकाकत्या पर्सेस त्यांच्या आजूबाजूला विखरून पडल्या आहेत. आपल्याच घरच्या दिवाणखान्यात बसल्याचा थाट. पर्या, लाल्या, मट्टू, खंडू एका ऐसपैस सोफ्यावर आपापल्या ''बियर बेलीज्'' सांभाळत दाटीवाटीने बसले आहेत. लाल्या बगळ्यासारखी मान तिरकी करून फ्रेंच विंडोच्या काचेतून दिसणार्या इनफिनिटी स्विमिंग पुलाकडे आणि त्यात तरंगणार्या दोन-तीन आंग्ल जोडप्यांकडे डोळे विस्फारून बघत आहे.
सुभ्याने मेन्यू कार्डात डोकं खुपसलंय. आंद्या त्याच्या खांद्यावरून मेनूकार्ड वाचायचा वृथा प्रयत्न करत आहे. शैली एक पाय हेलकावत शून्यात नजर लावून आपल्याच हाताच्या बोटाचे नख कुरतडत बसली आहे. विनू मोबाईलवरचा मेसेज धीरगंभीरपणे तपासतोय. सूझन बोअर होऊन कॉफी शॉपमधील तुरळक गर्दीकडे, इकडे-तिकडे भिरभीर नजर फिरवते आहे. दीपा आणि सुशांत हळूऱ्हळू आवाजात एकमेकांशी काहीतरी गुफ्तगू करत आहेत.
एवढ्यात वेटर आमची ऑर्डर घ्यायला येतो. त्याच्या आगमनासरशी समोर बसलेल्या गलितगात्रांच्या अंगात त्राण संचारते.
''ए आधी सर्वांना कडक चहा मागव! झोपलेत सगळे!''
''ए गपे, तुला काय कळतंय! माहितेय ना, इथला चहा किती फुळकवणी असतो ते... तो कडक चहा प्यायचा असेल तर इथून उठायचं आणि अमृततुल्यमध्ये जायचं हां... त्यापेक्षा कॉफी सांगा सगळ्यांना!''
''नको, चहाच बरा!''
''पर्यासाठी बोर्नव्हिटा सांगा रे! तो ग्रोईंग बॉय आहे ना!!'' हे पर्याच्या ढेरीला ढोसत आणि डोळा मारत.
''बरं तो पॉट-टी मागवूयात ना! खूप दिवसात प्यायला नाहीए...''
''हा हा हा.... काय गं श्वेते, तुला काय म्हणायचंय नक्की? सकाळच्या पारी पॉट्टी.... ''
''ईईईई... कसला घाणेरडा आहेस रे तू! बरं बरं... तो किटलीतला चहा असतो ना, तो मागवूयात, झालं?''
''ए त्या सुशाला हालवा जरा.... काय त्या दीपाशी लाडंलाडं बोलत बसलाय.... जाम कन्फ्यूज्ड आहे ती! त्यालाही कन्फ्यूज करून सोडेल!''
''छोड ना यार, काय को उन के बीच अपनी तंगडी अडाता है.... ते काय चिल्लीपिल्ली नाहीएत. असेल कायतरी सीरियस.''
''अरे कसले मरगळल्यासारखे बसलेत रे सगळे!! सर्वांची पी.टी. घेतली पायजेल आपल्या ड्रॅगन मास्तरासारखी. उठा की राव आता! इथं काय झोपायला आलात का रे?''
''ह्यॅ! ही काय वेळ आहे का सोशलायझिंगची! फक्त अन् फक्त विन्यासाठी आलोय मी इथं! समजला ना?''
''व्वा! म्हणजे जसं काही आम्ही इथं गोट्या खेळायलाच आलोत जणू! कै च्या कै.....''
''लाल्या, लेका, अरे मान मोडेल रे तुझी... किती ताणतोस! तू कधी गोर्यांना स्विमिंग करताना बघितलं नाहीएस का?''
''तुम्हाला काय करायचंय रे लेको, माझी मान हाय.... मी काय पण करंल....''
''विन्या, तो मोबाईल बाजूला ठेव आता.... अरे ठरवा रे चटकन काय ऑर्डर करायचंय ते!''
''असं करुयात, चहा - कॉफी दोन्ही मागवूयात. ज्याला जे हवंय ते तो घेईल. सोबत ब्रेड बटर.''
