आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान, पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.
''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )
पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''
''आँ?? .... म्हणजे रे काय? ''
''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''
''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''
''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''
''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''
''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''
''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''
''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''
''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''
''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.
''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''
''आणि बाकीचा दिवस?''
''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''
''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''
''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''
''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''
''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''
''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''
''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''
''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''
''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''
बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....
बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.
एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?
बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....
मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?
कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ? त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?
कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''
काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्हास'' होतो? आणि र्हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्या व मनःपटलावर आदळणार्या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!
मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....
इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?
बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!
-- अरुंधती
मनोपटल -> मन:पटल; 'प फ ब भ म' मधल्या (वा इतर वर्गांतल्या) पहिल्या दोन वर्णांच्या आधी विसर्ग आल्यास त्याचा 'ओ' होत नाही. आणि 'मनोकामना' शब्द मराठीत स्थिरावला असला तरी तो 'मन:कामना' असा आहे. मात्र संस्कृतमधेही असे अपवाद आहेत, तर मराठीत का असू नयेत? 'आशिस्' हा शब्द स्त्रीलिंगी असूनही मुलाचं नांव 'आशिष' ठेवतात म्हणून रागावणारे संस्कृतपंडित मी पाहिले आहेत, आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल अर्थात आदर आहेच.
ReplyDeleteबटाट्याच्या चाळीतल्या प्रत्येक घरांत काय पदार्थ शिज़ला हे सगळ्यांना कळे, कारण समोरच्या खोलीत दार न लावता लोक ज़ेवण करीत. हे पुरुषोत्तमाच्या पुस्तकात वाचायला छान वाटतं, पण वाचायलाच छान वाटतं. त्या काळात पुरुष कदाचित बायकोला बदडून काढायलाच दार लावत असतील, किंवा तो समारंभही दार उघडं ठेऊनच उरकत असतील. ते पुरुषोत्तम कालौघात लुप्त झाले. ते सौदीत, काबूलकडे अज़ूनही आहेत, पण हिन्दु लोक म्हणजे अमेरिकनांइतकेच आधुनिक. आधुनिक भारतीय नवरे बायकोबरोबर अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहतात.
'मनोपटल' शब्द पहिल्यांदाच वाचला, पण ते एक सोडून लेख आवडला.
- नानिवडेकर
far surekh vichar mandala ahes.
ReplyDeletekhraech vichar karayachi vel ali ahe ki san kala pramane badalavet ka nahi ?
ek navi kalpana kathet khup chhan gunfali ahe.
धन्यवाद नानिवडेकर व आशू ताई! :)
ReplyDeleteनानिवडेकर, बदल केला आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद.
योग्य शब्दात मांडलत सगळ...बर्याच ठिकाणी आता दिवाळीकडे वेगवेगळ्या कोनातून पाहिलं जातेय... बंड्याच सोल्युशन पटते पण थोडा समतोल पण हवा एकदम जून्या रुढी टाकून कसे चालेल ... बाकी थोड्याफार फरकाने असे बदल होतच राहतील काळाच्या ओघात आपणही त्यात सामावले जातोच....कालाय तस्मै नम:
ReplyDeleteदवबिंदू, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बंड्याला जे पटतं, जमतं, आवडतं, रुचतं ते त्यानं केलं. कोणाच्या दबावाला बळी न पडता. स्वतःच्या मर्जीने. आणि त्यात त्याने स्वतःचा व कुटुंबियांचा आनंदही जोपासायचा प्रयत्न केला. ज्याला ज्यामुळे आनंद मिळेल त्याने ते ते करावं. रूढी, प्रथांचे दडपण येऊन त्या आचरणात आणण्याचा काय फायदा? :)
ReplyDeleteइरु ताई .. लेख आवडला .. आधी का नाही लिहिला ग? .. 1-2 दिवाळी tension मध्ये गेल्या नसत्या :-)
ReplyDeletegoshta wachayachya aadhi Shri Naniwadekarachi tipani wachli.
ReplyDeleteKhup chan..
Kadachit goshti peksha chan asel, Shri Naniwadekar Aapan Goshta Ka nahi lihit....
थँक्स संदीप! :)
ReplyDelete