''नको, त्यापेक्षा सँडविचेस मागवू.''
''हे बघा, तुम्ही सँडविच मागवा नायतर ब्रेडबटर मागवा.... पण लाल्यासाठी चहाबरोबर केचप पण मागवा.''
''आँ??''
''काय राव, विसरलात का.... कॉलेजात असताना आपण वेंकीजला गेलेलो.... लै बिल झालं व्हतं.... तर ह्या पठ्ठ्यानं टेबलावरच्या केचपची बाटली सरळ चहात उपडी केलेली.... म्हणे पैशान् पैशाची किंमत वसूल केली पायजेल.... काय तुमी... विसरलात येवढ्यात?!!!''
''ए पण मला इथला कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट ट्राय करायचा होता ना!'' सूझन मधूनच गळा काढते.
''सुझू, तू तुझ्या घों बरोबर येशील ना इथं तेव्हा ट्राय कर हां कॉन्टिनेन्टल.... आत्ता आपण मेजॉरिटी बघतोय ना...'' आंद्याचा सूझनला प्रेमळ स्वरात समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न.
''आंद्या, लेका, बायकोशी बोलतोस का रे इतका प्रेमाने.... बिच्चारी परवा फोनवर इतकी वैतागली होती!!''साना आंद्याला टोकते. लगेच स्मिता तिची 'री' ओढते. दोघींची सवयच आहे तशी.
खंडू अस्वस्थपणे केसांतून हात फिरवतोय. त्याला सिगरेट सोडून जेमतेम आठ दिवस झालेत. पण जरा आजूबाजूला सिगरेटच्या धुराचा वास आला की तो लगेच अस्वस्थ होत असतो.
''ए विन्या, तुझी बायडी आणि पोर ठीक आहेत. चांगली डाराडूर झोपली आहेत ना वर तुमच्या खोलीत? आम्ही तू राजस्थानातून इथं आला आहेस सुट्टीसाठी, म्हणून खास तुझ्यासाठी जमलो आहोत बरं का इथं! तेव्हा तो मोबाईल बाजूला ठेव आणि बोल गुमान आमच्याशी!!'' शैलीचा धमकावणीचा स्वर.
''आरे, पण चा-कॉफीचं कायतरी सांगा नं राव...!!!'' इतका वेळ गप्प बसलेला मट्टू उसळून म्हणतो. त्याच्या चेहर्यावरून त्याला भूक लागली आहे हे स्पष्ट दिसतंय. पण त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.
सँडविच की ब्रेड-बटर की चीज-टोस्ट..... की कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट.... चहा की कॉफी की पॉट टी....
घोळवून घोळवून, एकमेकांना ढोसत, चिमकुटे काढत, फटकारत चर्चा चालूच राहते.
एवढा वेळ अदबीने उभा राहिलेला वेटर वैतागून हातातली वही-पेन्सिल परजतो आणि जरा खाकरतो.
''मी एक सजेस्ट करू का सर?''
''हा, बोल...''
''तुम्ही जी असेल ती ऑर्डर देऊन टाका, नंतर काय हवं-नको ते मागवता येईल...''
''हम्म्म... गुड... गुड... बरं, असं कर...'' आंद्याचं उरलेलं बोलणं स्मिताच्या किंकाळीत नाहीसं होतं....
सगळेजण दचकून तिच्याकडे पाहू लागतात, तर ती खिडकीतून बाहेर बघत असते.... 'ए, ए, ते बघ खारीचं पिल्लू!!!!!!'' कोवळ्या उन्हात टुकूरमुकूर बघत एक खारीचं पिल्लू तुरुतुरु खिडकीजवळ आलेलं असतं. त्याला बघायला साना आणि श्वेताही पुढे झेपावतात. खंडू कपाळ बडवून घेतो. बाकीचे लोक सुटकेचा नि:श्वास टाकतात.
''मग विनू, बायडीला फिरवलंस की नाही इथं? शॉपिंग केलंस की नै काही?'' शैली मुलाखतकाराच्या आवेशात विनूला टोकरू लागते. शॉपिंग चं नाव काढता क्षणी विनू शहारतो, त्याच्या चेहर्यावरचे झरझर बदलणारे भाव जाम कॉमेडी असतात. त्याची कणव येऊन पर्या मध्येच आपलं नाक खुपसतो आणि विन्याच्या गेल्या भेटीनंतर शहरात किती बदल झालेत ह्याची चर्चा सुरू करतो. सगळेजण अहमहमिकेने आपापली मते, दृष्टिकोन, विचार इत्यादी इत्यादी मांडतात. चर्चा रंगत असतानाच चहा-कॉफी व बाकीची ऑर्डर येते.
कॉलेजातील आठवणींना स्मरून मीठ मिरपुडीला चहा-कॉफीत मिसळण्याची ऑफर आग्रहाने केली जाते. कॉलेजातील तेलकट वडा-पाव आणि कळकट कपातील चहाच्या उकळपाण्याच्या आठवणीने क्षणभर काहीजणांचे गळे भरून येतात. मधूनच हास्याचे फवारे, मधूनच खेचाखेची, काटे-चमच्यांची पळवापळवी असले माकड उद्योग चालूच असतात.
काटे-चमचे-कप-बश्यांच्या किणकिणाटासोबत संभाषणाचे स्वर हेलकावे घेत राहतात.
चर्चेची गाडी रस्त्यांची खराब अवस्था, पेट्रोलचे चढते भाव, मुलांच्या शाळांच्या अवाढव्य फिया, नवा सिनेमा, आवडते हिरोऱ्हिरॉईन अशा अनेक वळणा-वळणांनी सरकत पुढे जात राहते.
बघता बघता नऊ वाजून जातात. बाहेर लख्ख ऊन पडलेले असते. दूरवर ट्रॅफिकचा आवाज शहर पुरते जागे झाल्याची साक्ष देत असतो. कॉफी शॉपमध्ये आता लोकांची वर्दळ वाढलेली असते. एक-दोनदा वेटर आमच्या टेबलांपाशी घुटमळून जातो. पण त्याला हातानेच ''नंतर ये'' ची खूण केली जाते.
संभाषणाच्या आवर्तात पर्यानं शहरात आपलं पाचवं दुकान खोललं आहे आणि गेल्याच महिन्यात स्वारीने राजकारणात प्रवेश केलाय ही बातमी कळते. खंडूच्या साखर कारखान्याला यंदा चांगला नफा झालाय. त्यामुळे कारखानदार साहेब खूश आहेत. त्याच्याकडूनच आज हजर नसलेल्या जग्गूची बातमी कळते. जग्गूच्या मालकीची बागायती जमीन आहे बरीच एकर. शेतीचं काम निघाल्यामुळेच त्याला यायची फुरसत झालेली नसते.
सुभ्या त्याच्या नव्या बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये एक मोठं देऊळ बांधतोय. त्याच्या वडिलांच्या नावाने त्याला तिथे दरवर्षी सांस्कृतिक उत्सव सुरू करायचाय. दीपाचा डिवोर्स फायनल झाल्याची बातमी कुजबुजत सांगितली जाते. सुशांत तिला गुंतवणुकीचे सल्ले देतोय म्हणे! विनू लाजत आपल्याकडे दुसर्यांदा गुड न्यूज असल्याचे कन्फर्म करतो. मट्टूला मॅजिस्ट्रेटच्या पोस्टचा कंटाळा आलाय. त्याला पुन्हा प्रॅक्टिस सुरू करायची आहे. सानाचं बाळ आता तीन वर्षांचं झालंय, आपल्या मोबाईलमधले बाळाचे फोटो ती सर्वांना कौतुकाने दाखवत आहे. सूझनचं बूटिक मस्त चाललंय. तिला तिचा बिझनेस वाढवायचाय.....
अचानक शैलीचा मोबाईल घणघणतो. ''येस बेबीऽऽ..... एक्स्क्यूज मी प्लीऽज...'' म्हणत ती जागेवरून उठून एका कोपर्यात जाऊन मोबाईलमध्ये लाडं लाडं बोलत राहते. मग टेबलापाशी येऊन ''सॉरी हां लोक्स! मला घरी जायला हवं... आमचं पिल्लू उठलंय मगाशीच आणि ममाच हवीए म्हणून गळा काढलाय...'' असे म्हणत खांद्याला पर्स लटकवते. तिला तिच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी खंडू लगबगीने उठतो. मट्टू आणि पर्या सर्वांचा एक घाईघाईतला ग्रुप फोटो घेतात.
शैलीच्या निघण्यासरशी इतर मंडळींना वेळेचं भान येऊ लागतं.
''ओ गॉड! दहा वाजत आले.... नो वंडर! ए मलाही गेलंच पाहिजे...'' स्मिता चित्कारते. एकेक करत ललना वर्ग कॉफी शॉपमधून पाय काढू लागतो. व्हिजिटिंग कार्डस् ची देवाण-घेवाण होते.
सुभ्या देखील बरीच कामं आहेत असे म्हणत निघाल्यावर त्याला दमदाटी करून पुन्हा बळजबरीने जागेवर बसविण्यात येतं. खिशांतून सिगरेट पाकिटं-लायटर बाहेर येतात. नाश्त्याचा अजून एक राउंड होतो. कॉलेजच्या आठवणी, जुनी प्रेमप्रकरणं, बाज्याचा अपघाती मृत्यू, शर्याला निघालेला डायबिटीस, वाढणारं वजन, विरळ होत चाललेले केस....
विन्याचा मोबाईल वाजतो. पलीकडून एक बायकी स्वर जरा घुश्शातच काहीतरी विचारतो. विन्या थयुं थयुं करत काहीतरी उत्तर देतो. इतरांना बरोब्बर त्या फोनचा अर्थ कळलेला असतो. खिशातून पैशाची पाकिटे काढली जातात. इतका वेळ कोपर्यात सरकवून ठेवलेले बिल चुकते केले जाते.
''ए नेक्स्ट टाइम आपण कोठेतरी पिकनिकला जाऊयात. मस्त लाँग ड्राइव्ह किंवा बीचवर कोठेतरी.... व्हॉट से?''
सर्वांनाच नुसत्या कल्पनेनेही हुरूप चढतो. मनातल्या मनात त्या पिकनिकचे प्लॅनिंगही सुरू होते....
पुन्हा एकदा कोणाचा तरी मोबाईल वाजतो. लोकांना आपण घरी निघालो होतो ह्याची आठवण येते. एकमेकांशी हस्तांदोलन करून निरोपानिरोपी होते. फोन, ईमेल, भेटीची आश्वासने दिली घेतली जातात. आपापल्या गाड्यांच्या दिशेने लोकांचे मोर्चे वळतात.
फारसं महत्त्वाचं असं काहीच बोलणं झालेलं नसतं. तरीही मनावर अनामिक आनंदाची सुस्ती दाटलेली असते. चेहर्यावर विलसत असते एक खुळे हास्य. बोलून बोलून आणि हसून खिदळून गाल दुखत असतात. अनेक दिवसांनी सगळेजण आपापली पदे, जबाबदार्या, व्याप विसरून जुन्या मैत्रीच्या अनौपचारिक आणि निखळ वातावरणात मनावरचे ताण विसरलेले असतात. थोड्याच वेळात जणू त्यांना आपलं तारुण्य परत मिळालेलं असतं. मनावरचं दडपण दूर झालेलं असतं. अल्लड, टपोर्या वयातील गुलनार आठवणी जागवून काळजात एक नवा उत्साह नाचू लागलेला असतो. विसर पडलेली स्वप्ने पुन्हा खुणावू लागलेली.... आणि त्याचवेळी मनाची व्यवहारी बाजूही जागी झालेली....आळसाची वेळ संपल्याचे संकेत येऊ लागतात.... नकळतच पुढच्या आठवड्याचे प्लॅन्स मनात घोळू लागतात.
रविवारची एक सुरम्य सकाळ आता ओसरलेली असते.
-- अरुंधती
**********************************************************************************
हे असंच जाता जाता सुचलेलं! वरील ललितामधील सर्व पात्रे काल्पनिक आहेत व त्यांचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा! :-P
अप्रतिम. कसलं फ्रेश वाटलं वाचून :)
ReplyDeleteधन्स हेरंब! कॉलेजातला टाईमपास आठवला ना? :-)
ReplyDeletesuperlike
ReplyDeleteधन्यवाद दत्तात्रय! :-)
ReplyDeleteछान! कसलीही लेबलं न लावलेली निखळ मैत्री काही वेळ का होईना अनुभवावीच अधुनमधून. मूड एकदम झकास होऊन जाईल! :)
ReplyDeleteधन्यवाद भानस! :-) अशा मैत्रीची किंमत कधी होऊच शकत नाही हेच खरं!
ReplyDelete